वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ६/१५ पृ. ६-८
  • पृथ्वी—का अस्तित्वात आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वी—का अस्तित्वात आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलचे म्हणणे काय?
  • देवाचा उद्देश खंडला, पण बदलला मात्र नाही
  • जीवनाला भव्य उद्देश आहे
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • देव कोणता उद्देश बाळगून आहे?
    सावध राहा!—१९९९
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • शांतीदायक नवीन जगातील जीवन
    शांतीदायक नवीन जगातील जीवन
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ६/१५ पृ. ६-८

पृथ्वी—का अस्तित्वात आहे?

तुम्ही विचारात घेण्याजोगा एक प्रश्‍न आहे: पृथ्वीकरता आणि त्यावर राहणाऱ्‍या मानवजातीकरता एक उद्देश राखणाऱ्‍या बुद्धिमान निर्माणकर्त्याने आपला हा सर्वांगसुंदर ग्रह निर्माण केला आहे का? या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळवल्यास आपल्या या ग्रहाकरता भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे समजून घेणे तुम्हाला फार जड जाणार नाही.

सबंध विश्‍व आणि पृथ्वी यांविषयी सखोल अभ्यास केल्यावर निश्‍चितच एक निर्माणकर्ता अस्तित्वात आहे, या सर्वांमागे एक देव आहे, असे सुचविणारे पुरावे कित्येक शास्त्रज्ञांना आढळले आहेत. त्यांपैकी केवळ एकाची मते विचारात घ्या:

द माइन्ड ऑफ गॉड (देवाची बुद्धी) या पुस्तकात प्रोफेसर पॉल डेव्हीस लिहितात: “स्थायी, सुसंघटित आणि गुंतागुंतीच्या संरचना असलेले एक सुव्यवस्थित आणि सुसूत्र विश्‍वमंडल अस्तित्वात राहण्याकरता अत्यंत विशेष प्रकारचे नियम आणि परिस्थिती असाव्या लागतात.”

खगोलीय भौतिकी शास्त्रज्ञ आणि इतरांच्या पाहण्यात आलेल्या विश्‍वातील अनेक “विलक्षण योगायोगांविषयी” वर्णन केल्यानंतर प्रोफेसर डेव्हीस पुढे म्हणतात: “एकंदर हे सर्व अत्यंत खात्रीलायक पद्धतीने शाबीत करतात की आपल्या सभोवतालची सजीव सृष्टी ही भौतिकशास्त्रातील नियमांच्या विशिष्ट स्वरूपावर, आणि निरनिराळ्या कणांचे वस्तुमान, बलसामर्थ्य इत्यादींकरता निसर्गाने जी विद्यमान मूल्ये ठरवली आहेत त्यांत घडून आलेल्या अत्यंत अनपेक्षित संयोगांवर फार सूक्ष्मपणे अवलंबून आहे. . . . असे समजा की आपण देवाच्या जागी आहोत आणि आपल्याला ही मूल्ये ठरवायची आहेत; ही नेमकी मूल्ये ठरवण्यासाठी जर आपल्याला बरीचशी बटणं वाटेल तशी फिरवायला लावलीत, तर आपल्याला असे आढळेल की कोणत्याही प्रकारे ही बटणं फिरवून ठेवली तरीसुद्धा विश्‍वाची परिस्थिती सजीव सृष्टी अस्तित्वात राहण्याकरता अयोग्यच राहील. काही बाबतीत असं दिसतं, की जीवन शक्य होईल अशी परिस्थिती घडवून आणण्याकरता ही वेगवेगळी बटणं अगदी नेमक्या ठिकाणी चपखलपणे आणून अत्यंत सूक्ष्मपणे जुळवून ठेवावी लागतील. . . . विश्‍वाचे नियम सध्या जसे आहेत, त्यात किंचितही बदल केल्यास हे विश्‍वच नाहीसे होईल; ही निश्‍चितच एक अत्यंत अर्थसूचक वस्तूस्थिती आहे.”

यावरून बरेच जण अशा निष्कर्षावर येतात की आपली पृथ्वी तसेच बाकीचे विश्‍व देखील एक उद्देश बाळगणाऱ्‍या सृष्टिकर्त्याने घडवून आणले आहे. असे असल्यास, त्याने मुळातच पृथ्वी का निर्माण केली हे आपल्याला शोधून काढावे लागेल. शिवाय, त्याचा पृथ्वीच्या संबंधाने कोणता उद्देश आहे हे देखील शक्य असल्यास आपल्याला शोधून काढावे लागेल. पण याबाबतीत एक विचित्र विरोधाभास आढळतो. नास्तिकवाद सर्वत्र लोकप्रिय असला तरीसुद्धा, एका बुद्धिमान सृष्टिकर्त्यावर अद्यापही विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या पाहून आश्‍चर्य वाटते. ख्रिस्ती धर्मजगताच्या बहुतांश चर्चेसमध्ये सर्वसमर्थ देवाच्या आणि आपल्या विश्‍वाच्या निर्माणकर्त्याचा नाममात्र उल्लेख होतो. तथापि, देवाच्या उद्देशानुसार पृथ्वीचे भविष्य काय आहे, याविषयी हे कोणतेही धर्म आत्मविश्‍वासाने किंवा खात्रीने क्वचितच भाष्य करतात.

बायबलचे म्हणणे काय?

ज्यास सर्वसामान्यपणे बरेच लोक निर्माणकर्त्याकडून आले आहे असे मानतात अशा एखाद्या उगमाकडे माहितीकरता वळणे तर्कसंगत ठरेल. हा उगम म्हणजे बायबल. त्यात आपल्या पृथ्वीच्या भविष्यासंबंधाने दिलेले सर्वात सहजसोपे आणि सुस्पष्ट विधान उपदेशक १:४ येथे वाचायला मिळते. ते असे: “एक पिढी जाते व दुसरी पिढी येते, परंतु पृथ्वी सर्वकाल टिकते.” (पं.र.भा.) यहोवा देवाने पृथ्वीची निर्मिती का केली याचे बायबलमध्ये अगदी सरळसरळ स्पष्टीकरण दिलेले आहे. शिवाय, सजीव सृष्टी कायम राहावी या दृष्टीने त्याने तिला विश्‍वात अगदी योग्य ठिकाणी तसेच सूर्यापासूनही अगदी अचूक अंतरावर स्थापन केले आहे. प्राचीन काळातील संदेष्टा यशया याला देवाने पुढीलप्रमाणे लिहिण्याची प्रेरणा दिली: “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली; हा परमेश्‍वर म्हणतो, मीच परमेश्‍वर आहे; अन्य कोणी नव्हे.”—यशया ४५:१८.

पण मानवाने तर पृथ्वीवरील जीवन संपूर्णपणे नष्ट करण्याची साधने अस्तित्वात आणली आहेत, मग त्यांविषयी काय? आपल्या अतुलनीय बुद्धीसवे देवाने असे घोषित केले आहे की माणसाने आपल्या या ग्रहावरील सर्व सृष्टी नष्ट करण्याआधी तो स्वतः हालचाल करील. बायबलचे शेवटले पुस्तक, प्रकटीकरण यात दिलेले हे दिलासादायक अभिवचन लक्षात घ्या: “राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदेष्टे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीति बाळगणारे लहानथोर ह्‍यांस वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”—प्रकटीकरण ११:१८.

अंतराळात पृथ्वी एखाद्या रत्नासारखी दिसते असे एकदा एका अंतराळवीराने म्हटले होते; हे पृथ्वीरत्न निर्माण करण्यामागचा आपला मूळ उद्देश कोणता होता हे यहोवा देवाने आपल्यापासून लपवून ठेवलेले नाही. सबंध पृथ्वीचे एका आनंदवनात म्हणजेच परादीसात रूपांतर व्हावे, आणि त्यात फार दाटी न होता, मानवांनी म्हणजेच पुरुष, स्त्रिया—सर्वांनी शांतीसुखाने नांदावे असा देवाचा पृथ्वीकरता उद्देश होता. पहिल्या मानवी दांपत्याला संतती उत्पन्‍न करण्याची संधी देऊन या ग्रहाची जनसंख्या हळूहळू वाढवण्याची देवाने व्यवस्था केली होती. या पहिल्या मानवी जोडप्याला आनंद आणि सौख्य उपभोगता यावे म्हणून यहोवाने पृथ्वीच्या एका लहानशा भागात ही आनंदवनासारखी परिस्थिती निर्माण केली होती. येणाऱ्‍या वर्षांत आणि शतकात जसजसे मानवी कुटुंबांचे प्रजनन होत गेले असते तसतशी एदेन बाग आणखीन विस्तारत गेली असती; आणि एक वेळ अशी आली असती जेव्हा उत्पत्ती १:२८ येथील शब्द खरे ठरले असते: “देव त्यांस म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.”

पृथ्वी आणि तिच्या रहिवाशांची आज जी दैनावस्था झाली आहे ती पाहता, पृथ्वीकरता देवाचा मूळ उद्देश निष्फळ ठरला आहे असे म्हणता येईल का? किंवा माणसाची स्वैराचारी वृत्ती पाहून, पृथ्वीला असेच नष्ट होऊ द्यावे आणि नव्याने सुरवात करावी असे ठरवून त्याने आपला उद्देश बदलला आहे का? नाही, यांपैकी काहीही घडलेले नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. बायबल आपल्याला सांगते की यहोवा जे काही उद्देशतो ते कधी न कधी घडणारच, कोणतीही व्यक्‍ती किंवा कोणतीही अनपेक्षित घटना देवाने जे ठरवले आहे ते पूर्ण होण्यापासून थांबवू शकत नाही. तो स्वतः याची हमी देऊन म्हणतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

देवाचा उद्देश खंडला, पण बदलला मात्र नाही

आदाम आणि हवा यांनी विद्रोह केला आणि त्यांना एदेन बागेतून बाहेर काढण्यात आले, त्यानंतर पृथ्वी एक परादीस बनावी या देवाच्या उद्देशाच्या पूर्ततेत त्यांचा समावेश होणार नव्हता हे उघड होते. पण यहोवाने तेथल्या तेथे या गोष्टीचा संकेत दिला की त्यांच्या संततीपैकी काहीजण त्याची मूळ आज्ञा पूर्ण करतील. हे लगेच घडणार नव्हते हे खरे आहे, कदाचित कितीतरी शतके लागणार होती, पण आदाम आणि हवा दोघेही परिपूर्ण अवस्थेतच कायम जिवंत राहिले असते तरीसुद्धा देवाची मूळ आज्ञा पूर्ण होण्यास नेमका किती काळ लागला असता हे कोठेही सांगितलेले नाही. खरे तर, ख्रिस्त येशूच्या हजार वर्षांच्या राज्यानंतर—म्हणजे आतापासून हजार वर्षांपेक्षा आणखी थोड्या काळानंतर—एदेन वाटिकेत होत्या तशाच आनंदवनासारख्या, परादीसमय परिस्थिती सबंध पृथ्वीवर असतील आणि पृथ्वी ग्रह पहिल्या मानवी जोडप्याच्या शांतीपूर्ण आणि आनंदी वंशजांनी भरून जाईल. खरोखर, कधीही अपेशी न होणाऱ्‍या उद्देशकर्त्याच्या रूपात यहोवाचे सामर्थ्य कायमचे शाबीत होईल!

त्यानंतर देवाने फार पूर्वी प्रेरित केलेल्या उत्कंठावर्धक भविष्यवाण्या पूर्ण होतील. यशया ११:६-९ यांसारख्या वचनांची विलक्षण पूर्तता होईल: “लांडगा कोंकराजवळ राहील, चिता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांस लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”

निकृष्ट आरोग्य आणि जीवघेणे रोग, अगदी मृत्यूसुद्धा इतिहासजमा होतील. बायबलच्या शेवटल्या पुस्तकात दिलेल्या या सरळसोप्या शब्दांपेक्षा आणखी स्पष्ट काय असेल? “देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

होय, हवालदिल होण्याचे कारण नाही—आपला सर्वांगसुंदर पृथ्वी ग्रह कायम टिकेल. या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍या त्यातील सर्व गोष्टींच्या नाशातून बचावण्याचा सुहक्क तुम्हालाही लाभो. देवनिर्मित निर्मळ नवे जग अगदी जवळ आले आहे. मृत झालेले कित्येक प्रियजन पुनरुत्थानाच्या चमत्काराकरवी जिवंत होतील. (योहान ५:२८, २९) निश्‍चितच, आपली पृथ्वी कायम टिकेल आणि आपण देखील कायम तिच्यात राहून तिचा आनंद लुटू शकू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा