वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१५ पृ. १३-१८
  • विश्‍वास कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वास कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पक्षपातीपणा विश्‍वासाच्या अनुरूप नाही
  • “दया न्यायावर विजय मिळविते”
  • विश्‍वास उत्तम कार्ये उत्पन्‍न करतो
  • त्या जिभेला आळा घाला!
  • वरून येणाऱ्‍या सुज्ञतेच्या योगे कार्य करा
  • विश्‍वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आम्हाला विश्‍वास व ज्ञानाची का जरुरी आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१५ पृ. १३-१८

विश्‍वास कृती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो!

“विश्‍वास [अब्राहामाच्या] क्रियांसहित कार्य करीत होता, आणि क्रियांनी विश्‍वास पूर्ण झाला, हे तुला दिसते.”—याकोब २:२२.

१, २. आपला विश्‍वास असल्यास आपण कसे कार्य करू?

दे वावर विश्‍वास असल्याचा अनेकांचा दावा आहे. पण निव्वळ विश्‍वास असल्याचा दावा, मृत शरीरासारखा निर्जीव असतो. “विश्‍वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे,” असे शिष्य याकोबाने लिहिले. देवमाणूस अब्राहामाचा “क्रियांसहित कार्य” करणारा विश्‍वास होता असेही त्याने म्हटले. (याकोब २:१७, २२) या शब्दांचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

२ आपला विश्‍वास खरा असल्यास, ख्रिस्ती सभांमध्ये आपण जे काही ऐकतो त्यावर नुसता विश्‍वास ठेवणार नाही. तर, आपण यहोवाचे सक्रिय साक्षीदार असल्यामुळे आपला विश्‍वास सिद्ध करून दाखवू. होय, विश्‍वास आपल्याला देवाचे वचन आपल्या जीवनात लागू करण्यास व त्यानुसार कार्य करण्यास प्रवृत्त करील.

पक्षपातीपणा विश्‍वासाच्या अनुरूप नाही

३, ४. आपण इतरांना ज्याप्रकारे वागवतो त्यावर विश्‍वासाचा कोणता परिणाम झाला पाहिजे?

३ देव आणि ख्रिस्त यांच्यावर आपला खरोखरच विश्‍वास असेल तर आपण पक्षपातीपणा दाखवणार नाही. (याकोब २:१-४) याकोबाने ज्यांना लिहिले त्यांतील काहीजण खऱ्‍या ख्रिश्‍चनांकडून अपेक्षिले जाते त्याप्रमाणे निःपक्षपातीपणा दाखवत नव्हते. (रोमकर २:११) म्हणूनच याकोबाने म्हटले: “गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्यावर विश्‍वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका.” सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे पांघरलेला एखादा श्रीमंत सत्य न मानणारा मनुष्य सभेला आला आणि त्याच्याबरोबरच सत्य न मानणारा एखादा “भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीहि” आला तर दोघांचेही एकसारखेच स्वागत करण्यास हवे होते, पण श्रीमंताकडे जास्त लक्ष दिले जाई. त्यांना ‘चांगल्या जागी’ जागा देण्यात येई आणि सत्य न मानणाऱ्‍या गरीबांना उभे राहण्यास किंवा एखाद्याच्या पायांजवळ बसण्यास सांगितले जाई.

४ यहोवाने येशू ख्रिस्ताचे खंडणी अर्पण श्रीमंत आणि गरीब दोघांसाठी दिले आहे. (२ करिंथकर ५:१४) आपण श्रीमंतांच्या पुढे पुढे करतो तेव्हा, ‘स्वतःच्या दारिद्र्‌याने आपल्याला धनवान’ करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या विश्‍वासापासून आपण विभक्‍त होत असतो. (२ करिंथकर ८:९) गल्लत उद्दिष्ट बाळगून मानवांचा आदर करणे—अशाप्रकारे आपण लोकांचा न्याय कधीही करू नये. देव पक्षपाती नाही, आणि आपण पक्षपातीपणा दाखवला तर आपण “वाईट विचार बाळगणारे न्यायाधीश,” [पं.र.भा.] होऊ. (ईयोब ३४:१९) देवाला खूष करण्याची इच्छा बाळगल्यास, निश्‍चितच आपण पक्षपातीपणा दाखवण्याच्या किंवा ‘स्वतःच्या लाभासाठी तोंडपुजेपणा’ करण्याच्या मोहात पडणार नाही.—यहूदा ४, १६.

५. “विश्‍वासासंबंधाने धनवान होण्यास” देवाने कोणास निवडले आणि धनसंपन्‍न बहुधा कसे वागतात?

५ याकोब खऱ्‍या श्रीमंतांची ओळख करून देतो व निःपक्षपातीपणे सर्वांना प्रेम दाखवण्यास आर्जवतो. (याकोब २:५-९) ‘विश्‍वासासंबंधाने धनवान होण्यास आणि राज्याचे वारीस होण्यास देवाने गरीबांना निवडले आहे.’ कारण गरीब लोकच सहसा सुवार्तेला उदंड प्रतिसाद देत असतात. (१ करिंथकर १:२६-२९) वर्ग या नात्याने, भौतिकरीत्या धनसंपन्‍न असलेले, कर्ज, मजुरी आणि कायदेशीर कारवाया यांद्वारे इतरांची पिळवणूक करतात. ते ख्रिस्ताविषयी वाईट बोलतात आणि आपण त्याचे नाव धारण करत असल्यामुळे आपल्याला छळतात. काहीही असो, आपण शेजाऱ्‍याबद्दल प्रीती बाळगण्याची, अर्थात श्रीमंत आणि गरीब दोघांना एकसारखी प्रीती दाखवण्याची अपेक्षा करणाऱ्‍या ‘राजमान्य नियमाच्या’ आज्ञेत राहण्याचा निर्धार करू या. (लेवीय १९:१८; मत्तय २२:३७-४०) ही देवाची इच्छा असल्यामुळे, पक्षपातीपणा दाखवल्यास आपण “पाप” करत असतो.

“दया न्यायावर विजय मिळविते”

६. इतरांबरोबर आपण दयाळूपणे वागलो नाही तर आपण नियमाचे उल्लंघन करणारे कसे ठरू?

६ आपण निर्दयीपणे पक्षपातीपणा दाखवत असल्यास नियमाचे उल्लंघन करणारे ठरू. (याकोब २:१०-१३) या अनुषंगाने चुकीचे पाऊल उचलण्याद्वारे आपण देवाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करणारे ठरतो. ज्या इस्राएलांनी व्यभिचार केला नाही, पण जे चोर होते ते सर्व मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे ठरले. ख्रिस्ती या नात्याने, ‘स्वतंत्र लोकांच्या नियमाद्वारे’ आपला न्याय केला जातो; हे स्वतंत्र लोक नवीन करारातील आध्यात्मिक इस्राएल आहेत ज्यांच्या अंतःकरणात त्याचे नियम आहेत.—यिर्मया ३१:३१-३३.

७. पक्षपात करणारे देवाकडून दया मिळण्याची अपेक्षा का करू शकत नाहीत?

७ आपला विश्‍वास आहे असा आपण दावा केला आणि पक्षपातीपणा दाखवतच राहिलो तर आपण धोक्यात असतो. क्रूर व निर्दयी असलेल्यांचा निर्दयीपणे न्याय केला जाईल. (मत्तय ७:१, २) याकोब म्हणतो: “दया न्यायावर विजय मिळविते.” आपल्या सर्व व्यवहारांत दया दाखवण्याद्वारे आपण यहोवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यास, न्यायाच्या वेळी आपण दोषी ठरणार नाही. उलट, आपण दया अनुभवू आणि अशाप्रकारे कडक न्याय किंवा प्रतिकूल न्यायदंडावर विजय मिळवू.

विश्‍वास उत्तम कार्ये उत्पन्‍न करतो

८. विश्‍वास आहे असा दावा करणारा परंतु कार्य करण्यात उणा पडणाऱ्‍या मनुष्याची अवस्था काय असते?

८ आपल्याला प्रेमळ व दयाशील बनवण्याव्यतिरिक्‍त विश्‍वास इतरही उत्तम कार्ये उत्पन्‍न करतो. (याकोब २:१४-२६) अर्थातच, कार्याविना विश्‍वास असल्याचा दावा आपला बचाव करणार नाही. हे खरे आहे, की नियमशास्त्राच्या कार्यांद्वारे आपण देवासमोर धार्मिक भूमिका मिळवू शकत नाही. (रोमकर ४:२-५) याकोब येथे, कायदेसंहितेमुळे नव्हे तर प्रीती व विश्‍वास यांमुळे कार्ये घडतात याबद्दल बोलत आहे. ह्‍या गुणांनी प्रवृत्त होऊन आपण एखाद्या गरजू सहउपासकाच्या हिताची केवळ इच्छा व्यक्‍त करणार नाही. तर, अन्‍नवस्त्राची आवश्‍यकता असलेल्या बंधू अथवा भगिनीला भौतिक साहाय्य देऊ. याकोब विचारतो: ‘तुम्हांमधील कोणी गरजू बांधवाला म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा,” पण त्याच्या गरजा पूर्ण करीत नाही तर काय फायदा?’ काहीच नाही. (ईयोब ३१:१६-२२) अशा प्रकारचा “विश्‍वास” निर्जीव आहे!

९. आपला विश्‍वास आहे हे कशावरून दिसते?

९ आपण काही प्रमाणात देवाच्या लोकांबरोबर संगत करत असू पण, पूर्ण अंतःकरणाने केलेली कार्येच विश्‍वास असल्याच्या आपल्या दाव्याला पाठबळ देऊ शकतात. त्रैक्याची शिकवण झुगारून एकच खरा देव आहे असा आपण विश्‍वास करू लागलो हे किती प्रशंसनीय आहे. तरीसुद्धा, नुसती माहिती असणे म्हणजे विश्‍वास नव्हे. “भुतेहि . . . विश्‍वास धरतात व थरथर कांपतात” कारण त्यांचा नाश होणार आहे हे त्यांना माहीत आहे. आपला खरोखरच विश्‍वास असेल तर तो आपल्याला सुवार्तेचा प्रचार करणे व गरजू सहउपासकांना अन्‍नवस्त्र देणे यांसारखी कार्ये करण्यास प्रवृत्त करील. याकोब विचारतो: “अरे बुद्धिहीन मनुष्या [देवाचे अचून ज्ञान नसलेला], क्रियांवाचून विश्‍वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय?” होय, विश्‍वासाकरता कार्ये आवश्‍यक आहेतच.

१०. अब्राहामाला ‘विश्‍वास असलेल्या सर्वांचा बाप’ असे का म्हटले जाते?

१० ईश्‍वरी कुलपिता अब्राहामाच्या विश्‍वासाने त्याला कार्य करण्यास प्रवृत्त केले. ‘विश्‍वास असलेल्या सर्वांचा बाप’ या नात्याने, अब्राहाम “ह्‍याने आपला पुत्र इसहाक ह्‍याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्‍यात तो क्रियांनी नीतिमान ठरला.” (रोमकर ४:११, १२; उत्पत्ति २२:१-१४) देव इसहाकाला पुनरुत्थित करून त्याच्याद्वारे येणाऱ्‍या संतानाविषयीचे अभिवचन पूर्ण करू शकतो असा अब्राहामाचा विश्‍वास नसता तर? तो आपल्या पुत्राचे अर्पण देण्यास कदापि राजी झाला नसता. (इब्री लोकांस ११:१९) अब्राहामाच्या आज्ञाधारक कार्यांमुळे त्याचा ‘विश्‍वास परिपूर्ण झाला,’ किंवा पूर्ण झाला. त्यामुळे, “‘अब्राहामाने देवावर विश्‍वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले,’ . . . हा शास्त्रलेख [उत्पत्ति १५:६] पूर्ण झाला.” अब्राहाम धार्मिक होता असे देवाने आधीच जे घोषित केले होते त्याला इसहाकाचे अर्पण देण्याचा प्रयत्न केलेले अब्राहामाचे कार्य पुष्टी देते. विश्‍वासाच्या कार्यांद्वारे त्याने देवाबद्दल असलेली प्रीती व्यक्‍त केली आणि म्हणूनच त्याला “देवाचा मित्र” असे गणण्यात येते.

११. राहाबाच्या बाबतीत विश्‍वासाचा कोणता पुरावा आपल्याला मिळतो?

११ “केवळ विश्‍वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो” हे अब्राहामाने सिद्ध करून दाखवले. जेरिकोतील राहाब नावाच्या वेश्‍येच्या बाबतीतही ही गोष्ट खरी होती. कनानी शत्रूंच्या हाती लागू नये म्हणून तिने “[इस्राएली] जासूदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्‍या वाटेने लावून दिले; ह्‍यांत ती क्रियांनी नीतिमान ठरली.” इस्राएल जासूदांना भेटण्याआधी, यहोवा खरा देव आहे हे तिने जाणले व त्यानंतर तिने काढलेल्या उद्‌गारावरून तसेच वेश्‍याव्यवसाय सोडल्यावरून तिचा विश्‍वास शाबीत होतो. (यहोशवा २:९-११; इब्री लोकांस ११:३१) कार्यांद्वारे प्रकट झालेल्या विश्‍वासाच्या या दुसऱ्‍या उदाहरणानंतर याकोब म्हणतो: “जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्‍वासहि क्रियांवांचून निर्जीव आहे.” एखाद्या मनुष्याचे निधन झाल्यावर त्याच्यात कोणतीही सचेतन शक्‍ती, अथवा ‘आत्मा’ राहत नाही व तो काहीही तडीस नेत नाही. विश्‍वास असल्याचा केवळ दावा, मृत शरीरासारखा निर्जीव आणि निरुपयोगी आहे. पण आपला विश्‍वास खरा असल्यास तो आपल्याला ईश्‍वरी कार्य करण्यास प्रवृत्त करील.

त्या जिभेला आळा घाला!

१२. मंडळीतील वडिलांनी काय विचारात घ्यावे?

१२ बोलण्याद्वारे व शिकवण्याद्वारेही विश्‍वास शाबीत होऊ शकतो; परंतु, येथेही मर्यादा आहेत. (याकोब ३:१-४) मंडळीत शिक्षक या नात्याने वडिलांवर भारी जबाबदारी असते व त्यांना देवाला हिशेब द्यावा लागेल. यास्तव, त्यांनी आपल्या हेतूंचे व योग्यतांचे नम्रपणे परीक्षण करावे. ज्ञान आणि क्षमता यांच्याव्यतिरिक्‍त त्यांना देवाबद्दल आणि सहउपासकांबद्दल गाढ प्रीती असली पाहिजे. (रोमकर १२:३, १६; १ करिंथकर १३:३, ४) वडिलांनी शास्त्रवचनांवर आधारित सल्ला द्यावा. एखाद्या वडिलांनी चुकीचा सल्ला दिला आणि यामुळे इतरांना त्याचा त्रास झाला तर अशा वडिलाचा ख्रिस्ताद्वारे देव प्रतिकूल न्याय करील. यास्तव, वडिलांनी नम्र, दक्ष, देववचनाचे विश्‍वासूपणे पालन करणारे असले पाहिजे.

१३. आपण आपल्या बोलण्यात का चुकतो?

१३ वास्तविक पाहता, आपण सर्व जण, ज्यात तरबेज शिक्षकांचा देखील समावेश होतो अपरिपूर्णतेमुळे “पुष्कळ चुका” करतो. बोलण्याद्वारे होणाऱ्‍या चुका, वारंवार घडणाऱ्‍या आणि संभाव्य हानीकारक चुका असतात. याकोब म्हणतो: “कोणी जर बोलण्यांत चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यांत ठेवण्यास समर्थ आहे.” आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे नसल्यामुळे आपल्याला पूर्णपणे आपल्या जिभेवर ताबा ठेवता येत नाही. आणि असता तर आपल्या शरीराच्या इतर अंगांवरही आपण ताबा ठेवू शकलो असतो. कारण, लगामामुळे आपण घोड्यांना हवे तसे वळवू शकतो; शिवाय सुकाण्या एका छोट्याशा सुकाणूने जोरदार वाऱ्‍यातही मोठ्या बोटीला हवे तसे फिरवू शकतो.

१४. जिभेवर ताबा ठेवण्याकरता परिश्रमाची गरज आहे यावर याकोब जोर कसा देतो?

१४ जिभेवर ताबा ठेवण्याकरता परिश्रम घ्यावे लागतात हे सर्वांनी प्रामाणिकपणे कबूल केलेच पाहिजे. (याकोब ३:५-१२) घोड्याच्या मानाने लगाम लहान असतो; जहाजाच्या मानाने सुकाणूही लहान असते. मानवी शरीराच्या मानाने जीभसुद्धा लहानच आहे पण ती “मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते.” फुशारकीचा देवाला वीट आहे हे शास्त्रवचनांत स्पष्ट सांगितलेले असल्यामुळे आपण सर्वजण त्यापासून दूर राहण्याकरता देवाची मदत घेऊ या. (स्तोत्र १२:३, ४; १ करिंथकर ४:७) जंगलाला आग लागण्याकरता ठिणगी पुरेशी असते ही गोष्ट लक्षात ठेवून आपण, आपल्याला चिडविले असताही आपल्या जिभेवर ताबा ठेवू या. याकोबाच्या म्हणण्यानुसार, “जीभ ही आग आहे” जी मोठी हानी घडवून आणू शकते. (नीतिसूत्रे १८:२१) एवढेच नव्हे तर, बेलगाम जीभ “अनीतीचे भुवन आहे!” या अभक्‍त दुनियेतील प्रत्येक दुष्ट गुण बेलगाम जीभेशी संबंधित आहे. निंदा, खोटी शिकणूक यांसारख्या हानीकारक गोष्टींसाठी ती जबाबदार आहे. (लेवीय १९:१६; २ पेत्र २:१) तुम्हाला काय वाटते? आपल्या जिभेवर ताबा ठेवण्यास परिश्रम करण्यासाठी आपल्या विश्‍वासाने आपल्याला प्रवृत्त करावे की नाही?

१५. बेलगाम जिभेमुळे कोणती हानी होऊ शकते?

१५ बेलगाम जीभ आपल्याला पूर्णपणे ‘मर्जीतून उतरवते.’ उदाहरणार्थ, खोटे बोलताना आपण अनेकदा पकडलो गेलो तर आपल्याला खोटारडे म्हणून नावच पडते. पण, एक बेलगाम जीभ “सृष्टीचे चक्र पेटविणारी” कशी काय ठरते? जीवनाला दुष्टचक्र बनवण्याद्वारे. एका बेलगाम जीभेमुळे संपूर्ण मंडळी अस्वस्थ होऊ शकते. याकोब ‘गेहेन्‍ना’ अर्थात हिन्‍नोम दरीचा उल्लेख करतो. एके काळी मुलांचा बळी देण्याकरता वापरली जाणारी दरी जेरूसलेमची कचरातळ झाली जेथे सतत आग जळत असायची. (यिर्मया ७:३१) म्हणजे, गेहेन्‍ना नाशाचे प्रतीक आहे. एका अर्थाने, गेहेन्‍नातील नाशकारक शक्‍ती बेलगाम जीभेलाही सूचित होते. आपण आपल्या जीभेवर ताबा ठेवला नाही तर तिच्यामुळे लागणाऱ्‍या आगीत आपणच पहिल्यांदा होरपळून निघू शकतो. (मत्तय ५:२२) एखाद्याची निंदा केल्याबद्दल आपल्यालाच कदाचित मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते.—१ करिंथकर ५:११-१३.

१६. बेलगाम जिभेमुळे होणाऱ्‍या हानीचा विचार केल्यावर आपण काय करावे?

१६ देवाचे वचन वाचल्यावर तुम्हाला माहीत झाले असेल की प्राणी राज्यावर अधिकार गाजवण्याचा यहोवाने मानवाला आदेश दिला होता. (उत्पत्ति १:२८) सर्व प्रकारच्या प्राण्यांना माणसाळविण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. जसे की, प्रशिक्षित बहिरीससाण्याचा शिकारीसाठी उपयोग करण्यात आला आहे. याकोब ज्या ‘सरपटणाऱ्‍या प्राण्यांचा’ उल्लेख करतो त्यात गारूड्यांच्या कह्‍यात असलेल्या सापांचा समावेश असू शकतो. (स्तोत्र ५८:४, ५) मानव, देवमाशालाही आपल्या कह्‍यात ठेवू शकतो पण पापी मनुष्य मात्र आपल्या जीभेवर पूर्णपणे ताबा ठेवू शकत नाहीत. तरीसुद्धा, आपण मात्र अपमानास्पद, खोचक किंवा निंदात्मक भाषा टाळणे आवश्‍यक आहे. बेलगाम जीभ जहाल विष भरलेल्या एखाद्या घातक साधनासारखी होऊ शकते. (रोमकर ३:१३) दुःखाची गोष्ट म्हणजे, खोट्या शिक्षकांच्या जिव्हांनी काही प्रारंभिक ख्रिश्‍चनांना देवापासून बहकवले. यास्तव, विषारी धर्मत्यागी विचारांना, लिखित असोत अथवा अलिखित असोत, आपल्यावर कदापि कब्जा मिळवू देऊ नये.—१ तीमथ्य १:१८-२०; २ पेत्र २:१-३.

१७, १८. याकोब ३:९-१२ मध्ये कोणती विसंगती दाखवण्यात आली आहे व याबाबतीत आपण काय करावे?

१७ देवावर विश्‍वास ठेवून त्याला खूष करण्याची इच्छा आपल्याला धर्मत्यागापासून बचावून ठेवील आणि आपल्या जिभेचा विसंगतपणे वापर टाळण्यास मदत करील. काहींची विसंगती दर्शवून याकोब म्हणतो की, “तिच्या [जिभेच्या] योगे, जो प्रभु व पिता त्याची आपण स्तुति करितो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापहि देतो.” (उत्पत्ति १:२६) यहोवा आपला पिता असल्यामुळे, “जीवन, प्राण व सर्व काही तो . . . सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२४, २५) आध्यात्मिक अर्थानेही तो अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा पिता आहे. मानसिक आणि नैतिक गुणांमध्ये आपण सर्व “देवाच्या प्रतिमेप्रमाणे” आहोत; प्रीती, न्याय आणि बुद्धी या गुणांमुळे आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. मग, यहोवावर आपला विश्‍वास आहे तर आपण कशाप्रकारे कार्य करावे?

१८ आपण लोकांचा तळतळाट करतो याचा अर्थ आपण त्यांना शाप देतो. आपण ईश्‍वरप्रेरित संदेष्टे नसल्यामुळे कोणालाही शाप देण्याचा आपल्याला अधिकार नाही; अशा प्रकारचे भाषण, आपली उपासना निरर्थक ठरवणारी द्वेष भावनेचा पुरावा ठरेल. एकाच तोंडून “स्तुती व शाप” निघणे उचित नाही. (लूक ६:२७, २८; रोमकर १२:१४, १७-२१; यहूदा ९) सभांमध्ये देवाची स्तुती गायची आणि नंतर एखाद्या सहविश्‍वासूबद्दल वाईट बोलायचे किती पापमय आहे! एकाच झऱ्‍यातून गोड आणि कडू पाणी येऊ शकत नाही. जसे “अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर” येऊ शकत नाहीत तसेच खाऱ्‍या पाण्यातून गोड पाणी निघू शकत नाही. आपल्या तोंडून चांगले ते निघाले पाहिजे पण त्याऐवजी खोचक बोलणे निघत असले म्हणजे आध्यात्मिकरीत्या आपल्यात काहीतरी खोट असावी. खोचक बोलण्याची आपल्याला सवय लागली असेल तर, ती सवय तोडण्याकरता आपण यहोवाला प्रार्थना करू या.—स्तोत्र ३९:१.

वरून येणाऱ्‍या सुज्ञतेच्या योगे कार्य करा

१९. स्वर्गीय सुज्ञतेचे आपल्याला मार्गदर्शन होत असेल तर इतरांवर आपण कसा प्रभाव पाडू शकतो?

१९ विश्‍वास असलेल्यांना शोभेल असे बोलण्यासाठी व कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना सुज्ञतेची आवश्‍यकता आहे. (याकोब ३:१३-१८) आपल्याला देवाचे आदरयुक्‍त भय असल्यास, तो आपल्याला स्वर्गीय सुज्ञता, बुद्धीचा योग्य वापर करण्याची क्षमता बहाल करेल. (नीतिसूत्रे ९:१०; इब्री लोकांस ५:१४) ‘ज्ञानजन्य लीनता’ कशी दाखवावी हे त्याचे वचन आपल्याला शिकवते. आणि आपण लीन असल्यामुळे मंडळीत शांती टिकून राहते. (१ करिंथकर ८:१, २) सहविश्‍वासूंचे महान शिक्षक असल्याची फुशारकी मारणारे ‘ख्रिस्ती सत्याविरुद्ध लबाडी’ करत असतात; पण हे सत्य त्यांच्या अहंकाराचा धिक्कार करते. (गलतीकर ५:२६) अशांचे “ज्ञान” “ऐहिक,” असते; देवापासून विभक्‍त झालेल्या पापी मानवांचे हे गुणलक्षण आहे. ते “दैहिक,” [पं.र.भा.] शारीरिक प्रवृत्तींचे फळ आहे. एवढेच नव्हे तर, ते “सैतानाकडले आहे,” कारण दुरात्मे घमेंडी आहेत! (१ तीमथ्य ३:६) म्हणूनच, आपण सुज्ञता व नम्रता बाळगून कार्य करू या जेणेकरून निंदा आणि पक्षपातीपणा यासारख्या ‘नीच’ प्रवृत्तींची भरभराट करणारे वातावरण आपण निर्माण करणार नाही.

२०. तुम्ही स्वर्गीय सुज्ञतेचे वर्णन कसे कराल?

२० “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते;” ते आपल्याला नैतिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या शुद्ध करते. (२ करिंथकर ७:११) ते “शांतिप्रिय” असून शांती राखण्यास आपल्याला प्रवृत्त करते. (इब्री लोकांस १२:१४) स्वर्गीय सुज्ञता आपल्याला, हाताळण्यास कठीण असलेल्या हट्टी वृत्तीचे नव्हे तर ‘समजूतदार’ बनवते. (फिलिप्पैकर ४:५) वरून येणारी सुज्ञता ‘आज्ञेत राहण्यास तत्पर,’ ईश्‍वरी शिक्षणाच्या अधीन राहण्यास व यहोवाच्या संघटनेला सहकार्य देण्यास उत्तेजन देणारी आहे. (रोमकर ६:१७) वरून येणारी सुज्ञता आपल्याला दयाळू, करुणामय बनवते. (यहूदा २२, २३) सुज्ञता ही “सत्फले” यांनी पूर्ण असल्यामुळे, ती इतरांबद्दल चिंता करण्यास तसेच चांगुलपणा, धार्मिकता आणि सत्य यांच्या सुसंगतेत असलेल्या कार्यांस प्रेरित करते. (इफिसकर ५:९) आणि शांतीचे चाहते या नात्याने आपण शांतीमय वातावरणात बहरणाऱ्‍या ‘नीतिमत्त्वरूपी फळांचा’ आस्वाद घेतो.

२१. याकोब २:१–३:१८ नुसार, देवावरील विश्‍वासाने आपल्याला कोणती कार्ये करण्यास प्रवृत्त करावे?

२१ स्पष्टपणे मग, विश्‍वास कार्य करण्यास प्रवृत्त करतो. तो आपल्याला निःपक्षपाती, दयाळू आणि उत्तम कार्यांत क्रियाशील बनवतो. आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास व स्वर्गीय सुज्ञतेनुसार कार्य करण्यास विश्‍वास आपल्याला साहाय्य करतो. पण या पत्रातून आपण एवढेच शिकत नाही. यहोवावर विश्‍वास असलेल्यांना शोभते त्याप्रमाणे वागण्यास आपली मदत करणारा आणखी सल्ला याकोब आपल्याला देतो.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ पक्षपातीपणा दाखवण्यात गैर काय आहे?

◻ विश्‍वास आणि कार्य हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत?

◻ जिभेवर नियंत्रण ठेवणे इतके महत्त्वपूर्ण का आहे?

◻ स्वर्गीय सुज्ञतेचे वर्णन करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा