“आपसात क्षमा करा”
“एकमेकांचे सहन करा, आणि . . . आपसात क्षमा करा.”—कलस्सैकर ३:१३.
१. (अ) इतरांना “सात वेळा” क्षमा करावी, असे पेत्राने सुचवले तेव्हा आपण उदार आहोत असे त्याला का वाटले असावे? (ब) आपण “साताच्या सत्तर वेळा” क्षमा करावी, असे येशूने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
“प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” (मत्तय १८:२१) असे सुचवण्याद्वारे आपण फार उदार आहोत असे कदाचित पेत्राला वाटले असावे. त्याकाळी, रब्बी परंपरेनुसार असे सांगण्यात येत असे, की अपराध्याला त्याच त्या अपराधासाठी तीनपेक्षा अधिक वेळा क्षमा करण्यात येऊ नये.a येशूने पुढीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले तेव्हा पेत्राला झालेल्या आश्चर्याची कल्पना करा: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा”! (मत्तय १८:२२) सात या अंकाची पुनरावृत्ती करण्याचा अर्थ होता, “अमर्याद.” येशूच्या दृष्टीने, ख्रिस्ती व्यक्तीने इतरांना किती वेळा क्षमा करावी याकरता कोणतीही मर्यादा नाही.
२, ३. (अ) अशा काही परिस्थिती कोणत्या आहेत जेव्हा इतरांना क्षमा करणे अवघड वाटते? (ब) इतरांना क्षमा करणे आपल्याच हिताचे आहे, असा विश्वास आपण का बाळगू शकतो?
२ तथापि, वरील सल्ला लागू करणे, नेहमीच इतके सोपे नाही. अन्यायामुळे मन दुखावले गेले नाही असा आपल्यांपैकी कोण आहे? तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला होता त्यानेच कदाचित तुमचा विश्वासघात केला असेल. (नीतिसूत्रे ११:१३) जवळच्या मित्राचे अविचारी बोलणे तुम्हाला ‘तलवारीच्या भोसकण्याप्रमाणे वाटले असेल.’ (नीतिसूत्रे १२:१८) तुम्ही ज्यावर प्रेम केले किंवा तुमचा ज्यावर विश्वास होता त्यानेच तुम्हाला वाईट वागणूक दिली तर ती गोष्ट तुमच्या जिव्हारी लागेल. अशा गोष्टी होतात तेव्हा आपल्याला राग येणे, हे स्वाभाविकच आहे. अपराध्याशी अबोला धरण्याचा आपला कल असेल, किंबहुना त्याला हरएक प्रसंगी टाळण्याचाही आपण प्रयत्न करू. त्याला क्षमा करणे म्हणजे आपल्याला दुखावल्याबद्दल त्याला कोणतीही शिक्षा न करणे असे वाटेल. पण द्वेष मनात बाळगल्याने आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो.
३ या कारणास्तव, येशू आपल्याला क्षमा करण्याचे शिकवतो—“साताच्या सत्तर वेळा.” त्याच्या शिकवणुकीमुळे निश्चितच आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहंचणार नाही. त्याने जे काही शिकवले ते सर्व यहोवापासून होते आणि ‘यहोवा आपल्याला हिताच्याच गोष्टी शिकवतो.’ (यशया ४८:१७; योहान ७:१६, १७) तर मग हे तर्कसंगत आहे, की इतरांना क्षमा करणे हे आपल्याच हिताचे आहे. आपण क्षमा का करावी आणि कशी करावी याची चर्चा करण्यापूर्वी क्षमा म्हणजे नक्की काय आहे आणि काय नाही हे स्पष्ट होणे मदतदायी ठरेल. क्षमाशीलतेची आपली संकल्पना, इतर जन आपल्याला दुखावतात तेव्हा त्यांना क्षमा करण्याच्या आपल्या क्षमतेशी संबंधित असेल.
४. इतरांना क्षमा करण्याचा अर्थ काय होत नाही, पण क्षमाशीलतेची व्याख्या कशी केली जाते?
४ व्यक्तिगत अपराधांकरता इतरांना क्षमा करण्याचा असा अर्थ होत नाही, की त्यांनी जे काही केले त्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यास क्षुल्लक समजतो; आपला गैरफायदा घेण्यास त्यांना मुभा देतो असाही त्याचा अर्थ होत नाही. नाहीतरी, यहोवा आपल्याला क्षमा करतो तेव्हा तो निश्चितच आपली पातके क्षुल्लक समजत नाही आणि पापमय व्यक्तींना त्याच्या दयेखाली चिरडून जाण्याची अनुमती तो देणार नाही. (इब्री लोकांस १०:२९) शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) यानुसार क्षमाशीलतेची व्याख्या अशा प्रकारे करण्यात आली आहे, “अपराध्याला क्षमा करण्याचे कृत्य; त्याचा द्वेष न करणे आणि त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न न करणे.” (खंड १, पृष्ठ ८६१)b इतरांना क्षमा करण्यासंबंधी बायबल आपल्याला अनेक सबळ कारणे पुरवते.
इतरांना क्षमा का करावी?
५. इतरांना क्षमा करण्याचे कोणते महत्त्वपूर्ण कारण इफिसकर ५:१ येथे देण्यात आले आहे?
५ इफिसकर ५:१ येथे इतरांना क्षमा करण्याचे एक प्रमुख कारण देण्यात आले आहे: “तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” आपण कोणत्या अर्थाने ‘देवाचे अनुकरण करणारे’ असले पाहिजे? “तर मग,” या शब्दांचा आधीच्या वचनाशी संबंध आहे, जे म्हणते: “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ४:३२) होय, क्षमाशीलतेची बाब येते तेव्हा आपण देवाचे अनुकरण करणारे असले पाहिजे. लहान मूल जसे आपल्या वडलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते तसे आपणही यहोवाची प्रिय मुले या नात्याने आपल्या स्वर्गीय क्षमाशील पित्याचे अनुकरण केले पाहिजे. यहोवा स्वर्गातून खाली पाहतो तेव्हा त्याची पृथ्वीवरील मुले एकमेकांना क्षमा करण्याद्वारे त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात हे पाहून त्याला किती आनंद होत असेल!—लूक ६:३५, ३६; पडताळा मत्तय ५:४४-४८.
६. यहोवाच्या आणि आपल्या क्षमाशीलतेमध्ये कोणते जमीनअस्मानाचे अंतर आहे?
६ हे मान्य आहे, की आपल्याला यहोवाप्रमाणे पूर्णपणे क्षमा करणे शक्य नाही. म्हणूनच, आपण एकमेकांना क्षमा का केली पाहिजे, याकरता हे आणखी एक कारण आहे. यावर विचार करा: आपल्या आणि यहोवाच्या क्षमाशीलतेमध्ये जमीनअस्मानाचे अंतर आहे. (यशया ५५:७-९) आपल्याविरुद्ध पातके केलेल्यांना आपण क्षमा करतो तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला याची जाण असते, की आज किंवा उद्या आपल्यालाही त्यांच्या क्षमेची अपेक्षा करावी लागेल. मानवांच्या बाबतीत, नेहमी पापी लोक पापी लोकांना क्षमा करत असतात. तथापि, यहोवाच्या बाबतीत क्षमा ही नेहमी एकमार्गी असते. तो आपल्याला क्षमा करतो, पण त्याला क्षमा करण्याची आपल्याला केव्हाही गरज पडणार नाही. यहोवा कोणत्याही प्रकारचे पाप करत नाही, तरी तो इतक्या प्रेमळपणे आणि पूर्णपणे आपल्याला क्षमा करतो तर मग, आपण पापमय मानवांनी एकमेकांना क्षमा करू नये काय?—मत्तय ६:१२.
७. दयेचे कारण असतानाही आपण इतरांना क्षमा करत नाही तेव्हा त्याचा यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर कोणता विपरीत परिणाम होऊ शकतो?
७ याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दयेचे कारण असतानाही आपण इतरांना क्षमा करत नाही तेव्हा देवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आपण एकमेकांना क्षमा करावी, असे यहोवा केवळ आपल्याला सांगत नाही, तर तो तसे करण्याची आपल्याकडून अपेक्षा देखील करतो. शास्त्रवचनांच्या अनुसार, क्षमाशील असण्याची एक प्रेरणा म्हणजे यहोवा आपल्याला क्षमा करील किंवा त्याने पूर्वी आपल्याला क्षमा केली आहे. (मत्तय ६:१४; मार्क ११:२५; इफिसकर ४:३२; १ योहान ४:११) तर मग, क्षमा करण्याचे सबळ कारण असतानाही आपण इतरांना क्षमा करण्यास इच्छुक नसतो तेव्हा यहोवाने आपल्याला क्षमा करावी अशी अपेक्षा आपण खरोखरच बाळगू शकतो का?—मत्तय १८:२१-३५.
८. क्षमाशील होण्याचा परिणाम आपले सर्वोत्तम हित साधण्यात का आहे?
८ आपल्या लोकांनी ‘ज्या सन्मार्गाने चालले पाहिजे तो मार्ग’ यहोवा त्याच्या लोकांना शिकवतो. (१ राजे ८:३६) एकमेकांना क्षमा करण्याचे तो आपल्याला शिकवतो तेव्हा आपले चांगले व्हावे असेच त्याला मनापासून वाटत असते. चांगल्या कारणास्तव बायबल आपल्याला सांगते की, “क्रोधाला वाट द्या.” (रोमकर १२:१९) द्वेषभावनेचे ओझे जीवनात वाहण्यासाठी फार जड आहे. आपण या द्वेषभावनेला आपल्या मनात घर करू दिल्यास आपल्या विचारांचा ऱ्हास होतो, आपल्या शांतीचा भंग होतो आणि आपल्या आनंदावरही विरजण पडते. मत्सरासारख्या दीर्घकाळाच्या क्रोधामुळे त्याचा आपल्या शारीरिक प्रकृतीवर हानीकारक परिणाम होऊ शकतो. (नीतिसूत्रे १४:३०) या सर्व गोष्टी आपण अनुभवत असतो तेव्हा अपराध्याला आपल्या विपन्नावस्थेची पुसटशी जाण देखील नसेल! आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याला हे माहीत आहे, की इतरांना मनमोकळेपणाने क्षमा करण्याची आवश्यकता केवळ इतरांच्या चांगल्याकरता नाही तर आपल्या स्वतःच्या हिताकरता देखील आहे. क्षमा करण्याचा बायबलचा सल्ला खरोखरच ‘चालण्याकरता सन्मार्ग आहे.’
“एकमेकांचे सहन करा”
९, १०. (अ) कोणत्या प्रकारच्या परिस्थितींत औपचारिक क्षमेची आवश्यकता असतेच असे नाही? (ब) “एकमेकांचे सहन करा” ही अभिव्यक्ती काय सुचवते?
९ शारीरिक इजा साधारण खरचटण्यापासून ते खोल जखमेपर्यंत होऊ शकतात आणि सर्व जखमांची एकाच प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. दुखावलेल्या भावनांच्या बाबतीत देखील हेच खरे आहे—काही जखमा इतर जखमांपेक्षा अधिक खोल असतात. इतरांसोबतच्या नातेसंबंधातील छोट्याछोट्या अपराधांचा बाऊ करण्याची खरोखरच काही गरज आहे का? क्षुल्लक चिडचिडेपणा, अनादर करणे, गांजणूक या गोष्टी तर आपल्या जीवनाच्या भाग आहेत आणि त्याकरता नेहमीच औपचारिक क्षमेची आवश्यकता असतेच असे नाही. इतरांच्या क्षुल्लक चुकांमुळे आपण त्यांना टाळतो आणि त्यांच्याशी पूर्वीप्रमाणे संबंध ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आपली क्षमा मागावी अशी अपेक्षा करतो, अशा प्रकारची आपली ख्याती असल्यास, आपल्या सोबतीत अधिक सावधानपूर्वक राहण्याकरता—सुरक्षित अंतर ठेवण्याकरता आपण इतरांवर कदाचित जोर देऊ!
१० त्याऐवजी ‘समजूतदारपणाची ख्याती असणे’ हे कितीतरी चांगले आहे. (फिलिप्पैकर ४:५, सुबोध भाषांतर) अपरिपूर्ण प्राणी या नात्याने खांद्याला खांदा लावून सेवा करत असता, वेळोवेळी आपले बांधव चीड आणून देतील त्यामुळे आपणही जशास तसे वागू, अशी माफक अपेक्षा आपण करू शकतो. कलस्सैकर ३:१३ येथे आपल्याला सल्ला देण्यात आला आहे: “एकमेकांचे सहन करा.” ही अभिव्यक्ती सुचवते, की इतरांसोबत सहनशील असावे, त्यांच्यातील आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्याला त्रासदायक वाटणारी त्यांची वर्तणूक सहन करावी. अशा प्रकारच्या सहनशीलतेमुळे आणि आत्मसंयमामुळे इतरांशी व्यवहार करताना होणारे छोटेछोटे अपराध—मंडळीच्या शांतीचा कोणत्याही प्रकारे भंग न करता सहन करण्यास आपल्याला मदत होते.—१ करिंथकर १६:१४.
जखम खोलवर असते तेव्हा
११. इतर जन आपल्याविरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांना क्षमा करण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकते?
११ तथापि, इतरांनी आपल्याविरुद्ध पातक करून आपल्यावर खोल घाव केला असल्यास काय? पातक इतके गंभीर नसल्यास “आपसात क्षमा करा” हा बायबलचा सल्ला लागू करण्यास आपल्याला कठीण जाणार नाही. (इफिसकर ४:३२) क्षमा करण्याची अशा प्रकारची तत्परता पेत्राच्या प्रेरित शब्दांच्या एकवाक्यतेत आहे: “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा; कारण प्रीति पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) आपण देखील पापी आहोत ही बाब लक्षात ठेवल्याने इतरांचे अपराध सोडून देण्यास आपल्याला शक्य होते. आपण अशा प्रकारे जेव्हा क्षमा करतो तेव्हा द्वेषभावनेला आपण आपल्या मनात घर करू देत नाही, उलटपक्षी ती भावना आपण काढून टाकतो. परिणामी, अपराध्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला कायमची इजा पोहंचणार नाही आणि मंडळीतील मौल्यवान शांती टिकवून ठेवण्यासाठी देखील आपण हातभार लावतो. (रोमकर १४:१९) कालांतराने, अपराध्याने काय केले होते, याचे पूर्णपणे विस्मरण होईल.
१२. (अ) एखाद्याने आपल्याला फारच खोलवर इजा पोहंचवली असल्यास आपल्याला कोणत्या प्रकारचा पुढाकार घेण्याची गरज असेल? (ब) आपण लवकर तंटा सोडवला पाहिजे, हे इफिसकर ४:२६ येथील शब्द कशा प्रकारे दाखवून देतात?
१२ पण, एखाद्याने आपल्याविरुद्ध फारच गंभीर पातक करून आपल्याला खोलवर इजा पोहंचवली असल्यास काय? उदाहरणार्थ, विश्वासू मित्राला तुम्ही मोठ्या विश्वासाने सांगितलेली तुमची व्यक्तिगत बाब त्याने उघड केली असेल. तुम्हाला फार दुःख, मानखंडना आणि विश्वासघात झाल्याचे वाटते. तुम्ही ती बाब विसरण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती गोष्ट तुमच्या मनातून काही केल्या जाणार नाही. अशा वेळी, समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घेण्याची गरज असेल, कदाचित त्यासाठी तुम्हाला अपराध्याबरोबर बोलावे लागेल. गोष्ट चिघळण्याआधीच त्याविषयी बोलणे समंजसपणाचे आहे. पौलाने आपल्याला असा उपदेश केला: “तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका [म्हणजे, आपला राग मनात ठेवणे किंवा व्यक्त करणे], तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) यहुद्यांमध्ये सूर्यास्ताने दिवस संपत असे आणि सूर्योदयाने नवीन दिवसाची सुरवात होत असे, या वास्तविकतेचा आपण विचार करतो तेव्हा पौलाचा सल्ला अधिक जोरदार होतो. यास्तव सल्ला हा दिला आहे: लवकरात लवकर तंटा मिटवा!—मत्तय ५:२३, २४.
१३. ज्याने अपराध केला आहे त्याच्याकडे आपण जातो तेव्हा आपला कोणता उद्देश असला पाहिजे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्या सूचना मदतदायी ठरू शकतात?
१३ अपराध्याकडे आपण कसे गेले पाहिजे? “शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा,” असे १ पेत्र ३:११ म्हणते. तर मग, तुमचा उद्देश राग व्यक्त करणे हा नसून तुमच्या बांधवासोबत शांती प्रस्थापित करणे हा आहे. तो उद्देश साध्य करण्यासाठी कटू शब्दांचा वापर किंवा अयोग्य हावभाव टाळणे उचित आहे; दुसऱ्या व्यक्तीकडून तशाच प्रकारची प्रतिक्रिया मिळेल. (नीतिसूत्रे १५:१८; २९:११) याशिवाय, तिखटमीठ लावून सांगणे टाळावे जसे, “तू नेहमी . . . !” किंवा, “तू कधीही . . . !” अशा प्रकारे तिखटमीठ लावून सांगितल्यामुळे अपराधी केवळ बचावात्मक भूमिका घेईल. उलटपक्षी, तुमच्या आवाजातून किंवा चेहऱ्यावरील हावभावातून हे स्पष्ट व्हावे, की तुम्हाला ज्यामुळे खोलवर इजा झाली आहे तो तंटा सोडवण्याची तुमची इच्छा आहे. जे काही घडले त्यामुळे तुम्हाला कसे वाटते ते स्पष्ट सांगा. दुसऱ्या व्यक्तीला तिने केलेल्या कार्याविषयी सांगण्याची संधी द्या. तिला काय म्हणायचे आहे ते ऐका. (याकोब १:१९) यामुळे कोणता चांगला परिणाम होईल? नीतिसूत्रे १९:११ सांगते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” दुसऱ्या व्यक्तीच्या भावना आणि तिच्या कार्यांची कारणे समजावून घेतल्यामुळे तिच्याविषयी असणारे नकारात्मक विचार आणि भावना निघून जातील. शांती राखण्याच्या उद्देशाने आपण पावले उचलतो आणि तशी मनोवृत्ती कायम ठेवतो तेव्हा बहुतेक वेळा गैरसमज दूर होतात, योग्य ती माफी मागितली जाते आणि क्षमा देखील केली जाते.
१४. आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा कोणत्या अर्थाने विसरले पाहिजे?
१४ जे काही घडले ते प्रत्यक्ष विसरलेच पाहिजे, असा क्षमा करण्याचा अर्थ होतो का? याबाबतीत आधीच्या लेखात चर्चा करण्यात आलेले स्वतः यहोवाचे उदाहरण आठवा. यहोवा आपली पातके विसरतो असे बायबल म्हणते तेव्हा त्याला आपली पातके आठवता येऊ शकत नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही. (यशया ४३:२५) उलटपक्षी, तो या अर्थाने विसरतो, की एकदा त्याने क्षमा केल्यानंतर तो त्या पातकांबद्दल भवितव्यात कारवाई करत नाही. (यहेज्केल ३३:१४-१६) त्याचप्रमाणे, सहमानवांना क्षमा करणे म्हणजे, त्यांनी जे काही केले ते आपल्याला आठवणारच नाही, असे नाही. तथापि, आपण या अर्थाने विसरू शकतो, की अपराध्याने आपल्याविरुद्ध जे काही केले ते मनात बाळगणार नाही किंवा त्याचा उल्लेख आपण भवितव्यात पुन्हा करणार नाही. अशा प्रकारे समस्येचे निरसन होण्याकरता त्याविषयी चहाडी करणे उचित ठरणार नाही, तसेच बहिष्कृत असल्याप्रमाणे वागणूक देऊन अपराध्याला पूर्णपणे टाळणे देखील प्रेमळपणाचे होणार नाही. (नीतिसूत्रे १७:९) हे खरे आहे, की त्यासोबतचा आपला नातेसंबंध सुधारण्यासाठी काही काळ उलटेल; त्यासोबत आपली पहिल्याप्रमाणे सलगी राहणार नाही. पण तरीही आपला एक ख्रिस्ती बांधव या नात्याने आपण त्याच्यावर प्रेम करू आणि शांतिमय नातेसंबंध राखण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करू.—पडताळा लूक १७:३.
क्षमा करणे अशक्य वाटते तेव्हा
१५, १६. (अ) अपश्चात्तापी पातक्याला ख्रिश्चनांनी क्षमा करण्याची अपेक्षा केली जाते का? (ब) स्तोत्र ३७:८ येथील बायबलचा सल्ला आपण कसा लागू करू शकतो?
१५ तथापि, इतर लोक आपल्याला अगदी खोलवर घाव करून आपल्याविरुद्ध पाप करतात तसेच असे करूनही ते त्यांचे पाप कबूल करत नाहीत, कोणताही पश्चात्ताप दाखवत नाहीत आणि अपराधी म्हणून कोणतीही क्षमा मागत नाहीत, तेव्हा काय करावे? (नीतिसूत्रे २८:१३) शास्त्रवचने हे स्पष्टपणे दाखवून देतात, की यहोवा अपश्चात्तापी, कठोर पातक्याला क्षमा करत नाही. (इब्री लोकांस ६:४-६; १०:२६, २७) आपल्याबद्दल काय? शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी म्हणते: “कोणत्याही पश्चात्तापाविना आकसखोरपणे, हेतुपुरस्सर पातक आचरणाऱ्या लोकांना ख्रिश्चनांनी क्षमा करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचे लोक देवाचे शत्रू झाले आहेत.” (खंड १, पृष्ठ ८६२) कमालीचा अन्याय, तिरस्कारणीय किंवा उग्र वागणूक या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या कोणत्याही ख्रिस्ती मनुष्याला अपश्चात्तापी इसमाला क्षमा करावी किंवा त्याला माफ करावे असे वाटणार नाही.—स्तोत्र १३९:२१, २२.
१६ हे समजण्याजोगे आहे, की क्रूर वागणुकीला बळी पडलेल्यांना कदाचित दुःख होईल किंवा त्यांना राग देखील येईल. तथापि, हे लक्षात ठेवा, की रागाला किंवा द्वेषाला आपल्या मनात घर करू देणे आपल्याकरता फार अपायकारक आहे. कधीही न केल्या जाणाऱ्या कबुलीची किंवा कधीही मागण्यात न येणाऱ्या क्षमेची वाट पाहात राहिल्याने आपण निव्वळ अधिकाधिक निराश होऊ. एकसारखा अन्याय होत असल्यामुळे आपल्यामध्ये राग धूमसत राहील, ज्याचा आपल्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल. परिणामी, आपल्याला इजा पोहंचविणाऱ्याला त्याने आपल्याला इजा पोहंचवत राहावी म्हणून आपण त्याला अनुमती देतो. बायबल सुज्ञपणे सल्ला देते: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर.” (स्तोत्र ३७:८) यामुळे काही ख्रिश्चनांना अनेकदा असे दिसून आले आहे, की द्वेषभावनेला मनात घर करू न देणे या अर्थाने क्षमा करण्याचा निर्णय घेण्यास त्यांना शक्य झाले—त्यावेळी ते अपराधाची गंभीरता विसरत नाहीत, क्रोधाविष्ट होत नाहीत. न्यायी देवाच्या हातांत बाब पूर्णपणे सोपवून दिल्याने त्यांना अधिक हायसे वाटले आहे आणि कोणतीही द्वेषभावना न बाळगता जीवन जगणे त्यांना शक्य झाले आहे.—स्तोत्र ३७:२८.
१७. प्रकटीकरण २१:४ येथे नमूद केलेले कोणते सांत्वनदायक अभिवचन यहोवा देतो?
१७ जेव्हा घाव फार खोल असतो तेव्हा तो आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकण्यास आपल्याला शक्य होणार नाही, किमान या व्यवस्थीकरणात तरी नाही. पण यहोवा आपल्याला नवीन जगाचे अभिवचन देतो ज्यामध्ये “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) त्यावेळी आपल्याला जे काही आठवेल त्यामुळे आपल्याला फार इजा किंवा दुःख होणार नाही ज्यांचे कदाचित सध्या आपल्या मनांवर ओझे असेल.—यशया ६५:१७, १८.
१८. (अ) आपल्या बंधू आणि बहिणींसोबतच्या आपल्या व्यवहारांमध्ये क्षमाशील असण्याची का आवश्यकता आहे? (ब) आपल्याविरुद्ध इतर जण पाप करतात तेव्हा आपण कोणत्या अर्थाने क्षमा करू शकतो आणि चुका विसरू शकतो? (क) याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो?
१८ तोपर्यंत आपल्याला अपरिपूर्ण, पापमय मानव असलेल्या बंधू आणि बहिणींसोबत राहिले पाहिजे तसेच त्यांच्यासोबत काम केलेच पाहिजे. आपण सर्व जण चुका करतो. आपण वेळोवेळी एकमेकांना निराश करतो इतकेच नव्हे तर आपण एकमेकांना दुखावतो देखील. आपल्याला इतरांना “सात वेळा . . . नाही तर साताच्या सत्तर वेळा” क्षमा करावी लागणार, हे येशूला माहीत होते! (मत्तय १८:२२) हे खरे आहे, की यहोवा ज्याप्रमाणे पूर्णपणे क्षमा करतो त्याप्रमाणे आपण क्षमा करू शकत नाही. तरी देखील बहुतेक बाबतीत आपले बांधव आपल्याविरुद्ध पाप करतात तेव्हा द्वेषावर मात करण्याच्या अर्थाने आपण क्षमा करू शकतो आणि भवितव्यात त्यांच्याविरुद्ध संबंधित बाब केव्हाही लक्षात न ठेवण्याद्वारे आपण त्यांचे पाप विसरू शकतो. आपण जेव्हा अशा प्रकारे क्षमा करतो आणि चुका विसरतो तेव्हा आपण केवळ मंडळीची शांती नव्हे तर आपल्या मनाची आणि हृदयाची शांती टिकवण्यासाठी हातभार लावत असतो. विशेषतः, आपला प्रेमळ देव यहोवाच पुरवू शकतो अशा शांतीचा आपण आनंद घेऊ.—फिलिप्पैकर ४:७.
[तळटीपा]
a बॅबिलोनी तालमूदनुसार, एका रब्बी परंपरेने असे म्हटले: “एखाद्याने पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अपराध केल्यास त्याला क्षमा होते, पण चौथ्यांदा मात्र त्याला क्षमा होत नाही.” (योमा ८६ब) हा विचार, आमोस १:३; २:६ आणि ईयोब ३३:२९ यांसारख्या वचनांच्या चुकीच्या समजेवर काही अंशी आधारित होता.
b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
उजळणीकरता प्रश्न
◻ इतरांना क्षमा करण्यासाठी आपण तयार का असले पाहिजे?
◻ कोणत्या प्रकारच्या परिस्थितींत आपण ‘एकमेकांचे सहन केले’ पाहिजे?
◻ इतरांच्या पातकांमुळे आपल्याला खोलवर इजा पोहंचते तेव्हा तंटा शांतिमयरीत्या मिटवण्यासाठी काय करता येऊ शकते?
◻ आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा आपण कोणत्या अर्थाने विसरले पाहिजे?
[१६ पानांवरील चित्र]
जेव्हा आपण द्वेषभावना बाळगतो तेव्हा अपराधी आपल्या अवस्थेबद्दल अजाण असेल
[१७ पानांवरील चित्र]
शांती बनविण्याच्या उद्देशाने आपण पावले उचलल्याने गैरसमज सहजगत्या दूर होतील