त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
आत्म-त्याग व निष्ठा यांचा नमुना
अलीशा नामक एका तरुण शेतकऱ्याच्या जीवनातील नित्यक्रमानुसार नांगरणीचा तो दिवस सर्वात महत्त्वपूर्ण दिवस ठरला. अलीशा आपल्या शेतात काम करत असताना अचानक इस्राएलचा प्रमुख संदेष्टा एलीया त्याच्याकडे आला. ‘याचे असे अचानक येणे कसे झाले?’ असा अलीशाच्या मनात विचार आला असावा. त्याच्या शंकेचे लागलीच निरसन झाले. एलीयाने अलीशावर आपला झगा टाकला व याद्वारे तो त्याला हे सुचवत होता, की एक ना एक दिवस अलीशा त्याचा वारस होणार होता. अलीशाने हे निमंत्रण क्षुल्लक समजले नाही. एलीयाचा सेवक होण्याकरता त्याने हातातले काम तिथल्या तिथेच सोडून दिले.—१ राजे १९:१९-२१.
सहा वर्षांनंतर, एलीयाची जाण्याची वेळ आली. त्याच्या प्रस्थानाच्या अहवालाला, इब्री शास्त्रवचनांतील “सर्वात प्रभावी अहवाल” असे संबोधण्यात आले आहे.
एलीया प्रस्थानाची तयारी करतो
जाण्याआधी एलीयाला बेथेल, जेरिको आणि जॉर्डनला शेवटची भेट द्यावी असे वाटले. त्यासाठी त्याला पुष्कळ अंतर तुडवावे लागणार होते, डोंगरदऱ्या पार कराव्या लागणार होत्या. प्रवासादरम्यान ते जेथे जेथे थांबले तेथे तेथे एलीयाने अलीशाला राहावयास आर्जवले. पण, अलीशाने शेवटपर्यंत आपल्या धन्याची पाठ सोडली नाही.—२ राजे २:१, २, ४, ६.
बेथेल आणि जेरिकोत असताना, “संदेष्ट्यांचे शिष्य” अलीशाकडे आले.a आणि त्यांनी त्याला विचारले, “आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्यावर “मला ठाऊक आहे, पुरे करा,” असे त्याने त्यांना उत्तर दिले.—२ राजे २:३, ५.
तेथून, एलीया व अलीशा जॉर्डन नदीच्या दिशेने निघाले. जॉर्डनला पोहंचल्यावर, एलीयाने एक चमत्कार केला आणि ५० संदेष्ट्यांच्या शिष्यांनी बघ्याची भूमिका घेतली. “एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारिली: तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले.”—२ राजे २:८.
नदी पार केल्यावर, एलीया अलीशास म्हणाला: “मला तुजपासून नेण्यात येण्यापूवी मी तुजसाठी काय करू ते मला सांग.” अलीशाने एलीयाठायी असलेल्या आत्म्याचा “दुप्पट वाटा” मागितला; म्हणजे, एखाद्या ज्येष्ठ पुत्राला स्वाभाविकरीत्या मिळेल त्याच्या दुप्पट. अर्थातच, एखादा ज्येष्ठ पुत्र जसे आपल्या बापाचा मान राखतो त्याचप्रमाणे अलीशानेही एलीयाचा मान राखला होता. शिवाय, इस्राएलमध्ये यहोवाचा संदेष्टा व एलीयाचा वारस या नात्यानेही त्याचा अभिषेक करण्यात आला होता. तेव्हा त्याची ही विनंती स्वार्थी अथवा अनुचितही नव्हती. पण, ही विनंती केवळ यहोवाच मान्य करू शकतो हे माहीत असल्यामुळे एलीया नम्रपणे त्याला म्हणाला: “तू दुर्घट गोष्ट मागतोस.” पुढे तो असेही म्हणाला: “मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.”—२ राजे २:९, १०; अनुवाद २१:१७.
अलीशाने आता आपल्या धन्याच्या समीप राहण्याचा अधिकच निर्धार केला. एकाएकी, “एक अग्निरथ व एक अग्निवारु” प्रकट झाले. अलीशाच्या विस्मित डोळ्यांदेखत, एलीया एका वावटळीत अदृश्य झाला—त्याचे आश्चर्यकारकपणे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर झाले.b अलीशाने एलीयाचा झगा उचलला आणि पुन्हा जॉर्डन नदीच्या तीराकडे मागे चालत गेला. पाण्यावर मारून त्याने म्हटले: “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” पाण्यावर मारताच पाणी दुभंगले; अलीशाला एलीयाचा वारस असण्याकरता ईश्वरी साहाय्य होते याची प्रचिती झाली.—२ राजे २:११-१४.
आपल्याकरता धडे
एलीयाबरोबर खास सेवा करण्याचे आमंत्रण मिळाल्यावर अलीशाने लगेचच इस्राएलच्या प्रमुख संदेष्ट्याची सेवा करण्यासाठी आपली शेती सोडून दिली. त्याची काही कामे अगदी क्षुल्लक होती, कारण “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा” म्हणून लोक त्याला ओळखत होते.c (२ राजे ३:११) तरीसुद्धा, अलीशाने या कामाला सुहक्क समजले व तो एलीयाच्या बाजूने एकनिष्ठ राहिला.
आज, देवाचे अनेक सेवक अशाच प्रकारचा आत्मत्यागाचा आत्मा दाखवतात. काहींनी, लांबलांबच्या क्षेत्रांमध्ये सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी किंवा बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून सेवा करण्यासाठी आपली ‘शेती’ अर्थात आपल्या उपजीविकेचे साधन सोडून दिले आहे. काहीजण संस्थेच्या बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी परदेशात राहावयास गेले आहेत. अनेकांनी क्षुल्लक समजली जाणारी कामे करणे स्वीकारले आहे. पण, यहोवाची चाकरी करणारा कोणीही क्षुल्लक काम करत नसतो. स्वखुषीने सेवा करणाऱ्या प्रत्येकाची यहोवा प्रशंसा करतो आणि आत्म-त्यागाच्या त्यांच्या आत्म्यावर तो आशीर्वाद पाठवेल.—मार्क १०:२९, ३०.
अलीशा एलीयाच्या बाजूने शेवटपर्यंत राहिला. संधी दिल्यावरही त्याने त्या वृद्ध संदेष्ट्याला सोडून दिले नाही. एलीयाबरोबर त्याने विकसित केलेल्या घनिष्ठ नातेसंबंधामुळे तो इतक्या आनंदाने त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकला. आज, देवाबरोबर आपला नातेसंबंध मजबूत करण्यास व आपल्या सहविश्वासूंच्या अधिक समीप येण्यास देवाचे सेवक झटत आहेत. ऐक्याच्या अतूट बंधनावर आशीर्वाद दिला जाईल कारण बायबल यहोवाविषयी म्हणते: “एकनिष्ठ जनाशी तू एकनिष्ठेने वागशील.”—२ शमुवेल २२:२६, NW.
[तळटीपा]
a “संदेष्ट्यांचे शिष्य” ही संज्ञा, या खास कार्याकरता बोलावलेल्यांसाठी असलेल्या प्रशिक्षण शाळेला अथवा संदेष्ट्यांच्या सहकारी मंडळाला कदाचित सूचित होते.
b यहुदाचा राजा यहोराम याला एलीयाने पाठवलेला संदेश काही वर्षांनंतर लिहिण्यात आला होता.—२ इतिहास २१:१२-१५.
c नोकराने आपल्या धन्याच्या हातांवर, विशेषकरून भोजनानंतर हात धुण्याकरता पाणी ओतण्याची तेथे प्रथा होती. ही प्रथा, आदरातिथ्य, आदर आणि काही संबंधात नम्रता प्रदर्शित करणाऱ्या पाय धुण्याच्या प्रथेसारखीच होती.—उत्पत्ति २४:३१, ३२; योहान १३:५.