खरे सौख्य—त्याचे रहस्य काय आहे?
मानवांना सुखी राहण्याकरता बनवले होते. कशावरून? त्यांच्या निर्मितीचा जरा विचार करून पाहा.
यहोवा देवाने पहिल्या मानवी जोडप्याला सुख उपभोगण्याच्या क्षमतेसह निर्मिले होते. त्याने आदाम व हव्वेला, एदेन नावाच्या परादीसमध्ये अर्थात आनंदवनात ठेवले होते. निर्माणकर्त्याने त्यांना सर्व जीवनावश्यक शारीरिक गोष्टी पुरवल्या होत्या. त्या वनात “दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे” होती. (उत्पत्ती २:९) आदाम आणि हव्वा ठणठणीत, सशक्त आणि देखणे होते—ते परिपूर्ण आणि खरोखरच सुखी होते.
परंतु, त्यांच्या सौख्याचे रहस्य काय होते बरे? त्यांचे परादीसमय गृह की त्यांची शारीरिक परिपूर्णता? देवाकडून मिळालेल्या या देणगींमुळे त्यांचे जीवन आनंदी तर झालेच; पण त्यांचे सौख्य अशा मूर्त गोष्टींवर निर्भर नव्हते. एदेन बाग केवळ एक मनोरम बाग नव्हती. ती पवित्र जागा होती, देवाची उपासना करण्याची जागा. आपल्या निर्माणकर्त्याबरोबर प्रेमळ नातेसंबंध प्रस्थापित करून त्यास टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या चिरकालिक सौख्याचे रहस्य होते. सुखी होण्याकरता त्यांना पहिल्यांदा आध्यात्मिक असावयाचे होते.—पडताळा मत्तय ५:३.
आध्यात्मिकतेमुळे सौख्य
आदामाचा सुरवातीला देवाबरोबर आध्यात्मिक नातेसंबंध होता. पुत्राचा आपल्या पित्यासोबत असलेल्या एका प्रेमळ, कोमल नातेसंबंधाप्रमाणे. (लूक ३:३८) एदेन बागेत, आदाम आणि हव्वेची परिस्थिती अनुकूल होती ज्यामुळे ते उपासना करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करू शकले. स्वेच्छेने व प्रेमापोटी यहोवाच्या आज्ञेत राहून, ते देवाचा सन्मान व गौरव करू शकत होते जे प्राणी करू शकत नव्हते. आपल्या बुद्धीचा वापर करून ते देवाच्या आश्चर्यकारक गुणांची प्रशंसा करू शकत होते व त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करू शकत होते. अशाप्रकारे ते यहोवाच्या प्रेमळ व कोमल छायेखाली देखील राहू शकत होते.
निर्माणकर्त्याबरोबरच्या या सख्यसंबंधामुळे व त्याच्या नियमांच्या आज्ञेत राहिल्यामुळे आपल्या पहिल्या पालकांना खरे सुख लाभले. (लूक ११:२८) सौख्याचे रहस्य जाणून घेण्याकरता पुष्कळ वर्षांपर्यंत आदाम आणि हव्वेने प्रयत्न करीत राहावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात आली नव्हती. त्यांच्या निर्मितीच्या क्षणापासूनच ते सुखी होते. देवाबरोबर शांतीत व त्याच्या अधिकाराच्या अधीन राहिल्यामुळे त्यांना सुख मिळाले.
परंतु, अवज्ञा केल्याबरोबर त्यांचे सुख नाहीसे झाले. आदाम व हव्वेने बंड पुकारून यहोवाबरोबर असलेला आपला आध्यात्मिक नातेसंबंध तोडला. आता ते देवाचे मित्र राहिले नाहीत. (उत्पत्ति ३:१७-१९) बागेतून त्यांची हकालपट्टी झाल्या दिवसापासूनच यहोवाबरोबरचे त्यांचे दळणवळण थांबले. त्यांनी त्यांची परिपूर्णता, अनंतकाळ जगण्याची आशा व त्यांचे बागेसमान घर गमावले. (उत्पत्ति ३:२३) याहून महत्त्वाचे म्हणजे, देवाबरोबर असलेला त्यांचा नातेसंबंध तुटल्यामुळे त्यांनी सौख्याचे रहस्यही गमावले.
निवड करण्याची आपली क्षमता
आदाम आणि हव्वेने जाता जाता आपली मानवी गुणलक्षणे, आपला उपजत विवेक व आध्यात्मिकतेची क्षमता आपल्या अपत्याला दिली. पण मानव परिवाराला प्राण्यांच्या स्तराला येऊन पोहंचण्याइतके क्षुद्र करण्यात आले नाही. आपण निर्माणकर्त्याशी समेट करू शकतो जे प्राणी करू शकत नाहीत. (२ करिंथकर ५:१८) बुद्धिमान असल्यामुळे मानवांकडे देवाच्या आज्ञेत राहायचे की नाही ही निवड करण्याचे सामर्थ्य आहे. पुष्कळ वर्षांनंतर यहोवाने नव्याने स्थापन झालेल्या इस्राएल राष्ट्रासमोर जीवनाची वा मृत्यूची निवड ठेवली त्यावरून हे स्पष्ट झाले. देवाने आपला प्रवक्ता मोशे याच्याद्वारे म्हटले: “जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत.”—अनुवाद ३०:१५-१८.
परादीस गमावून हजारो वर्षे उलटल्यावर आजही आपण योग्य निवड करण्यास समर्थ आहोत. आपल्यात कार्य करणारा एक विवेक आहे व देवाच्या नियमांच्या आज्ञेत राहण्याकरता मूळ क्षमता आहे. बायबल “आतील माणूस” आणि “आंतरिक मनुष्य” याविषयी सांगते. (२ करिंथकर ४:१६, पं.र.भा.; रोमकर ७:२२, NW) आपल्या सर्वात देवाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करण्याची, त्याच्या विचारानुसार विचार करण्याची व आध्यात्मिक होण्याची उपजत शक्यता आहे हे ह्या संज्ञा दाखवून देतात.
आपला नैतिक स्वभाव आणि विवेक यांविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रांतील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.”—रोमकर २:१४, १५.
ईश्वरी सुज्ञता व आज्ञाधारकता —हेच रहस्य
पण मग एखाद्याला प्रश्न पडेल, की ‘जर आपल्या सर्वांमध्ये देवाची उपासना करण्याची स्वाभाविक ओढ आहे ज्यामुळे आपण खरोखरचे सुख उपभोगू शकतो तर सगळीकडे दुःखाचेच सावट पसरलेले का दिसते?’ कारण, सुखी होण्याकरता प्रत्येकाने आध्यात्मिकपणे वाढ केली पाहिजे. मानवाला सुरवातीला देवाच्या प्रतिमेत निर्मिण्यात आले असले तरीसुद्धा, मानव आपल्या निर्माणकर्त्यापासून खूप दूर गेला आहे. (इफिसकर ४:१७, १८) यास्तव, प्रत्येकाने देवाबरोबर आध्यात्मिक नातेसंबंध जोडून तो टिकवून ठेवण्याकरता खचित पावले उचलणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा नातेसंबंध आपोआप निर्माण होत नाही.
आध्यात्मिकता वाढवण्याकरता येशूने दोन महत्त्वाची तत्त्वे दिली. एक, देवाचे अचूक ज्ञान प्राप्त करणे व दुसरे, आज्ञाधारकपणे त्याच्या इच्छेच्या अधीन होणे. (योहान १७:३) देवाचे वचन उद्धृत करून येशू म्हणाला: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) दुसऱ्या प्रसंगी येशू म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” (योहान ४:३४) अनेक दशकांसाठी चुकतमाकत सुधारपद्धतीद्वारे सुखाचा शोध घेत राहण्याची आपल्याला गरज नाही. अनुभव, सौख्याचे रहस्य नाही. उलट, फक्त ईश्वरी सुज्ञता व आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेत राहिल्यास जीवनात खरे सौख्य मिळू शकेल.—स्तोत्र १९:७, ८; उपदेशक १२:१३.
ईश्वरी सुज्ञता बाळगण्याद्वारे व देवासमोर उत्तम भूमिका राखल्याद्वारे मिळणारे सौख्य आपल्या आवाक्याबाहेर नाही. (प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७) यहोवा आणि त्याच्या उद्देशाविषयीचे ज्ञान सर्वांना उपलब्ध आहे. अनेक भाषांत कोट्यवधी प्रती उपलब्ध असलेले बायबल, जगाचे सर्वात जास्त वितरीत असलेले पुस्तक आहे. देवाचा मित्र होण्यास व खऱ्या सुखाचा आनंद लुटण्यास बायबल तुमची मदत करू शकेल कारण शास्त्रवचनांत म्हटले आहे की, “ज्या लोकांचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] आहे ते धन्य!”—स्तोत्र १४४:१५.
[७ पानांवरील चित्र]
‘आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.’—मत्तय ५:३