वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१ पृ. १३-१८
  • ‘मेलेले उठविले जातील’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘मेलेले उठविले जातील’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशू पुनरुत्थानावर प्रकाश टाकतो
  • पुनरुत्थानाच्या आशेचे समर्थन
  • पुनरुत्थानावर विश्‍वास आवश्‍यक
  • पुनरुत्थानाची आशा आपल्याला शक्‍ती देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • पुनरुत्थान—एक पक्की आशा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • पुनरुत्थान—तुमच्या जीवनाशी संबंधित असलेली शिकवणूक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • मी “देवाकडे आशा बाळगतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१ पृ. १३-१८

‘मेलेले उठविले जातील’

“कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ.”—१ करिंथकर १५:५२.

१, २. (अ) संदेष्टा होशेयद्वारे कोणते सांत्वनदायक अभिवचन देण्यात आले होते? (ब) मृतांना जिवंत करण्याची देवाची इच्छा आहे हे आपल्याला कसे माहीत होते?

तुमच्या कोणा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे का? मग तुम्हाला मृत्यूमुळे होणाऱ्‍या दुःखाची कल्पना आहे. तरीसुद्धा, देवाने संदेष्टा होशेय याच्याद्वारे दिलेल्या अभिवचनातून ख्रिस्ती लोक सांत्वन प्राप्त करतात: “मी त्यांना मृतलोकांच्या [शिओल] सत्तेतून उद्धरीन. मी त्यांना मरणापासून खंडून घेईन; अरे मरणा, तुझ्या पीडा कोठे आहेत? अरे मृतलोका, [शिओल] तुझ्याजवळचा विध्वंस कोठे आहे?”—होशेय १३:१४, पं.र.भा.

२ मृतजन पुन्हा जिवंत होतील ही कल्पना संशयवाद्यांना अर्थहीन वाटते. परंतु, असा एक चमत्कार करण्यासाठी सर्वसमर्थ देवाकडे निश्‍चितच शक्‍ती आहे! खरा मुद्दा असा आहे, की यहोवाला मृतांना पुन्हा जिवंत करण्याची इच्छा आहे का. धार्मिक मनुष्य ईयोबाने असे विचारले: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” तोच हे सांत्वनदायक उत्तर देतो: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१४, १५) “उत्कंठा,” हा शब्द उत्कट इच्छा किंवा उत्सुकता याला सूचित करतो. (पडताळा स्तोत्र ८४:२.) होय, यहोवा पुनरुत्थानाची आतुरतेने वाट पाहत आहे—त्याच्या स्मरणात जिवंत असलेल्या विश्‍वासू जणांना पुन्हा पाहण्याची त्याला उत्कट इच्छा आहे.—मत्तय २२:३१, ३२.

येशू पुनरुत्थानावर प्रकाश टाकतो

३, ४. (अ) येशूने पुनरुत्थानाच्या आशेवर कोणता प्रकाश टाकला? (ब) येशूला मानव म्हणून नव्हे तर स्वर्गीय व्यक्‍ती म्हणून का उठवण्यात आले?

३ ईयोबासारख्या प्राचीन लोकांना पुनरुत्थानाची अर्धवट माहिती होती. येशू ख्रिस्तानेच या विस्मयकारक आशेवर पूर्ण प्रकाश टाकला. त्याने स्वतःच्या प्रमुख भूमिकेविषयी सांगितले; तो म्हणाला: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” (योहान ३:३६) ह्‍या जीवनाचा उपभोग कोठे घेतला जाईल? विश्‍वास ठेवणारे बहुसंख्य लोक पृथ्वीवरच त्याचा उपभोग घेतील. (स्तोत्र ३७:११) परंतु, येशूने आपल्या शिष्यांस सांगितले: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२) देवाचे राज्य स्वर्गीय राज्य आहे. तेव्हा, ह्‍या आशेचा अर्थ असा होतो, की ‘लहान कळपाला’ येशूबरोबर स्वर्गामध्ये गौरवी व्यक्‍ती या अर्थी असणे आवश्‍यक आहे. (योहान १४:२, ३; १ पेत्र १:३, ४) किती भव्य आशा! येशूने पुढे प्रेषित योहानाला याबद्दल प्रकट केले, की या ‘लहान कळपाची’ संख्या केवळ १,४४,००० इतकीच असेल.—प्रकटीकरण १४:१.

४ परंतु, हे १,४४,००० लोक स्वर्गीय गौरवात कसे प्रवेशतील? येशूने “सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.” त्याच्या रक्‍ताद्वारे त्याने स्वर्गात जाण्याकरता “नवीन व जीवनयुक्‍त मार्ग” तयार केला. (२ तीमथ्य १:१०; इब्री लोकांस १०:१९, २०) प्रथम, बायबलने त्याच्याविषयी भाकीत केल्याप्रमाणे तो मरण पावला. (यशया ५३:१२) मग, प्रेषित पेत्राने नंतर घोषित केल्याप्रमाणे “त्या येशूला देवाने उठविले.” (प्रेषितांची कृत्ये २:३२) परंतु, येशूला मानव म्हणून उठवण्यात आले नव्हते. तो म्हणाला होता: “जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (योहान ६:५१) म्हणजेच, त्याने शारीरिक देह धारण केला असता तर हे अर्पण परिणामशून्य ठरले असते. म्हणूनच, येशू “देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (१ पेत्र ३:१८) अशाप्रकारे येशूने ‘आपल्यासाठी’ अर्थात ‘लहान कळपासाठी’ “सार्वकालिक मुक्‍ति मिळविली.” (इब्री लोकांस ९:१२) त्याने पापी मनुष्यजातीसाठी आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे मूल्य खंडणी म्हणून देवाला सादर केले आणि याचा प्रथम लाभ १,४४,००० जणांना होतो.

५. येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांना कोणती आशा प्रदान करण्यात आली होती?

५ स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान करण्यात येणारा केवळ येशूच एकटा असणार नव्हता. रोममधील आपल्या सहख्रिश्‍चनांना पौलाने सांगितले, की त्यांना देवाचे पुत्र व ख्रिस्ताबरोबर सहवारीस होण्याकरता पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आले होते; परंतु, शेवटपर्यंत टिकून राहिल्यावरच त्यांना अभिषिक्‍त झाल्याची निश्‍चिती मिळणार होती. (रोमकर ८:१६, १७) पौलाने पुढे असेही म्हटले: “जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्‍त झालो आहो, तर त्याच्या उठण्याच्याहि प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्‍त होऊ.”—रोमकर ६:५.

पुनरुत्थानाच्या आशेचे समर्थन

६. करिंथमध्ये पुनरुत्थानाच्या विश्‍वासावर प्रखर टीका का करण्यात आली व प्रेषित पौलाने याला कसा प्रतिसाद दिला?

६ पुनरुत्थानाची शिकवण, ख्रिस्ती विश्‍वासाच्या “प्राथमिक सिद्धान्ताचा” भाग आहे. (इब्री लोकांस ६:१, २, NW) तरी देखील, करिंथमध्ये या शिकवणीवर प्रखर टीका करण्यात आली. उपलब्ध पुराव्यानुसार, मंडळीतील काहींवर ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला होता व ते म्हणत होते की, “मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही.” (१ करिंथकर १५:१२) प्रेषित पौलापर्यंत ही बातमी पोहंचली तेव्हा त्याने पुनरुत्थानाच्या आशेचे, विशेषतः अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या आशेचे समर्थन केले. पहिले करिंथकर याच्या १५ व्या अध्यायातील पौलाच्या शब्दांचे आपण परीक्षण करू या. मागील लेखात सुचवल्याप्रमाणे तुम्ही तो संपूर्ण अध्याय आधीच वाचला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

७. (अ) पौलाने कोणत्या मुख्य वादावर लक्ष केंद्रित केले? (ब) पुनरुत्थित येशूला कोणी पाहिले?

७ पहिले करिंथकरच्या १५ व्या अध्यायाच्या पहिल्या दोन वचनात पौल आपल्या चर्चेचा विषय सांगतो: “बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरहि राहत आहा. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. . . . नसल्यास तुमचा विश्‍वास व्यर्थ आहे.” करिंथकर सुवार्तेत स्थिर झाले नसते तर त्यांनी सत्य स्वीकारूनही फायदा झाला नसता. पौल पुढे म्हणतो: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्‍या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला; त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत; त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाहि सर्वांच्या शेवटी दिसला.”—१ करिंथकर १५:३-८.

८, ९. (अ) पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे? (ब) कदाचित कोणत्या प्रसंगी येशू “एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना” प्रकट झाला?

८ सुवार्ता स्वीकारणाऱ्‍यांकरता, येशूच्या पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवायचा की नाही हा ऐच्छिक प्रश्‍न नव्हता. “ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला,” आणि उठवण्यात आला याची खात्री देण्याकरता पुष्कळ साक्षीदार होते. त्यांच्यापैकी एक, केफा किंवा जो पेत्र म्हणून नावाजला आहे तो होता. येशूचा विश्‍वासघात करून त्याला पकडण्यात आले त्या रात्री पेत्राने येशूला नाकारल्यानंतर, येशूने त्याला दर्शन दिल्यावर त्याला केवढे सांत्वन मिळाले असावे. “बारा जणांना” अर्थात, प्रेषितांच्या गटाला पुनरुत्थित येशूने भेट दिली—हा एक असा अनुभव होता ज्याने निश्‍चितच त्यांना भयावर मात करण्यास व येशूच्या पुनरुत्थानाचे धाडसी साक्षीदार होण्यास मदत केली.—योहान २०:१९-२३; प्रेषितांची कृत्ये २:३२.

९ ख्रिस्त एका मोठ्या समूहाला, “एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना” देखील दिसला. केवळ गालीलातच त्याचे मोठ्या संख्येत अनुयायी असल्यामुळे मत्तय २८:१६-२० मध्ये वर्णन करण्यात आलेल्या प्रसंगी त्याने दर्शन दिले असावे आणि त्याच वेळी येशूने शिष्य बनवण्याची आज्ञाही दिली होती. हे लोक किती जबरदस्त साक्ष देऊ शकले! सा.यु. ५५ मध्ये पौलाने करिंथकरांना पहिले पत्र पाठवले तोपर्यंत काहीजण अद्यापही हयात होते. परंतु, या गोष्टीकडे लक्ष द्या, की ज्यांचा मृत्यू झाला होता ते “महानिद्रा” घेत आहेत असे त्यांच्याविषयी म्हटले आहे. त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळण्याकरता त्यांचे अद्याप पुनरुत्थान घडले नव्हते.

१०. (अ) येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटल्या भेटीचा काय परिणाम झाला? (ब) “जणू काय अकाली जन्मलेला” शौल याला येशूने कसे काय दर्शन दिले?

१० योसेफ आणि येशूची आई मरीया यांचा पुत्र याकोब, येशूच्या पुनरुत्थानाचा आणखी एक उल्लेखनीय साक्षीदार आहे. पुनरुत्थानापूर्वी याकोबाचा अजूनही त्याच्यावर विश्‍वास नव्हता. (योहान ७:५) पण, येशूने त्याला दर्शन दिल्यावर तो विश्‍वास ठेवू लागला आणि कदाचित त्याने आपल्या इतर बांधवांना परिवर्तन करण्यास मदत केली असावी. (प्रेषितांची कृत्ये १:१३, १४) येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटल्या भेटीवेळी, म्हणजे स्वर्गारोहण प्रसंगी त्याने त्यांना, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत . . . साक्षी” होण्याचा आदेश दिला. (प्रेषितांची कृत्ये १:६-११) नंतर, ख्रिश्‍चनांचा छळ करणाऱ्‍या तार्सच्या शौलाला त्याने दर्शन दिले. (प्रेषितांची कृत्ये २२:६-८) “जणू काय अकाली जन्मलेला” शौल याला येशूने दर्शन दिले. हे जणू शौलाचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झाल्याप्रमाणे होते; पुनरुत्थान व्हायच्या अनेक दशकांआधीच तो वैभवी प्रभूला पाहू शकला. या अनुभवामुळे, ख्रिस्ती मंडळीचा तो करीत असलेला खुनी विरोध जिथल्या तिथेच थांबला व त्याच्यामध्ये विलक्षण बदल झाला. (प्रेषितांची कृत्ये ९:३-९, १७-१९) शौलाचा प्रेषित पौल झाला; ख्रिस्ती विश्‍वासाच्या समर्थकांपैकी तो एक अग्रेसर समर्थक बनला.—१ करिंथकर १५:९, १०.

पुनरुत्थानावर विश्‍वास आवश्‍यक

११. “पुनरुत्थान नाही,” असे म्हणणाऱ्‍यांचा तर्कदोष पौलाने उघडपणे कसा दाखवला?

११ यास्तव, येशूचे पुनरुत्थान सिद्ध झालेली वस्तुस्थिती होती. पौल येथे युक्‍तीवाद करतो: “आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?” (१ करिंथकर १५:१२) या लोकांच्या मनात पुनरुत्थानाविषयी केवळ शंका वा प्रश्‍नच नव्हते तर ते उघडपणे त्यावर अविश्‍वास दाखवत होते. म्हणूनच पौलाने त्यांचा तर्कदोष उघडपणे दाखवला. तो म्हणतो, की जर ख्रिस्ताचे मृतांमधून पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्ती संदेश लबाड आहे व ज्यांनी ख्रिस्ताचे पुनरुत्थान पाहिले होते ते “देवासंबंधाने खोटे साक्षी” आहेत. जर ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नाही तर देवाला कसलीही खंडणी देण्यात आली नाही; ख्रिश्‍चन अजूनही “आपल्या पापातच” आहेत. (१ करिंथकर १५:१३-१९; रोमकर ३:२३, २४; इब्री लोकांस ९:११-१४) मृत्यूमुळे “महानिद्रा” घेणारे ख्रिश्‍चन, जसे काही हुतात्म्यांच्या बाबतीत झाले, ते, कोणत्याही अस्सल आशेविनाच नाश पावले म्हणायचे! आणि ख्रिश्‍चनांना या जीवनाची अपेक्षा होती मग तर त्यांची किती दयनीय स्थिती! त्यांनी सोसलेले दुःख सर्व अर्थहीन झाले असते.

१२. (अ) ख्रिस्ताला “तो महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ असा आहे” असे संबोधल्याने काय सूचित होते? (ब) ख्रिस्ताने पुनरुत्थान कसे शक्य केले?

१२ परंतु, ते असे नव्हते. पौल पुढे म्हणतो: “ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच.” शिवाय, “तो महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथम फळ असा आहे.” (१ करिंथकर १५:२०) इस्राएल लोकांनी यहोवाला आज्ञाधारकपणे आपल्या उत्पन्‍नातून प्रथमफळ दिले तेव्हा भरपूर उपज देऊन यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला. (निर्गम २२:२९, ३०; २३:१९; नीतिसूत्रे ३:९, १०) ख्रिस्ताला “प्रथम फळ” संबोधण्याद्वारे, भविष्यात पुष्कळ लोकांना स्वर्गीय जीवनासाठी मृतांतून उठवण्यात येईल असे, पौल सूचित करतो. तो म्हणतो: “मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानहि आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” (१ करिंथकर १५:२१, २२) येशूने आपले परिपूर्ण मानवी जीवन खंडणी म्हणून देऊन पुनरुत्थान शक्य केले, तसेच मानवजातीची पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्‍तता करण्यासाठी मार्ग खुला केला.—गलतीकर १:४; १ पेत्र १:१८, १९.a

१३. (अ) स्वर्गीय पुनरुत्थान कधी होते? (ब) काही अभिषिक्‍त जन मृत्यूमध्ये “महानिद्रा” घेत नाहीत हे कसे?

१३ पौल पुढे म्हणतो: “प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.” (१ करिंथकर १५:२३) सा.यु. ३३ मध्ये ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले. परंतु, त्याचे अभिषिक्‍त अनुयायी, अर्थात “जे ख्रिस्ताचे” आहेत त्यांचे, येशूची राजसी उपस्थिती चालू होऊन काही काळ उलटल्यानंतर पुनरुत्थान होऊ लागले; बायबल भविष्यवाणीनुसार ही उपस्थिती १९१४ मध्ये सुरू झाली. (१ थेस्सलनीकाकर ४:१४-१६; प्रकटीकरण ११:१८) त्या उपस्थितीदरम्यान जिवंत असलेल्यांबद्दल काय? पौल म्हणतो: “पाहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषांत, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ.” (१ करिंथकर १५:५१, ५२) स्पष्टपणे, सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती कबरेत पुनरुत्थान होईपर्यंत निद्रा घेत नाहीत. ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान मरण पावणाऱ्‍यांचे रूपांतर क्षणात होते.—प्रकटीकरण १४:१३.

१४. अभिषिक्‍तांचा ‘मेलेल्यांबद्दल बाप्तिस्मा’ होतो हे कसे?

१४ “नाही तर मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? मेलेले जर उठवले जात नाहीत तर ते लोक त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा कशाला घेतात? आणि आम्ही घडोघडी संकटांत का पडतो?” असे पौल विचारतो. (१ करिंथकर १५:२९, ३०, NW) काही बायबल भाषांतरे दर्शवतात त्याप्रमाणे, जिवंत लोकांना मृतांखातर बाप्तिस्मा देण्यात आला होता असा पौलाच्या बोलण्याचा अर्थ नव्हता. कारण, बाप्तिस्म्याचा संबंध ख्रिस्ती शिष्यत्वाशी आहे व मृत लोक शिष्य बनू शकत नाहीत. (योहान ४:१) उलट, पौल जिवंत ख्रिश्‍चनांविषयी बोलत होता; बहुतेक जणांचे पौलाप्रमाणे “घडोघडी जीव धोक्यात” होते. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा ‘ख्रिस्त येशूच्या मरणात’ बाप्तिस्मा झाला होता. (रोमकर ६:३) त्यांना अभिषिक्‍त केल्यापासून त्यांचा बाप्तिस्मा जणू अशा मार्गाकरता होत होता की ज्या मार्गावर त्यांना ख्रिस्ताप्रमाणे मृत्यू येणार होता. (मार्क १०:३५-४०) एका गौरवी स्वर्गीय पुनरुत्थानाची आशा बाळगून ते मरण पावणार होते.—१ करिंथकर ६:१४; फिलिप्पैकर ३:१०, ११.

१५. पौलाने कोणकोणत्या संकटांचा सामना केला असावा व पुनरुत्थानावरील विश्‍वासाने त्याला ह्‍या सर्व संकटांचा सामना करावयास कसे साहाय्य केले?

१५ पौल आता सांगतो, की त्याने स्वतःनेच इतकी संकटे झेलली होती की तो, “मी रोज रोज मरतो” असे म्हणू शकला. तो अतिशयोक्‍ती करत आहे असे कोणी म्हटल्यास त्यांना तो म्हणतो: “बंधुजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्या ठायी मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो.” मराठी कॉमन लँग्वेज भाषांतरात हे वचन अशाप्रकारे आहे: “भावांनो, तुमच्याविषयी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासमक्ष मला जो अभिमान आहे त्याची शपथ घेऊन मी सांगतो, मला दररोज मृत्यूशी सामना करावा लागला.” त्याने सामना केलेल्या संकटाचे उदाहरण म्हणून तो ३२ व्या वचनात म्हणतो, की “इफिसांत मी श्‍वापदाबरोबर लढाई केली.” गुन्हेगारांना आखाड्यातील हिंस्र पशूंपुढे टाकून ठार मारण्याचा रोमनांचा प्रघात होता. पौलाने खरोखरच जंगली श्‍वापदांबरोबर झुंज दिली असेल तर तो यहोवाच्या मदतीनेच जिवंत राहू शकला असावा. पुनरुत्थानाच्या आशेविना, अशा संकटांचा सामना करावे लागणारे जीवन निवडणे निश्‍चित मूर्खपणा ठरला असता. भविष्यातील जीवनाच्या आशेविना, देवाची सेवा करताना सहन करावे लागणारे कष्ट आणि त्याग यांचा काहीच फायदा झाला नसता. पौल म्हणतो: “मेलेले उठविले जात नाहीत, ‘तर चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.’”—१ करिंथकर १५:३१, ३२; २ करिंथकर १:८, ९; ११:२३-२७ पाहा.

१६. (अ) “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे” ह्‍या वाक्यांशाचा उगम कोठून झाला असावा? (ब) हे विचार स्वीकारण्यात कोणते धोके होते?

१६ जेरुसलेमच्या अवज्ञाकारक रहिवाशांच्या दैववादी मनोवृत्तीचे वर्णन करणाऱ्‍या यशया २२:१३ या वचनाचा पौलाने कदाचित उल्लेख केला असावा. किंवा, तो एपिक्यूरियन लोकांच्या विश्‍वासाचा विचार करीत असावा; ते लोक, मृत्यूनंतर जीवन असल्याच्या कल्पनेला तुच्छ लेखत होते आणि शारीरिक सुखच जीवनातील सर्वात प्रमुख गोष्ट आहे असे मानत होते. काहीही असो, “खाऊ, पिऊ” हे तत्त्वज्ञान अधम होते. म्हणूनच पौल बजावतो: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) पुनरुत्थान नाकारणाऱ्‍यांबरोबर संगत करणे घातक ठरू शकते. अशा संगतीमुळेच करिंथ मंडळीत, लैंगिक अनैतिकता, फुटी, खटले आणि प्रभूच्या सांज भोजनाबद्दल अनादर यांसारख्या उद्‌भवलेल्या पुष्कळ समस्या पौलाला सोडवाव्या लागल्या होत्या.—१ करिंथकर १:११; ५:१; ६:१; ११:२०-२२.

१७. (अ) पौलाने ख्रिश्‍चनांना कोणती विनवणी केली? (ब) कोणती प्रश्‍ने अनुत्तरीत राहतात?

१७ म्हणूनच पौल करिंथकरांना ही सकारात्मक विनवणी करतो: “नीतिमत्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.” (१ करिंथकर १५:३४) पुनरुत्थानाविषयी नकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यामुळे काहीजण आध्यात्मिकरीत्या बेशुद्धावस्थेत होते. त्यांनी शुद्धीवर येणे आवश्‍यक होते. आज, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी देखील, जगाच्या संशयी दृष्टिकोनांनी प्रभावीत न होता आध्यात्मिकरीत्या जागृत असणे आवश्‍यक आहे. त्यांनी स्वर्गीय पुनरुत्थानाच्या त्यांच्या आशेशी जडून राहिले पाहिजे. पण, त्यावेळी करिंथकरांसमोर जे प्रश्‍न होते ते आज आपल्यापुढे देखील आहेत. जसे की, १,४४,००० जणांना कोणत्या शरीराने स्वर्गात उठवले जाते? आणि, अजूनही कबरेत असलेल्या व स्वर्गीय आशा नसलेल्या कोट्यवधी लोकांबद्दल काय? अशा लोकांसाठी पुनरुत्थान कोणता अर्थ राखून आहे? आपल्या पुढील लेखात आपण पौलाने पुनरुत्थानावर केलेल्या उरलेल्या चर्चेचे परीक्षण करू या.

[तळटीपा]

a खंडणीबद्दल आणखी माहितीकरता इंग्रजीतील टेहळणी बुरूज नियतकालिकाचा फेब्रुवारी १५, १९९१ चा अंक पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ येशूने पुनरुत्थानावर कोणता प्रकाश टाकला?

◻ ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे काही साक्षीदार कोण होते?

◻ पुनरुत्थानाच्या सिद्धान्ताला आव्हान का देण्यात आले होते व पौलाचा काय प्रतिसाद होता?

◻ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक का होते?

[१५ पानांवरील चित्र]

याईराची मुलगी पुनरुत्थान शक्य आहे याचा पुरावा बनली

[१६, १७ पानांवरील चित्र]

पुनरुत्थानाच्या आशेविना, विश्‍वासू ख्रिश्‍चनांचे हौतात्म्य अर्थहीन बनले असते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा