वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १०/१५ पृ. ८-१२
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग तीन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग तीन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मिशनरी आणि बायबल संस्था
  • भाषांतरकाराच्या अडचणी
  • वादाच्या भोवऱ्‍यात बायबल
  • शोधांकरवी बायबल मूळग्रंथ निर्धारित करण्यात मदत
  • वॉच टावर सोसायटी आणि बायबल
  • भाषांतर एक, भाषा अनेक
  • सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता
  • जिवंत भाषा “बोलणारे” पुस्तक
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
  • कोडेक्स सायनाटीकसला बचावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • देवाच्या वचनाच्या रसिकांसाठी विक्रम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • संवाद साधणारा देव—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १०/१५ पृ. ८-१२

बायबल आपल्या हातात कसे आले—भाग तीन

बर्मा, सन १८२४ —राजाच्या शिपायांनी नुकतेच ॲडनायरम आणि ॲन जड्‌सन यांचे मिशनरी गृह पालथे पाडून, होत्या नव्हत्या त्या सर्व मोलवान वस्तू जप्त केल्या आहेत. पण जे सर्वात मोलवान, नेमके तेच त्यांच्या नजरेतून निसटले आहे, आणि ते म्हणजे—ॲनने घरात कुठेतरी जमिनीखाली पुरून ठेवलेले बायबलचे एक भाषांतरीत हस्तलिखित. भाषांतरकार, म्हणजे ॲडनायरम यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावण्यात आल्यामुळे ते साखळ्यांनी जखडलेल्या अवस्थेत डासांनी भरलेल्या एका कोठडीत पडले आहेत. जमिनीतील ओलसरपणामुळे ते हस्तलिखित कुजून जाण्याचा धोका आहे. काय करता येईल? ॲन ते हस्तलिखित एका उशीत घालून ती शिवून टाकते आणि तुरुंगात आपल्या नवऱ्‍याकडे पाठवते. ही उशी सांभाळून ठेवली जाते आणि त्यातल्या हस्तलिखितातून बनते, पहिले बर्मी बायबल.

कालसरितेच्या प्रवाहात बायबलला अशाप्रकारच्या अनेक वादळांना तोंड द्यावे लागले आहे. या आधीच्या अंकांत आपण बायबलचे लिखाण पूर्ण झाले तेव्हापासून १६०० या शतकाच्या सुरवातीपर्यंत त्याचे भाषांतर आणि वितरण कसे झाले ते पाहिले. त्यानंतर आजपावेतो बायबलच्या प्रवासात काय काय घडले? सर्व लोकांना, ते कधीतरी उपलब्ध होणार होते का? शिवाय, यात वॉच टावर सोसायटीची कोणती भूमिका राहिली आहे?

मिशनरी आणि बायबल संस्था

अनेक देशांमध्ये, १६०० आणि १७०० या शतकांत बायबलचे वाचन अचानक अत्यंत प्रचलित झाले होते. इंग्लंडच्या लोकसमाजावर तर या कालावधीत बायबलचा अतिविलक्षण प्रभाव पडला. बायबलमधील गोष्टी आणि शिकवणुकी अक्षरशः राजापासून रंकापर्यंत ज्याच्या त्याच्या ध्यानीमनी रुजल्या होत्या. पण, बायबलचा प्रभाव एवढ्यावरच सीमित राहिला नाही. इंग्लंड हे दर्यावर्दी व्यापाराचे एक केंद्र आणि वसाहतवादी साम्राज्य होते, आणि काही इंग्रजांनी प्रवासाला जाताना आपल्यासोबत बायबलही नेले. यामुळे, बायबलचा आणखी व्यापक प्रमाणावर प्रसार होण्याकरता जणू मार्ग मोकळा झाला.

इंग्लंडमध्ये १७०० या शतकाच्या उत्तरार्धात, बायबल वाचणारे काहीजण ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या देशांमधील मूळ रहिवाशांच्या आध्यात्मिक गरजांविषयी विचार करण्यास प्रवृत्त झाले. पण, याविषयी सर्वांचे एकमत मुळीच नव्हते. लोकांचे भविष्य पूर्वनियोजित केलेले आहे अशी अनेक चर्च पुढाऱ्‍यांची समजूत असल्यामुळे, काही लोकांचे तारण होऊ नये ही देवाचीच इच्छा आहे असे त्यांना वाटे. भारतात जाऊन एक मिशन स्थापित करण्याच्या उद्देशाने साहाय्य मिळवण्यासाठी विल्यम कॅरी या भावी मिशनऱ्‍याने अत्यंत त्वेषी भाषण दिले तेव्हा श्रोत्यांमधील एकाने त्याला खडसावून म्हटले: “अहो राव, खाली बसा; देवाची मर्जी असेल तेव्हा तो स्वतःहूनच मूर्तिपूजकांचे धर्मपरिवर्तन घडवून आणील, त्यासाठी तुमच्या मदतीची जरूर पडणार नाही!” तरीसुद्धा, १७९३ साली कॅरी समुद्री मार्गाने भारतात गेले. आश्‍चर्य म्हणजे, त्यांनी संपूर्ण बायबलचा किंवा त्याच्या काही भागांचा पाहता पाहता ३५ भारतीय भाषांत अनुवाद केला.

स्थानिक भाषेतले बायबल हे एक अत्यावश्‍यक सहायक साधन असल्याची मिशनऱ्‍यांना जाणीव झाली. पण बायबलच्या प्रती पुरवणार कोण? बायबलला सबंध जगात पोहंचविणाऱ्‍या चळवळीची सुरवात नकळत १६ वर्षीय मेरी जोन्स नावाच्या एका वेल्श मुलीच्या हातून कशी झाली याचा वृत्तान्त रोचक आहे. १८०० साली, एका पाळकाकडून वेल्श भाषेतले बायबल खरेदी करण्यासाठी मेरी अनवाणी ४० किलोमीटर चालत गेली. सहा वर्षांपर्यंत पै पै साठवून ती मोठ्या आशेने गेली होती, पण बायबलच्या सर्व प्रती विकल्या गेल्याचे तिला कळले तेव्हा निराशेपायी ती बिचारी हुंदके देऊन रडू लागली. पाळकाचे हृदय हेलावले, आणि त्याने तिला स्वतःच्या बायबलपैकी एक दिले.

यानंतर, तो पाळक विचार करू लागला, की मेरीसारखेच आणखी कितीतरी लोक असतील ज्यांना एक बायबल हवे असेल; त्याने लंडनमधील आपल्या काही परिचितांसोबत या विवंचनेविषयी चर्चा केली. परिणामस्वरूप, १८०४ साली ब्रिटिश ॲण्ड फॉरेन बायबल सोसायटी स्थापन करण्यात आली. या संस्थेचा उद्देश एवढाच होता की लोकांना स्वतःच्या भाषेत, परवडेल अशा किंमतीत, “स्पष्टीकरणार्थ टिपा किंवा विवेचनांशिवाय” मुद्रित केलेले बायबल उपलब्ध करून देणे. समासांतील भाष्ये काढून टाकण्याद्वारे, या सोसायटीच्या संस्थापकांना सैद्धान्तिक विवाद टाळायचा होता. तथापि, काही विषयांवरून, उदाहरणार्थ बायबलमध्ये सामील न करण्यात आलेली अतिरिक्‍त लिखाणे, पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देणे, आणि त्रैक्याचा सिद्धान्त यांवरून सदर बायबल सोसायटीच्या सदस्यांत कित्येकदा मतभेद होत असे.

हा सुरवातीचा उत्साह पसरायला वेळ लागला नाही; १८१३ सालापर्यंत जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क आणि रशिया येथेही सहयोगी संस्था स्थापन झालेल्या होत्या. कालांतराने, यात इतर देशांतील बायबल संस्थांचीही भर पडली. सुरवातीच्या या बायबल संस्थांनी आपले उद्देश निश्‍चित केले तेव्हा, जगात बोटावर मोजण्याइतक्याच मुख्य भाषा असतील असा त्यांचा ग्रह होता. हजारो भाषा जगात असतील हा विचारही त्यांच्या मनाला शिवून गेलेला नव्हता. थेट हिब्रू आणि ग्रीकमधून प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी लागणारे या मूळभाषांचे ज्ञान फार कमी भाषांतरकारांजवळ होते. म्हणूनच, ब्रिटिश ॲण्ड फॉरेन बायबल सोसायटीने भाषांतरे प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले तेव्हा त्यांच्या भाषांतरकारांनी बऱ्‍याचदा इंग्रजी भाषेतील किंग जेम्स व्हर्शनच्या आधारावर अनुवाद केला.

भाषांतरकाराच्या अडचणी

बायबलमधील पुष्कळसा भाग दररोजच्या अनुभवांवर आधारित असलेल्या वृत्तान्तांच्या आणि दृष्टान्तांच्या रूपात आहे. तत्त्वज्ञानाच्या कठीण भाषेपेक्षा अशा रूपात लिहिलेले असल्यामुळे बायबलचे भाषांतर तसे सोपे आहे. पण, साहजिकच मिशनऱ्‍यांच्या सुरवातीच्या भाषांतरांमध्ये काही बुचकळ्यात पाडणाऱ्‍या तर काही विनोदी चुका पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, एका विशिष्ट भाषांतरामुळे भारतातील काही लोकांचा असा ग्रह झाला की देव हा निळ्या रंगाचा आहे. “स्वर्गीय पिता” या शब्दप्रयोगातील “स्वर्गीय” शब्दासाठी जो शब्द वापरण्यात आला होता त्याचा अर्थ “आकाशाच्या रंगाचा”—म्हणजे, शब्दशः स्वर्गाच्या रंगाचा असा अर्थ होता!

भाषांतरकाराला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या अडचणींविषयी ॲडनायरम जड्‌सन यांनी १८१९ साली असे लिहिले: ‘जगाच्या दुसऱ्‍या टोकाला राहणाऱ्‍या लोकांची भाषा शिकायची म्हणजे सगळंच वेगळं पडतं, त्यांची भावना व्यक्‍त करण्याची पद्धत आपल्याला अगदी अनोळखी असते, आणि अक्षरं, शब्द असे की आपल्या माहितीतल्या कोणत्याच भाषेशी त्यांचे तिळमात्रही साम्य नसते; मदतीला शब्दकोष नाही की अनुवाद करणारा दुभाषिक नाही, शिवाय एखाद्या स्थानिक शिक्षकाची मदत घेतो म्हटलं, तर त्या भाषेचे निदान थोडेबहुत तरी ज्ञान असणे अनिवार्य—सारे करता करता नाकी नऊ येतात!’ असे असूनही, जड्‌सनसारख्या भाषांतरकारांनी हे सारे केल्यामुळेच बायबलची सुलभता वाढत गेली.—पृष्ठ १२ वरील तक्‍ता पाहा.

ॲन जड्‌सनने आपल्या नवऱ्‍याला भाषांतराच्या कठीण कामात मदत केली. पण, जड्‌सन दांपत्याला सोसाव्या लागलेल्या अडचणी या केवळ भाषांतरासंबंधीच नव्हत्या. राजाच्या शिपायांनी ॲडनायरमला फरफटत नेऊन तुरुंगात डांबले तेव्हा ॲनला दिवस गेलेले होते. आपल्या नवऱ्‍याची सुटका व्हावी म्हणून ती मोठ्या धैर्याने २१ महिन्यांपर्यंत पाषाणहृदयी अधिकाऱ्‍यांपुढे गयावया करीत राहिली. हा कठीण अनुभव, शिवाय शारीरिक दुखणी यांमुळे ती बिचारी अक्षरशः जर्जर झाली. ॲडनायरमची सुटका झाल्यावर काही काळातच त्याची धाडशी ॲन आणि त्यांची चिमुकली तापाने दगावल्या. ॲडनायरमवर आभाळच कोसळले. पण तरीसुद्धा देवाकडे शक्‍ती मागून त्याने भाषांतराचे आपले काम जारी ठेवले आणि अशारितीने १८३५ साली बर्मी भाषेत बायबलचे भाषांतर पूर्ण झाले. दरम्यान, बायबलपुढे इतर अप्रत्यक्ष आव्हाने उभी राहू लागली होती.

वादाच्या भोवऱ्‍यात बायबल

एकोणिसावे शतक हे भयंकर सामाजिक आणि राजनैतिक विवादांचे शतक होते; प्रसंगी, बायबल या विवादांचा प्रमुख विषय असे. उदाहरणार्थ, रशियन बायबल सोसायटी ही झार आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाठिंब्यानेच स्थापन करण्यात आली असली तरीसुद्धा, कालांतराने त्यांनी ही संस्था विसर्जित केली आणि तिच्यावर प्रतिबंध लावला. (साधारण एका वर्षाआधी, या संस्थेच्या विरोधकांनी हजारो बायबल जाळून टाकले होते.) सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी मोठ्या हिरिरीने बायबलच्या जगव्याप्त वितरणाचे जे कार्य सुरू केले होते त्या कार्याला खीळ घालण्याचा आता हे ऑर्थोडॉक्स पाळक आतोनात प्रयत्न करीत होते. बायबल, चर्चच्या आणि सरकारच्याही अधिकाराला धोक्यात आणते, असा एकोणिसाव्या शतकातल्या ऑर्थोडॉक्स पुढाऱ्‍यांचा अट्टाहास होता. दुसरीकडे पाहता, नुकत्याच सुरू झालेल्या राजकीय क्रांतीकारी चळवळीत सहभागी असलेल्यांच्या मते, बायबल हे अधिकाऱ्‍यांना धोकेदायक नसून, सामान्य लोकांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी चर्च आणि सरकार वापरत असलेले एक हत्यार होते. इकडे आड तिकडे विहीर अशी बायबलची स्थिती झाली!

पुढील वर्षांत बायबलला अधिकाधिक “वैचारिक” टक्के टोणपे खावे लागले. १८३१ साली चार्ल्स डार्विन समुद्रावाटे एका अशा प्रवासाला निघाला ज्याची त्याच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्तात परिणती झाली. १८४८ साली मार्क्स आणि एंजेल्स यांनी मिळून कॉम्युनिस्ट मॅनिफेस्टो काढला; यात ख्रिस्ती धर्म जुलूमशाही करण्याचे माध्यम आहे या अर्थाचा मजकूर होता. याच काळादरम्यान, बायबल टीकाकार बायबलच्या विश्‍वासार्हतेविषयी आणि त्यात उल्लेखित व्यक्‍तींच्या, खुद्द येशूच्याही ऐतिहासिकतेविषयी शंका उपस्थित करू लागले होते! पण, देवाला आणि बायबलला अमान्य करणाऱ्‍या या सिद्धान्तांतील तर्कदोष काही बुद्धीजिवी लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही आणि म्हणून ते विद्वत्तापूर्ण मार्गांनी बायबलची विश्‍वासार्हता सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. यांपैकी होते एक निष्णात जर्मन भाषाविशारद कॉन्स्टॅनटीन वॉन टिशेनडॉर्फ.

शोधांकरवी बायबल मूळग्रंथ निर्धारित करण्यात मदत

टिशेनडॉर्फ यांनी प्राचीन बायबल हस्तलिखितांच्या शोधात सबंध मध्य पूर्वेचा प्रवास केला; बायबलचा मूळग्रंथ निर्विवादपणे निर्धारित करण्याची त्यांची मनीषा होती. डार्विनने दि ओरिजिन ऑफ स्पीशीज प्रकाशित केले त्याच वर्षी, म्हणजे १८५९ मध्ये, टिशेनडॉर्फ यांना सिनाय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका मठात ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची सर्वात जुनी संपूर्ण प्रत गवसली. तिला कोडेक्स सायनायटिकस म्हणण्यात आले; जेरमीने लॅटिन व्हल्गेट पूर्ण केले तेव्हापासून सुमारे ५० वर्षांपूर्वी ती तयार करण्यात आली असावी. मठातून कोडेक्स घेण्याचे औचित्य अजूनही विवादात्मक असले तरीसुद्धा, टिशेनडॉर्फ यांनी ते प्रकाशित करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिले.a

मूळभाषांतील हस्तलिखितांपैकी सायनायटिकस सर्वात जुने असल्यामुळे, ग्रीक शास्त्रवचने बहुतांशी जशीच्या तशीच राहिली होती हे तर त्याद्वारे उघड झालेच झाले, पण नंतरच्या हस्तलिखितांत शिरलेल्या चुका देखील प्रकाशात आणण्यासाठी त्याकरवी अभ्यासकांना मदत मिळाली. उदाहरणार्थ, १ तीमथ्य ३:१६ येथे सायनायटिकसमध्ये आपण असे वाचतो: “तो देहाने प्रगट झाला.” “तो” ऐवजी, तेव्हापर्यंत ज्ञात असलेल्या बहुतांश हस्तलिखितांत “तो” या अर्थाच्या ग्रीक शब्दात किरकोळ बदल करून, “देव” यासाठी वापरण्यात येणारे एक संक्षिप्तरूप वापरलेले आढळते. तथापि, कोणत्याही ग्रीक हस्तलिखिताने या वचनात “देव” हा शब्द घालण्याच्या कितीतरी वर्षांपूर्वीच सायनायटिकस तयार झाले होते. त्याअर्थी, त्रैक्याच्या सिद्धान्ताला आधार देण्याच्या उद्देशाने मूळग्रंथात हा दोष मागाहून मुद्दाम सामील करण्यात आला हे पुराव्यानिशी स्पष्ट झाले.

टिशेनडॉर्फ यांच्या काळापासून, आणखी कितीतरी हस्तलिखितांचा शोध लागला आहे. एकंदरीत, आज हिब्रू शास्त्रवचनांची जवळजवळ ६,००० आणि ग्रीक शास्त्रवचनांची १३,००० पेक्षा जास्त ज्ञात हस्तलिखिते अस्तित्वात आहेत. या हस्तलिखितांच्या तुलनात्मक अभ्यासामुळे एक अतिशय विश्‍वासार्ह मूळभाषा ग्रंथ तयार करणे शक्य झाले आहे. एफ. एफ. ब्रूस या अभ्यासकाने म्हटल्यानुसार: “हस्तलिखितांतील तफावतींमुळे . . . ऐतिहासिक वास्तविकतेसंबंधी किंवा ख्रिस्ती विश्‍वास आणि चालीरितींसंबंधी कोणताही ठोस प्रश्‍न उपस्थित होत नाही.” आणखीही कित्येक भाषांत बायबलचे भाषांतर सुरूच राहिले, पण या वृद्धिंगत ज्ञानाचा लोकांना कोणता फायदा होणार होता?

वॉच टावर सोसायटी आणि बायबल

बायबल शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या एका लहानशाच पण विचारशील समूहाने १८८१ साली, भविष्यातील वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीची स्थापना केली. सुरवातीला त्यांनी इतर बायबल संस्थांनी काढलेले बायबल वितरीत केले; टिशेनडॉर्फ यांची ग्रीक शास्त्रवचने देखील यांपैकी होती. तथापि, १८९० पर्यंत त्यांनी स्वतःच बायबल प्रकाशनाच्या क्षेत्रात प्रवेश केलेला होता, आणि कितीतरी बायबलच्या आवृत्त्यांचे भाषांतर कार्य हाती घेणारे ते पहिलेच होते. १९२६ साली, सोसायटीने स्वतःच्या मुद्रण यंत्रांवर बायबलचे मुद्रण करण्याचे आरंभले. पण बायबलच्या एका अत्याधुनिक भाषांतराची अधिकाधिक गरज भासू लागली होती. गत शतकात विविध शोधांकरवी आणि अभ्यासांकरवी प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारावर, एखादे सहज समजण्यालायक आणि परवडण्यालायक बायबल तयार करता आले तर? याच उद्देशाने, सदर सोसायटीच्या सभासदांनी १९४६ साली बायबलचे एक नविनतम भाषांतर प्रकाशित करण्याचा विडा उचलला.

भाषांतर एक, भाषा अनेक

इंग्रजी भाषेत पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर तयार करण्याच्या उद्देशाने अनुभवी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची एक भाषांतर समिती स्थापन करण्यात आली. सुरवातीला केवळ ग्रीक शास्त्रवचनांचे हे भाषांतर १९५० ते १९६० यादरम्यान सहा खंडांत प्रकाशित करण्यात आले. १९६३ सालापासून ते आणखी २७ भाषांत भाषांतरीत करण्यात आले असून यांव्यतिरिक्‍त इतर भाषांचे भाषांतर सध्या मार्गावर आहे. इंग्रजी भाषेसाठी निश्‍चित करण्यात आलेली उद्दिष्टेच इतर भाषांनाही लागू करण्यात आली. पहिले म्हणजे भाषांतर हे अचूक असावे, अर्थात, मूळ विचारांशी त्यांचे शक्य होईल तितके साम्य असावे. विशिष्ट सैद्धान्तिक समजुतीला जुळवून घेण्यासाठी अर्थामध्ये फेरबदल करण्यात येऊ नयेत. दुसरे असे, की सुसंबद्धता कायम राखली जावी; त्याअर्थी भाषांतरात प्रत्येक मुख्य शब्दाच्या ठिकाणी संदर्भाच्या अनुषंगाने माफकपणे चालण्यासारखे आहे तोपर्यंत, विशिष्टच शब्द वापरण्यात यावा. ही पद्धत वापरल्यामुळे बायबल लेखकांनी कशाप्रकारे विशिष्टच शब्द वापरले होते हे वाचकाला कळून येते. तिसरे म्हणजे अर्थ अस्पष्ट होऊ न देता, होता होईल तितके शब्दशः भाषांतर करण्यात यावे. शब्दशः शैलीमुळे वाचकाला मूळ भाषेची छटा आणि संबंधित विचारसरणी यांचे जवळून दर्शन घडते. आणि चौथे म्हणजे, भाषांतर हे सामान्य माणसाला वाचायला आणि समजायला सोपे जाईल असे असावे.

इंग्रजी भाषेतील नवे जग भाषांतराच्या या अगदीच शब्दशः शैलीमुळे त्याचे इतर भाषांत भाषांतर करणे सोयीस्कर बनले आहे. असे करताना, कमी वेळात अधिक काम करण्याच्या आणि अधिक अचूकपणे भाषांतर करण्याच्या उद्देशाने, सोसायटीचे भाषांतर गट सध्या उच्चतंत्रीय संगणकीय साधनांचा उपयोग करतात. या व्यवस्थेच्या आधाराने प्रत्येक प्रमुख शब्दासाठी प्रादेशिक भाषेतील समानार्थी शब्दांच्या याद्या तयार करणे भाषांतरकारांना शक्य होते. तसेच, याकरवी ते बायबलमधील प्रत्येक हिब्रू आणि ग्रीक शब्दासाठी इंग्रजीत वापरलेल्या शब्दाचेही परीक्षण करू शकतात.

थेट हिब्रू आणि ग्रीक भाषांतून करण्यापेक्षा इंग्रजीतून भाषांतर करण्याचे काही विशेष फायदे आहेत. वेळेची बचत करण्यासोबतच, यामुळे सर्व भाषांत बऱ्‍याच प्रमाणावर समान अभिव्यक्‍ती साध्य करता येते. का? कारण एका पुरातन भाषेतून वेगवेगळ्या आधुनिक भाषांत भाषांतर करण्यापेक्षा, एका आधुनिक भाषेतून दुसऱ्‍या आधुनिक भाषेत भाषांतर करणे कितीतरी पटीने सोपे आहे. भाषांतरकार आधुनिक भाषांच्या मूळ भाषिकांशी विचारविनिमय तरी करू शकतात, पण हजारो वर्षांपूर्वी बोलल्या जाणाऱ्‍या भाषेच्या बाबतीत असे करता येणे शक्य नाही.

सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता

बायबलला जगातील सापेक्षतः सर्वाधिक सर्वत्र-सुलभ पुस्तक बनवण्यात हातभार लावणाऱ्‍या कर्तव्यनिष्ठ स्त्रीपुरुषांविषयी आणखी कितीतरी लिहिता येईल. गत शतकांत, संपूर्ण बायबलच्या किंवा त्याच्या काही भागांच्या कमीतकमी चार अब्ज प्रती, जगाच्या लोकसंख्येतील ९० टक्क्यांहून कितीतरी अधिक लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्‍या दोन हजाराहून अधिक भाषांत मुद्रित करण्यात आलेल्या आहेत!

आपल्या काळात देवाच्या राज्याची जगव्याप्त घोषणा होण्याविषयी बायबलने पूर्वभाकीत केले होते. हे साध्य करण्यासाठी, बायबलला आता जवळजवळ सबंध विश्‍वात उपलब्ध करून देण्यात निश्‍चितच यहोवा देवाने साहाय्य केले आहे. (मत्तय १३:४७, ४८; २४:१४) गतकाळात बायबलच्या साहसी भाषांतरकारांनी आणि प्रकाशकांनी देवाचे वचन, अर्थात या नैतिकरित्या अंधारलेल्या जगात आध्यात्मिक प्रकाशाचा एकमात्र स्रोत, आपल्याला मिळावा म्हणून अक्षरशः त्यांचे सर्वस्व पणास लावले. त्यांच्या उदाहरणातून तुम्हालाही हे वचन वाचण्याची, त्याच्यानुसार जगण्याची, आणि त्यांनी जो आत्मविश्‍वास दाखवला त्याच आत्मविश्‍वासाने इतरांनाही या वचनाविषयी सांगण्याची प्रेरणा मिळत राहो. तुमच्या हातात असलेल्या विश्‍वासार्ह बायबलचा, दररोज, पुरेपूर फायदा उचला!—यशया ४०:६-८.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज, एप्रिल १, १९९० अंकातील “कोडेक्स सायनायटिकसला बचावणे” हा लेख पाहा.

[८ पानांवरील चित्र]

जड्‌सनला बांधून फरफटत नेण्यात आले

[Picture Credit Line on page 8]

मूळ ग्रंथ Judson the Hero of Burma, by Jesse Page

[Picture Credit Line on page 9]

Mountain High Maps® Copyright © 1995 Digital Wisdom, Inc.

[१० पानांवरील चित्र]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

टिशेनडॉर्फ यांनी सिनाय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या याच मठातून एक बहुमूल्य हस्तलिखित मिळवले

[१२ पानांवरील तक्‍ता]

बायबल भाषांतरातील वृद्धी

एकूण भाषा

१ यहुद्यांनी हिब्रू शास्त्रवचनांचे ग्रीकमध्ये भाषांतर आरंभले सु. सा.यु.पू. २८०

१२ जेरमीचे लॅटिन व्हल्गेट पूर्ण सु. सा.यु. ४००

३५ गुटेनबर्गचे पहिले मुद्रित बायबल पूर्ण सु. १४५५

८१ १९०४ साली ब्रिटिश ॲण्ड फॉरेन बायबल सोसायटीची स्थापना

वर्षांप्रमाणे भाषांची अंदाजे संख्या

५२२

१९००

६००

७००

८००

९००

१,०४९

१९५०

१,१००

१,२००

१,३००

१,४७१

१९७०

२,१२३

१९९६

२,२००

२,३००

२,४००

[Credit Line]

उगम: Christianity Today, United Bible Society

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा