वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. १०-१५
  • ख्रिस्ती विश्‍वासाची पारख होईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती विश्‍वासाची पारख होईल
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाची पारख—का?
  • सन १९१४ संबंधी पारखण्यात आलेला विश्‍वास
  • त्या काळच्या परीक्षांना प्रतिक्रिया
  • तुमच्या विश्‍वासाच्या गुणवत्तेची—सध्या पारख होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. १०-१५

ख्रिस्ती विश्‍वासाची पारख होईल

“सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.”—२ थेस्सलनीकाकर ३:२.

१. सर्वांकडे खरा विश्‍वास नाही, हे इतिहासाने कसे दाखवून दिले आहे?

खरा विश्‍वास असलेले अनेक स्त्रीपुरुष आणि मुले इतिहासात होऊन गेले आहेत. “खरा” हे विशेषण अगदी उचित आहे कारण कोट्यवधी लोकांनी असा विश्‍वास प्रदर्शित केला आहे ज्यात भोळेपणा अर्थात कोणत्याही सबळ आधाराशिवाय किंवा कारणाशिवाय विश्‍वास ठेवण्याची तयारी आहे. अशाप्रकारच्या विश्‍वासामध्ये बहुतेकवेळा खोट्या देवता किंवा त्यांच्या उपासनेच्या चालीरीती सामावलेल्या असतात. अशा गोष्टी सर्वशक्‍तिमान यहोवाच्या आणि त्याने प्रकट केलेल्या त्याच्या वचनाच्या एकवाक्यतेत नाहीत. यास्तव, प्रेषित पौलाने लिहिले: “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.”—२ थेस्सलनीकाकर ३:२.

२. आपण आपल्या विश्‍वासाचे परीक्षण करणे महत्त्वाचे का आहे?

२ त्या काळाच्या काही लोकांमध्ये खरा विश्‍वास होता आणि आजही तसा विश्‍वास आहे, असा अर्थ पौलाच्या विधानावरून स्पष्ट होतो. या नियतकालिकाच्या बहुतेक वाचकांना अशाप्रकारचा खरा विश्‍वास—ईश्‍वरी सत्याच्या ज्ञानाच्या एकवाक्यतेत असणारा विश्‍वास ठेवावा आणि तो वाढवावा असे वाटते. (योहान १८:३७, इब्री लोकांस ११:६) तुमच्या बाबतीतही असेच आहे का? तर मग, तुमच्या विश्‍वासाची पारख होईल, या वस्तुस्थितीची तुम्हाला जाणीव असणे आणि तुम्ही त्यासाठी तयारी करणे अत्यावश्‍यक आहे. असे का म्हटले जाऊ शकते?

३, ४. विश्‍वासाची पारख होण्याच्या बाबतीत आपण येशूकडे का पाहण्यास हवे?

३ येशू ख्रिस्त आपल्या विश्‍वासाचा केंद्रबिंदू आहे, हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे. विश्‍वासाचा पूर्ण करणारा, असे बायबल त्याचे वर्णन करते. येशूने जे म्हटले ते केले सुद्धा त्यामुळे आणि विशेषतः त्याच्याद्वारे भविष्यवाणीची पूर्णता झाली त्यामुळे त्याच्याविषयी असे म्हणण्यात आले आहे. मानवाच्या खऱ्‍या विश्‍वासाचा आधार त्याने आणखी मजबूत केला. (इब्री लोकांस १२:२; प्रकटीकरण १:१, २) असे असतानाही, आपल्याला येशूविषयी असे वाचायला मिळते, की तो “आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला.” (इब्री लोकांस ४:१५) होय, येशूचा विश्‍वास पारखण्यात आला होता. परंतु यामुळे आपण निराश होण्याऐवजी किंवा आपल्या मनात भीती उत्पन्‍न होण्याऐवजी या गोष्टीद्वारे आपल्याला सांत्वन मिळण्यास हवे.

४ वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत कठीण परीक्षांमधून जाण्याद्वारे येशू “आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्री लोकांस ५:८) त्याने हे शाबीत करून दाखवले, की मनुष्यांवर कोणत्याही परीक्षा आल्या तरी तो खऱ्‍या विश्‍वासानिशी जगू शकतो. येशूने त्याच्या शिष्यांविषयी जे म्हटले त्यावर आपण विचार करतो तेव्हा ही गोष्ट आणखी अर्थपूर्ण बनते: “दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा.” (योहान १५:२०) खरे तर, सध्याच्या काळातील अनुयायांविषयी येशूने पूर्वभाकीत केले: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.”—मत्तय २४:९.

५. आपल्याला परीक्षांना सामोरे जावे लागेल, हे शास्त्रवचने कसे दाखवून देतात?

५ या शतकाच्या सुरवातीला देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास सुरवात झाली. शास्त्रवचनांनी भाकीत केले: “देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्‍यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्‍तिहीन व पापी ह्‍याला ठिकाण कोठे मिळेल?”—१ पेत्र ४:१७, १८.

विश्‍वासाची पारख—का?

६. पारखण्यात आलेला विश्‍वास अनमोल का आहे?

६ एका अर्थाने, पारखण्यात न आलेल्या विश्‍वासाचे मोल शाबीत होतच नाही तसेच त्याची गुणवत्ताही दिसून येत नाही. आपण त्याची तुलना अशा धनादेशासोबत करू शकतो ज्यापासून अद्याप रोख रक्कम मिळालेली नाही. हा धनादेश तुम्हाला तुम्ही केलेल्या एखाद्या कामाबद्दल किंवा तुम्ही दिलेल्या सामानाबद्दल मिळाला असेल अन्यथा तुम्हाला तो कोणी बक्षीस म्हणूनही दिला असेल. तो धनादेश खरा वाटतो, पण तो खरोखरच तसा आहे का? त्यावर लिहिलेली रक्कम खरोखरच मिळेल का? त्याचप्रमाणे आपला विश्‍वास केवळ देखाव्यापेक्षा आणि निव्वळ दाव्यापेक्षा अधिक असला पाहिजे. विश्‍वासात जोर आणि खरी गुणवत्ता आहे, हे शाबीत करायचे असल्यास त्याची पारख होण्यास हवी. विश्‍वासाची पारख होते तेव्हा आपल्याला हे दिसून येईल, की आपला विश्‍वास दृढ आणि अनमोल आहे. तसेच विश्‍वासाची पारख झाल्यामुळे विश्‍वासात कोठे सुधारणेची किंवा दृढतेची आवश्‍यकता आहे, हे सुद्धा आपल्याला दिसून येईल.

७, ८. आपल्या विश्‍वासाच्या परीक्षांचा उगम कोठून आहे?

७ देव आपल्यावर छळ आणि विश्‍वासाच्या इतर परीक्षा येऊ देतो. आपल्याला असे वाचायला मिळते: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.” (याकोब १:१३) अशाप्रकारच्या परीक्षांसाठी कोण आणि काय जबाबदार आहे? सैतान, हे जग आणि आपले स्वतःचे अपरिपूर्ण शरीर.

८ सैतान, या जगावर आणि त्याच्या विचारसरणीवर तसेच त्याच्या चालीरीतींवर मोठा प्रभाव पाडत आहे, हे कदाचित आपण मान्य करू. (१ योहान ५:१९) ख्रिश्‍चनांचा छळ होण्यामागे त्याचाच हात असतो हे देखील आपल्याला माहीत असेल. (प्रकटीकरण १२:१७) तथापि, आपण फसावे, देवाची आज्ञा तोडावी आणि परिणामी देवाची स्वीकृती गमवावी या अपेक्षेने सैतान आपल्याला मार्गभ्रष्ट करण्याकरता आपल्या स्वतःच्या अपरिपूर्ण शरीराचा उपयोग करतो, याचीही आपल्याला तितकीच खात्री आहे का? अर्थातच, आपल्याला सैतानाच्या धूर्त मार्गांचे आश्‍चर्य वाटू नये कारण येशूला मोहपाशात पाडण्यासाठी त्याने अशाचप्रकारच्या डावपेचांचा वापर केला होता.—मत्तय ४:१-११.

९. विश्‍वासाच्या उदाहरणापासून आपल्याला कसा लाभ होऊ शकतो?

९ यहोवाने त्याच्या वचनाद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे आपल्याला अनुकरण करता येतील अशी विश्‍वासाची सकारात्मक उदाहरणे दिली आहेत. पौलाने अशी ताकीद दिली: “बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.” (फिलिप्पैकर ३:१७) पहिल्या शतकातील देवाचा अभिषिक्‍त सेवक या नात्याने पौलासमोर मोठ्या परीक्षा आल्या तरी तो विश्‍वासाच्या कार्यात नेहमी अग्रेसर होता. २० व्या शतकाच्या अखेरपर्यंत आपल्याकडे विश्‍वासाच्या अशा उदाहरणांची कमतरता नाही. इब्री लोकांस १३:७ येथील पौलाचे शब्द आजही तितक्याच महत्त्वाचे आहेत, त्याने लिहिले: “जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा.”

१०. अलीकडच्या काळातील विश्‍वासाची कोणती विशेष उदाहरणे आपल्याकडे आहेत?

१० अभिषिक्‍त शेषांच्या वर्तणुकीचा कसा परिणाम झाला आहे, याचा आपण विचार करतो तेव्हा वरील सल्ल्याचा विशेष परिणाम दिसून येतो. आपण त्यांच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ शकतो आणि त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकतो. त्यांचा विश्‍वास हा परीक्षांमुळे उत्तरोत्तर सुधारत गेलेला खरा विश्‍वास आहे. १८७० च्या दशकात छोटी सुरवात होऊन एक जगव्याप्त बंधुसमाज विकसित झाला. तेव्हापासून त्यांच्या विश्‍वासाचे आणि सहनशक्‍तीचे फळ म्हणजे आज पंचावन लाखांपेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याविषयी प्रचार करत आहेत आणि लोकांना शिकवत आहेत. आवेशी खऱ्‍या उपासकांची सध्याची जगव्याप्त मंडळी पारखलेल्या विश्‍वासाचा पुरावा आहे.—तीत २:१४.

सन १९१४ संबंधी पारखण्यात आलेला विश्‍वास

११. सी. टी. रस्सल आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांकरता १९१४ ही तारीख उल्लेखनीय कशी होती?

११ सन १९१४ बायबल भविष्यवाणीची उल्लेखनीय तारीख असेल, असे पहिले जागतिक युद्ध सुरू होण्याच्या कितीतरी वर्षांआधी अभिषिक्‍त शेष घोषित करत होते. तथापि, त्यांच्या काही अपेक्षा अकालिक होत्या आणि भवितव्यामध्ये जे होण्याची त्यांनी अपेक्षा केली तसे पूर्णपणे घडले नाही. उदाहरणार्थ, प्रचाराचे मोठे कार्य फार अत्यावश्‍यक आहे, हे वॉचटावर सोसायटीचे पहिले अध्यक्ष सी. टी. रस्सल आणि त्यांचे सहकारी स्पष्टपणे पाहू शकत होते. त्यांनी बायबलमधील वचन वाचले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) तथापि, त्यांच्या या लहानशा गटाला हे करणे कसे शक्य होते?

१२. रस्सल यांच्या एका सहकाऱ्‍याने बायबलच्या सत्याप्रती कशी प्रतिक्रिया दाखवली?

१२ यामुळे रस्सल यांचे सहकारी, ए. एच. मॅकमिलन यांच्यावर कसा परिणाम झाला हे लक्षात घ्या. कॅनडामध्ये जन्मलेले मॅकमिलन यांना अद्याप २० वर्षेसुद्धा पूर्ण झाली नव्हती तेव्हा त्यांना रस्सल यांचे युगांसाठी योजना (१८८६, इंग्रजी) हे पुस्तक मिळाले. (हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वितरीत होणारे शास्त्रवचनांतील अभ्यास याचा पहिला खंड बनले तसेच त्यास युगांसाठी ईश्‍वरी योजना असेही संबोधण्यात येते. काळ जवळ आहे [१८८९, इंग्रजी] या दुसऱ्‍या खंडाने १९१४ या वर्षाला ‘परराष्ट्रीयांच्या सद्दीच्या’ शेवटच्या स्वरूपात दाखवले. [लूक २१:२४]) ज्या रात्री मॅकमिलन यांनी हे पुस्तक वाचण्यास घेतले तेव्हाच त्यांनी विचार केला: “हेच तर सत्य आहे!” सन १९०० च्या उन्हाळ्यात ते बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनामध्ये रस्सल यांना भेटले; त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी या नावाने ओळखण्यात येत असे. लवकरच मॅकमिलन यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांनी न्यूयॉर्कमध्ये संस्थेच्या मुख्यालयात बंधू रस्सलबरोबर काम करण्यास सुरवात केली.

१३. मत्तय २४:१४ ची पूर्णता होण्यासंबंधी मॅकमिलन आणि इतरांना कोणती एक समस्या लक्षात आली?

१३ बायबल अभ्यासाच्या आधारावर त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी देवाच्या उद्देशामध्ये कलाटणी ठरणारे वर्ष म्हणून १९१४ कडे लक्ष वेधले. परंतु मत्तय २४:१४ येथे भाकीत केलेली सुवार्ता इतक्या अल्पावधीत राष्ट्रांना सांगणे कसे शक्य आहे, असा विचार मॅकमिलन आणि इतर लोकांनी केला. त्यांनी नंतर असे म्हटले: “मला आठवते, की मी बंधू रस्सल यांच्यासोबत बहुतेकवेळा याविषयी बोलत असे आणि ते मला म्हणत असत, ‘बंधू, खरे तर जेरुसलेममध्ये नसतील इतके यहुदी न्यूयॉर्कमध्ये आहेत. डब्लीनपेक्षाही अधिक आयरीश लोक येथे आहेत. आणि रोममध्ये नसतील इतके इटालियन येथे आपल्याकडे आहेत. जर आपण आता त्या लोकांपर्यंत पोहंचलो तर संपूर्ण जगात पोहंचल्यासारखे होईल.’ परंतु आमच्या मनांचे समाधान मात्र होत नव्हते. म्हणून ‘फोटो-ड्रामाचा’ विचार पुढे आला.”

१४. सन १९१४ च्या आधी कोणता उल्लेखनीय उपक्रम हाती घेण्यात आला?

१४ “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” ही खरोखरच एक अफलातून कल्पना होती! त्यात चलचित्रे आणि काचेच्या रंगीत स्लाईड्‌स तसेच ग्रामोफोन तबकड्यांवर बायबलची भाषणे व संगीतही मुद्रित करण्यात आले होते. सन १९१३ मध्ये, अर्कान्सास, अमेरिका येथे झालेल्या अधिवेशनाविषयी टेहळणी बुरूज नियतकालिकाने म्हटले: “बायबलमधील सत्य शिकवण्यासाठी चलचित्रांचा उपयोग करण्याची वेळ आता आली आहे, असे एकमताने मान्य करण्यात आले. . . . [रस्सल] यांनी सांगितले, की ते या योजनेवर तीन वर्षांपासून काम करत होते आणि आता शेकडो सुंदर चित्रे जवळजवळ तयार झाली आहेत; ही चित्रे असंख्य लोकांस आकर्षित करतील आणि सुवार्तेची घोषणा करतील आणि देवावर पुन्हा विश्‍वास ठेवण्यास त्यांना मदत करतील.”

१५. “फोटो-ड्रामाचे” कशाप्रकारे पडसाद उमटले?

१५ “फोटो-ड्रामाने” जानेवारी १९१४ मध्येच, पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी असे करून दाखवले. १९१४ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील काही अहवाल खाली दिले आहेत:

एप्रिल १: “एका पाळकाने दोन भाग पाहिल्यानंतर म्हटले, ‘मी फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशनचा निम्माच भाग पाहिला आहे, परंतु मला त्यातून बायबलविषयी इतकं काही शिकायला मिळालं जितकं मला थियोलॉजिकल सेमिनरीच्या तीन वर्षांच्या कोर्समध्येही शिकायला मिळालं नव्हतं.’ एका यहुदी व्यक्‍तीने असे म्हटले, ‘तो पाहिल्यानंतर मी एक चांगला यहुदी बनलो आहे.’ अनेक कॅथलिक पाळक आणि नन्स यांनी ड्रामा पाहिल्यानंतर त्याची खूप स्तुती केली. . . . आतापर्यंत ड्रामाचे केवळ बारा भाग पूर्ण झाले आहेत . . . तथापि, आम्ही एकतीस शहरापर्यंत पोहंचलो आहोत आणि सेवा करत आहोत . . . एका दिवसाला पस्तीस हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक, श्रोते आहेत, ते आश्‍चर्य व्यक्‍त करत आहेत, विचार करत आहेत आणि आशीर्वाद प्राप्त करत आहेत.”

जून १५: “या चित्रांमुळे सत्याचा प्रसार करण्यास मला आणखी आवेश मिळाला आहे आणि स्वर्गीय पिता तसेच आमचा प्रिय ज्येष्ठ बंधू येशू यावरचं माझं प्रेम आणखी सखोल झालं आहे. मी रोज फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन यावर आणि तो सादर करणाऱ्‍यांवर देवाचा आशीर्वाद असावा अशी प्रार्थना करतो . . . मी प्रभूमध्ये तुमचा सेवक आहे, एफ. डब्लू. नोच.—आइओवा.”

जुलै १५: “या चित्रांमुळे शहरात उमटणारा उत्तम प्रतिसाद पाहून आम्हाला फार आनंद होत आहे. तसेच प्रभूने निवडलेले रत्न असल्याचा पुरावा देणाऱ्‍या लोकांना एकत्र करण्यासाठी व जगाला साक्ष देण्यासाठी या चित्रांचा उपयोग केला जात असल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आम्हाला असे अनेक प्रांजळ बायबल विद्यार्थी माहीत आहेत जे फोटो-ड्रामामुळे आमच्यासोबत मंडळीमध्ये आहेत. . . . प्रभूच्या सेवेत आपली बहीण, एमा एल. ब्रिकर.”

नोव्हेंबर १५: “आमचा पूर्ण विश्‍वास आहे, की हे ऐकून तुम्हाला फार आनंद होईल, की लंडन ऑपेरा हाऊस, किंग्सवे येथे फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन याद्वारे मोठी साक्ष देण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक गोष्टीत प्रभूच्या मार्गदर्शनाचा वैभवीरीत्या पुरावा मिळतो आणि तो पुरावा पाहून बांधवांच्या आनंदाला पारावार राहत नाही . . . आमचे श्रोते प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक प्रकारचे होते; या लोकांत पाळकही असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. एका पाळकाने तर . . . त्याला आणि त्याच्या पत्नीला हा प्रयोग पुन्हा पाहता यावा म्हणून तिकीट मागून घेतले. चर्च ऑफ इंग्लंडच्या एका धर्मोपदेशकाने हा ड्रामा अनेक वेळा पाहिला, आणि . . . तो पाहण्यासाठी त्याने त्याच्या कित्येक मित्रांना देखील सोबत आणले होते. दोन बिशपसहित कित्येक नामवंत लोक उपस्थित होते.”

डिसेंबर १: “तुमच्याद्वारे आमच्यापर्यंत पोहंचणाऱ्‍या आपल्या स्वर्गीय पित्याच्या त्या महान आणि अनमोल आशीर्वादांसाठी मी आणि माझी पत्नी मनःपूर्वक आभारी आहोत. या सुंदर फोटो-ड्रामामुळे आम्हाला सत्य कळलं आणि ते आम्ही आत्मसात केलं. . . . आमच्याकडे तुमच्या शास्त्रवचनांमधील अभ्यास (इंग्रजी) याचे सहा खंड आहेत. यामुळे खरोखरच फार मदत होते.”

त्या काळच्या परीक्षांना प्रतिक्रिया

१६. सन १९१४ या वर्षाने विश्‍वासाची परीक्षा का आणली?

१६ सन १९१४ मध्ये, प्रभूला जाऊन मिळण्याची आपली अपेक्षा पूर्ण न झाल्याचे खऱ्‍या आणि समर्पित ख्रिश्‍चनांना समजले तेव्हा काय झाले? त्या अभिषिक्‍त लोकांना अग्निपरीक्षेतून जावे लागले. नोव्हेंबर १, १९१४ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकाने म्हटले: “आपण हे लक्षात ठेवावे, की आपण परीक्षांच्या काळात आहोत.” याविषयी यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (१९९३, इंग्रजी) पुस्तक म्हणते: “१९१४ ते १९१८ हा काळ बायबल विद्यार्थ्यांकरता खरोखरच ‘परीक्षांचा काळ’ ठरला.” भवितव्यातील मोठे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विश्‍वासामध्ये आणि त्यांच्या विचारसरणीमध्ये सुधारणा करण्यास ते तयार होते का?

१७. सन १९१४ नंतरही पृथ्वीवर राहण्याच्या बाबतीत एकनिष्ठ अभिषिक्‍त लोकांनी कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली?

१७ सप्टेंबर १, १९१६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकाने म्हटले: “मंडळीला [अभिषिक्‍त लोकांना] एकत्र करण्याचे कापणीचे काम विदेश्‍यांचा काळ संपण्याआधी पूर्ण होईल असा आमचा ग्रह होता; परंतु बायबलमध्ये असे काहीही सांगण्यात आले नव्हते. . . . कापणी अद्यापही चालू आहे, याची आपल्याला खंत वाटते का? . . . प्रिय बंधूंनो, देवाप्रती आपला मनोभाव हा अत्यंत कृतज्ञतेचा, जे सत्य ओळखण्याचा आणि त्यास आत्मसात करण्याचा सुहक्क त्याने आपल्याला दिला आहे, त्या मनोरम सत्याविषयी उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्‍या गुणग्राहकतेचा, आणि या सत्याचे इतरांना ज्ञान व्हावे या उद्देशाने त्यांना मदत करण्याकरता वाढत्या आवेशाचा असावा.” त्यांच्या विश्‍वासाची पारख झाली होती तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही आणि ते यशस्वी झाले. परंतु आपल्यावरही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा येऊ शकतात याची आपण ख्रिश्‍चनांनी जाणीव ठेवली पाहिजे.

१८, १९. बंधू रस्सल यांच्या मृत्यूनंतर काही काळात देवाच्या लोकांवर विश्‍वासाच्या कोणकोणत्या परीक्षा आल्या?

१८ उदाहरणार्थ, बंधू चार्ल्स टी. रस्सल यांच्या मृत्यूनंतर काही काळातच एका वेगळ्या प्रकारची परीक्षा अभिषिक्‍त लोकांवर आली. त्यांच्या निष्ठेची आणि विश्‍वासाची ती परीक्षा होती. मत्तय २४:४५ येथील ‘विश्‍वासू दास’ कोण होता? काही लोकांना वाटले, की बंधू रस्सल ते दास होते आणि त्यामुळे त्यांनी नव्या संघटनात्मक रचनेस सहकार्य करण्यास नकार दिला. केवळ तेच दास होते तर आता त्यांच्या मृत्यूनंतर बांधवांना पुढे काय करायचे होते? त्यांनी नव्या नेमलेल्या व्यक्‍तीच्या मागे जायचे होते का, की यहोवा केवळ एका व्यक्‍तीचा नव्हे तर ख्रिश्‍चनांच्या संपूर्ण गटाचा एक माध्यम किंवा दास वर्गाच्या स्वरूपात उपयोग करत होता, हे समजण्याची वेळ आली होती?

१९ खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर आणखी एक परीक्षा १९१८ मध्ये आली; जगीक अधिकाऱ्‍यांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाच्या सांगण्यावरून यहोवाच्या संघटनेविरुद्ध ‘कायद्याने अरिष्ट योजले.’ (स्तोत्र ९४:२०, पं.र.भा.) उत्तर अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी बायबल विद्यार्थ्यांच्याविरुद्ध हिंसक छळाची लाट उसळली. पाळकवर्गाद्वारे प्रोत्साहित केलेला विरोध मे ७, १९१८ मध्ये कळसास पोहंचला कारण तेव्हा अमेरिकेच्या सरकारने जे. एफ. रदरफोर्ड आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांवर अटकेचे वॉरंट काढले, या साथीदारांमध्ये ए. एच. मॅकमिलनही होते. राजद्रोहाचा खोटा आरोप बांधवांवर लावण्यात आला आणि आपण निर्दोष आहोत, या त्यांच्या विनंतीकडे अधिकाऱ्‍यांनी दुर्लक्ष केले.

२०, २१. मलाखी ३:१-३ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, अभिषिक्‍त लोकांमध्ये कोणते काम पार पाडण्यात आले?

२० एक शुद्धिकरणाचे कार्य चालू होते, खरे तर त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली नाही कारण मलाखी ३:१-३ म्हणते: “त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो [करार घेऊन येणारा निरोप्या] धातु गाळणाऱ्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणाऱ्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांस शुद्ध करील; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील, मग ते धर्माने परमेश्‍वराला बलि अर्पण करितील.”

२१ पहिले जागतिक युद्ध समाप्तीस येण्याच्या काळात काही बायबल विद्यार्थ्यांनी आणखी एका परीक्षेला तोंड दिले—लष्कराबाबतीत त्यांनी भक्कम तटस्थता राखावी की नाही. (योहान १७:१६; १८:३६) काहीजण तटस्थ राहिले नाहीत. यास्तव, १९१८ मध्ये यहोवाने त्याच्या उपासकांच्या लहानशा गटाला जगीक दोषांपासून शुद्ध करता यावे म्हणून “करार घेऊन येणारा निरोप्या” अर्थात येशू ख्रिस्ताला त्याच्या आत्मिक मंदिरामध्ये पाठवले. खरा विश्‍वास प्रदर्शित करण्याचा ज्यांनी निर्धार केला होता त्यांना अनुभवाने शिकण्यास मिळाले आणि त्यांनी आवेशाने प्रचारकार्य चालूच ठेवले.

२२. विश्‍वासाच्या परीक्षेच्या बाबतीत आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे?

२२ आतापर्यंत आपण विचारात घेतलेल्या गोष्टी म्हणजे केवळ इतिहासात आस्था दाखवणे नव्हे. यहोवाच्या जगव्याप्त मंडळीच्या सध्याच्या आध्यात्मिक स्थितीशी याचा थेट संबंध आहे. परंतु आपण पुढील लेखात अशा परीक्षांचा विचार करू या ज्यांस देवाचे लोक आज सामोरे जात आहेत आणि त्यांत आपण यशस्वी कसे होऊ शकतो हेही आपण पाहू या.

आपल्याला आठवते का?

◻ आपल्या विश्‍वासाची पारख होईल, अशी अपेक्षा यहोवाच्या लोकांनी का केली पाहिजे?

◻ सन १९१४ च्या आधी देवाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यात येत होते?

◻ “फोटो-ड्रामा” काय होता आणि त्याचे कसे पडसाद उमटले?

◻ सन १९१४-१८ या काळातील घटनांनी कशाप्रकारे अभिषिक्‍त लोकांसमोर परीक्षा आणल्या?

[१२ पानांवरील चित्र]

शतकाच्या शेवटच्या आसपास अनेक देशांतील लोक “मिलिनियल डॉन” ग्रंथसंग्रहाच्या मदतीने बायबलचा अभ्यास करत होते, ज्यास नंतर “शास्त्रवचनांमधील अभ्यास” असे संबोधण्यात आले

[१३ पानांवरील चित्र]

सी. टी. रस्सल यांचे एक पत्र ज्यामध्ये ध्वनिमुद्रणासाठी प्रस्तावना आहे त्यात त्यांनी म्हटले: “‘द फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन’ आयबीएसए—आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी संघटना याद्वारे सादर करण्यात आला आहे. लोकांना धार्मिक-विज्ञानाच्या विचारात बोध देणे आणि बायबलचे समर्थन करणे हा त्यामागील उद्देश आहे.”

[१५ पानांवरील चित्र]

डमीट्रीयस पापाजॉर्ज यांनी “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” दाखवण्यासाठी प्रवास केला, त्यानंतर ख्रिस्ती तटस्थतेमुळे त्यांना तुरुंगवास घडला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा