पृथ्वी ग्रहाचा सर्वनाश ठरलेला?
विसावे शतक संपत आले असून, २१ व्या शतकाची चिन्हे क्षितिजावर दिसू लागली आहेत. त्यामुळे, जगाच्या विनाशासंबंधीच्या भाकितांकडे एरवी फारसे किंवा अजिबातच लक्ष न देणारे देखील येणाऱ्या निकट भविष्यात जगाला हादरवून सोडणारी एखादी विलक्षण घटना घडणार की काय असा विचार करू लागले आहेत.
हा विषय हाताळणारे वृत्तपत्रातील आणि मासिकांतील लेख तुमच्या पाहण्यात आले असतील—अख्खी पुस्तके देखील या विषयावर लिहिण्यात आली आहेत. पण २१ व्या शतकात पाऊल ठेवता ठेवता नेमक्या कोणत्या घटना घडतील हे येणारा काळच सांगेल. काही लोक असे दाखवून देतात की वर्ष २००० च्या शेवटापर्यंत पोचल्यावर केवळ एकाच वर्षाचा (किंवा वर्ष २००० मधून वर्ष २००१ मध्ये प्रवेश केल्यावर केवळ एका मिनिटाचाच फरक पडेल); काही विशेष परिणाम होणार नाही. अधिकांश लोकांना काळजी आहे, ती आपल्या या ग्रहाच्या दीर्घकालीन भविष्याची.
एक विशिष्ट भाकीत जे खासकरून आजकाल अधिकच ऐकिवात येऊ लागलेय ते असे, की—येणाऱ्या काही वर्षांत म्हणा किंवा भविष्यात कधीतरी म्हणा—पृथ्वी ग्रहाचा सर्वनाश म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. अशीच काही नाशाची भाकिते विचारात घ्या.
लेखक आणि तत्त्वज्ञानी जॉन लेस्ली, १९९६ साली प्रथम प्रकाशित झालेल्या दी एन्ड ऑफ द वर्ल्ड—द सायन्स ॲण्ड एथिक्स ऑफ ह्यूमन एकस्टिंकशन (जगाचा अंत—मानवी विनाशाचे सामाजिक आणि नैतिक पैलू) या आपल्या पुस्तकात, पृथ्वीवर मानव जीवनास संपुष्टात आणणाऱ्या तीन संभाव्य कारणांचा उल्लेख करतात. त्यांचा पहिला प्रश्न: “सर्वव्यापी आण्विक युद्धामुळे तर मानवजातीचा विनाश होणार नाही?” पुढे ते म्हणतात: “यापेक्षा अधिक संभावना वाटते ती अशी, की . . . किरणोत्सर्जनाच्या दुष्परिणामांमुळे [मानवजात] नाहीशी होईल: वेगवेगळे कर्करोग, रोगप्रतिबंधक शक्ती क्षीण झाल्यामुळे बोकाळलेले संसर्गजन्य रोग किंवा मग मोठ्या प्रमाणावर जन्मजात विकार. आरोग्यपूर्ण वातावरणाकरता आवश्यक असणारे सूक्ष्मजीव नष्ट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.” लेस्ली यांनी सुचवलेली तिसरी शक्यता म्हणजे कोणत्यातरी धूमकेतूची किंवा लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर: “एक ते दहा किलोमीटर व्यास असलेल्या जवळजवळ दोन हजार धूमकेतू आणि लघुग्रहांची कक्षा अशाप्रकारची आहे की एक ना एक दिवशी त्यांची पृथ्वीसोबत टक्कर होईल अशी अपेक्षा करता येते. यापेक्षा मोठ्या आकाराचे धूमकेतू आणि लघुग्रह देखील आहेत ज्यांची तुलनात्मकपणे लहान संख्या आहे (अंदाजे सांगता येणार नाही); शिवाय यापेक्षा कितीतरी जास्त असेही आहेत ज्यांचा आकार लहान आहे.”
“सर्वनाशाचे” सजीव वर्णन
आणखी एका शास्त्रज्ञाचे, ऑस्ट्रेलियातील ॲडेलेड विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल डेव्हीस यांचे उदाहरण विचारात घ्या. “अटलांटिकच्या दोन्ही बाजूला ज्याला तोड नाही असा उत्कृष्ट विज्ञान लेखक,” या शब्दांत वॉशिंग्टन टाईम्सने एकदा त्यांचे वर्णन केले होते. १९९४ साली त्यांनी द लास्ट थ्री मिनिट्स (शेवटली तीन मिनिटे) नावाचे एक पुस्तक लिहिले; या पुस्तकाला “पृथ्वीच्या सर्वनाशाविषयी प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकांचा मूलाधार” म्हणण्यात आले आहे. सदर पुस्तकातील पहिल्याच अध्यायाचे शीर्षक “सर्वनाश” असे असून यदाकदाचित पृथ्वी ग्रहावर एखादा धूमकेतू आदळलाच तर नेमके काय घडेल याचे एक काल्पनिक चित्र त्यात उभे केले आहे. त्यांनी केलेले रक्त गोठवून टाकणारे वर्णन काहीसे असे आहे:
“दहा हजार भूकंप एकदाच आल्यागत पृथ्वी हादरून जाते. सबंध भूमंडलाच्या पृष्ठभागावरून वाऱ्याची अशी एक जोरदार लाट उसळते की असतील नसतील त्या सर्व इमारती जमीनदोस्त होतात, त्या लाटेच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही वस्तूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. धूमकेतू आदळला त्या ठिकाणाच्या आसपासची समतल जमीन वितळून कितीतरी किलोमीटर उंच डोंगरांच्या रूपात वर येते; दीडशे किलोमीटरपर्यंत व्यापलेला भला मोठा खड्डा पडून पृथ्वीचा भूगर्भ उघडा पडतो . . . धूळमातीचे ढीगच्या ढीग वातावरणात पसरतात आणि पृथ्वीवरून सूर्य पूर्णपणे दिसेनासा होतो. जमिनीवरून अंतराळात फेकल्या गेलेल्या वस्तू पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात पडू लागतात; आता सूर्यप्रकाशाऐवजी या अब्जावधी वस्तूंचा फडफडणारा, भयाण, रखरखीत प्रकाश सर्वत्र पसरतो आणि त्यांच्या भयंकर उष्णतेत खालची जमीन होरपळून निघते.”
प्रोफेसर डेव्हीस, स्विफ्ट-टटल नावाचा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याविषयीच्या भाकिताच्या संदर्भात या काल्पनिक दृश्याचे वर्णन करतात. ते पुढे म्हणतात की अशी घटना अगदी निकटच्या भविष्यात जरी होणार नसली तरीसुद्धा त्यांच्या मते “पुढेमागे कधीतरी स्विफ्ट-टटल किंवा त्यासारखे काहीतरी नक्कीच पृथ्वीवर आदळेल.” काही अंदाजांवरून असे सुचवण्यात आले आहे की, अर्ध्या किलोमीटरइतके किंवा त्यापेक्षा अधिक व्यास असलेले १०,००० पदार्थ पृथ्वीच्छेदक कक्षेत फिरत आहेत; याच अंदाजांच्या आधारावर डेव्हीस यांनी वरील निष्कर्ष काढला आहे.
अशी ही भयावह शक्यता वास्तवात उतरेल असे तुम्हालाही वाटते का? आश्चर्य म्हणजे बऱ्याच लोकांना वाटते. एवढेच की आपल्या हयातीत असे काही घडणार नाही, असे म्हणून ते स्वतःचे समाधान करून घेतात. पण, निकट भविष्यात म्हणा किंवा आजपासून हजारो वर्षांनी म्हणा—पृथ्वी ग्रहाचा सर्वनाश होण्याचे कारणच काय? पृथ्वीवरील माणसांना आणि प्राण्यांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचे मूळ कारण स्वतः पृथ्वी थोडीच आहे? उलट, या २० व्या शतकातील बहुतांश समस्यांकरता, ज्यांत पूर्णतः “पृथ्वीची नासाडी” होण्याची शक्यता देखील सामील आहे, त्यांकरता स्वतः मानवच जबाबदार नाही का?—प्रकटीकरण ११:१८.
मनुष्याच्या गैरव्यवस्थेचे दुष्परिणाम रद्द करणे
पण, माणूस स्वतःच आपल्या गैरव्यवस्थेमुळे आणि स्वार्थामुळे आपल्याच हाताने पृथ्वीचा सर्वनाश करून घेईल याचीच अधिक दाट शक्यता वाटते, त्याविषयी काय? मोठ्या प्रमाणावरील निर्वनीकरण, वातावरणाचे अनिर्बंध प्रदूषण आणि जलमार्ग दूषित करण्याद्वारे माणसाने पृथ्वीच्या बऱ्याच भागांची आधीच भयंकर नासाडी केली आहे याबद्दल वादच नाही. सुमारे २५ वर्षांपूर्वी बार्बरा वॉर्ड आणि रने ड्यूबो यांनी ओन्ली वन अर्थ (एकुलती एक पृथ्वी) नावाच्या आपल्या पुस्तकात पुढील सारांश काढला होता: “हवा, पाणी आणि जमीन—हे तीनही या ग्रहावर आपल्या जीवनाकरता अत्यावश्यक असणारे मुख्य घटक आहेत; पण या तीन घटकांच्या प्रदूषणाचे परीक्षण करणे आज अगत्याचे झाले आहे.” आजपर्यंत ही स्थिती फारशी सुधारलेली नाहीये, आहे का?
माणसाने आपल्या मूर्खपणामुळे पृथ्वीचे जे नुकसान किंवा नाश केला आहे त्याचा विचार करताना, पृथ्वी ग्रहाजवळ स्वतःला झालेले नुकसान भरून काढण्याची आणि पुनरुज्जीवित होण्याची जी आश्चर्यकारक शक्ती आहे त्याचा विचार केल्यास आपल्याला दिलासा मिळतो. पूर्वस्थितीत येण्याच्या या विलक्षण क्षमतेचे वर्णन करताना रने ड्यूबो, द रेसिलियन्स ऑफ ईकोसिस्टम्स (परिसंस्थांची स्थितीस्थापकता) नावाच्या दुसऱ्या एका पुस्तकात ही प्रोत्साहन देणारी मते मांडतात:
“पुष्कळांना अशी भीती वाटते की पर्यावरणाला झालेल्या हानीबद्दल माणसाचे फार उशिरा डोळे उघडले, कारण परिसंस्थांना झालेले नुकसान भरून काढणे आता अशक्यप्राय आहे. माझ्या मते हा निराशावाद निराधार आहे कारण आघातजन्य परिस्थितीतून जावे लागले तरीसुद्धा झालेले नुकसान भरून काढण्याची परिसंस्थांठायी प्रचंड शक्ती असते.
“स्वतःला सावरून पूर्वस्थितीत येण्याकरता परिसंस्थांठायी निरनिराळी तंत्रे असतात. . . . परिसंस्थेचा सुरवातीला जो समतोल होता तो हळूहळू पुनर्स्थापित करण्याद्वारे बिघाडामुळे झालेल्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी ही तंत्रे सहायक ठरतात.”
अशक्य नाही
याची सत्यता पटवून देणारे अलीकडचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे लंडनच्या प्रसिद्ध थेम्स नदीची क्रमाक्रमाने करण्यात आलेली स्वच्छता. द थेम्स ट्रान्सफॉर्म्ड (थेम्सचा कायापालट) या पुस्तकात लेखक जेफरी हॅरिसन आणि पीटर ग्रांट या अनन्यसाधारण साध्यतेचा अहवाल प्रस्तुत करतात जो दाखवून देतो की समान सुउद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून जेव्हा चार माणसे एकत्र येऊन कार्य करतात तेव्हा किती काही साध्य करता येते. सदर पुस्तकाच्या प्रस्तावनेत ब्रिटनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग लिहितात: “शेवटी यश आलेच; आणि तेही प्रचंड प्रमाणावर. पर्यावरणाच्या समस्या जितक्या गंभीर आहेत असे आम्हाला सांगण्यात आले होते तितक्या काही त्या गंभीर नाहीत असा काहीजण यामुळे विचार करू लागतील हा धोका असूनसुद्धा, ही यशोगाथा प्रकाशित करण्याजोगी आहे असे आम्ही समजतो. . . . थेम्सच्या बाबतीत आलेल्या यशातून त्या सर्वांना हिंमत मिळेल. आनंदाचे कारण असे, की यश मिळणे काही अशक्य नाही, त्यांच्या उपाययोजना देखील सफल होऊ शकतात.”
सदर पुस्तकात “एक धाडसी स्वच्छता मोहीम” हे शीर्षक असलेल्या प्रकरणात, हॅरिसन आणि ग्रांट यांनी मागील ५० वर्षांदरम्यान कायकाय साध्य करण्यात आले याचे मोठे उत्साहपूर्ण वर्णन केले आहे: “औद्योगिक घाण वाहून नेणाऱ्या अत्यंत दूषित झालेल्या एका नदीचे इतक्या मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण व्हावे, इतके की पाणथळ पक्षी आणि मत्स्यांची पूर्वीसारखीच भरभराट व्हावी, असे जगात पहिल्यांदाच घडते आहे. अगदी आशाहीन भासणाऱ्या परिस्थितीतही असे हे परिवर्तन एवढ्या कमी वेळात घडून आल्याचे पाहून जगातल्या सर्वात निराशावादी वन्यजीवन संरक्षकाला देखील परिस्थिती आशादायक वाटू लागेल.”
पुढे त्यांनी प्रत्यक्ष हा कायापालट कसा झाला त्याचे वर्णन केले आहे: “कित्येक वर्षांपासून या नदीची एकसारखी दैनावस्था होत चालली होती आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाले-गटारी आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य यंत्रणा निकामी झाल्या किंवा नष्ट झाल्या तेव्हा तर कहरच झाला. १९४० आणि १९५० सालांदरम्यान थेम्सची दुर्गती अगदी पाहवेनाशी झाली. नदी काय, उघडी पडलेली गटार म्हणण्याची वेळ आली होती; पाणी गलिच्छ काळ्या रंगाचे झाले होते, त्यात प्राणवायूचा पत्ता नव्हता आणि उन्हाळ्यात तर थेम्सची दुर्गंधी कितीतरी दूरपर्यंत येत असे. . . . आधी विपुल प्रमाणात असणारे मासे शेवटी पूर्णपणे नाहीसे झाले, फक्त पाण्यावरती येऊन श्वासोच्छ्वास करण्याची क्षमता असल्यामुळे बोटांवर मोजण्याइतके वाम मासे तेवढे उरले होते. लंडन आणि वूलिच यामध्ये असणाऱ्या परिसरातील पक्ष्यांपैकी फक्त नावाला काही जंगली बदके आणि मूक हंस उरले होते, आणि तेसुद्धा नैसर्गिक खाद्य पुरवठा मिळाल्यामुळे नव्हे, तर जहाजाच्या धक्क्यांवर सांडलेल्या धान्यावर ते जिवंत राहिले होते. . . . लवकरच ही परिस्थिती अक्षरशः उलटेल यावर तेव्हा कोणाचातरी विश्वास बसला असता का? दहा वर्षांच्या आत, अक्षरशः कोणतेही पक्षी नसणारे हे क्षेत्र हिवाळ्यात येणारी जवळजवळ १०,००० बदके आणि १२,००० वेडर पक्ष्यांसहित कितीतरी जातींच्या पाणथळ पक्षांचे माहेरघर झाले.”
अर्थात हे सबंध जगातील केवळ एका कोपऱ्यात घडलेल्या केवळ एका परिवर्तनाचे वर्णन होते. तथापि, यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. यावरून दिसून येते की माणसाची गैरव्यवस्था, स्वार्थ आणि अविचारामुळे पृथ्वीचा नाश ठरलेला आहे असे मानण्याची गरज नाही. योग्य प्रकारची जनजागृती आणि माणसाच्या कल्याणाकरता खांद्याला खांदा लावून संयुक्त प्रयत्न केल्यास पृथ्वीच्या परिसंस्थेला, पर्यावरणाला आणि जमिनीला झालेले अफाट नुकसान तिला भरून काढता येईल. पण एखाद्या धूमकेतू किंवा लघुग्रहासारख्या बाह्य शक्तीकडून पृथ्वीचा सर्वनाश होण्याच्या शक्यतेविषयी काय?
पुढील लेख या गोंधळविणाऱ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्याचा मार्ग दाखवील.
[५ पानांवरील चित्र]
जनजागृती आणि संयुक्त प्रयत्नांमुळे पृथ्वीला झालेले अफाट नुकसान देखील तिला भरून काढता येईल