वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. १६-२०
  • तुमच्या विश्‍वासाच्या गुणवत्तेची—सध्या पारख होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या विश्‍वासाच्या गुणवत्तेची—सध्या पारख होते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुमची परीक्षा कशा प्रकारे होईल?
  • पारखलेल्या विश्‍वासाचा लाभ
  • ख्रिस्ती विश्‍वासाची पारख होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तुमचा विश्‍वास मजबूत असेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. १६-२०

तुमच्या विश्‍वासाच्या गुणवत्तेची—सध्या पारख होते

“माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.”—याकोब १:२, ३.

१. आपल्या विश्‍वासाची परीक्षा होईल, अशी अपेक्षा ख्रिश्‍चनांनी का केली पाहिजे?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना संकटांचा अनुभव घेण्यात कोणताही रस नाही तसेच दुःख आणि मानखंडना सहन करण्यातही त्यांना कोणताही आनंद वाटत नाही. तरी देखील, खरे ख्रिश्‍चन, येशूने त्याच्या सावत्र भावाला म्हणजेच याकोबाला सांगितलेले वरील शब्द लक्षात ठेवतात. देवाच्या नियमांचे पालन केल्यामुळे छळ आणि इतर प्रकारचे कठीण प्रसंग ओढवण्याची अपेक्षा करण्याचे ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितले होते. (मत्तय १०:३४; २४:९-१३; योहान १६:३३) तथापि, या परीक्षांमुळे आनंद अनुभवला जाऊ शकतो. ते कसे?

२. (अ) आपल्या विश्‍वासाच्या परीक्षेमुळे आनंद कसा मिळू शकतो? (ब) आपल्या बाबतीत धीर त्याचे कार्य कसे पूर्ण करू शकतो?

२ संकटे आणि परीक्षा यांमध्ये असताना आपल्याला आनंद होतो याचे प्रमुख कारण म्हणजे यांमुळे चांगले प्रतिफळ निर्माण होऊ शकते. याकोबाने म्हटल्याप्रमाणे कठीण प्रसंग आणि परीक्षा सहन केल्यामुळे ‘धीर निर्माण होतो.’ या मौल्यवान ख्रिस्ती गुणवत्तेचा विकास करण्याद्वारे आपण लाभ मिळवू शकतो. याकोबाने लिहिले: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्‍यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:४) धीराला काहीतरी करायचे आहे अर्थात, “कार्य.” आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अखंड परिपूर्णता प्राप्त करून देणे, ख्रिस्ती या नात्याने प्रौढ होण्यास मदत करणे हे धीराचे कार्य आहे. यास्तव, परीक्षांना कोणत्याही अशास्त्रवचनीय पद्धतीने संपुष्टात आणण्याऐवजी त्यांस पूर्ण होऊ दिल्याने आपल्या विश्‍वासाची पारख होते आणि त्यात सुधारणाही होते. एखाद्या समस्येला तोंड देत असताना किंवा सहमानवांशी व्यवहार करताना आपल्यात सहनशीलता, करुणा, कृपा किंवा प्रेम या गुणांची उणीव असल्यास धीर ही उणीव भरून काढू शकतो. होय, क्रम असा आहे: परीक्षांमुळे धीर निर्माण होतो; धीर ख्रिस्ती गुणवत्तेस वाढवतो; ही आनंदाची कारणे आहेत.—१ पेत्र ४:१४; २ पेत्र १:५-८.

३. आपण संकटांना आणि विश्‍वासाच्या परीक्षांना घाबरून माघार का घेऊ नये?

३ आपण विश्‍वासाच्या परीक्षांना का घाबरू नये किंवा त्यांपासून माघार का घेऊ नये, या गोष्टीवरही प्रेषित पेत्राने जोर दिला. त्याने लिहिले: “त्याविषयी तुम्ही उल्हास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले; ह्‍यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्‍वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्‍यास कारणीभूत व्हावे.” (१ पेत्र १:६, ७) हे शब्द आज विशेष प्रोत्साहनदायक आहेत कारण “मोठे संकट”—स्तुती, गौरव, आदर आणि बचाव होण्याचा काळ—लोक विचार करतील त्यापेक्षा फार जवळ आहे आणि आपण अनुयायी झालो तेव्हापेक्षा आणखी निकट येऊन ठेपले आहे.—मत्तय २४:२१; रोमकर १३:११, १२.

४. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी आणि स्वतः सहन केलेल्या परीक्षांविषयी एका बांधवाने कोणत्या भावना व्यक्‍त केल्या?

४ अभिषिक्‍त शेषांनी १९१४ पासून सहन केलेल्या परीक्षांविषयी आपण मागील लेखात पाहिले. या परीक्षांमुळे आनंद परिणीत झाला का? ए. एच. मॅकमिलन यांनी अवलोकनात्मक दृष्टिकोन सादर केला: “संघटनेवर अनेक संकटे येताना आणि तिच्या सदस्यांच्या विश्‍वासाची पारख होताना मी पाहिले आहे. देवाच्या आत्म्याद्वारे संघटना टिकून राहिली आणि तिची भरभराट होत गेली. कोणत्याही नवीन विचाराने अस्वस्थ होण्याऐवजी शास्त्रवचनीय बाबींबद्दल आपली समज योग्य होण्यासाठी यहोवावर विसंबून राहण्यातले शहाणपण मी पाहिले आहे. . . . वेळोवेळी आम्हाला आमच्या विचारांमध्ये कोणतेही बदल करावे लागले तरी खंडणीच्या प्रेममय तरतुदीमध्ये आणि सार्वकालिक जीवनाच्या देवाच्या अभिवचनामध्ये काहीही बदल होणार नाही. म्हणून पूर्ण न झालेल्या अपेक्षा आणि दृष्टिकोनातील बदल यांमुळे आपण आपला विश्‍वास कमकुवत करण्याची काही एक आवश्‍यकता नाही.”—टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १५, १९६६, पृष्ठ ५०४.

५. (अ) अभिषिक्‍त शेषांना परीक्षांमधून गेल्याने कोणते लाभ झाले (ब) परीक्षा होण्याच्या या बाबतीत आपण आज का आस्था दाखवावी?

५ सन १९१४-१९ या काळादरम्यानच्या परीक्षांमधून बचावलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जगाच्या आणि बॅबिलोनी धार्मिक चालीरीतींच्या जबरदस्त प्रभावापासून मुक्‍त करण्यात आले. अभिषिक्‍त शेषाने शुद्ध आणि सुधारित लोकांच्या स्वरूपाने आगेकूच केली आणि देवाच्या स्तुतीचे बलिदान त्यांनी अशा विश्‍वासानिशी अर्पण केले, की लोक या नात्याने ते त्यास मान्य आहे. (यशया ५२:११; २ करिंथकर ६:१४-१८) न्यायनिवाड्याचा आरंभ देवाच्या घरापासूनच झाला होता पण तो न्यायनिवाडा एका विशिष्ट कालावधीत पूर्ण व्हायचा नव्हता. देवाच्या लोकांची पारख आणि छानणी करण्याचे काम चालू आहे. ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ लोक या नात्याने ‘मोठ्या संकटातून’ बचावण्याची आशा ठेवणाऱ्‍यांच्या विश्‍वासाचीही परीक्षा होत आहे. (प्रकटीकरण ७:९, १४) इतर प्रकारांखेरीज या परीक्षांमध्ये असेही प्रकार समाविष्ट आहेत ज्यांचा अभिषिक्‍त शेषांनी सामना केला आहे.

तुमची परीक्षा कशा प्रकारे होईल?

६. अनेक लोकांनी सहन केलेली एक कठीण परीक्षा कोणती होती?

६ आपल्यावर थेटपणे हल्ला होऊन आपल्यासमोर परीक्षेचे आव्हान उभे राहील, असा अनेक खिश्‍चनांनी विचार केला आहे. ते पुढील अहवालाचे स्मरण करतात: “[यहुदी पुढाऱ्‍यांनी] प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.” (प्रेषितांची कृत्ये ५:४०, ४१) आणि देवाच्या लोकांचा आधुनिक इतिहास, विशेषतः जागतिक युद्धाचा काळ स्पष्ट करतो, की अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी छळ करणाऱ्‍यांच्या हातून खरोखरच मार खाल्ला आहे आणि त्यांच्याकडून त्यांना फार वाईट वागणूक मिळाली आहे.

७. विश्‍वास प्रदर्शित करण्याच्या बाबतीत आधुनिक दिवसातील काही ख्रिस्ती लोक कोठपर्यंत गेले आहेत?

७ ख्रिश्‍चनांचा छळ करण्याच्या बाबतीत जगाने, अभिषिक्‍त शेषाला आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ सारखीच वागणूक दिली आहे. (योहान १०:१६) अनेक वर्षांदरम्यान, देवावरील प्रेमामुळे आणि विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्याद्वारे आणि वध करण्याद्वारे दोन्ही गटांच्या लोकांची फार भयंकररीत्या परीक्षा घेण्यात आली. दोन्ही गटांची आशा भिन्‍न असली तरी त्यांना देवाच्या आत्म्याची आवश्‍यकता भासली आहे. (पडताळा टेहळणी बुरूज, जून १५, १९९६, पृष्ठ ३१.) सन १९३० आणि १९४० च्या दशकात नात्सी जर्मनीमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांनी आणि त्यांच्या मुलांनी विशेष विश्‍वास दाखवला आणि त्यांच्यापैकी अनेकांची इतकी परीक्षा घेतली की तिला कोणतीही सीमा नव्हती. अलीकडील काळात, यहोवाच्या लोकांनी इथियोपिया, एरिट्रिया, झाइरे, बुरुंडी, मलावी, मोझांबिक, र्‌वांडा, सिंगापूर यांसारख्या देशांत छळाच्या परीक्षांना तोंड दिले आहे. शिवाय अशाप्रकारच्या परीक्षा अद्यापही चालू आहेत.

८. आपल्या विश्‍वासाची पारख होण्यात मारहाण होण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे, हे आफ्रिकी बांधवाच्या विवेचनावरून कसे दिसून येते?

८ परंतु आधी सांगितल्याप्रमाणे, आपल्या विश्‍वासाची अधिक अप्रत्यक्षरीत्या परीक्षा होत आहे. काही परीक्षा थेट नसतात आणि त्यांना सहजपणे ओळखताही येत नाही. खाली सांगितलेल्या परीक्षांमध्ये तुम्ही कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली असती यावर विचार करा. अंगोलाच्या एका बांधवाला दहा मुले आहेत. हे बांधव ज्या मंडळीत होते त्या मंडळीचा जबाबदार बांधवांशी काही काळ संपर्क तुटला होता. काही काळानंतर काही बांधव या मंडळीला भेट देऊ शकले. कुटुंबाचे पालण-पोषण करणे आपल्याला कसे शक्य झाले, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्‍नाचे उत्तर देणे त्यांच्याकरता इतके सोपे नव्हते आणि त्यांनी फक्‍त असे म्हटले, की तो फार कठीण प्रसंग होता. आपल्या मुलांना निदान एक वेळचं जेवण देणं तरी त्यांना शक्य झालं का? त्यांनी उत्तर दिले: “क्वचितच. आमच्याकडे जे काही होतं त्यातच भागवण्यास आम्ही शिकलो.” त्यानंतर त्यांनी पूर्ण विश्‍वासाने असे म्हटले: “पण शेवटल्या काळात आपण नेमकी याचीच अपेक्षा करत नाही का?” या जगात असा विश्‍वास अभावानेच आढळतो; परंतु राज्याचे अभिवचन पूर्ण होण्यावर ठाम विश्‍वास ठेवणाऱ्‍या एकनिष्ठ ख्रिस्ती लोकांमध्ये ही काही असाधारण गोष्ट नाही.

९. पहिले करिंथकर ११:३ च्या संबंधाने आपली कशाप्रकारे परीक्षा होत आहे?

९ ईश्‍वरशासित कार्यपद्धतींच्या बाबतीतही मोठ्या लोकसमुदायाची परीक्षा होत आहे. जगव्याप्त ख्रिस्ती मंडळी ईश्‍वरी तत्त्वे आणि ईश्‍वरशासित आदर्श यांद्वारे मार्गदर्शित होते. याचा अर्थ सर्वात पहिल्यांदा येशूला नेता म्हणून स्वीकारणे समाविष्ट आहे; त्याला मंडळीचा मस्तक या नात्याने नेमण्यात आले आहे. (१ करिंथकर ११:३) यहोवाची इच्छा ऐक्याने करण्याच्या बाबतीत ईश्‍वरशासित नेमणुका आणि निर्णय यांवर आपला पूर्ण विश्‍वास प्रकट करण्याद्वारे आपण येशूच्या आणि त्याच्या पित्याच्या स्वेच्छेने अधीन असल्याचे दाखवत असतो. याशिवाय, प्रत्येक स्थानिक मंडळीमध्ये पुढाकार घेण्यासाठी पुरुषांना नियुक्‍त करण्यात आले आहे. ते अपरिपूर्ण मानव असून त्यांच्या चुका आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतीलही; तरी सुद्धा अशा पर्यवेक्षकांचा आदर करण्याचा आणि त्यांच्या अधीन राहण्याचा आपल्याला आर्जव केला जातो. (इब्री लोकांस १३:७, १७) तुम्हाला असे करणे काहीवेळा आव्हानात्मक वाटते का? ही तुमच्याकरता खरोखरच एक परीक्षा आहे का? असे आहे तर तुम्ही तुमच्या विश्‍वासाच्या या परीक्षेचा लाभ घेत आहात का?

१०. क्षेत्र सेवेच्या बाबतीत आपण कोणत्या परीक्षांना तोंड देतो?

१० नियमितपणे क्षेत्र सेवेत राहण्याचा विशेषाधिकार आणि अपेक्षा यासंबंधित सुद्धा आपली परीक्षा होते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला या गोष्टीची जाण असली पाहिजे, की सेवाकार्यात संपूर्ण सहभाग घेण्यात निव्वळ नाममात्र प्रचार करण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. गरीब विधवेने आपले सर्वकाही दिल्यानंतर तिच्याबद्दलचे येशूने काढलेले प्रशंसेचे उद्‌गार आठवा. (मार्क १२:४१-४४) आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी सुद्धा क्षेत्र सेवेत आपले सर्वकाही देत आहे का?’ आपल्या सर्वांना हरएक प्रसंगी यहोवाचे साक्षीदार राहायचे आहे; लोकांसमोर आपला प्रकाश पाडण्यासाठी आपण प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास हवा.—मत्तय ५:१६.

११. विचारसरणीतील बदल आणि वर्तणुकीबाबत सल्ला यांविषयी कशी परीक्षा होऊ शकते?

११ बायबलमधील सत्यांचा वाढता प्रकाश आणि विश्‍वासू दासांमार्फत मिळणाऱ्‍या सल्ल्यांप्रती आपली कदर या संबंधित परीक्षेला सुद्धा आपल्याला तोंड द्यावे लागेल. (मत्तय २४:४५) काहीवेळा आपल्याला व्यक्‍तिगत वर्तणुकीत सुधारणा करण्याची गरज पडते उदाहरणार्थ, पूर्वी तंबाखूचा वापर करणाऱ्‍यांना स्पष्ट सांगण्यात आले होते, की मंडळीत राहायचे असल्यास त्यांना तंबाखू सोडावी लागेल.a (२ करिंथकर ७:१) किंवा संगीताच्या आवडीमध्ये तसेच मनोरंजनाच्या इतर प्रकारांमध्ये बदल करण्याच्या आवश्‍यकतेचा स्वीकार करण्याची ही परीक्षा असू शकते.b आपण सल्ल्याच्या सुज्ञतेची शंका करू का? किंवा आपण देवाच्या आत्म्याला आपल्या विचारसरणीमध्ये फेरफार करू देऊ आणि ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व धारण करण्यात आपली मदत करू देऊ?—इफिसकर ४:२०-२४; ५:३-५.

१२. एखाद्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर विश्‍वास दृढ करण्याकरता काय आवश्‍यक आहे?

१२ कित्येक दशकांपासून मोठ्या लोकसमुदायातील लोकांच्या संख्येत वाढ होत आहे आणि बाप्तिस्म्यानंतर ते यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध आणखी मजबूत करत आहेत. एखाद-दुसऱ्‍या ख्रिस्ती संमेलनाला जाणे, राज्यसभागृहामध्ये काही सभांसाठी जाणे किंवा क्वचित क्षेत्र सेवेला जाण्यापेक्षा यामध्ये अधिक काही समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, एखादा इसम मोठ्या बाबेलच्या अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यापासून शारीरिकरीत्या बाहेर होऊ शकतो, परंतु त्याने खऱ्‍या अर्थाने त्याकडे पाठ फिरवली आहे का? मोठ्या बाबेलच्या आत्म्याला—देवाच्या धार्मिक आदर्शांची खिल्ली उडवणाऱ्‍या आत्म्याला चित्रित करणाऱ्‍या गोष्टींना तो अद्यापही जडून राहिला आहे का? तो नैतिकतेला आणि वैवाहिक विश्‍वासूपणाला हलके समजतो का? तो आध्यात्मिक आस्थांपेक्षा व्यक्‍तिगत आणि भौतिक आस्थांना अधिक महत्त्व देतो का? होय, त्याच्यावर या जगाचा एकही ठपका नाही ना?—याकोब १:२७.

पारखलेल्या विश्‍वासाचा लाभ

१३, १४. खऱ्‍या उपासनेच्या मार्गावर चालण्यास सुरवात केल्यानंतर काही लोकांनी काय केले आहे?

१३ आपण खरोखरच मोठ्या बाबेलपासून आणि जगापासून पलायन केले असल्यास आपण मागे सोडलेल्या गोष्टींकडे पाहू नये. लूक ९:६२ येथे दिलेल्या तत्त्वानुसार आपल्यापैकी कोणीही मागे पाहणे म्हणजे देवाच्या राज्याची प्रजा होण्याची संधी गमावून बसणे होय. येशूने म्हटले: “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.”

१४ परंतु गतकाळात ख्रिस्ती झालेल्या काही लोकांनी या व्यवस्थीकरणाच्या साच्यात स्वतःला बसवले आहे. त्यांनी या जगाच्या आत्म्याचा विरोध केला नाही. (२ पेत्र २:२०-२२) जगीक चित्तभ्रमांनी त्यांच्या आस्थेवर आणि वेळेवर मात केली आहे आणि अशाप्रकारे स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा उभा केला आहे. आपले मन आणि हृदय देवाच्या राज्यावर आणि त्याच्या धार्मिकतेवर एकाग्रपणे केंद्रित करण्याऐवजी आणि त्यास आपल्या जीवनात पहिले स्थान देण्याऐवजी ते भौतिक गोष्टींच्या मागे लागले आहेत. जोपर्यंत ते त्यांच्या दुर्बळ विश्‍वासाला आणि कोमट परिस्थितीला मान्य करत नाहीत आणि ईश्‍वरी सल्ला प्राप्त करण्याद्वारे स्वतःमध्ये परिवर्तन करत नाहीत तोपर्यंत यहोवासोबतचा आणि त्याच्या संघटनेसोबतचा बहुमोल नातेसंबंध धोक्यात आहे.—प्रकटीकरण ३:१५-१९.

१५. देवाची स्वीकृती प्राप्त होत राहावी म्हणून कोणत्या गोष्टीची गरज आहे?

१५ आपला स्वीकार होणे आणि अगदी जलद गतीने येत असलेल्या मोठ्या संकटातून वाचणे आपल्या शुद्ध राहण्यावर आणि आपले वस्त्र ‘कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुण्यावर’ अवलंबून आहे. (प्रकटीकरण ७:९-१४; १ करिंथकर ६:११) आपण देवासमोर शुद्ध, धार्मिक भूमिका कायम न ठेवल्यास तो आपल्या पवित्र सेवेचा स्वीकार करणार नाही. निश्‍चितच, आपल्यातील प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव होण्यास हवी, की पारखलेल्या विश्‍वासाची गुणवत्ता धीर धरण्यास आणि देवाला नाराज न करण्यास आपली मदत करील.

१६. कोणत्या प्रकारांनी असत्य आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेऊ शकते?

१६ काहीवेळा, प्रसिद्धी-माध्यम आणि प्रापंचिक अधिकारी देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात; आपल्या ख्रिस्ती विश्‍वासांचे आणि जीवनशैलीचे खोटे स्वरूप मांडतात. याचे आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको कारण येशूने स्पष्टपणे सांगितले, की ‘आपण या जगाचे नाही म्हणून जग आपला द्वेष करील.’ (योहान १७:१४) सैतानाने अंध केलेल्या लोकांच्या दहशतीने आपण घाबरून जावे का आणि नाउमेद होऊन सुवार्तेला लज्जेची गोष्ट समजावी का? सत्याविषयीच्या खोट्या गोष्टींचा नियमितरीत्या सभांना उपस्थित राहण्यावर आणि प्रचाराच्या कार्यहालचालीवर आपण प्रभाव पडू द्यावा का? किंवा आपण यहोवा आणि त्याच्या राज्याविषयी सत्याची घोषणा करत राहण्यासाठी स्थिर आणि धैर्यशील व पहिल्यापेक्षा अधिक मजबूत व्हावे?

१७. विश्‍वास दाखवत राहण्याकरता कोणत्या खात्रीमुळे आपल्याला उत्तेजन मिळू शकते?

१७ पूर्ण झालेल्या बायबलच्या भविष्यवाण्यांनुसार आपण आता अंतसमयाच्या अगदी समाप्तीच्या काळात जगत आहोत. धार्मिकतेच्या नव्या जगाकरता असलेल्या आपल्या बायबलवर आधारित अपेक्षा निश्‍चितच खऱ्‍या ठरतील तेव्हा आपल्याला फार आनंद होईल. परंतु तो दिवस येईपर्यंत, आपण देवाच्या वचनावर अढळ विश्‍वास ठेवावा आणि संपूर्ण जगामध्ये राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात मंद न होण्याद्वारे आपल्या विश्‍वासाची प्रचिती द्यावी. दर आठवड्याला बाप्तिस्मा घेणाऱ्‍या हजारो लोकांचा विचार करा. यहोवाने आपला न्याय रोखून धरण्यात दाखवलेल्या धीरामुळे कित्येक लोकांचे तारण होऊ शकते याची कदर करण्यास ही गोष्ट पुरेसा आधार देत नाही का? यहोवाने या जीवनरक्षक राज्यप्रचाराच्या कार्याला चालू ठेवले आहे यामुळे आपल्याला आनंद होत नाही का? लाखो लोकांनी सत्याचा स्वीकार करून विश्‍वास प्रदर्शित केल्यामुळे आपण हर्षित होत नाही का?

१८. यहोवाची सेवा करण्याविषयी तुमचा कोणता निर्धार आहे?

१८ आपल्या विश्‍वासाची सध्याची पारख कोठपर्यंत चालेल हे आपण सांगू शकत नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: सध्याच्या दुष्ट आकाशाचा आणि पृथ्वीचा झाडा घेण्यासाठी यहोवाने एक दिवस नियुक्‍त केला आहे. तोपर्यंत, पारखण्यात आलेल्या त्या विश्‍वासाच्या उत्तम गुणाचे अनुकरण करण्याचा आपण निग्रह करू या; जो गुण आपल्या विश्‍वासाच्या पूर्तिकर्त्याने अर्थात येशूने दाखवला. आणि आपल्यामध्ये धाडसाने सेवा करणाऱ्‍या पृथ्वीवरील वृद्ध अभिषिक्‍त शेषांच्या आणि इतरांच्या उदाहरणाचे आपण अनुकरण करावे.

१९. तुमच्या मते कोणता गुण या जगावर निश्‍चितपणे विजय मिळवेल?

१९ आकाशात उडणाऱ्‍या देवदूताला सहकार्य करत असताना आपण दृढनिश्‍चय करण्यास हवा, की मंद न होता प्रत्येक राष्ट्रांस, वंशास, निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांस आणि लोकांस आपण सार्वकालिक सुवार्ता सांगावी. त्यांना स्वर्गदूताची घोषणा ऐकवावी: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) तो ईश्‍वरीय न्यायनिवाडा बजावण्यात येईल तेव्हा आपल्या पारखलेल्या विश्‍वासाच्या गुणवत्तेसंबंधी कोणता परिणाम होईल? तो एक वैभवी विजय नसेल का—सध्याच्या व्यवस्थीकरणातून वाचून देवाच्या धार्मिक नवीन जगात प्रवेश? विश्‍वासाच्या परीक्षा सहन केल्याने आपण प्रेषित योहानाप्रमाणे म्हणू शकू: “ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्‍वास.”—१ योहान ५:४.

[तळटीपा]

a पाहा टेहळणी बुरूज, (इंग्रजी) जून १, १९७३, पृष्ठे ३३६-४३ आणि जुलै १, १९७३, पृष्ठे ४०९-११.

b पाहा टेहळणी बुरूज, (इंग्रजी) जुलै १५, १९८३, पृष्ठे २७-३१.

तुम्हाला आठवते का?

◻ आपल्या विश्‍वासाची परीक्षा आनंदमय गोष्ट असावी, हे कसे शक्य आहे?

◻ सहजपणे ओळखता येणार नाही अशा आपल्या विश्‍वासाच्या कोणत्या काही परीक्षा आहेत?

◻ आपल्या विश्‍वासाच्या परीक्षांवर मात करून आपण कसा निरंतर लाभ घेऊ शकतो?

[१७ पानांवरील चित्र]

ए. एच. मॅकमिलन (समोर डावीकडे), त्यांना आणि वॉच टावर सोसायटीच्या इतर कर्मचाऱ्‍यांना अन्यायाने तुरुंगात टाकले तेव्हा

डिटरॉइट, मिशिगन, १९२८ च्या अधिवेशनात प्रतिनिधी

बंधू मॅकमिलन, आपल्या शेवटल्या वर्षांतही विश्‍वासू

[१८ पानांवरील चित्र]

या कुटुंबाप्रमाणे, आफ्रिकेमध्ये अनेक ख्रिश्‍चनांनी पारखण्यात आलेल्या विश्‍वासाची गुणवत्ता दाखवली आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा