मजबूत ख्रिस्ती वारशाबद्दल कृतज्ञ
ग्वेन गूच यांच्याद्वारे कथित
‘महान यहोवा त्याच्या गौरवात सिंहासनावर विराजमान,’ हे स्तोत्र मी शाळेत असताना गायचे. तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा, ‘हा यहोवा कोण आहे?’
माझे आजीआजोबा देव-भीरू होते. या शतकाच्या सुरवातीला त्यांनी, आता ज्यांना यहोवाचे साक्षीदार म्हटले जाते त्या बायबल विद्यार्थ्यांबरोबर सहवास राखण्यास सुरवात केली. माझ्या बाबांचा व्यापार चांगला चालला होता; पण पहिल्यांदा, त्यांना मिळालेला ख्रिस्ती वारसा मात्र त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना दिला नाही.
माझ्या बाबांनी, माझा थोरला भाऊ डग्लस, माझी धाकटी बहीण ॲनी आणि मला, आम्हा तिघांना त्याची कार्ये आणि देव कोण आहे? (इंग्रजी), नावाच्या पुस्तिका दिल्या तेव्हाच कुठे मला यहोवा हे खऱ्या देवाचे नाव असल्याचे समजले. (स्तोत्र ८३:१८) काय आनंद झाला मला! पण बाबांची आस्था अशी कशी काय जागृत झाली बरे?
सन १९३८ मध्ये, राष्ट्रे युद्धाची तयारी करीत असल्याचे बाबांनी पाहिले तेव्हा जगीक समस्या सोडवण्याकरता मानवी प्रयत्न पुरेसे नाहीत हे त्यांनी जाणले. आजीने त्यांना यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले शत्रू हे इंग्रजीतील पुस्तक दिले. ते पुस्तक वाचल्यावर त्यांना कळाले, की मानवजातीचा खरा शत्रू दियाबल सैतान आहे आणि मात्र देवाचे राज्य जागतिक शांती आणू शकते.a—दानीएल २:४४; २ करिंथकर ४:४.
युद्ध जसजसे जवळ येत होते, तसतसे आमचे कुटुंब उत्तर लंडनच्या वूड ग्रीन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहू लागले. १९३९ च्या जून मध्ये आम्ही, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष जोसेफ एफ. रदरफोर्ड यांचे “सरकार आणि शांती” हे भाषण ऐकावयास जवळच्या अलेक्झॅन्ड्रा पॅलेस येथे गेलो. न्यूयॉर्क शहराच्या मॅडिसन स्क्वेर गार्डन येथील रदरफोर्ड यांचे भाषण लंडनभर आणि इतर मुख्य शहरांना रेडिओवरून ऐकवण्यात आले. ते भाषण आम्ही इतक्या स्पष्टरीतीने ऐकू शकत होतो, की न्यूयॉर्कमध्ये जेव्हा एका टोळक्याने गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी आजूबाजूला पाहू लागले कारण मला वाटले, की तो गोंधळ आमच्या श्रोतृगृहातच होत आहे!
बायबल सत्याकरता बाबांचा आवेश
दर शनिवारी आमच्या कुटुंबाने बायबल अभ्यास करावा असे बाबांचे मत होते. आमच्या अभ्यासात आम्ही, दुसऱ्या दिवशी होणाऱ्या टेहळणी बुरूज अभ्यासातील बायबल विषयावर चर्चा करीत असू. सन १९३९ च्या मे १ टेहळणी बुरूज (इंग्रजी), मधील अभ्यासाच्या लेखातील यहोशवा आणि आय नगराला घातलेल्या वेढ्याच्या अहवालांचा माझ्या मनावर इतका प्रभाव पडला होता की आजवर तो माझ्या मनात तसाच ताजा आहे. माझ्यात इतकी जिज्ञासा निर्माण झाली होती, की मी त्यातील सर्व संदर्भ माझे बायबल उघडून पाहिले होते. अशाप्रकारचा अभ्यास मला खूपच मोहक वाटला—आणि आजवर वाटतो.
आम्ही शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगताना माझ्या हृदयात बायबल शिकवणुकी रुजत गेल्या. एकदा बाबांनी मला, बायबल प्रवचन रेकॉर्ड केलेला एक फोनोग्राफ, बायबल अभ्यासासाठी आम्ही वापरत असलेली एक पुस्तिका आणि एका वृद्धेचा पत्ता दिला. तिला जाऊन भेटण्यास त्यांनी मला सांगितले.
मी त्यांना म्हणाले: “मी तेथे जाऊन काय म्हणू, काय करू?”
बाबा म्हणाले: “सर्व त्यात आहे. फक्त रेकॉर्ड लाव, प्रश्न वाच तिला उत्तरे वाचायला लाव आणि मग वचनं वाच, बस्स.”
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केले आणि अशाप्रकारे मी बायबल अभ्यास घेण्यास शिकले. अशाप्रकारे सेवेमध्ये वचनांचा उपयोग केल्यामुळे मी वचने आणखी चांगल्यारीतीने समजू शकले.
युद्धाच्या वर्षांचे आव्हान
सन १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाचा उद्रेक झाला आणि दुसऱ्याच वर्षी यहोवाला माझ्या जीवनाच्या समर्पणाचे द्योतक म्हणून मी बाप्तिस्मा घेतला. तेव्हा माझं वय केवळ १३ वर्ष होतं. मी, पूर्ण वेळेची सेविका, म्हणजे पायनियर होण्याचे ठरवले. सन १९४१ मध्ये मी शाळा सोडली आणि लेस्टर अधिवेशनात डग्लसबरोबर पूर्ण वेळेच्या प्रचार कार्यात सामील झाले.
पुढील वर्षी, बाबांनी धार्मिक कारणांमुळे युद्धात भाग घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. युद्धाच्या त्या कठीण काळादरम्यान आईला मदत करण्याकरता आम्ही सर्व मुले एकत्र आलो. बाबांची तुरुंगातून सुटका होताच डग्लसला लष्करी सेवेसाठी बोलावण्यात आले. एका स्थानीय बातमीपत्राचा मथळा छापून आला: “मुलाने पित्याप्रमाणे तुरुंगच का निवडला.” खरे ख्रिस्ती सहमानवांच्या कत्तलीत भाग का घेऊ शकत नाहीत याचे स्पष्टीकरण देण्याकरता संधी मिळाल्यामुळे एक चांगली साक्ष देता आली.—योहान १३:३५; १ योहान ३:१०-१२.
त्या युद्धाच्या काळात, पूर्ण वेळेच्या सेवेतील अनेक साक्षीदारांच्या आमच्या घरी नेहमी भेटी व्हायच्या आणि त्यांच्या उभारणीकारक बायबल आधारित चर्चांमुळे माझ्यावर कायमचा प्रभाव पडला. त्या विश्वासू ख्रिस्ती बांधवांपैकी जॉन बार आणि अल्बर्ट श्रोडर हे होते; ते आता यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य आहेत. माझे आईबाबा पाहुणचार करण्यात खूप आवेशी होते आणि आम्हीही त्यांच्यासारखे होण्यास त्यांनी आम्हाला शिकवले.—इब्री लोकांस १३:२.
उत्तर देण्यास तयार
मी पायनियरींग चालू केल्यानंतर, हिल्डा नामक एका स्त्रीला घरोघरच्या कार्यात भेटले. ती अगदी रागारागात मला म्हणाली: “माझा नवरा तिकडे तुमच्या भल्यासाठीच लढतोय! युद्धासाठी तुम्ही काही का करत नाही?”
मी तिला विचारले, “मी काय करत आहे त्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? मी तुमच्याकडे का आले आहे ते तुम्हाला माहीत आहे का?”
ती म्हणाली: “बरं, आत ये आणि सांग.”
बहुतेक वेळा देवाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या किळसवाण्या कार्यांमुळे पीडित असलेल्या लोकांना आम्ही खरी आशा देत आहोत असे मी तिला सांगू शकले. हिल्डाने अगदी लक्षपूर्वक सर्व ऐकले आणि ती माझी पहिली नियमित बायबल विद्यार्थीनी झाली. आता, सुमारे ५५ वर्षांपासून ती एक सक्रिय साक्षीदार आहे.
युद्ध समाप्त झाल्यावर मला, नैर्ऋत्य इंग्लंडमधील डॉरचेस्टर नामक गावी नवीन पायनियर नेमणूक मिळाली. घरापासून दूर राहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. आमची लहानशी मंडळी, “द ओल्ड टी हाऊस” म्हटल्या जाणाऱ्या १६ व्या शतकातील एका इमारतीत, एका रेस्टॉरन्टमध्ये एकत्र जमत असे. प्रत्येक सभांना आम्हाला टेबल आणि खुर्च्या लावाव्या लागत असत. मी ज्या राज्य सभागृहात जायचे त्यापेक्षा हे राज्य सभागृह फारच वेगळे होते. पण, तेथे तेच आध्यात्मिक अन्न आणि तोच ख्रिस्ती बंधूभगिनींचा प्रेमळ सहवास होता.
यावेळेपर्यंत माझे आईबाबा लंडनच्या दक्षिणेकडील टूनब्रिज वेल्स येथे राहावयास आले. बाबा, ॲनी आणि मी आम्ही एकत्र पायनियरींग करू शकू या हेतूने मी पुन्हा घरी आले. तेथील मंडळीत लागलीच वाढ झाली, १२ पासून ७० पर्यंत साक्षीदार झाले; म्हणून, राज्य उद्घोषकांची अधिक आवश्यकता असलेल्या दक्षिण किनाऱ्यावरील ब्राह्यटन येथे जाण्यास आमच्या कुटुंबाला सांगण्यात आले. आमच्या पायनियर कुटुंबाबरोबर अनेक जण आवेशाने सामील झाले; आमच्या कार्यावरील यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांची आम्हाला प्रचिती झाली. लवकरच एका मंडळीच्या तीन मंडळ्या झाल्या!
अनपेक्षित आमंत्रण
सन १९५० च्या उन्हाळ्यात, न्यूयॉर्क शहराच्या यांकी स्टेडियम येथील ईश्वरी शासन पद्धतीची वाढ, या आंतरराष्ट्रीय संमेलनाला ब्रिटनहून आलेल्या ८५० प्रतिनिधींपैकी आमचे कुटुंब देखील होते. परगावाहून त्या अधिवेशनाला येणाऱ्या अनेक पायनियरांना, दक्षिण लॅनसिंग, न्यूयॉर्क येथील वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडला उपस्थित राहण्याकरता अर्ज पाठवण्यात आले. त्यांच्यापैकी डग्लस, ॲनी आणि मी होते! मी माझा अर्ज पोस्टपेटीत टाकला तेव्हा, ‘चला, शेवटी मी काहीतरी साध्य केलेच! आता माझे जीवन कोणते वळण घेणार?’ हा माझ्या मनात आलेला विचार आजही माझ्या लक्षात आहे. पण माझा मात्र, ‘ही मी आहे, मला पाठीव’ हा पक्का निर्धार होता. (यशया ६:८) अधिवेशनानंतर गिलियडच्या १६ वर्गासाठी मला, डग्लस आणि ॲनीला थांबावयास सांगितले तेव्हा मला झालेल्या आनंदाबद्दल तर विचारूच नका. जगाच्या पाठीवर कोठेही आम्हाला मिशनरी म्हणून पाठवण्यात येईल याची आम्हा तिघांनाही जाणीव होती.
सर्व कुटुंबाने अधिवेशनाचा आनंद लुटल्यावर, आता फक्त आईबाबाच इंग्लंडला परतणार होते. आम्ही तिघांनी माऊरिटानिया नामक बोटीवर त्यांना बसवून त्यांचा निरोप घेतला. तो ताटातूटीचा भावुक क्षण होता!
मिशनरी नेमणुका
गिलियडच्या १६ व्या वर्गात जगातील सर्व भागांहून आलेले १२० विद्यार्थी होते; काहींनी तर नात्सी छळछावण्यात छळ सोसलेला होता. आमच्या वर्गाला स्पॅनिश भाषा शिकवल्यामुळे, दक्षिण अमेरिकेतील एखाद्या स्पॅनिश बोलणाऱ्या राष्ट्रांत आम्हाला पाठवण्यात येईल असे आम्हाला वाटले. पण पदवीदानाच्या दिवशी आम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले, की डग्लसला जपानला तर ॲनी आणि मला सिरियाला नेमणूक देण्यात आली. म्हणून मला आणि ॲनीला अरबी भाषा शिकण्याची आवश्यकता होती, कारण मग जेव्हा आमची नेमणूक लेबननला करण्यात आली तेव्हा देखील ती भाषा उपयोगी पडली. आमचा व्हिसा मिळेपर्यंत आम्ही, अरबी भाषेतील टेहळणी बुरूज नियतकालिकाचे वॉच टावर संस्थेचे टाईपसेटर, जॉर्ज शाकशिरी यांच्याकडून आठवड्यातून दोनदा अरबी शिकत होतो.
वर्गात आम्ही ज्या बायबल देशाविषयी शिकलो होतो तेथे प्रत्यक्षात जाणे किती रोमहर्षक होते! किथ आणि जॉईस चू, एडना स्टॅकहाऊस, ऑलिव टर्नर, डोरीन वॉरबर्टन आणि डोरीस वूड हेही आमच्याबरोबर आले. आमचे एक आनंदी मिशनरी कुटुंबच तयार झाले होते! एक स्थानीय साक्षीदार आम्हाला भाषेसंबंधी आणखी मदत करण्याकरता आमच्या मिशनरी गृही नेहमी येत असत. आमच्या रोजच्या वर्गात आम्ही एका संक्षिप्त प्रस्तुतीचा सराव करीत असू आणि मग प्रचार कार्यात जाऊन त्याच प्रस्तुतीचा वापर करीत असू.
सुरवातीचे काही वर्ष आम्ही ट्रिपोली येथेच होतो; तेथे एक मंडळी होती. जॉईस, एडना, ऑलिव, डोरीन, डोरीस, ॲनी आणि मी, स्थानीय साक्षीदारांच्या पत्नींना व मुलींना सभांमध्ये तसेच सार्वजनिक सेवेत भाग घेण्यास साहाय्य करीत असू. आम्ही तेथे येण्याआधी, आपले ख्रिस्ती बंधू आणि भगिनी, स्थानिक रीतीरिवाजानुसार स्त्रीपुरुष सभांना एकत्र बसत नव्हते, शिवाय या ख्रिस्ती भगिनी क्वचितच घरोघरच्या कार्यात भाग घ्यायच्या. आमच्या सार्वजनिक प्रचाराच्या वेळी आम्हाला भाषेसाठी त्यांचे साहाय्य लागत असे, म्हणून आम्ही त्यांना स्वतःहून या कार्यात भाग घेण्याचे उत्तेजन दिले.
नंतर, ॲनी आणि मला प्राचीन सिदोन शहरातील साक्षीदारांच्या लहानशा गटाला मदत करण्याकरता नेमण्यात आले. काही दिवसांतच आम्हाला राजधानी बेरुतला बोलावण्यात आले. तेथील अरमेनियन भाषा बोलणाऱ्या समाजात बायबल सत्याचे बी पेरण्यात आले असल्यामुळे त्यांना मदत करण्याकरता आम्ही तीही भाषा शिकलो.
नेमणुकीत बदल
इंग्लंड सोडण्याआधी मी विल्फ्रेड गूच यांना भेटले होते. त्यांनी लंडन बेथेल येथे सेवा केली होती; ते अतिशय आवेशी आणि काळजीवाहू होते. विल्फ, गिलियडच्या १५ व्या वर्गाचे सदस्य होते; ह्या वर्गाचे पदवीदान सन १९५० च्या दरम्यान यांकी स्टेडियम अधिवेशनात झाले होते. त्यांची मिशनरी नेमणूक नायजेरियातील वॉच टावर संस्थेच्या शाखेत होती; आमचा काही दिवस पत्रव्यवहार चालू होता. १९५५ मध्ये आम्ही दोघे लंडन येथील “विजयी राज्य” अधिवेशनाला उपस्थित होतो आणि काही दिवसांतच आमची मागणी झाली. दुसऱ्या वर्षी घानात आमचा विवाह समारंभ पार पडला आणि नायजेरिया, लागोस येथील विल्फ यांच्या मिशनरी नेमणुकीत मीही सामील झाले.
मी ॲनीला लेबनन येथेच सोडून आल्यावर तिने जेरुसलेममध्ये बायबल सत्य मिळालेल्या एका उत्तम ख्रिस्ती बंधूबरोबर विवाह केला. डग्लस, ॲनी आणि मी, आम्हा तिघांचाही विवाह जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी झाला असल्यामुळे आई आणि बाबा एकाच्याही विवाहाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण, आम्ही सर्व आपला देव यहोवा याची आनंदाने सेवा करीत आहोत हे ऐकून त्यांचे समाधान झाले.
नायजेरियात कार्य
लागोस येथील शाखा कार्यालयात मला, आमच्या आठ जणांच्या बेथेल परिवाराच्या खोल्या साफ करण्याचे तसेच त्यांच्यासाठी जेवण तयार करण्याचे व त्यांच्या लाँड्रीचे काम देण्यात आले. मला असे वाटले की मी फक्त एक पतीच मिळवला नव्हता तर एक संपूर्ण कुटुंबही मिळवले होते!
विल्फ आणि मी योरुबा भाषेत एक संक्षिप्त प्रस्तावना शिकलो; आणि आमचे परिश्रम वाया गेले नाहीत. आम्ही शिकवलेल्या एका तरुण विद्यार्थ्याचा मुलगा आणि मुलगी आता, सुमारे ४०० सदस्य असलेल्या नायजेरियाच्या मोठ्या बेथेल परिवाराचे भाग आहेत.
सन १९६३ मध्ये विल्फ यांना, न्यूयॉर्क ब्रुकलिन येथे दहा महिन्यांच्या एका खास कोर्ससाठी बोलावण्यात आले. कोर्सनंतर त्यांना अचानक पुन्हा इंग्लंडला नेमण्यात आले. मी तेव्हा नायजेरियातच होते, विल्फ यांना लंडनमध्ये भेटण्याकरता मला केवळ १४ दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्यात आली. माझ्या मनात संमिश्र भावना उत्पन्न होऊ लागल्या कारण नायजेरियातील नेमणूक मला आवडू लागली होती. १४ वर्षे परदेशात राहिल्यामुळे इंग्लंडमधील जीवनाशी समरूप होण्यास जरा वेळच लागला. पण, एका गोष्टीसाठी आम्ही कृतज्ञ होतो व ती म्हणजे आता आम्ही आमच्या वृद्ध आईबाबांजवळ होतो व त्यांची चांगल्याप्रकारे काळजी घेऊ शकत होतो.
आमच्या आशेमुळे आम्ही टिकलो
सन १९८० पासून विल्फ परिमंडल पर्यवेक्षक या नात्याने कार्य करू लागले तेव्हा मला त्यांच्याबरोबर अनेक राष्ट्रांना भेटी देण्याचा सुहक्क मिळाला. मी खासकरून नायजेरियाला पुन्हा भेट देण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत होते. नंतर आम्ही स्कॅनडिनाविया, वेस्ट इंडिज, मध्य पूर्व—तसेच लेबनन या ठिकाणांनाही गेलो. जुन्या आठवणी आठवल्याने तसेच आमच्यासमोर किशोरावस्थेत असलेले तरुण आता ख्रिस्ती वडील या नात्याने कार्य करत असल्याचे पाहून विशेष आनंद झाला.
सन १९९२ च्या वसंतात माझ्या प्रिय पतीचे दुःखद निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. हा घाला अतिशय तीव्र होता कारण हे सर्व काही अचानक घडले. ३५ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर आता एकटीने राहणे काही दिवस मला अवघडच गेले. पण माझ्या जगव्याप्त ख्रिस्ती कुटुंबाकडून मला पुष्कळसे प्रेम आणि साहाय्य मिळाले आहे. माझ्याकडे अनेक सुंदर अनुभव आहेत ज्यांवर मी मनन करू शकते.
माझ्या आईबाबांनी ख्रिस्ती एकनिष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण मांडले. सन १९८१ आईचे तर १९८६ मध्ये बाबांचे निधन झाले. डग्लस आणि ॲनी अजूनही यहोवाची विश्वासूपणे सेवा करीत आहेत. डग्लस आणि त्याची पत्नी कॅम बाबांची काळजी घेण्यासाठी लंडनला आल्यावर तेथेच स्थायिक झाले. ॲनी आणि तिचे कुटुंब संयुक्त संस्थानांत आहेत. आम्ही सर्वजण देव-प्रदत्त आशा आणि वारसा यासाठी खूपच कृतज्ञ आहोत. जिवंत असलेले लोक त्यांच्या पुनरुत्थित प्रिय जनांसह यहोवाच्या पार्थिव कुटुंबाचे सदस्य या नात्याने कायमसाठी सेवा करतील त्या काळाची वाट पाहत आम्ही अजूनही “प्रतिक्षा करण्याची मनोवृत्ती” बाळगून आहोत.—विलापगीत ३:२४, NW.
[तळटीप]
a सन १९८० च्या मार्च १५ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) मध्ये माझे बाबा, एर्नस्ट बिवर यांचा अनुभव आला आहे.
[२३ पानांवरील चित्र]
वरून उजवीकडून डावीकडे:
१३ वर्षीय ग्वेन, एनफिल्ड राज्य सभागृहात बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवताना
सन १९५१ मध्ये लेबनन, ट्रिपोली येथील मिशनरी कुटुंब
ग्वेन तिचे दिवंगत पती विल्फसमवेत