वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १/१ पृ. २४-२६
  • ‘बाळकांच्या मुखातून’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘बाळकांच्या मुखातून’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • उत्तम आचरण साक्ष देते
  • परिणामकारी तरुण साक्षीदार
  • तरुणांचे धैर्य उत्तम साक्ष देते
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १/१ पृ. २४-२६

‘बाळकांच्या मुखातून’

शमुवेल तरुण होता तेव्हा, महायाजक एलीच्या पुत्रांचा दुष्टपणा असतानाही तो योग्य तत्त्वांना दृढपणे चिकटून राहिला. (१ शमुवेल २:२२; ३:१) अलीशाच्या दिवसांमध्ये, सिरियात कैद करून नेलेल्या एका चिमुकल्या इस्त्राएली मुलीने तिच्या धनिणीस धैर्याने साक्ष दिली. (२ राजे ५:२-४) येशू १२ वर्षांचा असताना, तो इस्त्राएलच्या शिक्षकांसोबत मोठ्या साहसाने बोलला, तो त्यांना प्रश्‍न विचारून आजूबाजूला त्याला पाहणाऱ्‍यांना आश्‍चर्याने गुंग करणारी उत्तरे देत होता. (लूक २:४६-४८) संपूर्ण इतिहासात यहोवाची त्याच्या तरुण उपासकांनी विश्‍वासूपणे सेवा केली आहे.

आजही तरुण लोक, त्याचप्रकारची मनोवृत्ती प्रदर्शित करतात का? होय, निश्‍चितच! वॉचटावर सोसायटीच्या शाखा दप्तरांकडून येणारे अहवाल दाखवतात की, विश्‍वासातील पुष्कळ तरुण यहोवाची सेवा करण्यासाठी ‘स्वेच्छेने पुढे येत’ आहेत. (स्तोत्र ११०:३) त्यांच्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम तरुण आणि वृद्ध, सर्व ख्रिश्‍चनांना ‘चांगले करण्याचा कंटाळा न करण्याचे’ उत्तेजन देतात.—गलतीकर ६:९.

ऑयुमी नावाच्या एका लहानशा जपानी मुलीचे अतिशय छान उदाहरण आहे. ती सहा वर्षांची असताना प्रचारक झाली व तिच्या वर्गातील सर्वांना साक्ष देण्याचे तिने ध्येय ठेवले. तिला वर्गाच्या पुस्तकालयात पुष्कळ प्रकाशने सादर करण्याची परवानगी मिळाली. तिचे शाळकरीसोबती तिला कदाचित कोणतेही प्रश्‍न विचारतील म्हणून त्यांना उत्तरे देण्यासाठी तिने तयारी केली. तिच्या वर्गातील बहुतेक सर्व वर्गसोबती शिवाय तिची शिक्षिका देखील या प्रकाशनांसोबत चांगली परिचित झाली. तिच्या प्राथमिक शाळेच्या सहा वर्षांदरम्यान, ऑयुमीने १३ बायबल अभ्यासांची व्यवस्था केली. ती चवथीत होती तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला, आणि ती जिच्यासोबत अभ्यास करीत होती त्या तिच्या एका मैत्रिणीचा सहावीत असताना बाप्तिस्मा झाला. शिवाय, या मैत्रिणीच्या आईने व आणखी दोन थोरल्या बहिणींनी देखील अभ्यास केला व बाप्तिस्मा घेतला.

उत्तम आचरण साक्ष देते

“परराष्ट्रीयांत आपले आचारण चांगले ठेवा,” असे प्रेषित पेत्र म्हणाला व तरुण ख्रिस्ती ही आज्ञा गंभीरपणे स्वीकारतात. (१ पेत्र २:१२) परिणामस्वरूप, त्यांचे चांगले वर्तन नेहमी उत्तम साक्ष देते. आफ्रिकेच्या कॅमेरून राष्ट्रात, एक मनुष्य यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला दुसऱ्‍यांदा आला होता, आणि त्याला नेमकी एका लहान मुलीशेजारी बसावयास जागा मिळाली. वक्‍ता जेव्हा श्रोत्यांना बायबलमधील उतारा उघडून पाहावयाचे आमंत्रण देत असे तेव्हा त्याने पाहिले की त्या लहान मुलीला तो उतारा तिच्या स्वतःच्या बायबलमध्ये लगेच सापडत असे आणि ती ते लक्षपूर्वकतेने वाचत असे. तिची ही मनोवृत्ती पाहून या मनुष्यावर इतका प्रभाव पडला की सभा संपल्यावर तो वक्त्याकडे गेला आणि म्हणाला: “या लहान मुलीने माझ्यामध्ये तुमच्यासोबत बायबल अभ्यास करण्याची इच्छा जागृत केली आहे.”

दक्षिण आफ्रिकेत एक शाळा आहे जेथे २५ विद्यार्थी यहोवाच्या साक्षीदारांची मुले आहेत. त्यांच्या चांगल्या वर्तणूकीमुळे यहोवाच्या साक्षीदारांना उत्तम नावलौकिक मिळाला आहे. एका शिक्षिकेने एका साक्षीदार पालकाला अगदी विश्‍वासाने म्हटले की साक्षीदार त्यांच्या मुलांना इतके चांगले प्रशिक्षण कसे देऊ शकतात हेच तिला कळत नाही. कारण ती स्वतः ज्या चर्चमध्ये जाते ते चर्च तरुण मुलांना मदत करण्यास असमर्थ ठरले होते. एक नवी शिक्षिका शाळेमध्ये साहाय्य देण्यासाठी आली होती आणि तिला साक्षीदार मुलांची उत्तम वागणूक लगेच दिसून आली. तिने एका साक्षीदार मुलाला विचारले की यहोवाची एक साक्षीदार होण्यासाठी तिला काय करावे लागेल. त्याने तिला सांगितले की तिला बायबलचा अभ्यास करावा लागेल आणि मग तिने दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घेण्यासाठी त्याने तिची भेट त्याच्या पालकांसोबत घालून दिली.

कोस्टा रिकामध्ये, रिगोबर्टो नावाच्या एका मुलाने, त्याच्या दोन वर्गमित्रांनी त्याला त्रैक्य, आत्मा आणि नरकाग्नीबद्दलच्या त्याच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी बायबलचा उपयोग केला तेव्हा हीच सत्याची वाणी असल्याचे त्याने ओळखले. शास्त्रवचने वापरण्याची केवळ त्यांची क्षमता पाहूनच नव्हे तर, त्याने स्वतः ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चमध्ये जी परिस्थिती प्रत्यक्षात पाहिली होती तिच्यापासून या दोघांचे वळण किती उत्तम होते यामुळे त्याच्यावर सकारात्मक प्रभाव पडला. कुटुंबाकडून विरोध असताना देखील, रिगोबर्टो बायबलच्या त्याच्या अभ्यासात चांगली प्रगती करत आहे.

स्पेनमध्ये यहोवाच्या दोन साक्षीदारांनी—त्यातील एक नऊ वर्षांचा आहे—ऑनॉफ्रे नावाच्या एका व्यक्‍तीला भेट दिली. या दोघांतील जो प्रौढ होता तोच बहुतेक करून सर्व बोलत होता पण लहानगा साक्षीदार प्रौढासोबत शास्त्रवचने मनातल्या मनात वाचत होता शिवाय तोही त्याच्या स्मरणात असलेली शास्त्रवचने सांगत होता. ऑनॉफ्रे हे पाहून अतिशय प्रभावीत झाला. त्याने ठरवले की तो लहान मुलगा इतक्या कुशलतेने शास्त्रवचने हाताळण्यास जेथे शिकला तेथेच त्याला बायबलचा अभ्यास करावयाचा होता. यास्तव, दुसऱ्‍या दिवशी रविवारी सकाळीच तो राज्य सभागृहात गेला. साक्षीदार सभांना येईपर्यंत त्याला दुपारभर बाहेर थांबून राहावे लागले. तेव्हापासून त्याने अतिशय उत्तम प्रगती केली आणि अलिकडेच त्याच्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला.

परिणामकारी तरुण साक्षीदार

होय, यहोवा नम्र हृदयाच्या लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी तरुण तसेच प्रौढांचा उपयोग करतो. हीच गोष्ट हंगेरी येथील एका अनुभवातून दिसून येते. तेथे, इस्पितळात काम करणाऱ्‍या एका नर्सने पाहिले की एका विशिष्ट दहा वर्षांच्या मुलीला लोक भेटावयास येत तेव्हा ते वाचण्यासाठी काही साहित्य आणि खाण्यासाठी काही घेऊन येत असत. तिला प्रश्‍न पडला की ही लहान मुलगी इतक्या आवडीने काय वाचत असेल. तिने जाऊन पाहिले तर काय ते एक बायबल होते. ती नर्स तिच्यासोबत बोलली आणि नंतर म्हणाली: “पहिल्या क्षणापासून ही मुलगी मला खरोखरच काही तरी शिकवत होती.” इस्पितळ सोडून जात असताना, त्या तरुण मुलीने त्या नर्सला एका अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले, परंतु त्या नर्सने जाण्यास नाकारले. परंतु नंतर, ती “शुद्ध वाणी” ह्‍या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यास तयार झाली. त्यानंतर लगेचच, तिने बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली आणि एका वर्षानंतर तिने बाप्तिस्मा घेतला—हे सर्व काही त्या लहानशा मुलीने इस्पितळातील तिचा वेळ बायबल साहित्य वाचण्यात घालवल्यामुळे घडले.

एल साल्वादोर येथील ॲना रूथ, माध्यमिक शाळेतील दुसऱ्‍या वर्षात शिकत होती. तिला तिच्या टेबलावर बायबल साहित्य सोडून जाण्याची सवय होती जेणेकरून ज्यांना ती वाचावयास आवडतील ते ती घेऊन वाचू शकतील. ती जेव्हा टेबलावर कोणतेही साहित्य ठेवत असे, तेव्हा ते कोणीतरी घेऊन काही वेळाने पुन्हा ठेवत असे. तिने पाहिले की इलीन नावाची तिच्या शाळेतील एक मैत्रिण ते साहित्य वाचण्यासाठी घेऊन जात होती. काही दिवसांनंतर इलीनने अभ्यास स्वीकारला व ती मंडळीच्या सभांना उपस्थित राहू लागली. कालांतराने तिचा बाप्तिस्मा झाला आणि आता ती एक नियमित पायनियर म्हणून कार्य करत आहे. ॲना रूथ देखील एक नियमित पायनियर आहे.

पनामामध्ये एक बहीण एका स्त्रीसोबत अभ्यास करत होती, जिचा पती सत्याला खूप विरोध करत होता. त्याचा विरोध इतका वाढला की शेवटी तिला तो अभ्यास थांबवावा लागला. परंतु काही काळाने पतीची मनोवृत्ती नरम होऊ लागली. काही दिवसांनंतर त्याचा सख्खा मोठा भाऊ जो स्वतः एक साक्षीदार आहे, त्याने त्याला घरात सूचना देणारा गजर बसवून घेण्यास सांगितले. तो गजर लावत असताना त्याची नऊ वर्षांची पुतणी रुसून घरी आली. त्याने तिला विचारले की काय झाले तेव्हा ती त्याला म्हणाली की ती आणि तिची थोरली बहीण दोघी, एक बायबल अभ्यास चालवण्यास गेल्या होत्या पण ती व्यक्‍ती घरात नव्हती, म्हणून ती त्या दिवशी यहोवासाठी काहीच करू शकली नाही. तेव्हा तिच्या ह्‍या चुलत्याने म्हटले: “मग तू मला प्रचार का करत नाहीस? म्हणजे तू यहोवासाठी काही तरी करू शकतेस.” त्याची ही पुतणी आनंदाने तिचे बायबल आणण्यासाठी घरी पळत गेली व तेथे एक अभ्यास सुरू झाला.

या लहान मुलीची आई (म्हणजे या माणसाची वहिनी) हे सर्व ऐकत होती. तिला वाटले की त्यांचा हा अभ्यास केवळ एक नाटक असेल, परंतु जेव्हा जेव्हा हा माणूस तिच्या घरी जात असे तेव्हा तेव्हा तो त्याच्या पुतणीला बायबल अभ्यासाबद्दल विचारत असे. आईने जेव्हा हे पाहिले की तिचा दीर अभ्यास गंभीरपणे करत होता व त्याचे जर काही अवघड प्रश्‍न असतील तर, तिने ठरवले की ती स्वतः तो अभ्यास चालवेल आणि मुलगी देखील तेथे अभ्यासाला उपस्थित राहील. तो आठवड्यातून दोनदा अभ्यास करू लागला व त्याने त्वरित प्रगती केली. शेवटी, त्याची पत्नी ज्या संमेलनात बाप्तिस्मा घेणार त्याच संमेलनात तोही समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यापर्यंत पोहंचला होता—हे सर्व काही त्याच्या तरुण पुतणीच्या उत्तम मनोवृत्तीमुळे साध्य झाले.

तरुणांचे धैर्य उत्तम साक्ष देते

बायबल म्हणते: “खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्‍वराचीच [यहोवा, NW] प्रतीक्षा कर.” (स्तोत्र २७:१४) हे शब्द देवाच्या सर्व सेवकांना लागू होतात व गेल्या वर्षी तरुण तसेच प्रौढांनी ते लागू केले. ऑस्ट्रेलियात, एक पाच वर्षांची मुलगी शाळेत नव्याने जाऊ लागली तेव्हा तिची आई शिक्षिकेकडे गेली व यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासाबद्दलचे स्पष्टीकरण तिला देऊ लागली. तेव्हा शिक्षिका म्हणाली: “तुम्ही काय विश्‍वास करता हे मला आधीच माहीत आहे. तुमच्या मुलीने मला सर्व काही समजावून सांगितले आहे.” ही लहान मुलगी तिच्या विश्‍वासाबद्दल शिक्षिकेला सांगण्यासाठी मुळीच घाबरली नाही.

रोमानियातील पाच वर्षांच्या ॲन्ड्रीयाने देखील असेच धैर्य दाखवले. साक्षीदार होण्यासाठी तिच्या आईने कर्मठ विश्‍वास सोडून दिला तेव्हा, तिच्या शेजारी राहणाऱ्‍या लोकांनी तिचे काहीही ऐकण्याची इच्छा दाखवली नाही. एके दिवशी मंडळीच्या पुस्तक अभ्यासात सेवा पर्यवेक्षकांनी शेजाऱ्‍यांना प्रचार करण्याच्या गरजेवर जोर दिला. तिने यावर गंभीर विचार केला आणि घरी परतल्यावर ती तिच्या आईला म्हणाली: “आई, तू उद्या कामाला गेल्यावर, मी सकाळीच लवकर उठून तू करतेस त्याचप्रमाणे माझ्या बॅगेत साहित्य भरीन व शेजाऱ्‍यांसोबत सत्याबद्दल बोलण्यास मला साहाय्य करण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करीन.”

दुसऱ्‍या दिवशी ॲन्ड्रीयाने जे म्हटले होते ते पूर्ण केले. तिचे सर्व धैर्य एकवटून तिने तिच्या शेजाऱ्‍यांच्या दाराची घंटा वाजवली. शेजाऱ्‍यांनी दार उघडले तेव्हा ही लहान मुलगी म्हणाली: “मला माहीत आहे की माझी आई साक्षीदार झाल्यापासून तुम्हाला ती आवडत नाही. तिने तुमच्यासोबत बोलण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तुम्ही काही तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती अतिशय निराश झाली आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.” त्यानंतर, ॲन्ड्रीयाने एक उत्तम साक्ष दिली. एका दिवसात तिने सहा पुस्तके, सहा नियतकालिके, चार पुस्तिका व चार पत्रिकांचे वाटप केले. तेव्हापासून, ती क्षेत्रसेवेत नियमित जाते.

र्‌वांडातील आपल्या बांधवांना तेथे चाललेल्या झगड्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर पुष्कळ धैर्य दाखवण्याची गरज होती. एके प्रसंगी एका साक्षीदार कुटुंबाला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले व तेथे सैनिकांनी त्यांना ठार मारण्याची तयारी केली होती. त्या कुटुंबाने पहिल्यांदा प्रार्थना करण्याची परवानगी मागितली. त्यांना परवानगी देण्यात आली व डबोरा नावाच्या त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला सोडून इतर सर्वांनी मनातल्या मनात प्रार्थना केल्या. एका अहवालानुसार, डबोरा प्रार्थनेत मोठ्याने म्हणाली: “यहोवा, ह्‍या आठवडी पप्पा आणि मी पाच नियतकालिकांचे वाटप केले. त्या लोकांना सत्य शिकवण्यासाठी व जीवन मिळण्यास मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे कसे जाऊ शकू? शिवाय, मी आता प्रचारक कशी होऊ शकेन? तुझी सेवा करण्यासाठी मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे.” हे ऐकल्यावर एका सैनिकाने म्हटले: “या लहान मुलीमुळे आम्ही तुम्हाला मारू शकत नाही.” डबोराने लगेच: “आभारी आहे” असे म्हटले. आणि त्या कुटुंबाला सोडण्यात आले.

येशूने त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटाला जेरुशलेम शहरात विजयी प्रवेश केला तेव्हा प्रचंड, आनंदी जनसमुदायाने त्याचे स्वागत केले. या जनसमुदायात लहान मुले तसेच प्रौढ लोक देखील होते. अहवालानुसार, ‘मंदिरात गजर करणारी मुले, दाविदाच्या पुत्राला होसान्‍ना’ असे म्हणून ओरडत होती. मुख्य याजक व शास्त्र्यांनी याला विरोध केला तेव्हा येशूने त्यांना प्रतिटोला देत म्हटले: “‘बाळके व तान्ही मुले ह्‍यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे,’ हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”—मत्तय २१:१५, १६.

येशूचे हे शब्द आजही खरे ठरतात हे पाहून आपल्याला रोमांचकारी वाटत नाही का? “बाळके व तान्ही मुले ह्‍यांच्या मुखातून”—आणि आपण आणखी भर घालून म्हणू शकतो की किशोरवयीन, तरुण पुरूष व स्त्रियांकडून—यहोवाने स्तुती पुरवली आहे. खरेच, यहोवाची स्तुती करण्याविषयी कोणासही वयाची मर्यादा नाही.—योएल २:२८, २९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा