‘तुझे मन माझ्याविषयी सरळ आहे का?’
“मजबरोबर चल; परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.”—२ राजे १०:१६.
१, २. (अ)इस्राएलची परिस्थिती अधिकच कशी चिघळली? (ब) सा.यु.पू. ९०५ मध्ये कोणते नाट्यमय बदल होण्याच्या मार्गावर होते?
इस्राएलमध्ये सा.यु.पू. ९०५ या वर्षी फार मोठा बदल झाला. सुमारे १०० वर्षांपूर्वी, शलमोनाच्या धर्मत्यागामुळे यहोवाने इस्राएलाच्या संघटित राज्याचे तुकडे होऊ दिले. (१ राजे ११:९-१३) दक्षिणी राज्य, यहुदा यावर त्यानंतर शलमोनाचा पुत्र रहबाम याने राज्य केले, तर उत्तरेकडील राज्य, इस्राएल एफ्राईमच्या, यराबामाच्या राज्यसत्तेखाली आले. खेदाची गोष्ट अशी, की उत्तरेकडील राज्याची संकटमय सुरवात झाली. आपल्या प्रजेने मंदिरातील उपासनेसाठी दक्षिणी राज्यात जावे, असे यराबामाला वाटत नव्हते कारण असे झाले तर त्यांच्या मनात दावीदाच्या घराण्यात परतण्याचा विचार येईल, अशी त्याला भिती वाटत होती. म्हणून त्याने इस्राएलमध्ये वासराची उपासना सुरू केली आणि अशा प्रकारे त्याने मूर्तिपूजेचा कित्ता घालून दिला जो उत्तरेकडील राज्यातील संपूर्ण इतिहासात काही प्रमाणात गिरवला गेला.—१ राजे १२:२६-३३.
२ अम्रीचा पुत्र, अहाब गादीवर आला तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली. त्याची विदेशी पत्नी, ईजबेल हिने बआल उपासनेला चालना दिली आणि यहोवाच्या संदेष्ट्यांना ठार मारले. एलीया संदेष्ट्याने याविषयी अहाबाला अनेकदा स्पष्ट इशारा दिला होता तरी त्याने आपल्या पत्नीला रोखले नाही. तथापि, सा.यु.पू. ९०५ मध्ये अहाब मरण पावला आणि त्याचा पुत्र, यहोराम याने राज्यसूत्रे हाती घेतली. देश शुद्ध करण्याची वेळ आता आली होती. एलीयानंतर येणारा अलीशा याने येहू नामक सेनापतीला अशी सूचना दिली, की इस्राएलचा भावी राजा होण्याकरता यहोवा त्याचा अभिषेक करणार आहे. त्याची कामगिरी? अहाबाच्या पापी घराण्याचा बिमोड करणे आणि ईजबेलने सांडलेल्या संदेष्ट्यांच्या रक्ताचा सूड घेणे!—२ राजे ९:१-१०.
३, ४. ‘येहूविषयी आपले मन सरळ आहे,’ हे यहोनादाबाने कसे दाखवून दिले?
३ देवाच्या आज्ञेनुसार, येहूने दुष्ट ईजबेलला ठार मारले आणि त्यानंतर अहाबाच्या घराण्याचा नाश करून इस्राएलास शुद्ध करण्यासाठी तो निघाला. (२ राजे ९:१५–१०:१४, १७) त्यानंतर त्याची भेट एका पाठीराख्याशी झाली. “रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीस येताना त्यास आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्यास म्हटले, तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध [“सरळ,” NW] आहे तसे तुझे आहे काय? यहोनादाब म्हणाला आहे. मग तो म्हणाला, असे असेल तर मला तुझा हात दे. त्याने त्यास हात दिला आणि आपल्या रथावर घेतले. तो त्यास म्हणाला, मजबरोबर चल; परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा. या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले.”—२ राजे १०:१५, १६.
४ यहोनादाब (किंवा, योनादाब) इस्राएली नव्हता. तथापि, त्याच्या नावानुसार (अर्थ “यहोवा इच्छुक आहे,” “यहोवा थोर आहे,” किंवा “यहोवा उदार आहे”) तो यहोवाचा उपासक होता. (यिर्मया ३५:६) निश्चितच, येहूची ‘परमेश्वराप्रीत्यर्थ असलेली उत्कट आस्था’ पाहण्यात त्याला असामान्य आस्था होती. आपल्याला हे कसे समजते? इस्राएलाच्या अभिषिक्त राजाशी त्याची भेट काही अपघाताने झाली नव्हती. यहोनादाब ‘त्याच्या भेटीस येत होता’ आणि त्यावेळी येहूने ईजबेलला तसेच अहाबाच्या घराण्यातील लोकांना आधीच ठार मारले होते. रथात येण्याचे येहूचे आमंत्रण यहोनादाबाने स्वीकारले तेव्हा काय होत आहे, याची यहोनादाबाला कल्पना होती. खोट्या आणि खऱ्या उपासनेत चाललेल्या लढाईत तो निश्चितच येहूच्या—आणि यहोवाच्या—बाजूने होता.
आधुनिक-दिवसातील येहू आणि यहोनादाब
५.(अ) सर्व मानवजातीकरता लवकरच कोणते बदल होणार आहेत? (ब) थोर येहू कोण आहे आणि पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधित्व कोण करतो?
५ सा.यु.पू. ९०५ या वर्षी इस्राएलात जसा बदल झाला तशाच प्रकारचा मोठा बदल आज मानवजातीकरता होणार आहे. खोट्या धर्मासहित सैतानाच्या प्रभावांमुळे झालेल्या सर्व वाईट परिणामांचे उच्चाटन करून यहोवा पृथ्वी शुद्ध करील अशी वेळ आता आली आहे. पण आधुनिक-दिवसातील येहू कोण आहे? येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे कोणीही असू शकत नाही, ज्याच्याविषयी भविष्यसूचक शब्दांनी असे म्हटले: “हे वीरा, तू आपली तरवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो.” (स्तोत्र ४५:३, ४) पृथ्वीवर येशूचे प्रतिनिधित्व ‘देवाचे इस्राएल’ अर्थात अभिषिक्त ख्रिस्ती करतात जे ‘देवाची आज्ञा पाळतात आणि येशूविषयी साक्ष देतात.’ (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण १२:१७) सन १९२२ पासून येशूच्या अभिषिक्त बांधवांनी मोठ्या निर्भयाने यहोवाच्या येणाऱ्या न्यायदंडाविषयी इशारा दिला आहे.—यशया ६१:१, २; प्रकटीकरण ८:७-९:२१; १६:२-२१.
६. अभिषिक्त ख्रिश्चनांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रांतून कोण आले आणि त्यांनी कशा प्रकारे जणू थोर येहूच्या रथात प्रवेश केला आहे?
६ अभिषिक्त ख्रिस्ती एकटे नाहीत. येहूला भेटण्यासाठी यहोनादाब आला त्याप्रमाणे थोर येहू अर्थात येशू आणि त्याचे प्रतिनिधी यांच्या खऱ्या उपासनेतील भूमिकेला समर्थन देण्यासाठी राष्ट्रांतून अनेक लोक आले आहेत. (जखऱ्या ८:२३) येशूने संबोधलेल्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ सन १९३२ मध्ये प्राचीन काळातील यहोनादाबाप्रमाणे त्यांना आधुनिक-दिवसातील येहूच्या ‘रथात येण्याचे’ आमंत्रणही देण्यात आले. (योहान १०:१६) कसे? ‘देवाच्या आज्ञा पाळण्याद्वारे’ आणि अभिषिक्त लोकांसोबत ‘येशूविषयी साक्ष देण्यात’ सहभाग घेण्याद्वारे. आधुनिक काळात, या गोष्टीत देवाच्या प्रस्थापित राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचा समावेश होतो, या राज्याचा राजा येशू आहे. (मार्क १३:१०) सन १९३५ मध्ये हे “योनादाब” प्रकटीकरण ७:९-१७ येथील “मोठा लोकसमुदाय” म्हणून ओळखण्यात आले.
७. ‘येशूविषयी आपले मन अद्यापही सरळ आहे,’ हे आज ख्रिश्चनांनी कसे दाखवून दिले आहे?
७ सन १९३० च्या दशकापासून, मोठ्या लोकसमुदायाने आणि त्यांच्या अभिषिक्त बांधवांनी मोठ्या निर्भयपणे खऱ्या उपासनेप्रती आपले समर्थन दाखवून दिले आहे. पौर्वात्य आणि पश्चिमी युरोप, दूरवरील पूर्व आशिया आणि आफ्रिकी देशांतील अनेक लोकांनी आपल्या विश्वासाला जडून राहण्यासाठी मरण देखील पत्करले आहे. (लूक ९:२३, २४) इतर देशांत, त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, त्यांच्यावर जमावांकडून हल्ला करण्यात आला किंवा त्यांचा छळ करण्यात आला. (२ तीमथ्य ३:१२) खरोखरच त्यांच्या विश्वासाचा अहवाल किती कमालीचा होता! सन १९९७ चा सेवा वर्ष अहवाल दाखवतो, की काहीही झाले तरी देवाची सेवा करण्याचा त्यांचा दृढनिश्चय अद्यापही कायम आहे. येशूप्रती त्यांचे ‘मन अद्यापही सरळ आहे.’ हे १९९७ सालादरम्यान दाखविण्यात आले जसे, की ५५,९९,९३१ राज्य प्रचारकांनी ज्यांपैकी जवळजवळ सर्व जण “योनादाब” आहेत, येशूविषयी साक्ष देण्यात त्यांनी एकूण १,१७,९७,३५,८४१ तास घालवले.
अद्यापही आवेशाने प्रचार करणे
८. खऱ्या उपासनेप्रती आपला आवेश यहोवाचे साक्षीदार कसे दाखवतात?
८ बेफान होऊन रथ हाकण्यात येहू प्रसिद्ध होता—काम पूर्ण करण्यातील त्याचा आवेश यातून दिसून येतो. (२ राजे ९:२०) थोर येहूचे अर्थात येशूचे वर्णन जणू त्याला आवेशाने ‘ग्रासून टाकले’ आहे, असे करण्यात आले आहे. (स्तोत्र ६९:९) अर्थात, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, की खऱ्या ख्रिश्चनांची त्यांच्या आवेशासाठी नोंद घेतली जाते. मंडळीमध्ये आणि जनतेला ते ‘सुवेळी अवेळी देवाच्या वचनाची घोषणा करत आहेत.’ (२ तीमथ्य ४:२) त्यांचा आवेश विशेषतः सन १९९७ च्या सुरवातीला दिसून आला जेव्हा आमची राज्य सेवा यातील लेखाने अधिकाधिक लोकांनी सहायक पायनियर सेवेत भाग घेण्याचे उत्तेजन दिले होते. प्रत्येक देशात सहायक पायनियरांच्या संख्येचे एक ठराविक लक्ष्य ठेवण्यात आले. याची प्रतिक्रिया? उल्लेखनीय! अनेक शाखांमध्ये ठराविक संख्येच्या लक्ष्यापेक्षा जास्त संख्येची नोंद झाली. इक्वादोर या देशाने ४,००० चे लक्ष्य ठेवले होते, पण मार्च महिन्यात ६,९३६ लोकांनी सहायक पायनियरींग केल्याचा अहवाल दिला. त्या तीन महिन्यांत जपानमधील एकूण १,०४,२१५ लोकांनी सहायक पायनियरींग केली. झांबिया देशात ६,००० चे लक्ष्य होते, पण मार्चमध्ये ६,४१४; एप्रिलमध्ये ६,५३२ आणि मे महिन्यात ७,६९५ लोकांनी सहायक पायनियरींग केली. संपुर्ण जगभरात सहायक पायनियर आणि नियमित पायनियर यांची एकूण संख्या ११,१०,२५१ इतकी होती, १९९६ या वर्षापेक्षा ३४.२ टक्के वाढ!
९. घरोघरच्या सेवाकार्याखेरीज, यहोवाचे साक्षीदार इतर कोणत्या मार्गांनी सुवार्ता सांगण्यासाठी लोकांचा शोध घेतात?
९ प्रेषित पौलाने इफिसमधील वडिलांना म्हटले: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.” (प्रेषितांची कृत्ये २०:२०) आज यहोवाचे साक्षीदार पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करून मोठ्या आवेशाने सुवार्तेचा घरोघरी प्रचार करत आहेत. तथापि, लोक घरी भेटणे कदाचित इतके सोपे नसेल. म्हणून, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ राज्य प्रचारकांना, जेथे लोक भेटतात तेथे—कामाच्या ठिकांणी, रस्त्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर, सार्वजनिक उद्यानांत—जाण्याचे उत्तेजन देतो. (मत्तय २४:४५-४७) यामुळे उत्तम परिणाम मिळत आहेत.
१०, ११. दोन देशांतील प्रचारकांनी, सामान्यपणे घरी न भेटणाऱ्या आस्थेवाईक लोकांना शोधण्यासाठी कशा प्रकारे उत्तम पाऊल उचलले आहे?
१० कोपनहेगन, डेन्मार्क येथे प्रचारकांचा एक लहान गट रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर प्रचार करत राहिला आहे. जानेवारी ते जून पर्यंत त्यांनी ४,७३३ नियतकालिके वाटली, लोकांसोबत चांगली चर्चा केली आणि अनेक पुनर्भेटी देखील केल्या. त्या देशातील अनेक प्रचारकांनी दुकानांत नियतकालिक मार्ग सुरू केला आहे. या देशातील एका शहरात प्रत्येक शुक्रवारी एक मोठा बाजार भरतो आणि त्या दिवशी तेथे हजारोंच्या संख्येने लोक जमा होतात. म्हणून मंडळीने नियमित बाजार साक्षकार्याची व्यवस्था केली आहे. एका दुसऱ्या क्षेत्रात, शाळांमध्ये माहिती पार्सल घेऊन भेट दिली जाते, शाळेतील शिक्षकांना उचित ठरतील अशी प्रकाशने या पार्सलमध्ये असतात.
११ हवाई देशात देखील घरी न भेटणाऱ्या लोकांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. खास क्षेत्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणे (रस्ते, उद्याने, वाहनतळ, आणि बस स्थानक) व्यापारी क्षेत्रे, बाजार केंद्रे आणि विमानतळ, दूरध्वनी साक्षकार्य, सार्वजनिक परिवहन (बसमध्ये प्रचार करणे) आणि कॉलेजचे आवार यांचा समावेश होतो. एकाच क्षेत्रात मोजक्याच साक्षीदारांना पाठवण्यात येईल आणि नियुक्त जन चांगल्याप्रकारे प्रशिक्षित असतील, अशी काळजी घेण्यात येते. अनेक देशांनी अशाच प्रकारच्या सुव्यवस्थित प्रयत्नांचा अहवाल दिला आहे. परिणामी, घरोघरचे सेवाकार्य करताना घरी न भेटणाऱ्या अनेक आस्थेवाईक लोकांशी संपर्क साधता आला आहे.
दृढ राहणे
१२, १३. (अ)सन १९९७ दरम्यान सैतानाने यहोवाच्या साक्षीदारांच्या विरुद्ध कोणत्या युक्तीचा उपयोग केला? (ब) एका देशात खोट्या मतप्रसाराचा कशा प्रकारे वेगळाच परिणाम झाला?
१२ सन १९९७ या वर्षी अनेक देशांत, यहोवाच्या साक्षीदारांविषयी अगदी सवंग आणि खोटा मतप्रसार करण्यात आला, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी हा त्यामागील हेतू होता, हे उघड आहे. पण त्यांनी हार मानली नाही! (स्तोत्र ११२:७, ८) त्यांनी स्तोत्रकर्त्याची प्रार्थना लक्षात ठेवली: “गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधि पाळीन.” (स्तोत्र ११९:६९) खऱ्या ख्रिश्चनांचा द्वेष केला जाईल, या येशूच्या भविष्यवाणीचा पुरावा म्हणजे अशा प्रकारची खोटी प्रसिद्धी. (मत्तय २४:९) पण काहीवेळा याचा अगदी उलट परिणाम झाला आहे. बेल्जियम देशातील एका मनुष्याने एका प्रख्यात दैनिक वर्तमानपत्रात यहोवाच्या साक्षीदारांची निंदा करणारा लेख वाचला. अशा निंदात्मक शेऱ्यांमुळे त्याला आश्चर्य वाटले आणि तो त्यानंतरच्याच रविवारी राज्यसभागृहात उपस्थित राहिला. त्याने साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला आणि वेगाने प्रगती केली. पूर्वी, हा मनुष्य एका टोळीचा सदस्य होता. त्याच्या बायबल अभ्यासाने त्याचे जीवन सुधारण्यास त्याला मदत झाली आणि त्याच्यातील बदल आसपासच्या लोकांना देखील दिसून आला. निश्चितच, आपल्या लेखामुळे अशा प्रकारचा परिणाम होईल, असा विचार सदर लेखकाच्या मनात आला देखील नसेल!
१३ बेल्जियममधील काही प्रामाणिक हृदयाच्या लोकांनी या कपटपूर्ण मतप्रसाराच्या विरोधात तोंड उघडले आहे. त्यांमध्ये भूतपूर्व पंतप्रधानही होते, यहोवाच्या साक्षीदारांनी जे काही साध्य केले आहे त्याची आपण मनःपूर्वक प्रशंसा करतो, असे त्यांनी मान्य केले. एका संसद सदस्याने लिहिले: “काही प्रसंगी करण्यात येणाऱ्या आरोपांच्या विपरीत, [यहोवाच्या साक्षीदारांपासून] सरकारी संस्थांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असं मला वाटतं. ते शांतिप्रिय, न्यायनिष्ठ नागरिक असून अधिकार पदावर असणाऱ्यांचा ते आदर करतात.” प्रेषित पेत्राचे शब्द खरोखरच शहाणपणाचे होते: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.
विलक्षण स्मारकविधी
१४. सन १९९७ मधील स्मारकविधीचे काही रोमांचक अहवाल कोणते?
१४ हे यथायोग्य आहे, की येशूची साक्ष देणाऱ्यांनी त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीकडे संपूर्ण वर्षातील एक खास प्रसंग म्हणून पाहण्यास हवे. मार्च २३, १९९७ या दिवशी हा प्रसंग साजरा करण्यासाठी १,४३,२२,२२६ लोक उपस्थित होते. ही उपस्थिती १९९६ च्या उपस्थितीपेक्षा १४,००,००० पेक्षाही अधिक होती. (लूक २२:१४-२०) अनेक देशांतील स्मारकविधीची उपस्थिती तेथील प्रचारकांच्या संख्येपेक्षा फार जास्त होती, भवितव्यातील वाढ यावरून दिसून येते. उदाहरणार्थ, हैती देशात, १९९७ या वर्षी १०,६२१ इतके प्रचारकांचे शिखर होते पण ६७,२५९ लोक स्मारकविधीकरता उपस्थित राहिले. तुम्ही पृष्ठ १८ ते २१ यावरील वार्षिक अहवाल पडताळू शकता आणि अशाच प्रकारे, प्रचारकांच्या तुलनेपेक्षा जास्त उपस्थिती असलेले आणखी किती देश आहेत, हे पाहू शकता.
१५. स्मारकविधी साजरा करण्यासाठी काही देशांत आपल्या बांधवांनी गंभीर समस्यांवर कशी मात केली?
१५ काही जणांसाठी स्मारकविधीला उपस्थित राहणे इतके सोपे नव्हते. अल्बेनियात तेथील मुलकी अव्यवस्थेमुळे संध्याकाळी ७ वाजताच संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संपूर्ण देशातील ११५ लहान गटांनी स्मारकविधीची सुरवात संध्याकाळी पावणेसहा वाजता केली. निसान १४ ची सुरवात सूर्यास्तानंतर अर्थात संध्याकाळी ६:०८ वाजता झाली. जवळपास सव्वासहा वाजता बोधचिन्हे फिरवण्यात आली. बहुतेक ठिकांणी समाप्तीची प्रार्थना साडेसहा वाजता करण्यात आली आणि उपस्थित असलेले लोक संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपआपल्या घराकडे घाईघाईने रवाना झाले. तरी देखील, १,०९० प्रचारकांच्या तुलनेत स्मारकविधीची उपस्थिती ३,१५४ इतकी होती. एका आफ्रिकी देशात स्थानिक अव्यवस्थेमुळे राज्यसभागृहात पोहंचणे अवघड झाले होते त्यामुळे दोघा वडिलांनी तिसऱ्या वडिलांच्या घरी एकत्र होण्याचा निर्णय घेतला जेणेकरून लहान गटांत स्मारकविधी साजरा करण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्या वडिलांच्या घरी पोहंचण्यासाठी दोघा वडिलांना एक नाला पार करावा लागणार होता. तथापि, त्या भागात लढाई चालू होती आणि जो कोणी नाला पार करण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा तेथे दबा धरून बसलेले लोक त्यावर गोळीबार करत. एका वडिलांनी जवळजवळ पळतच नाला पार केला आणि तेव्हा काही झाले नाही. दुसरे वडील जेव्हा नाला ओलांडत होते तेव्हा त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. ते पटकन जमिनीवर पडले आणि सरपटत-सरपटत एका सुरक्षित ठिकाणी पोहंचेपर्यंत त्यांच्या डोक्यावरून गोळीबार होत होता. वडिलांची सभा यशस्वीपणे पार पडली आणि मंडळीच्या आवश्यकतांकडे लक्ष पुरवण्यात आले.
“सर्व राष्ट्रे, वंश, व निरनिराळ्या भाषा बोलणारे . . . ह्यांच्यापैकी”
१६. लहान गटांतील लोकांच्या भाषांमध्ये सुवार्तेचा प्रसार होण्यासाठी विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाने कशी व्यवस्था केली आहे?
१६ “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” यांतून मोठा लोकसमुदाय येईल, असे प्रेषित योहानाने म्हटले होते. (प्रकटीकरण ७:९) यास्तव, नियमन मंडळ अधिकाअधिक भाषांमध्ये साहित्य उपलब्ध करण्याची व्यवस्था करते ज्यामध्ये दूरवरील जमाती आणि लहानलहान गटांत बोलल्या जाणाऱ्या भाषांचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, मोझांबिकमध्ये शांतिमय नवीन जगातील जीवन ही पत्रिका आणखीन पाच भाषांत प्रकाशित करण्यात आली. निकाराग्वामध्ये भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे माहितीपत्रक मिसकिटो भाषेत उपलब्ध करून देण्यात आले—वॉच टावर सोसायटीचे या भाषेतील हे पहिले प्रकाशन आहे. अनेक मिसकिटो इंडियन लोकांनी स्वतःच्या मातृभाषेतील या माहितीपत्रकाचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला. सन १९९७ मध्ये सोसायटीने आणखी २५ भाषांत साहित्य प्रकाशित करण्यास मान्यता देऊन १०० कोटींपेक्षा अधिक नियतकालिके छापली.
१७. कोरियातील कोणत्या भाषेच्या लोकांना मदत करण्यात आली आणि येथील लोकांना व्हिडिओ फितींची किती मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे?
१७ कोरियामध्ये आणखी एका भाषेच्या लोकांना मदत करण्यात आली. कोरियन सांकेतिक भाषेतील पहिले अधिवेशन झाले ते १९९७ साली. कोरियामध्ये सांकेतिक भाषेच्या १५ मंडळ्या असून त्यांमध्ये ५४३ प्रचारक आहेत, पण अधिवेशनाकरता १,१७४ लोक उपस्थित होते आणि २१ जणांनी बाप्तिस्मा घेतला. बोललेले आणि लिहिलेले शब्द सहजपणे न समजणाऱ्या बधिरांकरता व्हिडिओ फितींवर १३ वेगवेगळ्या सांकेतिक भाषांत प्रकाशने काढली जात आहेत. अशा प्रकारे, बधिरांना सुवार्ता “वाचण्यात” तसेच त्यांच्यासोबत तिचा अभ्यास करण्यात मदत केली जात असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. संयुक्त संस्थानांत, सुरवातीला एका बधिर व्यक्तीला प्रगती करून बाप्तिस्मा घेण्यासाठी पाच वर्षांचा अवधी लागत असे. पण आता अमेरिकन सांकेतिक भाषेत अनेक व्हिडिओ उपलब्ध असल्यामुळे काही बधिरांना तर एका वर्षातच बाप्तिस्मा घेणे शक्य होते.
‘रथात राहणे’
१८. यहोनादाब येऊन मिळाल्यानंतर, येहू काय करण्यासाठी निघाला?
१८ सा.यु.पू ९०५ मध्ये, यहोनादाब येऊन मिळाल्यानंतर, येहू खोट्या उपासनेचा नाश करण्यासाठी निघाला. त्याने सर्व बआल उपासकांसाठी बोलावणे पाठवले: “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” त्यानंतर, बआलचा कोणी उपासक मागे राहिला तर नाही ना हे पाहण्यासाठी त्याने संपूर्ण देशात आपले जासूद धाडले. त्या खोट्या दैवताच्या महान मंदिरात लोक गर्दी करू लागले तेव्हा त्यांच्यामध्ये यहोवाचा एकही उपासक नाही याची त्याने खबरदारी घेतली. अखेरीस, येहू आणि त्याच्या सेनेने बआल उपासकांचा संहार केला. “या प्रकारे येहूने इस्राएल लोकांतून बआलमूर्ति काढून टाकिली.”—२ राजे १०:२०-२८.
१९. मानवजातीसमोर असलेल्या भवितव्याकडे पाहत असताना, आपण कोणता आत्मा दाखवण्यास हवा आणि आपण कोणते काम परिश्रमपूर्वक करण्याचे चालू ठेवले पाहिजे?
१९ आज, सर्व खोट्या धर्मांचा अखेरचा न्याय होणे फार जवळ आहे. देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली, ख्रिस्तीजन संपूर्ण मानवजातीला सुवार्तेची घोषणा करत आहेत आणि देवाचे भय बाळगण्याचे आणि खोट्या धर्मापासून स्वतःला वेगळे करण्याचे उत्तेजन देत आहेत. (प्रकटीकरण १४:६-८; १८:२, ४) यहोवाचा सिंहासनाधिष्ट राजा, येशू ख्रिस्त याच्या अंमलाखाली देवाच्या राज्याच्या अंकित होण्याचे उत्तेजन लीन जणांना देण्यात येते. (प्रकटीकरण १२:१०) या रोमांचकारी काळात, खऱ्या उपासनेप्रती खंबीर भूमिका घेत असताना आपला आवेश कमी होता कामा नये.
२०. सन १९९८ सेवा वर्षात काय करण्याचा तुमचा दृढसंकल्प असेल?
२० एकदा दावीद राजा फारच दबावाखाली होता तेव्हा त्याने प्रार्थना केली: “हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे; मी गाईन, मी स्तोत्रे गाईन. हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन.” (स्तोत्र ५७:७, ९) आपणही त्याच्याप्रमाणे स्थिर व्हावे. सन १९९७ च्या सेवा वर्षादरम्यान, अनेक कठीण परिस्थितींमध्ये देखील यहोवा देवाच्या गौरवार्थ उंच स्वरात स्तुतिगान करण्यात आले होते. चालू सेवा वर्षादरम्यान अशाच प्रकारचा किंबहुना त्याहीपेक्षा मोठा निनाद व्हावा. आपण असेच करत राहावे मग, आपल्याला निराश करण्यासाठी किंवा आपला विरोध करण्यासाठी सैतानाने कितीही अथक प्रयत्न केला तरी. अशा प्रकारे, आपण हे दाखवून देऊ, की आपले मन थोर येहू, येशू ख्रिस्ताविषयी सरळ आहे आणि आपण पुढील प्रेरित आर्जवाला मनःपूर्वक प्रतिक्रिया दाखवू: “अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.”—स्तोत्र ३२:११.
तुम्ही सांगू शकाल का?
◻इस्राएलमध्ये सा.यु.पू. ९०५ मध्ये कोणते बदल झाले?
◻आधुनिक-दिवसातील येहू कोण आहे आणि त्याच्याप्रती आपले ‘मन सरळ आहे,’ हे ‘मोठ्या लोकसमुदायाने’ कसे दाखवले आहे?
◻यहोवाच्या साक्षीदारांनी १९९७ च्या सेवा वर्षादरम्यान दाखवलेला आवेश वार्षिक अहवालाच्या कोणत्या आकडेवारींमुळे दिसून येतो?
◻सैतानाने आपल्याविरुद्ध काहीही केले, तरी १९९८ च्या सेवा वर्षादरम्यान आपण कोणता आत्मा दाखवू?
[१५ पानांवरील चित्र]
स्मारकविधीची विलक्षण उपस्थिती भवितव्यातील वाढीची उत्तम संभावना दाखवते
[१६ पानांवरील चित्र]
यहोनादाबाने जसे येहूला समर्थन दिले तसे “मोठा लोकसमुदाय” आज थोर येहू, येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या अभिषिक्त बांधवांना समर्थन देत आहे