अविश्वासापासून जपा
“भावांनो, जपा, नाही तर जिवंत देवापासून दुरावल्याने तुमच्यांतल्या कोणामध्ये अविश्वासी वाईट अंतःकरण उत्पन्न होईल.”—इब्री लोकांस ३:१२, पं.र.भा.
१. हिब्रू ख्रिश्चनांना उद्देशून लिहिलेल्या शब्दांतून पौल कोणती धक्कादायक, पण सत्य परिस्थिती आपल्या लक्षात आणून देतो?
एकेकाळी यहोवासोबत ज्यांचा वैयक्तिक नातेसंबंध होता, त्यांच्यातच नंतर एक ‘वाईट अंतःकरण’ उत्पन्न व्हावे आणि ते ‘जिवंत देवापासून दुरावले जावेत,’ ही खरीच किती भयंकर कल्पना आहे! शिवाय यात किती मोठा इशारा देखील आहे! कारण पौलाचे हे शब्द सत्य न मानणाऱ्यांच्या संदर्भात नव्हे, तर अशा लोकांना उद्देशून लिहिलेले होते ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवून त्याच्या आधारावर आपले जीवन यहोवाला समर्पित केले होते.
२. आपण कोणते प्रश्न विचारात घेणे आवश्यक आहे?
२ अशा या आध्यात्मिकरित्या आशीर्वादित स्थितीत असणाऱ्यांमध्ये “अविश्वासी वाईट अंतःकरण” उत्पन्न होणे कसे शक्य होते? देवाची प्रीती, आणि अपात्री कृपा अनुभवल्यावर कोणी त्याला जाणूनबुजून कसा सोडून जाऊ शकत होता? आपल्यापैकी कोणाच्या बाबतीत असे होऊ शकते का? हे गांभिर्याने विचारात घेण्याजोगे प्रश्न आहेत आणि म्हणून या इशाऱ्यामागच्या कारणाचे परीक्षण करणे योग्य ठरेल.—१ करिंथकर १०:११.
एवढी सक्त ताकीद का?
३. पहिल्या शतकात जेरुसलेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांतील ख्रिश्चन कशाप्रकारच्या परिस्थितीत जगत होते याचे वर्णन करा.
३ यहुदियातील हिब्रू ख्रिश्चनांना पौलाने हे पत्र सा.यु. ६१ साली लिहिले होते असे दिसते. एका इतिहासकाराच्या मते या विशिष्ट काळात “कोणत्याही सज्जन गृहस्थाला शांती, सुरक्षितता नव्हती, जेरुसलेम शहरातच काय, तर रोमी शासनाधीन असलेल्या त्या सबंध प्रांतात कोठेही नाही.” अराजकतेचे आणि हिंसाचाराचे साम्राज्य होते; एकीकडे रोमची जुलमी सेना, तर दुसरीकडे रोमविरोधी यहुदी झीलट्स गटाचे शौर्याचे पोकळ प्रदर्शन, आणि त्यातल्या त्यात या अंधाधुंदीच्या काळाचा गैरफायदा घेणाऱ्या भामट्यांच्या निरनिराळ्या गुन्ह्यांमुळे परिस्थिती आणखीनच चिघळलेली होती. अशात ख्रिश्चनांचे जगणे अतिशय कठीण होऊन बसले होते; या कोणत्याच प्रकारांत आपण गोवले जाऊ नये म्हणून ते सतत सांभाळत. (१ तीमथ्य २:१, २) किंबहुना, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे काहीजण त्यांना माणूसघाणे, नव्हे राष्ट्रद्रोही देखील म्हणत असत. ख्रिश्चनांना सहसा गैरवागणूक दिली जात असे; कधी कधी वैयक्तिक नुकसान देखील सोसावे लागत असे.—इब्री लोकांस १०:३२-३४.
४. हिब्रू ख्रिश्चनांना, धार्मिक स्वरूपाच्या कोणत्या दबावाला तोंड द्यावे लागत होते?
४ हिब्रू ख्रिश्चनांना भयंकर धार्मिक दबाव देखील सहन करावा लागत होता. येशूच्या विश्वासू शिष्यांच्या आवेशामुळे आणि परिणामस्वरूप ख्रिस्ती मंडळीत झालेल्या जलद वाढीमुळे यहुदी लोक—विशेषतः त्यांचे धार्मिक पुढारी द्वेषाने पेटले. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना सतावण्यात, त्यांना छळण्यात त्यांनी कोणतीच कसूर केली नाही.a (प्रेषितांची कृत्ये ६:८-१४; २१:२७-३०; २३:१२, १३; २४:१-९) काही ख्रिश्चनांना जरी प्रत्यक्ष छळ सोसावा लागला नाही तरीसुद्धा, त्यांना देखील यहुद्यांकडून विटंबना आणि उपहास सहन करावा लागला. काल परवाच सुरू झालेला धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माला तुच्छ लेखण्यात येत असे कारण त्यात यहुदी धर्मासारखा थाटमाट नव्हता; मंदिर नाही, याजकगण नाही, सण नाहीत, पारंपरिक यज्ञार्पणे नाहीत. शिवाय त्यांच्या नेत्याला, म्हणजे येशूला तर एक गुन्हेगार ठरवून मृत्यूदंड देण्यात आला होता. अशा या परिस्थितीत, आपला धर्म पाळण्यासाठी ख्रिश्चनांना विश्वासाची, धैर्याची आणि सहनशीलतेची गरज होती.
५. यहुदियातील ख्रिश्चनांना आध्यात्मिकरित्या जागृतावस्थेत राहणे इतके अगत्याचे का होते?
५ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहुदियातील हिब्रू ख्रिश्चन त्या राष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत बिकट काळात जगत होते. त्यांचा प्रभू येशू ख्रिस्त, याने यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताचे चिन्ह म्हणून ज्या घटना भाकीत केल्या होत्या त्यांतील बहुतेक घटना पूर्ण झाल्या होत्या. अंत अगदी उंबरठ्यावर होता. बचावण्याकरता, ख्रिश्चनांना आध्यात्मिकरित्या जागृतावस्थेत आणि ‘डोंगरात पळून जाण्यास’ तयार राहायचे होते. (मत्तय २४:६, १५, १६) येशूने त्यांना सांगितल्याप्रमाणे तात्काळ हालचाल करण्यासाठी आवश्यक असणारा विश्वास आणि आध्यात्मिक ताकद त्यांच्याजवळ असेल का? याबद्दल शंकेला जागा होती.
६. यहुदियातील ख्रिश्चनांना तातडीने कशाची आवश्यकता होती?
६ सबंध यहुदी व्यवस्थीकरणाचा सर्वनाश होण्याआधीच्या शेवटल्या दशकात हिब्रू ख्रिश्चनांवर मंडळीच्या आतून आणि बाहेरूनही प्रचंड दबाव होता यात काही शंका नाही. त्यांना प्रोत्साहनाची गरज होती. पण त्याच वेळेस, आपण निवडलेला मार्गच योग्य असून आपण सहन केलेले, सोसलेले कष्ट व्यर्थ नाही हे समजून घेण्याकरता त्यांना सल्ला आणि मार्गदर्शनाची देखील आवश्यकता होती. याप्रसंगी त्यांना मदत करण्यासाठी पौलाने पुढाकार घेतला हे किती बरे झाले.
७. हिब्रू ख्रिश्चनांना पौलाने जे लिहिले त्याविषयी आपल्याला उत्सुकता का असली पाहिजे?
७ पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना जे लिहिले त्याचे आपण अत्यंत उत्सुकतेने परीक्षण केले पाहिजे. का? कारण आपण त्यांच्यासारख्याच परिस्थितीत आहोत. सैतानाच्या ताब्यात असलेल्या या जगाकडून आपल्यावर दररोज कितीतरी प्रकारे दबाव येत असतो. (१ योहान ५:१९) येशूने आणि त्याच्या प्रेषितांनी शेवटल्या दिवसांविषयी आणि ‘या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी’ जी भाकिते केली होती ती आपण आपल्या डोळ्यांदेखत पूर्ण होताना पाहात आहोत. (मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४; प्रकटीकरण ६:१-८) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आध्यात्मिकरित्या जागृतावस्थेत राहणे अत्यंत जरूरीचे आहे, जेणेकरून ‘होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास आपण समर्थ होऊ शकू.’—लूक २१:३६.
मोशेपेक्षा थोर
८. इब्री लोकांस ३:१ येथे नमूद असणाऱ्या शब्दांतून, पौल आपल्या सहख्रिश्चनांना काय करण्याचे प्रोत्साहन देत होता?
८ एका महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करून पौलाने लिहिले: “आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक—येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.” (इब्री लोकांस ३:१) ‘लक्ष लावणे’ याचा अर्थ “स्पष्टपणे आकलन होणे . . . , पूर्णपणे समजून घेणे, बारकाईने लक्षात घेणे” असा होतो. (वाईन्स एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्र्स) त्याअर्थी, पौल आपल्या सहविश्वासू बांधवांना असे प्रोत्साहन करत होता की त्यांनी आपल्या विश्वासाच्या आणि तारणाच्या संबंधाने येशूने कोणती भूमिका बजावली याची खऱ्या अर्थाने समज प्राप्त करण्यासाठी, प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. असे केल्यामुळे विश्वासात दृढ राहण्याचा त्यांचा संकल्प आणखी बळकट होणार होता. तर मग येशूने कोणती भूमिका बजावली आणि आपण त्याकडे का ‘लक्ष लावावे?’
९. पौलाने येशूच्या संदर्भात “प्रेषित” आणि “प्रमुख याजक” या संज्ञा का वापरल्या?
९ पौलाने येशूच्या संदर्भात “प्रेषित” आणि “प्रमुख याजक” या संज्ञा उपयोगात आणल्या. “प्रेषित” हा पाठवलेला असतो आणि या ठिकाणी हा शब्द, मानवजातीसोबत संपर्क साधण्याचे देवाचे माध्यम या अर्थाने वापरण्यात आला आहे. “प्रमुख याजक” म्हणजे ज्याच्या माध्यमाने मनुष्य देवाजवळ येऊ शकतो. या दोन्ही तरतुदी खऱ्या उपासनेकरता अत्यावश्यक आहेत आणि त्या दोन्ही येशूत सामावलेल्या आहेत. मानवजातीला देवाबद्दलचे सत्य सांगण्याकरता त्यालाच स्वर्गातून पाठवण्यात आले. (योहान १:१८; ३:१६; १४:६) आणि यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या व्यवस्थेत पापाच्या क्षमेकरता प्रतिरूपक प्रमुख याजक म्हणूनही येशूलाच नेमण्यात आले आहे. (इब्री लोकांस ४:१४, १५; १ योहान २:१, २) येशूच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणते आशीर्वाद प्राप्त करता येतात हे जर आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले तर विश्वासात दृढ राहण्याचे धैर्य आणि निर्धार आपल्याठायी राहील.
१०. (अ) यहुदी धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे समजून घेण्यास पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना कसे साहाय्य केले? (ब) या मुद्द्याचे समर्थन करण्याकरता पौलाने कोणत्या सर्वमान्य सत्याचा उल्लेख केला?
१० ख्रिस्ती विश्वास किती मोलाचा आहे यावर जोर देण्याकरता, पौलाने येशूची तुलना मोशेसोबत केली; कारण यहुदी लोक आपल्या पूर्वजांपैकी मोशेला सर्वात श्रेष्ठ संदेष्टा मानायचे. येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सत्य हिब्रू ख्रिश्चनांनी मनापासून स्वीकारले असते, तर ख्रिस्ती धर्म यहुदी धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे याविषयी कोणताही संदेह बाळगण्याचे कारणच उरले नसते. पौलाने याकडे लक्ष वेधले की मोशेला देवाच्या ‘घराण्याची’—इस्राएलच्या राष्ट्राची अथवा मंडळीची जबाबदारी सोपवण्याइतपत योग्य समजण्यात आले असले तरीसुद्धा—तो केवळ एक विश्वासू सेवक, किंवा दास होता. (गणना १२:७) पण येशू हा त्याचा पुत्र, घराण्याचा मालक होता. (१ करिंथकर ११:३; इब्री लोकांस ३:२, ३, ५) या मुद्द्याचे समर्थन करण्याकरता, पौलाने एक सर्वमान्य सत्य मांडले: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) देव हा सर्वांहून श्रेष्ठ आहे याबाबतीत कोणाचेही दुमत नसावे, कारण सर्व काही बांधणारा, निर्माण करणारा तोच आहे. तर मग तर्कसंगतपणे, येशू देवाचा सहायक असल्यामुळे तो इतर सर्व निर्मितीकृत्यांपेक्षा, म्हणजेच मोशेपेक्षाही श्रेष्ठच असला पाहिजे.—नीतिसूत्रे ८:३०; कलस्सैकर १:१५-१७.
११, १२. पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना काय ‘शेवटपर्यंत दृढ राखण्यास’ आर्जवले आणि आपण हे मार्गदर्शन कसे लागू करू शकतो?
११ खरोखर, हिब्रू ख्रिश्चन अतिशय विशेष अशा स्थितीत होते. पौलाने त्यांना आठवण करून दिली की ते, ‘स्वर्गीय पाचारणाचे भागीदार’ होते; हा एक असा विशेषाधिकार होता जो यहुदी व्यवस्थेतून मिळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मोलवान होता. (इब्री लोकांस ३:१) पौलाच्या शब्दांमुळे त्या अभिषिक्त ख्रिश्चनांना आपल्या यहुदी परंपरेशी संबंधित असणाऱ्या गोष्टी गमावल्याची खंत वाटण्यापेक्षा आपल्याला मिळणार असलेल्या नव्या वारशाबद्दल कृतज्ञता वाटली असावी. (फिलिप्पैकर ३:८) आपल्या या विशेषाधिकाराला कधीही हलके न समजता, त्यास कवटाळून राहण्याचा आग्रह करीत, पौल म्हणतो: “ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आहो.”—इब्री लोकांस ३:६.
१२ यहुदी व्यवस्थीकरणाच्या जवळ येऊन ठेपलेल्या समाप्तीतून बचावण्याकरता हिब्रू ख्रिश्चनांना देवाकडून मिळालेल्या आपल्या आशेला “शेवटपर्यंत दृढ” राखायचे होते. आपल्याला या व्यवस्थीकरणाच्या अंतातून बचावायचे असल्यास आपल्यालाही तेच करावे लागेल. (मत्तय २४:१३) जीवनाच्या चिंता, लोकांची बेपर्वाई किंवा आपल्या स्वतःच्या अपरिपूर्ण प्रवृत्तींमुळे आपण कधीही देवाच्या अभिवचनांवरील आपला विश्वास डळमळू देता कामा नये. (लूक २१:१६-१९) आपल्याला स्वतःला बळकट कसे करता येईल हे समजून घेण्याकरता आपण पौलाच्या पुढील शब्दांकडे लक्ष देऊ.
“आपली मने कठीण करू नका”
१३. पौलाने कोणती ताकीद दिली आणि त्याने स्तोत्र ९५ कशाप्रकारे जोडले?
१३ हिब्रू ख्रिश्चनांची अनुग्रहप्राप्त स्थिती लक्षात घेतल्यावर, पौलाने ही ताकीद दिली: “पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे ‘आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.’” (इब्री लोकांस ३:७, ८) पौल ९५ व्या स्तोत्रातील शब्द उद्धृत करीत होता आणि म्हणूनच “पवित्र आत्मा म्हणतो” असे तो म्हणू शकला.b (स्तोत्र ९५:७, ८; निर्गम १७:१-७) कारण बायबल हे देवाने आपल्या पवित्र आत्म्याकरवी प्रेरित केले आहे.—२ तीमथ्य ३:१६.
१४. यहोवाने केलेल्या उपकारांप्रती इस्राएली लोकांची काय प्रतिक्रिया होती, आणि का?
१४ मिसर देशातील गुलामीतून सुटका मिळाल्यावर इस्राएली लोकांना यहोवासोबत एका कराराच्या नातेसंबंधात प्रवेश करण्याचा मोठा सुहक्क देण्यात आला. (निर्गम १९:४, ५; २४:७, ८) देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांबद्दल कृतज्ञता दाखवण्याऐवजी ते लवकरच विद्रोहीपणे वागू लागले. (गणना १३:२५–१४:१०) हे असे का झाले? पौलाने याचे नेमके कारण सांगितले: त्यांनी आपली मने कठीण केली. पण एकेकाळी देवाच्या वचनाप्रती संवेदनशील असणारी आणि त्यास प्रतिसाद देणारी मने कठीण कशी होतात? आणि असे होऊ नये म्हणून आपण काय करावे?
१५. (अ) भूतकाळात आणि सद्यकाळात ‘देवाची वाणी’ कशाप्रकारे प्रकट झाली आहे? (ब) ‘देवाच्या वाणीच्या’ संबंधाने आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१५ पौलाने ताकीद देण्याआधी एक शर्त ठेवली, ती अशी की “जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर.” देव आपल्या लोकांसोबत मोशे आणि इतर संदेष्ट्यांच्या माध्यमाने बोलला. नंतर, यहोवा त्यांच्याशी आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्या माध्यमाने बोलला. (इब्री लोकांस १:१, २) आज आपल्याजवळ देवाचे संपूर्ण प्रेरित वचन, अर्थात पवित्र बायबल आहे. शिवाय, आध्यात्मिक अन्न “यथाकाळी खावयास देण्यासाठी” येशूने नेमलेला ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ देखील आहे. (मत्तय २४:४५-४७) अशा रितीने देव आजही बोलत आहे. पण आपण ऐकत आहोत का? उदाहरणार्थ पेहराव-शृंगार, मनोरंजन आणि संगीत यांविषयी मार्गदर्शन दिले जाते तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? आपण ‘ऐकतो’ का, अर्थात, जे आपण कानाने ऐकतो त्याकडे लक्ष देऊन त्याचे पालन करतो का? जेव्हाही मार्गदर्शन दिले जाते, तेव्हा सबबी सांगण्याची किंवा हरकत घेण्याची आपल्याला सवय असल्यास नकळत आपण आपली मने कठीण करण्याचा धोका पत्करत आहोत.
१६. कोणता असा एक मार्ग आहे ज्याकरवी आपली मने कठीण होऊ शकतात?
१६ तसेच, आपण जे करू शकतो आणि जे केले पाहिजे ते करण्यापासून जर अंग चोरतो तर याप्रकारे देखील आपली मने कठीण होऊ शकतात. (याकोब ४:१७) यहोवाने इस्राएली लोकांवर असंख्य उपकार केले होते तरीसुद्धा त्यांनी विश्वास दाखवला नाही; उलट त्यांनी मोशेच्या विरोधात विद्रोह केला, कनानविषयी नकारात्मकपणे बोलणाऱ्यांवर त्यांनी विश्वास ठेवला आणि वचनयुक्त देशात प्रवेश करण्यास नकार दिला. (गणना १४:१-४) त्यामुळे यहोवाने असे घोषित केले की ते ४० वर्षे अरण्यात भटकत राहतील—एवढ्या काळात त्या पिढीतील अविश्वासू लोक मरून जाणार होते. यहोवाला त्या लोकांचा अक्षरशः वीट आला, आणि तो म्हणाला: “‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत; म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.’” (इब्री लोकांस ३:९-११) यातून आपल्याला काही शिकण्यासारखे आहे का?
आपल्याकरता धडा
१७. इस्राएली लोकांनी यहोवाची अद्भुत कृत्ये पाहिली आणि त्याच्या घोषणा ऐकल्या तरीसुद्धा ते अविश्वासी का झाले?
१७ इस्राएली लोकांची जी पिढी मिसर देशातून बाहेर पडली, त्या पिढीच्या लोकांनी यहोवाची अद्भुत कृत्ये आणि त्याच्या घोषणा आपल्या डोळ्यांनी पाहिल्या व आपल्या कानांनी ऐकल्या होत्या. तरीसुद्धा, देव आपल्याला सुखरूप वचनयुक्त देशात नेण्यास समर्थ आहे यावर त्यांना विश्वासच नव्हता. का? यहोवाने म्हटले, “[त्यांनी] माझे मार्ग जाणिले नाहीत.” यहोवा काय बोलला होता, त्याने कायकाय केले होते हे त्यांना माहीत होते, पण तो आपली काळजी वाहण्यास समर्थ आहे या गोष्टीवर त्यांच्याठायी विश्वास आणि खातरी निर्माण झाली नव्हती. स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांचीच त्यांना इतकी काळजी होती की देवाचे मार्ग आणि त्याचा उद्देश त्यांनी विचारातच घेतला नाही. त्याच्या अभिवचनावर त्यांना विश्वास नव्हता, हेच खरे.
१८. पौलाने सांगितल्यानुसार, कशाप्रकारच्या वागणुकीमुळे ‘अविश्वासी वाईट अंतःकरण’ उत्पन्न होईल?
१८ हिब्रू लोकांना उद्देशून लिहिलेले हे पुढील शब्द आपल्याकरता देखील तेवढेच समर्पक आहेत: “भावांनो, जपा, नाही तर जिवंत देवापासून दुरावल्याने तुमच्यांतल्या कोणामध्ये अविश्वासी वाईट अंतःकरण उत्पन्न होईल.” (इब्री लोकांस ३:१२) “अविश्वासी वाईट अंतःकरण” उत्पन्न होण्यामागचे कारण ‘देवापासून दुरावणे’ हे आहे असे म्हणताना पौलाने अगदी मर्मावर बोट ठेवले. याच पत्रात आधी त्याने दुर्लक्ष झाल्यामुळे ‘वाहवत जाण्याविषयी’ उल्लेख केला होता. (इब्री लोकांस २:१) पण, ‘दुरावणे’ असे भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “अलिप्त राहणे” असा असून त्याचे भाषांतर ‘धर्मत्याग’ असेही करता येईल. या शब्दात मुद्दामहून, जाणूनबुजून विरोध करण्याचा, स्वतःला अलिप्त करण्याचा आणि फितूर होण्याचा अर्थ असून, काहीसा तिरस्काराचाही सूर आहे.
१९. मार्गदर्शन लक्षपूर्वक न ऐकल्यास कशाप्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतात? उदाहरण द्या.
१९ त्याअर्थी यातून आपल्याला शिकण्यासारखा धडा हा आहे की आपण ‘त्याची वाणी न ऐकण्याची’ सवय स्वतःला होऊ दिली, अर्थात जर आपण यहोवाकडून त्याच्या वचनाच्या आणि विश्वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने येणाऱ्या मार्गदर्शनाकडे कानाडोळा केला, तर मग पाहता पाहता आपली अंतःकरणे संवेदनाशून्य, कठीण होऊन जातील. उदाहरणार्थ, एखाद्या अविवाहित जोडप्याची जवळीक जरा जास्तच वाढली असे समजा. आता त्यांनी जर या बाबीकडे दुर्लक्षच केले, तर काय परिणाम होईल? त्यामुळे त्यांना पुन्हा तेच करण्याचे टाळण्यास मदत मिळेल का, की उलट दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या हातून सहज तोच प्रकार पुन्हा घडेल? तसेच, संगीत किंवा मनोरंजनाचे प्रकार इत्यादी विचारपूर्वक निवडण्याबाबत जेव्हा दास वर्ग सल्ला देतो तेव्हा आपण तो आभारपूर्वक मान्य करून आवश्यक ते बदल करतो का? पौलाने आपल्याला आर्जवून सांगितले की आपण ‘एकत्र मिळणे सोडू नये.’ (इब्री लोकांस १०:२४, २५) हे मार्गदर्शन मिळूनही, काहीजण ख्रिस्ती सभांना फारसे महत्त्व देत नाहीत. त्यांना कदाचित असे वाटत असावे की काही सभा अधूनमधून चुकवल्यास किंवा काही विशिष्ट सभांना अजिबातच न गेल्यास काही फरक पडत नाही.
२०. शास्त्रवचनीय मार्गदर्शन ऐकून त्यानुसार वागणे आवश्यक का आहे?
२० बायबलमधून आणि बायबल-आधारित प्रकाशनांमधून अभिव्यक्त होणारी यहोवाची “वाणी” आपण तत्परतेने न स्वीकारल्यास, पाहता पाहता आपण ‘जिवंत देवापासून दुरावत चाललो आहोत’ असे आपल्या लक्षात येईल. मनातल्या मनात मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करता करता, नंतर एखादी व्यक्ती या मार्गदर्शनाला उघडउघड तुच्छ लेखू लागेल, त्यावर टीका करू लागेल आणि त्याचा विरोध करू लागेल. याकडे लागलीच लक्ष न दिल्यास, परिणामी एक “अविश्वासी वाईट अंतःकरण” उत्पन्न होईल; अशारितीने मार्गभ्रष्ट झाल्यावर पुन्हा फिरणे सहसा अत्यंत कठीण असते. (पडताळा इफिसकर ४:१९.) यिर्मयाने लिहिले ते अगदी उचित होते, की “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) यामुळेच, पौलाने आपल्या सहविश्वासू हिब्रू बांधवांना कळकळीने आर्जवले: “जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतु हा की, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये.”—इब्री लोकांस ३:१३.
२१. आपल्या सर्वांना काय करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे, आणि आपल्यासमोर कोणते भवितव्य आहे?
२१ यहोवा आजही त्याच्या वचनाच्या आणि त्याच्या संघटनेच्या माध्यमाने आपल्याशी बोलतो याबद्दल आपल्याला किती आनंद वाटतो! ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला ‘आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरून राहण्यास’ सतत मदत पुरवतो याबद्दलही आपण किती कृतज्ञ आहोत. (इब्री लोकांस ३:१४) देवाच्या प्रेमाला आणि मार्गदर्शनाला प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. असे करत असताना आपण यहोवाच्या आणखी एका अद्भुत अभिवचनाचा—त्याच्या विसाव्यात ‘प्रवेश करण्याचा’ आनंद अनुभवू शकतो. (इब्री लोकांस ४:३, १०) याच विषयावर पौलाने पुढे हिब्रू ख्रिश्चनांसोबत चर्चा केली, आणि त्यावरच आपण पुढच्या लेखात चिंतन करणार आहोत.
[तळटीपा]
a जोसीफसच्या अहवालानुसार फेस्टसच्या मृत्यूनंतर लगेचच सदुक्यांच्या पंथातला एननस (हनन्या) मुख्य याजकपदी आला. त्याने येशूचा सावत्र भाऊ याकोब आणि त्याच्यासोबत इतर शिष्यांना यहुदी न्यायसभेपुढे आणून त्यांना दगडमार करून मारून टाकण्याचा दंड सुनावला.
b पौलाने ग्रीक सेप्टुअजिंटमधून हे वचन घेतले होते हे स्पष्ट आहे; त्यात “मरीबा” आणि “मस्सा” या इब्री शब्दांचे अनुक्रमे “कलह” आणि “परीक्षा पाहणे” असे भाषांतर केले आहे. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड दुसरा पृष्ठे ३५० आणि ३७९ पाहा.
तुम्ही कसे स्पष्टीकरण द्याल?
◻ पौलाने हिब्रू ख्रिश्चनांना इतक्या कडक शब्दांत मार्गदर्शन का केले?
◻ हिब्रू ख्रिश्चनांजवळ यहुदी धर्मात होते त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे हे समजण्यास पौलाने त्यांना कसे साहाय्य केले?
◻ एखाद्याचे अंतःकरण कठीण कसे बनते?
◻ “अविश्वासी वाईट अंतःकरण” आपल्यात उत्पन्न होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?
[१० पानांवरील चित्र]
थोर मोशे, म्हणजेच येशू याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात का?