वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १०/१ पृ. १५-२०
  • एकनिष्ठतेने देवाच्या प्रेरित वचनाची बाजू घेणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकनिष्ठतेने देवाच्या प्रेरित वचनाची बाजू घेणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या नावाचे काय झाले?
  • व्यक्‍तिगत विश्‍वासांनुसार भाषांतर होते तेव्हा
  • एकनिष्ठतेने देवाच्या वचनाची बाजू घेणे
  • देवाच्या वचनाच्या रसिकांसाठी विक्रम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे आवडते नवे जग भाषांतर
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • संवाद साधणारा देव—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १०/१ पृ. १५-२०

एकनिष्ठतेने देवाच्या प्रेरित वचनाची बाजू घेणे

“आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट [भेसळ] करीत नाही.”—२ करिंथकर ४:२.

१. (अ) मत्तय २४:१४ आणि २८:१९, २० येथे दिलेले कार्य पूर्ण करायला कशाची गरज आहे? (ब) शेवटले दिवस सुरू झाले तेव्हा बायबल किती भाषांमध्ये उपलब्ध होते?

येशू ख्रिस्ताची राजेशाही उपस्थिती आणि जुन्या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या वेळेविषयीच्या मोठ्या भविष्यवाणीत त्याने भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” त्याने आपल्या शिष्यांना अशीही सूचना दिली: “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २४:१४; २८:१९, २०) त्या भविष्यवाणींच्या पूर्णतेत, बायबलचे भाषांतर आणि छपाई, लोकांना त्याचा अर्थ समजावणे आणि त्याचा अवलंब त्यांच्या जीवनात करायला त्यांची मदत करणे असे पुष्कळ काम गोवलेले आहे. अशा कार्यात भाग घेणे म्हणजे केवढा मोठा विशेषाधिकार! सन १९१४ पर्यंत बायबलचे किंवा त्याच्या काही भागाचे ५७० भाषांमध्ये प्रकाशन झालेही होते. पण, त्यानंतर आणखी शेकडो भाषा आणि कित्येक पोटभाषा सामील झाल्या आणि कित्येक भाषांमध्ये एकापेक्षा अधिक भाषांतरे उपलब्ध करून दिली आहेत.a

२. बायबल भाषांतरकार आणि प्रकाशकांच्या कार्यावर कोणत्या विविध हेतूंचा प्रभाव पडला आहे?

२ एका भाषेतले साहित्य घेऊन ज्यांना दुसरी भाषा वाचता येते किंवा समजते अशांसाठी त्यांच्या भाषेत ते समजेल असे भाषांतर करणे काही सोपे काम नव्हे. काही बायबल भाषांतरकारांनी याची जाणीव राखून हे काम केले की ते देवाच्या वचनाचे भाषांतर करत होते. इतरजणांनी केवळ या प्रकल्पातले विद्वत्तेचे आव्हान पाहून तो हाती घेतला. त्यांना बायबलमधील मजकूर केवळ मौल्यवान परंपरा वाटली असावी. काहींसाठी, धर्म हा धंदा असतो आणि भाषांतरकार किंवा प्रकाशक म्हणून त्यांच्या नावाचे पुस्तक छापवणे हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक भाग असतो. स्पष्टतः, त्यांच्या हेतूंचा त्यांच्या कामावर प्रभाव पडतो.

३. नवे जग भाषांतर समितीने आपले काम कसे लेखले?

३ नवे जग बायबल भाषांतर समितीने केलेले हे विधान लक्षणीय आहे: “पवित्र शास्त्रवचनांचे भाषांतर करणे म्हणजे दुसऱ्‍या शब्दांत दुसऱ्‍या एखाद्या भाषेत यहोवा देवाचे विचार आणि मते मांडणे होय. . . . हा अगदी गंभीर विचार वाटतो. पवित्र शास्त्रवचनांच्या ईश्‍वरी लेखकाचे भय बाळगणाऱ्‍या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या या कार्याच्या भाषांतरकारांना, होता होईल तितक्या अचूकपणे त्याचे विचार आणि उद्‌गार कळवण्यासाठी त्याच्याप्रती एक खास जबाबदारी असल्याचे वाटते. त्याचप्रमाणे आपल्या सार्वकालिक उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ देवाच्या प्रेरित वचनाच्या भाषांतरणावर अवलंबून राहणाऱ्‍या शोधक वाचकांप्रतीही त्यांना जबाबदारी वाटते. अशा या गंभीर जबाबदारीची जाणीव राखून अनेक वर्षांनंतर या समर्पित लोकांच्या समितीने पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) तयार केले.” बायबलचे भाषांतर स्पष्ट आणि सुलभ असावे त्याचप्रमाणे मूळ इब्री आणि ग्रीकनुसार होता होईल तितके अचूक असावे जेणेकरून अचूक ज्ञानात अधिकाधिक भर पडण्यास ते आधारभूत ठरेल हे या समितीचे उद्दिष्ट होते.

देवाच्या नावाचे काय झाले?

४. बायबलमध्ये देवाच्या नावाचे काय महत्त्व आहे?

४ बायबलचा एक प्रमुख उद्देश म्हणजे लोकांना खऱ्‍या देवाची ओळख करून देण्यास मदत करणे होय. (निर्गम २०:२-७; ३४:१-७; यशया ५२:६) येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना त्याच्या पित्याचे नाव “पवित्र मानिले जावो,” अर्थात पूज्य मानले जावे किंवा गौरविले जावे अशी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९) देवाने आपले वैयक्‍तिक नाव बायबलमध्ये ७,००० वेळा सामील करवून घेतले. लोकांनी ते नाव आणि त्या नामधारकाचे गुण जाणून घ्यावेत अशी त्याची इच्छा आहे.—मलाखी १:११.

५. निरनिराळ्या भाषांतरकारांनी ईश्‍वरी नाव कसे सादर केले आहे?

५ अनेक बायबल भाषांतरकारांनी ईश्‍वरी नामाला मनस्वी आदर दाखवून त्यांच्या भाषांतरात त्याचा सातत्याने उपयोग केला आहे. काही भाषांतरकारांना याव्हे हा शब्द पसंत पडतो. तर इतरांनी, त्यांच्या भाषेनुसार जुळवून घेतलेल्या पण तरीही इब्री शास्त्रवचनातील शब्दाशी पुरेसे साम्य असलेल्या, कदाचित दीर्घकाळापर्यंत उपयोग केल्यामुळे सुपरिचित असलेल्या रूपाचा उपयोग केला आहे. पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर आपल्या मुख्य मजकुरात यहोवाचे नाव ७,२१० वेळा वापरते.

६. (अ) अलीकडील वर्षांमध्ये, भाषांतरकारांनी ईश्‍वरी नावाच्या संदर्भांसंबंधी काय केले? (ब) ही प्रथा किती व्यापक आहे?

६ अलीकडील वर्षांमध्ये, बायबल भाषांतरकार बआल आणि मोलेखसारख्या मूर्तिपूजक देवतांची नावे राहू देत असले, तरी खऱ्‍या देवाचे वैयक्‍तिक नाव त्याच्या प्रेरित वचनाच्या भाषांतरणांमधून काढण्याचे प्रमाण वाढतच आहे. (निर्गम ३:१५; यिर्मया ३२:३५) मत्तय ६:९ आणि योहान १७:६, २६ सारख्या उताऱ्‍यांमध्ये, एक सुप्रसिद्ध अल्बेनियन आवृत्ती “तुझे नाव” (अर्थात, देवाचे नाव) या ग्रीक अभिव्यक्‍तीचे भाषांतर केवळ “तू” असे करते जणू त्या वचनांमध्ये नावाचा काही उल्लेखच नाही. स्तोत्र ८३:१८ येथे द न्यू इंग्लिश बायबल आणि टुडेज इंग्लिश व्हर्शन, देवाचे व्यक्‍तिगत नाव त्याचप्रमाणे देवाला एक नाव आहे अशा कोणत्याही संदर्भाचाही उल्लेख करत नाही. इब्री शास्त्रवचनांच्या जुन्या भाषांतरांच्या बहुतांश भाषांमध्ये हे ईश्‍वरी नाव होते तरी नवीन भाषांतरणे बहुधा ते नाव काढून टाकतात किंवा फक्‍त समासातल्या टिपणीत ते राहू देतात. हेच इंग्रजी, त्याचप्रमाणे युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत आणि पॅसिफिक बेटांवरील अनेक भाषांमध्ये घडले आहे.

७. (अ) काही आफ्रिकन बायबलचे भाषांतरकार ईश्‍वरी नावाविषयी काय करत आहेत? (ब) त्याविषयी तुम्हाला काय वाटते?

७ काही आफ्रिकन भाषेचे बायबल भाषांतरकार तर आणखीनच वरचढ ठरलेत. ईश्‍वरी नावाच्या जागी देव किंवा प्रभू अशा शास्त्रवचनीय पदव्या देण्याऐवजी ते स्थानिक धार्मिक विश्‍वासांमधून घेतलेली नावे घालत आहेत. नवा करार आणि झुलूमध्ये स्तोत्र (१९८६ आवृत्ती, इंग्रजी) यात, देव (uNkulunkulu) या पदवीच्या जागी अधूनमधून एका व्यक्‍तिगत नावाचा (uMvelinqangi) उपयोग केला गेला की जे झुलूंच्या मते ‘मानवी पूर्वजांद्वारे उपासना केल्या जाणाऱ्‍या श्रेष्ठ पूर्वजाला’ सूचित करते. बायबल भाषांतरकार (इंग्रजी) या ऑक्टोबर १९९२ च्या नियतकालिकातल्या लेखानुसार, बुकू लोएरॉ नाव दिले जाणारे चिचेवा बायबल तयार करत असताना भाषांतरकार यहोवाच्या व्यक्‍तिगत नावाच्या जागी चाऊटॉ हे नाव वापरत होते. तो लेख स्पष्टकरण देतो की, चाऊटॉ म्हणजे “त्यांना आधीपासून सुपरिचित असलेला आणि त्यांनी उपासना केलेला देव.” तथापि, त्यांच्या मते यांतील अनेक लोक मृतांचे आत्मे असलेल्यांचीही उपासना करतात. जर लोक “सर्वश्रेष्ठ व्यक्‍तीला” प्रार्थना करत असले आणि त्यांच्या उपासनेत बाकीचे काहीही गोवलेले असले, तरीही ‘सर्वश्रेष्ठ व्यक्‍तीसाठी’ वापरत असलेले कोणतेही नाव यहोवाच्या व्यक्‍तिगत नावाच्या बदल्यात चालू शकते हे खरे आहे का? मुळीच नाही! (यशया ४२:८; १ करिंथकर १०:२०) आपले पारंपरिक विश्‍वास बरोबर आहेत असे भासवणारे एखादे नाव देवाच्या व्यक्‍तिगत नावाच्या बदल्यात घातल्यामुळे लोकांना खऱ्‍या देवाच्या जवळ यायला मदत मिळणार नाही.

८. आपले नाव जगजाहीर करण्याचा देवाचा उद्देश निष्फळ का ठरलेला नाही?

८ परंतु या सर्व गोष्टींमुळे आपले नाव प्रसारित करण्याच्या यहोवाच्या उद्देशात तिळमात्रही फरक झालेला नाही किंवा तो निष्फळही ठरलेला नाही. युरोप, आफ्रिका, अमेरिकन देश, पौर्वात्य देश, आणि समुद्रातील बेटांवरील भाषांमध्ये अद्यापही असे काही बायबल उपलब्ध आहेत ज्यांमध्ये ईश्‍वरी नाव आहे. याशिवाय, २३३ देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये ५४,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार आहेत जे एकत्र मिळून वर्षाला एक अब्ज पेक्षा अधिक तास इतरांना खऱ्‍या देवाच्या नावाविषयी आणि उद्देशाविषयी सांगण्यात घालवतात. ते, इंग्रजी, चीनी, रशियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच या भाषांना धरून पृथ्वीवरील ३,६०,००,००,००० लोकांच्या भाषांमध्ये—ईश्‍वरी नावाचा उल्लेख असलेले—बायबल छापतात आणि त्यांचे वितरण करतात. शिवाय, पृथ्वीवरील अधिकांश लोकांना येत असलेल्या भाषांमध्ये ते बायबल अभ्यासासाठी उपयुक्‍त साधने सुद्धा छापतात. लवकरच, स्वतः देव अशा तऱ्‍हेचे पाऊल उचलेल की ज्याद्वारे राष्ट्रांना “समजेल की मी [यहोवा] आहे” हे त्याचे उद्‌गार निर्णायकपणे पूर्ण होतील.—यहेज्केल ३८:२३.

व्यक्‍तिगत विश्‍वासांनुसार भाषांतर होते तेव्हा

९. देवाचे वचन हाताळणाऱ्‍यांवर गंभीर जबाबदारी असल्याचे बायबल कसे दाखवून देते?

९ देवाच्या वचनाचे भाषांतर करणाऱ्‍यांवर आणि त्याची शिकवण देणाऱ्‍यांवर एक गंभीर जबाबदारी आहे. प्रेषित पौलाने आपल्या तसेच आपल्या सहकार्यांच्या सेवेविषयी म्हटले: “आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट [भेसळ] करीत नाही; तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्‌सद्विवेकाला आपणास पटवितो.” (२ करिंथकर ४:२) भेसळ करणे म्हणजे असंबद्ध किंवा हलक्या प्रतीचे काही मिसळून भ्रष्ट करणे. प्रेषित पौल यिर्मयाच्या दिवसातील इस्राएलच्या अविश्‍वासू मेंढपाळांसारखा नव्हता ज्यांनी देवाने जे सांगितले त्याऐवजी स्वतःच्या कल्पनांचा प्रसार केला ज्यामुळे देवाने त्यांची खरडपट्टी काढली. (यिर्मया २३:१६, २२) पण आधुनिक समयात काय घडले आहे?

१०. (अ) आधुनिक दिवसांमध्ये, काही भाषांतरकारांवर देवाप्रती निष्ठावान असण्याव्यतिरिक्‍त इतर हेतूंचा कसा प्रभाव झाला आहे? (ब) ते अनुचितपणे कोणती भूमिका घेऊ लागले होते?

१० दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान, जर्मनीत वेदान्ती आणि पाळकांच्या एका समितीने नात्सी सरकारासोबत मिळून ‘नव्या कराराची’ पुनरावृत्ती काढली ज्यात ज्यू लोकांचे सर्व अनुकूल संदर्भ आणि येशू ख्रिस्ताच्या यहुदी वंशास सुचवणारे सर्व उल्लेख काढून टाकले. आणखी अलीकडची गोष्ट घ्यायची झाल्यास, न्यू टेस्टामेंट ॲण्ड साम्स: ॲन इन्क्लुसिव्ह व्हर्शन तयार केलेल्या भाषांतरकारांच्या मनाचा कल दुसऱ्‍या ठिकाणी कललेला होता; ख्रिस्ताच्या मृत्यूसंबंधी ज्यू लोक जबाबदार होते असे सुचवणाऱ्‍या सर्व गोष्टी त्यांनी बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. त्या भाषांतरकारांना असेही वाटले की, जर देवाचा उल्लेख पिता म्हणून नव्हे तर पिता-माता असा केला आणि येशूला देवाचा पुत्र नव्हे तर मूल असे संबोधले तर स्त्रीवादी वाचक अधिक खूश होतील. (मत्तय ११:२७) असे करताना त्यांनी, पत्नींनी पतींच्या अधीन राहण्याचे तत्त्व आणि मुलांनी पालकांच्या आज्ञेत असण्याचे तत्त्व गाळून टाकले. (कलस्सैकर ३:१८, २०) त्या भाषांतरणांच्या उत्पादकांनी प्रेषित पौलासारखा ‘देवाच्या वचनाविषयी भेसळ न करण्याविषयी’ दृढ निर्धार केला नाही हे स्पष्ट होते. ते भाषांतरकाराची भूमिका विसरत होते, लेखकाची जागा घेत होते आणि स्वतःच्या कल्पनांचा पुरस्कार करण्यासाठी बायबलच्या नावलौकिकाचा विपर्यास करणारी पुस्तके बनवत होते.

११. ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणुकी, जीव आणि मृत्यूविषयी बायबल जे सांगते त्याच्या परस्परविरोधात कशा आहेत?

११ ख्रिस्ती धर्मजगताचे चर्चेस सहसा असे शिकवतात की जीव किंवा प्राण असे भाषांतरित केलेले मूळ भाषेतले शब्द आत्मा असे कशाला तरी सूचित करतात, मृत्यूनंतर तो शरीर सोडून जातो आणि तो अमर आहे. याच्या अगदी विषमतेत, अधिकांश भाषांमधील जुनी बायबल भाषांतरणे स्पष्टपणे सांगतात की, मानव हे जीव आहेत, प्राणी हे सुद्धा जीव आहेत आणि जीव मरतो. (उत्पत्ति १२:५; ३६:६; गणना ३१:२८; याकोब ५:२०) यामुळे पाळकवर्ग गोंधळून गेला आहे.

१२. आताच्या काही आवृत्ती मूलभूत बायबल सत्ये कशी अस्पष्ट करतात?

१२ आताच्या काही नवीन आवृत्तींमध्ये ही सत्ये अस्पष्ट रूपात दिली आहेत. ते कसे? विशिष्ट वचनांमध्ये ते नेफेश (जीव) या इब्री नामाचे थेट भाषांतर टाळतात. उत्पत्ति २:७ येथे, पहिला मानव (“जिवंत जीव झाला” असे म्हणण्याऐवजी) “जगू लागला” असेच म्हणतील. किंवा पशु जीवनाला सूचित करताना “जीव” म्हणण्याऐवजी ते “प्राणी” म्हणतील. (उत्पत्ति १:२१) यहेज्केल १८:४, २० सारख्या वचनांमध्ये ते (“जीव” म्हणण्याऐवजी) “व्यक्‍ती” किंवा “इसम” मरत आहे असे म्हणतील. असले भाषांतर कदाचित भाषांतरकाराला योग्य वाटेल. पण, सत्याचा शोध घेणाऱ्‍या ज्या प्रामाणिक व्यक्‍तीची विचारशैली ख्रिस्ती धर्मजगताच्या अशास्त्रीय शिकवणुकींनुसार साचेबद्ध झालेली आहे अशांना ते किती मदत देतात?b

१३. काही बायबल आवृत्तींनी पृथ्वीसंबंधी देवाचा उद्देश कसा लपवून ठेवला आहे?

१३ सर्व चांगले लोक स्वर्गात जातात या विश्‍वासाला पाठपुरावा देण्याच्या प्रयत्नात, भाषांतरकार—किंवा आपल्या साहित्यात सुधारणा करणारे वेदान्ती—पृथ्वीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशाविषयी बायबल जे सांगते ते देखील लपवण्याचा प्रयत्न करतील. स्तोत्र ३७:११ येथे अनेक आवृत्तींमध्ये, नम्र लोक “जमिनीचे” वतन पावतील असे दिले आहे. “जमीन” हा शब्द इब्री वचनात वापरलेल्या (इरेट्‌स) या शब्दाचे संभवनीय भाषांतर आहे. परंतु, टुडेज इंग्लिश व्हर्शनमध्ये (ज्यावर अनेक भाषांची भाषांतरणे आधारित आहेत) तर अधिकच बदल केले आहेत. या आवृत्तीत मत्तयाच्या शुभवर्तमानात १७ वेळा गे या ग्रीक शब्दाचे भाषांतर “पृथ्वी” असे केले असले, तरी मत्तय ५:५ येथे ते “पृथ्वी” या शब्दाऐवजी “देवाने अभिवचन दिलेले” असे म्हणते. चर्चचे सदस्य साहजिकच याला स्वर्ग समजतात. पण सौम्य, लीन अथवा नम्र लोक “पृथ्वीचे वतन” पावतील असे डोंगरावरील प्रवचनात येशू ख्रिस्त म्हणाला हे त्यांना खरेपणाने सांगण्यात येत नाही.

१४. काही विशिष्ट बायबल आवृत्तींमधून कोणता स्वार्थी हेतू दिसून येतो?

१४ शास्त्रवचनांची काही भाषांतरणे, प्रचारकांना चांगला पगार मिळावा अशा तऱ्‍हेने लिहिण्यात आली आहेत हे स्पष्ट आहे. “कामकऱ्‍याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे,” असे बायबल म्हणते हे खरे आहे. (१ तीमथ्य ५:१८) पण १ तीमथ्य ५:१७ येथे, चांगल्याप्रकारे अधिकार चालवणारे वडील “दुप्पट सन्मानास योग्य गणले” जावेत असे जे म्हटले आहे तेथे तो सन्मान केवळ पैशासंबंधी आहे असे म्हणणे काहींना इष्ट वाटते. (पडताळा १ पेत्र ५:२.) म्हणून, द न्यू इंग्लिश बायबल म्हणते की, हे वडील “दुप्पट भत्ता मिळण्यास योग्य गणले” जावेत, आणि कोंटेम्पोररी इंग्लिश व्हर्शन असे म्हणते की ते “दुप्पट पगार मिळण्यास योग्य” आहेत.

एकनिष्ठतेने देवाच्या वचनाची बाजू घेणे

१५. कोणती बायबल भाषांतरणे वापरावीत हे आपण कसे ठरवू शकतो?

१५ वैयक्‍तिक बायबल वाचन करणाऱ्‍या व्यक्‍तीसाठी आणि इतरांना शिकवण्यासाठी जे बायबलचा उपयोग करतात त्यांच्यासाठी या सर्वांचा काय अर्थ होतो? व्यापक प्रमाणावर उपयोग होणाऱ्‍या अधिकांश भाषांमध्ये, अनेक बायबल भाषांतरणे आहेत ज्यातून निवड करता येईल. तुमच्यासाठी बायबल निवडताना सुज्ञ असा. (नीतिसूत्रे १९:८) एखादे भाषांतर खुद्द देवाच्या ओळखीविषयीच प्रामाणिक नसल्यास—मग त्याचे नाव त्याच्या प्रेरित वचनातून काढण्याचे कोणतेही निमित्त असले—त्याच्या भाषांतरकारांनी बायबलच्या इतर भागांमध्येही फेरबदल तर नाही केला? भाषांतरित शब्दांच्या सत्यतेविषयी तुम्हाला शंका असल्यास, जुन्या भाषांतरणांसोबत त्याची तुलना करून पाहा. तुम्ही देवाच्या वचनाचे शिक्षक असल्यास, मूळ इब्री आणि ग्रीक शास्त्रवचनांशी जास्त साम्यता असणाऱ्‍या आवृत्ती पसंत करा.

१६. देवाचे प्रेरित वचन वापरण्यामध्ये आपण स्वतः निष्ठा कशी प्रदर्शित करू शकतो?

१६ आपण सर्वांनी व्यक्‍तिगतपणे देवाच्या वचनाप्रती निष्ठावान असले पाहिजे. त्यामध्ये काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करून असे केले जाते, म्हणजे शक्य असल्यास आपण दररोज काही वेळ बायबलचे वाचन करण्यात घालवतो. (स्तोत्र १:१-३) त्याचे मार्गदर्शन आपल्या जीवनात पूर्णपणे लागू करून, यथायोग्य निर्णय घेता येण्यासाठी त्याची तत्त्वे आणि उदाहरणांचा उपयोग करण्याचे शिकून आपण हे करू शकतो. (रोमकर १२:२; इब्री लोकांस ५:१४) इतरांना देवाच्या वचनाचा आवेशाने प्रचार करून आपण त्याचे निष्ठावान समर्थक असल्याचे दाखवून देतो. शिक्षक या नात्याने बायबलचा काळजीपूर्वक उपयोग करूनही आपण असे करतो—उगाच ओढून ताणून आपल्या कल्पनांशी त्याचा मेळ बसवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. (२ तीमथ्य २:१५) देवाने जे भाकीत केले ते निश्‍चित घडेल. आपल्या वचनाची पूर्तता करण्यात तो निष्ठावान आहे. तर आपणही त्याची बाजू घेण्यात निष्ठावान असू या.

[तळटीपा]

a सन १९९७ मध्ये संयुक्‍त बायबल संस्थांनी २,१६७ भाषा आणि पोटभाषांची यादी दिली ज्यांमध्ये पूर्ण बायबल किंवा काही भाग प्रकाशित झाले आहेत. या आकड्यात काही भाषांच्या अनेक पोटभाषाही आहेत.

b या चर्चेत, ज्या भाषांमध्ये हा वादविषय स्पष्ट केला जाऊ शकतो पण ज्यांचे भाषांतरकार तसे करत नाहीत अशा भाषांबद्दल सांगितले आहे. पण, विशिष्ट भाषांमध्ये, भाषांतरकारांना तसे करण्यासाठी उपलब्ध शब्दसंग्रह अगदीच अपुरा पडतो. तेव्हा, प्रांजळ धार्मिक शिक्षक असे स्पष्टीकरण देतील की, भाषांतरकाराने अनेक शब्द वापरले असले किंवा अशास्त्रीय अर्थबोध देणारा शब्द वापरला असला, तरी मूळ भाषेतला नेफेश हा शब्द मानवांना त्याचप्रमाणे प्राण्यांनाही लागू होतो आणि तो श्‍वासोच्छ्‌वास करणाऱ्‍या, खाणाऱ्‍या आणि मरत असलेल्या कशालाही सूचित होतो.

तुम्हाला आठवते का?

◻ आधुनिक समयात बायबल भाषांतरकारांच्या कार्यावर कोणत्या हेतूंचा प्रभाव पडला आहे?

◻ आधुनिक भाषांतर शैलींमुळे आपल्या नावासंबंधी देवाचा उद्देश विफल का झाला नाही?

◻ काही भाषांतरणे जीव, मृत्यू आणि पृथ्वीविषयी बायबलची सत्ये कशी अस्पष्ट करतात?

◻ आपण देवाच्या वचनाची एकनिष्ठतेने बाजू घेत आहोत हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

[१६ पानांवरील चित्र]

तुम्ही कोणते बायबल भाषांतर वापरावे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा