यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०३ व्या वर्गाचा विद्यार्थी, विल हा आपली पत्नी पॅट्सी हिच्यासह नुकतेच पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाविषयी बोलताना म्हणाला, “आम्हाला खरंच ही सुसंधी मिळू शकली, माझा अजूनही विश्वास बसत नाही!” झाहीद आणि जेनी यांनी देखील त्याच्या म्हणण्यास दुजोरा दिला. ते म्हणाले, “इथं यायला मिळालं, हा आम्ही एक सन्मान समजतो.” प्रशालेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली होती. आता त्यांना आपले मिशनरी जीवन सुरू करण्याचे वेध लागले होते. पण त्याआधी, सप्टेंबर ६, १९९७ रोजी संपन्न झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना त्यांच्या मिशनरी कार्यनियुक्तीत यशस्वी होण्यासाठी सहायक ठरेल असे प्रेमळ मार्गदर्शन देण्यात आले.
नियमन मंडळाचे सदस्य थियोडोर जॅरस हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे—बेथेल कुटुंबाच्या सदस्यांव्यतिरिक्त वॉच टावर संस्थेच्या शाखा दप्तरांपैकी ४८ दप्तरांचे प्रतिनिधी आणि कॅनडा, युरोप, प्वेर्त रिको आणि संयुक्त संस्थाने या ठिकाणांहून आलेले आप्तेष्ट, सर्वजण आपला पाठिंबा आणि प्रेम सदैव या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे हे व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित होते. बंधू जॅरस यांनी एक वेधक विधान केले, ते असे की ख्रिस्ती धर्मजगताने पाठविलेल्या मिशनऱ्यांनी सहसा आपल्या मिशनरी कार्यापासून विचलित होऊन विद्वत्तापूर्ण कार्यांत किंवा कधीकधी तर राजकारणात देखील स्वतःला गुंतवून घेतले आहे. त्याउलट, गिलियड पदवीधर ज्या कार्याचे त्यांना प्रशिक्षण मिळाले आहे त्यासाठीच स्वतःला वाहून घेतात, अर्थात लोकांना बायबलचे शिक्षण देतात.
त्यानंतर सोसायटीच्या ब्रुकलिन कार्यालयात काम पाहणारे रॉबर्ट बट्लर “आपला मार्ग सफल करा” या विषयावर बोलले. त्यांनी खुलासा करताना म्हटले की, माणूस तर व्यक्तीच्या आर्थिक किंवा इतर साध्यतांवरून तिची सफलता मापतो; पण देव कोणत्या आधारावर व्यक्तीची सफलता ठरवतो हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे. येशूचे सेवाकार्य सफल झाले ते अनेक लोकांचे मतपरिवर्तन केल्यामुळे नव्हे, तर आपल्या नियुक्त कार्यात तो विश्वासू राहिला यामुळे. येशूने यहोवाला गौरविले आणि जगाच्या भ्रष्टतेचा स्वतःला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. (योहान १६:३३; १७:४) प्रत्येक ख्रिश्चनाने अनुकरण करण्याजोग्या गोष्टी.
पौर्वात्य देशांतील एक भूतपूर्व मिशनरी, रॉबर्ट पेव्ही यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचा विषय होता, “आपणाला सर्वांचे दास करा.” प्रेषित पौल एक सफल मिशनरी होता. या सफलतेमागचे रहस्य? त्याने स्वतःला सर्वांचा दास केले. (१ करिंथकर ९:१९-२३) वक्त्याने स्पष्टीकरण केले की, “अशी मनोभूमिका बाळगणारा गिलियड पदवीधर मिशनरी सेवा ही एक बढती आहे किंवा संघटनेत आणखी मानाचे हुद्दे मिळवण्याची प्राथमिक पायरी आहे या दृष्टिकोनातून पाहणार नाही. मिशनरी आपल्या नियुक्त ठिकाणी जातो तो केवळ एकाच उद्देशाने, अर्थात—सेवा करण्यासाठी, कारण दास हेच करतात.”
प्रामुख्याने २ करिंथकर अध्याय ३ आणि ४ यांचा आधार घेऊन नियमन मंडळाचे सदस्य गेरट लॉश यांनी विद्यार्थ्यांना “आरशांप्रमाणे यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करा” असे आर्जवले. त्यांनी आठवण करून दिली की, देवाचे ज्ञान हे प्रकाशाप्रमाणे असून एखादा ख्रिस्ती जेव्हा हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपले अंतःकरण खुले करतो तेव्हा तो या प्रकाशाने प्रज्वलित होतो. सुवार्तेचा प्रचार आणि उत्तम आचरण यांद्वारे आपण हा प्रकाश प्रतिबिंबित करतो. त्यांनी कबूल केले की, “काही वेळा आपण कमी पडतो असे वाटू लागेल. पण अशा भावना सारख्या मनात येऊ लागतात, तेव्हा यहोवावर विसंबून राहा कारण ‘सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे.’” (२ करिंथकर ४:७) २ करिंथकर ४:१ येथील पौलाच्या शब्दांच्या सामंजस्यात बंधू लॉश यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले: “आपली मिशनरी कार्यनियुक्ती कधीही सोडू नका. आरसा नेहमी चकाकता ठेवा!”
गिलियड विद्याशाखेचे सदस्य कार्ल ॲडम्स यांच्या भाषणाचा लक्षवेधक विषय होता, “यहोवा कोठे आहे?” हा प्रश्न विश्वात देवाचे स्थान कोठे आहे यासंदर्भात नव्हता, तर यहोवाचा दृष्टिकोन आणि त्याच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेणे किती महत्त्वाचे आहे यासंदर्भात होता. ते म्हणाले, “तणावात असताना यहोवाच्या सेवेत कित्येक वर्षांपासून विश्वासू राहिलेल्या व्यक्तीला देखील, याचा विसर पडू शकतो.” (ईयोब ३५:१०) आपल्या आधुनिक दिवसाविषयी काय? १९४२ साली, देवाच्या लोकांना मार्गदर्शनाची गरज होती. प्रचाराचे कार्य संपण्याच्या बेतात होते का, की आणखी कार्य शिल्लक होते? आपल्या सेवकांच्या संबंधाने यहोवाच्या मनात नेमके काय होते? देवाच्या वचनाच्या अभ्यासातून उत्तर स्पष्ट होत गेले. बंधू ॲडम्स यांनी सांगितल्यानुसार, “ते वर्ष संपण्याआधीच वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या स्थापनेसंबंधी योजना आखून तयार होत्या.” या प्रशालेतून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या मिशनऱ्यांच्या कार्यावर यहोवाने भरभरून आशीर्वाद दिला यात शंकाच नाही.
प्रशालेतील आणखी एक मार्गदर्शक, मार्क नुमॅर हे देखील याप्रसंगी बोलले. “तुमच्याकडे सोपवलेल्या रुपयांचे तुम्ही काय करणार?,” या विषयावरील आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना गिलियडमध्ये लाभलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या नियुक्त ठिकाणी पोहोंचल्यावर लवकरात लवकर उपयोग करू लागण्याचे प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, “लोकांशी ओळख करून घेण्याचा मनस्वी प्रयत्न करा. त्यांच्यासोबत मिसळा. त्या देशातील चालीरिती, इतिहास, तेथील हसण्या-हसवण्याचे विषय इत्यादी, जाणून घेण्याची उत्सुकता बाळगा. जितक्या लवकर तुम्ही त्यांची भाषा शिकाल, तितकेच तुम्हाला सोपे जाईल.”
आवेशी विद्यार्थी आपल्या सेवेत आनंदी
गिलियड येथे असताना अभ्यासाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना ११ स्थानिक मंडळ्यांमध्ये देखील नियुक्त करण्यात आले होते. शनिवार-रविवार ते मोठ्या आवेशाने प्रचार कार्यात सहभाग घेत असत. गिलियड विद्याशाखेच्या वॉलस लिव्हरन्स यांनी विद्यार्थ्यांपैकी अनेकांना आपले अनुभव श्रोत्यांना सांगण्याची विनंती केली. बाजारांत, वाहनांच्या पार्किंग क्षेत्रांत, बिझनेस क्षेत्रांत, रस्त्यावर आणि घरोघरी प्रचार करताना त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन करताना त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांपैकी काहींनी आपल्या मंडळीच्या क्षेत्रात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या विदेशी भाषिकांपर्यंत सुवार्ता पोहोंचविण्याचा प्रयत्न केला होता. प्रशिक्षणाच्या ५ महिन्यांच्या कालावधीत या १०३ व्या वर्गातील सदस्यांनी जवळजवळ १० बायबल अभ्यास सुरू केले व चालवले होते.
अनुभवी मिशनऱ्यांचे कानमंत्र
कार्यक्रमाच्या या रोचक भागानंतर, पॅट्रिक ला फ्रॅन्का आणि विल्यम व्हॅन दी वॉल यांनी शाखा समितीतील सात सदस्यांना, मिशनरी जीवनातून त्यांना शिकायला मिळालेले, विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे धडे सांगण्यास निमंत्रित केले. त्यांनी पदवीधरांना आपआपली मिशनरी कार्यनियुक्ती यहोवाकडून आली आहे असे मानून सदैव आपल्या कार्यात निष्ठावानपणे झटत राहण्याचा सल्ला दिला. गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्यांनी इतर देशांतील कार्यात किती हितकारक योगदान केले आहे याविषयी देखील ते बोलले.
वर्षानुवर्षे आनंदी आणि परिणामकारक मिशनरी या नात्याने कार्य करीत राहण्यास या शाखा समितीतील सदस्यांना कशामुळे मदत मिळाली असावी? स्थानिक बांधवांना सहकार्य दिल्यामुळे त्यांच्याकडून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले होते. त्यांनी आपल्या नियुक्त ठिकाणी येताच तेथील भाषा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आवश्यकतेनुसार स्वतःत बदल करण्याचे आणि स्थानिक चालीरितींनुसार जुळवून घेण्याचे त्यांनी शिकून घेतले होते. गिलियड प्रशालेतील सर्वप्रथम वर्गातील विद्यार्थी आणि एव्हाना ५४ वर्षे मिशनरी कार्य केलेल्या चार्ल्स आयझनहावर यांनी मिशनऱ्यांनी अनुभवाने आत्मसात केलेले “पाच कानमंत्र” विद्यार्थ्यांना सांगितले: (१) बायबलचा नियमित अभ्यास, (२) भाषेचा अभ्यास, (३) सेवाकार्यात सक्रिय सहभाग, (४) मिशनरी निवासस्थानात शांतीपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न आणि (५) यहोवाला वेळोवेळी प्रार्थना. या व्यावहारिक सल्ल्यामुळे आणि त्यासोबतच या अनुभवी मिशनऱ्यांना यहोवाच्या सेवेत मिळालेल्या, सर्वांना दिसून येणाऱ्या आनंदामुळे विद्यार्थी अत्यंत प्रभावित झाले. आर्मान्डो आणि लुपे यांच्या शब्दांत, “आपल्या जीवनाविषयी बोलताना त्यांच्या शब्दाशब्दांतून आनंद झळकत होता.”
या मुलाखतींनंतर एक शेवटले भाषण झाले. नियमन मंडळाचे सदस्य ॲल्बर्ट श्रोडर यांनी आपल्या भाषणासाठी निवडलेला विषय होता, “देव वचनाच्या विश्वासू कारभाऱ्यांना गवसणारी सत्याची मोलवान रत्ने.” बायबल हे गिलियड प्रशालेचे प्रमुख पाठ्यपुस्तक असल्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांचे या भाषणाकडे लक्ष आकर्षिले गेले. बंधू श्रोडर यांनी सांगितले की ५० वर्षांपूर्वी जेव्हा पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) हाती घेण्यात आले तेव्हा नवे जग बायबल भाषांतर समितीच्या अभिषिक्त सदस्यांनी लोकांच्या स्वीकृतीची अपेक्षा करण्याऐवजी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर भाव ठेवला. (यिर्मया १७:५-८) तथापि, अलीकडेच काही जाणकारांनी नवे जग भाषांतराच्या उच्च दर्जाला मान्यता दिली आहे. संस्थेला लिहिलेल्या एका पत्रात, एका अभ्यासकाने लिहिले: “दर्जेदार प्रकाशन मला पाहता क्षणीच ओळखू येते, आणि तुमच्या ‘नवे जग बायबल भाषांतर समितीने’ याबाबतीत खरंच कमाल केली आहे.”
या भाषणानंतर, विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या आणि त्यांना नियुक्त करण्यात आलेली ठिकाणे श्रोत्यांपुढे घोषित करण्यात आली. हे अत्यंत भावस्पर्शी क्षण होते, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी. त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या वतीने आभारप्रदर्शनाचे पत्र वाचून दाखवले तेव्हा अनेकांना गहिवरून आले होते. मिशनरी कार्यासाठी काही विद्यार्थ्यांनी कितीतरी वर्षांपासून प्रयत्न केलेले होते. गिलियड अभ्यासक्रम इंग्रजीतून असेल हे माहीत असल्यामुळे काहीजण या भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे म्हणून इंग्रजी मंडळ्यांसोबत सहवास राखू लागले होते. इतरजण स्वतःच्या देशातच किंवा परदेशी, अशा ठिकाणी स्थलांतर करून गेले होते जेथे पायनियरांची अतिशय गरज होती. आणखी काहीजणांनी अनुभव वाचून, संशोधन करून, किंवा टू दी एन्ड्स ऑफ दी अर्थ हा सोसायटीचा व्हिडिओपट पुन्हा पुन्हा पाहून तयारी केली होती.
सुरवातीला उल्लेखलेले विल आणि पॅट्सी, विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेल्या जिव्हाळ्याने भारावून गेले होते. “आमची ओळखही नसलेले लोक आम्हाला जवळ घेत होते, आमचे फोटो काढत होते. नियमन मंडळाचे एक बंधू तर आमचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!’” १०३ व्या वर्गातील विद्यार्थी अत्यंत प्रिय आहेत यात शंकाच नाही. त्यांना उत्तम प्रशिक्षण देण्यात आले आहे. गिलियडमध्ये मिळालेले प्रशिक्षण त्यांना यशस्वी विद्यार्थ्यांपासून यशस्वी मिशनरी होण्यापर्यंत प्रगती करण्यास सहायक ठरेल.
[२२ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ९
नेमलेले देश: १८
एकूण विद्यार्थी: ४८
विवाहित जोडप्यांची संख्या: २४
सरासरी वय: ३३ सत्यात सरासरी वर्षे: १६
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२
[२३ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १०३ वा पदवीधर वर्ग
खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत.
(१) बन, ए.; डालस्टेड, एम.; काम्पान्या, झेड.; बॉयाज्युअलू, आर.; ओगॅन्डो, जी.; नीकनचक, टी.; मेलव्हिन, एस. (२) मे, एम.; मॅपला, एम.; लुइन, जे; हायटामा, डी.; हर्नान्डेझ, सी.; बॉयाज्युअलू, एन.; स्टर्म, ए.; मेलव्हिन, के. (३) टॉम, जे.; मॅपला, ई.; नॉल, एम.; टीझडेल, पी.; राइट, पी.; पेरस, एल.; शेनाफेल्ट, एम.; पॅक, एच. (४) मर्फी, एम.; काम्पान्या, जे.; स्टीवर्ट, एस.; शेरेडा, एम.; रीड, एम.; पेरस, ए.; टीझडेल, डब्ल्यु.; पॅक, जे. (५) स्टीवर्ट, डी.; राइट, ए.; शेरेडा, पी.; नीकनचक, एफ.; रीड, जे.; हायटामा, के.; ओगॅन्डो, सी; शेनाफेल्ट, आर. (६) मर्फी, टी.; हर्नान्डेझ, जे.; नॉल, एम.; बन, बी.; टॉम, आर.; डालस्टेड, टी.; लुइन, झेड.; मे, आर.; स्टर्म, ए.
[२४ पानांवरील चित्र]
आमची नियुक्ती कोठे?