“ईश्वरी जीवनाचा मार्ग” १९९८ चे प्रांतीय अधिवेशन लवकरच!
भारत, नेपाळ आणि बांगलादेश या देशात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत १९ अधिवेशनांची योजना करण्यात आली आहे. तीन दिवसांचे एखादे अधिवेशन कदाचित तुमच्या आसपासच्या शहरातच असेल. बहुतेक ठिकाणी, प्रत्येक दिवशी—शुक्रवार ते रविवार—कार्यक्रमाची सुरवात सकाळी ९:३० वाजता संगीताने होईल.
शुक्रवार सकाळच्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशांतील राज्यप्रचार कार्याच्या प्रगतीचा अहवाल देण्यात येईल. “ख्रिस्ताची खंडणी—उद्धाराचा ईश्वरी मार्ग” हे अधिवेशनाच्या विषयावर जोर देणारे प्रमुख भाषण असेल.
यहोवावर प्रेम करण्यास आणि त्याची सेवा करण्यास युवकांना कसे प्रेरित करावे याबद्दलच्या सूचना “पालकहो,—आपल्या मुलांमध्ये ईश्वरी मार्ग बिंबवा,” या दुपारच्या परिचर्चेत देण्यात येतील. “मरणोत्तर जीवन आहे का?” या भाषणाने दुपारच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल.
शनिवार सकाळच्या कार्यक्रमात, यहोवाच्या साक्षीदारांच्या शिष्य बनविण्याच्या कार्याविषयी लागोपाठ तीन भागांत चर्चा करण्यात येईल, “जीवनाच्या मार्गावर येण्यास लोकांची मदत करणे,” “लोकांपर्यंत पोहंचण्याचे आव्हान” आणि “ख्रिस्ताने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी शिष्यांना शिकवणे.” सकाळच्या कार्यक्रमाच्या अखेरीस नवीन शिष्यांना बाप्तिस्मा देण्याची योजना करण्यात येईल.
“सार्वकालिक जीवनाला लक्षात ठेवून सेवा करणे,” या भाषणाने दुपारचा कार्यक्रम सुरू होईल. या भाषणाद्वारे देवाची सेवा करण्याच्या आपल्या व्यक्तिगत कारणांवर प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे आपल्याला उत्तेजन देण्यात येईल. “ईश्वरी मार्ग शिकवणाऱ्या ‘मानवरूपी देणग्यांची’ कदर करणे” आणि “व्यक्तिमत्त्व—जुने टाकून नवीन परिधान करा” या दोन्ही भाषणांत इफिसकराच्या चौथ्या अध्यायातील प्रत्येक वचनाची सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर “स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवा” आणि तीन भागांची परिचर्चा “युवकांनो—ईश्वरी मार्ग आचरा” या भाषणांत उत्तम शास्त्रवचनीय सल्ला देण्यात येईल. “निर्माणकर्ता—त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे मार्ग” या भाषणाने दुपारच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल.
रविवार सकाळच्या कार्यक्रमात तीन भागांची परिचर्चा असेल. या परिचर्चेत बायबलमधील यहेज्केल पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायांवर तसेच त्यांच्या भविष्यसूचक अनुप्रयोगावर चर्चा करण्यात येईल. सकाळच्या कार्यक्रमाची समाप्ती होण्याआधी फुल-कॉस्ट्युम ड्रामा सादर करण्यात येईल. तीन हिब्रू युवकांच्या विश्वासूपणावर ते आधारित असेल. “सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग” हे जाहीर भाषण दुपारच्या कार्यक्रमाची विशेषता आहे.
तीनही दिवस तेथे उपस्थित राहिल्याने निश्चितच आध्यात्मिकरीत्या तुम्हाला पुष्कळ काही प्राप्त होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रत्येक सत्राला उपस्थित राहण्याकरता तुमचे स्वागत आहे. तुम्हाला नजीक असणाऱ्या अधिवेशनाचे ठिकाण जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा.