‘खोल पाणी’ काढणे
बायबलमधील एक म्हण अशी आहे: “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस [“समजबुद्धी असलेला,” NW] ती बाहेर काढितो.” (नीतिसूत्रे २०:५) आज कित्येक देशांमध्ये पाणी काढण्यासाठी इतका त्रास होत नाही, पण बायबल काळांमध्ये खूप त्रास होत असे. येशू, शोमरोनी स्त्रीसोबत बोलत होता त्यावेळी ती याकोबाच्या झऱ्यातून पाणी काढत होती, ही विहीर सुमारे २३ मीटर खोल होती!—योहान ४:५-१५.
नीतिसूत्रे २०:५ दाखवते त्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या हृदयात वसलेले खोल विचार व भावना जाणून घेण्यासाठी लागणारी समजबुद्धी, एखाद्या विहीरीतून पाणी वर काढण्यासाठी लागणाऱ्या परिश्रमासारखीच आहे. जीवनाच्या बहुतेक क्षेत्रांमध्येही हेच सत्य आढळते. उदाहरणार्थ, कित्येक वर्षांच्या कालावधीत, ज्ञान व अनुभव यांचा खजिना संपादन केलेल्या लोकांना कदाचित तुम्ही ओळखत असाल. कोणीही विचारल्याशिवाय आपणहून सल्ला देण्यास हे लोक इच्छुक नसतील तर, त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आस्था दाखवून, प्रश्ने विचारून, व कौशल्याने विचारपूस करून, जणू तुम्ही तुमचा पोहरा बुद्धीच्या खोल विहीरीत सोडत असता.
कुटुंबामध्येही नीतिसूत्रे २०:५ चा सल्ला लाभदायक ठरतो. आपण अनेकदा पत्नींना असे म्हणताना ऐकतो: “माझ्या पतीला काय वाटतं, त्याबद्दल ते मला कधीही सांगत नाहीत!” एक पती कदाचित असे म्हणू शकेल: “माझी पत्नी तर माझ्याशी बोलतच नाही!” अशावेळी, सोबत्याच्या हृदयात खोल दडलेल्या विचारांना बाहेर काढण्यासाठी समजबुद्धीची गरज आहे. (थकलेले दिसता/थकलेली दिसतेस . . . काय झालं? मी काय मदत करू शकते/शकतो का?) असे व्यवहारकुशल प्रश्न, पुष्कळदा मनमोकळ्या संभाषणाला वाव देऊ शकतात. अशी समजबुद्धी दाखवल्यामुळे विवाहबंधन दृढ होते आणि त्याचा लाभ पतीपत्नी दोघांनाही होतो.