वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१ पृ. ३-५
  • कुटुंब—एक इमर्जन्सी केस!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुटुंब—एक इमर्जन्सी केस!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणता धोका आहे?
  • एक-पालकीय घराण्यात वाढ
  • प्रेमहीन विवाहात अडकलेले
    सावध राहा!—२००१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१ पृ. ३-५

कुटुंब—एक इमर्जन्सी केस!

“आणि त्यानंतर ते सुखाने नांदू लागले.” अशा कथाकहाणींचा ज्याप्रमाणे शेवट होतो, त्याप्रमाणे फारच कमी विवाहांच्याबाबतीत होत आहे. जीवनाच्या ‘उतारचढावात’ आम्ही दोघेही एकत्र राहू तोपर्यंत प्रेम करू हे विवाहातील अभिवचन, फक्‍त बोलणंच राहतं. सुखी कुटुंबाची शक्यता एका जुगारासारखी वाटते ज्यात हारण्याची अधिक शक्यता असते.

सन १९६० व १९९० दरम्यान, बहुतेक पाश्‍चिमात्य उद्योगप्रधान राष्ट्रांत घटस्फोटाचे प्रमाण दुप्पटीने वाढले. काही राष्ट्रांत तर ते चौपट झाले. उदाहरणार्थ, स्वीडनमध्ये दर वर्षी सुमारे ३५,००० विवाह होतात आणि त्यांच्यातील अर्धे मोडकळीस येतील ज्यात ४५,००० मुलांचा समावेश असेल. विवाहाविना एकत्र राहणारी जोडपी तर ह्‍याहूनही अधिक प्रमाणावर विभक्‍त होतात ज्याचा आणखी हजारोहजार मुलांवर परिणाम होतो. हीच प्रवृत्ती जगाच्या पाठीवरील इतर राष्ट्रांतही दिसून येते; पृष्ठ ५ वरील चौकानात तुम्हाला ते पाहावयास मिळेल.

खरेच, मोडलेली कुटुंबे व विवाहांचा शेवट इतिहासातील नवीन गोष्टी नव्हेत. बॅबिलोनियामध्ये सा.यु.पू. १८ व्या शतकाच्या हामुराबीच्या विधिसंहितेत घटस्फोटास परवानगी देणारे नियम होते. इस्राएलमध्ये सा.यु.पू. १६ व्या शतकात स्थापिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रानेही घटस्फोटास अनुमती दिली. (अनुवाद २४:१) परंतु, तेव्हापेक्षा आज या २० व्या शतकात कौटुंबिक बंधने अशक्‍त बनली आहेत. एक दशकांपेक्षा अधिक काळाआधी एका वृत्तपत्र स्तंभलेखकाने असे लिहिले: “आजपासून पन्‍नास वर्षांनी, पारंपरिक अर्थाची कुटुंबे राहणार नाहीत. त्याऐवजी विविध प्रकारचे समूह असतील.” आणि तेव्हापासून आजपर्यंतची प्रवृत्ती त्याच्या म्हणण्याला पुष्टी देते. कुटुंब संस्थेचा ऱ्‍हास इतका जलद होत आहे की, “त्याचा बचाव होईल का?” हा प्रश्‍न प्रसंगोचित बनत चालला आहे.

एकमेकांशी जडून राहून संयुक्‍त कुटुंब टिकवणे आज इतक्या जोडप्यांना कठीण का जात आहे बरे? आपल्या सिल्वर आणि गोल्डन वेडींग ॲनिव्हर्सरी आनंदाने साजरा करणारी जोडपी दीर्घकाळ एकमेकांबरोबर राहू शकले त्याचे रहस्य काय असावे? माहीत आहे, अझरबयजानच्या भूतपूर्व सोव्हियत प्रजासत्ताक येथील एका जोडप्याने १२६ आणि ११६ या वयात १९८३ मध्ये त्यांच्या विवाहाची १०० वी ॲनीव्हर्सरी साजरी केली!

कोणता धोका आहे?

अनेक राष्ट्रांत, व्यभिचार, मानसिक किंवा शारीरिक छळ, फारकत, दारूबाजी, नपुंसकता, वेडेपणा, द्विविवाह आणि अंमली पदार्थांचे व्यसन, ही कायदेशीर घटस्फोटाची काही कारणे आहेत. परंतु, एक सामान्य कारण, विवाहाप्रती आवश्‍यक मनोवृत्ती आणि पारंपरिक कौटुंबिक जीवन यांत खासकरून अलीकडच्या दशकांत आमूलाग्र बदल झाले आहेत. एकेकाळी पवित्र म्हणून मानल्या जाणाऱ्‍या विवाह व्यवस्थेविषयीचा आदर आता नाहीसा झाला आहे. संगीत, चलचित्रपट, टीव्ही सोप ऑपेरा आणि प्रसिद्ध साहित्य यांच्या स्वार्थी निर्मात्यांनी समागम स्वातंत्र्य, अनैतिकता, स्वैरवर्तन आणि स्व-केंद्रित जीवनशैली, यांची फारच स्तुती केली आहे. त्यांनी अशी एक संस्कृती वाढवली आहे जिने तरुण आणि वृद्ध दोघांची मने व अंतःकरणे भ्रष्ट केली आहेत.

सन १९९६ मधील एका सर्वेक्षणातून असे दिसून आले, की विवाहबाह्‍य संबंध कधीकधी विवाहासाठी चांगला असू शकतो, असे २२ टक्के अमेरिकन लोकांचे म्हणणे आहे. स्वीडनमध्ये सर्वात मोठ्या बातमीपत्रापैकी एक, ॲफटोनब्लाडेटच्या एका खास अंकाने स्त्रियांना घटस्फोट घेण्याची गळ घातली. का तर म्हणे, “त्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल.” काही पॉप मानसशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ यांचा अंदाज आहे, की उत्क्रांतीने मानवाला अशारीतीने ‘प्रोग्रॅम’ केले आहे, की तो दर काही वर्षांनी आपला जोडीदार बदलू शकतो. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, विवाहबाह्‍य संबंध आणि घटस्फोट हे स्वाभाविक आहे असे ते सुचवत आहेत. पालकांचा घटस्फोट मुलांसाठी चांगला असू शकतो, एक ना एक दिवस त्यांनाही मग आपल्या घटस्फोटाला तोंड देता येईल असेही काही जण म्हणतात!

अनेक तरुणांना, आईवडील आणि मुलं असलेलं पारंपरिक कौटुंबिक जीवन नकोय. “एकाच जोडीदाराबरोबर अख्खे जीवन जगायचं, अरे बापरे, मला तर कल्पनासुद्धा करवत नाही,” हा दृष्टिकोन सर्वत्र आहे. “विवाह नाताळासारखा आहे, केवळ एक कहाणी आहे. मी विश्‍वास करूच शकत नाही,” असे एका १८ वर्षीय डॅनिश मुलाने म्हटले. आयर्लंडमधील राष्ट्रीय स्त्रियांच्या मंडळाची नोरीन बर्न म्हणते, “[पुरुषां]बरोबर राहून त्यांचे मोजे धुवा, हे कुणी सांगितलयं?, असा समज झाला आहे. बंधनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यांच्याबरोबर मजा करा. . . . जगण्याकरता त्यांना पुरुषांची गरज नाही असं आता पुष्कळ स्त्रियांचं ठाम मत झालंय.”

एक-पालकीय घराण्यात वाढ

या मनोवृत्तीमुळे युरोपभर एकट्या मातांची वाढ झाली आहे. यांतील काही माता किशोरवयीन आहेत; अयोजित गर्भधारणा ही काही चूक नाही असे त्यांना वाटते. काही स्त्रियांची आपल्या मुलांना एकट्यानेच वाढवण्याची इच्छा आहे. बहुतेक माता, त्यांना होणाऱ्‍या बाळाच्या बापाबरोबर राहतात; लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन नसतो. गेल्या वर्षी, न्यूजवीक नियतकालिकाने मुखपृष्ठावरच “विवाहाचा मृत्यू?” या प्रश्‍नावर एक लेख छापला. विवाहबाह्‍य संबंधांतून झालेल्या मुलांचे प्रमाण युरोपमध्ये वाढतच चालले आहे आणि कोणाला याची पर्वा देखील नाही असे दिसते. स्वीडन प्रथम क्रमांकावर असेल, तेथे जन्मलेल्या मुलांपैकी अर्धी तरी अविवाहित पालकांची असतील. डेन्मार्क आणि नॉर्वे यांचा नंबर यानंतर लागतो आणि फ्रान्स व इंग्लंडमध्ये ३ पैकी १ मूल अविवाहित पालकांना झालेले असते.

संयुक्‍त संस्थानांत, गेल्या काही दशकांत दोन पालकीय कुटुंबांतही नाट्यमय घट होत चालली आहे. एका अहवालानुसार: “सन १९६० मध्ये, . . . सर्व ९ टक्के मुले एक पालकीय घरांत राहत होते. सन १९९० पर्यंत, ती संख्या २५ टक्के इतकी वाढली. आज, २७.१ टक्के सर्व अमेरिकी मुले एक पालकीय घरांत जन्म घेतात, ही संख्या वाढण्याच्या मार्गावर आहे. . . . १९७० पासून एक पालकीय कुटुंबांची संख्या दुप्पट पेक्षा अधिक झाली आहे. पारंपरिक कुटुंब इतके धोक्यात आहे की ते नामशेष होण्याच्या कड्यावर उभे आहे, असे काही संशोधक म्हणतात.”

ज्या राष्ट्रांत रोमन कॅथलिक चर्चने आपला नैतिक अधिकार गमावला आहे तेथे, एक पालकीय कुटुंबे वाढत चालली आहेत. अर्ध्यापेक्षा कमी इटालियन घरांत आई, वडील आणि मुले असतात व पारंपरिक कुटुंबाची जागा, संततिहीन जोडपी, एक पालकीय घराणी, यांनी घेतली आहे.

काही राष्ट्रांत तर कल्याण व्यवस्था अक्षरशः लोकांना, तुम्ही विवाह करू नका असे प्रोत्साहन देत आहेत. एकट्या मातांनी विवाह केला तर त्यांना मिळणारे सार्वजनिक साहाय्य त्या गमावतील. डेन्मार्कमधील एकट्या मातांना मुलांच्या काळजीसाठी जादा अर्थसाहाय्य मिळते आणि काही समाजात तर १८ वयाखालील मातांना जादा पैसे मिळतात व त्यांच्या घराचं भाडं भरलं जातं. अशाप्रकारे पैसा खर्च केला जातो. ऑल्फ बी. स्वेन्सोन दावा करतात, की स्वीडनमध्ये एका घटस्फोटामागे करदात्यांना अर्थसाहाय्य, घर भत्ता आणि सामाजिक साहाय्य यांत २.५ लाख ते ३.७५ लाख डॉलर्स इतका खर्च करावा लागतो.

कुटुंबांतील ही विनाशकारी प्रवृत्ती बदलवण्यासाठी ख्रिस्ती धर्मजगताचे चर्चेस फारच कमी किंवा काहीच प्रयत्न करीत नाहीत असे दिसते. अनेक पाद्री आणि पाळक स्वतःच त्यांच्या कौटुंबिक समस्यांशी झगडत असल्यामुळे कोणत्या तोंडाने ते इतरांना साहाय्य करतील असे त्यांना वाटत आहे. असे दिसते, की काही तर घटस्फोटाला समर्थन देत आहेत. इंग्लंड, ब्रॅडफोर्ड येथील स्टीवन ॲलेन या पाळकाने एक खास घटस्फोट विधी तयार केला जो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व ब्रिटिश चर्चेसमध्ये अधिकृत घटस्फोट सेवा, असा मानला जावा असे एप्रिल १५, १९९६ च्या ॲफटोनब्लाडेटने अहवाल दिला. “ही बरे करणारी सेवा आहे, त्यांच्या बाबतीत जे घडले आहे ते त्यांनी स्वीकारून त्यानुसार आपल्या जीवनात तडजोडी कराव्यात म्हणून त्यांना साहाय्य करणारी सेवा आहे. ही सेवा, देव अजूनही त्यांच्यावर प्रेम करतो व त्यांना झालेल्या दुःखातून त्यांची सुटका करतो याची त्यांना जाणीव करून देते.”

तर मग, कुटुंबसंस्था कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे? त्याच्या बचावाची काही आशा आहे का? इतक्या प्रचंड धोक्यात राहून प्रत्येक कुटुंब त्यांच्यातील ऐक्य टिकवून ठेवू शकतील का? कृपया पुढील लेख वाचा.

[५ पानांवरील तक्‍ता]

काही देशांत वार्षिक विवाहांची घटस्फोटाबरोबर केलेली तुलना

देश वर्ष विवाह घटस्फोट

ऑस्ट्रेलिया १९९३ १,१३,२५५ ४८,३२४

कॅनडा १९९२ १,६४,५७३ ७७,०३१

क्यूबा १९९२ १,९१,८३७ ६३,४३२

झेक प्रजासत्ताक १९९३ ६६,०३३ ३०,२२७

डेन्मार्क १९९३ ३१,५०७ १२,९९१

एस्टोनिया १९९३ ७,७४५ ५,७५७

फ्रान्स १९९१ २,८०,१७५ १,०८,०८६

जर्मनी १९९३ ४,४२,६०५ १,५६,४२५

जपान ११९३ ७,९२,६५८ १,८८,२९७

मालदीव १९९१ ४,०६५ २,६५९

नॉर्वे १९९३ १९,४६४ १०,९४३

प्वेर्त रिको १९९२ ३४,२२२ १४,२२७

रशियन फेडरेशन १९९३ ११,०६,७२३ ६,६३,२८२

स्वीडन १९९३ ३४,००५ २१,६७३

संयुक्‍त राज्य १९९२ ३,५६,०१३ १,७४,७१७

संयुक्‍त संस्थाने १९९३ २३,३४,००० ११,८७,०००

(१९९४ लोकसंख्याशास्त्र वार्षिक पुस्तक, संयुक्‍त राष्ट्रे, न्यूयॉर्क १९९६ वर आधारित)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा