सुरक्षित भवितव्य असलेले नवतरुण
“सर्वात भयानक आणि किळसवाणी [बलात्कार] केस”—असे उद्गार अलीकडील खटला सुनावणीच्या प्रसंगी न्यायाधीशांनी काढले. १४ ते १८ वयोगटातील आठ किशोरवयीनांच्या एका टोळीने लंडन शहराच्या आतील भागात एका पर्यटक महिलेला पळवून नेले, अनेक वेळा तिच्यावर लैंगिक हल्ले केले आणि तिला पोहता येत नव्हते तरी जवळच्याच एका नाल्यात भिरकावून दिले. त्या टोळीतील एका किशोरवयीनाच्या आईने जेव्हा आपल्याच मुलाचे हे काळकर्तृत्व टीव्हीच्या बातम्यांमध्ये पाहिले तेव्हा तिचे मन विषण्ण झाले, हे समजण्याजोगे आहे.
दुःखाची गोष्ट म्हणजे, आज समाजात जे काही घडत आहे त्याचेच हे एक दृश्य चित्र आहे. क्रूरता सर्वसामान्य बनली आहे; मग ती गुन्हेगारी क्षेत्रात, देशांतर्गत झगड्यात, किंवा बाल्कन्स, मध्य आणि पश्चिम आफ्रिका व इतरत्र चाललेल्या जातीय दंगलीत असो. नवतरुण अशाच परिस्थितींमध्ये लहानाचे मोठे होतात किंवा अशा गोष्टी वारंवार त्यांच्या कानावर पडतात. तेव्हा, अनेक जण पाषाणहृदयी, “ममताहीन,” “असंयमी” बनतात यात नवल असे काहीच नाही.—२ तीमथ्य ३:३.
“क्रूर”
ख्रिस्ती प्रेषित पौलाने जेव्हा, त्याचा सहवडील तीमथ्य याला दुसरे पत्र लिहिले तेव्हा रोम प्रमुख विश्वशक्ती होते. रोमी आखाड्यात क्रूरता आणि रानटीपणाचे उदंड पीक होते. तरीसुद्धा, पौलाने ताकीद दिली, की भविष्यात “कठीण” दिवस येतील. (२ तीमथ्य ३:१) “कठीण” दिवसांचे वर्णन करणाऱ्या ग्रीक शब्दात “क्रूर” असण्याचा अर्थही समाविष्ट आहे. ३० पेक्षा अधिक वर्षांआधी येशूच्या पार्थिव सेवेदरम्यान घडलेली घटना त्या रानटीपणामागे कोणाचा हात होता ते दाखवून देते.
येशू गालील समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर नुकताच आला होता. किनाऱ्यावर पाय ठेवताच, दोन मनुष्य त्याच्यासमोर आले. त्यांच्या त्या भयानक अवतारावरून आणि किंचाळण्यावरून हे स्पष्ट झाले की त्यांच्यात नक्कीच काही तरी दोष होता. ते “अक्राळविक्राळ, [क्रूर]” होते, म्हणजेच भूतग्रस्त होते.a ते जे काही बोलत होते ते, त्यांना हिंसक कृत्ये करावयास लावणारे दुरात्मे त्यांच्याकडून वदवून घेत होते. “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पीडावयास येथे आला आहेस काय?” असे ते ओरडून म्हणाले. त्या दोघांत जे दुरात्मे होते त्यांना हे माहीत होते, की दुरात्म्यांवर न्यायदंड बजावण्याकरता देवाने आधीच एक समय निश्चित केला होता. म्हणजे त्यांचा कायमचा नाश केला जाणार आहे. पण तोपर्यंत क्रूरपणे हिंसा करण्यास ते आपल्या अमानुष शक्तींचा उपयोग करणार होते. केवळ येशूचे चमत्कारिक कार्यच त्या दुरात्म्यांना काढून त्या मनुष्यांना आराम देऊ शकले.—मत्तय ८:२८-३२; यहूदा ६.
आजचे लोक, ज्यामध्ये तरुणांचाही समावेश होतो, भ्रमिष्टासारखे वागतात तेव्हा आपल्याला ती घटना आठवते. का? कारण, बायबलचे शेवटले पुस्तक, प्रकटीकरण स्पष्टीकरण देते त्याप्रमाणे या २० व्या शतकात आपण काहीशा अशाच धोक्याचा सामना करीत आहोत, तेथे म्हटले आहे: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) सैतानाचा असा पाणउतारा केल्यामुळे तो “अतिशय संतप्त” झाला आहे कारण आपला काळ थोडाच राहिला आहे हे त्याला आता माहीत आहे.
हल्ला
या नियतकालिकात नेहमी सांगितले जाते त्याप्रमाणे, वर्ष १९१४ ने येशू ख्रिस्ताला स्वर्गातील देव राज्याचा राजा होताना पाहिले आहे. येशूने अधिकार सूत्रे हाती मिळाल्या मिळाल्या देवाचा मुख्य शत्रू, सैतान याच्याविरुद्ध कार्यवाही केली. अशाप्रकारे, दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांची स्वर्गातून हकालपट्टी झाल्यामुळे आता त्यांचे लक्ष पृथ्वीवर आहे. (प्रकटीकरण १२:७-९) सैतान केवळ एका मर्यादित क्षेत्रावरच आपला प्रभाव पाडू शकत असल्यामुळे, तो “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) त्याला कोण सहज बळी पडतात? जीवन आणि मानवी नातेसंबंधाविषयी कम अनुभव असलेले त्याला बळी पडतात हे समजण्याजोगे नाही का? म्हणूनच आज तरुणजन दियाबलाला बळी पडतात. संगीत आणि सुखविलास यांमागे धावण्याद्वारे ते अगदी सहजपणे त्याच्या हातचे कटपुतळे बनतात ज्यांना तो नाचवतो.—इफिसकर ६:११, १२.
तरुण आपल्या जीवनाचे सार्थक बनवण्याचा प्रयत्न करतात तेव्हाही त्यांच्यासमोर अडथळे येतात. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ज्या पालकांना युद्धाची झळ पोहंचली व ज्यांनी हलाखीत दिवस काढले, त्यांनी आपले कुटुंब होता होईल तितके सुखसंपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. भौतिक संपत्ती, बेबंद मौजमस्ती आणि मनोरंजन आज प्रमुख उद्दिष्टे बनली आहेत. परिणामतः, अनेकांना कडू फळे चाखावी लागली आहेत. पौलाने तीमथ्याला इशारा दिला: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि . . . मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. . . . कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून . . . त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) एकंदरीत, आजच्या भौतिकवादी समाजाच्या लोकांनी स्वतःला आर्थिक, सांपत्तिक व भावनिक खेदांनी भोसकून घेतल्याचे आपण पाहतो. त्यांच्यात अनेक तरुणजन आहेत जे देवाच्या आद्यशत्रूचे बळीचे बकरे बनले आहेत.
परंतु एक आनंदाची देखील बातमी आहे. आणि ती, तरुणांसाठीच आहे ज्यांच्यासमोर एक सुरक्षित भवितव्य आहे. हे कसे शक्य आहे?
शोधा म्हणजे तुम्हास सापडेल
अनेक युवकांचे उच्च विचार आहेत. ते, प्रौढांमध्ये सर्वसामान्य असलेले खालावलेले दर्जे झिडकारतात. सत्तेसाठी हपापलेल्या राजकारणी लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा अन्यायीपणा व कोडगेपणा पाहून ते खचून जातात. तुम्हीही तरुण असाल तर कदाचित तुम्हालाही असेच वाटत असेल.
विशीच्या सुमारास आलेल्या सेड्रीक नावाच्या तरुणाचा अनुभव काही आगळा नाही.b लहानपणापासून त्याला अनेक गोष्टींचे भय वाटत असे, मृत्यूचेही भय वाटत असे. जीवनाचा काय उद्देश असावा यावर तो नेहमी विचार करीत असे. तो १५ वर्षांचा होईपर्यंत त्याला त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली नसल्यामुळे जीवनाचा अर्थ शोधण्याकरता, तो इतर आदर्शवादी तरुणांसोबत संगती करू लागला. तो आठवून सांगतो, “आम्ही मादक पदार्थांच्या विड्या ओढत तास-न्-तास बोलत बसायचो. मला वाटायचे, की सगळेजण माझ्याप्रमाणेच विचार करतात पण कोणाकडे उत्तरे नव्हती.”
इतर तरुणांप्रमाणे सेड्रीकचाही मनोरंजनाकडे ओढा होता. अंमली पदार्थांच्या सेवनाने तो संतुष्ट झाला नाही. काही काळातच तो अंमली पदार्थांची चोरी आणि त्यांची ने-आण करण्यात सामील झाला. अजूनही तो नवनवीन जोखिमा पत्करू इच्छित होता. ऑर्डर पुरवण्यासाठी तो चोऱ्या करू लागला. तो कबूल करतो, “मला हे काम मनापासून आवडायचे. पण मी कधीही सामान्य लोकांना लुटले नाही. मी जर एखादी कार चोरली तर ती चांगल्या अवस्थेतच पुन्हा कोठे तरी सोडून द्यायचो. मला एखाद्या व्यापाऱ्याकडे चोरी करायची असल्यास, मी अशा व्यापाऱ्याकडेच चोरी करायचो ज्याला इनश्यूरन्स वाल्यांकडून भरपाई मिळेल. या माझ्या कार्यांमुळे मला वाटायचे की मी काही चूक करीत नाही.” तुम्ही कदाचित ओळखलेच असेल, सेड्रीकला शेवटी तुरुंगातच जावे लागले.
सेड्रीक आठवून सांगतो: “मार्क नावाच्या एका कैद्याबरोबर माझी ओळख झाली. माझ्या दंडावर गोंदलेला मोठा क्रॉस पाहून त्याने मला विचारले की मी असे का गोंदून घेतले होते. त्याला वाटले की कदाचित मी फार धार्मिक आहे.” काही आठवड्यांनंतर, मार्कने सेड्रीकला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकालc पुस्तक दिले. “‘तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल’—या काही शब्दांनीच माझ्यात आस्था जागृत झाली. आम्ही नेहमी तर याच विषयावर बोलत होतो पण अनंतकाळ जगण्याचे सत्य आम्हाला कधी माहीतच झाले नव्हते.” तुरुंगात येऊन भेट देणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदारासोबत अनेक वेळा चर्चा केल्यावर सेड्रीकला उमगले की त्याने जी महत्त्वकांक्षा बाळगली होती ती साधण्याजोगी होती—पण फक्त देवाच्या मार्गानेच.
सेड्रीक पुढे म्हणतो: “माझ्या पूर्वीच्या मित्रांबरोबरची माझी संगत सोडून दिल्या दिल्या मी प्रगती करू लागलो.” ग्रहणशक्तीत आणि खरा आनंद ओळखण्यात त्याची प्रगती इतकी सोपी नव्हती. तो म्हणतो, “मी अजूनही प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. मला अजूनही सांभाळून विचार करावा लागतो.” होय, सेड्रीकने आता हे ओळखले आहे की आदर्शवादी बनल्यामुळे तो दियाबलाच्या जाळ्यात अडकला होता, मौजमजेवर केंद्रित असलेल्या कार्यांत गुंतल्याने तो आपली उद्दिष्टे साध्य करू शकेल असे त्याला वाटले होते.
आनंदाची गोष्ट म्हणजे, तुरुंगातून बाहेर येऊन त्याला बरेच दिवस लोटले आहेत आणि आता तो अशा लोकांबरोबर संगत राखून आहे ज्यांनी, ते आधी ज्याचा शोध करीत होते त्या गोष्टी प्राप्त केल्या आहेत. तो आता यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहे आणि पृथ्वीवरील परादीसमध्ये जगण्याची त्यांच्यासारखीच आशा बाळगून आहे. सैतानी प्रभाव आणि त्याचे मिष यांच्या समूळ नाशाचीही तो आतुरतेने वाट पाहत आहे.
अर्थातच, सेड्रीकसारख्या तरुणांनाच केवळ सुरक्षित भवितव्य नाही; इतर तरुणांचे त्यांच्या ईश्वरी पालकांनी संगोपन केले ज्यांनी त्यांच्या अंतःकरणावर बायबल सत्याविषयी प्रेम बिंबविले आहे.
ईश्वरी प्रशिक्षण लाभ करून देते
“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही,” असे प्राचीन काळच्या राजा शलमोनाने लिहिले. (नीतिसूत्रे २२:६) बायबलचे स्तर अनुसरण्याची निवड केलेल्या अनेक पूर्ण मनाच्या नवतरुणांच्या बाबतीत ही गोष्ट सत्य ठरली आहे.
शीला, गॉरडन आणि सारा या तिघांनी असे केले. त्यांना आठवते की त्यांच्या पालकांनी, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे ‘लोकांना शिष्य बनवण्याविषयी’ ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याला जास्त महत्त्व दिले. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) शीला आठवून सांगते, “कोणताही निर्णय घ्यायचा असो, आई आणि मी एकमेकींना म्हणत असू, ‘प्रचार कार्यावर त्याचा कसा प्रभाव पडेल?’ या कारणामुळे आम्ही अनेक योजना रद्द केल्या.” पुढे तिने कबूल केले, की “आम्हाला कितीतरी आशीर्वाद मिळाले!” लोकांच्या घरी जाऊन सुवार्ता ऐकवण्यात संपूर्ण दिवस घालवल्यानंतर देखील, शीला आणि तिची आई गीते गात पायी घरी येत. ती म्हणते: “माझा आनंद पूर्ण होता. मला आताही तो जाणवतो.”
गॉरडनला पुष्कळ सुखावह शनिवार संध्याकाळ आठवतात. तो म्हणतो: “मला मंडळीतील वडील आपल्या घरी बोलवत असत आणि आम्ही बायबलची कोडी सोडवीत तसेच चर्चा करीत असू ज्या खरोखरच लाभदायक होत्या. आम्हाला बायबलमधील वचने पाठ करण्यास, शास्त्रवचनीय विषयांवर अस्खलितपणे बोलण्यास, प्रचारकार्यातील एखाद्या अनुभवाचे कथन करण्यास व राज्य कार्य कसे विस्तारत आहे ते शिकण्यास उत्तेजन दिले जात असे. यासर्वांमुळे मी भक्कम पाया घालू शकलो व यहोवा देवासाठी प्रेम विकसित करू शकलो.”
संध्याकाळच्या वेळी साक्षीदारांच्या भेटीच्या गोड आठवणी साराकडे आहेत. “आम्ही एकत्र भोजन करीत असू. सगळ्यात शेवटी, आम्ही पियानो वाजवून देवाच्या राज्याविषयी गाणी गात असू. संगीताने आम्हाला खूपच मदत केली आहे, विशेषकरून आमच्या शालेय दिवसांमध्ये; कारण त्यामुळे आम्ही कुटुंब या नात्याने सर्व काही एकत्र मिळून करू शकलो.”
अर्थातच, यहोवाला संतुष्ट करू पाहणाऱ्या सर्वच तरुणांची आदर्श कौटुंबिक परिस्थिती नसते. पण, मंडळीतील इतर साक्षीदार कुटुंबांसोबत जवळचा सहवास राखल्याने त्यांना सुरक्षित व आपलेसे वाटते.
भवितव्यासाठी सुरक्षित पाया टिकवा
आज तरुणांपुढे एक निवड आहे. ते, येशूने ज्याच्याबद्दल भाकीत केले त्या येणाऱ्या ‘मोठ्या संकटात’ नाशाकडे वाटचाल करणाऱ्या या दुष्ट जगाबरोबर राहू शकतात. किंवा, ईश्वरप्रेरित स्तोत्रकर्ता आसाफ याने गायिल्याप्रमाणे, ‘देवावर भाव ठेवून त्याच्या आज्ञा पाळू शकतात.’ देवाची आज्ञा पाळल्याने ते, “हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंत:करण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी” होणार नाहीत.—मत्तय २४:२१; स्तोत्र ७८:६-८.
संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ८०,००० पेक्षा अधिक मंडळ्यांत अनेक तरुण तुमच्या नजरेस पडतील ज्यांचे तुम्ही कौतुक करू शकता. “चांगले करावे; चांगल्या कामाविषयी धनवान व्हावे, दान देण्यास उत्सुक, परोपकारी असे व्हावे; जेणेकरून पुढल्या काळी चांगला आधार होईल, अशी सांठवण त्यांनी आपणासाठी करावे,” हा पौलाने तरुण तीमथ्याला दिलेला सल्ला त्यांनी आत्मसात केला आहे. यामुळे, त्यांनी ‘जे खरेखुरे जीवन आहे ते आताच धरून ठेवले’ आहे. (१ तीमथ्य ६:१८, १९, पं.र.भा.) त्यांच्या सभांना उपस्थित राहून या खऱ्या ख्रिश्चनांविषयी आणखी माहिती मिळवा. मग तुम्हाला देखील सुरक्षित भवितव्याची आशा लाभू शकते.
[तळटीपा]
a “क्रूरता,” मत्तय ८:२८ आणि २ तीमथ्य ३:१ मध्ये वापरण्यात आलेल्या त्याच ग्रीक शब्दाचा अनुवाद आहे.
b नावे बदलण्यात आली आहेत.
c वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[७ पानांवरील चित्र]
येशूने बरे केलेल्या “अक्राळविक्राळ” मनुष्यांमागे दुरात्म्यांचा हात होता
[८ पानांवरील चित्र]
‘पुढल्या काळासाठी चांगला पाया’ घालणे