सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
“देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३५.
१. आपल्याला बायबलबद्दल काय वाटते, असे एका प्राध्यापकाला विचारल्यानंतर त्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली आणि त्यांनी काय करायचे ठरवले?
रविवार दुपारची वेळ, आज प्राध्यापक घरीच होते आणि आपल्याकडे कोणी येईल, अशी त्यांची मुळीच अपेक्षा नव्हती. पण आपल्या एका ख्रिस्ती बहिणीने त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तिचे ऐकले. प्रदूषणाविषयी आणि पृथ्वीच्या भवितव्याविषयी ती बोलली—या विषयावर चर्चा करण्यास त्यांना आवडले. तथापि, चर्चेमध्ये तिने जेव्हा बायबलचा उल्लेख केला तेव्हा मात्र प्राध्यापकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला बायबलबद्दल काय वाटते, असे तिने त्यांना विचारले.
“काही बुद्धिमान लोकांनी लिहिलेले ते एक चांगले पुस्तक आहे,” त्यांनी उत्तर दिले, “पण त्याचे वाचन काही तेवढ्या गांभिर्याने घेण्यालायक नाहीय.”
“तुम्ही कधी बायबल वाचलेय?” तिने विचारले.
या प्रश्नामुळे जरा चमकून गेलेल्या प्राध्यापकांना आपण ते वाचलेले नाही हे कबूल करावे लागले.
त्यानंतर तिने असे विचारले: “जे पुस्तक तुम्ही वाचलेच नाहीय त्याविषयी तुम्ही एवढ्या खात्रीने कसे काय बोलू शकता?”
आपल्या बहिणीच्या बोलण्यात तथ्य होते. बायबल वाचून मगच त्याविषयी मत बनविण्याचे प्राध्यापकांनी ठरवले.
२, ३. अनेक लोकांकरता बायबल हे बंद पुस्तक का आहे आणि यामुळे आपल्यापुढे कोणती आव्हाने उभी राहतात?
२ अशाप्रकारचे मत केवळ याच प्राध्यापकांचे नाही. अनेक लोकांनी व्यक्तिशः बायबल कधीही वाचलेले नाही, तरीही त्यांची त्याविषयी निश्चित अशी धारणा आहे. त्यांच्याकडे बायबल असेलही. त्याचे साहित्यिक आणि ऐतिहासिक महत्त्व ते कबूल करतीलही. पण अनेकांसाठी ते निव्वळ एक बंद पुस्तक आहे. काही जण म्हणतात, ‘बायबल वाचायला मला वेळच नाही मुळी.’ इतर असा विचार करतात, ‘हे जुनं पुस्तक माझ्या जीवनासाठी समर्पक कसं असू शकेल?’ अशा दृष्टिकोनांमुळे आपल्यासमोर खरोखरच आव्हान उभे राहते. बायबल ‘परमेश्वरप्रेरित असून शिक्षणाकरता उपयोगी आहे,’ असा यहोवाच्या साक्षीदारांचा ठाम विश्वास आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) लोकांची कोणत्याही प्रकारची जातीय, राष्ट्रीय किंवा वंशीय पार्श्वभूमी असली तरी त्यांनी बायबलचे वाचन का केले पाहिजे, हे आपण त्यांना कशा प्रकारे पटवून देऊ शकतो?
३ बायबल परीक्षण करण्याच्या योग्यतेचे का आहे, याच्या काही कारणांची आपण चर्चा करू या. सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांशी तर्क करण्यासाठी अशाप्रकारची चर्चा आपल्याला तयार करील किंबहुना बायबल काय म्हणते ते त्यांनी विचारात घेतले पाहिजे असे त्यांना पटवून देण्यासही यामुळे आपल्याला मदत होईल. तसेच बायबल जे दावा करते, की ते—“देवाचे वचन” आहे यावरील आपला विश्वासही या उजळणीमुळे दृढ होण्यास हवा.—इब्री लोकांस ४:१२.
जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक
४. बायबल हे जगातील सर्वाधिक वितरीत पुस्तक आहे, असे का म्हटले जाऊ शकते?
४ बायबल विचारात घेण्याजोगे आहे याचे एक कारण म्हणजे ते संपूर्ण मानवी इतिहासामध्ये जगातील सर्वात व्यापक प्रमाणावर वितरीत आणि भाषांतरित पुस्तक आहे. पाचशेपेक्षा अधिक वर्षांपूर्वी चल खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रित करण्यात आलेली प्रथमावृत्ती योहॅन्नस गुटेनबेर्क यांच्या मुद्रणालयातून बाहेर पडली. त्यानंतर आजपावेतो बायबलच्या, संपूर्णतः किंवा अंशतः अंदाजे चार अब्ज प्रती मुद्रित करण्यात आल्या आहेत. सन १९९६ पर्यंत अवघे बायबल किंवा त्याचे काही भाग २,१६७ भाषांत आणि पोटभाषांत अनुवादित करण्यात आले आहेत.a मानवी कुटुंबातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबलचा निदान काही भाग तरी उपलब्ध आहे. इतर कोणतेच पुस्तक—धार्मिक अथवा धर्मेत्तर—या आकड्याच्या जवळही येत नाही!
५. बायबल जगव्याप्त प्रमाणातील लोकांना उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा आपण का करण्यास हवी?
५ भाषांच्या संख्यांसंबंधी असलेल्या आकड्यांमुळे बायबल देवाचे वचन आहे, हे सिद्ध होत नाही. तथापि, देवाद्वारे प्रेरित झालेला लिखित अहवाल जगव्याप्त प्रमाणातील लोकांना उपलब्ध व्हावा, अशी आपण निश्चितच अपेक्षा करण्यास हवी. नाहीतरी बायबल स्वतः आपल्याला सांगते, की “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३५) अशाप्रकारे या पुस्तकाने राष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत आणि जातीय व वंशीय मर्यादाही सर केली आहे, पण इतर कोणत्याही पुस्तकाला असे करता आले नाही. खरोखरच, बायबल सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक आहे!
जतन केलेला अतुलनीय अहवाल
६, ७. मूळ लिखाणांपैकी कोणतेही लिखाण अस्तित्वात राहिलेले नाही, यात आश्चर्याचे असे का नाही आणि यामुळे कोणता प्रश्न उपस्थित होतो?
६ बायबल परीक्षण करण्याच्या योग्यतेचे का आहे, याचे आणखी एक कारण आहे. नैसर्गिक आणि मानवी अडचणींतून ते बचावले आहे. जबरदस्त आव्हानांशिवाय त्यास कसे जतन करून ठेवण्यात आले याविषयीचा अहवाल प्राचीन लिखाणांमध्ये खरोखरच अतुलनीय आहे.
७ उपलब्ध पुराव्यावरून असे दिसते की बायबल लेखकांनी आपले शब्द पपायरस (याच नावाच्या इजिप्शियन वनस्पतीपासून बनवलेले) आणि चर्मपत्रे (ही प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवलेली असत) यांवर लिहून ठेवले होते.b (ईयोब ८:११) तथापि, अशाप्रकारच्या लिखित साहित्यांस नैसर्गिक शत्रूंची भीती होती. ऑस्कर पॉरेट हे विद्वान खुलासा करून सांगतात: “या दोन्ही लेखन साधनांना आर्द्रता, बुरशी आणि निरनिराळे कीटक यांचा तितकाच मोठा धोका असतो. खुल्या हवेत किंवा दमट वातावरण असलेल्या ठिकाणी ठेवल्यास कागद किंवा मजबूत चामडेही किती सहज खराब होते याचा तर आपल्यालाही रोजचा अनुभव आहे.” म्हणून यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही, की मूळ लिखाणांपैकी कोणतेही लिखाण अस्तित्वात राहिलेले नाही किंबहुना ही लिखाणे फार पूर्वीच नाहीशी झाली आहेत. मूळ लिखाणांनी नैसर्गिक शत्रूंपुढे हार मानली तर मग बायबल टिकले तरी कसे?
८. शतकांदरम्यान बायबल लिखाणे कशा प्रकारे टिकून राहिली?
८ मूळ लिखाण झाल्यावर काही काळातच हस्तलिखित प्रतिकृती तयार करण्यात येऊ लागल्या. नियमशास्त्राचे आणि पवित्र शास्त्रवचनांच्या इतर भागांची नक्कल करून प्रतिकृती तयार करणे हा प्राचीन इस्राएलात एक पेशाच बनला. उदाहरणार्थ, याजक एज्रा “मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता,” असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. (एज्रा ७:६, ११; पडताळा स्तोत्र ४५:१.) परंतु, तयार करण्यात आलेल्या प्रतिकृती नाशवंत होत्या; त्यामुळे कालांतराने या प्रतिकृतींच्या ऐवजी इतर हस्तलिखित प्रतिकृती तयार करणे भाग पडले. प्रतिकृतींची नक्कल करण्याचे हे काम कितीतरी शतकांपर्यंत चालले. मानव परिपूर्ण नसल्यामुळे नकलनीसांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे बायबलमधील मूळ मजकुरात आमूलाग्र बदल झाला का? पुराव्यानुसार असे घडले नाही!
९. बायबल नकलनीसांची अतिशय दक्षता आणि अचूकता याचे वर्णन मॅसोरेट्सचे उदाहरण कशा प्रकारे करते?
९ हे नकलनीस केवळ पारंगतच नव्हते तर नक्कल करीत असलेल्या शब्दांबद्दल त्यांच्या मनात परम आदर होता. “नकलनीस” यासाठी असलेल्या इब्री शब्दाचा गणना आणि नोंदणीशी संबंध आहे. नकलनीसांच्या कामातील अतिदक्षता आणि अचूकपणाचे उदाहरण म्हणून मॅसोरेट्स यांचेच पाहा; हे सा. यु. सहाव्या आणि दहाव्या शतकांदरम्यानच्या काळातले इब्री शास्त्रवचनांचे नकलनीस होते. थॉमस हार्टवेल हॉर्न या विद्वानांच्या मते “अवघ्या इब्री शास्त्रवचनांत [इब्री] वर्णमालेतील प्रत्येक वर्ण एकूण किती वेळा आढळतो” हे त्यांना अवगत होते. याचा काय अर्थ होतो हे विचारात घ्या! मूळ भागातून एकही वर्ण आपल्या हातून निसटू नये म्हणून हे नकलनीस नक्कल करून लिहिलेले केवळ शब्दच नव्हे, तर वर्ण देखील मोजण्याची खबरदारी घेत असत. एका विद्वानानुसार त्यांना इब्री शास्त्रवचनांतील एकूण ८,१५,१४० पृथ्थक वर्ण मोजावे लागत! अशी परिश्रमपूर्वक खबरदारी घेतल्यामुळे लिखाणाची अचूकता फार मोठ्या प्रमाणावर कायम राहात असे.
१०. इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांवर आधारित असलेली आधुनिक भाषांतरे मूळ बायबल लेखकांनी वापरलेल्या शब्दांचे अत्यंत विश्वासूपणे दर्शन घडवतात, याचा ठोस पुरावा कोणता आहे?
१० इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांवर आधारित असलेली आधुनिक भाषांतरे मूळ बायबल लेखकांनी वापरलेल्या शब्दांचे अत्यंत विश्वासूपणे दर्शन घडवतात असे मानण्यास ठोस कारण आहे. उपलब्ध पुराव्यात सध्या अस्तित्वात असलेल्या हजारो बायबल हस्तलिखित प्रतींचा समावेश आहे—इब्री शास्त्रवचनांच्या संपूर्ण अथवा काही भागांची अंदाजे ६,००० आणि ग्रीक भाषेतील ख्रिस्ती शास्त्रवचनांची सुमारे ५,००० हस्तलिखिते—जी आपल्या दिवसापर्यंत टिकून राहिली आहेत. अस्तित्वात असलेल्या अनेक हस्तलिखितांचे काळजीपूर्वक, तुलनात्मक परीक्षण केल्यामुळे विद्वानांना एखाद्या नकलनीसाच्या चुका शोधण्यास आणि मूळ लिखाण ठरविण्यास शक्य झाले आहे. इब्री शास्त्रवचनांवर विवेचन मांडताना विल्यम एच. ग्रीन हे विद्वान असे लिहू शकले: “प्राचीन काळातले इतर कोणतेही काम इतक्या अचूकपणे पार पाडले नव्हते, असे ठामपणे म्हणता येईल.” ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांवर अशाचप्रकारचा विश्वास दाखवला जाऊ शकतो.
११. पहिले पेत्र १:२४, २५ यानुसार बायबल आपल्या दिवसापर्यंत का टिकून राहिले?
११ मूळ लिखाणांच्या त्यांतील मौल्यवान संदेशासह हस्तप्रती बनविण्यात आल्या नसत्या तर बायबल किती सहजपणे नाहीसे झाले असते! ते टिकून राहिले याचे एकमेव कारण आहे—यहोवा आपल्या वचनाला टिकवून ठेवणारा आणि आपल्या वचनाचा संरक्षक आहे. बायबल स्वतः १ पेत्र १:२४, २५ येथे म्हणते: “सर्व मानवजाति गवतासारखी आहे; आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते; परंतु, प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.”
मानवजातीच्या बोलणाऱ्या जिवंत भाषांत
१२. शतकांदरम्यान पुन्हा नक्कल करून टिकून ठेवण्याखेरीज बायबलला आणखी कोणत्या अडथळ्याला सामोरे जावे लागले?
१२ शतकांदरम्यान पुन्हा नक्कल करून टिकून ठेवण्याचे आव्हान होते; पण बायबलला आणखी एका अडथळ्याला सामोरे जावे लागले—तत्कालिन भाषांत भाषांतर करणे. लोकांच्या हृदयांपर्यंत पोहंचण्यासाठी बायबलला लोकांच्या भाषांत बोलणे अगत्याचे होते. तथापि, बायबलचे—त्याच्या १,१०० पेक्षा अधिक अध्यायांचे आणि ३१,००० पेक्षा अधिक वचनांचे भाषांतर करणे—हे काही साधे काम नाही. तथापि, गत शतकांत कर्तव्यनिष्ठ भाषांतरकारांनी हे आव्हान सोत्साह स्वीकारले किंबहुना असे करत असताना काही वेळा त्यांना अवघड अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.
१३, १४. (अ) रॉबर्ट मॉफट या बायबल भाषांतरकाराला १९ व्या शतकाच्या सुरवातीला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागले? (ब) त्स्वाना लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत लूककृत शुभवर्तमान प्राप्त झाल्यावर त्यांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दाखवली?
१३ उदाहरणार्थ, आफ्रिकेतील भाषांत बायबलचे कसे भाषांतर करण्यात आले याचा विचार करा. आफ्रिकेत १८०० साली, केवळ दहाबारा लिपिबद्ध भाषा होत्या. इतर शेकडो बोली भाषा बोलल्या जात होत्या, पण त्यांना कोणतीही लिपी नव्हती. रॉबर्ट मॉफट या भाषांतरकाराला एका आव्हानाला तोंड द्यावे लागले. वयाच्या २५ व्या वर्षी १८२१ साली, मॉफटने दाक्षिणात्य आफ्रिकेच्या त्स्वाना भाषिकांसाठी एक मिशन स्थापन केले. त्यांची अलिखित भाषा शिकून घेण्यासाठी तो त्या लोकांसोबत मिसळत असे. मॉफटने आपले प्रयत्न चालू ठेवले आणि कोणत्याही वर्णमालेच्या आणि शब्दकोशांच्या मदतीशिवाय कालांतराने त्याने त्या भाषेवर प्रभुत्व मिळवले, त्या भाषेचे लिखित स्वरूप विकसित केले आणि ती लिपी कशी वाचावी हे त्याने काही त्स्वाना लोकांना शिकवले. त्स्वाना लोकांच्या सहवासात आठ वर्षे काम केल्यानंतर १८२९ साली, मॉफटने लूककृत शुभवर्तमानाचे भाषांतर पूर्ण केले. त्याने नंतर असे म्हटले: “सेंट लूकाच्या त्या प्रती मिळवण्यासाठी अक्षरशः शेकडो मैल पार करून आलेल्या लोकांना मी पाहिलेय. . . . आपल्याला मिळालेल्या या सेंट लूकाचे काही भाग छातीशी कवटाळून, कृतज्ञतेनं ढसाढसा रडताना पाहिलेय, इतकं की मला शेवटी कित्येकांना म्हणावं लागलं, ‘इतकं रडलात तर तुमची पुस्तकं ओली होऊन खराब व्हायची.’” मॉफटने असेही सांगितले, की अनेक लोक लूककृत शुभवर्तमान वाचत होते तेव्हा त्यांच्याकडे काय आहे, असे एका आफ्रिकी इसमाने विचारले. “ते देवाचं वचन आहे,” त्यांनी उत्तर दिले. “ते बोलतं का?” त्या इसमाने विचारले. “होय,” त्यांनी उत्तर दिले, “ते हृदयाशी बोलतं.”
१४ मॉफट सारख्याच समर्पित भाषांतरकारांमुळेच अनेक आफ्रिकी लोकांना लेखनाद्वारे दळणवळण करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. परंतु भाषांतरकारांनी आफ्रिकी लोकांना आणखीन मौल्यवान वरदान दिले—त्यांच्या स्वतःच्या भाषेतले बायबल. याशिवाय, मॉफटने त्स्वाना लोकांना ईश्वरी नामाची ओळख करून दिली आणि त्याने त्या नावाचा त्याच्या संपूर्ण भाषांतरामध्ये उपयोग केला.c अशाप्रकारे, “यहोवाचे मुख” या अर्थाने त्स्वाना लोकांनी बायबलला सूचित केले.—स्तोत्र ८३:१८.
१५. बायबल आज इतके जिवंत का आहे?
१५ जगाच्या पाठीवरील इतर भागांमध्येही इतर भाषांतरकारांना अशाचप्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. बायबलचे भाषांतर करण्यासाठी काहींनी तर आपल्या जीवाची देखील पर्वा केली नाही. याविषयी विचार करा: बायबल प्राचीन इब्री आणि ग्रीक भाषेतच राहिले असते तर ते फार पूर्वीच “मेले” असते कारण या भाषांचे कालांतराने लोकांना विस्मरण झाले आणि पृथ्वीवरच्या अनेक भागांत या भाषांविषयी कोणाला माहिती देखील नव्हती. तथापि, बायबल हे जिवंत आहे कारण जगातील सर्व लोकांसोबत ते त्यांच्या भाषांत “बोलू” शकते; परंतु इतर कोणत्याही पुस्तकाला तसे करणे शक्य नाही. परिणामी त्यातील संदेश “विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) या शब्दांना द जेरुसलेम बायबल पुढीलप्रमाणे मांडते: “जे विश्वास करतात त्यांच्यामध्ये हे अद्यापही जिवंत शक्ती आहे.”
भरवसालायक
१६, १७. (अ) बायबल भरवसालायक असण्यासाठी कोणता पुरावा असला पाहिजे? (ब) बायबल लेखक मोशे याचा प्रामाणिकपणा दाखवून देणारे एखादे उदाहरण द्या.
१६ ‘बायबल खरोखरच भरवसालायक आहे का?’ असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. ‘त्यात उल्लेख करण्यात आलेले लोक वास्तविक होते का, त्यातली स्थाने खरोखर अस्तित्वात होती का, शिवाय त्यात वर्णिलेल्या घटना खरोखरच घडल्या होत्या का?’ आपल्याला यावर विश्वास ठेवायचा असल्यास, हे पुस्तक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक लेखकांनी लिहिल्याचा पुरावा असलाच पाहिजे. बायबलचे परीक्षण का करावे, याचे हे आणखी एक कारण आहे: बायबल अचूक आणि भरवसालायक असल्याचा सबळ पुरावा आहे.
१७ प्रामाणिक इतिहासकार केवळ विजयच नव्हे तर पराजय देखील अभिलिखित करतात; ते, केवळ जमेच्या बाजूंवरच प्रकाश टाकत नाहीत तर कमकुवतपणा देखील लोकांपुढे मांडतात. अशाप्रकारचा सुखावणारा प्रामाणिकपणा बायबल लेखकांनी दाखवला. उदाहरणार्थ, मोशेच्या स्पष्टवक्तेपणाचा विचार करा. वक्तृत्वकलेतील आपली कमतरता त्याने मोकळेपणे स्पष्ट केली; यामुळे आपण इस्राएलाचे नेतृत्व करण्यास अपात्र आहोत, असे त्याला वाटत होते. (निर्गम ४:१०); त्याने केलेल्या गंभीर पातकामुळे त्याला वाग्दत्त देशात जाता आले नाही (गणना २०:९-१२; २७:१२-१४); त्याचा भाऊ अहरोन याचे मार्गभ्रष्ट होणे अर्थात बंडखोर इस्राएलांना सोन्याचे वासरू बनवण्यास हातभार लावणे. (निर्गम ३२:१-६); त्याची बहीण मिर्याम हिची बंडखोरी आणि तिला मिळालेली लज्जास्पद शिक्षा (गणना १२:१-३, १०); त्याचे पुतणे नादाब व अबीहू यांचे भ्रष्ट होणे (लेवीय १०:१, २); तसेच देवाच्या स्वतःच्या लोकांनी वारंवार केलेली तक्रार आणि कुरकूर. (निर्गम १४:११, १२; गणना १४:१-१०) अशाप्रकारचा मनमोकळेपणाचा, प्रामाणिक अहवाल दिल्यामुळे सत्याविषयी प्रांजळ आवड असल्याचे दिसून येत नाही का? ज्याअर्थी बायबल लेखकांनी आपल्या नातलगांविषयी, आपल्या लोकांविषयी, एवढेच काय तर स्वतःविषयीच्या नकारात्मक माहितीचे वृत्त देताना मागेपुढे पाहिले नाही त्याअर्थी त्यांच्या लिखाणांवर भरवसा ठेवण्यात तथ्य नाही का?
१८. बायबल लेखकांची लिखाणे भरवसालायक असल्याचे कोणत्या गोष्टीद्वारे मुद्रांकित करण्यात येते?
१८ बायबल लेखकांची सुसंगतता देखील त्यांच्या लिखाणास भरवसालायक असल्याचे मुद्रांकित करते. सुमारे १,६०० वर्षांपेक्षा अधिक कालावधीत ४० लोकांनी केलेल्या बारीकसारीक तपशीलांतही सुसंगतता असणे, ही खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. तथापि, अशाप्रकारची ही सुसंगतता मुद्दामहून घडवून आणण्यात आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटबाजी झाली असावी असा संशय येत नाही. उलटपक्षी, विविध अहवालांतील एकमताच्या पूर्वयोजनेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो, सहसा सुसंगतता ही योगायोगाने आली आहे.
१९. सुसंगतता हेतुपुरस्सर नाही, हे येशूच्या अटक होण्याचा शुभवर्तमानातील अहवाल कसे दाखवून देतात?
१९ हे समजून घेण्यासाठी येशूला अटक करण्यात आलेल्या रात्री जी घटना घडली तिचा विचार करा. चारही शुभवर्तमानाच्या लेखकांनी असा अहवाल दिला, की एका शिष्याने तलवार काढली आणि प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तथापि, केवळ लूक आपल्याला सांगतो, की येशूने “त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.” (लूक २२:५१) “प्रिय वैद्य” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखकाकडून आपण नेमकी हीच अपेक्षा करू नये का? (कलस्सैकर ४:१४) केवळ योहानाचा अहवाल दाखवतो, की तेथे असलेल्या शिष्यांपैकी तलवार चालवणारा पेत्र होता—खरे तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते कारण पेत्राचा स्वभाव अविचारी आणि उतावीळ होता. (योहान १८:१०; पडताळा मत्तय १६:२२, २३ आणि योहान २१:७, ८.) योहान अनावश्यक भासणाऱ्या तपशीलाचा अहवाल देतो: “त्या दासाचे नाव मल्ख होते.” एकट्या योहानानेच त्या माणसाच्या नावाचा उल्लेख का करावा बरे? याचे उत्तर योहानाच्या अहवालात संक्षिप्तरीत्या सहजासहज देण्यात आले आहे—योहान हा “प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता.” तो प्रमुख याजकाच्या सबंध घराण्याच्याही ओळखीचा होता; याजकाचे दास त्याच्या परिचयाचे होते आणि तो त्यांच्या परिचयाचा होता.d (योहान १८:१०, १५, १६) अशा परिस्थितीत योहानाने त्या दुखापत झालेल्या माणसाचा नावाने उल्लेख करावा हे स्वाभाविकच होते; पण अर्थातच इतर शुभवर्तमान लेखकांनी तो माणूस अनोळखी असल्यामुळे तसे केले नाही. या सर्व तपशीलांतील सुसंगतता उल्लेखनीय तर आहेच, शिवाय ती हेतुपुरस्सर नाही. संपूर्ण बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत.
२०. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना बायबलविषयी काय जाणून घेण्याची गरज आहे?
२० तर मग, बायबल भरवसालायक आहे का? निश्चितच! बायबल लेखकांचा अशाप्रकारचा प्रामाणिकपणा आणि बायबलच्या लिखाणांमध्ये आढळणारी अंतर्गत सुसंगतता खरी असल्याचे लगेच लक्षात येते. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना हे जाणून घेण्याची गरज आहे, की ते बायबलवर भरवसा ठेवू शकतात कारण ते ‘सत्यस्वरूप देवाचे’ प्रेरित वचन आहे. (स्तोत्र ३१:५) बायबल सर्व लोकांसाठी असणारे पुस्तक का आहे, याची आणखी कारणे आहेत, पुढील लेखात त्यांची चर्चा करण्यात येईल.
[तळटीपा]
a युनायटेड बायबल सोसायटीज तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीवर आधारित.
b रोममधील आपल्या दुसऱ्या तुरुंगवासाच्या दरम्यान पौलाने तीमथ्याला “पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेहि” आणण्यास सांगितले. (२ तीमथ्य ४:१३) आपल्याला तुरुंगात अभ्यास करता यावा म्हणून पौल कदाचित इब्री शास्त्रवचनांचे भाग मागवत असावा. “विशेषेकरून चर्मपत्रेहि” हा वाक्यांश पपायरसाच्या गुंडाळ्यांना आणि चर्मपत्रांना सूचित करू शकतो.
c सन १८३८ मध्ये मॉफटने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर पूर्ण केले. १८५७ मध्ये एका सहकाऱ्याच्या मदतीने त्याने इब्री शास्त्रवचनांचे भाषांतर पूर्ण केले.
d प्रमुख याजक आणि त्याच्या घराण्यासोबतचा योहानाचा परिचय त्या अहवालात नंतर दाखवण्यात आला आहे. या प्रमुख याजकाच्या दुसऱ्या एका दासाने पेत्रावर येशूचा शिष्य असल्याचा आरोप केला तेव्हा योहान सांगतो की हा दास “ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग” होता.—योहान १८:२६.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ बायबल जगव्याप्त प्रमाणात उपलब्ध असणारे पुस्तक असावे, अशी अपेक्षा आपण का करण्यास हवी?
◻ बायबल अचूकपणे टिकून राहिले आहे, याचा कोणता पुरावा आहे?
◻ बायबलच्या भाषांतरकारांनी कोणत्या अडथळ्यांना तोंड दिले?
◻ बायबल लिखाणे भरवसालायक आहेत, हे कोणत्या गोष्टीमुळे मुद्रांकित होते?