यहोवाच्या सेवेत दीर्घायुष्य दिल्याबद्दल कृतज्ञ
ओटीले मिडलन यांच्याद्वारे कथित
एकोणीसाव्या शतकातल्या उत्तरार्धातली गोष्ट, पश्चिम नॉर्वेमध्ये कोपरवीकच्या बंदरात प्रवासी जहाजे ओळीने उभी केली होती. त्या काळी, रस्त्यांवरून हातगाड्या आणि टांगे जायचे. प्रकाशासाठी लोक दिवे वापरायचे आणि पांढरा रंग दिलेली लाकडी घरे लाकूड आणि कोक यांनी उबदार ठेवली जायची. तेथे जून १८९८ मध्ये माझा जन्म झाला आणि पाच मुलांपैकी माझा दुसरा नंबर होता.
सन १९०५ मध्ये, बाबांची नोकरी सुटली म्हणून ते संयुक्त संस्थानांत गेले. तीन वर्षांनी ते परतले तर त्यांनी आम्हा मुलांसाठी बक्षिसं आणि सिल्कचे कपडे आणि आईसाठी आणखी पुष्कळ काही अशा सुटकेस भरून वस्तू आणल्या. पण त्यांच्याकडच्या सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे चार्ल्स टेझ रस्सल यांनी लिहिलेले शास्त्रवचनांतील अभ्यास (इंग्रजी) हे खंड होते.
या पुस्तकातून शिकत असलेल्या गोष्टींविषयी बाबा मित्रांना आणि नातेवाईकांना सांगू लागले. स्थानिक चॅपल सभांमध्ये, ते बायबलमधून अग्नीमय नरक नाही हे दाखवू लागले. (उपदेशक ९:५, १०) सन १९०९ मध्ये, म्हणजेच बाबा संयुक्त संस्थानांतून आल्यानंतरच्या वर्षी, बंधू रस्सल, नॉर्वेच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी बर्गन आणि आता ओस्लो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्टीयाना येथे भाषणे दिली. बाबा त्यांची भाषणे ऐकायला बर्गनला गेले.
बहुतेक सगळेच जण बाबांना खोट्या शिकणुकींचा पुरस्कार करत असल्याचा दोष द्यायचे. मला त्यांची दया वाटायची आणि शेजाऱ्यांना बायबलच्या पत्रिका देण्यामध्ये मी त्यांची मदत करायचे. सन १९१२ मध्ये, मी नरकाविषयी एक पत्रिका एका पाळकाच्या मुलीला दिली. तिनं मला आणि बाबांना भलंबुरं सुनावलं. एका पाळकाची मुलगी आणि इतकं गलिच्छ बोलते हे पाहून मला धक्काच बसला!
त्या काळचे यहोवाचे साक्षीदार अर्थात बायबल विद्यार्थी अधूनमधून कोपरवीकला येऊन आम्हाला भेट द्यायचे; टीओडोर सीमनसन हे कार्यक्षम वक्ते देखील यायचे. आमच्या घरात दिल्या जाणाऱ्या भाषणांसाठी मी लोकांना आमंत्रण द्यायचे. भाषण द्यायच्या आधी ते झिथर वाजवून गाणं गायचे आणि भाषणानंतर समारोपाचं गीत गायचे. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायचा.
ऑनॉ ॲन्डरसन या कॉलपोरटर किंवा पूर्ण-वेळेच्या सेविका देखील आमच्या घरी यायच्या. त्या संपूर्ण नॉर्वेमध्ये मुख्यतः आपल्या सायकलीवरून नगरोनगरी जायच्या आणि लोकांना बायबल साहित्य द्यायच्या. एके काळी त्या सॅल्व्हेशन आर्मीमधल्या ऑफिसर होत्या आणि त्यांना कोपरवीकमधील सॅल्व्हेशन आर्मीच्या काही ऑफिसर लोकांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या सभा भरवण्याच्या घरात तिला बायबल आधारित भाषण देण्याची अनुमती दिली आणि त्यावेळी तिच्या भाषणाचं आमंत्रण मी लोकांना दिलं.
आणखी एक कोलपोरटर आमच्याकडं कोपरवीकमध्ये यायचे आणि त्यांचं नाव होतं कार्ल गुनबर. हे विनम्य, शांत वृत्तीचे पण विनोदी गृहस्थ अधूनमधून ओस्लोच्या शाखा दफ्तरात भाषांतरणाचं काम करायचे. काही वर्षांनंतर आम्ही तिथं एकत्र मिळून काम केलं.
धार्मिक मतांनी प्रभावित
त्या वेळी लोकांना फक्त देव आणि बायबलवर पक्का विश्वासच नव्हता तर नरकाग्नी आणि त्रैक्यासारखे विश्वास त्यांच्यात अगदी रुजले होते. म्हणून हे सिद्धान्त बायबलच्या एकवाक्यतेत नाहीत असे बायबल विद्यार्थी शिकवू लागले तेव्हा खळबळ माजली. माझे बाबा पाखंडी आहेत असा जोरदार आरोप आमच्या शेजाऱ्यांनी केला तेव्हा त्याचा माझ्यावर प्रभाव पडला. एकदा तर मी बाबांना असंही म्हटलं: “तुम्ही जे शिकवता ते खरं नाही. हे सगळं पाखंडमत आहे!”
तेव्हा त्यांनी मला म्हटलं, “हे बघ ओटीले, बायबल काय म्हणतं ते.” मग त्यांनी मला शास्त्रवचनांमधून वाचून दाखवलं. परिणामस्वरूप, त्यांच्यावरचा आणि त्यांच्या शिकवणुकींवरचा माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यांनी मला शास्त्रवचनांवरील अभ्यास वाचायला सांगितले, म्हणून १९१४ च्या उन्हाळ्यात मी एका टेकडीवर जाऊन ते वाचत बसायचे; या टेकडीवरून सगळं नगर पाहता यायचं.
ऑगस्ट १९१४ मध्ये, स्थानिक वृत्तपत्र इमारतीच्या बाहेर पहिल्या महायुद्धाच्या उद्रेकाविषयी वाचत उभ्या असलेल्या लोकांची गर्दी जमली होती. बाबा तिथं काय होतंय हे पाहायला आले. “बरं झालं!” असं ते उद्गारले. युद्ध सुरू झाल्याने ते ज्याविषयी प्रचार करत होते त्या बायबल भविष्यवाणींची पूर्णता झाली हे ते ओळखून चुकले. (मत्तय २४:७) त्या वेळी अनेक बायबल विद्यार्थ्यांचा असा विश्वास होता की त्यांना लवकरच स्वर्गात घेतलं जाईल. हे घडून आलं नाही तेव्हा काहीजण निराश झाले.
बायबल सत्यासाठी माझी भूमिका
सन १९१५ मध्ये, वयाच्या १७ व्या वर्षी मी माध्यामिक शाळेतून पास झाल्यावर एका कार्यालयात नोकरी करू लागले. तेव्हा मी टेहळणी बुरूजचे नियमित वाचन करू लागले. पण कोपरवीकमध्ये नियमित सभा १९१८ नंतरच सुरू झाल्या. सुरवातीला, आम्ही केवळ पाच जण होतो. आम्ही शास्त्रवचनांतील अभ्यास यासारख्या वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांचं वाचन करून त्या साहित्यावर प्रश्न आणि उत्तरे विचारून चर्चा करायचो. इतरांसमोर आई, बायबल विद्यार्थ्यांची जरी खूप प्रशंसा करत असली, तरी ती स्वतः बायबल विद्यार्थी कधीच बनली नाही.
मी १९१८ पासून जिथं काम करू लागले तिथं माझी ओळख ॲन्टोन सॉल्टनसशी झाली आणि त्याला मी बायबल विद्यार्थी बनायला मदत करू शकले. या दरम्यान मी एक नियमित प्रचारक बनले होते आणि १९२१ मध्ये बर्गनमधल्या एका संमेलनात माझा बाप्तिस्मा झाला.
मे १९२५ मध्ये स्वीडनच्या ओरिब्रो येथे सबंध स्कॅन्डिनेव्हियासाठी संमेलन भरवण्यात आले होते. तिथं ५०० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते; जोसेफ एफ. रदरफोर्ड हे वॉच टावर संस्थेचे अध्यक्षही आले होते. आम्ही सुमारे ३० जणांनी ओस्लोहून ट्रेनने प्रवास केला—त्यात एक संपूर्ण डब्बा आमच्यासाठी आरक्षित केला होता.
या संमेलनात अशी घोषणा झाली, की सबंध स्कॅन्डिनेव्हिया आणि बाल्टिक देशांमधल्या प्रचार कार्याची पाहणी करण्यासाठी डेन्मार्क येथील कोपनहेगनमध्ये एक उत्तर युरोपीय दफ्तर स्थापले जाईल. स्कॉटलंडच्या विल्यिम डे यांना प्रचार कार्याची पाहणी करायला नेमण्यात आलं. ते लोकांचे आवडते बनले आणि त्यांना बीग स्कॉट्समन (मोठा स्कॉट्समन) असं टोपण नाव पडलं. सुरवातीला, बंधू डे यांना स्कॅन्डिनेव्हियन भाषेबद्दल काडीची माहिती नव्हती म्हणून ते सभांमध्ये आणि संमेलनांमध्ये मागच्या बाजूला बसून लहान मुलांना सांभाळायचे आणि यामुळे त्यांच्या पालकांना व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्या माहितीकडे पूर्ण लक्ष देता येत होतं.
मार्च १, १९२५ च्या टेहळणी बुरूजमध्ये प्रकटीकरण १२ अध्यायावर चर्चा करून समजावले होते की हा अध्याय देव राज्याच्या जन्माविषयी सांगतो आणि हा जन्म १९१४ मध्ये स्वर्गात झाला. मला हे समजायला जरा कठीण गेलं म्हणून मी तो लेख अनेकदा वाचून काढला. शेवटी, मला त्याचा अर्थ कळला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
बायबल विषयांच्या आपल्या समजुतीत बदल करण्यात आल्यावर काहींजण अडखळून देवाच्या लोकांपासून दुरावलेत. पण असा एखादा बदल समजायला कठीण वाटतो तेव्हा मी त्यातली कारणमीमांसा समजून घेण्यासाठी वारंवार तो लेख वाचत असते. पण तरीही मला नवीन स्पष्टीकरण समजले नाही तर मग मी स्पष्टीकरण मिळेपर्यंत थांबून राहते. अनेकदा मला अशा धीर धरण्यामुळे प्रतिफळ मिळालंय.
बेथेल येथे सेवा
काही वर्षांपर्यंत मी बुककीपर, सचिव आणि काउंटी ऑडिटरचं काम केलं होतं. सन १९२८ मध्ये, संस्थेच्या वित्त अहवालांची पाहणी करणारे बांधव आजारी पडले आणि त्यांना बेथेल सोडावं लागलं. मला तसल्या कामाचा अनुभव असल्यामुळं, मी ते काम करीन का असं मला विचारण्यात आलं. जून १९२८ मध्ये मी बेथेल सेवा सुरू केली. कधीतरी एकदा, बंधू डे आमच्याकडे यायचे आणि जमाखर्चाची हिशेबतपासणी करायचे. आमच्या बेथेल कुटुंबाने, ओस्लोमधील जाहीर प्रचार कार्यातही पुढाकार घेतला; त्यावेळी तिथं फक्त एक मंडळी होती.
आम्हापैकी काहींनी बेथेलच्या शिपींगमधल्या बांधवाला, बंधू सॉक्शमर यांना द गोल्डन एज (आताचे सावध राहा!) पॅक करायला आणि पाठवायलाही मदत केली. बंधू सीमनसन आणि गुनबर यांनी त्यावेळी हातभार लावला. त्यावेळी खूप मजा यायची, बहुधा काम करता करताच आम्ही गाणी गायचो.
राज्य आशेविषयी विश्वस्त
सन १९३५ मध्ये आम्हाला कळालं की “मोठा लोकसमुदाय” दुय्यम स्वर्गीय वर्ग नव्हता. तर उलट त्या वर्गातले लोक मोठं संकट पार करतात आणि पृथ्वीवरील परादीसमध्ये सर्वकाळ जगण्याची संधी त्यांना मिळते. (प्रकटीकरण ७:९-१४) ही नवीन समजूत मिळाल्यावर, स्मारक विधीची बोधचिन्हं जे लोक घेत होते त्यातील काहींना कळालं की त्यांची पार्थिव आशा होती आणि म्हणून त्यांनी ती बोधचिन्हं घेण्याचं बंद केलं.
मला माझ्या स्वर्गीय आशेबद्दल कधीच शंका वाटली नाही, तरी माझ्या मनात सहसा असा विचार डोकवायचा, ‘देवाला माझी काय गरज आहे?’ इतक्या मोठ्या विशेषाधिकारासाठी मी पात्र नाही असं मला वाटायचं. मी अशी ठेंगणी आणि बुजऱ्या स्वभावाची असल्यामुळं, स्वर्गामध्ये ख्रिस्तासोबत राजा म्हणून मी राज्य करणार हा विचार मला विचित्रच वाटायचा. (२ तीमथ्य २:११, १२; प्रकटीकरण ५:१०) पण तेव्हा मी प्रेषित पौलाच्या शब्दांचा विचार करायचे की, “समर्थ . . . असे पुष्कळ जण नाहीत” तर “जे बलवान् ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले.”—१ करिंथकर १:२६, २७.
दुसऱ्या महायुद्धादरम्यानचे कार्य
एप्रिल ९, १९४० मध्ये, नॉर्वेला जर्मन सैन्याने काबीज केले आणि त्यानंतर काही काळातच सैन्य तिथं आलं. युद्धामुळे अनेकजण राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देऊ लागले. ऑक्टोबर १९४० ते जून १९४१ पर्यंत, आम्ही २,७२,००० पुस्तकांचे आणि पुस्तिकांचे वाटप केले. म्हणजेच, त्यावेळच्या ४७० पेक्षा अधिक नॉर्वेतल्या साक्षीदारांनी प्रत्येकी, त्या नऊ महिन्यांदरम्यान सरासरीने ५७० पेक्षाही अधिक पुस्तकांचे आणि पुस्तिकांचे वाटप केले!
जुलै ८, १९४१ रोजी गेस्टॅपोंनी सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांची भेट घेऊन त्यांना बजावलं की त्यांनी प्रचार कार्य थांबवलं नाही तर त्यांना छळ छावण्यांमध्ये पाठवलं जाईल. पाच जर्मन पोलिस अधिकारी बेथेलमध्ये आले आणि त्यांनी वॉच टावर संस्थेची पुष्कळशी मालमत्ता जप्त केली. बेथेल कुटुंबाला नेलं व त्यांची चौकशी घेतली पण आम्हापैकी कोणालाच तुरुंगात पाठवलं नाही. शेवटी, जुलै २१, १९४१ रोजी, संस्थेची इन्कोग्नीटोगॉटन २८ बी ही इमारत जप्त करून आमच्या प्रचार कामावर बंदी आणण्यात आली. मी पुन्हा कोपरवीकला गेले आणि माझं पोट भरण्यासाठी नोकरी करू लागले.
त्यावेळी बाबा पायनियर होते. एकदा नात्सी आले आणि त्यांनी सगळ्या घराची तपासणी केली. त्यांनी बाबांचं सगळं साहित्य नेलं, त्यांचं बायबल आणि बायबल कॉन्कॉरडन्सेस सुद्धा नेले. या काळात आम्हाला अगदीच तुरळक आध्यात्मिक अन्न मिळायचं. आध्यात्मिकरित्या दृढ राहण्यासाठी आम्ही पुनः-पुन्हा सरकार (इंग्रजी) सारखी जुनी पुस्तकं वाचायचो आणि प्रचार तर करतच होतो.
पण दुःखाची गोष्ट अशी होती की, पुष्कळ ठिकाणी बांधवांमध्ये दुमत होतं. काहींना वाटलं की उघडपणे घरोघरी जाऊन प्रचार करावा तर इतरांचं मत होतं की गुप्ततेत कार्य करून लोकांशी संपर्क साधण्याचे इतर मार्ग काढावेत. तर अशाप्रकारे, आधी मिळूनमिसळून कार्य केलेले आणि आम्हाला इतके पसंत असणारे प्रमुख बांधवच एकमेकांशी बोलेनासे झाले. माझ्या साक्षीदाराच्या जीवनात इतर कोणत्याही परिस्थितीपेक्षा त्यांच्यातल्या त्या दुमताचं मला सर्वात जास्त दुःख वाटलं.
युद्धानंतर पुन्हा सुरू झालेले कार्य
युद्धानंतर, १९४५ च्या उन्हाळ्यात बंधू डे यांनी नॉर्वेला भेट दिली आणि ओस्लो, शेअन आणि बर्गनमध्ये त्यांनी सभा भरवल्या. त्यांनी बांधवांना, झालं गेलं विसरून जावं अशी विनंती केली आणि तसं करायला जे तयार आहेत त्यांनी उभं राहावं असं म्हटलं. सगळेच उठून उभे राहिले! मग, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांनी भेट दिल्यावर डिसेंबर १९४५ मध्ये तो मतभेद एकदाचा मिटला.
दरम्यान, जुलै १७, १९४५ रोजी मला शाखा सेवक, बंधू इनोक एमन यांची एक तार मिळाली, त्यात लिहिलं होतं: ‘तू बेथेलला पुन्हा कधी येशील?’ काहींनी म्हटलं की, मी घरी राहून बाबांची काळजी घ्यावी; त्यावेळेस त्यांनी ७० री ओलांडली होती. पण बाबांनी मला बेथेलमध्ये जायला उत्तेजन दिलं आणि मी गेले. सन १९४६ मध्ये, संयुक्त संस्थानांतील एक बंधू, मॉर्वन एफ. ॲन्डरसन आमचे शाखा पर्यवेक्षक बनले आणि प्रचाराचे कार्य पुन्हा सुसंघटित केले गेले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी कोपरवीकला माझ्या परिवाराला भेट द्यायला यायचे. माझे दोन भाऊ आणि दोन बहिणी साक्षीदार बनले नाहीत, पण माझ्याशी आणि बाबांशी ते नेहमीच चांगले वागायचे. माझा एक भाऊ हार्बरमास्टर झाला आणि मग पायलेटमास्टर बनला आणि धाकटा भाऊ शिक्षक होता. माझी आर्थिक स्थिती त्यांच्यापेक्षा बेताची होती तरी बाबा त्यांना म्हणायचे: “ओटीले तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे.” आणि हे खरंच होतं! त्यांनी जे काही साध्य केलं होतं त्याची तुलना मला मिळत असलेल्या आध्यात्मिक संपन्नतेशी केली जाऊ शकत नव्हती! बाबा, १९५१ साली वयाच्या ७८ व्या वर्षी मरण पावले. आई तर १९२८ मध्येच वारली होती.
सन १९५३ मध्ये न्यूयॉर्क शहरातल्या यहोवाच्या लोकांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे हा माझ्या जीवनातला सुवर्ण क्षण होता. त्या वर्षी, जागतिक क्षेत्राने ५,००,००० प्रचारकांचा आकडा ओलांडला, आणि १,६५,००० पेक्षा अधिक लोक अधिवेशनाला उपस्थित होते! १९५३ सालच्या अधिवेशनाआधी, पृथ्वीवरील यहोवाच्या संघटनेच्या मुख्यालयात, ब्रुकलिन बेथेल येथे मी एक आठवडा सेवा केली.
मला जमेल ते करणे
अलीकडील वर्षांमध्ये मोतीबिंदुंमुळं माझी दृष्टी कमी झाली आहे. मला मोठ्या नंबरचा चष्मा आणि सूक्ष्मदर्शक भिंगानं अजूनही मोठ्या छपाईतलं अक्षर वाचता येतं. आणि ख्रिस्ती बहिणी माझ्याकडे येऊन मला आठवड्यातून दोनदा काहीतरी वाचून ऐकवतात; त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते.
माझं प्रचार कार्य सुद्धा आता मर्यादित आहे. उन्हाळ्यात सहसा ख्रिस्ती बहिणी मला माझ्या व्हीलचेअरमधून अशा ठिकाणी नेतात जिथं मला थोडाफार प्रचार करता येतो. मी नियमितपणे कोपरवीकमधल्या शाळांनाही नियतकालिकं आणि माहितीपत्रकं पोस्टाने पाठवत असते; जेथे मी जवळजवळ १०० वर्षांआधी शिकत होते त्या माझ्या प्राथमिक शाळेलाही पाठवते. मी अजूनही नियमित प्रचारक आहे याचा मला आनंद होतो.
सुदैवाची एक गोष्ट म्हणजे, बेथेलमध्ये डायनींग रूम आणि राज्य सभागृह सुद्धा मी ज्या मजल्यावर राहते त्याच मजल्यावर आहेत; १९८३ पासून बेथेल ओस्लोबाहेर इत्रे इनेबॉक येथे वसले आहे. म्हणून मी वॉकरच्या मदतीनं सकाळची उपासना, भोजन आणि आमच्या सभांना जाऊ शकते. आणि मी अजूनपर्यंत तरी अधिवेशनं आणि संमेलनांना जाऊ शकते याचा मला आनंद वाटतो. अनेक वर्षांपासून ओळखत असलेल्या स्नेह्यांना आणि नवीन बंधू-बहिणी तसंच गोड मुलांनाही भेटायला मला फार बरं वाटते.
शेवटपर्यंत विश्वासू असणे
इथं बेथेलमध्ये कार्यशील, आनंदी आणि आध्यात्मिक लोकांसोबत असणं म्हणजे एक आशीर्वादच आहे. मी माझी बेथेल सेवा सुरू केली, तेव्हा इथल्या सबंध कुटुंबातल्या लोकांना स्वर्गीय आशा होती. (फिलिप्पैकर ३:१४) पण, आता मात्र मला सोडून बाकीचे सर्वजण पृथ्वीवर सदा सर्वकाळ जिवंत राहण्याची वाट पाहत आहेत.
यहोवानं आधीच कार्यवाही केली असती अशी आम्ही अपेक्षा केली होती हे खरं आहे. पण तरीही, आता मोठ्या लोकसमुदायातले लोक दिवसेंदिवस वाढत जात आहेत हे पाहून मला आनंद होतो. किती वाढ पाहिलीय मी! मी सेवाकार्य सुरू केलं तेव्हा जगभरात सुमारे ५,००० प्रचारक होते. पण आता ५४,००,००० पेक्षाही अधिक आहेत! मी खरंच “लहान त्याचे सहस्र . . . क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” होत असलेलं पाहिलंय. (यशया ६०:२२) आपण यहोवाची वाट पाहत राहिलं पाहिजे, जसं संदेष्टा हबक्कूकनं लिहिलं: “त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच.”—हबक्कूक २:३.