वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१ पृ. १५-२०
  • देवापासून प्राप्त झालेले पुस्तक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवापासून प्राप्त झालेले पुस्तक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विज्ञानाशी मेळ असणारे पुस्तक
  • आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक
  • खऱ्‍या भविष्यवाणीचे पुस्तक
  • या पुस्तकाचा विज्ञानाशी मेळ आहे का?
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
  • भविष्यवाणीचे पुस्तक
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
  • बायबल—देवाकडून आलेले पुस्तक
    बायबल नेमके काय शिकवते?
  • आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१ पृ. १५-२०

देवापासून प्राप्त झालेले पुस्तक

“संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२१.

१, २. (अ) आधुनिक जीवनाकरता बायबल समर्पक आहे किंवा नाही, याविषयी काहींच्या मनात प्रश्‍न का येतो? (ब) बायबल देवापासून प्राप्त झाले आहे, हे दाखवण्यासाठी आपण कोणत्या तीन पुराव्यांचा उपयोग करू शकतो?

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्या जीवनाकरता बायबल समर्पक आहे का? काहींच्या मते हे शक्य नाही. “एखाद्या आधुनिक रसायनशास्त्राच्या वर्गात पाठ्यपुस्तकाची १९२४ सालाची आवृत्ती वापरण्याचा सल्ला थोडाच कुणी देणार आहे,” असे म्हणून, डॉ. ईलाय एस. चेसन यांनी आपल्या मते बायबल कालबाह्‍य का आहे हे व्यक्‍त केले. वरवर पाहिल्यास या युक्‍तिवादात तथ्य असल्याचे भासते. काही झाले तरी, बायबल काळापासून आजवर विज्ञान, मानसिक आरोग्य आणि मानवी वर्तन यांविषयी मनुष्याच्या ज्ञानात कितीतरी पटीने भर पडली आहे. यामुळे काहींना असे वाटते: ‘अशाप्रकारचे जुने पुस्तक वैज्ञानिकदृष्ट्या अचूक असणे कसे शक्य आहे? त्यात, आधुनिक जीवनाकरता समर्पक माहिती असणे कसे शक्य आहे?’

२ स्वतः बायबल याचे उत्तर देते. २ पेत्र १:२१, येथे आपल्याला सांगण्यात येते, की बायबलच्या संदेष्ट्यांनी ‘पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन देवापासून आलेला संदेश सांगितला.’ अशाप्रकारे बायबल हे दाखवून देते, की हे पुस्तक देवापासून प्राप्त झाले आहे. तथापि, ही गोष्ट आपण इतरांना कशी पटवून देऊ शकतो? बायबल देवाचे वचन आहे, याचे तीन पुरावे आपण लक्षात घेऊ: (१) ते वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे, (२) आधुनिक जीवनाकरता व्यावहारिक ठरतील अशी कायम टिकणारी तत्त्वे त्यात आहेत, आणि (३) त्यात अशा भविष्यवाण्या आहेत ज्या पूर्ण झाल्या आहेत आणि ऐतिहासिक पुराव्यांवरून त्या सिद्ध झाल्या आहेत.

विज्ञानाशी मेळ असणारे पुस्तक

३. वैज्ञानिक शोधांमुळे बायबलने का कच खाल्ली नाही?

३ बायबल विज्ञानाचे पाठ्यपुस्तक नाही. तथापि, ते सत्याचे पुस्तक आहे आणि सत्य काळाच्या ओघातही टिकून राहते. (योहान १७:१७) वैज्ञानिक शोधांमुळे बायबलने कच खाल्ली नाही. त्यात जेव्हा वैज्ञानिक गोष्टींचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा ते निव्वळ मिथ्या शाबीत झालेल्या प्राचीन “वैज्ञानिक” मतापासून पूर्णपणे अलिप्त असते. खरे तर, त्यात अशी विधाने आहेत जी वैज्ञानिकदृष्ट्या तर अचूक आहेत, पण त्यांच्या काळात ती विधाने सर्वमान्य मतांच्या अगदी विरोधात होती. उदाहरणार्थ, बायबल आणि वैद्यकीय शास्त्र यांच्यात मेळ कसा बसतो, याचा विचार करा.

४, ५. (अ) जुन्या काळातील वैद्यांना रोगाविषयी काय समजले नाही? (ब) इजिप्शियन वैद्यांच्या उपायांशी मोशे निश्‍चितपणे परिचित का होता?

४ जुन्या काळातील वैद्यांना रोग कसा पसरतो याविषयी संपूर्ण समज नव्हती आणि रोगांवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आरोग्यरक्षण किती महत्त्वाचे आहे हेही त्यांना उमगलेले नव्हते. त्यांच्या पुष्कळशा वैद्यकीय पद्धती आधुनिक प्रमाणांनुसार अक्षरशः रानटी वाटतात. उपलब्ध असलेले सर्वात जुने वैद्यकीय लिखाण म्हणजे सा. यु. पू. १५५० च्या जवळपासच्या कालखंडातील एबर्स पपायरस नामक इजिप्शियन वैद्यकीय ज्ञानाचा संग्रहग्रंथ. ‘तुम्हाला मगरीने चावा घेतलेला असो की पायाच्या अंगठ्याचे नख दुखत असो,’ या गुंडाळीत अशाप्रकारच्या कितीतरी दुखण्यांवर ७०० उपाय सुचविण्यात आलेले आहेत. बरेच उपाय निरुपयोगी होते, पण काही तर अतिशय धोकेदायकही होते. जखमेवरील उपचाराकरता माणसाची विष्ठा इतर पदार्थांसोबत मिसळून हे मिश्रण जखमेवर लावावे असे एका ठिकाणी सुचवलेले होते.

५ इजिप्शियन वैद्यकीय उपायांचे हे लिखाण थोड्याफार फरकाने, बायबलची पहिली पाच पुस्तके लिहिली जाण्याच्या काळातच करण्यात आले; या पुस्तकांत मोशेचे नियमशास्त्र देखील समाविष्ट होते. सा. यु. पू. १५९३ साली जन्मलेला मोशे, मिसर देशात लहानाचा मोठा झाला. (निर्गम २:१-१०) फारोच्या घरात मोठा झाल्यामुळे मोशेला “मिसरी [इजिप्शियन] लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले.” (प्रेषितांची कृत्ये ७:२२) तो मिसर देशातील “वैद्यांस” ओळखत होता. (उत्पत्ति ५०:१-३) मोशेच्या लिखाणांवर त्यांच्या निरुपयोगी, धोकेदायक वैद्यकीय पद्धतींची पडछाया उमटली का?

६. मोशेच्या नियमशास्त्रातील कोणते आरोग्यविषयक नियम आधुनिक वैद्यकीय शास्त्र वाजवी मानते?

६ उलट, मोशेच्या नियमशास्त्रातील काही आरोग्यविषयक नियम आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या मानाने कितीतरी पुढारलेले होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, लष्करी छावण्यासंबंधी एका नियमानुसार छावणीपासून दूर जाऊन खड्ड्यात मल झाकून टाकणे आवश्‍यक होते. (अनुवाद २३:१३) हा एक अत्यंत पुढारलेला प्रतिबंधक उपाय होता. यामुळे पाणी निर्जंतुक राहण्यास मदत होत असे; शिवाय माशांमुळे होणाऱ्‍या शिजेल्लोसिस नावाच्या रोगापासून, तसेच विशेषतः विकसनशील देशांत आज देखील लाखो लोकांचा बळी घेणाऱ्‍या अतिसाराच्या इतर रोगांपासूनही यामुळे बचाव होत असे.

७. संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्यास अटकाव घालण्याकरता मोशेच्या नियमशास्त्रातील कोणत्या आरोग्यविषयक नियमांनी मदत केली?

७ मोशेच्या नियमशास्त्रात आणखी बरेचसे आरोग्यविषयक नियम होते ज्यांमुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्यास अटकाव बसत असे. एखाद्याला संसर्गजन्य रोग झालेल्या किंवा त्याला असा रोग असण्याची शक्यता असल्यास त्याला इतरांपासून दूर ठेवण्यात येत असे. (लेवीय १३:१-५) अचानक (कदाचित रोगाने) मेलेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली वस्त्रे किंवा पात्रे पुन्हा वापरण्याआधी धुवून घ्यावी लागत किंवा नष्ट तरी करावी लागत. (लेवीय ११:२७, २८, ३२, ३३) मृतदेहास स्पर्श करणाऱ्‍याला अशुद्ध समजले जात असे आणि त्याला स्वतःला शुद्ध करण्यासाठी काही विधी करावे लागत, ज्यात कपडे धुवून अंघोळ करणे समाविष्ट होते. सात दिवसांच्या अशुद्धतेच्या काळात त्याला इतरांना स्पर्श करण्याची मनाई होती.—गणना १९:१-१३.

८, ९. मोशेच्या नियमातील आरोग्य संहिता त्या काळात पुढारलेली होती, असे का म्हणता येते?

८ या आरोग्य संहितेतून अशा सुज्ञानाचे दर्शन घडते जे त्या काळात फार पुढारलेले होते. रोगाच्या प्रसाराविषयी आणि त्यावर प्रतिबंध घालण्याविषयी आधुनिक वैद्यकीय शास्त्राला पुष्कळ काही माहीत झाले आहे. उदाहरणार्थ, १९ व्या शतकातील वैद्यकीय प्रगतीमुळे अँन्टीसेस्पिसची, म्हणजेच रोगांच्या फैलावावर आळा घालण्याकरता स्वच्छतेचे अवलंबन करण्याची वैद्यकीय पद्धत प्रचारात आली. परिणामी संसर्गजन्य रोगांत आणि अकाली मृत्यूंच्या प्रमाणात विलक्षण घट झाली. अनेक युरोपियन देशांत आणि संयुक्‍त संस्थानांत, १९०० साली अपेक्षित आयुर्मर्यादा ५० पेक्षा कमी होती. त्यानंतर तिच्यात लक्षणीय वाढ झाली आहे; रोगप्रतिबंधाच्या दिशेने झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळेच नव्हे तर पूर्वीपेक्षा चांगल्या आरोग्याचा आणि राहणीमानाचा यात सिंहाचा वाटा आहे.

९ तथापि, रोग कोणत्या मार्गांनी पसरतात याविषयी वैद्यकीय शास्त्राला माहिती मिळण्याच्या हजारो वर्षांपूर्वीच, रोगापासून बचावण्यासाठी वाजवी प्रतिबंधक उपाय बायबलमध्ये सुचवण्यात आले होते. यामुळे, मोशेने त्याच्या काळातील लोक साधारण ७० ते ८० वर्षे जगतात असे जे म्हटले त्यात काही नवल नाही. (स्तोत्र ९०:१०) अशाप्रकारच्या आरोग्य नियमांविषयी मोशेला कसे कळले? स्वतः बायबल याचे उत्तर देते: नियमशास्त्र संहिता “देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात” आली होती. (गलतीकर ३:१९) होय, बायबल मानवी सुज्ञानाचे पुस्तक नाही, ते देवापासून प्राप्त झालेले पुस्तक आहे.

आधुनिक जीवनासाठी उपयुक्‍त पुस्तक

१०. बायबल सुमारे २,००० वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले, तरीसुद्धा त्यातील सल्ल्याच्या बाबतीत काय खरे आहे?

१० सल्ला देणारी पुस्तके काही काळातच कालबाह्‍य होतात आणि त्यांत सुधारणा करण्याची गरज पडते किंवा नवीन पुस्तके त्यांची जागा घेतात. पण बायबल हे खरोखरच अतुलनीय आहे. “तुझे निर्बंध अभंग [“भरवसालायक,” NW] आहेत,” असे स्तोत्र ९३:५ म्हणते. बायबल सुमारे २,००० वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले, तरीसुद्धा त्यांतील शब्द अद्यापही अवलंब करण्याजोगे आहेत. आपल्या कातडीचा रंग कोणताही असो किंवा आपण कोणत्याही देशात राहात असो, बायबलमधील शब्द आपल्या सर्वांना सारख्याच प्रमाणात लागू होतात. बायबलच्या कालनिरपेक्ष, ‘अतिशय भरवसालायक’ सल्ल्याच्या काही उदाहरणांचा विचार करा.

११. मुलांना शिस्त लावण्याविषयी काही दशकांपूर्वी काही पालक कशावर विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त झाले?

११ मुलांच्या संगोपनाविषयी “नाविन्यपूर्ण कल्पनांच्या” आहारी जाऊन—“मनाई करण्यावर मनाई आहे”—असा अनेक पालकांचा काही दशकांपूर्वी ग्रह झाला होता. मुलांवर बंधने घातल्यामुळे त्यांच्यावर आघात तर होणार नाही, ती हताश तर होणार नाहीत अशी त्यांना भीती होती. बाल संगोपनाच्या प्रांजळ सल्लागारांचे ठाम मत होते की पालकांनी केवळ सौम्यपणे मुलांच्या चुकांची दुरुस्ती करावी, पण एवढेच, यापुढे त्यांनी जाऊ नये. असे म्हणणारे अनेक तज्ज्ञ आता “पालकांना थोडेसे कडक व्हावे असे आर्जवतात जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल,” असा अहवाल द न्यूयॉर्क टाईम्स देते.

१२. ‘शिस्त’ याअर्थी भाषांतरित करण्यात आलेल्या ग्रीक नामाचा अर्थ काय होतो आणि मुलांना अशाप्रकारच्या शिस्तीची का गरज आहे?

१२ बायबलने मात्र बाल संगोपनाविषयी सुरवातीपासूनच विशिष्ट, संतुलित मार्गदर्शन दिले आहे. ते सल्ला देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) या वचनात ‘शिस्त’ याअर्थी भाषांतरित करण्यात आलेल्या ग्रीक नामाचा अर्थ, “संगोपन, प्रशिक्षण, मार्गदर्शन” असा होतो. बायबलनुसार ही शिस्त किंवा वळण लावण्याद्वारे पालकांचे प्रेम व्यक्‍त होते. (नीतिसूत्रे १३:२४) निःसंदिग्ध नैतिक सूचना मिळाल्यामुळे आणि बऱ्‍यावाईटाविषयीची समज प्रगल्भ झाल्यामुळे मुलांचा चांगला विकास होतो. योग्यप्रकारे लावण्यात आलेली शिस्त त्यांना सुरक्षित वाटण्यास मदत करते; यामुळे आपण कोणत्या प्रकारचे व्यक्‍ती होणार आहोत याची पालकांना काळजी आहे, हे देखील त्यांना समजते.—पडताळा नीतिसूत्रे ४:१०-१३.

१३. (अ) शिस्त लावताना कोणत्या बाबतीत पालकांनी दक्ष असावे, असे बायबल सांगते? (ब) कोणत्या प्रकारच्या शिस्तीची बायबल शिफारस करते?

१३ परंतु शिस्त लावताना पालकांनी दक्ष असावे, असा सल्ला बायबल देते. पालकांनी शासनवेत्राचा कधीही निष्ठुरपणे वापर करू नये. (नीतिसूत्रे २२:१५) कोणतेही मूल क्रूर शिक्षेच्या अधीन कधीही झालेले नाही. बायबलनुसार वागणाऱ्‍या कुटुंबामध्ये शारीरिक हिंसेला कोणतेही स्थान नाही. (स्तोत्र ११:५) त्याचप्रमाणे भावनात्मक हिंसेलाही स्थान नाही—कठोर शब्द, एकसारखी केलेली टीका, झोंबणारे वर्मी लागणारे भाषण यांमुळे मुलाचे मन अगदी खिन्‍न होऊ शकते. (पडताळा नीतिसूत्रे १२:१८.) बायबल अगदी सुज्ञपणे पालकांना बजावते: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न [किंवा, “तुम्ही त्यांना अतिशय निराश कराल,” फिलिप्स्‌] होतील.” (कलस्सैकर ३:२१) निवारणीय शिक्षा देण्याचे, बायबल आर्जवते. अनुवाद ११:१९ मध्ये पालकांना आर्जवण्यात आले आहे की त्यांनी निवान्त क्षणांचा फायदा घेऊन मुलांच्या मनात आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये बिंबवण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या संगोपनाविषयी सुस्पष्ट, वाजवी मार्गदर्शन बायबल काळाप्रमाणे आजही समर्पक आहे.

१४, १५. (अ) सुज्ञ सल्ला देण्याखेरीज बायबल आणखीन काय देते? (ब) वेगवेगळ्या जातींच्या आणि राष्ट्रांच्या लोकांना एकमेकांशी समभावाने वागण्यास बायबलमधील कोणत्या शिकवणुकींमुळे मदत होऊ शकते?

१४ सुज्ञ सल्ला देण्याखेरीज बायबल आणखी काही देते. त्यातील संदेश हृदयाचा ठाव घेतो. इब्री लोकांस ४:१२ म्हणते: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” बायबलच्या चालना देणाऱ्‍या शक्‍तीच्या उदाहरणाचा विचार करा.

१५ आज जातीय, राष्ट्रीय आणि वंशीय भेदभावांमुळे लोक विभाजित झाले आहेत. अशाप्रकारचा मानवनिर्मित दुजाभाव सबंध जगात युद्धांमध्ये असंख्य निरपराध जिवांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे. उलटपक्षी, वेगवेगळ्या जातींच्या आणि राष्ट्रांच्या लोकांना एकमेकांशी समभावाने वागण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन बायबलमध्ये आहे. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये १७:२६ म्हणते, की देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण” केली. त्यातून दिसून येते, की खरे पाहता जगात एकच जात आहे—मानवजात! शिवाय बायबल आपल्याला ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’ असा आग्रह करते, आणि देवाविषयी ते म्हणते: ‘तो पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भिती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.’ (इफिसकर ५:१; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) बायबलमधील शिकवणुकींनुसार जगण्याचा प्राजंळपणे प्रयत्न करणारे लोक या ज्ञानामुळे एक होतात. या ज्ञानाची पोहंच अत्यंत खोलवर—हृदयाच्या गाभाऱ्‍यापर्यंत असल्यामुळे—लोकांना विभाजित करणारे मानवनिर्मित भेदभाव नाहीसे होतात. हे ज्ञान आजच्या जगात खरोखरच उपयोगी आहे का?

१६. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये खरा विश्‍वव्यापी बंधुभाव आहे, हे दाखवणारा अनुभव सांगा.

१६ निश्‍चितच ते उपयोगी आहे! विश्‍वव्यापी बंधुभावासाठी यहोवाचे साक्षीदार प्रसिद्ध आहेत; हा विश्‍वव्यापी बंधुभाव वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींच्या लोकांना एकत्र आणतो अन्यथा हे लोक एकमेकांसोबत शांतीने राहिलेच नसते. उदाहरणार्थ, र्‌वांडामधील वंशीय झगड्यांदरम्यान एका वंशाच्या यहोवाच्या साक्षीदारांनी दुसऱ्‍या वंशातील त्याच्या ख्रिस्ती भाऊ-बहिणींना वाचवले आणि हे करताना त्यांनी स्वतःचा जीव देखील धोक्यात घातला होता. एकदा, एका हुतू साक्षीदाराने त्याच मंडळीत असलेल्या एका कुटुंबातील सहा तुत्सी लोकांना आपल्या घरी लपवले. खेदाची गोष्ट म्हणजे, या तुत्सी कुटुंबाविषयी लोकांना कळले आणि त्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतर या हुतू बांधवावर आणि त्याच्या कुटुंबावर मारेकऱ्‍यांचा राग अनावर झाला आणि परिणामी त्यांना टान्झानियाला पलायन करावे लागले. अशाप्रकारची अनेक उदाहरणे आहेत. बायबल संदेशाच्या शक्‍तीच्या प्रेरणेने हृदयाला स्पर्श केल्यामुळे आपल्यात हा एकोपा निर्माण झाला आहे, असे यहोवाचे साक्षीदार नेहमीच कबूल करतात. द्वेषाने भरलेल्या या जगात बायबल लोकांमध्ये ऐक्य घडवून आणू शकते, ही गोष्ट बायबल देवाकडून असल्याचा मजबूत पुरावा आहे.

खऱ्‍या भविष्यवाणीचे पुस्तक

१७. मानव-निर्मित भाकितांपेक्षा बायबलमधील भविष्यवाण्या कशाप्रकारे वेगळ्या आहेत?

१७ “शास्त्रातील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही,” असे २ पेत्र १:२० म्हणते. बायबल संदेष्ट्यांनी तत्कालिन जगीक घडामोडींच्या झोकांवर नजर ठेवून या विकसनांसंबंधी स्वतःच्या कल्पनेनुसार धूर्तपणे अंदाज बांधले नाहीत. भविष्यातील कोणत्याही घटनेला लागू करता येतील अशाप्रकारची संदिग्ध भाकिते देखील त्यांनी केली नाहीत. उदाहरण म्हणून एका बायबल भविष्यवाणीचा विचार करा; ही भविष्यवाणी विशेष स्पष्ट असून तत्कालिन लोकांनी ज्याप्रकारे विचार केला असेल त्याच्या अगदी विरोधात भाकीत केले.

१८. प्राचीन बाबेलमधील रहिवाशी साहजिकच निश्‍चिंतपणे का जगत होते, परंतु त्या शहराविषयी यशयाने काय भाकीत केले होते?

१८ सा. यु. पू. सातव्या शतकापर्यंत बाबेल शहर बॅबिलोनी साम्राज्याची अभेद्य राजधानी भासू लागले. हे शहर फरात नदीच्या दोन्ही बाजूला वसलेले होते आणि या नदीचे पाणी वापरून एक मोठा, खोल खंदक आणि कालव्यांची एक व्यूहरचना निर्माण करण्यात आली होती. या शहराला भरभक्कम दुहेरी भिंतींच्या रांगांचे संरक्षण लाभले होते आणि या भिंतींवर असलेल्या असंख्य सुरक्षा बुरूजांमुळे त्यात आणखीनच भर पडली होती. या शहरातील रहिवाशी निश्‍चिंतपणे जगत होते. परंतु, सा. यु. पू. आठव्या शतकात, बाबेल आपल्या उत्कर्षाचा कळस गाठण्याच्या मार्गावर असताना, यशया संदेष्ट्याने भाकीत केले: “बाबेल त्याची, सदोम व गमोरा यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी, स्थिती होईल. त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही, पिढ्यान्‌पिढ्या त्यांत कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसविणार नाहीत.” (यशया १३:१९, २०) बाबेलचा केवळ नाशच होणार नाही तर ती कायमची निर्मनुष्य होईल असे या भविष्यवाणीने भाकीत केले, याकडे लक्ष द्या. किती धाडसी पूर्वकथन! बाबेलचा विनाश पाहिल्यानंतर यशयाने ही भविष्यवाणी लिहिली असेल का? इतिहास यास दुजोरा देत नाही!

१९. ऑक्टोबर ५, सा. यु. पू. ५३९ रोजी यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णपणे पूर्णता का झाली नाही?

१९ ऑक्टोबर ५, सा. यु. पू. ५३९ च्या रात्री बलाढ्य कोरेशच्या नेतृत्वाखाली मेद व पारसच्या सैन्यापुढे बाबेल पडले. तथापि, त्यावेळी यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णपणे पूर्णता झाली नाही. कोरेशने बाबेल काबीज केल्यानंतर बाबेलमध्ये कितीतरी शतकांपर्यंत मनुष्यवस्ती होतीच—अर्थात हे बाबेल पूर्वीइतके समृद्ध नव्हते. सा. यु. पू. दुसऱ्‍या शतकाच्या कालखंडात यशयाच्या मृत समुद्र गुंडाळीची नक्कल तयार करण्यात आली आणि त्याच सुमारास पार्थियन लोकांनी बाबेल हस्तगत केले; त्यावेळी बाबेलला भांडार समजण्यात येत असे त्यामुळे आसपासच्या राष्ट्रांमध्ये त्याकरता लढाया होत. यहुदी इतिहासकार जोसीफस याने अहवाल दिल्यानुसार सा. यु. पू. पहिल्या शतकात तेथे ‘मोठ्या संख्येने’ यहुदी राहत होते. द कॅम्बरिज एन्शंट हिस्ट्री यानुसार पालमाइरा व्यापाऱ्‍यांना सा. यु. २४ मध्ये बाबेलमध्ये संपन्‍न व्यापारी वसाहत सापडली. त्याअर्थी, सा. यु. पहिल्या शतकाच्या अखेरपर्यंतही बाबेल पूर्णतः उजाड झालेले नव्हते, पण यशयाचे पुस्तक लिहून बराच काळ लोटला होता.—१ पेत्र ५:१३.

२०. बाबेल शेवटी निव्वळ “नासाडीचा ढिगार” बनले, याचा कोणता पुरावा आहे?

२० निर्मनुष्य झालेले बाबेल यशयाला आपल्या डोळ्यांनी पाहता आले नाही. पण भविष्यवाणी मात्र खरी ठरली, बाबेल शेवटी निव्वळ “नासाडीचा ढिगार” बनले. (यिर्मया ५१:३७) इब्री विद्वान जेरोम (जन्म सा. यु. चौथ्या शतकात) सांगतो की त्याच्या काळापर्यंत बाबेल हे शिकारीचे मैदान झाले होते, जेथे “सर्व प्रकारचे जंगली पशू” भटकायचे आणि आजतागायत बाबेल उजाडच आहे. पर्यटन स्थळ बनवण्याकरता बाबेलचे पुनर्वसन केल्यामुळे कदाचित पर्यटक त्याकडे आकर्षित होतीलही, पण यशयाने भाकीत केल्याप्रमाणे बाबेलचे “पुत्रपौत्र” कायमचे नामशेष झाले आहेत.—यशया १४:२२.

२१. भवितव्याविषयी अचूक भाकीत करणे, विश्‍वासू संदेष्ट्यांना का शक्य झाले?

२१ यशया संदेष्ट्याने निव्वळ धूर्तपणे अंदाज बांधला नाही. केवळ इतिहासाची नक्कल करून आपल्या लिखाणाला भविष्यवाणीचे स्वरूपही त्याने दिले नाही. यशया खरा संदेष्टा होता. म्हणून इतर सर्व विश्‍वासू संदेष्टे देखील त्याच्याप्रमाणे होते. इतरांना करणे शक्य नाही ते—अचूक भवितव्याविषयी भाकीत करणे, या मनुष्यांना का शक्य झाले? उत्तर स्पष्ट आहे. या भविष्यवाणींचा उगम भविष्यवाणीचा देव अर्थात यहोवा होता जो “आरंभीच शेवट कळवितो.”—यशया ४६:१०.

२२. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी बायबलचे स्वतः परीक्षण करावे म्हणून आपण होता होईल तितके का केले पाहिजे?

२२ तर मग, बायबल परीक्षण करण्यास योग्य आहे का? आपल्याला माहीत आहे, की ते योग्य आहे! पण अनेक लोकांना हे पटत नाही. अनेक लोकांनी बायबल वाचले नाही, तरी देखील त्यांच्या मनात त्याविषयी निश्‍चित अशी धारणा आहे. आधीच्या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या प्राध्यापकांना आठवा. ते बायबल अभ्यासाकरता तयार झाले आणि बायबलचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत पोहंचले, की ते देवापासून प्राप्त झालेले पुस्तक आहे. यहोवाचे साक्षीदार म्हणून त्यांचा कालांतराने बाप्तिस्मा झाला आणि आज ते वडील या नात्याने सेवा करत आहेत! प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी बायबलचे परीक्षण करावे आणि त्यानंतरच त्याविषयी आपले मत ठरवावे, असे त्यांना आर्जवण्यासाठी आपल्याला होते तितके आपण करू या. आपल्याला पूर्ण खात्री आहे, की त्यांनी प्रांजळपणे परीक्षण केल्यास त्यांना हे नक्की समजेल, की हे अतुलनीय पुस्तक अर्थात बायबल सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक आहे!

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

◻ बायबलचा उगम मानवाकडून झालेला नाही, हे दाखविण्यासाठी तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राचा कशाप्रकारे उपयोग करू शकता?

◻ आधुनिक जीवनाकरता उपयोगी पडतील अशी बायबलमधील कालनिरपेक्ष तत्त्वे कोणती आहेत?

◻ यशया १३:१९, २० येथील भविष्यवाणी घटना घडल्यानंतर लिहिणे का शक्य नव्हते?

◻ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना काय करण्याचे आपण उत्तेजन दिले पाहिजे आणि का?

[१७ पानांवरील चित्र]

मोशेने आरोग्यविषयक असे नियम लिहिले जे त्याच्या काळाच्या मानाने फार पुढारलेले होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा