व्यक्तित्व असणाऱ्या देवाला यहोवाला ओळखा
देवाविषयी हिंदू धर्मातील संकल्पनेची इतर धार्मिक पद्धतींशी तुलना करताना भारताचे डॉ. राधाकृष्णन यांनी असे परीक्षण केले: “इब्री लोकांचा देव काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्याकडे व्यक्तित्व आहे तसेच तो इतिहासात कार्यरत असून या विकसनशील जगातील बदलांमध्ये आणि योगायोगांमध्ये त्याला आस्था आहे. तो असा आहे जो आपल्याशी दळणवळण करतो.”
बायबलमध्ये देवाचे इब्री नाव יהוה आहे, ज्याचे “यहोवा” असे सामान्यपणे भाषांतर करण्यात आले आहे. तो इतर सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काय माहीत आहे? बायबल काळातील लोकांशी त्याने कशा प्रकारे व्यवहार केला?
यहोवा आणि मोशे “प्रत्यक्ष”
मोशेला देवाला अक्षरशः पाहता येणे शक्य नव्हते तरी देखील यहोवाचा त्याचा सेवक मोशे याच्याशी “प्रत्यक्ष” परिचय होता. (अनुवाद ३४:१०; निर्गम ३३:२०) आपल्या तरुणपणात मोशेचे अंतःकरण इस्राएल लोकांसोबत होते; त्यावेळी इस्राएल लोक इजिप्तच्या दास्यत्वात होते. त्याने फारोच्या घराण्याचा सदस्य होण्यास नकार दिला, “देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.” (इब्री लोकांस ११:२५) परिणामी, यहोवाने मोशेला अनेक खास विशेषाधिकार दिले.
फारोच्या घराण्याचा सदस्य या नात्याने “मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले.” (प्रेषितांची कृत्ये ७:२२) परंतु इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी नम्रता, सहनशीलता आणि लीनता यांसारखे गुण विकसित करण्याची त्याला आवश्यकता होती. मिद्यानमध्ये मेंढपाळ म्हणून ४० वर्ष काम करत असताना त्याने असे केले. (निर्गम २:१५-२२; गणना १२:३) यहोवाने अदृश्य राहूनही स्वतःला आणि त्याच्या उद्देशाला मोशेसमोर प्रगट केले आणि देवाने देवदूताद्वारे त्याला दहा आज्ञा दिल्या. (निर्गम ३:१-१०; १९:३–२०:२०; प्रेषितांची कृत्ये ७:५३; इब्री लोकांस ११:२७) बायबल आपल्याला सांगते, की “मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले.” (निर्गम ३३:११) खरोखर यहोवाने स्वतः म्हटले: “मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो.” व्यक्तित्व असणाऱ्या अदृश्य देवाशी मोशेने किती मोलवान व्यक्तिगत नातेसंबंधाचा आनंद घेतला होता!—गणना १२:८.
इस्राएल राष्ट्राच्या आरंभिक इतिहासाखेरीज मोशेने अनेक विभागांसहित नियमशास्त्रसंहिता नमूद केली. त्याला आणखी एक अनमोल विशेषाधिकार देण्यात आला होता—उत्पत्तीचे पुस्तक लिहिण्याचा विशेषाधिकार. त्या पुस्तकाचा अखेरचा भाग इतिहास असून त्याच्या कुटुंबाला तो चांगल्याप्रकारे माहीत होता आणि त्यामुळे त्याला तो तपशील टिपण्यास जड गेले नाही. परंतु मानवाच्या आरंभीच्या इतिहासाचे सविस्तर वर्णन मोशेला कोठून प्राप्त झाले? मोशेकडे त्याच्या वाडवडिलांनी जतन करून ठेवलेले प्राचीन लिखित तपशील राहिले असावेत. दुसऱ्या बाजूला पाहता, त्याला ही सविस्तर माहिती तोंडी संचारणाद्वारे किंवा यहोवाकडून थेट ईश्वरी प्रकटीकरणाद्वारे प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक समयातील आदरणीय व्यक्तींनी फार पूर्वीच हे मान्य केले आहे, की या बाबतीत यहोवाचा मोशेसोबत व्यक्तिगत नातेसंबंध होता.
यहोवा—व्यक्तित्व असणारा एलीयाचा देव
यहोवा व्यक्तित्व असणारा देव आहे, हे एलीया संदेष्ट्याला देखील माहीत होते. एलीया शुद्ध उपासनेसाठी आवेशी होता आणि कनानी लोकांचे प्रमुख दैवत, बआल याच्या उपासकांकडून द्वेषाचे आणि विरोधाचे लक्ष्य होऊनही त्याने यहोवाची सेवा केली.—१ राजे १८:१७-४०.
इस्राएलचा राजा अहाब आणि त्याची पत्नी ईजबेल यांनी अलीशाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आपला जीव धोक्यात असल्याचे ओळखून त्याने मृत समुद्राच्या पश्चिमेकडे, बैर-शेबाकडे पलायन केले. तेथे तो जंगलात भटकत राहिला आणि आपल्याला मरण यावे अशी देखील त्याने प्रार्थना केली. (१ राजे १९:१-४) यहोवाने एलीयाचा त्याग केला होता का? त्याला आता त्याच्या विश्वासू सेवकात कोणत्याही प्रकारची आस्था राहिली नव्हती का? एलीयाने कदाचित तसा विचार केला असावा, पण तो किती चुकीचा होता! त्यानंतर यहोवाने त्याला अगदी शांतपणे असे विचारले: “एलीया, तू येथे कशासाठी आलास?” वैभवी शक्तीच्या विलक्षण प्रदर्शनानंतर “त्यास [पुन्हा] वाणी ऐकू आली ती अशी, एलीया, तू येथे कशासाठी आलास?” आपल्या भरवशाच्या सेवकाला, एलीयाला उत्तेजन देण्यासाठी यहोवाने त्याच्यामध्ये व्यक्तिगत आस्था घेतली. त्याच्यासाठी देवाकडे अधिक काम होते आणि एलीयाने त्याचे निमंत्रण लगेचच स्वीकारले! व्यक्तित्व असणारा देव यहोवा याचे नाव पवित्र करण्याकरता दिलेली सर्व कामे एलीयाने विश्वासूपणे पार पाडली.—१ राजे १९:९-१८.
इस्राएल राष्ट्राचा धिक्कार केल्यानंतर यहोवा त्याच्या पृथ्वीवरील सेवकांशी कधीही व्यक्तिगतरीत्या बोलला नाही. याचा असा अर्थ झाला नाही, की त्यांच्यामधील त्याची व्यक्तिगत आस्था नाहीशी झाली होती. आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्याने त्यांच्या सेवेत त्यांना मार्गदर्शित आणि दृढ केले. पूर्वी शौल या नावाने ओळखला जात असलेल्या प्रेषित पौलाचे उदाहरण आपण घेऊ या.
पौल पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शित
शौल किलिकियातील तार्स नगराचा होता. त्याचे पालक इब्री होते, पण त्याचा रोमी नागरिक म्हणून जन्म झाला होता. तथापि, तो लहानाचा मोठा झाला तेव्हा त्याच्यावर परुशी लोकांचे कडक विश्वास बिंबवण्यात आले होते. नंतर जेरूसलेममध्ये “गमलिएलाच्या चरणांजवळ” शिकण्याची संधी त्याला प्राप्त झाली, गमलिएल नियमशास्त्राचा प्रमुख शिक्षक होता.—प्रेषितांची कृत्ये २२:३, २६-२८.
यहुदी परंपरेप्रती शौलाच्या चुकीच्या आवेशामुळे तो येशू ख्रिस्ताच्या अनुयायांच्या विरोधातील अयोग्य मोहिमेत सामील झाला. त्याने स्तेफनच्या हत्येला मान्यताही दिली होती, स्तेफन प्राणांतिक छळ झालेला पहिला ख्रिस्ती होता. (प्रेषितांची कृत्ये ७:५८-६०; ८:१, ३) त्याने नंतर हे मान्य केले, की जरी निंदक आणि छळ करणारा व जुलमी होता तरी त्याने “जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून [त्याच्यावर] दया झाली.”—१ तीमथ्य १:१३.
देवाची सेवा करण्याच्या प्रांजळ इच्छेमुळे शौल प्रेरित झाला होता. दिमिष्काला जाणाऱ्या रस्त्यावर शौलाचे मतांतर झाल्यानंतर यहोवाने त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला. शौलाला मदत करता यावी म्हणून हनन्या नामक आरंभीच्या ख्रिस्ती शिष्याला पुनरुत्थित येशूद्वारे पाठवण्यात आले. त्यानंतर पौल (या रोमी नावाने ख्रिस्ती म्हणून शौल ओळखला जाऊ लागला) याला यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शित करण्यात आले ज्यामुळे त्याला संपूर्ण युरोप आणि आशिया मायनरमध्ये दीर्घ आणि फलदायक सेवाकार्य पूर्ण करता आले.—प्रेषितांची कृत्ये १३:२-५; १६:९, १०.
पवित्र आत्म्याच्या तशाच प्रकारच्या मार्गदर्शनाला आज ओळखले जाऊ शकते का? होय, ओळखले जाऊ शकते.
यहोवाच्या व्यक्तिगत आस्थेला नास्तिकवादामुळे अटकाव नाही
जोसफ एफ. रदरफोर्ड वॉच टावर सोसायटीचे दुसरे अध्यक्ष होते. बायबल विद्यार्थी या नात्याने त्यांनी १९०६ मध्ये बाप्तिस्मा घेतला होता—त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने ओळखण्यात येत असे—त्यांना त्यांच्या बाप्तिस्म्याच्या दुसऱ्या वर्षी सोसायटीचे कायदेशीर सल्लागार म्हणून नेमण्यात आले आणि ते जानेवारी १९१७ मध्ये सोसायटीचे अध्यक्ष झाले. तथापि, हे तरुण वकील एकेकाळी नास्तिक होते. ते यहोवाचे प्रेरित ख्रिस्ती सेवक कसे झाले?
जुलै १९१३ मध्ये स्प्रिंगफिल्ड, मॅसाचस्टेस, अमेरिका येथे भरविण्यात आलेले आंतरराष्ट्रीय बायबल संघटनेचे रदरफोर्ड अध्यक्ष होते. द होमस्टेड या स्थानिक वर्तमानपत्राच्या पत्रकाराने रदरफोर्ड यांची मुलाखत घेतली आणि त्याने सदर अधिवेशनाचे मुख्य अंश स्मरणिकेत छापले.
रदरफोर्ड यांनी बातमीदाराला सांगितले, की त्यांनी जेव्हा विवाह करण्याचा विचार केला तेव्हा ते बॅप्टिस्ट होते आणि त्यांची होणारी पत्नी प्रेसबिटेरियन होती. तेव्हा रदरफोर्ड यांच्या पाळकांनी म्हटले की “तिचे मज्जन न झाल्यामुळे ती नरकाग्नित जाईल आणि ते स्वतः मात्र थेट स्वर्गात जातील, परंतु त्यांच्या तर्कबुद्धीला हा विचार न पटल्यामुळे ते नास्तिक झाले.”
व्यक्तित्व असणाऱ्या देवावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यासाठी रदरफोर्ड यांना अनेक वर्षे काळजीपूर्वक संशोधन करावे लागले. “जी गोष्ट तुमच्या मनाला पटू शकत नाही त्या गोष्टीला तुमच्या अंतःकरणाला पटवून देण्याचा काहीएक अधिकार नाही,” या आधारावर आपला तर्क असल्याचे त्यांनी म्हटले. ख्रिश्चनांनी “या गोष्टीची खात्री करण्यास हवी, की ते ज्या शास्त्रवचनांवर विश्वास ठेवतात ती खरी आहेत,” असे रदरफोर्ड यांनी म्हटले. त्यांनी असेही म्हटले: “ते ज्या पायावर आहेत तो पाया त्यांना माहीत असला पाहीजे.”—पाहा २ तीमथ्य ३:१६, १७.
होय, नास्तिक किंवा अज्ञेयवादी मनुष्याला शास्त्रवचनांचा शोध करणे, यहोवा देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्यासोबत दृढ व्यक्तिगत नातेसंबंध विकसित करणे आजही शक्य आहे. बायबल अभ्यासासाठी वॉच टावर प्रकाशनाचा अर्थात सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकाचा परीक्षणपूर्वक अभ्यास केल्यानंतर एका युवकाने मान्य केले: “मी जेव्हा अभ्यासाला सुरवात केली तेव्हा मी देवावर विश्वास ठेवत नव्हतो, पण आता मला असे आढळून येते, की बायबलच्या ज्ञानाने माझ्या संपूर्ण विचारसरणीत आमूलाग्र बदल केला आहे. मी यहोवाला जाणून घेण्यास आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात करत आहे.”
“मूर्ख” आणि देव
“जुन्या कराराच्या [इब्री शास्त्रवचनाच्या] लेखकांना कधीही देवाचे अस्तित्व सिद्ध करावे लागले नाही किंवा त्याच्या अस्तित्वाविषयी वाद घालावा लागला नाही,” असे डॉ. जेम्स हेस्टिंग्स अ डिक्शनरी ऑफ द बायबल मध्ये म्हणतात. “देवाच्या अस्तित्वाला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वाद घालणे हे सामान्यतः प्राचीन जगाच्या विचारसरणीत नव्हते. देवावरील विश्वास मानवी मनामध्ये स्वाभाविक आणि सर्व लोकांसाठी सामान्य होता.” अर्थात, याचा असा अर्थ होत नाही, की त्याकाळचे सर्व लोक देवभिरू होते. हे अगदी उघड सत्य होते. स्तोत्र १४:१ आणि ५३:१ या दोन्ही वचनांत, “देव [“यहोवा,” NW] नाही,” असे आपल्या अंतःकरणात म्हणणाऱ्या मनुष्याला “मूढ” असे म्हणण्यात आले, तर पंडिता रमाबाई भाषांतरामध्ये अशा मनुष्याला “मूर्ख” असे म्हणण्यात आले आहे.
देवाच्या अस्तित्वाला न मानणारा हा मूर्ख मनुष्य कोणत्या प्रकारचा आहे? त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेची कमी नाही. तर मूर्ख यासाठी वापरलेला नावल हा इब्री शब्द नैतिक उणिवेस निर्देशित करतो. प्राध्यापक एस. आर. ड्रायव्हर यांनी द पॅरलल सॉल्टर या आपल्या पुस्तकात लिहिताना असे म्हटले की “तर्क करण्याची कमतरता नाही, पण नैतिक आणि धार्मिक संवेदनशून्यता, आकलनाची किंवा समजेची” उणीव आहे.
स्तोत्रकर्ता, ढासळलेल्या नैतिकतेचे पुढे वर्णन करतो जी पुढील मनोवृत्तीमुळे निर्माण झाली आहे: “लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करितात, सत्कर्म करणारा कोणी नाही.” (स्तोत्र १४:१) डॉ. हेस्टिंग्स समारोप करतात: “या जगात देव नाही तसेच शिक्षेचे कोणतेही भय नाही त्यामुळे लोक भ्रष्ट होतात आणि निंद्य कामे करतात.” ते अगदी उघडपणे अभक्त तत्त्वांचा अंगीकार करतात आणि व्यक्तित्व असणाऱ्या देवाचा अवमान करतात, त्याला जाब देण्याची त्यांची कोणतीही इच्छा नाही. अशा प्रकारची विचारसरणी आज मूर्खतेची आणि मूढपणाची आहे आणि हेच स्तोत्रकर्त्याने सुमारे ३,००० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लिहिले होते.
व्यक्तित्व असणाऱ्या आपल्या देवाकडून ताकीद
आधीच्या लेखात जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांकडे आपण जाऊ या. आजच्या जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या यातनांसोबत व्यक्तित्व असणाऱ्या देवाशी एकवाक्यता राखणे अनेक लोकांना का अशक्य आहे?
बायबलमध्ये अशा लोकांद्वारे लिखित माहिती आहे, ज्यांनी ‘पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन देवापासून आलेला संदेश सांगितला.’ (२ पेत्र १:२१) व्यक्तित्व असणारा देव, यहोवा याच्याविषयी केवळ बायबल प्रकट करते. मानवाला न दिसणाऱ्या एका व्यक्तित्वाबद्दल देखील बायबल आपल्याला ताकीद देते, जो मानवी विचारसरणीला मार्गदर्शित आणि नियंत्रित करण्यात समर्थ आहे—तो आहे दियाबल सैतान. हे तर्कसंगत आहे, की व्यक्तित्व असणाऱ्या देवावर आपला विश्वास नसल्यास, व्यक्तित्व असणारा दियाबल किंवा सैतान सुद्धा आहे यावर तरी आपण कसा विश्वास ठेवू शकतो?
प्रेषित योहानाने प्रेरित होऊन असे लिहिले: “सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे.” (प्रकटीकरण १२:९) नंतर योहानाने असे म्हटले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) वरील विधाने येशूचे शब्द प्रकट करतात, हे शब्द स्वतः योहानाने त्याच्या शुभवर्तमानात नमूद केले आहेत: “जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.”—योहान १४:३०.
ही शास्त्रवचनीय शिकवण लोक सध्या जो विश्वास करतात त्यापासून किती भिन्न आहे! “दियाबलाविषयी बोलणे आज स्पष्टपणे कालबाह्य झाले आहे. आपल्या नास्तिक आणि वैज्ञानिक युगातून सैतानाला निवृत्ती मिळाली आहे,” असे कॅथलिक हेरॉल्ड म्हणते. तथापि, आपल्याला मारण्याचा चंग बांधलेल्या लोकांना येशूने अगदी ठामपणे म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता.”—योहान ८:४४.
सैतानाच्या शक्तीविषयी केलेले बायबलमधील स्पष्टीकरण अर्थपूर्ण आहे. बायबल हे स्पष्ट करते, की बहुतेक लोकांना शांतीत आणि ऐक्यात जगण्याची इच्छा असतानाही हे जग द्वेष, युद्धे आणि निरर्थक हिंसाचार यांनी भयंकर पीडित का झाले आहे, डनब्लेनमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती पाहण्यास मिळाली होती (पृष्ठे ३ आणि ४ वर उल्लेख करण्यात आला आहे). याशिवाय, सैतान केवळ एकटाच नाही ज्याच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहे. बायबल आपल्याला दुरात्मा किंवा पिशाच्च यांच्यासंबंधाने आणखी एक ताकीद देते—दुरात्मिक प्राणी जे मानवजातीची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याशी दुर्व्यवहार करण्यासाठी फार पूर्वी सैतानाला जाऊन मिळाले. (यहुदा ६) येशू ख्रिस्ताने अनेक वेळा या दुष्टात्म्यांच्या शक्तीला तोंड दिले आणि त्या दुष्टात्म्यांना नमविणे त्याला शक्य झाले.—मत्तय १२:२२-२४; लूक ९:३७-४३.
खरा देव यहोवा याने दुष्टतेचे उच्चाटन करून पृथ्वीला शुद्ध करण्याचे तसेच अखेरीस सैतान आणि त्याचे पिशाच्च यांची कार्ये थांबविण्याचे उद्देशिले आहे. यहोवाविषयी आपल्याला असणाऱ्या ज्ञानावर आधारित आपण त्याच्या अभिवचनांवर दृढ विश्वास आणि भरवसा ठेवू शकतो. तो म्हणतो: “माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरहि कोणी होणे नाही . . . मीच परमेश्वर [यहोवा] आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.” जे लोक यहोवाला ओळखतात, त्याची उपासना आणि सेवा करतात त्या सर्वांसाठी यहोवा खरोखरच एक व्यक्तित्व असणारा देव आहे. आपल्या तारणासाठी आपण त्याच्याकडे आणि केवळ त्याच्याकडेच डोळे लावू शकतो.—यशया ४३:१०, ११.
[७ पानांवरील चित्र]
मोशे प्रेरणेद्वारे उत्पत्ति १:१ लिहित असताना, १८ व्या शतकातील एक खोदकाम
[Credit Line 7]
From The Holy Bible by J. Baskett, Oxford
[८ पानांवरील चित्र]
येशू ख्रिस्ताने अनेक वेळा दुरात्म्यांना नमविले