राज्य घोषकांचा वृत्तान्त
“अनपेक्षित प्रदेशातील” आव्हानांवर मात करणे
प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील करिंथमधील ख्रिश्चनांना विचारले: “कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीहि सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल?”—१ करिंथकर १४:८, ९.
पापुआ, न्यू गिनी या देशाला काही वेळा अनपेक्षित प्रदेश असे म्हणण्यात येते, यहोवाच्या साक्षीदारांना येथे बायबलचा स्पष्ट संदेश प्रचार करण्यात भयंकर अडथळे येतात. साक्षीदार तेथील अशा लोकांना प्रचार करतात जे ७०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि त्यांच्या चालीरिती देखील फार भिन्न आहेत. तेथील डोंगराळ भाग, रस्त्यांची कमतरता आणि वाढती गुन्हेगारी यांमुळे देखील तेथील साक्षीदारांना संघर्ष करावा लागत आहे. अशा प्रकारच्या कठीण परिस्थिती तर आहेतच, शिवाय तेथील विशिष्ठ धार्मिक गटांकडून साक्षीदारांना विरोध केला जातो आणि काही वेळा तर हा विरोध शालेय अधिकाऱ्यांकडून देखील होतो.
तथापि, चांगले आध्यात्मिक मार्गदर्शन आणि स्थानिक भाषेतील बायबल अभ्यासाला उपयोगी ठरणाऱ्या पुस्तकांचा वाढता संग्रह यांमुळे तेथील साक्षीदार कर्ण्याच्या स्पष्ट नादाप्रमाणे सुवार्ता सांगण्यासाठी सज्ज होत आहेत. बहुतेकवेळा त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया मिळते, जसे खालील अहवाल दाखवून देतात:
• शाळेतील नवीन वर्षाच्या सुरवातीला एका शिक्षकाला हे जाणून घेण्याची इच्छा होती, की यहोवाच्या साक्षीदारांची मुले झेंडावंदन का करत नाहीत किंवा राष्ट्रगीत का गात नाहीत. त्याने हा प्रश्न १३ वर्षांच्या माईऑला हिला विचारला, ती एक बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार आहे. माईऑलाने शिक्षकांना स्पष्ट, शास्त्रवचनांवर आधारित स्पष्टीकरण दिले. तिने केलेली कारणमीमांसा बायबलमधून असल्यामुळे शिक्षकांना तिचे म्हणणे पटले. शाळेतील इतर कर्मचारीवर्गाने देखील तिचे स्पष्टीकरण ऐकले.
नंतर, विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा माईऑलाने त्रैक्य या विषयावर निबंध लिहिण्याचे ठरवले. तिच्या या निबंधाला वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आणि तिला ही माहिती कोठे मिळाली असे तिच्या शिक्षकांनी तिला विचारले. तिने त्यांना तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे इंग्रजी भाषेतील पुस्तक दाखवले. तिच्या शिक्षकांनी ते पुस्तक संपूर्ण वर्गाला दाखवले आणि त्यांच्यापैकी अनेकांना त्या पुस्तकाची व्यक्तिगत प्रत हवी होती. दुसऱ्या दिवशी, माईऑलाने तिच्या शाळासोबत्यांना १४ पुस्तके आणि ७ नियतकालिके दिली आणि त्यांतील तिघांसोबत तर तिने बायबल अभ्यास देखील सुरू केला. पूर्ण वेळेची सेविका होण्याचे माईऑलाचे ध्येय आहे.
• पोर्ट मोरेसबी जवळील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या एका गावातील यहोवाच्या साक्षीदारांच्या एकाकी गटाने १९७० व्या दशकाच्या सुरवातीपासून विरोधाला तोंड दिले आहे. तथापि, अलीकडे त्यांना एका अनपेक्षित उगमाकडून मदत मिळाली. पापुआ न्यू गिनीचा रहिवासी असलेल्या आणि परदेशात शिक्षण घेतलेल्या युनायटेड चर्चच्या बिशपने एके दिवशी चर्चमध्ये लोकांना त्यांचे प्रश्न विचारण्यास सांगितले. एका मनुष्याने त्याच्याकडे अशी पृच्छा केली: “आपल्या गावात दोन धर्म आहेत—युनायटेड चर्च आणि यहोवाचे साक्षीदार. यहोवाचे साक्षीदार आमच्या दरवाजावर येतात तेव्हा आम्ही काय करावं?” पुष्कळ वेळ थांबल्यानंतर त्या बिशपने म्हटले: “खरं तर, तुम्हाला काय सांगावं, हे मला समजत नाहीए. अलीकडे दोन तरुण साक्षीदार माझ्या दरवाजावर आले होते. त्यांनी मला एक प्रश्न विचारला आणि विद्यापीठाचं सर्व प्रशिक्षण मिळालं असतानाही मला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. परंतु त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर बायबलमधून अगदी सहज दिलं. त्यामुळे तुम्ही काय करावं, हे मी तुम्हाला सांगणार नाही—हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला त्यांचं ऐकून घ्यायचं नसल्यास तुम्ही ऐकू नका, पण त्यांच्यासोबत निदान दांडगाई तरी करू नका.”
वॉच टावर सोसायटीच्या एका प्रवासी प्रतिनिधीने काही काळानंतर साक्षीदारांच्या या गटाला भेट दिली तेव्हा त्याने त्या भेटीचा अहवाल देताना म्हटले: “साक्षीदार जेव्हा प्रचाराला गेले तेव्हा जवळजवळ गावातील प्रत्येकानं त्यांचं ऐकलं. काहींनी तर त्यांना घरात देखील बोलावलं. आता हे गाव प्रचारासाठी परादीसच झालं आहे.”