वाचकांचे प्रश्न
येशूने आर्जवून म्हटले: “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा; कारण मी तुम्हांस सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.” (लूक १३:२४) येशूचे असे म्हणण्याचे काय तात्पर्य होते आणि आज हे शब्द आपल्याला कशाप्रकारे लागू होतात?
या रोचक उताऱ्याचा अर्थ समजून घेण्याकरता त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. आपल्या मृत्यूपूर्वी साधारण सहा महिन्यांआधी, मंदिराच्या पुनर्समर्पणाच्या वार्षिक महोत्सवादरम्यान येशू जेरुसलेम येथे आला होता. आपण देवाच्या मेंढरांचे मेंढपाळ आहोत असे तो त्यावेळी म्हणाला, पण त्याने स्पष्टीकरण दिले की सर्वसामान्यपणे यहुदी लोक या मेंढरांपैकी नव्हते कारण त्यांनी येशूची वाणी ऐकण्यास नकार दिला होता. आपला पिता आणि आपण “एक” आहोत असे तो म्हणाला, तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करण्याकरता हातात दगड घेतले. त्यांच्या हाती लागू नये म्हणून तो जॉर्डनच्या पलीकडे पेरियात निघून गेला.—योहान १०:१-४०.
तेथे एकाने त्याला विचारले: “प्रभुजी, तारणप्राप्ति होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” (लूक १३:२३) हा त्याचा प्रश्न उचित होता, कारण त्याकाळी यहुद्यांची अशी धारणा होती की तारणाकरता लायक असणाऱ्यांची केवळ एक मर्यादित संख्याच आहे. आणि यहुद्यांची नेहमीची वृत्ती लक्षात घेता, त्यांच्या मते या मर्यादित संख्येत कोण असावेत हे काही वेगळे सांगायला नको. पण कालांतराने काही घटनांवरून उघड झाल्याप्रमाणे त्यांचा ग्रह अगदीच चुकीचा होता!
साधारण दोन वर्षांपासून येशू त्यांच्यात राहून, शिकवत होता, अद्भुत कार्ये करीत होता, आणि स्वर्गीय राज्याचे वारस होण्याची संधी त्यांना देऊ करीत होता. परिणाम? त्यांना आणि विशेषतः त्यांच्या पुढाऱ्यांना आपण अब्राहामाचे संतान आहोत आणि आपल्याला देवाचे नियमशास्त्र देण्यात आले आहे या गोष्टीचा फार अभिमान होता. (मत्तय २३:२; योहान ८:३१-४४) पण त्यांनी उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकून तिला प्रतिसाद दिला नाही. त्यांच्यासमोर जणू एक द्वार खुले होते आणि या द्वारातून प्रवेश केल्यास त्यांना राज्यात सहभागी होण्याचे मुख्य प्रतिफळ लाभणार होते, पण त्यांनी ही संधी धुत्कारली. प्रामुख्याने निम्न वर्गातील असणाऱ्या अगदी मोजक्याच यहुद्यांनी येशूचा सत्याचा संदेश ऐकला, प्रतिसाद दिला, आणि येशूसोबत ते जडून राहिले.—लूक २२:२८-३०; योहान ७:४७-४९.
सा. यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी, हेच मोजके लोक आत्म्याने अभिषिक्त होण्यास पात्र ठरले. (प्रेषितांची कृत्ये २:१-३८) देऊ केलेल्या संधीचा फायदा न घेतल्यामुळे ज्यांना रडावे व दात खावे लागेल अशा येशूने उल्लेखलेल्या अधर्म करणाऱ्यांपैकी ते नव्हते.—लूक १३:२७, २८.
परिणामस्वरूप, पहिल्या शतकातील “पुष्कळ लोक” म्हणजे सर्वसाधारण यहुदी होते, विशेषतः धार्मिक पुढारी. आपण देवाची कृपापसंती मिळवण्यास उत्सुक आहोत असा त्यांचा दावा तर होता,—पण ते देवाच्या नव्हे तर स्वतःच्याच दर्जांनुरूप आणि स्वतःच्याच पद्धतीने असे करू पाहात होते. उलटपक्षी, राज्यात सहभागी होण्याची प्रांजळ इच्छा असल्यामुळे ज्यांनी प्रतिसाद दिला असे तुलनात्मकपणे ‘थोडे लोक’ ख्रिस्ती मंडळीचे अभिषिक्त सदस्य बनले.
आता हेच आपल्या काळात कशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर लागू होते ते पाहा. ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसच्या असंख्य सभासदांना असे शिकवण्यात आले आहे की तुम्ही स्वर्गात जाल. परंतु, अशाप्रकारची इच्छा धरणे बायबलच्या अचूक शिकवणुकींवर आधारित नाही. त्या जुन्या काळातील यहुद्यांप्रमाणे, या लोकांनाही देवाची कृपापसंती तर हवी आहे, पण स्वतःच्याच अटींवर.
तथापि, तुलनात्मकपणे आपल्या काळात काही मोजक्या लोकांनी राज्य संदेशाला नम्रपणे प्रतिसाद देऊन स्वतःचे जीवन यहोवाला समर्पित केले आहे आणि अशा तऱ्हेने त्याची कृपापसंती मिळवण्यास ते पात्र ठरले आहेत. परिणामी, ते “राज्याचे पुत्र” झाले आहेत. (मत्तय १३:३८) या अभिषिक्त ‘पुत्रांचे’ पाचारण पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ पासून सुरू झाले. यहोवाच्या साक्षीदारांचे बऱ्याच काळापासून असे मानणे आहे की मानवजातीसोबत देवाच्या दळणवळणावरून असे सूचित होते की स्वर्गीय वर्गाच्या सदस्यांचे मूलभूत पाचारण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अलीकडच्या वर्षांत बायबलचे सत्य शिकणाऱ्यांना समजले आहे की आता पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाची आशा देऊ केली जात आहे. प्रत्यक्ष स्वर्गात जाण्याची ज्यांना आशा आहे, अशा अभिषिक्त ख्रिश्चनांच्या रोडावत चाललेल्या संख्येच्या तुलनेत अशा लोकांची संख्या बरीच मोठी आहे. लूक १३:२४ हे प्राथमिकपणे स्वर्गात जाण्याची आशा नसणाऱ्यांना लागू होत नाही, पण त्यात त्यांच्यासाठी उपयुक्त सल्ला निश्चितच आहे.
नेटाने यत्न करा असे येशूने आर्जवून सांगितले तेव्हा तो किंवा त्याचा पिता आपल्याला मागे खेचण्याकरता आपल्या मार्गात अडखळणे आणील असे तो सुचवत नव्हता. परंतु, लूक १३:२४ यावरून आपल्याला हे कळून येते की देवाच्या अपेक्षांनुसार लायक नसणाऱ्यांना तो स्वीकारत नाही. “नेटाने यत्न करा” या शब्दांतून संघर्ष करण्याचा, झटण्याचा अर्थ सूचित होतो. त्याअर्थी आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी झटतो का?’ लूक १३:२४ या वचनाचा पुढील शब्दांत सारांश देता येईल: ‘अरुंद दरवाजातून प्रवेश करण्यासाठी मला नेटाने यत्न केला पाहिजे कारण पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील पण त्यांना जाता येणार नाही. मग मी खऱ्या अर्थाने नेटाने यत्न करीत आहे का? जुन्या काळातील क्रीडांगणांवर विजय प्राप्त करण्याकरता आपले सर्वस्व वाहून घेणाऱ्या खेळाडूंसारखा मी आहे का? असा हा खेळाडू आपली कामगिरी हलकी समजून त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. मी असे करतो का?’
येशूच्या शब्दांवरून असे सूचित होते की काहीजण आपल्याच सोयीनुसार, आपल्याला मानवेल त्याप्रमाणे “दरवाजाने आत जाण्याचा” प्रयत्न करतात. अशाप्रकारच्या मनोवृत्तीचा एखाद्या साक्षीदारावरही प्रभाव पडू शकतो. काहीजण कदाचित असा युक्तिवाद करत असतील, ‘वर्षानुवर्षे, असंख्य त्याग करून सतत झटत राहिलेल्या कितीतरी कर्तव्यनिष्ठ ख्रिश्चनांना आपण ओळखतो; ते मरायला टेकले तरी या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत काही आलाच नाही. तेव्हा आपण सुद्धा थोडं दमानं घेतल्यास, जरा चारचौघांसारखं जीवन जगल्यास काही हरकत नाही.’
असा विचार सहज मनात येऊ शकतो, पण हे शहाणपणाचे ठरेल का? उदाहरणार्थ, प्रेषितांनी असा विचार केला का? निश्चितच नाही. त्यांनी खऱ्या उपासनेकरता आपले सर्वस्व दिले—अगदी जीवनाच्या शेवटल्या क्षणापर्यंत. पौलाचेच पाहा, तो म्हणू शकला: “आम्ही [ख्रिस्ताची] घोषणा करितो . . . ह्याकरिता त्याची जी शक्ति माझ्या ठायी जोराने कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.” नंतर त्याने लिहिले: “ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करितो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेविली आहे.”—कलस्सैकर १:२८, २९; १ तीमथ्य ४:१०.
पौलाने हा यत्न केला ते अगदी उचित केले हे आपल्याला माहीत आहे. पौल म्हणू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे;” त्याच्यासारखेच आपल्या सर्वांना असे म्हणता आले तर आपल्याला किती समाधान वाटू शकेल. (२ तीमथ्य ४:७) त्यामुळे लूक १३:२४ येथे नोंदून ठेवलेल्या येशूच्या शब्दांनुरूप, आपल्यांतील प्रत्येकजण स्वतःला विचारू शकतो, ‘मी मेहनत, कष्ट करण्याचा प्रयत्न करतो का? “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा” ही येशूची आज्ञा मी मनावर घेतली आहे याचा नियमितपणे मी पुरेसा पुरावा देतो का?’