वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१ पृ. १४-१९
  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उभारणीकारक सभा
  • चांगली तयारी करा
  • देवाच्या वचनातील उदाहरणे
  • सर्वोत्तम उदाहरण
  • आजच्या काळातील उदाहरणे
  • पवित्र सभांविषयी आदर दाखवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१ पृ. १४-१९

ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे

‘आपले एकत्र मिळणे न सोडता, प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे आपण एकमेकांकडे लक्ष देऊ.’—इब्री लोकांस १०:२४, २५.

१, २. (अ) खऱ्‍या ख्रिश्‍चनांसोबत कोणत्याही सभेला उपस्थित राहणे हा एक मोलाचा हक्क आहे असे का म्हणता येईल? (ब) आपल्या अनुयायांच्या सभांमध्ये येशू कोणत्या अर्थाने उपस्थित असतो?

कोणत्याही ख्रिस्ती सभेला उपस्थित असणे हा आपल्याला लाभलेला किती मोलाचा हक्क आहे, मग त्या सभेत दहापेक्षाही कमी किंवा हजारो यहोवाचे उपासक असोत; कारण येशूने म्हटले होते: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे”! (मत्तय १८:२०) हे अभिवचन येशूने दिले तेव्हा तो मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांनी न्यायसंबंधी बाबींना योग्यपणे कसे हाताळावे याविषयी बोलत होता, हे कबूल आहे. (मत्तय १८:१५-१९) पण तरीसुद्धा येशूच्या शब्दांतील मुख्य मुद्दा, त्याच्याच नावाने प्रार्थना करून सुरू होणाऱ्‍या व संपणाऱ्‍या सर्वच ख्रिस्ती सभांना लागू करता येणार नाही का? निश्‍चितच. आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याचे कार्य सोपवताना येशूने त्यांना दिलेले अभिवचन लक्षात घ्या: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:२०.

२ ख्रिस्ती मंडळीचे मस्तक, अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या विश्‍वासू अनुयायांच्या सर्व सभांविषयी मोठे स्वारस्य बाळगून आहे यात शंकाच नाही. शिवाय, आपण याचीही खात्री बाळगू शकतो की तो देवाच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने त्यांच्यासोबत या सभांमध्ये उपस्थित असतो. (प्रेषितांची कृत्ये २:३३; प्रकटीकरण ५:६) सभांमध्ये आपल्या एकत्र येण्यात यहोवा देवाला देखील स्वारस्य आहे. या सभांचा प्रमुख उद्देशच हा आहे, की “जनसभांत” परमेश्‍वराची स्तुती केली जावी. (स्तोत्र २६:१२) मंडळीच्या सभांमध्ये आपले उपस्थित राहणे हा देवाबद्दल आपल्याला असलेल्या प्रेमाचा एक पुरावा आहे.

३. आपण ख्रिस्ती सभांविषयी कदर बाळगतो यामागे कोणती महत्त्वाची कारणे आहेत?

३ ख्रिस्ती सभांविषयी आपण कदर बाळगण्याची आणखीही समर्पक कारणे आहेत. पृथ्वीवरून जाण्याआधी येशू ख्रिस्ताने आपल्या अभिषिक्‍त शिष्यांना विश्‍वास ठेवणाऱ्‍या घराण्याला वेळोवेळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हणून नेमले. (मत्तय २४:४५) हे आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याचे प्रमुख माध्यम म्हणजे मंडळीच्या सभा तसेच—संमेलने आणि अधिवेशने यांसारख्या मोठ्या सभा. ज्या कोणाला या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतातून बचावून देवाच्या नीतिमान नव्या जगात जीवन प्राप्त करायचे आहे अशा सर्वांकरता महत्त्वाचे ज्ञान पुरवण्याकरता स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या या विश्‍वासू दासाला मार्गदर्शन देतो.

४. बायबल कोणत्या एका धोकेदायक ‘चालीविषयी’ उल्लेख करते, आणि तिच्यापासून दूर राहण्याकरता आपल्याला काय सहायक ठरेल?

४ असे असल्यामुळे, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने प्रेषित पौलाने उल्लेख केलेल्या एका धोकेदायक चालीप्रमाणे वागता कामा नये, प्रेषित पौलाने लिहिले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा मोलाचा हक्क आणि त्याकरवी मिळणाऱ्‍या फायद्यांविषयी चिंतन करणे, या गोष्टी सभांना निष्ठापूर्वक आणि मनःपूर्वक पाठबळ देण्याकरता आपल्याला सहायक ठरतील.

उभारणीकारक सभा

५. (अ) आपण जे बोलतो त्याचा सभांमध्ये कसा परिणाम व्हावा? (ब) आस्थेवाईक लोकांना सभांना येण्याचे आमंत्रण देण्यास आपण उशीर का लावू नये?

५ आपल्या ख्रिस्ती सभांमध्ये यहोवाचा पवित्र आत्मा असावा अशी ज्याअर्थी ख्रिस्तीजन प्रार्थना करतात, त्याअर्थी उपस्थितांपैकी प्रत्येकाने आत्म्याच्या अनुरूप कार्य करण्याचा, आणि ‘देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न न करण्याचा’ सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. (इफिसकर ४:३०) प्रेषित पौलाने हे देवप्रेरित शब्द लिहिले तेव्हा तो योग्य भाषणाविषयी चर्चा करत होता. आपण जे बोलतो ते नेहमीच, “गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता” उपयोगी पडावे; “ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९) विशेषतः ख्रिस्ती सभांमध्ये. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात, सभा उभारणीकारक, बोधप्रद आणि प्रेरणादायी असणे किती महत्त्वाचे आहे यावर पौलाने जोर दिला. (१ करिंथकर १४:५, १२, १९, २६, ३१) या सभांमधून सर्वच उपस्थितांना, अर्थात नवीन लोकांनाही फायदा होतो. कदाचित ते खात्रीने म्हणू शकतील: “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे.” (१ करिंथकर १४:२५) म्हणूनच, आपण आस्था दाखवणाऱ्‍यांना आपल्या सभांमध्ये उपस्थित होण्याचे आमंत्रण द्यायला दिरंगाई करू नये, कारण सभांमुळे त्यांची आणखी वेगाने आध्यात्मिक प्रगती होईल.

६. सभा उभारणीकारक होण्यास हातभार लावणाऱ्‍या कोणत्या काही गोष्टी आहेत?

६ ख्रिस्ती सभेत ज्या कोणाला भाषण, मुलाखत किंवा प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी नेमण्यात आले असेल, त्या सर्वांनी याची काळजी घ्यावी की आपले शब्द प्रोत्साहन देणारे आणि देवाच्या लिखित वचनाच्या, अर्थात बायबलच्या एकवाक्यतेत असावेत. आपण बोलतो ते शब्द अचूक असण्यासोबतच, आपण अभिव्यक्‍त करतो त्या भावभावना देखील देवाच्या आणि ख्रिस्ताच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वांना साजेशा असाव्यात. सभेच्या कार्यक्रमातील भाग सादर करणाऱ्‍या सर्वांनी जर आनंद, सहनशीलता, विश्‍वासूपणा यांसारखी ‘आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारी फळे’ जाणीवपूर्वक प्रदर्शित केली, तर सर्व उपस्थितांना नक्कीच उभारी येईल.—गलतीकर ५:२२, २३.

७. सभा उभारणीकारक व्हावी म्हणून उपस्थित असणारे सर्वजण कशाप्रकारे हातभार लावू शकतात?

७ मंडळीच्या सभांतील कार्यक्रमात भाग सादर करण्याची जबाबदारी मोजक्याच लोकांवर असली तरीसुद्धा सभा उभारणीकारक ठरावी म्हणून सर्वच जण हातभार लावू शकतात. प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरता पुष्कळ वेळा श्रोत्यांनाही संधी असते. खरे तर आपला विश्‍वास जाहीर करण्याच्या या संधी असतात. (रोमकर १०:९) पण आपल्या वैयक्‍तिक कल्पना पुढे आणण्याकरता, स्वतःच्या सफलतांची शेखी मिरवण्याकरता किंवा एखाद्या सहविश्‍वासू बांधवाची टीका करण्याकरता या संधींचा कधीही गैरफायदा घेतला जाऊ नये. असे केल्यामुळे देवाचा आत्मा खिन्‍न होणार नाही का? सहविश्‍वासू बांधवांसोबत झालेले मतभेद प्रेमळपणे, खासगीतच सोडवणे उत्तम. बायबल म्हणते: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिसकर ४:३२) हा सल्ला कृतीत आणण्याकरता ख्रिस्ती सभांमध्ये किती उत्तम संधी मिळते! म्हणूनच तर, बरेच जण सभांना लवकर येतात आणि सभा संपल्यावरही कितीतरी वेळ मुद्दामहून सभागृहातच थांबतात. यामुळे नव्या लोकांना देखील मदत होते; तुम्ही परके नसून, आमच्यातलेच आहात अशी जाणीव करून देण्याची गरज इतरांपेक्षा या नव्या लोकांच्या बाबतीत अधिक असते. अशारितीने, ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊन’ सभांना आणखी उभारणीकारक बनविण्यात सर्वच समर्पित ख्रिस्ती लोकांनी सहभागी व्हावयास हवे.

चांगली तयारी करा

८. (अ) सभांना उपस्थित राहण्याकरता काहीजण कोणते प्रशंसास्पद त्याग करतात? (ब) मेंढपाळ या नात्याने यहोवा कोणता आदर्श घालून देतो?

८ ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे काहींना फारसे जड जात नसले तरीसुद्धा, काहींना याकरता सतत कितीतरी त्याग करावे लागतात. उदाहरणार्थ, कुटुंबाच्या गरजा भागवण्याकरता नोकरी करणारी एखादी ख्रिस्ती आई कामावरून सहसा थकूनभागून घरी परत येते. मग तिला स्वयंपाक, आणि शिवाय सभेला जाण्याकरता मुलांनाही तयार करावे लागत असेल. इतर ख्रिश्‍चनांना सभांकरता लांबचा प्रवास करून जावे लागत असेल किंवा काहींना अपंगत्वामुळे किंवा वृद्धत्वामुळे कदाचित सभांना जाणे कठीण जात असेल. हे सारे असूनही विश्‍वासूपणे सभेला येणाऱ्‍याच्या परिस्थितीची यहोवा देवाला निश्‍चितच जाणीव आहे, तशीच, जशी एका प्रेमळ मेंढपाळाला आपल्या कळपातल्या प्रत्येक मेंढराच्या खास गरजांची जाणीव असते. बायबल म्हणते, “मेंढपाळासारखा [यहोवा] आपला कळप चारील. तो आपल्या हाताने कोकरे एकवटील आणि ती आपल्या उराशी धरून वाहील, व ज्यांना तान्ही पिल्ले आहेत त्यांना तो जपून नेईल.”—यशया ४०:११, पं.र.भा.

९, १०. आपण सभांचा पुरेपूर लाभ कसा मिळवू शकतो?

९ नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याकरता ज्यांना बरेच त्याग करावे लागतात, अशांना सभांमध्ये विचारात घेतले जाणार असलेल्या विषयांची तयारी करण्यासाठी कदाचित मर्यादितच वेळ मिळत असेल. बायबल वाचनाकरता दर आठवड्यासाठी नेमलेले भाग नियमाने वाचून आल्यामुळे ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतून आणखी फायदा मिळतो. तसेच, टेहळणी बुरूज अभ्यास आणि मंडळीचा पुस्तक अभ्यास यांसारख्या इतर सभांचीही आधीच तयारी करून येण्यामुळे या सभा आणखीन लाभदायक ठरतात. ज्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमुळे वेळ मिळेनासा होतो, अशांनी देखील जर अभ्यासाचा भाग आधीच वाचून त्यातील उद्धृत केलेल्या निदान काही बायबल वचनांवर विचार केला तर या महत्त्वपूर्ण बायबल चर्चांमध्ये अर्थपूर्ण सहभाग घेण्याची त्यांची उत्सुकता वाढेल.

१० ज्यांच्यावर वेळेचे इतके बंधन नाही अशा इतरजणांना सभेची तयारी करण्यासाठी अधिक वेळ देता येईल. उदाहरणार्थ, ज्या वचनांचा केवळ उल्लेख केलेला आहे, अवतरण दिलेले नाही अशा वचनांवर ते संशोधन करू शकतात. अशाप्रकारे सर्वजण सभांचा पुरेपूर लाभ करून घेऊ शकतील आणि आपल्या भाषणांतून आणि उत्तरांतून मंडळीची उभारणी करण्यात चांगला सहभाग घेऊ शकतील. चांगली तयारी करून येण्याद्वारे, वडील आणि सेवा-सेवक थोडक्यात, मुद्देसूद उत्तरे देण्याचा इतरांपुढे एक चांगला आदर्श घालून देतील. यहोवाच्या तरतुदींबद्दल आदर बाळगून, उपस्थित असलेले सर्वजण, सभा सुरू असताना दुसऱ्‍यांचे लक्ष विचलित होईल असे काहीही करण्याचे टाळतील.—१ पेत्र ५:३.

११. सभांसाठी तयारी करण्याकरता आत्मनियंत्रणाची आवश्‍यकता का असते?

११ आपल्या आध्यात्मिक आरोग्याकरता आवश्‍यक नसणारी कामे आणि करमणुकी आपला बराच वेळ खाऊ शकतात. असे असल्यास, आपण स्वतःचे परीक्षण करून वेळ खर्च करण्याच्या बाबतीत “अविचारीपणाने वागू” नये. (इफिसकर ५:१७, सुबोध भाषांतर) वैयक्‍तिक बायबल अभ्यास आणि सभांची पूर्वतयारी, तसेच राज्य सेवा यांकरता जास्त वेळ देता यावा म्हणून, कमी महत्त्वाच्या गोष्टींत तो वाया घालवण्याऐवजी ‘वेळेचा सदुपयोग करण्याचे’ आपले ध्येय असावे. (इफिसकर ५:१६) अर्थात, हे नेहमीच म्हणावे तितके सोपे नसते, आणि त्यासाठी आत्मनियंत्रण असणेही आवश्‍यक आहे. जे तरुण लोक याकडे लक्ष देतात ते भविष्यात प्रगती करण्यासाठी एक चांगली पूर्वतयारी करीत आहेत. पौलाने आपला तरुण साथीदार तीमथ्य याला लिहिले: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा [पौलाने तीमथ्याला केलेल्या उपदेशाचा] अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.”—१ तीमथ्य ४:१५.

देवाच्या वचनातील उदाहरणे

१२. शमुवेलाच्या कुटुंबाने कोणता उत्तम आदर्श घालून दिला?

१२ शमुवेलाच्या कुटुंबाने मांडलेले उत्तम उदाहरण विचारात घ्या; देवाचा निवासमंडप शिलो येथे असताना इतर सहउपासकांसोबत एकत्र येण्याच्या ज्या काही व्यवस्था होत्या, त्यांत ते नियमितपणे सहभाग घेत असत. या वार्षिक सणांना जाण्याची आज्ञा खरे तर केवळ पुरुषांसाठीच होती. पण शमुवेलाचा पिता एलकाना हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन “दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्‍वर याची आराधना करण्यास व होमबलि अर्पिण्यास शिलो येथे जात असे.” (१ शमुवेल १:३-५) शमुवेलाचे मूळ गाव, रामाथाईम-सोफीम हे समुद्रतटाजवळ, “एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील” पायथ्याशी, आता रॅन्टीस म्हटले जाते त्या ठिकाणी होते असा अंदाज आहे. (१ शमुवेल १:१) त्याअर्थी शिलोपर्यंतचा प्रवास जवळजवळ ३० किलोमीटरचा असावा; त्याकाळात चांगलाच थकवा आणणारा प्रवास. पण तरीसुद्धा, “परमेश्‍वराच्या मंदिरी” जाण्याचा एलकानाच्या निष्ठावान कुटुंबाचा “हा परिपाठ वर्षानुवर्ष होता.”—१ शमुवेल १:७.

१३. येशू पृथ्वीवर होता त्याकाळी विश्‍वासू यहुद्यांनी कोणते उदाहरण मांडले?

१३ येशू देखील एका मोठ्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला. दर वर्षी त्याचे कुटुंब नासरेथपासून दक्षिणेकडे जवळजवळ १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेरुसलेममध्ये वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी जात असे. त्यांना दोन मार्गांनी जाता येत होते. त्यांपैकी एक सरळ मार्ग म्हणजे मेगिद्दोच्या खोऱ्‍यात उतरून मग शोमरोनी प्रदेशातून २,००० फूट उंचीवर चढून जेरुसलेमपर्यंत जायचे. आणखी एक सर्रास वापरला जाणारा मार्ग होता; सा.यु. ३३ साली शेवटच्या वेळी जेरुसलेमला जाताना येशू याच मार्गाने गेला होता. यासाठी त्याला “यहूदीया प्रांतांत . . . यार्देनेच्या पलीकडे” पोहंचेपर्यंत, समुद्र सपाटीच्या खाली यार्देन खोऱ्‍यात पायी उतरून जावे लागले. (मार्क १०:१) येथपासून ‘वर यरुशलेमेस जाणारी वाट’ जवळजवळ ३० किलोमीटरची असून, हे तब्बल ३,७०० फूट उंचीचे चढण आहे. (मार्क १०:३२) वेळोवेळी, सण साजरे करण्यासाठी जाणाऱ्‍या विश्‍वासू लोकांच्या झुंडी गालीलपासून जेरुसलेमपर्यंतचा हा कठीण प्रवास करत असत. (लूक २:४४) आधुनिक प्रवास माध्यमांमुळे ज्यांना ख्रिस्ती सभा, संमेलनांना, अगदी आरामशीर जाणे शक्य झाले आहे, अशा आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांत राहणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांसाठी त्या विश्‍वासू लोकांनी किती सुंदर उदाहरण मांडले!

१४, १५. (अ) हन्‍ना हिने कोणते उदाहरण आपल्या पुढे ठेवले? (ब) सभांना उपस्थित राहणाऱ्‍या काही नव्या लोकांची जी चांगली मनोवृत्ती आहे, तिच्यापासून आपण काय शिकू शकतो?

१४ आणखी एक उदाहरण म्हणजे ८४ वर्षांची विधवा हन्‍ना हिचे. बायबल सांगते की ती कधीच ‘मंदिर सोडून जात नसे.’ (लूक २:३७) शिवाय, हन्‍ना प्रेमळपणे इतरांबद्दल स्वारस्य दाखवत असे. येशू बाळाला पाहिल्यावर आणि तोच वचनयुक्‍त मशीहा असल्याचे कळाल्यावर तिने काय केले? देवाचे आभार मानून “जे यरुशलेमेच्या मुक्‍ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.” (लूक २:३८) किती चांगली मनोवृत्ती, सर्व ख्रिश्‍चनांनी अनुकरण करावी अशीच!

१५ खरोखर, सभांना उपस्थित राहण्यात आणि सहभाग घेण्यात आपल्याला इतका आनंद वाटावा की हन्‍नाप्रमाणेच आपण सभांमध्ये नाही असे कधीच होऊ नये. कितीतरी नवीन लोकांच्या अगदी अशाच भावना आहेत. अंधारातून बाहेर पडून देवाच्या अद्‌भुत प्रकाशात आल्यामुळे, किती शिकू किती नाही असे त्यांना होते; कित्येक जण ख्रिस्ती सभांविषयी मोठ्या उत्साहाने बोलतात. दुसरीकडे पाहता, सत्यात बऱ्‍याच काळापासून असणाऱ्‍यांनी ‘आपली पहिली प्रीती न सोडण्याची’ खबरदारी घेतली पाहिजे. (प्रकटीकरण २:४) गंभीर आजार किंवा व्यक्‍तीच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या इतर कारणांमुळे कदाचित काहीवेळा सभांतील उपस्थिती अनियमित होऊ शकते. पण भौतिकवाद, करमणूक किंवा अनास्थेवाईकपणा यांपैकी कोणत्याही कारणामुळे आपण सभांना तयारी करून न येणाऱ्‍यांपैकी, येऊन नुसतेच बसणाऱ्‍यांपैकी किंवा अनियमितपणे येणाऱ्‍यांपैकी असू नये.—लूक ८:१४.

सर्वोत्तम उदाहरण

१६, १७. (अ) आध्यात्मिक सभांप्रती असलेल्या येशूच्या मनोवृत्तीपासून आपण काय शिकू शकतो? (ब) सर्व ख्रिस्ती लोकांनी कोणता उत्तम परिपाठ पाळला पाहिजे?

१६ आध्यात्मिक सभांना महत्त्व देण्याच्या बाबतीत येशूने एक अनन्यसाधारण उदाहरण मांडले. १२ वर्षांच्या कोवळ्या वयातच त्याने जेरुसलेम येथे असलेल्या देवाच्या मंदिराविषयी प्रेम असल्याचे दाखवून दिले. त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप शोधल्यावर शेवटी तो कोठे सापडला, तर मंदिरात गुरूजनांसोबत देवाच्या वचनावर चर्चा करताना. आईवडिलांना आपल्याविषयी वाटलेली काळजी पाहून येशूने त्यांना आदरपूर्वक विचारले: “माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” (लूक २:४९) आपल्या आईवडिलांच्या आज्ञेनुसार लहानगा येशू त्यांच्यासोबत नासरेथला परतला. तेथेही सभास्थानात नियमितपणे उपस्थित राहून, उपासनेच्या सभांविषयी आपल्या मनात असलेले प्रेम तो दाखवतच राहिला. म्हणूनच तर त्याने आपली सेवा आरंभली, तेव्हा बायबल सांगते की “ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला.” येशूने यशया ६१:१, २ वाचून त्यावर खुलासा केला तेव्हा तेथे उपस्थित असणारे, “जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्‍चर्य करू लागले.”—(तिरपे वळण आमचे.) लूक ४:१६, २२.

१७ आजच्या ख्रिस्ती सभा देखील याच मूळ नमुन्यावर आधारलेल्या आहेत. स्तुतीपर गीत आणि प्रार्थनेने सभेची सुरवात झाल्यानंतर, बायबलमधील वचने (किंवा बायबल अभ्यासाच्या साहित्यातील बायबलची अवतरणे) वाचून त्यांवर खुलासा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या उत्तम परिपाठाचे अनुकरण करण्याचे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे कर्तव्य आहे. शक्यतोवर ख्रिस्ती सभांना नियमितपणे हजर राहण्यास त्यांना आनंद वाटतो.

आजच्या काळातील उदाहरणे

१८, १९. सभा, संमेलने आणि अधिवेशने यांच्याबाबतीत आर्थिकदृष्ट्या कमी विकसित देशांतल्या बंधुभगिनींनी कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे?

१८ जगातल्या आर्थिकदृष्ट्या कमी विकसित प्रदेशांत, आपल्या अनेक बंधुभगिनींना ख्रिस्ती सभांविषयी वाटणारी कदर प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. मोझांबिक येथे, एक प्रांतीय पर्यवेक्षक ओरलांड्यू आणि त्यांच्या पत्नी आमेल्या यांना नियुक्‍त करण्यात आलेल्या एका संमेलनात पोचण्याकरता एका उंच डोंगरावरून ९० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ४५ तास पायी चालावे लागले. नंतर पुढच्या संमेलनातील नियुक्‍तीसाठी हजर राहण्याकरता त्यांना पुन्हा तेवढेच अंतर पार करावे लागले. ओरलांड्यूने नम्रतेने कबूल केले: “बावा मंडळीच्या बांधवांच्या तुलनेत, आम्ही जे केलं ते काहीच नाही असं आम्हाला जाणवलं. संमेलनाला हजर राहून घरी परतण्यासाठी त्यांना सहा दिवस तब्बल ४०० किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला, त्यांच्यातले एक बंधू तर ६० वर्षांचे होते!”

१९ दर आठवड्याच्या मंडळीच्या सभांविषयी कदर बाळगण्याविषयी काय? काश्‍वाश्‍वा नजांबा या सत्तरी ओलांडलेल्या एक दुर्बळ भगिनी आहेत. नामिबियातील रुंडू नावाच्या खेड्यातील राज्य सभागृहापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कायसोसोसी नावाच्या लहानशा खेड्यात त्या राहतात. सभांना हजर राहण्यासाठी त्या जंगलातून येऊन जाऊन दहा किलोमीटर पायी चालतात. या रस्त्यावरून जाताना कितीतरी जणांवर चोरांचा हल्ला झाला आहे, पण भगिनी काश्‍वाश्‍वा यांनी सभांना येण्याचे थांबवलेले नाही. बऱ्‍याच सभा त्यांना न समजणाऱ्‍या भाषांतून चालवल्या जातात. मग त्यांना हजर राहिल्याने कसा काय फायदा होतो? भगिनी काश्‍वाश्‍वा सांगतात, “सांगितलेल्या वचनांवरून मी समजण्याचा प्रयत्न करते, की हे भाषण कोणत्या विषयावर असेल.” पण त्या अशिक्षित आहेत, मग त्यांना वचनांवरून कसे कळते? त्या उत्तर देतात, “मला तोंडपाठ असणाऱ्‍या वचनांवर माझं लक्ष असतं.” आणि कित्येक वर्षांपासून त्यांनी बरीचशी वचने तोंडपाठ केलेली आहेत. बायबल आणखी चांगल्या प्रकारे वापरता यावे म्हणून, त्या मंडळीद्वारे चालवल्या जाणाऱ्‍या साक्षरता वर्गाला जातात. त्या म्हणतात “मला सभांना जायला खूप आवडतं. सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. भाऊबहिणींना भेटायलाही मी खूप आतूर असते. सर्वांशी मी बोलू शकत नसले तरीसुद्धा ते मात्र नेहमी येऊन माझी विचारपूस करतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला माहीत आहे की मी सभांना हजर राहिल्याने यहोवाला आनंद होतो.”

२०. आपण आपल्या ख्रिस्ती सभांना जाण्याचे का सोडू नये?

२० भगिनी काश्‍वाश्‍वा यांच्यासारखेच सबंध जगात यहोवाचे कोट्यवधी उपासक ख्रिस्ती सभांविषयी कदर बाळगतात, आणि हे प्रशंसास्पद आहे. सैतानाचे जग स्वतःवर वेगाने नाश ओढवून घेत असता, आपण एकमेकांसोबत एकत्र मिळण्याचे कधीही सोडता कामा नये. उलट आपण आध्यात्मिकदृष्ट्या जागृत राहून सभा, संमेलने आणि अधिवेशने यांविषयी मनापासून कदर दाखवली पाहिजे. यामुळे यहोवाला तर आनंद होईलच पण त्यासोबत आपल्यालाही, जसजसे आपण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे शिक्षण आत्मसात करीत राहू तसतसा आपल्याला अवर्णनीय लाभ होत राहील.—नीतिसूत्रे २७:११; यशया ४८:१७, १८; मार्क १३:३५-३७.

उजळणीचे प्रश्‍न

◻ ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे हा एक मोलाचा हक्क का आहे?

◻ सभा उभारणीकारक व्हावी म्हणून उपस्थित असलेले सर्वजण कशाप्रकारे हातभार लावू शकतात?

◻ येशू ख्रिस्ताने कोणते उल्लेखनीय उदाहरण मांडले?

◻ आर्थिकदृष्ट्या कमी विकसित देशांमधील बांधवांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

[१८ पानांवरील चित्र]

रोमानियातील या साक्षीदारांप्रमाणे, ख्रिस्ती सभांविषयी कदर दाखवण्यात साक्षीदार एक उत्तम उदाहरण मांडतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा