माझे हृदय कृतज्ञतेने अगदी भरून जाते
जॉन विन यांच्याद्वारे कथित
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा चुकवण्याचा विचार माझ्या मनात कित्येक वेळा आला! सभेला जाण्याचे टाळण्यासाठी मी पोटदुखीचे किंवा डोकेदुखीचे ढोंग करत असे. परंतु माझ्या आईची दृढ भूमिका पाहून माझे हे आजार कुठल्या कोठे पळून जात आणि मग तीन किलोमीटर दूर असणाऱ्या राज्य सभागृहात आईसोबत जाण्याकरता मी तयार होत असे, तेथील सभांसाठी जाताना आई, वयाने वयस्कर असलेल्या एका स्त्रीशी देवराज्याची चर्चा करत असे तेव्हा त्यांचे बोलणे माझ्या कानांवर पडत असे.
यामुळे मला एक मौल्यवान धडा शिकण्यास मिळाला: देवाच्या दृष्टीने योग्य असलेल्या गोष्टींच्या बाबतीत पालकांनी प्रेमळपणे दृढ राहण्याचे कधीही थांबवू नये. (नीतिसूत्रे: २९:१५, १७) ‘आपले एकत्र मिळणे न सोडण्याची’ ईश्वरी आज्ञा त्यांनी कधीही विसरता कामा नये. (इब्री लोकांस १०:२५) मी माझ्या जीवनाचे सिंहावलोकन करतो तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी जे उत्तम होते तेच केले हे जाणून मी किती कृतज्ञ होतो!
उत्तम उदाहरणांसाठी कृतज्ञ
माझे वडील सत्य मानणारे नव्हते तरी आई जेव्हा बायबल विद्यार्थीनी झाली तेव्हा ते तिच्या विश्वासाच्या विरोधात काही बोलले नाहीत, त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी या नावाने ओळखण्यात येत असे. सन १९१३ मध्ये आई “बियाँड द ग्रेव्ह” हे भाषण ऐकण्यासाठी गेली, हे भाषण त्यावेळचे वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष चार्ल्स टी. रस्सल यांच्याद्वारे देण्यात आले होते. तथापि, त्या ठिकाणी ती उशिरा पोहंचली तेव्हा तिला बसायला जागा मिळाली नाही. उशिरा आलेल्यांसाठी बसण्याची खास व्यवस्था व्यासपीठाजवळ, पास्टर रस्सल यांच्या अगदी जवळ करण्यात आली होती, तेथे बसण्यासाठी तिला आमंत्रित करण्यात आले. त्या भाषणाने ती फार प्रभावित झाली. हे भाषण स्थानिक वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी छापण्यात आले, तिने त्या वर्तमानपत्राची एक प्रत स्वतःजवळ ठेवली आणि ती ते भाषण वारंवार वाचतही असे.
सभा संपल्यानंतर आईने स्वतःचे नाव आणि पत्ता एका कागदावर लिहून दिला आणि लवकरच तिला एका बायबल विद्यार्थ्याने भेट दिली. इंग्लंडमधील ग्लॉसेस्टर येथे आम्ही वास्तव्यास होतो त्याठिकाणी आईने कालांतराने बायबल पत्रिका घरोघरी द्यायला सुरवात केली. त्यावेळी मी आणि माझ्या दोघी बहिणी फार लहान होतो आणि त्या वेळेपासूनच आम्ही आईसोबत प्रचार कार्याला जाऊ लागलो.
हॅरी फ्रान्सिस नामक आवेशी बायबल विद्यार्थी ग्लॉसेस्टर येथे आला तेव्हा आईने त्याचे हार्दिक स्वागत केले. लवकरच, त्याने माझ्यामध्ये व्यक्तिगत आस्था घेतली आणि त्याने दिलेले उत्तेजन हा माझ्याकरता प्रमुख घटक आहे कारण त्यामुळे मी पुढे पायनियर होऊ शकलो, पूर्ण वेळेच्या सेवकाला पायनियर असे संबोधण्यात येते. बंधू फ्रान्सिसच्या उदाहरणाने मला एक महत्त्वाचा धडा शिकवला: वडीलधाऱ्या लोकांनी तरुणांना नेहमी उत्तेजन दिले पाहिजे.
आई बायबल विद्यार्थीनी झाली तेव्हा ग्लॉसेस्टरमधील इतर जणांनी देखील तिच्या पावलावर पाऊल ठेवले. तथापि, मंडळीतील काही वडील स्वतःला अनावश्यक महत्त्व देऊ लागले आणि वर्गाचे सदस्य—त्यावेळी मंडळीला वर्ग या नावाने ओळखण्यात येत असे—मंडळीतील काही लोकांचे अनुकरण करू लागले. एका सभेच्या वेळी मंडळीतील काही जन विशिष्ट वडिलांना पाठिंबा द्यावा म्हणून हात वर करण्यासाठी मागून आईला डिवचू लागले. परंतु त्यांनी योग्य उदाहरण मांडले नव्हते याची आईला पूर्ण कल्पना होती त्यामुळे आईने न घाबरता त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यावेळी म्हणजे १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक जन पडले आणि त्यांनी सत्याच्या मार्गावर जाण्याचे सोडले. (२ पेत्र २:२) परंतु संघटनेला एकनिष्ठपणे पाठिंबा देण्याचे आईने कधीही सोडले नाही, आणि अशा प्रकारे तिने माझ्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले.
सत्यासाठी माझी भूमिका
कालांतराने, जून १९३९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी मी सव्हर्न नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला. त्याच वर्षी ध्वनिसेवक म्हणून देखील मला नियुक्ती मिळाली. त्या दिवसांत आम्ही मोठ्या ट्रान्सक्रिप्शन मशिनचा उपयोग करत असू आणि सार्वजनिक ठिकाणी “धर्म पाश आणि गोंधळ” (इंग्रजी) हा संदेश या मशिनच्या साह्याने लोकांना ऐकवत असू. ख्रिस्ती धर्मजगताची दांभिकता आणि त्याच्या खोट्या शिकवणी उघड करण्यावर त्यावेळी जोर देण्यात आला होता.
एकदा मिरवणूक काढण्यात आली होती आणि हातात बॅनर घेऊन त्या मिरवणुकीत मी अग्रेसर होतो, त्या बॅनरच्या एका बाजूला “धर्म पाश आणि गोंधळ” आणि दुसऱ्या बाजूला “देवाची आणि ख्रिस्त राजाची सेवा करा,” (इंग्रजी) असा संदेश लिहिण्यात आला होता. त्याचप्रमाणे या मिरवणुकीत एक घोडा देखील होता, त्याच्या दोन्ही बाजूस जाहीर भाषणाचे मोठमोठे बॅनर लावून जाहीर भाषणाची जाहिरात करण्यात आली होती. ग्लॉसेस्टरच्या त्या धार्मिक शहरात त्या मिरवणुकीचे दृश्य किती भव्य होते!
घरी पैशाची चणचण असताना सुद्धा पायनियर होण्याचे आईने मला उत्तेजन दिले. अशा प्रकारे, सप्टेंबर १९३९ मध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीला वॉरविकशायरच्या छोट्याशा शहरात, लिमिंग्टनमध्ये मला पहिली पायनियर नियुक्ती मिळाली. हे शहर म्हणजे अनेक निवृत्त पाळकांचे घरच होते.
त्यावेळी आम्ही घरोघरच्या सेवाकार्यात हलक्या वजनाचे ग्रामोफोन वापरत असू, त्यावर आम्ही त्यावेळचे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे अध्यक्ष, जोसेफ एफ. रदरफोर्ड यांची भाषणे ऐकवत असू. परंतु, (मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांकरता उपयोगात आणता येईल असे) आमचे ट्रान्सक्रिप्शन मशिन फारच जड होते आणि त्यामुळे ते वाहून नेण्यासाठी आम्ही बाबागाडीचा उपयोग करत असू. खोट्या धर्माला उघड करणाऱ्या संदेशामुळे काहीवेळा पाळक रागावून आम्हाला त्यांच्या इलाक्यातून घालवून देत असत. परंतु आम्ही कधीही हार खाल्ली नाही. यहोवाने आमच्या कामावर आशीर्वाद पाठवला आणि आज लिमिंग्टनमध्ये एक मंडळी असून तीत शंभरपेक्षा अधिक साक्षीदार आहेत.
सन १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले, मी वॉल्स येथे राहण्यासाठी गेलो आणि याठिकाणी मी हॅवरफोर्डवेस्टच्या कारमार्थन आणि रेक्झॅम या शहरांत पायनियरींग करू लागलो. पूर्ण-वेळेचा सेवक असल्यामुळे लष्करी सेवेतून मला वगळण्यात आले, परंतु आमच्या तटस्थ भूमिकेची लोकांनी कदर केली नाही. अशा प्रकारे माझ्या सोबत्यावर आणि माझ्यावर हेर आणि देशद्रोही असल्याचा आरोप ठेवण्यात आला. एके रात्री पोलिसांनी आमच्या ट्रेलरला वेढा घातला. कोळसा चाळण्याचे काम माझा सोबती करत असे आणि तो नुकताच कामावरून आला होता; कोण आले आहे, हे पाहण्यासाठी त्याने बाहेर डोकावले. कोळशामुळे काळे झालेले त्याचे तोंड पाहून पोलिसांना वाटले, की तो कमांडो रेडच्या तयारीत आहे. आम्हाला ती परिस्थिती पोलिसांना समजावून सांगावी लागली!
आम्हाला आमच्या नेमणुकांमध्ये फार मोठा आशीर्वाद प्राप्त झाला होता. आम्ही एकदा कारमार्थन येथे होतो तेव्हा लंडनमधील शाखा दफ्तराचे जॉन बार (आता नियमन मंडळाचे सदस्य आहेत) यांनी आम्हाला एक उत्तेजनात्मक भेट दिली. त्यावेळी कारमार्थनमध्ये केवळ दोघे जन प्रचारक होते; आता तेथे शंभरपेक्षा अधिक प्रचारक आहेत. रेक्झॅम येथे आता तीन मंडळ्या आहेत आणि अलीकडे मला हॅवरफोर्डवेस्टमध्ये राज्य सभागृहाचे समर्पण करण्याचा सुहक्क प्राप्त झाला.—१ करिंथकर ३:६.
माझ्या सेवाकार्याप्रती कृतज्ञ
साऊथ वॉल्स येथील स्वानसीमध्ये आम्ही होतो तेव्हा माझा सोबती डॉन रेनडेल याला लष्करातून मात्र सूट मिळाली नाही. आपण दुसऱ्या देशांतील सहख्रिश्चनांच्या विरोधात युद्धामध्ये बुद्धिपुरस्सर भरती होणार नाही, असे सांगितल्यानंतरही त्याला तुरुंगात डांबण्यात आले. (यशया २:२-४; योहान १३:३४, ३५) त्याला उत्तेजन देण्यासाठी तसेच आसपासच्या लोकांना साक्ष देण्यासाठी मी ट्रान्सक्रिप्शन मशिन हाकेच्या अंतरावर ठेवले आणि त्यावरून बायबल भाषणे ऐकवली.
तथापि, स्थानिक स्त्रियांना हे आवडले नाही आणि माझ्या सोबत्याला आणि मला सैनिकांनी चोप द्यावा म्हणून त्यांनी सैनिकांना देण्यासाठी पैसे गोळा केले. त्यावेळी आम्ही जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला—त्याचवेळी मी ट्रान्सक्रिप्शन मशिन बाबागाडीवर टाकून ती ढकलत होतो—संरक्षणासाठी राज्य सभागृहाचा शोध घेत होतो. परंतु आम्ही तेथे पोहंचलो तेव्हा ते बंद होते! त्यावेळी वेळेवर पोलिस आले आणि त्यांनी मध्यस्थी केली म्हणून आम्ही जबर मारहाणीतून बचावलो.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्वानसीजवळील देशात मी जेव्हा काही काळानंतर प्रचार करत होतो तेव्हा एका इसमाने मान्य करून मला असे म्हटले: “स्वानसीमधील एका युवकाने त्याच्या विश्वासाची धैर्याने घोषणा केली आणि त्यामुळे त्याला संरक्षणासाठी पळ काढावा लागला आणि तुम्ही ख्रिस्ती विश्वासाप्रती घेत असलेली भूमिका अगदी त्याप्रमाणेच आहे.” तो युवक मीच होतो हे त्याला कळल्यानंतर तो अगदी मंत्रमुग्ध झाला होता!
त्या युद्धकाळात पायनियरींग करणे इतके सोपे नव्हते. आमच्याकडे जगातील सर्व सुखसोयी नव्हत्या, परंतु जे काही आमच्याकडे होते त्याची आम्ही कदर बाळगली आणि आम्ही त्यात समाधानी होतो. आम्हाला आध्यात्मिक अन्नाचा नियमित पुरवठा मिळत होता आणि आजारपण या एका कारणाशिवाय आम्ही कधीही सभा चुकविल्या नाहीत. मी एक जुनी सायकल खरेदी केली आणि ग्रामोफोन आणि बायबल साहित्य वाहून नेण्यासाठी आमच्याकडे मोठ्या आकाराच्या बास्केट होत्या. काहीवेळी मी सायकलवरून एका दिवशी ८० किलोमीटरचा प्रवास करत असे! मी साधारण सात वर्षे पायनियर कार्य केले आणि त्या दिवसांतील गोड आठवणी अद्यापही माझ्या मनात ताज्या आहेत.
सन १९४६ मध्ये दुसरे महायुद्ध शांत झाले होते आणि मला बेथेलमध्ये काम करण्यासाठी बोलावण्यात आले, त्या त्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रमुख सुविधांना बेथेल या नावाने ओळखण्यात येते. लंडन टॅबरनॅकलच्या जवळ असणाऱ्या ३४ क्रॉवन टेरस याठिकाणी आमचे बेथेल त्यावेळी वसलेले होते. तेथील वडीलधाऱ्या मंडळीच्या संगतीचा मी आनंद घेतला, जसे ॲलिस हार्टचे वडील, टॉम हार्ट, असे मानण्यात येते, की ते इंग्लंडमधील सर्वात पहिले साक्षीदार आहेत.
विश्वासू सोबती मिळणे
इटीशी लग्न करण्यासाठी मी सन १९५६ मध्ये बेथेल सोडले, ती पायनियर होती, लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीला भेटण्यासाठी नेदरलंडमधून ती आली तेव्हा तिची आणि माझी ओळख झाली होती. दुसरे महायुद्ध संपण्याच्या बेतात असताना इटी दक्षिणीय नेदरलंडमधील टिलबुर्गमधील व्यापारी कॉलेजमध्ये टायपिंग आणि शॉर्टहँड शिकवत असे. एके दिवशी तिच्यासोबत काम करणाऱ्या एका शिक्षकाने तिला घरी सुरक्षित पोहंचता यावे म्हणून तिला घरापर्यंत सोबत दिली. तो शिक्षक रोमन कॅथलिक होता. ते दोघेही घरी पोहंचले तेव्हा इटीच्या प्रॉटेस्टंट पालकांसोबत चर्चा सुरू झाली. मैत्रीचे धागेदोरे जुळले आणि या शिक्षकाचे तिच्या घरी येणे-जाणे वाढले.
युद्ध संपल्यानंतर काही काळाने हा शिक्षक इटीच्या घरी आला आणि अक्षरशः ओरडला, “मला सत्य सापडलंय!”
“तू रोमन कॅथलिक होता तेव्हाच तुझ्याकडे सत्य होतं असं मी समजत होतो!” इटीच्या वडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
“नाही!” त्याने अगदी उद्दीपित होऊन म्हटले. “सत्य तर यहोवाच्या साक्षीदारांकडे आहे!”
त्या आणि त्यानंतर अनेक वेळा संध्याकाळी व्यासंगपूर्ण चर्चा झाल्या. काही काळानंतर इटी पायनियर झाली. तिच्या सेवाकार्यात तिलाही कडा विरोध सहन करावा लागला आणि नेदरलंडमध्ये तिला करण्यात आलेला हा विरोध रोमन कॅथलिक चर्चकडून होता. घरोघरी प्रचारकार्यासाठी ती जात असताना तिच्या कार्यात विघ्न आणण्यासाठी पाळकांनी मुलांना चेतवले होते आणि एकदा तर त्या मुलांनी तिच्या सायकलची मोडतोड देखील केली. तिने आपली सायकल, दुरूस्ती करणाऱ्याकडे नेली; या इसमाने आधी तिच्याकडून एक पुस्तिका घेतली होती. “पहा ना या मुलांनी माझ्या सायकलची काय दशा केली ते!” ती रडकुंडीला येऊन म्हणाली.
“पण, तू अशी हार मानू नको,” तो मनुष्य प्रेमळपणे म्हणाला. “तू एक चांगले काम करत आहेस. मी तुझी सायकल फुकट दुरूस्त करून देईन.” आणि त्याने केली सुद्धा.
इटीने लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू केला तोपर्यंत त्या लोकांच्या पाळकांना त्यांच्यामध्ये थोडी देखील आस्था नव्हती. परंतु आता मात्र पाळक आणि नन्स यांनी लोकांचा बायबल आणि यहोवावरील विश्वास कमजोर करण्याचा जणू चंग बांधला होता. तरीसुद्धा इटीकडे अनेक फलदायक बायबल अभ्यास होते.
आमच्या एकत्रित जीवनाप्रती कृतज्ञ
लग्न झाल्यानंतर इटीला आणि मला इंग्लंडमध्ये प्रवासी कार्यासाठी नियुक्त करण्यात आले आणि मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्यासाठी आम्ही जवळजवळ पाच वर्षे त्यांना भेटी देत होतो. त्यानंतर मला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात होणाऱ्या ३६ व्या गिलियड वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले. हा दहा महिन्यांचा कोर्स नोव्हेंबर १९६१ मध्ये पूर्ण झाला; हा कोर्स विशेषतः यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातील काम पार पाडण्याकरता लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मी तेथे गेलो होतो तेव्हा इटी इंग्लंडमधील लंडन बेथेलमध्ये राहिली. माझ्या पदवीदानानंतर आम्हा दोघांना तेथे नियुक्त करण्यात आले.
पुढील १६ वर्षे मी सर्व्हिस डेस्कमध्ये काम केले, याठिकाणी मंडळीच्या कार्यांच्या संबंधित बाबी हाताळल्या जात असत. सन १९७८ मध्ये बेथेल गृह पर्यवेक्षक, प्राइस हिऑज यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर माझी नेमणूक करण्यात आली. आमच्या वाढत्या बेथेल सदस्यांची—आता आमच्या कुटुंबात २६० पेक्षा अधिक सदस्य आहेत—काळजी घेण्याची नेमणूक या अनेक वर्षांच्या काळात प्रतिफलदायक राहिली आहे.
सन १९७१ मध्ये माझ्या प्रिय आईचा वयाच्या ८५ व्या वर्षी मृत्यू झाला. इटी आणि मी आईच्या अंत्यसंस्कारासाठी ग्लॉसेस्टरला परतलो, तेथे एका बांधवाने आईला असलेल्या स्वर्गीय आशेची चांगल्या प्रकारे चर्चा केली. (फिलिप्पैकर ३:१४) डॉरिस आणि ग्रेस या माझ्या बहिणींनी आईच्या उतारवयात जी प्रेमळ काळजी घेतली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे कारण त्यामुळे इटीला आणि मला पूर्ण वेळेचे सेवाकार्य अखंडपणे करता आले.
आमच्या पालकांनी आम्हाला प्रेमळपणे आणि तरीही दृढ राहून कशाप्रकारे लहानाचे मोठे केले याविषयी इटी आणि मी नेहमी विचार करतो. आम्हाला त्यांच्या उपकाराची परतफेड करणे निव्वळ अशक्य आहे! माझ्या आईने विशेषतः माझ्याकरता आणि माझ्या बहिणींकरता एक उत्तम उदाहरण मांडले, तिने यहोवाप्रती आणि त्याच्या संघटनेप्रती आमची कृतज्ञता वाढवली.
खरोखरच, आपला स्वर्गीय पिता, यहोवा याच्या सेवेतील प्रत्येक नवीन दिवसाचा आम्ही विचार करतो तेव्हा आमचे हृदय कृतज्ञतेने अगदी भरून येते. तो किती वैभवी, प्रेमळ पिता आहे! बायबल स्तोत्रकर्त्याने आमचे विचार त्याच्या शब्दांत मांडले: “हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.”—स्तोत्र १४५:१, २.
[२६ पानांवरील चित्र]
माझी पत्नी, इटी हिच्यासोबत