अगोरा—प्राचीन अथेन्सचे केंद्रस्थान
अथेन्सच्या बौद्धिक समाजात गोंधळ माजला होता! त्या ग्रीक शहराच्या अगोरात किंवा बाजारपेठेत नेहमी नवनवीन कल्पनांना प्रसिद्धी दिली जात असे. परंतु, ह्या वेळेला काही तरी वेगळेच घडत होते. शहरात नुकताच आलेला एक यहुदी मनुष्य “परक्या दैवतांची घोषणा करणारा” वाटत होता. “जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर” तो लक्षवेधक गोष्टी करीत होता. गर्विष्ठ एपिक्युरियन आणि गंभीर चेहऱ्याच्या स्तोईक लोकांनी, “हा बडबड्या काय बोलतो?” असे विचारले. होय, अथेनियन अगोरा, असे ठिकाण होते जेथे जगातील अगदी कोणत्याही विषयावर जाहीरपणे वादविवाद होत असत. पण, अनोळख्या दैवतांचा उल्लेख—बापरे, हा तर कहरच होता!—प्रेषितांची कृत्ये १७:१७, १८.
प्रेषित पौलाने जेव्हा अथेन्सच्या अगोरात पहिल्यांदाच प्रचार करावयास सुरवात केली तेव्हा अथेनी लोकांची अशी संशयास्पद प्रतिक्रिया होती. तो येशू ख्रिस्त आणि पुनरुत्थानाविषयी बोलत होता. परंतु, अथेन्सच्या मोकळ्या मनाच्या भासणाऱ्या संस्कृतीला, अगोरात अशी नवीन कल्पना ऐकून विचित्र का वाटत होते?
अथेन्समधील चौकाची निर्मिती
खरे तर, अगोरा हे ठिकाण आणि अथेनियन लोकांच्या धार्मिक व सामाजिक जीवनातील त्याची प्रमुख भूमिकाच अनोखी होती. ॲक्रापोलिसच्या वायव्य दिशेला सुमारे २५ एकराची अथेन्सच्या अगोराची जमीन जराशी उतरणाची आहे. असे दिसते, की सा.यु.पू. सहाव्या दशकाच्या सुरवतीला अथेनियन मुत्सद्दी आणि विधिनिर्माता सोलोन याच्या जीवनकालादरम्यान, ह्या जागेला शहराचा सार्वजनिक चौक बनवण्यात आले. अथेन्समध्ये लोकसत्ता स्थापन झाल्यावर नागरिक जीवनावर अधिकाधिक जोर देण्यात येऊ लागला ज्यामुळे पुढील शतकाच्या आरंभीच्या वर्षांमध्ये बांधकामाचे जंगल बरेच वाढले. यामुळे अगोराला नवीन जीवन मिळाले आणि अधिक महत्त्वाची एक भूमिका मिळाली.
ग्रीक शब्द अगोरा याचा उगम एका क्रियापदातून होतो ज्याचा अर्थ, “एकत्र येणे, जमणे” असा होतो. शहराचे भेटण्याचे प्रमुख ठिकाण असा जो अगोराचा उपयोग केला जाता होता तो या शब्दाप्रमाणे अगदी उचित आहे. अगोरा, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचे केंद्रस्थान बनले. ते, नागरिक प्रशासनाचे आणि न्यायमंडळाचे अधिष्ठान होते; बाजारहाट आणि व्यापाराचे प्रमुख ठिकाण होते; ग्रीक नाटक सादर करणारे रंगमंडल होते; व्यायामविषयक प्रदर्शनांचे ठिकाण होते आणि बौद्धिक चर्चेसाठी भेटण्याची सर्वात आवडती जागा होती.
अथेन्सच्या अगोऱ्याची मंदिरे, स्तंभावल्या, मूर्ती, स्मारक आणि सार्वजनिक इमारती यांचे अवशेष पाहण्यासाठी आमच्याबरोबर एक फेरफटका मारायला तुम्हाला आवडेल का? अगोराचा भूतकाळ पाहायचा असेल, तर आपण आधुनिक दिवसाची गजबज, गोंधळ विसरून जाऊ आणि खड्यांच्या रस्त्यावरून, निःस्तब्ध संगमरवर अवशेष, कोरलेले दगड, गवत आणि जंगली वनस्पतींनी झाकून गेलेल्या व मोडकळीस आलेल्या प्रवेशद्वारांतून वाट काढू या.
मंदिरे, देवळे आणि संरक्षक देवता
विविध दैवतांना समर्पित केलेली अनेक मंदिरे, देवळे आणि मंदिरातले देव्हारे पाहून भेट देणारे प्रभावित होतात. यामुळे अगोरा, उपासनेचे मोठे केंद्र बनले. ॲक्रापोलिसच्या खालोखाल याचाच नंबर लागतो. चिरसंमत अथेन्सच्या सुवर्ण युगादरम्यान, धर्म सार्वजनिक जीवनाच्या कणा कणात सामावलेला होता. म्हणजे याचा असा अर्थ नक्कीच होतो की, सरकारी विभाग आणि प्रशासकीय सेवांच्या विविध ‘संरक्षक देवतांची’ अगोरात देव्हारे होती.
यांपैकी हेफिस्टोसचे मंदिर सर्वात प्रमुख होते. अथीना देवीचा हेफिस्टोसशी संबंध होता. येथे, ह्या दोन्ही दैवतांची, कला आणि हस्तकलेचे संरक्षक देवता म्हणून उपासना केली जायची. पुरातत्त्वीय संशोधनांत या मंदिराच्या सभोवती सापडलेल्या धातूंच्या वस्तू आणि मातीची भांडी हेफिस्टोसशी संबंधित असल्याची ओळख पटली आहे. हा कलेचा ग्रीक देवता आहे, ज्याच्या उपासनेत अग्नीचा उपयोग केला जाई. कदाचित सा.यु. सातव्या शतकात, सुरक्षित ठेवलेल्या या मंदिराचे रूपांतर, सेंट जॉर्ज ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चमध्ये झाले; पण हे चर्च आज इतके वापरात नाही.
अर्थातच, अगोराला स्वतःचे संरक्षक दैवत हवे होते. त्याचे नाव होते, झ्यूस अगोरेऑस. तो प्रार्थनास्थानाचा कल्पित प्रेरक होता; मौल्यवान पेन्टेलिक संगमरवरच्या दगडात कोरलेली एक सुशोभित वेदी याला समर्पित करण्यात आली होती. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १४:११, १२.) शेजारी, दैवतांची माता हिच्या वेदीच्या दोन्ही बाजूंना शूरवीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकांचे भव्य दृश्य होते.
थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक लहानसे आयोनिक मंदिर दिसते. हे, पिता अपोलोचे मंदिर आहे, असे भूगोलतज्ज्ञ पॉसनियस यांचे म्हणणे आहे. का बरे? कारण, एका प्राचीन ग्रीक दंतकथेनुसार, अपोलो, आयोनचा पिता आणि अथेनी लोक ज्याचा भाग आहेत त्या आयोनियन वंशाचा संस्थापक होता.a या अधिकारात, विशेषकरून तेव्हा शहरात अस्तित्वात असलेल्या विविध संकुलकांच्या संबंधात अपोलो राज्य प्रशासन संघटनेचा एक संरक्षक देवता होता.
उत्तरेकडे लागलीच, चुनखडीने बनवलेल्या एका लहानशा मंदिराचे अवशेष आपण पाहतो; हे मंदिर सा.यु.पू. चौथ्या शतकाच्या मध्यादरम्यान बांधण्यात आले होते. येथे झ्यूस आणि अथीना फाट्रियोस यांची उपासना केली जाई; ते, पूर्वजीय धार्मिक संकुलकाचे प्रमुख देव होते. या संकुलकांमध्ये सदस्यत्व मिळवणे अथेनियन नागरिकत्वाची एक आवश्यकताच होती. रस्त्याच्या पलीकडेच आपण बारा देवांच्या एका वेदीचे अवशेष पाहतो.
जवळपासच्या झ्यूस एल्यूथेरोईसच्या स्तंभावलीत, पुन्हा ग्रीकच्या प्रमुख दैवताचा सन्मान केला जाई; पण येथे मात्र स्वातंत्र्य आणि मुक्ततेचा दैवत म्हणून. ही स्तंभावली किंवा स्टोआ, विहाराचे व सभेचे प्रसिद्ध ठिकाण होते. जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस आपल्या मित्रांसमवेत या स्तंभावलीत भेटायचा असे म्हटले जाते; तेथे बसून त्यांच्या गप्पा रंगायच्या किंवा ते रपेटही मारायचे. या स्तंभावलीला सजवण्याकरता केलेली अनेक समर्पणे व अर्पणे, जसे की, अथेन्सच्या सुरक्षिततेकरता लढलेल्या युद्धात मरण पावलेल्या योद्धांच्या ढाली यांचा, शत्रूंपासून शहराची झालेली सुटका किंवा शहराचे स्वातंत्र्य टिकवणे याजशी थेट संबंध होता.
पॅनॅथीनीयन मार्ग
अगोरामधून एक रुंद, खड्याखड्यांचा मार्ग जातो ज्याला पॅनॅथीनीयन मार्ग म्हटले जाते. हे नाव आणि खास वैशिष्ट्य, अथेन्सचा राष्ट्रीय सण, पॅनॅथीनीया यावरून घेण्यात आले होते. या सणादरम्यान अथीना देवीचा बुरखा (शहराच्या फाटकाजवळ असलेल्या) मिरवणूक गृहापासून ॲक्रापोलिसपर्यंत या रस्त्यावरून नेला जाई. एक पारथेनन उत्थित शिल्प आपल्याला सणाचा डामडौल आणि भव्यता यांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करण्यास मदत करते—घोडदळ, शर्यतीचे रथ, बलीच्या गायी आणि मेंढरे, बलीसाठी लागणारे साहित्य घेऊन जाणारे तरुणतरुणी, वगैरे. अथेन्सचे नागरिक आणि त्यांचे पाहुणे हा सण पाहत असत; यांच्या सुविधेसाठी शिल्पकारांनी अगोरा बनवला. जसे की, स्तंभावलींपुढचा ओटा आणि उतरत्या पायऱ्या मिरवणुकीचा मार्ग लक्षात ठेवून त्यानुसार कुशलतापूर्वक रचण्यात आल्या होत्या. दर्शनी भागावर कोरलेल्या असंख्य पायऱ्यांवर पुष्कळ प्रेक्षकांची सोय होऊ शकत होती.
“मूर्तींनी भरलेले”
एकाच ठिकाणी इतकी मंदिरे, पुतळे आणि स्मारके असल्यामुळे, “ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून [प्रेषित पौलाच्या] मनाचा संताप झाला,” हे काही आश्चर्याचे नाही. (प्रेषितांची कृत्ये १७:१६) पौलाने अगोरात प्रवेश केल्यानंतर जे दृश्य पाहिले त्यामुळे त्याला धक्काच बसला असावा. हर्मीस दैवताच्या लिंगाचे इतके पुतळे होते की त्यांना ठेवण्यासाठी हर्मीसची स्तंभावली असे नाव असलेली एक अख्खी स्तंभावली वापरावी लागली. हर्मीसच्या इतर रंगवलेल्या मूर्तींवर सुफलता आणि जीवन यांचे प्रतीक असलेल्या स्वास्तिकांची चित्रे होती. तेथे, काम देवता व्हिनस जेनेट्रिक्स हिचा तसेच, डायोनिसस ह्याचा देखील पुतळा होता ज्यावर अनेक लिंग क्रूस होते. अगोराच्या “पावित्र्याची” मर्यादा चिन्हित करणारा एक दगड होता जेथे “पवित्र” जल भरलेला एक जलकुंभ होता; आत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचे तेथे विधीपूर्वक शुद्धीकरण केले जाई.
असे अतिधार्मिक वातावरण लक्षात घेता, पौल किती धोकादायक परिस्थितीत होता हे आपण सहजपणे समजू शकतो. तो “परक्या दैवतांची घोषणा करणारा” आहे अशी त्याच्यावर शंका घेण्यात आली आणि त्या काळच्या नियमानुसार ‘कोणीही व्यक्ती स्वतःचे वेगळे दैवत किंवा नवीन दैवत मानू शकत नव्हता; किंवा जोपर्यंत त्याला अनोळख्या दैवतांची उपासना करण्याची सार्वजनिकरीत्या परवानगी मिळत नाही तोपर्यंत तो एकांतात त्याची उपासना करू शकत नव्हता.’ म्हणूनच तर प्रेषित पौलाला अरीयपगा येथे चौकशीसाठी नेण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १७:१८, १९.
प्रशासनाचे केंद्र
थोलोस नामक एका गोलाकाराच्या इमारतीत अथेनियन सरकाराचे मुख्यालय होते. शहरातील पुष्कळ अध्यक्ष रात्रीच्या वेळी येथेच झोपत असत, जेणेकरून जबाबदार अधिकारी नेहमी उपलब्ध असू शकत होते. प्रमाणभूत वजन आणि मापांचा एक संच थोलोसमध्ये नेहमी ठेवला जाई. प्रशासनाच्या विविध विभागांच्या सुविधा जवळपासच होत्या. थोलोसच्या वायव्येकडे, टेकडीच्या एका समतल भागावर परिषद भवन वसलेले होते. तेथे, ५०० लोकांच्या परिषदेचे सदस्य सभा भरवत असत; तेथे ते समिती कार्य करीत व विधान सभेसाठी कायदे तयार करीत.
रॉयल स्टोआ नामक आणखी एक महत्त्वपूर्ण नागरी इमारत तेथे होती. तेथे, अथेन्सचे रॉयल आरकॉन—शहरातील तीन प्रमुख दंडाधिकाऱ्यांपैकी एकाचे आसन होते. तेथून ते, धार्मिक आणि कायदेशीर अशा दोन्ही बाबींशी संबंधित असलेल्या अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या हाताळीत. बहुधा, अधर्मशीलतेचा आरोप करण्यात आलेल्या सॉक्रेटिसला कदाचित येथेच हजर राहावे लागले असावे. याच्यासमोरील बाजूला असलेल्या इमारतीच्या भिंतींवर अथेन्सच्या पूर्वजांचे नियम कोरण्यात आले होते. याच इमारतीपुढे ठेवण्यात आलेल्या एका दगडावर दर वर्षी आरकॉन किंवा प्रमुख दंडाधिकारी आपल्या कर्तव्याची शपथ घेण्यासाठी उभे राहत.
अत्तलसची स्तंभावली
अगोऱ्यातील सर्वात चांगल्याप्रकारे सुरक्षित ठेवण्यात आलेली इमारत म्हणजे, अत्तलसची स्तंभावली. पर्गममचा राजा (सा.यु.पू. दुसरे शतक) अत्तलस याने आपल्या तरुणपणी, भूमध्यातील राजसी घराण्यातील पुष्कळ इतर मुलांप्रमाणे अथेन्सच्या शाळेत शिक्षण घेतले होते. त्याचे राज्यारोहण झाल्यावर, त्याने ज्या शहरात शिक्षण घेतले होते त्या शहराला हे सुंदर बक्षीस दिले—अत्तलसची स्तंभावली.
अनौपचारिक संगती व देवाण-घेवाण यांच्यासाठी छप्परवजा व सुरेख विहार-पथ पुरवणे हा अत्तलसच्या स्तंभावलीचा प्रमुख उद्देश होता. हा विहार-पथ आणि चौथरा मिरवणूक पाहण्याकरता उत्तम ठिकाण होते; शिवाय विहार-पथ म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे ते एक चांगले शॉपिंग सेंटर देखील बनले असावे. पैसा मिळण्याच्या हेतूने कदाचित सरकारने तेथील दुकाने व्यापाऱ्यांना भाड्याने दिली होती.
अत्तलसची स्तंभावली तिच्या मूळ अवस्थेत पुन्हा रचल्यावर, ती भूमितीय रचनेचे एक सुरेख नमुना असल्याचे दिसून येते. तिचा एकूण आकार, खालच्या आणि वरच्या स्तंभांमधील आकारातला सुरेख फरक, ऊनसावलीची लपाछपी आणि बांधकाम साहित्याचा उत्कृष्टपणा व सौंदर्य या सर्वांमुळे ते अद्वितीय बनते. येथे एकसूरीपणा दिसून येत नाही, खासकरून यासाठी कारण येथे, डोरीक, आयोनियन आणि इजिप्शियन या तीन विभिन्न प्रकारच्या स्तंभशीर्षांचा उपयोग करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यांचे ठिकाण
अथेन्समध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम कॉन्सर्ट येथे व्हायचे. रोमी सम्राट अगस्टसचा जावई, विपसानियस अग्रीप्पा याजकडून ही इमारत एक भेंट होती. त्याचा पुढील भाग, रंगीबेरंगी संगमरवराचा होता. सुमारे २५ मीटरच्या या प्रेक्षागारात जवळजवळ १,००० लोक बसू शकत होते आणि पूर्वी यावर असलेल्या छप्पराला आतून कोणताही टेकू नव्हता. छप्पराबाबतचा हा प्रयोग प्राचीन जगातील सर्वात धाडसी प्रयोग होता! पंरतु, कदाचित तेथे सादर केले जाणारे बहुतांश मनोरंजन खऱ्या ख्रिश्चनांकरता नव्हते कारण त्यांचे नैतिक स्तर अतिशय उच्च होते.—इफिसकर ५:३-५.
प्राचीन काळचे जिज्ञासू लोक पॅन्टानोसच्या ग्रंथालयात जात असावेत अशी दाट शक्यता आहे. या ग्रंथालयाच्या भिंतींत कपाटेच कपाटे होती ज्यांत पपायरसच्या आणि चर्मपत्रांच्या हाताने लिहिलेल्या गुंडाळ्या जपून ठेवल्या होत्या. ग्रंथालयाच्या मुख्य खोलीचे तोंड पश्चिम दिशेला होते आणि स्तंभांच्या रांगेमधून एखादा समोरील स्तंभावलींचे अंगण पाहू शकत होता; हे अंगण रमतगमत फिरण्याकरता, वाचन करण्याकरता किंवा मनन करण्याकरता उत्तम ठिकाण होते. ग्रंथालयाच्या नियमांपैकी दोन नियम कोरलेला एक शिलालेख सापडलेला आहे. त्यावर हे नियम लिहिले होते: “कोणतेही पुस्तक येथून नेण्याची परवानगी नाही,” आणि “[ग्रंथालय] पहिल्या ते सहाव्या तासापर्यंत खुले राहील.”
आजचे अगोरा
अलीकडील वर्षांत, अमेरिकन स्कूल ऑफ क्लासिकल स्टडीझने अगोराचे जवळजवळ संपूर्णपणे उत्खनन केले आहे. उंचापुऱ्या ॲक्रापोलिसच्या छायेत निपचीत पडलेले अगोरा आता, प्राचीन अथेन्सच्या इतिहासाची झलक पाहू इच्छिणाऱ्या पर्यटकाची आवडती जागा बनली आहे.
अगोरा आणि ॲक्रापोलिसपासून काही पावलांच्या अंतरावर असलेले मोनॅस्टिराकी मौल्यवान वस्तूंचा जुना बाजार देखील दुसरे एक मोहक जग आहे. येथे भेट देणाऱ्याला, ग्रीक लोकविद्याचे, मध्य-पूर्व पौर्वात्य बाजारातील व्यवहारांसारखा व्यवहार आणि सौद्याच्या किंमती यांचे आश्चर्यकारक पण आल्हाददायक दर्शन घडते. आणि हो, पर्यटक तेथे यहोवाच्या साक्षीदारांना, प्रेषित पौलाने १,९०० पेक्षा अधिक वर्षांआधी जे केले अर्थात ‘जे आढळतात त्यांना’ राज्याच्या सुवार्तेचा जाहीररीत्या आनंदाने प्रचार करताना पाहील.
[तळटीपा]
a आयोनियन हे नाव, याफेथचा पुत्र आणि नोहाचा नातू यावान याच्यातून येते.—उत्पत्ति १०:१, २, ४, ५.
[२८ पानांवरील चौकट]
अथेन्समधील व्यापार
अगोरा, केवळ बौद्धिक व नागरी जीवनाचे केंद्र नव्हते तर ती शहराची प्रमुख बाजारपेठ देखील होती. अथेन्सचे व्यापाराचे केंद्र, त्याच्या दुर्लभ चलनाच्या मूल्यामुळे आणि तेथील प्रमुख दंडाधिकाऱ्यांच्या इमानदारीपणामुळे प्रसिद्ध झाले; या दंडाधिकाऱ्यांना, सर्व व्यवहार प्रामाणिक व चोख होत असल्याची खात्री करण्याचा अधिकार होता.
अथेन्स द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, मध, संगमरवर पाषाण तसेच चिनी मातीच्या बनवलेल्या वस्तू व प्रक्रिया केलेले धातू यांसारखे औद्योगिक उत्पादने निर्यात करत होते. याच्या बदल्यात ते मुख्यतः गहू आयात करीत. ॲटिकामधील (अथेन्सभोवतीचा परिसर), सर्व रहिवाशांकरता तेथील उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे व्यापाराचे स्तर कडक होते. पीराअसच्या (अथेन्सचे बंदर) बाजारात शहरवासी आणि सेना यांच्यासाठी नेहमी भरपूर ताजे अन्न ठेवावे लागत असे. आणि व्यापाऱ्यांना, माल मोठ्या प्रमाणात साठवून मग गरजेच्या काळात जास्त किंमतीत तो विकण्याची परवानगी नव्हती.