वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. ४-७
  • तारण—याचा खरा अर्थ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारण—याचा खरा अर्थ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तारण—सर्व धर्मात प्राप्य?
  • येशूविषयीचे अचूक ज्ञान तारणाकरता अगत्याचे
  • देवाविषयीचे अचूक ज्ञान देखील अगत्याचे
  • आत्म्याने व खरेपणाने
  • विश्‍वास कृती करण्यास प्रवृत्त करतो
  • तारणाचा तुमच्यासाठी अर्थ
  • “तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • येशूमुळे तारण कसं मिळतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • तारले जाण्यासाठी आपण काय करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तारणासाठी जाहीर घोषणा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. ४-७

तारण—याचा खरा अर्थ

‘तुमचे तारण झालेय?’ सहसा हा प्रश्‍न विचारणाऱ्‍यांचा असा ग्रह असतो की आपण ‘स्वतःचा तारणकर्ता म्हणून येशूचा स्वीकार’ केला असल्यामुळे आपले तारण झाले आहे. दुसरीकडे पाहता, इतरांच्या मते तारण प्राप्त करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत आणि जोवर ‘येशू तुमच्या अंतःकरणात आहे,’ तोवर तुमचा काय विश्‍वास आहे, एवढेच काय तर तुम्ही कोणत्या चर्चचे सदस्य आहात या गोष्टींमुळे काहीएक फरक पडत नाही.

बायबलनुसार देवाची अशी इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे.” (१ तीमथ्य २:३, ४) त्याअर्थी जो कोणी तारणाचा स्वीकार करील त्याला तारण मिळू शकते. तथापि, तारले जाण्याचा नेमका अर्थ काय? स्वतःहून फारसे किंवा अजिबातच काही प्रयत्न न करता ते तुम्हाला आपोआपच प्राप्त होण्यासारखे आहे का?

“तारण” म्हणजे “संकटप्रसंगातून किंवा विनाशातून बचाव.” त्याअर्थी, खरे तारण म्हणजे केवळ एक प्रसन्‍न मानसिक स्थिती नव्हे. उलट, सध्याच्या या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशातून आणि अंततः खुद्द मृत्यूपासून सुटका होणे म्हणजे खरे तारण! पण देव नेमके कोणाला तारील? याच्या उत्तरासाठी, आपण या विषयावर येशू ख्रिस्ताने काय शिकविले ते तपासून पाहू. आपल्या या परीक्षणातून निघणाऱ्‍या निष्कर्षांमुळे कदाचित तुम्हाला नवल वाटेल.

तारण—सर्व धर्मात प्राप्य?

एकदा, येशूचे एका शोमरोनी स्त्रीशी बोलणे झाले. ती एक यहुदी स्त्री नसली तरीसुद्धा, तिचा अगदी योग्य विश्‍वास होता की “ज्याला ख्रिस्त म्हणतात तो” मशीहा येईल. (योहान ४:२५) केवळ हा विश्‍वास असणे तिचे तारण होण्यासाठी पुरेसे होते का? नव्हते, कारण येशूने त्या स्त्रीला अगदी सडेतोडपणे सांगितले: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता.” येशूला माहिती होते की या स्त्रीला तारण हवे असल्यास, तिला तिच्या उपासनेच्या पद्धतीत फेरबदल करावा लागेल. म्हणूनच येशूने खुलासा करून सांगितले: “तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.”—योहान ४:२२, २३.

आणखी एकदा, जेव्हा येशूने तारणाविषयीचा आपला दृष्टिकोन व्यक्‍त केला होता त्याप्रसंगी यहुदी धर्माच्या एका प्रमुख धार्मिक संप्रदायाचे लोक, अर्थात परुशी देखील त्यात गोवलेले होते. परुशांनी स्वतःच उपासनेची एक पद्धत निर्माण केलेली होती आणि ती देवाला स्वीकृत आहे असा त्यांचा ग्रह होता. पण, येशू त्या परुशांना काय म्हणाला ते पाहा: “अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम.”—मत्तय १५:७-९.

ख्रिस्तावर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍या आजच्या अनेक धार्मिक गटांविषयी काय? येशू त्या सर्वांनाच तारण प्राप्त करण्याचे ग्राह्‍य मार्ग म्हणून मान्य करील का? याबाबतीत आपल्याला अंदाज बांधण्याची गरज नाही, कारण येशूने स्पष्टपणे म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, ‘आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला’, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; ‘अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’”—मत्तय ७:२१-२३.

येशूविषयीचे अचूक ज्ञान तारणाकरता अगत्याचे

येशूच्या या शब्दांचा गर्भितार्थ विचार करायला लावणारा आहे. त्यातून असे सूचित होते की अनेक धर्मपरायण लोक ‘पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत’ नाहीत. तर मग, मनुष्याला खरे तारण कसे प्राप्त होऊ शकते? पहिले तीमथ्य २:३, ४ उत्तर देते: “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण [“अचूक,” NW] ज्ञानाप्रत पोहचावे.” (तिरपे वळण आमचे.)—पडताळा कलस्सैकर १:९, १०.

अशाप्रकारचे ज्ञान तारणप्राप्तीकरता अनिवार्य आहे. एका रोमी बंदिशाळेच्या नायकाने प्रेषित पौल आणि त्याचा सोबती सीला यांस “माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” असे विचारले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “प्रभू येशूवर विश्‍वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषितांची कृत्ये १६:३०, ३१) त्याअर्थी, त्या बंदिशाळेचा नायक आणि त्याच्या घराण्याचे सदस्य यांच्या मनात केवळ एक विशिष्ट प्रकारची भावना असून चालणार होते का? नाही, कारण पहिली गोष्ट म्हणजे, येशू कोण होता, त्याने काय केले आणि त्याने काय शिकविले याविषयी निदान थोडेफार समजून घेतल्याशिवाय, ते खऱ्‍या अर्थाने “प्रभू येशूवर विश्‍वास” ठेवू शकत नव्हते.

उदाहरणार्थ, येशूने एका स्वर्गीय सरकारच्या स्थापनेविषयी शिकविले; हे स्वर्गीय सरकार म्हणजे ‘देवाचे राज्य.’ (लूक ४:४३) तसेच, त्याने ख्रिस्ती नैतिकता आणि वर्तन यांसंबंधीही काही तत्त्वे मांडली. (मत्तय, अध्याय ५-७) राजनैतिक बाबींचा प्रश्‍न उद्‌भवतो तेव्हा आपल्या शिष्यांनी कोणती भूमिका घ्यावी यावर त्याने प्रकाश टाकला. (योहान १५:१९) त्याने एका जगव्याप्त शैक्षणिक कार्यक्रमाची सुरवात करून दिली आणि आपल्या अनुयायांना त्यात सहभाग घेण्यासाठी नेमले. (मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये १:८) होय, ‘येशूवर विश्‍वास ठेवण्यात’ बऱ्‍याच गोष्टी समजून घेणे समाविष्ट होते! म्हणूनच तर सत्य मानणाऱ्‍या या नवीन लोकांचा बाप्तिस्मा होण्याच्या आधी पौल आणि सीला यांनी “[बंदिशाळेच्या नायकाला] व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.”—प्रेषितांची कृत्ये १६:३२, ३३.

देवाविषयीचे अचूक ज्ञान देखील अगत्याचे

येशूवर खऱ्‍या अर्थाने विश्‍वास ठेवल्यास, तो ज्या देवाची उपासना करतो त्याची उपासना करणे हे ओघाओघाने आलेच. प्रार्थनेत येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

देवाच्या पुत्राने त्याच्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान, स्वतःकडे नव्हे, तर नेहमी आपल्या पित्याकडे लोकांचे लक्ष वेधले. आपण सर्वशक्‍तिमान परमेश्‍वर असल्याचा दावा त्याने कधीही केला नाही. (योहान १२:४९, ५०) आपण देवापेक्षा कनिष्ठ आहोत असे म्हणून येशूने कित्येकदा, देवाच्या व्यवस्थेत आपली कोणती भूमिका आहे हे स्पष्ट केले. (लूक २२:४१, ४२; योहान ५:१९) किंबहुना, येशूने स्पष्टपणे सांगितले: “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) तुमच्या चर्चने तुम्हाला देव आणि ख्रिस्त यांच्यातल्या खऱ्‍या नातेसंबंधाविषयी शिकविले आहे का? की येशू स्वतःच सर्वशक्‍तिमान परमेश्‍वर आहे असा तुम्हाला विश्‍वास करायला लावण्यात आला आहे? तुमचे तारण हे सत्य समजून घेण्यावर अवलंबून आहे.

प्रभूच्या प्रार्थनेत, येशूने आपल्या शिष्यांना असे म्हणण्याचे प्रोत्साहन दिले: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) बायबलच्या पुष्कळ भाषांतरांत देवाचे नाव लपवून त्याठिकाणी “प्रभू” हा शब्द वापरला आहे. तथापि, ‘जुन्या कराराच्या’ प्राचीन प्रतींमध्ये, देवाचे नाव सहा हजारापेक्षा अधिक वेळा आढळते! स्तोत्र ८३:१८ (पं.र.भा.) येथे सांगितलेले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” तुम्हाला यहोवा हे देवाचे नाव उपयोगात आणण्यास शिकवण्यात आले आहे का? नसल्यास, तुमचे तारण धोक्यात आहे, कारण “जो कोणी परमेश्‍वराच्या [“यहोवाच्या,” NW] नावाने त्याचा धावा करील तो तरेल!”—प्रेषितांची कृत्ये २:२१; पडताळा योएल २:३२.

आत्म्याने व खरेपणाने

येशू ख्रिस्ताने देवाचे वचन, बायबल याकडेही लक्ष वेधले. विशिष्ट गोष्टींविषयी देवाच्या दृष्टिकोनावर खुलासा करताना, तो कितीतरी वेळा म्हणत असे: “असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४, ७, १०; ११:१०; २१:१३) त्याचा मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री, येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली: “तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.

त्याअर्थी, देवाचे वचन बायबल यातील शिकवणुकी समजून घेणे ही देखील तारणप्राप्तीकरता एक आवश्‍यक बाब आहे. (२ तीमथ्य ३:१६) जीवनाचा अर्थ काय? देवाने दुष्टपणाला एवढ्या दीर्घकाळापर्यंत का खपवून घेतले? मनुष्य मरतो तेव्हा त्याचे काय होते? देव खरोखर लोकांना जळजळत्या नरकात यातना देतो का? पृथ्वीसाठी देवाचा उद्देश काय?a यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे केवळ बायबल देते. या विषयांवर अचूक समज मिळाल्याशिवाय आपण देवाची योग्य रितीने उपासना करू शकत नाही, कारण येशूने म्हटले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील”—योहान ४:२३.

विश्‍वास कृती करण्यास प्रवृत्त करतो

केवळ माहिती मिळवणे हे तारणाकरता पुरेसे नाही. ज्ञानाला प्रतिसाद देणाऱ्‍या हृदयात, देवाच्या अचूक ज्ञानामुळे विश्‍वास उत्पन्‍न होतो. (रोमकर १०:१०, १७; इब्री लोकांस ११:६) अशाप्रकारचा विश्‍वास कृती करण्यास प्रवृत्त करतो. उदाहरणार्थ, बायबल उपदेश देते: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे.”—प्रेषितांची कृत्ये ३:१९.

होय, तारणप्राप्तीकरता आचरण आणि नैतिकता यांविषयी देवाच्या दर्जांचे पालन करणे देखील समाविष्ट आहे. देवाच्या वचनाच्या प्रभावामुळे व्यक्‍तीचे रूपांतर घडते तसतसे प्रामाणिकपणा आणि खरेपणा यांसारखे सद्‌गुण, खोटे बोलणे आणि फसवेगिरी यांसारख्या जुन्या सवयींची जागा घेतात. (तीत २:१०) ती व्यक्‍ती समलैंगिकता, व्यभिचार आणि जारकर्म यांसारख्या लैंगिक गैरकृत्यांचा धिक्कार करते आणि निष्कलंक नैतिकता आचरू लागते. (१ करिंथकर ६:९-११) हा केवळ भावनांच्या आहारी जाऊन स्वीकारलेला तात्पुरता सदाचार नसून देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास आणि त्याचे अवलंबन केल्यामुळे होणारा एक कायमचा बदल असतो.—इफिसकर ४:२२-२४.

कालांतराने, देवाविषयीचे प्रेम आणि कदर यांच्या प्रेरणेने प्रामाणिक अंतःकरणाची व्यक्‍ती देवाला संपूर्ण समर्पण करून याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेते. (मत्तय २८:१९, २०; रोमकर १२:१) बाप्तिस्मा झालेल्या ख्रिस्तीजनांचे देवाच्या नजरेत तारण झालेले आहे. (१ पेत्र ३:२१) या दुष्ट जगाच्या येणाऱ्‍या नाशात, देव त्या संकटातून त्यांचा बचाव करण्याद्वारे त्यांचे पूर्णार्थाने तारण करील.—प्रकटीकरण ७:९, १४.

तारणाचा तुमच्यासाठी अर्थ

या संक्षिप्त चर्चेतून स्पष्ट झाले आहे की तारण प्राप्त करण्यात केवळ ‘येशू तुमच्या अंतःकरणात असण्यापेक्षा’ अधिक काही सामील आहे. तारणासाठी यहोवा देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे अचूक ज्ञान घेणे आणि आपल्या जीवनात आवश्‍यक ते बदल करणे अनिवार्य आहे. हे अतिशय कठीण काम आहे असे कदाचित भासेल, पण यहोवाचे साक्षीदार तुम्हाला या कार्यात मदत करण्यास सदैव तयार आहेत. एका विनामूल्य गृह बायबल अभ्यासाच्या माध्यमाने, ते तुम्हाला खऱ्‍या तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालू लागण्यास मदत करतील.b

देवाचा येणारा न्यायाचा दिवस किती जवळ आहे हे लक्षात घेता, हे पाऊल उचलणे कधी नव्हते इतके आज निकडीचे झाले आहे! हीच ती वेळ आहे की जेव्हा भविष्यवक्‍त्‌याच्या पुढील शब्दांकडे कान दिला पाहिजे: “परमेश्‍वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”—सफन्या २:२, ३.

[तळटीपा]

a या विषयांवरील स्पष्टीकरणासाठी, कृपया वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक पाहा.

b तुम्हाला एक गृह बायबल अभ्यास हवा असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीशी संपर्क साधा. किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना तुम्ही लिहू शकता.

[६ पानांवरील चौकट]

तारण प्राप्तीकरता आवश्‍यक पावले...

◻ देव व येशू यांविषयी अचूक ज्ञान प्राप्त करणे. —योहान १७:३.

◻ विश्‍वास ठेवणे.—रोमकर १०:१७; इब्री लोकांस ११:६.

◻ पश्‍चात्ताप करून वाईट मार्गातून परत फिरणे. —प्रेषितांची कृत्ये ३:१९; इफिसकर ४:२२-२४.

◻ समर्पण आणि बाप्तिस्मा.—मत्तय १६:२४; २८:१९, २०.

◻ जाहीर घोषणा करत राहणे.—मत्तय २४:१४; रोमकर १०:१०.

[७ पानांवरील चित्रं]

बायबलचा अभ्यास करणे, शिकलेल्या गोष्टी आचरणात आणणे, समर्पण आणि बाप्तिस्मा ही तारणाकडे नेणारी पावले आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा