वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ६/१ पृ. ५-७
  • धीराने वाट पाहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीराने वाट पाहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्पष्ट विचार करा
  • देव विलंब करत नाही
  • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ
  • पूर्वीपासून माहीत असलेल्या गोष्टी
  • “आपणास देवाच्या प्रीतिमध्ये राखा”
  • यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपल्या मोलवान विश्‍वासाला धरून राहू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ६/१ पृ. ५-७

धीराने वाट पाहा

“लांडगा आला रे आला!” असे एकसारखे ओरडून फसवणाऱ्‍या मेंढपाळ मुलाला खरोखरच मदतीची आवश्‍यकता असते तेव्हा मात्र त्याच्या आरोळीकडे कोणीही कान देत नाही. त्याचप्रमाणे, आज देखील निकट असलेल्या यहोवाच्या दिवसाकडे अनेक लोक कानाडोळा करत आहेत, कारण त्यांनी असे अनेक इशारे ऐकले आहेत; परंतु प्रत्यक्षात मात्र त्या इशाऱ्‍याप्रमाणे काही घडले नाही. कोणता इशारा खरा आहे आणि कोणत्या इशाऱ्‍यावर विश्‍वास ठेवण्यास हवा, हे अनेक लोकांना माहीत नाही हे खरे आहे आणि देवाचा मोठा शत्रू अर्थात ‘तेजस्वी देवदूत’ सैतान या गोष्टीचा फायदा घेतो.—२ करिंथकर ११:१४.

बेपर्वाईचा आत्मा धोकेदायक शाबीत होऊ शकतो आणि मागील काही काळापासून यहोवाची सेवा करत असलेल्यांकरता देखील अशाप्रकारचा दृष्टिकोन धोकेदायक ठरू शकतो. का? प्रेषित पेत्राने पहिल्या शतकात दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या.

स्पष्ट विचार करा

पेत्राच्या दुसऱ्‍या ईश्‍वरप्रेरित पत्रात, आरंभीच्या ख्रिस्ती लोकांकरता सूचना होत्या आणि त्या आपल्याला सुद्धा लागू होतात. तो लिहितो: “प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहीत आहे; ह्‍या दोहींमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे.” (२ पेत्र ३:१) पेत्राच्या या चिंतेचे कारण काय होते? थट्टेखोर लोकांच्या अस्तित्वाकडे पेत्र विशेषतः लक्ष वेधतो; देवाचे लोक ज्या काळात जगत आहेत त्यासंबंधाने निकडीच्या आवश्‍यक भावनेचे महत्त्व कमी करण्यात या थट्टेखोर लोकांचा हात आहे. निंदा करणाऱ्‍यांच्या पाशात पडण्यापासून सावध राहण्याची ही वेळ आहे. अशाप्रकारे, ‘पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण करण्याचा’ पेत्र त्याच्या वाचकांना आर्जव करतो. (२ पेत्र ३:२; प्रेषितांची कृत्ये ३:२२, २३) संदेष्ट्यांनी काय सांगितले होते?

ईश्‍वरी न्यायदंडाने कशाप्रकारे दुष्टतेचा अंत केला, या गोष्टीकडे देवाच्या विश्‍वासू सेवकांनी कित्येक वेळा आपले लक्ष वेधले. आपल्या वाचकांना पेत्र नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाची आठवण करून देतो. त्यावेळी संपूर्ण पृथ्वी वाईट गोष्टींनी भरलेली होती आणि जलप्रलयाद्वारे देवाने हस्तक्षेप केला. त्या महान जलप्रलयाने त्या काळातील जगाचा पूर्णपणे नाश केला. परंतु देवाने नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला तसेच ‘प्रत्येक जातीच्या प्राण्यांतील’ नर-मादीला तारवाद्वारे वाचवले. जगव्याप्तरितीने ज्ञात असणाऱ्‍या कथा बायबलमधील या अहवालाच्या सत्यतेची साक्ष देतात.a—उत्पत्ति ६:१९; २ पेत्र ३:५, ६.

या ईश्‍वरी हस्तक्षेपाविषयी पेत्र म्हणतो, की काही लोक या घटनेस “विसरतात.” इतर जण त्यांच्या काळातील थट्टेखोर लोकांद्वारे बेपर्वाईच्या पाशात फसले गेले. परंतु, यहोवाने आधी केलेल्या कार्यांना आपण आपल्या स्मृतीतून कधीही काढू नये. पेत्र आपल्याला सांगतो: “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:७) होय, ईश्‍वरी हस्तक्षेप पुन्हा होणार आहे.

देव विलंब करत नाही

त्या घटनेला आता हजारो वर्षे होऊन गेली आहेत. मानवाच्या समस्या काढून टाकण्यासाठी देवाने इतका विलंब का केला आहे? पेत्र पुन्हा एकदा एका वास्तविकतेकडे आपले लक्ष वेधतो. तो म्हणतो: “प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.” (२ पेत्र ३:८) वेळेच्या बाबतीत देवाचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा निराळा आहे. आदामाची उत्पत्ती केल्यापासून आतापर्यंतचा काळ सनातन देवाकरता एका आठवड्याचाही नाही. परंतु वेळेच्या बाबतीत आपला कोणताही दृष्टिकोन असला तरी भूतकाळात जमा होणारे प्रत्येक सहस्त्र वर्ष आणि प्रत्येक दिवस आपल्याला यहोवाचा उद्देश पूर्ण होण्याकडे आणखी जवळ नेतो.

“प्रत्येक गोष्टीची नियुक्‍त वेळ असते,” असे म्हणतात. याचा असा अर्थ होतो, की एखादी गोष्ट होण्यासाठी अधीर होऊन वाट पाहत राहिल्याने त्या गोष्टीला फार विलंब होत आहे असे वाटते. तथापि, पेत्र असा सल्ला देतो, की “यहोवाच्या दिवसाच्या उपस्थितीला अगदी मनात ठेवून त्या दिवसाची वाट पाहात राहा.” (२ पेत्र ३:१२, NW) ईश्‍वरी हस्तक्षेपाच्या निकटतेबद्दल दक्ष ठेवणारी मनोवृत्ती आपण कशी विकसित करू शकतो?

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ

पेत्र प्रत्यक्ष कृतीवर जोर देतो. तो “वर्तणुकीच्या पवित्र कार्यांविषयी” आणि “ईश्‍वरी भक्‍तीच्या कार्यांविषयी” सांगतो. (२ पेत्र ३:११, NW) यांमध्ये काय समाविष्ट आहे?

देवाचा खरा सेवक देवाला आनंदविणारी कामे करतो. अशाप्रकारच्या खऱ्‍या उपासकाचा विश्‍वास त्याच्या वर्तणुकीतून दिसून येतो. ही गोष्ट त्याला अशा लोकांपासून निराळी दाखवते जे देवावर आणि त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास बाळगण्याविषयी केवळ बोलतात. कदाचित, तुमचे या गोष्टीकडे लक्ष गेले असेल, की यहोवाच्या साक्षीदारांचे सेवाकार्य त्यांना इतर लोकांपासून वेगळे करते. बायबलमधील देवाच्या अभिवचनांकडे लक्ष वेधण्यासाठी ते तुमच्या घरी येतात. तसेच ते लोकांना जेथे कोठे भेटतात तेथे त्यांना त्यांच्या आशेविषयी आणि विश्‍वासांविषयी साक्ष देतात.

एखादा साक्षीदार जेव्हा स्वतःचा विश्‍वास इतरांना सांगण्यात व्यस्त राहतो तेव्हा त्याचा स्वतःचा विश्‍वास देखील बळकट आणि मजबूत होत जातो. एखादी गोष्ट व्यक्‍त केल्याने ती मनात आणखी पक्की होते तसेच यामुळे आंतरिक आनंद आणि समाधान मिळते. आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत असतो तेव्हा आपण यहोवाला सुद्धा हर्षित करत असतो. आपल्याला देवाविषयी हे माहीत आहे, की ‘आपले कार्य आणि त्याच्या नावाप्रीत्यर्थ दाखवलेले प्रेम विसरण्यास तो अन्यायी नाही,’ असे पेत्राचा सहप्रेषित असलेल्या पौलाने सांगितले होते.—इब्री लोकांस ६:१०; रोमकर १०:९, १०.

सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांत राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात व्यस्त राहिल्याने कोणता परिणाम होतो? याचा परिणाम म्हणजे यहोवासोबत निकटचा नातेसंबंध विकसित कसा करावा, त्याच्या अपात्री कृपेचा लाभ कसा घ्यावा, परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाच्या आशेमध्ये खरा आनंद कसा मिळवावा, या गोष्टी लाखो प्रामाणिक अंतःकरणाचे लोक शिकत आहेत.

पूर्वीपासून माहीत असलेल्या गोष्टी

खरे तर आपल्याला हे माहीत आहे, की आपल्या नियुक्‍त वेळी यहोवा हस्तक्षेप करील त्यामुळे पेत्राने दिलेल्या पुढील इशाऱ्‍याकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. “ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.”—२ पेत्र ३:१७.

कमकुवत विश्‍वास असणारे काही लोक ईश्‍वरी हस्तक्षेपाच्या बाबतीत होणाऱ्‍या विलंबामुळे निराश होण्याची शक्यता आहे, हे यहोवाला निश्‍चितच आधीपासून माहीत होते. त्याला हे सुद्धा माहीत होते, की अभक्‍त लोकांच्या प्रभावामुळे त्याचे खरे सेवक भ्रष्ट होऊ शकतील किंवा निदान त्याच्या नावाचे पवित्रीकरण जवळ आहे हा विश्‍वास कमकुवत करतील. या शेवटल्या दिवसांमध्ये आपली स्थिरता डळमळीत होऊ देणे ही किती खेदाची बाब आहे!

यहोवा काय करणार आहे याविषयी मनात शंका बाळगण्याची किंवा संशय घेण्याची ही वेळ नाही. (इब्री लोकांस १२:१) उलटपक्षी, यहोवाच्या धीरामुळे शक्य झालेल्या गोष्टींची कदर दाखवण्याची ही वेळ आहे—त्याच्या धीरामुळे अशा लाखो लोकांना तारणाची आशा मिळाली आहे जे आंतरराष्ट्रीय मोठ्या लोकसमुदायाचे भाग बनतात आणि येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचाव होण्याची आशा बाळगतात. (प्रकटीकरण ७:९, १४) पेत्र प्रोत्साहन देतो: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्‍याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो.”—२ पेत्र ३:१८.

“आपणास देवाच्या प्रीतिमध्ये राखा”

राज्य प्रचाराच्या कार्यात व्यस्त राहिल्याने आणि उपासनेकरता नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्याने तसेच देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने आपल्याला सुरक्षितता प्राप्त होते. अशाप्रकारे, आजच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या खालावत जाणाऱ्‍या परिस्थितीबद्दल नाहक चिंता करण्यास आपल्याला उसंत मिळणार नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या जीवनांत भीती आणि चिंता या गोष्टींना प्राधान्य असू नये. (१ करिंथकर १५:५८) आपण यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्याने वेळ कसा निघून जातो हे आपल्याला कळणारच नाही.

पेत्राचा समकालीन आणि येशूचा सावत्र भाऊ यहूदा आपल्याला सल्ला देतो: “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्‍वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणास देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २०, २१) निरंतर प्रार्थना करण्याद्वारे उत्तेजन देण्यात आलेल्या सकारात्मक मनोवृत्तीच्या महत्त्वाला लक्षात घ्या. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) यहूदा पुढे म्हणतो: “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.” (यहूदा २२, २३) या कठीण काळात एकमेकांना मजबूत करणे किती गरजेचे आहे! तसेच हे किती आवश्‍यक आहे, की आपण मोहात पडू नये आणि पुढे ढकलण्यात आलेल्या ‘तारणाच्या दिवसाचा’ ‘कामातुरपणाची’ सबब म्हणून उपयोग करू नये.—यहूदा ४; २ करिंथकर ६:१, २.

पेत्राच्या, पौलाच्या आणि यहूदाच्या प्रेमळ सल्ल्यांकडे लक्ष देण्याद्वारे आणि देवाच्या सेवेत व्यस्त आणि सक्रिय राहण्याद्वारे तुम्ही यहोवाच्या हस्तक्षेपाची धीराने वाट पाहू शकता. परंतु तुम्ही तसे कराल का?

निर्माणकर्त्याच्या सार्वकालिक जीवनाच्या अभिवचनावरील तुमचा विश्‍वास दृढ करण्याकरता मदतीसाठी तुमच्या परिसरातील साक्षीदारांशी संपर्क साधण्यात कांकू करू नका. येणाऱ्‍या मोठ्या संकटापर्यंत चालणाऱ्‍या आणि कधीही पुनरावृत्ती न होणाऱ्‍या या जगव्याप्त साक्षकार्यात भाग घेण्याच्या लायक होण्याकरता आवश्‍यक त्या गोष्टी शिकून घ्या. (मार्क १३:१०) तेव्हा मग तुमच्याकडे धार्मिकतेच्या नवीन जगात जगण्याची आशा असेल आणि यहोवा नेमके याचेच अभिवचन देतो. (२ पेत्र ३:१३) त्याच्या सूचनांकडे लक्ष द्या! धीराने वाट पाहा! कामात व्यग्र राहा!

[तळटीप]

a कृपया वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित पुस्तक बायबल—देवाचे वचन की मानवाचे?, (इंग्रजी) पृष्ठ ११६ पाहा.

[७ पानांवरील चित्र]

देवाने दिलेल्या परादीसाच्या अभिवचनांविषयी आताच शिका

[Picture Credit Line on page 5]

लांडगा: Animals/Jim Harter/Dover Publications, Inc.; मेंढपाळ मुलगा: मुले: A Pictorial Archive from Nineteenth-Century Sources/Grafton/Dover Publications, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा