‘मृत्यू नाहीसा केला जाईल’
“जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यु होय.” १ करिंथकर १५:२६.
१, २. (अ) प्रेषित पौलाने मृतांसाठी कोणती आशा सांगितली? (ब) पौलाने पुनरुत्थानासंबंधी कोणत्या प्रश्नाकडे आपले लक्ष वळवले?
“मीशरीराच्या पुनरुत्थानावर आणि सार्वकालिक जीवनावर . . . विश्वास ठेवतो.” असे प्रेषितांचा मतांगिकार म्हणतो. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट लोक अगदी कर्तव्यतत्परतेने असे उच्चारत राहतात; परंतु आपले विश्वास, प्रेषित जो विश्वास बाळगत होते त्याच्यासारखे तर नाहीच नाही उलट ते ग्रीक तत्त्वज्ञानासारखेच आहेत, याची थोडीसुद्धा जाणीव त्यांना नाही. प्रेषित पौलाने मात्र ग्रीक तत्त्वज्ञान नाकारले आणि अमर आत्म्याची शिकवण मुळीच मानली नाही. पण, भविष्यातील जीवनावर त्याचा पक्का विश्वास होता आणि ईश्वरप्रेरणेने त्याने असे लिहिले: “जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यु होय.” (१ करिंथकर १५:२६) मग, मरणाच्या पंथास लागलेल्या मानवजातीकरता याचा काय अर्थ होतो?
२ याचे उत्तर मिळण्यासाठी आपण १ करिंथकराच्या १५ व्या अध्यायात पुनरुत्थानावर पौलाने केलेल्या चर्चेकडे वळू या. पुनरुत्थानाची शिकवण ख्रिस्ती सिद्धान्तातील सर्वात महत्त्वपूर्ण शिकवण आहे हे पौलाने सुरवातीच्या वचनात सिद्ध केल्याचे तुम्हाला आठवेल. आता तो एका विशिष्ट प्रश्नाकडे आपले लक्ष वेधतो: “आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?”—१ करिंथकर १५:३५.
कोणत्या प्रकारचे शरीर?
३. काहींनी पुनरुत्थानाची शिकवण का नाकारली?
३ प्लॅटोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने पौलाने कदाचित असा प्रश्न विचारला असावा. मानवामध्ये एक अमर आत्मा असतो जो शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहतो अशी प्लॅटोची शिकवण होती. लहानपणापासून अशी कल्पना बाळगणाऱ्यांना ख्रिस्ती शिकवण निश्चितच अनावश्यक वाटत होती. मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो तर मग पुनरुत्थानाची काय आवश्यकता आहे? शिवाय, पुनरुत्थानाची कल्पना त्यांच्या तर्काला पटत नव्हती. शरीराची एकदा माती झाल्यावर पुनरुत्थान कसे शक्य आहे? हेनरीक मेयर नामक बायबल विवेचनकर्ता म्हणतात, की काही करिंथकरांनी दाखवलेला विरोध कदाचित “शरीराचे प्रकृतीद्रव्य पूर्ववत होणे अशक्य आहे या तत्त्वज्ञानाच्या” आधारावर असावा.
४, ५. (अ) अविश्वासू लोकांचे आक्षेप अयोग्य का होते? (ब) ‘नुसत्या दाण्याविषयी’ पौलाने दिलेल्या उदाहरणाचे स्पष्टिकरण द्या. (क) अभिषिक्त पुनरुत्थित जणांना देव कोणत्या प्रकारची शरीरे देतो?
४ पौल त्यांचा मूर्ख तर्क उघड करतो: “हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही; आणि तू पेरतोस ते पुढे आकारीत होणारे अंग पेरीत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसरा कशाचा असेल; पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजांतल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो.” (१ करिंथकर १५:३६-३८) पृथ्वीवर असताना लोकांना जी शरीरे होती त्याच शरीरांसहित देव त्यांना उठवणार नव्हता. तर, तेथे एक रूपांतर होणार होते.
५ पौल पुनरुत्थानाची तुलना, बीजाच्या अंकुरण्याशी करतो. गव्हाचे एक लहानसे बीज पाहिल्यावर त्यातून निघणाऱ्या रोपाशी सादृश्यता आढळून येत नाही. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “बीजाला अंकुर फुटत असताना ते पुष्कळ पाणी शोषून घेते. पाण्यामुळे बीजामध्ये पुष्कळ रासायनिक बदल घडतात. त्यामुळे बीजातील आंतरिक ऊती फुगतात आणि त्या बीजावरणाच्या बाहेर येतात.” खरे तर, बीज तेथे मरून जाते आणि ते एक वाढते रोप बनते. “देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो” म्हणजे, त्याने त्याच्यामध्ये त्याच्या वाढीवर नियंत्रण करणारे वैज्ञानिक नियम घातले आहेत व प्रत्येक बीजाला आपआपल्या जातीप्रमाणे अंग मिळते. (उत्पत्ति १:११) तसेच, अभिषिक्त ख्रिस्ती पहिल्यांदा मानव म्हणून मरण पावतात. मग, देवाच्या नियुक्त समयी तो, पूर्णतः नवीन शरीरांत त्यांना जिवंत करतो. पौल फिलिप्पैकरांना म्हणाला: “येशू ख्रिस्त . . . तुमचेआमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.” (फिलिप्पैकर ३:२०, २१; २ करिंथकर ५:१, २) त्यांचे गौरवावस्थेत पुनरुत्थान होते व ते स्वर्गात राहतात.—१ योहान ३:२.
६. देव पुनरुत्थित जणांना उचित स्वर्गीय शरीरे देऊ शकतो असा विश्वास करणे तर्कशुद्ध का आहे?
६ यावर विश्वास ठेवणे इतके कठीण आहे का? मुळीच नाही. पौल म्हणतो की प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारची शरीरे असतात. तसेच, तो स्वर्गीय देवदूत आणि मांस व रक्ताचा मानव यांमधील फरक दाखवण्यासाठी म्हणतो: “तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत.” अचेतन सृष्टीतही पुष्कळ भिन्नता आहे. विज्ञानाने निळे महातारे, महत्तम तांबडे तारे आणि पांढरे लघुतम तारे यांसारख्या खगोलीय ज्योतींचा शोध लावण्याच्या कितीतरी वर्षांआधी पौल म्हणाला: “ताऱ्याताऱ्यांच्या तेजात भेद आहे.” यावरून, देव पुनरुत्थित अभिषिक्त जणांना उचित स्वर्गीय शरीरे देऊ शकतो हे तुम्हाला तर्कशुद्ध वाटत नाही का?—१ करिंथकर १५:३९-४१.
७. अविनाशीपण आणि अमरत्व या दोन्हींचा काय अर्थ होतो?
७ पौल मग म्हणतो: “तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठविले जाते.” (१ करिंथकर १५:४२) मानवी शरीर परिपूर्ण असले तरी, ते विनाशी असते. त्याचा वध होऊ शकतो. जसे की, पुनरुत्थित येशू “कुजण्याच्या अवस्थेपर्यंत” गेला नाही असे पौल म्हणाला. (प्रेषितांची कृत्ये १३:३४) पुनरुत्थानानंतरचे त्याचे शरीर परिपूर्ण, मानवी शरीर होते तरी ते विनाशी असणार नव्हते. पुनरुत्थित अभिषिक्त जणांना देव जी शरीरे देतो ती अविनाशी असतात—त्यांचा अंत होत नाही किंवा ती कुजत नाहीत. पौल पुढे म्हणतो: “जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठविले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठविले जाते; . . . जर जीवस्वभावाचा देह आहे तर आत्मिक देहहि आहे.” (१ करिंथकर १५:४३, ४४, पं.र.भा.) आणखी पुढे पौल असेही म्हणतो: “जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे.” अमरत्व म्हणजे अनंत, अक्षय जीवन. (१ करिंथकर १५:५३; इब्री लोकांस ७:१५) अशाप्रकारे, पुनरुत्थितजण ज्याने त्यांचे पुनरुत्थान शक्य केले त्या येशूचे अर्थात ‘जो स्वर्गातला आहे त्याचे प्रतिरूप’ धारण करतात.—१ करिंथकर १५:४५-४९.
८. (अ) पृथ्वीवर जे जिवंत होते तेच आता पुनरुत्थित झालेले लोक आहेत हे आपल्याला कसे माहीत होते? (ब) पुनरुत्थान घडेल तेव्हा कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण होतील?
८ असे रूपांतरण झालेले असले तरी, पुनरुत्थित जण त्यांच्या मृत्यूपूर्वी जसे होते तसेच असतील. त्यांना उठवल्यानंतर त्यांच्या त्याच आठवणी राहतील, तेच उत्तम ख्रिस्ती गुण असतील. (मलाखी ३:३; प्रकटीकरण २१:१०, १८) याबाबतीत ते येशू ख्रिस्तासारखे आहेत. स्वर्गीय रूपातून त्याने मानवी रूप धारण केले. मग तो मरण पावला आणि स्वर्गीय व्यक्ती म्हणून त्याचे पुनरुत्थान झाले. तरीपण, “येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.” (इब्री लोकांस १३:८) अभिषिक्त जणांना केवढा गौरवी सुहक्क लाभला आहे! पौल म्हणतो: “हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. ‘अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?’”—१ करिंथकर १५:५४, ५५; यशया २५:८; होशेय १३:१४.
पार्थिव पुनरुत्थान?
९, १०. (अ) पहिले करिंथकर १५:२४ च्या संदर्भात, “शेवट” म्हणजे काय व त्या अनुषंगाने कोणकोणत्या घटना घडतात? (ब) मृत्यूला नाहीसे करण्याकरता काय घडणे आवश्यक आहे?
९ स्वर्गातील अमर आत्मिक जीवनाची आशा नसलेल्या कोट्यवधी लोकांसाठी काही भविष्य आहे का? हो, आहे! स्वर्गीय पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान होते याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पौल एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांचे वर्णन असे म्हणून देतो: “नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यहि नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल.”—१ करिंथकर १५:२३, २४.
१० “शेवट” म्हणजे, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीचा शेवट; तेव्हा येशू नम्रतेने व एकनिष्ठपणे त्याचा देव आणि पिता याला राज्य सोपवून देतो. (प्रकटीकरण २०:४) तेव्हा, “सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र” करण्याचा देवाचा उद्देश पूर्ण झालेला असेल. (इफिसकर १:९, १०) परंतु, त्याआधी ख्रिस्ताने, देवाच्या सार्वभौम इच्छेविरुद्ध जाणारे “सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यहि” नष्ट केलेले असेल. यामध्ये हर्मगिदोनात होणाऱ्या नाशापेक्षा पुष्कळ काही समाविष्ट आहे. (प्रकटीकरण १६:१६; १९:११-२१) पौल म्हणतो: “[देव] आपल्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत [ख्रिस्ताला] राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यु होय.” (१ करिंथकर १५:२५, २६) होय, आदामाकडून आलेल्या पाप आणि मृत्यू यांचा सर्व मागमूस नाहीसा केलेला असेल. तेव्हा, देवाने मृतांना जिवंत करून स्मृती ‘कबरा’ रिकाम्या केलेल्या असतील.—योहान ५:२८.
११. (अ) देव मृतांना पुनःनिर्माण करू शकतो हे आपल्याला कसे समजते? (ब) पृथ्वीवर पुनरुत्थान होणाऱ्यांना कोणत्या प्रकारची शरीरे देण्यात येतील?
११ याचा अर्थ, मानवांची पुनःनिर्मिती. अशक्य वाटते का? देवाला हे अशक्य नाही; स्तोत्र १०४:२९, ३० आपल्याला याची खात्री देते, ते म्हणते: “तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात.” पुनरुत्थित लोक त्यांच्या मृत्यूपूर्वी जसे होते तसेच असले तरी त्यांना तीच शरीरे असणे जरूरीचे नाही. स्वर्गात पुनरुत्थान होणाऱ्यांना देव जसे त्याच्या मर्जीनुसार शरीर देतो तसेच पृथ्वीवर पुनरुत्थान होणाऱ्यांना देखील देव त्याच्या मर्जीनुसार शरीर देईल. त्यांची नवीन शरीरे निरोगी असतील आणि जवळजवळ त्यांच्या पहिल्या शरीरासारखीच असतील जेणेकरून त्यांचे प्रियजन त्यांना ओळखू शकतील.
१२. पार्थिव पुनरुत्थान कधी घडते?
१२ पार्थिव पुनरुत्थान केव्हा होईल? मार्था आपला मृत भाऊ लाजार याच्याबद्दल म्हणाली होती: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२४) तिला हे कसे ठाऊक होते? कारण, तिच्या दिवसांत तर पुनरुत्थानाचा विषय वादग्रस्त होता; परुशी लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत होते तर सदुकी लोक विश्वास ठेवत नव्हते. (प्रेषितांची कृत्ये २३:८) पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्त पूर्वकाळातील साक्षीदारांबद्दल मार्थाला माहिती असावी. (इब्री लोकांस ११:३५) शिवाय, पुनरुत्थान शेवटल्या दिवशी होईल हे तिने दानीएल १२:१३ मधून समजून घेतले असावे. कदाचित तिने स्वतः येशूकडूनही हे ऐकले असावे. (योहान ६:३९) तो ‘शेवटला दिवस’ ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीशी जुळतो. (प्रकटीकरण २०:६) ही महान घटना घडण्यास सुरवात होईल तेव्हा त्या ‘दिवसादरम्यान’ सर्वत्र किती आनंदीआनंद असेल!—पडताळा लूक २४:४१.
कोणकोण उठतील?
१३. प्रकटीकरण २०:१२-१४ मध्ये पुनरुत्थानाच्या कोणत्या दृष्टान्ताबद्दल लिहिण्यात आले आहे?
१३ प्रकटीकरण २०:१२-१४ मध्ये, योहानाने पाहिलेल्या पार्थिव पुनरुत्थानाच्या दृष्टान्ताचे वर्णन दिले आहे: “मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.”
१४. पुनरुत्थानात कोणाकोणाचा समावेश असेल?
१४ पृथ्वीवर राहून गेलेल्या सर्व ‘लहानथोरांचे,’ ख्यातनाम लोक आणि अगदी सामान्य लोक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे पुनरुत्थान होईल. इतकेच नव्हे तर, तान्ह्या मुलांचे देखील पुनरुत्थान होईल! (यिर्मया ३१:१५, १६) प्रेषितांची कृत्ये २४:१५ मध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा प्रकट केला आहे: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” ‘नीतिमानांमध्ये’ हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम, सारा आणि राहाब यांसारखे प्राचीन काळचे विश्वासू स्त्री-पुरुष उल्लेखनीय असतील. (इब्री लोकांस ११:१-४०) कल्पना करा, आपण अशा लोकांबरोबर बोलू शकू व प्राचीन काळी त्यांनी प्रत्यक्षात पाहिलेल्या बायबल घटनांचे सविस्तर वर्णन ऐकू शकू! ‘नीतिमानांमध्ये’ त्या देव-भीरू हजारो लोकांचा देखील समावेश होतो जे अलीकडील काळात मरण पावले व ज्यांना स्वर्गीय आशा नव्हती. त्यांच्यापैकी तुमच्या कुटुंबातील, किंवा तुमची प्रिय व्यक्ती आहे का? तुम्ही त्यांना पुन्हा पाहू शकाल हे किती सांत्वन देणारे आहे! परंतु, ते ‘अनीतिमान’ कोण आहेत ज्यांचे देखील पुनरुत्थान होईल? बायबलमधील सत्य शिकून त्याचा अवलंब आपल्या जीवनात करण्याची संधी न मिळताच मरण पावलेले ते कोट्यवधी कदाचित अब्जावधी लोक आहेत.
१५. पुन्हा उठणाऱ्यांचा ‘त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून न्याय’ केला जाईल याचा काय अर्थ होतो?
१५ पण मग, पुन्हा उठणाऱ्यांचा ‘त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून न्याय’ कसा केला जाईल? हे पुस्तक त्यांच्या पूर्व कर्मांची नोंद ठेवणारे पुस्तक नाही; हे लोक मरण पावले तेव्हाच त्यांच्या आयुष्यभरात केलेल्या पापांतून दोषमुक्त झाले आहेत. (रोमकर ६:७, २३) परंतु, पुनरुत्थित मानव तरीसुद्धा आदामाच्या पापाच्या ओझ्याखाली राहतील. आणि तेव्हा, ही पुस्तके ईश्वरी सूचना देतील ज्यांचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे जेणेकरून त्यांना येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा पूर्ण फायदा मिळू शकेल. आदामाच्या पापाचा सर्वात शेवटला अंश नाहीसा केला जाईल तेव्हा ‘मृत्यू’ पूर्णार्थाने नाहीसा केला जाईल. हजार वर्षांच्या अंतास, देव “सर्वांना सर्वकाही” होईल. (१ करिंथकर १५:२८) त्यानंतर मानवाला महायाजकाच्या किंवा खंडणी देणाऱ्याच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही. सर्व मानवजात आदामाने उपभोगलेल्या परिपूर्ण अवस्थेला पुन्हा येईल.
सुव्यवस्थित पुनरुत्थान
१६. (अ) पुनरुत्थान सुव्यवस्थित होईल असे मानणे तर्कशुद्ध का आहे? (ब) मृतांमधून कदाचित पहिल्यांदा कोणाचे पुनरुत्थान होईल?
१६ स्वर्गीय पुनरुत्थान सुव्यवस्थित, “प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे” असल्यामुळे, पार्थिव पुनरुत्थानामुळे लोकसंख्येचा विस्फोट होऊन गोंधळ माजणार नाही हे स्पष्टच आहे. (१ करिंथकर १५:२३) नव्याने पुनरुत्थान झालेल्यांची काळजी घ्यावी लागेल, हे समजण्याजोगे आहे. (पडताळा लूक ८:५५.) त्यांना, शारीरिक भरणपोषण लागेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांचे जीवन देणारे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक मदत लागेल. (योहान १७:३) सर्वांना एकाच वेळी उठवण्यात आले तर, त्या सर्वांची पुरेशी काळजी घेणे अशक्य होईल. म्हणूनच पुनरुत्थान टप्याटप्याने होईल असा विश्वास करणे उचित ठरेल. सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याच्या थोड्याच काळाआधी मरण पावलेल्या विश्वासू ख्रिश्चनांना पहिले उठवले जाईल. शिवाय, “अधिपति” या नात्याने कार्य करणाऱ्या प्राचीन विश्वासू पुरुषांचे देखील लवकरच पुनरुत्थान होण्याची आपण अपेक्षा करू शकतो.—स्तोत्र ४५:१६.
१७. पुनरुत्थानाबाबत काही विषय कोणते आहेत ज्याबद्दल बायबल आपल्याला काहीच सांगत नाही व अशा विषयांची ख्रिश्चनांनी भलतीच काळजी का करू नये?
१७ तरीसुद्धा, आपण अशा विषयांबाबत हटवादी असू नये. पुष्कळ विषयांबाबत बायबलमध्ये उत्तर दिलेले नाही. लोकांचे पुनरुत्थान कसे, केव्हा किंवा कोणत्या ठिकाणी होईल याबाबतची खुलासेवार माहिती विशद केलेली नाही. पुन्हा उठवलेले कोठे राहतील, काय खातील किंवा काय घालतील याबद्दल ते आपल्याला काहीच सांगत नाही. तसेच, पुनरुत्थित मुलांना वाढवण्याविषयी व त्यांची काळजी घेण्याविषयी यहोवा अमुक अमुक योजना करील किंवा आपले मित्र आणि प्रियजन यांच्याबाबतीत विशिष्ट प्रसंगांना तो कसा हाताळेल, हे आपण अगदी ठामपणे सांगू शकत नाही. हे खरे आहे, की अशा गोष्टींचा विचार करणे स्वाभाविक आहे; परंतु सध्या अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवणे निव्वळ मूर्खपणा ठरेल. यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्यावर व सार्वकालिक जीवन मिळवण्यावर आपले लक्ष केंद्रित असले पाहिजे. अभिषिक्त ख्रिस्ती गौरवी स्वर्गीय पुनरुत्थानावर आपली आशा ठेवतात. (२ पेत्र १:१०, ११) “दुसरी मेंढरे” पृथ्वीवरील देवाच्या राज्यात सार्वकालिक वारसा मिळण्याची आशा करतात. (योहान १०:१६; मत्तय २५:३३, ३४) पुनरुत्थानाविषयी अज्ञात असलेल्या अधिक सविस्तर माहितीसाठी यहोवावर भरवसा ठेवलेले बरे. आपले भावी सौख्य, ‘सर्व प्राणीमात्राची इच्छा पूरी करणाऱ्याच्या’ हातात सुरक्षित आहे.—स्तोत्र १४५:१६; यिर्मया १७:७.
१८. (अ) पौल कोणत्या विजयावर जोर देतो? (ब) आपण पुनरुत्थानाच्या आशेवर पूर्ण भरवसा का ठेवतो?
१८ “जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुति असो,” असे म्हणून पौल आपला युक्तिवाद समाप्त करतो. (१ करिंथकर १५:५७) होय, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारे आदामामुळे आलेल्या मृत्यूवर विजय मिळवता आला आणि अभिषिक्त तसेच “दुसरी मेंढरे” या दोघांचाही या विजयात वाटा आहे. अर्थातच, आज जिवंत असलेल्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ जी आशा आहे ती या पिढीला अनोखी आशा आहे. सतत वाढत राहणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ भाग या नात्याने, त्यांचा येणाऱ्या “मोठ्या संकटातून” बचाव होऊ शकतो व पुन्हा कधी ते मृत्यूचा अनुभव घेणार नाहीत! (प्रकटीकरण ७:९, १४) पण, ‘समय व प्रसंगामुळे’ किंवा सैतानाच्या लोकांमुळे मरण पावणारे, पुनरुत्थानाच्या आशेवर आपला भरवसा ठेवू शकतात.—उपदेशक ९:११, पं.र.भा.
१९. सर्व ख्रिश्चनांनी आज कोणत्या आर्जवाकडे लक्ष दिले पाहिजे?
१९ यास्तव, मृत्यूला नाहीसे करणाऱ्या त्या गौरवी दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. पुनरुत्थानाबद्दल यहोवाने दिलेल्या अभिवचनावरील आपला भक्कम भरवसा आपल्याला याबाबतीत वास्तविक दृष्टिकोन बाळगण्यास मदत करतो. या जीवनात आपले काहीही झाले तरी, अगदी आपण मरण पावलो तरी, यहोवाने दिलेले अभिवचन आपल्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच, पौलाने करिंथकरांना केलेला शेवटला आर्जव, दोन हजार वर्षांपूर्वी जितका उचित होता तितकाच आजही आहे: “म्हणून माझ्या प्रिय बंधुनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथकर १५:५८.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?
◻ अभिषिक्त जणांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांना कोणत्या प्रकारची शरीरे मिळतील या प्रश्नाचे पौलाने कसे उत्तर दिले?
◻ मृत्यू कसा आणि केव्हा नाहीसा केला जाईल?
◻ पार्थिव पुनरुत्थानात कोणाचा समावेश असेल?
◻ बायबल ज्या विषयांवर काही सांगत नाही अशा विषयांसंबधी आपली कोणती मनोवृत्ती असली पाहिजे?
[२० पानांवरील चित्र]
एका बीजात नाट्यमय बदल झाल्यावर ते ‘मरून जाते’
[२३ पानांवरील चित्र]
प्राचीन काळचे विश्वासू पुरुष आणि स्त्रिया जसे की, नोहा, अब्राहाम, सारा आणि राहाब त्या पुनरुत्थित लोकांपैकी असतील
[२४ पानांवरील चित्र]
पुनरुत्थानाचा समय आनंदाचा समय असेल!