राज्य घोषकांचा वृत्तान्त
‘दररोज बाजारात’
प्रेषित पौलाने राज्य संदेशाचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा उचलला. योग्य लोकांना शोधण्याकरता तो “सभास्थानात यहूद्यांबरोबर . . . आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत” असे.—प्रेषितांची कृत्ये १७:१७.
अशाप्रकारचा आवेश, सा.यु. पहिल्या शतकापासूनच यहोवाच्या खऱ्या उपासकांचे विशिष्ट चिन्ह राहिले आहे. (मत्तय २८:१९, २०) आज, यहोवाचे साक्षीदार अशाचप्रकारे, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना अचूक ज्ञानाप्रत आणण्याकरता आवेशाने साहाय्य करतात तेव्हा विविध पद्धतींचा उपयोग करतात. (१ तीमथ्य २:३, ४) ऑस्ट्रेलियातील पुढील अनुभव हे स्पष्ट करतो.
दर आठवडी पाच दिवस, सीड आणि हेराल्ड आळीपाळीने, सिडनीच्या रेल्वे स्थानकावर बायबल साहित्यांचे एक लहानसे प्रदर्शन मांडतात. गेल्या पाच वर्षांपासून ते अशाप्रकारे देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहेत. ९५ वर्षीय सीड म्हणतात: “मला ८७ वर्ष पूर्ण झाली तेव्हा माझं कार चालवणं बंद झालं. यामुळे मी खूप निराश झालो कारण मला सार्वजनिक साक्षीकार्य खूप आवडायचं. एकदा, काटुंबा येथील एको पॉईन्ट नामक एका प्रसिद्ध पर्यटन स्थळी मी एका कलाकाराला निसर्गदृश्य रंगीत चित्रे विकताना पाहिले. ती रंगवलेली चित्रे मी न्याहाळून पाहिली आणि विचार केला, ‘माझ्या बॅगेत तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली चित्रं आहेत, आणि त्यांची किंमत पण ह्या चित्रांपेक्षा खूपच कमी आहे!’ तेव्हा मी ठरवले, की मी एक लहानसा स्टॅण्ड करीन, एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी जाईन आणि यहोवाचे साक्षीदार वितरण करतात ते सुंदर चित्रे असलेले बायबल साहित्य येणाऱ्या जाणाऱ्यांना पेश करीन.
“चार वर्षांपूर्वी मी माझा स्टॅण्ड सिडनीला हलवला आणि हेराल्ड माझ्याबरोबर येऊ लागले. आम्ही आळीपाळीने स्टॅण्ड घेऊन उभे राहतो आणि आमच्या स्थानीय मंडळीसोबत कार्य करतो.” आता ८३ वर्षांचे हेराल्ड म्हणतात: “सोमवार ते शुक्रवार फार कमी लोक घरी भेटतात. तेव्हा अशाप्रकारे लोक जेथे असतात तेथे आम्ही राज्य संदेश सांगू शकतो. आणि आम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतात. या राष्ट्रात आमची साहित्य वितरणाची संख्या बरीच उल्लेखनीय आहे.”
सीड म्हणतात: “इतक्या वर्षांत आम्ही चार ते पाच ठिकाणे बदलली असल्यामुळे लोक आम्हाला ओळखू लागले आहेत. काही लोक स्वतःहून साहित्य घेण्यासाठी आमच्याकडे येतात. इतरांचे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरे त्यांना हवी असतात. आणि काही लोकांना तर आमच्याबरोबर फक्त थोडा वेळ बोलायचं असतं.” आणि मग गालातल्या गालात हसून ते म्हणाले, “अशातच माझी पुनर्भेट माझ्याकडे येते.”
हेराल्ड म्हणतात: “पुष्कळ लोकांना बायबलमध्ये आस्था आहे. आमच्याकडून मिळालेल्या साहित्यामुळे आणि आम्ही त्यांची उत्तरे बायबलमधून दिल्यामुळे फक्त एका महिन्यात चार लोकांनी साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास चालू केला. अशाप्रकारचे अनुभव आम्हाला खूप उत्तेजन देतात.”
सीड आणि हेराल्डप्रमाणे आणि प्रेषित पौलाप्रमाणे सर्व यहोवाचे साक्षीदार आपल्याकडील महत्त्वपूर्ण संदेश सांगण्याचा प्रत्येक मार्ग अवलंबतात. अशाप्रकारे, “सुवार्ता सर्व जगात गाजविली” जात आहे.—मत्तय २४:१४.