गरीब तरीही श्रीमंत—ते कसे?
गरिबीच्या गर्तेत लोटले जाऊ नये म्हणून एका सुज्ञ पुरुषाने अनेक शतकांपूर्वी प्रार्थना केली. त्याने अशी विनंती का केली बरे? कारण त्याला अशी एक भयशंका होती, की दारिद्र्य त्याला कदाचित अशा वृत्ती व कृत्यांकडे प्रवृत्त करील ज्यांमुळे देवाबरोबरील त्याचा नातेसंबंध धोक्यात येईल. ही गोष्ट त्याच्या या शब्दांवरून स्पष्ट होते: “मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. . . . मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.”—नीतिसूत्रे ३०:८, ९.
याचा अर्थ, एखाद्या गरीब व्यक्तीस विश्वासूपणे यहोवाची सेवा करणे अशक्यप्राय आहे असा होतो का? निश्चितच नाही! सबंध इतिहास काळात, यहोवा देवाच्या असंख्य सेवकांनी दारिद्र्यामुळे हाल होत असताना देखील सचोटी राखली आहे. परिणामी, जे लोक यहोवावर भरवसा ठेवतात त्यांच्यावर तो प्रेम करतो व त्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरवतो.
प्राचीन काळातील विश्वासू जण
स्वतः प्रेषित पौलाला देखील अडीअडचणींतून वाटचाल करावी लागली. (२ करिंथकर ६:३, ४) त्याने, ख्रिस्ती धर्म पूर्व काळातील विश्वासू साक्षीदारांच्या ‘मोठ्या मेघाचे’ वर्णन केले; यांच्यापैकी काही जण “मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, . . . असे होते; . . . ते अरण्यातून, डोंगरातून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.”—इब्री लोकांस ११:३७, ३८; १२:१.
संदेष्टा एलीया, या विश्वासू जणांपैकी एक होता. साडेतीन वर्षे कोरड पडली त्या काळादरम्यान यहोवाने नियमितपणे त्याला अन्न पुरवले. प्रथम, कावळ्यांमार्फत यहोवा त्याला भाकरी व मांस पुरवत असे. (१ राजे १७:२-६) नंतर, एलियाचे पोषण करणाऱ्या विधवेला, यहोवा चमत्कारिकरित्या पिठाचा व तेलाचा साठा पुरवित राहिला. (१ राजे १७:८-१६) ते अत्यंत साधे भोजन असले तरी त्यामुळे तो संदेष्टा, ती स्त्री व तिचा मुलगा तग धरू शकले.
अशाच प्रकारे यहोवाने, कठीण आर्थिक काळात टिकाव धरण्यास यिर्मयाचे पोषण केले. जेरुसलेमवर बॅबिलोनचा वेढा पडला व लोकांना ‘कष्टी होऊन भाकर तोलून खावी’ लागत असे, तेव्हा यिर्मयाचा मात्र निभाव लागला. (यहेज्केल ४:१६) सरतेशेवटी इतका दारुण दुष्काळ पडला, की स्त्रियांनी आपल्या पोटच्या मुलाबाळांचे मांस सेवन केले. (विलापगीत २:२०) आपल्या निर्भीड प्रचारामुळे यिर्मया कैदेत असताना देखील, “नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत” त्याला रोज एक “रोटी” मिळत असल्याची खात्री मात्र यहोवाने केली.—यिर्मया ३७:२१.
तर एलीयाप्रमाणे यिर्मया देखील अन्नाला महाग झाला होता. जेरुसलेममधील अन्नाचा साठा संपल्यावर यिर्मयाने काय सेवन केले व किती वेळा सेवन केले यांविषयी शास्त्रवचनांत कोणताही उल्लेख नाही. तरीसुद्धा, टिकाव धरण्यास यहोवाने त्याला मदत केली व दुष्काळाच्या त्या महाभयंकर काळातून तो निभावला याविषयी आपण अज्ञात नाही.
आज जगाच्या कानाकोपऱ्यात दारिद्र्याचे सावट पसरलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेत आढळते. १९९६ साली वृत्त प्रसार माध्यमाकरता तयार केलेले युएनचे एक विधान म्हणते: “कमीतकमी निम्मे आफ्रिकी लोक देशोधडीला लागले आहेत.” अधिकाधिक बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही, तग धरून राहण्यास यहोवा आपली मदत करील असा विश्वास बाळगून वाढत्या संख्येने आफ्रिकी लोक बायबलची तत्त्वे जीवनात लागू करून विश्वासूपणे देवाची सेवा करत आहेत. आपल्या त्रस्त जगाच्या एका भागातील काही उदाहरणे विचारात घ्या.
प्रामाणिकपणा राखणे
नायजेरियात राहणारा मायकलa हा एक शेतकरी असून त्याला सहा मुलांचे संगोपन करावे लागते. तो म्हणतो: “तुमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याकरता खिशात दमडी नसते तेव्हा प्रामाणिक असणे अगदीच कठीण होऊन बसते. असे असले तरी, मला अप्रामाणिक बनण्याचा मोह होतो तेव्हा मी स्वतःस इफिसकर ४:२८ ची आठवण करून देतो जे म्हणते: ‘चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे.’ तर मग, जेव्हा केव्हा मला मोह होतो तेव्हा मी स्वतःस विचारतो, ‘या पैशासाठी मी घाम गाळला आहे का?’”
मायकल पुढे म्हणतो: “उदाहरणार्थ, एकदा मी पायी चाललो होतो तेव्हा एका मोटार-सायकलवरून एक बॅग पडल्याची मला दिसली. वाहन चालकास मी काही थांबवू शकलो नाही, त्यामुळं मी ती बॅग उचलली आणि पाहतो तर काय, ती चक्क पैशांनी भरलेली होती! बॅगेत असलेल्या माहितीचा उपयोग करून मी त्या मालकास शोधून काढलं व त्याला बॅग परत केली.”
खिन्नतेशी झुंजणे
उत्तर आफ्रिकेतील एका गृहस्थाने निरीक्षिले: “दारिद्र्य म्हणजे एखाद्या खोल खाचेत सापडणं [यासारखं] आहे; वरती प्रकाश दिसतो व लोक इतरत्र फिरत असल्याचंही दिसतं, पण मदतीसाठी मात्र ओरडता येत नाही, की वर येण्याकरता शिडीही मागता येत नाही.” तर मग, दारिद्र्यामुळे खिन्नता व निराशा पदरी पडते यात आश्चर्याचे ते काय! इतरांची श्रीमंती डोळ्यांत आल्याने देवाचे सेवकसुद्धा कदाचित असा विचार करू लागतील, की सचोटीचे जीवन म्हणजे निव्वळ व्यर्थता आहे. (पडताळा स्तोत्र ७३:२-१३.) अशा भावनांवर कशाप्रकारे मात केली जाऊ शकते बरे?
पश्चिम आफ्रिकेतील पीटर हा १९ वर्षे सरकारी नोकरी करून निवृत्त झाला. आता एका तुटपुंज्या निवृत्ती-वेतनावरच त्याला आपले पोट भरावे लागते. पीटर म्हणतो: “जेव्हा निराशेचा काळ माझ्या वाट्याला येतो तेव्हा मी बायबलमध्ये व वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांत जे काही वाचले आहे त्याची स्वतःस आठवण करून देतो. हे जुने व्यवस्थीकरण लयास जाण्याच्या मार्गावर आहे आणि आपण एका अधिक चांगल्या व्यवस्थीकरणाकडे दृष्टी लावून आहोत.”
“याशिवाय मी, १ पेत्र ५:९ याचाही विचार करतो जे म्हणते: ‘[सैतानाविरुद्ध] विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.’ तर मग, कठीण काळातून वाटचाल करणारा मी काही एकटाच नाही. या स्मरणिकांमुळे, निरुत्साही व खिन्न करणाऱ्या विचारांना मूठमाती देण्यास मला मदत होते.”
“शिवाय, येशू पृथ्वीवर असताना त्यानं पुष्कळ चमत्कार केले पण त्यानं कुणालाही श्रीमंत केलं नाही. तर मग, धनवान होण्याची आस मी तरी का धरावी बरं?” असेही पीटर म्हणतो.
प्रार्थनेचे सामर्थ्य
यहोवा देवाच्या समीप जाणे हा नकारार्थी विचारसरणीशी झुंजण्याचा आणखी एक मार्ग आहे. सन १९६० मध्ये मेरी एक यहोवाची साक्षीदार बनली तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला वाळीत टाकले. सध्या, अविवाहीत व आपल्या पन्नाशीत असून ती दुर्बळ आहे आणि भौतिकरित्याही जवळजवळ कंगाल आहे. तथापि, ख्रिस्ती सेवेत मात्र ती आवेशी आहे.
मेरी म्हणते: “मी निरुत्साही होते तेव्हा प्रार्थनेद्वारे मी यहोवापाशी जाते. मला माहीत आहे, की यहोवाशिवाय दुसरं कुणीच मला अधिक मदत करू शकणार नाही. तुम्ही यहोवावर भरवसा ठेवता तेव्हा तो तुमच्या मदतीला धावून येतो हे मला कळून चुकलं आहे. स्तोत्र ३७:२५ येथे दिलेले दावीद राजाचे शब्द मी सतत आठवते: ‘मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.’
“टेहळणी बुरूज यात आपल्या वयोवृद्ध आध्यात्मिक बंधूभगिनींचे दिलेले अनुभव वाचूनही मी उत्तेजन मिळवत असते. यहोवा देवानं त्यांची मदत केली, त्यामुळं तो मलाही मदत करत राहील हे मला ठाऊक आहे. फूफू [कासावा भोजन] विकण्याचा माझा छोटासा धंदा तो आशीर्वादित करतो व त्यामुळं मला रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करता येते. काही वेळा तर जवळ एक दमडीही नसते तेव्हा काय करू अन् काय नाही या पेचात मी पडते; नेमकं याच वेळी यहोवा कुणालातरी माझ्याकडे पाठवतो जो मला देणगी देऊन म्हणतो: ‘कृपया, हे घे, हे तुझ्यासाठी आहे.’ यहोवानं कधीच मला निराश होऊ दिलं नाही.”
बायबल अभ्यासाचे महत्त्व
यहोवाचे साक्षीदार, देवाचे वचन अर्थात बायबल याच्या अभ्यासाला खूप महत्त्व देतात व त्यांच्यातले गरीब देखील याला अपवाद नाहीत. साठ वर्षांचा जॉन एक पायनियर (पूर्ण-वेळेचा राज्य प्रचारक) व मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करतो. १३ कुटुंबे राहत असलेल्या एका पडक्या दुमजली इमारतीत तो राहतो. त्याची राहण्याची खोली म्हणजे पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याचा एक भाग, जो प्लायवूड ठोकून अलग केलेला आहे. तिथे दोन जुन्या खुर्च्या व एक टेबल आहे ज्यावर बायबल अभ्यासासाठी सहायक असणाऱ्या प्रकाशनांचा मोठा ढीग लागलेला आहे. आणि एका चटईवर तो निजतो.
जॉन ब्रेड विकून दररोज एक डॉलर कमवत असे, पण देशातील गव्हाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली तेव्हा त्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन हातातून सुटले. तो म्हणतो: “काही वेळा परिस्थिती अतिशय बिकट असते, पण तरी मी पायनियरींग काही सोडत नाही. यहोवाच मला तग धरून राहण्यास मदत करतो. मंडळीतले बांधव अतिशय साहाय्यकारी असले तरी आश्रयासाठी अथवा माझे पोट भरण्यासाठी कोणत्याही मनुष्यावर विसंबून राहण्याऐवजी हाती येईल ते कुठलंही काम मी करतो. काम शोधण्यास बांधव माझी मदत करतात व काहीवेळा पैशांच्या रुपात मला बक्षीसही देतात.
वेळात वेळ काढून मी बायबल व वॉच टावर संस्थेची प्रकाशने वाचत असतो. सकाळच्या वेळी घरात शांतता असते तेव्हा मी अभ्यास करतो व आमच्याकडं वीज पुरवठा असतो तेव्हा रात्री उशिरापर्यंत मी वाचन करतो. मी माझा वैयक्तिक अभ्यास न चुकता केलाच पाहिजे हे मला ठाऊक आहे.”
जीवनाकरता मुलांना प्रशिक्षित करणे
डॅनियल एक विधुर असून त्याला सहा मुले आहेत. १९८५ साली, त्याने ज्यात २५ वर्षे घालवली होती ती नोकरी सुटली, पण तरी एक स्टोअरकिपर म्हणून त्याला दुसरी नोकरी मिळाली. तो म्हणतो: “आर्थिकदृष्ट्या कुटुंबाकरता जीवन अतिशय असह्य आहे. आता आम्हाला जेमतेम एक वेळेचं अन्न मिळतं. एकदा तर अक्षरशः तीन दिवस आम्ही उपाशीच राहिलो. केवळ पाणी पिऊन पोटाची खळगी भरत होतो.”
डॅनियल एक वडील म्हणून मंडळीत सेवा करत आहे. तो म्हणतो: “मी कधीच सभा चुकवत नाही व ईश्वरशासित कार्यनियुक्तीत मी स्वतःस नेहमी व्यस्त ठेवतो. राज्य सभागृहात काही काम करायचं असल्यास मी हमखास तिथं हजर असतो. आणि परिस्थिती अतिशय बिकट झाल्यास, मी स्वतःस योहान ६:६८ यात पेत्राने येशूला जे म्हटले त्याची आठवण करून देतो; त्यात म्हटले आहे: ‘प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार?’ मी जर यहोवाची सेवा सोडून दिली तर मी जाणार तरी कुठं? देवाच्या व ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोणीही आपल्याला विलग करू शकणार नाही असे सूचित करणाऱ्या रोमकर ८:३५-३९ येथील पौलाच्या शब्दांमुळेही मी दृढनिश्चयी होतो. हीच प्रवृत्ती मी माझ्या मुलाबाळांवर बिंबवतो. आपण कधीही यहोवाचा त्याग करू नये हे मी सतत त्यांना सांगत असतो.” डॅनियलच्या या आवेशामुळे शिवाय एका नियमित कौटुंबिक बायबल अभ्यासामुळे त्याच्या मुलांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे.
उदारतेचा आत्मा
काहींना कदाचित असे वाटेल, की कमालीचे कंगाल जीवन जगणाऱ्या लोकांना राज्य आस्थांना बढावा देण्यात हातभार लावणे अगदीच अशक्यप्राय असेल. पण तसे मुळीच नाही. (पडताळा लूक २१:१-४.) आपली उपजिविका चालविण्यासाठी शेती करणे हाच घानातील काही साक्षीदारांचा एकमेव व्यवसाय असून आपल्या जमिनीचा एक हिस्सा ते राखून ठेवतात व देव राज्याच्या आस्थांना बढावा देण्यासाठी ते याचा उपयोग करतात. त्यांच्या जमिनीच्या या भागातले उत्पन्न विकून मिळालेला पैसा केवळ त्याच कारणासाठी वापरला जातो; यात यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहात अनुदान देणे देखील अंतर्भूत आहे.
मध्य आफ्रिकेत राहणारी जोन, एक पायनियर आहे. आपल्या पक्षघाती पतीची व तिच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर चौघा जणांची जबाबदारी पेलण्यासाठी ती ब्रेड विकते. ती उपस्थित राहत असलेल्या मंडळीला, राज्य सभागृहासाठी बेंचेसची गरज होती तेव्हा जोनच्या कुटुंबाने त्यांच्या घरात होता नव्हता तो सर्व पैसा त्यासाठी ओतण्याचे ठरवले. त्यामुळे ते कंगाल झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोणीतरी अनपेक्षितपणे त्यांना एक फारच जुने कर्ज परत केले; हे पैसे आपल्याला कधी मिळतील अशी आशाच त्यांनी सोडून दिली होती!
जोन ही संतुष्ट असून पैशांची अवाजवी चिंता करत बसत नाही. “मी प्रार्थनेत माझी परिस्थिती यहोवाला सांगते आणि मग क्षेत्र सेवेस निघून जाते. आम्ही हे जाणून आहोत, की या व्यवस्थीकरणात सुकाळाची आशा अतिशय धूसर आहे. तरीही यहोवा आपल्या गरजांसाठी तरतूद करील हे आम्हाला माहीत आहे.”
कामसू वृत्ती प्रकट करणे
यहोवाचे साक्षीदार एकमेकांवरील आपल्या प्रेमामुळे ओळखले जातात. (योहान १३:३५) जे श्रीमंत आहेत ते इतर गरजू सहख्रिश्चनांना मदत करतात. अनेकदा हे बक्षिसाच्या रुपात तर काहीवेळा नोकरी देऊन केले जाते.
काँगो येथे राहणारा मार्क कुष्ठरोगाने पीडित आहे. त्यामुळे त्याच्या हातापायाची बोटे विद्रूप झाली आहेत. कुबड्यांच्या साह्याने त्याला चालावे लागते. मार्कने यहोवाची सेवा करण्याचा मनोदय केला तेव्हा तो आपल्या जीवनात नेत्रदीपक बदल करू लागला. पूर्वीसारखे भीक मागून खाण्याऐवजी आता तो स्वतःच आपले अन्न उगवू लागला. तो कच्च्या विटाही तयार करून विकतो.
शारीरिकरित्या अपंग असतानाही त्याने मेहनतीने काम केले. नंतर त्याने जमिनीचा एक तुकडा विकत घेऊन त्यावर एक टुमदार घर बांधले. सध्या मार्क, एका मंडळीत वडील म्हणून सेवा करतो व तो राहत असलेल्या नगरातही त्याला चांगला मानसन्मान आहे. आता तो इतर गरजू लोकांना साहाय्य करतो.
तथापि, अनेक ठिकाणी कामधंदा मिळणे वस्तुतः अशक्यप्रायच आहे. मध्य आफ्रिकेतील वॉच टावर संस्थेच्या शाखा दफ्तरात कार्य करणाऱ्या एका ख्रिस्ती वडिलांनी लिहिले: “इथं कित्येक बांधव असे आहेत जे बेकार आहेत. काही जण स्वतःहून काही उद्योग सुरू करतात, पण तेही कठीणच आहे. काहींनी असा तर्क केला आहे, की असे ना तसे त्यांचे हाल तर होणारच आहेत तर मग पायनियर सेवक होऊन भौतिक त्याग का करू नये. अनेकांना याचा प्रत्यय आला आहे, की त्यांनी जर थोडाफार अथवा काहीच मोबदला न देणारी एखादी नोकरी पत्करली असती तर पायनियर सेवक म्हणून त्यांना जितक्या विपुल प्रमाणात आशीर्वाद प्राप्त झाले आहेत तितके आशीर्वाद त्यांना मिळाले नसते.”
यहोवा आपल्या लोकांचा सांभाळ करतो
येशूने स्वतःबद्दल म्हटले: “खोकडास बिळे व आकाशातल्या पांखरास घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५८) त्याचप्रमाणे प्रेषित पौलाने देखील लिहिले: “ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहो; आम्ही ठोसे खात आहो, आम्हाला घरदार नाही.”—१ करिंथकर ४:११.
अधिक पूर्णार्थाने आपल्या सेवेचा पाठलाग करता यावा या हेतूने येशू आणि पौल या दोघांनीही बेताच्या आर्थिक परिस्थितीत जीवन व्यतीत करण्याची निवड केली. विद्यमान काळातील अनेक ख्रिस्ती गरीब आहेत, कारण त्यांच्यापुढे दुसरी कोणतीच निवड नाही. तरीसुद्धा, ते बायबलची तत्त्वे आपल्या जीवनात लागू करून आवेशाने देवाची सेवा करत राहतात. त्यांना माहीत आहे, की ते यहोवाला अतिशय प्रिय आहेत कारण येशूच्या शब्दांची सत्यता त्यांनी अनुभवली आहे: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व [भौतिक गोष्टी] तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:२५-३३) या शिवाय, देवाच्या या गरीब सेवकांजवळ याचा पुरावा आहे, की “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो.”—नीतिसूत्रे १०:२२.
[तळटीप]
a या लेखात पर्यायी नावे वापरलेली आहेत.
[७ पानांवरील चित्र]
जगभरातील लोक बायबल अभ्यासाला महत्त्व देतात