वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. २८-३०
  • सैन्यांची आपल्याला नेहमीच गरज भासेल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैन्यांची आपल्याला नेहमीच गरज भासेल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वव्यापी “पोलिस” हवा
  • “सैन्यांचा यहोवा”
  • देवाचे सैन्य लढावयास जाते
  • युद्ध नसलेल्या जगाची कल्पना करा
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “सत्य व शांति यांची आवड धरा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. २८-३०

सैन्यांची आपल्याला नेहमीच गरज भासेल का?

सैन्यामागे प्रचंड मानव साधनसंपत्ती खर्च करण्यात आली आहे आणि बऱ्‍याच प्रमाणावर मानवाचा आनंद हिरावून घेतला गेला आहे. काही लोकांना वाटते, ‘सैन्यांची गरज राहणार नाही अशी जगव्याप्त सुरक्षा मानवजात कधी साध्य करू शकते का?’ प्रचंड हानीचा शस्त्रसाठा सर्व जिवांचा नाश करण्याची शक्यता असल्यामुळे हा प्रश्‍न निकडीचा बनतो. सैन्ये नसलेल्या जगाची आस धरणे कितीपत व्यवहार्य आहे?

कैक पूर्वोदाहरणे शाबीत करतात, की चांगल्या आंतरराष्ट्रीय नातेसंबंधामुळे आत्मविश्‍वास निर्माण होतो ज्यामुळे काही प्रमाणात निःशस्त्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ, कॅनडा आणि संयुक्‍त संस्थाने यांच्यामधील मैत्रीमुळे, त्यांच्यातील ५,००० किलोमीटरच्या सीमेवर दीडपेक्षा अधिक शतकांपासून सैन्यांचा पहारा नाही. नॉर्वे आणि स्वीडननेही इतर राष्ट्रांप्रमाणे काहीसे असेच साध्य केले आहे. सर्व राष्ट्रांनी मिळून ठरवल्यास शस्त्रविरहीत जग अस्तित्वात येऊ शकेल का? पहिल्या महायुद्धाच्या भयप्रद घटनांमुळे या कल्पनेला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.

सन १९१८ मध्ये शांती प्रस्थापित करण्यात आली तेव्हा, व्हर्साय तहातील एक उद्देश, “सर्व राष्ट्रांनी शस्त्रसंभारावर मर्यादा घालण्याच्या क्रियेची सुरवात शक्य करणे,” हा होता. पुढील वर्षांदरम्यान, शांतीवाद प्रसिद्ध झाला. काही शांतीवाद्यांनी असा सिद्धान्त मांडला, की युद्ध एखाद्या राष्ट्रावर गुजरणारी सर्वात वाईट गोष्ट आहे आणि म्हणून पराजयाहूनही वाईट आहे. शांतीवादाच्या विरोधकांनी याला सहमती दिली नाही, त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली, की मोठमोठ्या क्षेत्रांतील यहुदी लोकांनी अनेक शतकांसाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्‍यांविरुद्ध फार कमी प्रमाणात शस्त्रांचा वापर केला तरीसुद्धा, त्यांचा सर्वनाश करण्याचे क्रूर प्रयत्न जारीच राहिले. आफ्रिकन लोक, त्यांना गुलाम म्हणून ज्या लोकांनी अमेरिकेला आणले त्यांच्याविरुद्ध इतका प्रतिकार करू शकले नाहीत, तरीसुद्धा त्यांना कितीतरी शतकांपर्यंत क्रूरपणे वागवण्यात आले.

पण, जेव्हा दुसऱ्‍या महायुद्धाचा उद्रेक झाला तेव्हा अनेक शांतीवाद्यांनी कबूल केले, की राष्ट्रांना खरोखरच सुरक्षिततेची आवश्‍यकता आहे. यास्तव, दुसऱ्‍या महायुद्धानंतर जेव्हा संयुक्‍त राष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा निःशस्त्रीकरणावर कमी जोर होता आणि आक्रमण टाळण्याकरता आंतरराष्ट्रीय सहकार्य घडवून आणण्यावर अधिक जोर दिला गेला होता. सदस्य राष्ट्रांनी आशा केली होती, की अशाप्रकारे मिळालेली सुरक्षा राष्ट्रांना निःशस्त्रीकरण करण्यास आत्मविश्‍वास देईल.

आणखी एक समस्या दृष्टिपथात आली. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक राष्ट्र जेव्हा प्रयत्न करीत असे तेव्हा शेजारच्या राष्ट्राला ते असुरक्षिततेचे वाटू लागले. या दुष्ट चक्रामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा चालू झाली. पण अलीकडेच, बड्या राष्ट्रांतील सुधारित नातेसंबंधांनी निःशस्त्रीकरणाची आशा बळकट केली आहे. परंतु, आखाती युद्ध आणि भूतपूर्व युगोस्लाव्हियातील समस्यांचा उद्रेक झाल्यापासून निःशस्त्रीकरणाविषयी अनेकांनी बाळगलेल्या आशेचा चक्काचूर झाला. पाच वर्षांपूर्वी, टाईम नियतकालिकाने म्हटले: “शीतयुद्ध समाप्त झाले असले तरी, हे जग कमी नव्हे तर जास्तच घातक ठिकाण बनले आहे.”

विश्‍वव्यापी “पोलिस” हवा

मानवजातीला जगात एकच सरकार ज्यात सर्वांचे संरक्षण करू शकणारे शक्‍तिशाली सैन्य असेल, असा निष्कर्ष काही निरीक्षक काढतात. पण संयुक्‍त राष्ट्र संघटना किंवा जगातील अग्रेसर सैनिकी सत्ता असे करू शकत नसल्यामुळे भवितव्यात आशेचा किरण नाही असे काहींना वाटते. परंतु, तुम्ही जर बायबल हे देवाचे वचन म्हणून स्वीकारले तर सर्वसमर्थ देव ही निकडीची गरज पूर्ण करील की नाही याविषयी तुम्हाला प्रश्‍न पडला असेल.

बायबल ज्याला “प्रीतीचा व शांतीचा देव” संबोधते तो न्याय अंमलात आणण्यासाठी सैन्यबळाचा वापर करील का? आणि जर करील तर ते कोणते सैन्य असेल? आम्हाला देवाचे साहाय्य आहे असा आजच्या अनेक सैन्यांचा दावा आहे, पण ते खरोखरच देवाची इच्छा पूर्ण करीत आहेत का? की, हस्तक्षेप करण्याचा आणि शांती व सुरक्षा आणण्याचा देवाचा काही वेगळा मार्ग आहे?—२ करिंथकर १३:११.

आदाम आणि हव्वेला एदेनातून बाहेर काढून व त्यांनी पुन्हा आत प्रवेश करू नये म्हणून प्रवेशद्वारापाशी करूबांची नियुक्‍ती करून सर्वसमर्थ देवाने पहिली बंडाळी हाताळली. त्याच्या सार्वभौम सत्तेविरुद्धच्या सर्व बंडाळीचा तो नाश करील असेही त्याने घोषित केले. (उत्पत्ति ३:१५) म्हणजे देव सैन्याचा वापर करील का?

बायबल अशा घटनांचे वर्णन करते ज्यात आपले न्यायदंड बजावण्याकरता देवाने सैन्यांचा जरूर वापर केला होता. जसे की, कनान देशातील राज्ये पशू समागम करीत होते, बालकांना अर्पण करीत होते आणि क्रौय युद्धे करीत होते. देवाने त्यांचा समूळ नाश करण्याची आज्ञा दिली आणि हा हुकूम पूर्ण करण्यासाठी यहोशवाच्या सैन्याचा उपयोग केला. (अनुवाद ७:१, २) तसेच, देव त्याच्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी सर्व दुष्टाईचा कसा अंत करील याचे उदाहरण देण्यासाठी फिलिस्टाईन लोकांचा नाश करण्यासाठी देवाने राजा दाविदाच्या सैन्याचा उपयोग केला होता.

त्या घटना बोधपर होत्या. लोकांचे संरक्षण करण्याकरता आपण सैन्याचा उपयोग करू शकतो हे यहोवाने प्रदर्शित केले. होय, यहोवाचे एक अद्वितीय सैन्य आहे जे त्याच्या सत्तेविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या विश्‍वव्यापी बंडाळीचा समूळ नाश करील.

“सैन्यांचा यहोवा”

बायबल “सैन्यांचा यहोवा” ही इब्री संज्ञा २५० पेक्षा अधिक वेळा वापरते. ही संज्ञा प्रामुख्याने, देवदूतांच्या प्रचंड सैन्याचा प्रमुख सेनापती म्हणून असलेला देवाचा हुद्दा सूचित करते. एके प्रसंगी संदेष्टा मिखायाने अहाब आणि यहोशाफाट या राजांना सांगितले: “परमेश्‍वर [“यहोवा,” NW] आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.” (१ राजे २२:१९) येथे देवदूतांच्या सेनेचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी यहोवाने या सैन्यांचा उपयोग केला. दोथान शहराला वेढा घालण्यात आला होता तेव्हा अलीशाचा सेवक हताश झाला. परंतु त्याला हिंमत देण्यासाठी देवाने त्याला आपल्या आत्मिक प्राण्यांच्या सेनेचा एक चमत्कारिक दृष्टान्त दाखवला. “परमेश्‍वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.”—२ राजे ६:१५-१७.

म्हणजे, आजच्या सैन्याला देवाचा पाठिंबा आहे असा या घटनांचा अर्थ होतो का? आम्ही देवाचे सैन्य आहोत असा ख्रिस्ती धर्मजगतातील काही सैन्य कदाचित दावा करतील. त्यांच्यावर आशीर्वाद देण्यासाठी अनेकांनी पाळकांना विनंती केली आहे. परंतु, ख्रिस्ती धर्मजगताचे सैन्य बहुधा एकमेकांविरुद्धच, आपल्याच धर्माच्या लोकांविरुद्ध लढत असतात. या शतकातील दोन महायुद्धे, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या सैन्यांमध्येच सुरू झाली. हे निश्‍चितच देवाचे कार्य असू शकत नाही. (१ योहान ४:२०) आम्ही शांतीसाठी लढत आहोत असा या सैनिकी बळाचा दावा असला तरी, जगातील शांतीचा भंग होण्यापासून टाळण्याकरता अशी सैन्ये तयार करा म्हणून येशूने आपल्या अनुयायांना सांगितले होते का?

येशू आपल्या शिष्यांसह एका बागेत प्रार्थना करीत असताना एका सशस्त्र समूहाने येशूला धरले तेव्हा एका गंभीर स्वरूपात शांततेचा भंग झाला. एका शिष्याने येशूला धरण्यासाठी आलेल्यांपैकी एकावर तलवारीने हल्ला केला. एका महत्त्वपूर्ण तत्त्वाचे स्पष्टीकरण देण्याकरता येशूने त्या प्रसंगाचा उपयोग केला. तो म्हणाला: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?” येशूच्या हाताखाली एक प्रचंड सेना होती, पण पेत्राची त्यात सैनिक म्हणून भरती करण्यात आलेली नव्हती किंवा कोणत्याही मानवाची भरती करण्यात आलेली नाही. उलट, पेत्र आणि येशूच्या इतर अनुयायांना ‘माणसे धरण्याकरता’ बोलवण्यात आले होते. (मत्तय ४:१९; २६:४७-५३) काही तासांनंतर, येशूने पिलाताला परिस्थितीचे स्पष्टीकरण करून दिले. तो म्हणाला: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही, माझे राज्य ह्‍या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) हे राज्य दाविदाच्या राज्यासारखे पृथ्वीवर स्थापण्यात आले नव्हते तर, देवाने ते राज्य येशूला स्वर्गात दिले आहे आणि ते पृथ्वीवर शांती आणील.

देवाचे सैन्य लढावयास जाते

देवाचे सैन्य लवकरच कार्यरत होणार आहे. भविष्यात होणाऱ्‍या चकमकीचे वर्णन करताना प्रकटीकरणाचे पुस्तक येशूला “देवाचा शब्द” म्हणते. आपण वाचतो: “स्वर्गातील सैन्ये पांढऱ्‍या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते.” बायबल म्हणते, की ह्‍या लढाईमुळे “पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये” समूळ नष्ट होतील. देवाठायी एकनिष्ठा दाखवणाऱ्‍या इतरांबद्दल भविष्यवाणी पुढे म्हणते: “बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले.” दियाबल सैतानाला देखील निष्क्रिय करण्यात येईल. यामुळे सैन्यविरहीत शांतीपूर्ण जग अस्तित्वात येणे शक्य होईल.—प्रकटीकरण १९:११-२१; २०:१-३.

युद्ध नसलेल्या जगाची कल्पना करा

सैन्यांची गरजच भासणार नाही अशा अगदीच सुरक्षित जगाचे चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभे करू शकता का? बायबलमधील एक स्तोत्र म्हणते: “या, परमेश्‍वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; रथ अग्नीत जाळून टाकितो.”—स्तोत्र ४६:८, ९.

एकदाची सुटका! कल्पना करा, सैन्यांसाठी आणि त्यांना लागणाऱ्‍या साधनांसाठी जे पैसे द्यावे लागतात त्या क्षीण करून टाकणाऱ्‍या ओझ्यापासून मानवी समाज मुक्‍त होईल! सर्वांसाठी परिस्थिती सुधारण्यात, पृथ्वी स्वच्छ करण्यात आणि पुनःरोपण करण्यात लोक आपल्या शक्‍तीचा वापर करू शकतील. मानवाला खरोखरच उपयोगी पडतील अशा नवनवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी संधी मिळतील.

“यापुढे तुझ्या देशात कसलाहि जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश याचे नावहि ऐकू येणार नाही,” या अभिवचनाची संपूर्ण जगभरात पूर्णता होईल. (यशया ६०:१८) पुन्हा कधीच, युद्ध क्षेत्रातून आपली घरे आणि मालमत्ता सोडून पळ काढण्यास भाग पडलेल्या लाखो निराश्रित निर्वासित, दुःखाशिवाय दुसरे काही नसलेल्या निर्वासितांच्या छावणींत राहावयास येणार नाहीत. पुन्हा केव्हाही लोक, राष्ट्राराष्ट्रांतील झगड्यात मारले गेलेल्या किंवा अपंग झालेल्या आपल्या प्रिय जनांसाठी शोक करणार नाहीत. यहोवाचा स्वर्गीय राजा कायमची जागतिक शांती प्रस्थापित करील. “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.”—स्तोत्र ७२:७, १४.

द्वेष करणे नव्हे तर देवाच्या प्रीतीचा मार्ग अनुसरण्यास शिकलेल्या लोकांमधील जीवन अधिकच सुखकारक असेल. देवाचे वचन भाकीत करते: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” यहोवाला ओळखणाऱ्‍या व त्याच्यावर प्रीती करणाऱ्‍या लोकांबरोबर राहण्याचा अनुभव कसा असेल? तेच पुस्तक पुढे भाकीत करते: “नीतिमत्तेचा परिणाम शांति व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानांत व सुखाश्रमांत राहतील.”—यशया ११:९; ३२:१७, १८.

बायबलमधील ज्ञानाच्या आधारावर भरवसा बाळगणारे लोक समजतात, की देवाचे सैन्य, पृथ्वीला शांतीच्या सर्व शत्रूंपासून स्वच्छ करण्यास सज्ज आहे. हे ज्ञान त्यांना, ‘शेवटल्या दिवसांत जे होणार आहे,’ असे बायबलमध्ये म्हटले आहे त्यानुसार वागण्यासाठी आत्मविश्‍वास देते. अर्थात: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:२-४.

अनेक राष्ट्रांतून यहोवाचे साक्षीदार बनलेल्या लोकांनी केव्हाच ‘युद्धकला शिकणे’ सोडून दिले आहे. ते देवाच्या स्वर्गीय सैन्यांकडून मिळणाऱ्‍या सुरक्षिततेवर भरवसा ठेवतात. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्याद्वारे तुम्हीही असाच भरवसा विकसित करू शकाल.

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

U.S. National Archives Photo

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा