इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
“तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा . . . . तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीहि परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये.”—अनुवाद १६:१६.
१. बायबलच्या काळातील सणासुदींविषयी काय म्हणता येईल?
सणाचा उल्लेख होताच तुमच्या मनात कोणते चित्र उभे राहते? प्राचीन काळातील काही सणांत स्वैराचार आणि अनैतिकता सर्रास चाले. आजच्या काळातील काही सणांत देखील हेच चित्र दिसते. पण देवाच्या नियमशास्त्रात इस्राएल लोकांना ज्या सणांविषयी सांगण्यात आले होते ते अगदी वेगळ्या स्वरूपाचे होते. ते प्रसंग आनंददायक सोहळे होते तरीसुद्धा, त्यांचे वर्णन “पवित्र मेळे” म्हणूनही करता येत होते.—लेवीय २३:२.
२. (अ) इस्राएली पुरुषांना वर्षातून तीन वेळा काय करणे आवश्यक होते? (ब) अनुवाद १६:१६ येथे वापरलेल्या “सण” या शब्दाचा काय अर्थ होतो?
२ सणांना उपस्थित राहण्याकरता ‘यहोवाने निवडलेल्या स्थानी’ अर्थात जेरुसलेमला प्रवास करून जाणे, विश्वासू इस्राएली पुरुषांसाठी—आणि सहसा त्यांच्यासोबत जाणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसाठी—एक अत्यंत आनंददायक अनुभव होता; शिवाय, या तीन मोठ्या सणांसाठी ते उदारपणे देणग्या देखील देत असत. (अनुवाद १६:१६) जुन्या करारातील शब्दांचा अभ्यास (इंग्रजी) या ग्रंथाने, अनुवाद १६:१६ येथे “सण” म्हणून भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाची व्याख्या, “देवाने कृपा दाखवलेल्या काही उल्लेखनीय घटनांच्या आनंदाप्रीत्यर्थ बलिदाने देऊन खाण्यापिण्याचा . . . अत्यंत आनंददायक सोहळा” या शब्दांत केली आहे.a
मोठ्या सणांचे महत्त्व
३. इस्राएल लोकांचे तीन वार्षिक सण कोणत्या आशीर्वादांची आठवण करून देत असत?
३ इस्राएल लोकांचा समाज कृषिप्रधान असल्यामुळे, त्यांचे जीवन पावसाच्या रूपात मिळणाऱ्या देवाच्या आशीर्वादावर अवलंबून होते. मोशेच्या नियमशास्त्रातील तीन मोठे सण वसंत ऋतूच्या सुरवातीला जवाचे पीक, वसंत ऋतू संपत आल्यावर गव्हाचे पीक, आणि उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी इतर पिके गोळा करण्याच्या दिवसांशी जुळायचे. पावसाचे चक्र अबाधित ठेवणाऱ्या पालनकर्त्याला आणि सुपीक जमिनीच्या निर्माणकर्त्याला मोठ्या हर्षोल्लासासहित आपले आभार व्यक्त करण्याचे हे प्रसंग होते. पण या सणांत आणखीही पुष्कळ काही समाविष्ट होते.—अनुवाद ११:११-१४.
४. पहिला सण कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या प्रीत्यर्थ साजरा केला जात असे?
४ पहिला सण बायबलच्या प्राचीन दिनदर्शिकेतील पहिल्या महिन्यात म्हणजे निसान १५-२१ यादरम्यान पाळला जायचा; या तारखा आपल्या दिनदर्शिकेत मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरवातीला येतील. या सणाला बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत; शिवाय, निसान १४ च्या वल्हांडणानंतर लगेच तो पाळावयाचा असल्यामुळे त्याला ‘वल्हांडणाचा सण’ देखील म्हणण्यात येई. (लूक २:४१; लेवीय २३:५, ६) या सणाच्या निमित्ताने इस्राएल लोकांना, इजिप्तमध्ये सोसाव्या लागलेल्या दुःखांपासून आपली कशी सुटका झाली याची आठवण होत असे; त्या बेखमीर भाकरींनाही “दुःखस्मारकाची भाकर” म्हणत असत. (अनुवाद १६:३) इजिप्तमधून आपल्याला कसे त्वरेने पलायन करावे लागले होते, इतके की पीठात खमीर घालून ते फुगेपर्यंतही थांबण्याची देखील सवड नव्हती, याची त्यांना आठवण होत असे. (निर्गम १२:३४) हा सण सुरू असताना कोणत्याच इस्राएली घरात खमीराची भाकर केली जात नसे. सण पाळणाऱ्यांपैकी कोणी, किंवा एखाद्या परदेशी निवाशाने देखील खमीराची भाकरी खालल्यास त्याला जिवे मारण्याची आज्ञा होती.—निर्गम १२:१९.
५. दुसऱ्या सणाच्या वेळी कदाचित कोणत्या मोठ्या मानाची आठवण होत असावी, आणि त्या आनंदात कोणाकोणाला सामील करायचे होते?
५ दुसरा सण निसान १६ नंतर सात आठवड्यांनी (४९ दिवसांनी), सिवान या त्यांच्या तिसऱ्या महिन्यातील ६ व्या दिवशी, म्हणजे आपल्या मे महिन्याच्या उत्तरार्धात साजरा केला जात असे. (लेवीय २३:१५, १६) या सणाला सप्ताहांचा सण म्हणत असत (येशूच्या काळी त्याला पेन्टेकॉस्ट देखील म्हणत, ज्याचा ग्रीक भाषेत “पन्नासावा” असा अर्थ होता); इस्राएल लोक जेव्हा सिनाय पर्वताजवळ नियमशास्त्राच्या करारात आले, त्याच काळाशी जुळणाऱ्या तारखांना हा सण पाळला जात असे. (निर्गम १९:१, २) या सणादरम्यान विश्वासू इस्राएल लोकांनी, देवाचे पवित्र राष्ट्र या नात्याने राखून ठेवण्यात आल्यामुळे आपल्याला केवढा मोठा मान मिळाला आहे यावर चिंतन केले असावे. देवाचे खास लोक असल्यामुळे त्यांना देवाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक होते, उदाहरणार्थ, गोरगरिबांना देखील सणाचा आनंद घेता यावा म्हणून त्यांची प्रेमळपणे काळजी वाहण्याचा आदेश इस्राएल लोकांना पाळायचा होता.—लेवीय २३:२२; अनुवाद १६:१०-१२.
६. तिसऱ्या सणाने देवाच्या लोकांना त्यांच्या कोणत्या अनुभवाची आठवण करून दिली?
६ तीन मोठ्या वार्षिक सणांपैकी शेवटल्या सणाला संग्रहाचा सण किंवा मांडवांचा सण म्हणायचे. हा सण सातव्या, अर्थात तिशरी किंवा एथनिम या महिन्यातील १५ ते २१ तारखांना, म्हणजे आपल्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला साजरा केला जात असे. (लेवीय २३:३४) या सणादरम्यान देवाचे लोक आपल्या घरांबाहेर किंवा घराच्या छतावर झाडांच्या फांद्या आणि पाने वापरून तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्यांत (मांडवांत) राहात असत. असे केल्यामुळे, इजिप्तमधून वाग्दत्त देशापर्यंतच्या ४० वर्षांच्या प्रवासात इस्राएल राष्ट्राला आपल्या दैनंदिन गरजांच्या पूर्तीकरता देवावर कसे विसंबून राहावे लागायचे, याची आठवण त्यांना सदोदित होत असे.—लेवीय २३:४२, ४३; अनुवाद ८:१५, १६.
७. प्राचीन इस्राएलात पाळल्या जाणाऱ्या सणांवर पुनर्विचार केल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारे फायदा होतो?
७ आता आपण देवाच्या प्राचीन लोकांच्या इतिहासातील काही आठवणीत राहिलेल्या सणांवर पुनर्विचार करू. यातून आपल्याला प्रोत्साहन प्राप्त व्हावे, कारण आपल्यालासुद्धा नियमितपणे दर आठवडी आणि वर्षातून तीन वेळा मोठ्या संमेलनांत आणि अधिवेशनांत एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५.
दाविदाच्या घराण्यातील राजांच्या काळी
८. (अ) शलमोन राजाच्या काळी कोणता ऐतिहासिक सण साजरा करण्यात आला? (ब) प्रतिनमुनेदार मांडवांच्या सणाच्या कोणत्या महान समारोपाची आपण उत्सुकतेने वाट पाहू शकतो?
८ एक ऐतिहासिक महोत्सव, दाविदपुत्र राजा शलमोन याच्या वैभवशाली राज्यात, मांडवांचा सण सुरू असताना साजरा करण्यात आला. वाग्दत्त देशातील कानाकोपऱ्यातून मांडवांचा सण साजरा करण्याकरता आणि मंदिराच्या समर्पणाकरता एक “मोठा जमाव” जमला होता. (२ इतिहास ७:८) महोत्सवाचा समारोप झाल्यावर, शलमोन राजाने सण साजरा करण्यासाठी आलेल्या सर्वांना निरोप दिला; तेव्हा ते सारेजण “राजाचे अभीष्ट चिंतून आपआपल्या डेऱ्यास गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल याजवर जो प्रसाद परमेश्वराने केला त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.” (१ राजे ८:६६) हा खरोखरच एक संस्मरणीय सण होता. आज, देवाचे सेवक थोर शलमोन अर्थात येशू ख्रिस्त याच्या हजार वर्षीय राज्याच्या शेवटी, प्रतिनमुनेदार मांडवांच्या सणाच्या महान समारोपाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (प्रकटीकरण २०:३, ७-१०, १४, १५) तेव्हा पुनरुत्थान झालेले तसेच हर्मगिदोनातून बचावलेले यांच्यासहित सर्वजण, मग जगाच्या पाठीवर ते कोठेही राहात असोत, ते एकत्र मिळून यहोवा देवाची आनंदाने उपासना करतील.—जखऱ्या १४:१६.
९-११. (अ) हिज्कीया राजाच्या काळात कोणत्या घटनांमुळे एक उल्लेखनीय सण साजरा करणे शक्य झाले? (ब) उत्तरेकडील दहा-वंशांच्या राज्यातील अनेकांनी कोणता उत्तम आदर्श घालून दिला, आणि यामुळे आज आपल्याला कशाची आठवण होते?
९ यानंतर बायबलमध्ये आढळणारा आणखी एक आठवणीत राहिलेला सण आहाज या दुष्ट राजाची कारकीर्द संपल्यावर झाला; या राजाने मंदिरातील उपासना थांबवून यहूदाच्या राष्ट्राला धर्मत्याग करण्याइतपत बहकवले होते. आहाजानंतर हिज्कीया हा सदाचारी राजा गादीवर आला. आपल्या राज्याच्या पहिल्या वर्षी हिज्कीयाने, वयाच्या २५ व्या वर्षी पुनर्स्थापना आणि सुधार करण्याची धाडसी मोहीम हाती घेतली. त्याने तत्काळ मंदिर उपासनेकरता खुले केले आणि त्याच्या दुरुस्तीची व्यवस्था केली. यानंतर, त्याने उत्तरेकडील दहा-वंशांच्या शत्रू राष्ट्रात राहणाऱ्या इस्राएल लोकांना पत्रे पाठवून त्यांना वल्हांडण आणि बेखमीर भाकरींचा सण साजरा करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. इतर लोकांनी टर उडवली तरीसुद्धा, बरेच जण आले.—२ इतिहास ३०:१, १०, ११, १८.
१० हा सण यशस्वीपणे पार पडला का? बायबल आपल्याला सांगते: “जे इस्राएल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी सात दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळिला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रीत्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुति करीत होते.” (२ इतिहास ३०:२१) आजच्या काळात देखील, बराच विरोध सहन करून आणि लांबचा प्रवास करून अधिवेशनांना उपस्थित राहणाऱ्या देवाच्या लोकांकरता या इस्राएल लोकांनी केवढा अप्रतिम आदर्श घालून दिला आहे!
११ उदाहरणार्थ, १९८९ साली पोलंडमध्ये संपन्न झालेल्या तीन “ईश्वरी भक्ती” प्रांतीय अधिवेशनांचेच पाहा. एकूण १,६६,५१८ उपस्थितांपैकी कितीतरी लोक पूर्वीचे सोव्हिएत संघ आणि इतर जन पूर्व युरोपीय देशांतून आलेले होते; या देशांत त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी होती. यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषकb (इंग्रजी) या पुस्तकात सांगितल्यानुसार, “या अधिवेशनांना आलेल्यांपैकी काहींची, एवढ्या मोठ्या मेळाव्यात येण्याची पहिलीच वेळ होती; त्यांनी यापूर्वी जास्तीतजास्त १५-२० जण असलेल्याच सभा पाहिल्या होत्या. त्या विशाल स्टेडियम्समध्ये आपल्या सोबत हजारो बांधवांना प्रार्थना करताना, एकसुरात यहोवाच्या स्तुतीकरता गीत गाताना पाहून त्यांची मने कृतज्ञतेने भरून आली.”—पृष्ठ २७९.
१२. योशीया राजाच्या कारकिर्दीत कोणत्या घटनांमुळे एक उल्लेखनीय सण साजरा करणे शक्य झाले?
१२ हिज्कीयाच्या मृत्यूनंतर मनश्शे आणि आमोन राजांच्या शासनाखाली यहुदियातील लोक पुन्हा एकदा खोट्या उपासनेत गुरफटून गेले. यानंतर आणखी एका सदाचारी राजाचे, अर्थात योशीयाचे राज्य आले; त्याने खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेकरता मोठ्या धैर्याने पावले उचलली. वयाच्या २५ व्या वर्षी, योशीयाने मंदिराची दुरुस्ती करण्याचा हुकूम दिला. (२ इतिहास ३४:८) दुरुस्तीचे काम सुरू असताना मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची एक प्रत मंदिरात गवसली. देवाचे नियमशास्त्र वाचून योशीया राजाच्या मनावर मोठा परिणाम झाला आणि त्याने सर्व लोकांना हे नियमशास्त्र वाचून दाखवण्याची व्यवस्था केली. (२ इतिहास ३४:१४, ३०) यानंतर, त्यात सांगितल्याप्रमाणे त्याने वल्हांडण सणाचे आयोजन केले. शिवाय, या सोहळ्याकरता उदारपणे देणग्या देण्याद्वारे देखील योशीया राजाने एक उत्तम उदाहरण मांडले. परिणामी, “शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्राएलात केव्हाहि पाळण्यात आला नव्हता,” असे बायबल या सणाविषयी आपल्याला सांगते.—२ इतिहास ३५:७, १७, १८.
१३. हिज्कीया आणि योशीया या राजांच्या काळातील सण आपल्याला कशाची आठवण करून देतात?
१३ हिज्कीया आणि योशीया यांच्या काळात झालेले सुधार, १९१४ साली येशू ख्रिस्त राजसिंहासनावर बसल्यापासून झालेल्या खऱ्या उपासनेच्या अद्भुत पुनर्स्थापनेशी जुळतात. विशेषतः, योशीयाच्या काळातील सुधारांप्रमाणेच आजच्या काळातील ही पुनर्स्थापना देवाच्या वचनावर आधारित आहे. शिवाय, हिज्कीया आणि योशीयाच्या काळाप्रमाणेच आजच्या काळातील पुनर्स्थापनेदरम्यानही उल्लेखनीय संमेलने आणि अधिवेशने संपन्न झाली; यांत बायबलमधील भविष्यवाण्यांची चित्तवेधक स्पष्टीकरणे आणि बायबल तत्त्वांचे समर्पक अर्थ प्रस्तुत करण्यात आले. मोठ्या संख्येने बाप्तिस्मा घेणाऱ्यांमुळे या उद्बोधक मेळाव्यांतील आनंद द्विगुणित होतो. हिज्कीया आणि योशीया यांच्या काळात पश्चात्ताप करणाऱ्या इस्राएल लोकांप्रमाणेच, बाप्तिस्मा घेतलेल्या नवीन लोकांनी ख्रिस्ती धर्मजगतात आणि सैतानाच्या उर्वरित जगातही रूढ असणाऱ्या अधार्मिक चालीरीतींचा अव्हेर केला आहे. पवित्र देव यहोवा याला केलेले आपले समर्पण जाहीर करण्याकरता १९९७ साली, ३,७५,००० जणांनी—म्हणजे, दररोज सरासरी १,००० जणांनी बाप्तिस्मा घेतला.
मुक्तते पश्चात
१४. कोणत्या घटनांमुळे सा.यु.पू. ५३७ साली एक उल्लेखनीय सण साजरा करण्यात आला?
१४ योशीयाच्या मृत्यूनंतर इस्राएल राष्ट्राची पावले पुन्हा त्याच हिणकस खोट्या उपासनेकडे वळाली. शेवटी, सा.यु.पू. ६०७ साली यहोवाने जेरुसलेमविरुद्ध बॅबिलोनियन सैन्यांना पाठवून आपल्या लोकांना अद्दल घडवली. जेरुसलेम शहर आणि तेथील मंदिर जमिनदोस्त करण्यात आले आणि सारा देश उजाड झाला. पुढची ७० वर्षे यहुद्यांच्या बॅबिलोनमधील बंदिवासात गेली. यानंतर, देवाने यहुद्यांपैकी पश्चात्तापी शेषजनांना पुनर्जिवित केले; या लोकांनी वाग्दत्त देशात परतून खऱ्या उपासनेची पुनर्स्थापना केली. जेरुसलेमच्या विराण नगरीत ते परतले तेव्हा सा.यु.पू. ५३७ सालचा सातवा महिना सुरू होता. मायदेशी आल्याबरोबर सर्वप्रथम त्यांनी नियमशास्त्राच्या करारात सांगितलेले दररोजचे होमबली नियमाने अर्पण करण्याकरता एक वेदी बांधली. आणखी एका ऐतिहासिक सोहळ्याची वेळ आली होती. त्यानुसार, “त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळिला.”—एज्रा ३:१-४.
१५. सा.यु.पू. ५३७ साली परतलेल्या शेषजनांपुढे कोणते कार्य होते, आणि १९१९ साली कशाप्रकारे एक समान परिस्थिती होती?
१५ या बंदिवासातून परतलेल्यांपुढे एक मोठे कार्य होते—अर्थात देवाच्या मंदिराची आणि जेरुसलेमची, शिवाय तिच्या वेशींची पुनर्बांधणी. मत्सराने पेटलेल्या सभोवतालच्या राष्ट्रांतील लोकांकडून त्यांना काही कमी विरोध झाला नाही. मंदिराची दुरुस्ती सुरू झाली तेव्हा तो “अल्पारंभाचा दिवस” होता. (जखऱ्या ४:१०) ती स्थिती १९१९ साली विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांच्या स्थितीसारखी होती. त्या महत्त्वपूर्ण वर्षी, अभिषिक्त ख्रिश्चनांना मोठी बाबेल अर्थात खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याच्या आध्यात्मिक बंदिवासातून सुटका मिळाली. जग त्यांचे वैरी होते आणि त्यांची संख्या केवळ काही हजारांइतकीच होती. देवाचे शत्रू खऱ्या उपासनेची आगेकूच थांबवू शकणार होते का? या प्रश्नाचे उत्तर, इब्री शास्त्रवचनांत नोंदलेल्या शेवटल्या दोन सणांची आठवण करून देते.
१६. सा.यु.पू. ५१५ साली साजरा करण्यात आलेल्या एका सणाची विशेषता काय होती?
१६ मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम शेवटी सा.यु.पू. ५१५ सालच्या अदार महिन्यात पूर्ण झाले; निसान महिन्यातील वसंत ऋतूचा सण साजरा करण्याचीही एव्हाना वेळ आली होती. बायबल सांगते: “त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळिला, कारण परमेश्वराने त्यांस आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातास जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यास अनुकूल केले होते.”—एज्रा ६:२२.
१७, १८. (अ) सा.यु.पू. ४५५ साली कोणता उल्लेखनीय सण साजरा करण्यात आला? (ब) आज आपण देखील अशाच परिस्थितीत कसे आहोत?
१७ साठ वर्षे लोटल्यावर, सा.यु.पू. ४५५ साली आणखी एक उल्लेखनीय सण आला. या वर्षाच्या मांडवांच्या सणातील विशेष घटना म्हणजे जेरुसलेमच्या वेशी बांधून पूर्ण झालेल्या होत्या. बायबल आपल्याला सांगते: “जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यात राहिला; नूनाचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला.”—नहेम्या ८:१७.
१८ एवढा कडा विरोध असूनही साध्य होऊ शकलेली देवाच्या खऱ्या उपासनेची पुनर्स्थापना, खरोखर अविस्मरणीय ठरली! आजची परिस्थितीही सारखीच आहे. छळ आणि विरोधाच्या वादळांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा, देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे महान कार्य पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहंचले आहे आणि देवाचे न्यायसंदेश सर्वदूर जाहीर करण्यात आले आहेत. (मत्तय २४:१४) १,४४,००० अभिषिक्त जनांपैकी शेषजनांवर शेवटला शिक्का मारण्याचे कार्य संपत आले आहे. ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ त्यांच्या ५० लाखांहून अधिक सहकार्यांना सर्व राष्ट्रांतून अभिषिक्त जनांसोबत ‘एका कळपात’ एकत्रित करण्यात आले आहे. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:३, ९, १०) मांडवांच्या सणाच्या भविष्यसूचक चित्रणाची किती विलक्षण पूर्तता! हे संग्रहित करण्याचे महान कार्य नव्या जगातही चालू राहील; तेथे पुनरुत्थान झालेल्या अब्जावधी लोकांनाही इतरांसोबत प्रतिनमुनेदार मांडवांचा सण साजरा करण्याचे निमंत्रण दिले जाईल.—जखऱ्या १४:१६-१९.
सामान्य युग पहिल्या शतकात
१९. सा.यु. ३२ साली साजरा करण्यात आलेला मांडवांचा सण कशामुळे उल्लेखनीय ठरला?
१९ बायबलमध्ये नोंदलेले सर्वात उल्लेखनीय सण कोणते असतील, तर ते देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या उपस्थितीत साजरे करण्यात आलेले सण होत. उदाहरणार्थ, येशू ज्यात उपस्थित राहिला होता तो सा.यु. ३२ साली पाळण्यात आलेला मांडवांचा (किंवा मंडपांचा) सण विचारात घ्या. त्या प्रसंगी येशूने महत्त्वाची सत्ये शिकविली आणि या शिकवणुकींकरता हिब्रू शास्त्रवचनांतील अवतरणांचा आधार घेतला. (योहान ७:२, १४, ३७-३९) या सणाच्या वेळी मंदिराच्या आतल्या अंगणात चार प्रचंड मोठ्या समया जळत ठेवण्याची प्रथा होती. यामुळे रात्रीपर्यंत चालणाऱ्या सणाच्या आनंददायक उत्सवांना आणखीनच शोभा येई. कदाचित, याच मोठ्या प्रकाशाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून येशूने हे पुढील उद्गार काढले असतील: “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”—योहान ८:१२.
२०. सा.यु. ३३ सालचा वल्हांडण उल्लेखनीय का होता?
२० यानंतर आला सा.यु. ३३ या महत्त्वपूर्ण वर्षाचा वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण. वल्हांडणाच्या त्या विशिष्ट दिवशी, येशूच्या वैऱ्यांनी त्याला ठार केले आणि “जगाचे पाप” हरण करण्याकरता मरण पावल्यामुळे, तो प्रतिनमुनेदार वल्हांडण सणाचा कोकरा ठरला. (योहान १:२९; १ करिंथकर ५:७) तीन दिवसांनंतर निसान १६ रोजी देवाने, येशूचे अमर आत्मिक शरीरात पुनरुत्थान केले. ही घटना नियमशास्त्रात सांगितल्यानुसार जवाच्या कापणीनंतर पहिले पीक अर्थात प्रथमफळ अर्पण करण्याच्या वेळी घडली. त्याअर्थी, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त “महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ” ठरला.—१ करिंथकर १५:२०.
२१. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टला काय घडले?
२१ सा.यु. ३३ सालचा पेन्टेकॉस्ट. खऱ्या अर्थाने उल्लेखनीय ठरलेला आणखी एक सण. या दिवशी कितीतरी यहुदी आणि यहुदीय मतानुसारी जेरुसलेममध्ये आले होते, येशूचे जवळजवळ १२० शिष्य यांमध्ये होते. सण अद्याप सुरू असताना, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने या १२० जणांवर देवाचा पवित्र आत्मा ओतला. (प्रेषितांची कृत्ये १:१५; २:१-४, ३३) अशारितीने हे शिष्य अभिषिक्त झाले आणि येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने बांधलेल्या नव्या कराराद्वारे ते देवाचे नवे निवडलेले राष्ट्र बनले. या सणादरम्यान यहुदी महायाजक गव्हाच्या कापणीनंतर प्रथमफळापासून केलेल्या दोन खमीराच्या भाकरी देवाला अर्पण करीत असे. (लेवीय २३:१५-१७) या खमीराच्या भाकरी त्या १,४४,००० अपरिपूर्ण मानवांना सूचित करतात, ज्यांना येशूने ‘राज्य व याजक करण्याकरता देवासाठी विकत घेतले आहे, आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.’ (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३) हे स्वर्गीय शासक पापी मानवजातीतील, यहुदी आणि गैरयहुदी या दोन वेगवेगळ्या गटांतून येतात हे देखील त्या दोन खमीराच्या भाकरींवरून सूचित होऊ शकते.
२२. (अ) ख्रिस्ती लोक नियमशास्त्राच्या करारातील सण का पाळत नाहीत? (ब) पुढच्या लेखात आपण काय विचारात घेणार आहोत?
२२ नवा करार पेन्टेकॉस्ट सा.यु. ३३ रोजी कार्यरत झाला त्याअर्थी देवाच्या नजरेत जुन्या कराराचे महत्त्व संपले होते. (२ करिंथकर ३:१४; इब्री लोकांस ९:१५; १०:१६) पण अभिषिक्त ख्रिस्तीजनांसाठी कोणतेच नियमशास्त्र नाही असा याचा अर्थ होत नाही. ते येशू ख्रिस्ताने शिकविलेल्या आणि त्यांच्या हृदयपटलांवर लिहिलेल्या देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन आहेत. (गलतीकर ६:२) यामुळे, जुन्या नियमशास्त्राच्या करारात सामील असणारे तीन वार्षिक सण ख्रिस्ती लोक पाळत नाहीत. (कलस्सैकर २:१६, १७) तरीसुद्धा, ख्रिस्ती धर्म स्थापनेपूर्वीच्या देवाच्या सेवकांची सणांविषयी आणि उपासनेच्या इतर सभांविषयी जी मनोवृत्ती होती, तिच्यापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुढच्या लेखात, आपण अशा काही उदाहरणांवर विचार करू, ज्यांतून ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहणे किती आवश्यक आहे हे समजून घेण्याची आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल.
[तळटीपा]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठ ८२०, पहिला रकाना, “सण” या शीर्षकाखाली परिच्छेद १ आणि ३ मध्ये दिलेली माहिती देखील पाहा.
b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
उजळणीचे प्रश्न
◻ इस्राएलाच्या तीन मुख्य सणांतून कोणता उद्देश साध्य होत असे?
◻ हिज्कीया आणि योशीया यांच्या काळातील सणांत विशेष काय होते?
◻ सा.यु.पू. ४५५ साली कोणता उल्लेखनीय सण साजरा करण्यात आला, आणि आज तो कशाप्रकारे आपल्याला प्रोत्साहन देतो?
◻ सा.यु. ३३ सालच्या वल्हांडणात आणि पेन्टेकॉस्टमध्ये काय विशेष होते?
[१२ पानांवरील चौकट]
सणांपासून आज मिळणारा धडा
पापाचे प्रायश्चित्त करणाऱ्या येशूच्या बलिदानातून कायमस्वरूपी फायदा करून घेऊ इच्छिणाऱ्यांनी बेखमीर भाकरींच्या सणातून जे चित्रित होते त्याच्या अनुषंगाने चालले पाहिजे. या दुष्ट जगातून सुटका झाल्याबद्दल आणि येशूच्या खंडणीमुळे पापाच्या दोषातून बंधमुक्त झाल्याबद्दल अभिषिक्त ख्रिस्ती मोठा आनंद साजरा करीत आहेत; हा त्यांचा आनंदसोहळा बेखमीर भाकरींच्या सणाचा प्रतिनमूना आहे. (गलतीकर १:४; कलस्सैकर १:१३, १४) बेखमीर भाकरींचा सण सात दिवस चालायचा—ही संख्या बायबलमध्ये आध्यात्मिक पूर्णतेचे प्रतीक आहे. प्रतिनमुनेदार सण अभिषिक्त ख्रिस्ती मंडळी पृथ्वीवर असेपर्यंत चालतो आणि तो ‘सात्विकपणाने व खरेपणाने’ साजरा करावयाचा आहे. याचा अर्थ असा, की लाक्षणिक खमीरापासून त्यांनी सतत सावध राहिले पाहिजे. बायबलच्या भाषेत खमीर हे बऱ्याचदा खोट्या शिकवणुकी, ढोंगीपणा आणि वाईटपणा यांचे सूचक आहे. यहोवाच्या खऱ्या उपासकांना अशा या खमीराचा वीट असला पाहिजे, यामुळे स्वतःच्या जीवनाला आणि ख्रिस्ती मंडळीच्या शुद्धतेला त्यांनी कधीही कलंक लागू देऊ नये.—१ करिंथकर ५:६-८; मत्तय १६:६, १२.
[९ पानांवरील चित्र]
दर वर्षी निसान १६ रोजी, म्हणजे येशूचे पुनरुत्थान झाले त्या दिवशी, जवाच्या नव्या पिकातून एक पेंढी अर्पण केली जात असे
[१० पानांवरील चित्र]
येशूने स्वतःला “जगाचा प्रकाश” म्हटले तेव्हा तो सणाच्या वेळी लावल्या जाणाऱ्या समयांच्या प्रकाशाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत असावा