वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१ पृ. १९-२४
  • यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आठवण करण्याचा स्नेहपूर्ण आर्जव
  • थट्टेखोरांच्या वासना
  • हेतूपुरस्सर आणि निंद्य
  • देवाचा शब्द भरवशालायक आहे
  • अंत येण्यासाठी उत्सुकता
  • यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याची गरज
  • काय नाहीसे होईल?
  • तुमच्या आशेवर नजर खिळवून ठेवा
  • तातडीची जाणीव आणि नैतिक निष्कलंकता कायम राखणे
  • आपल्या मोलवान विश्‍वासाला धरून राहू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • धीराने वाट पाहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • थट्टेखोरांपासून सावध!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१ पृ. १९-२४

यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा

‘शेवटल्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील.’—२ पेत्र ३:३.

१. आधुनिक काळातील एका ख्रिश्‍चनाच्या मनात कशाप्रकारची तातडीची जाणीव होती?

पूर्ण वेळेच्या सेवेत आता ६६ पेक्षा अधिक वर्षे होत आलेल्या एका बांधवाने असे लिहिले: “आजपर्यंत माझ्या मनात तातडीची एक तीव्र भावना सतत राहिली आहे. हर्मगिदोनाचा विचार केला की मला नेहमी तो जणू उद्यापरवाच येणार असल्यासारखा वाटतो. (प्रकटीकरण १६:१४, १६) माझे वडील आणि आजोबा या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील नेहमी प्रेषित पेत्राने प्रोत्साहन दिल्याप्रमाणेच जीवन घालवले आहे, अर्थात ‘यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत.’ देवाचे वचनयुक्‍त नवे जग ‘न दिसणारे’ असले तरी माझ्या नजरेत ते नेहमी वास्तविक राहिले आहे.”—२ पेत्र ३:११, १२; इब्री लोकांस ११:१; यशया ११:६-९; प्रकटीकरण २१:३, ४.

२. यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहण्याचा काय अर्थ आहे?

२ यहोवाच्या दिवसासंबंधाने पेत्राने “त्याची सतत अपेक्षा करीत राहा” असे जे म्हटले त्याचा असा अर्थ होतो की आपण आपल्या मनात तो लांबणीवर टाकू नये. देवाचे वचनयुक्‍त नवे जग स्थापन करण्यापूर्वी यहोवा देव या व्यवस्थीकरणाचा नाश करील तो दिवस फार जवळ आला आहे. आपल्यासाठी तो इतका वास्तविक असला पाहिजे, जणू काही आपण त्याला स्पष्टपणे पाहात आहोत. प्राचीन काळातील संदेष्ट्यांनी या दिवसाला इतकेच वास्तविक मानले होते आणि तो जवळ आहे असे त्यांनी अनेकवेळा म्हटले.—यशया १३:६; योएल १:१५; २:१; ओबद्या १५; सफन्या १:७, १४.

३. यहोवाच्या दिवसासंबंधी मार्गदर्शन देण्यामागे पेत्राजवळ कोणते कारण होते?

३ पेत्राने आपल्याला, यहोवाचा दिवस जणू “परवाच” येणार अशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याचे प्रोत्साहन का दिले? कारण दुष्टांचा नाश होईल त्या काळाची अर्थात अभिवचनाप्रमाणे ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या समजुतीची, काही लोक थट्टा करू लागले होते. (२ पेत्र ३:३, ४) म्हणूनच आपल्या दुसऱ्‍या पत्राच्या ३ ऱ्‍या अध्यायात पेत्र या थट्टेखोरांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतो; याचा विचार आता आपण करणार आहोत.

आठवण करण्याचा स्नेहपूर्ण आर्जव

४. आपण कशाची आठवण ठेवावी अशी पेत्राची इच्छा आहे?

४ या अध्यायात पेत्राने बांधवांना वारंवार “प्रियजनहो” असे संबोधल्याचे वाचताना, त्याला आपल्या बांधवांसाठी किती जिव्हाळा होता हे लक्षात येते. त्यांना शिकवण्यात आलेल्या गोष्टी त्यांनी विसरू नयेत म्हणून त्यांना स्नेहपूर्ण आर्जव करून, पेत्र अशी सुरवात करतो: “प्रियजनहो, . . . मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे; ह्‍यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभु तारणारा ह्‍याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.”—२ पेत्र ३:१, २, ८, १४, १७; यहूदा १७.

५. काही संदेष्ट्यांनी यहोवाच्या दिवसाविषयी काय म्हटले?

५ पेत्र ज्या “पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची” आठवण करण्यास आपल्या वाचकांना प्रोत्साहन देतो, ती वचने कोणती आहेत? अर्थात, राज्य सामर्थ्य हाती घेतलेल्या ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयीची आणि अधार्मिकांच्या न्यायाविषयीची वचने. पेत्राने याआधी या वचनांकडे लक्ष वेधले होते. (२ पेत्र १:१६-१९; २:३-१०) दुष्कृत्ये करणाऱ्‍यांवर देवाच्या प्रतिकूल न्यायदंडाविषयी इशारा देणारा पहिला अभिलिखित संदेष्टा म्हणून यहूदा हनोखाचा उल्लेख करतो. (यहूदा १४, १५) हनोखानंतर इतर संदेष्टेही आले आणि त्यांनी लिहिलेले संदेश आपण विसरू नयेत अशी पेत्राची इच्छा आहे.—यशया ६६:१५, १६; सफन्या १:१५-१८; जखऱ्‍या १४:६-९.

६. ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांच्या कोणत्या वचनांतून आपल्याला यहोवाच्या दिवसाबद्दल ज्ञानबोध होतो?

६ याखेरीज, पेत्र आपल्या वाचकांना “प्रभु तारणारा ह्‍याने . . . दिलेल्या आज्ञेची” देखील आठवण ठेवण्याविषयी सांगतो. येशूच्या आज्ञेत हा आग्रही उपदेश देखील येतो: “तुम्ही संभाळा, नाहीतर . . . तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.” “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.” (लूक २१:३४-३६; मार्क १३:३३) पेत्र आपल्याला प्रेषितांच्या वचनांकडेही लक्ष देण्याचे प्रोत्साहन देतो. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लिहिले: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. ह्‍यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.”—१ थेस्सलनीकाकर ५:२, ६.

थट्टेखोरांच्या वासना

७, ८. (अ) देवाच्या इशारेवजा संदेशांची थट्टा करणारी कशाप्रकारची माणसे आहेत? (ब) थट्टेखोरांचा काय दावा आहे?

७ यापूर्वी सांगितल्यानुसार, पेत्राच्या या उपदेशामागचे कारण असे आहे की प्राचीन काळी जशी इस्राएली लोकांनी यहोवाच्या संदेष्ट्यांची थट्टा केली होती तशीच काहीजण दिलेल्या इशाऱ्‍यांची थट्टा करू लागले होते. (२ इतिहास ३६:१६) पेत्र स्पष्टीकरण देतो: ‘प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येतील.’ (२ पेत्र ३:३) यहूदा सांगतो की या थट्टेखोरांच्या वासना “अभक्‍तीच्या” आहेत. तो त्यांना “देहबुद्धीचे, आध्यात्मिकता नसलेले” असे म्हणतो.—यहूदा १७-१९, NW.

८ पेत्राने ज्यांच्याविषयी “अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे” असे म्हटले तेच खोटे शिक्षक कदाचित आध्यात्मिकता नसलेल्या या थट्टेखोरांपैकी असावेत. (२ पेत्र २:१, १०, १४) विश्‍वासू ख्रिश्‍चनांना ते कुचेष्टेने विचारतात: “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”—२ पेत्र ३:४.

९. (अ) थट्टेखोर लोक देवाच्या सबंध वचनात आढळणारी तातडीची जाणीव क्षीण का करू पाहतात? (ब) यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहणे आपल्याकरता संरक्षक कसे ठरू शकते?

९ पण ही थट्टा का म्हणून? ख्रिस्ताची उपस्थिती कधीच होणार नाही, देवाने आजवर कधी मानवाच्या कारभारांत हस्तक्षेप केलेला नाही आणि यापुढेही तो असे करणार नाही असे सुचवण्यामागे काय कारण असेल? ते कारण असे की, देवाच्या सबंध वचनात आढळणारी तातडीची जाणीव क्षीण करण्याद्वारे हे देहबुद्धीचे थट्टेखोर इतरांना आध्यात्मिकरित्या अक्रियाशील बनवून जणू झोपी घालतात आणि अशारितीने त्यांना स्वार्थी हेतूंसाठी मोहपाशात अडकवतात. आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यासाठी हे आपल्याला केवढे प्रेरणात्मक प्रोत्साहन आहे! आपण यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहावी आणि त्याचे आपल्याकडे लक्ष आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे! असे केल्यास आपल्याला यहोवाची आवेशाने सेवा करण्याची आणि आपली नैतिक निष्कलंकता कायम राखण्याची प्रेरणा प्राप्त होईल.—स्तोत्र ११:४; यशया २९:१५; यहेज्केल ८:१२; १२:२७; सफन्या १:१२.

हेतूपुरस्सर आणि निंद्य

१०. पेत्र या थट्टेखोरांचे म्हणणे कसे खोडून काढतो?

१० अशाप्रकारचे थट्टेखोर एका अतिमहत्त्वपूर्ण घटनेकडे डोळेझाक करतात. ते मुद्दामहून त्याकडे डोळेझाक करतात आणि इतरांनाही याचा विसर पडावा म्हणून प्रयत्न करतात. का? लोकांना मोहपाशात अडकवणे अधिक सोपे जावे म्हणून. पेत्र लिहितो की, “हे तर ते जाणून बुजून विसरतात.” काय विसरतात? “की, देवाच्या शब्दाने आकाश पूर्वीच होते, आणि पृथ्वी पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या आत बरोबर व्यवस्थित केलेली अशी होती. त्यांच्या योगे तेव्हाचे जग पाण्याने बुडवले जाऊन नाश पावले.” (तिरपे वळण आमचे.) (२ पेत्र ३:५, ६, पं.र.भा.) होय, यहोवाने नोहाच्या काळात जलप्रलय आणून पृथ्वीवरील दुष्टपणा खतम केला होता, या वस्तुस्थितीवर येशूने देखील जोर दिला. (मत्तय २४:३७-३९; लूक १७:२६, २७; २ पेत्र २:५) यामुळे, थट्टेखोरांनी काहीही म्हटले तरीसुद्धा, “सर्व कांही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे,” हे खरे नाही.

११. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या अशा कोणत्या अकालिक अपेक्षा होत्या ज्यांमुळे काहींनी त्यांची थट्टा केली?

११ थट्टेखोरांनी नक्कीच विश्‍वासू ख्रिश्‍चनांचीही टर उडवली असेल कारण यांच्या अपेक्षा अद्यापही पूर्ण झालेल्या नव्हत्या. येशूच्या मृत्यूच्या थोड्याच काळाआधी, त्याच्या शिष्यांना “देवाचे राज्य एव्हांच प्रगट होणार आहे असे . . . वाटत होते.” मग, त्याच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी राज्य आताच स्थापन होणार किंवा कसे याविषयी विचारणा केली होती. तसेच, पेत्राने दुसरे पत्र लिहिण्याच्या सुमारे दहा वर्षांपूर्वी, कदाचित पौल किंवा त्यांच्या सोबत्यांकडून, ‘प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणारा’ “तोंडी संदेश” किंवा ‘पत्र’ मिळाल्यामुळे काहीजण ‘अस्वस्थ’ होते. (लूक १९:११; २ थेस्सलनीकाकर २:२, NW; प्रेषितांची कृत्ये १:६) तथापि, येशूच्या शिष्यांच्या या अपेक्षा निराधार नव्हत्या, केवळ अकालिक होत्या. यहोवाचा दिवस निश्‍चित येणार होता!

देवाचा शब्द भरवशालायक आहे

१२. ‘यहोवाच्या दिवसासंबंधाने’ केलेल्या भविष्यवादांच्या बाबतीत देवाचा शब्द कशाप्रकारे भरवशालायक ठरला?

१२ यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त पूर्व संदेष्ट्यांनी बऱ्‍याचवेळा यहोवाचा सूड घेण्याचा दिवस जवळ आल्याचा इशारा दिला होता. सा.यु.पू. ६०७ साली यहोवाने आपल्या स्वैराचारी लोकांवर सूड उगवला तेव्हा छोट्या प्रमाणावर ‘यहोवाचा दिवस’ आला होता. (सफन्या १:१४-१८) नंतर, बॅबिलोन व ईजिप्तसहित इतर राष्ट्रांना देखील अशाप्रकारच्या ‘यहोवाच्या दिवसाचा’ तडाखा बसला होता. (यशया १३:६-९; यिर्मया ४६:१-१०; ओबद्या १५) पहिल्या शतकातील यहुदी व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी देखील पूर्वभाकीत करण्यात आले होते आणि सा.यु. ७० मध्ये रोमी सैन्यांनी यहुदियाचा विनाश केला तेव्हा हे पूर्ण झाले. (लूक १९:४१-४४ १ पेत्र ४:७) पण, पेत्र भविष्यातील ‘यहोवाच्या दिवसाकडे’ लक्ष वेधतो; या दिवसाचे परिमाण इतके मोठे असेल की त्यापुढे जगव्याप्त जलप्रलय देखील फिका पडेल!

१३. कोणत्या ऐतिहासिक उदाहरणांवरून या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी खात्री पटते?

१३ त्या येऊ घातलेल्या विनाशाचे वर्णन करण्यापूर्वी पेत्र असे म्हणतो की तो “त्याच शब्दाने” घडून येईल. नुकतेच पेत्राने म्हटले होते की प्रलयापूर्वीची पृथ्वी, “देवाच्या शब्दाने . . . पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या आत” (पं.र.भा.) होती. बायबलमधील निर्मितीच्या वृत्तान्तात वर्णन केलेल्या पृथ्वीच्या या स्थितीमुळे, देवाने निर्देशन दिले तेव्हा, अर्थात त्याच्या शब्दाने, खाली पृथ्वीवर पाण्याचा वर्षाव झाला आणि अशाप्रकारे जलप्रलय आला. पेत्र पुढे म्हणतो: “आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.” (२ पेत्र ३:५-७; उत्पत्ति १:६-८) यहोवाने आपल्याला भरवशालायक शब्द दिला आहे! तो त्याच्या भयंकर दिवशी आपल्या जळजळत्या क्रोधाग्नीने “आकाश व पृथ्वी,” यांचा अर्थात, या व्यवस्थीकरणाचा नाश करील! (सफन्या ३:८) पण केव्हा?

अंत येण्यासाठी उत्सुकता

१४. आपण आता ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत याविषयी खात्री का बाळगू शकतो?

१४ येशूच्या शिष्यांना अंत केव्हा येईल हे जाणून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी त्याला विचारले: “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” अर्थात, त्यांना यहुदी व्यवस्थेचा अंत केव्हा होणार हे जाणून घ्यायचे होते, पण येशूचे उत्तर मात्र मुख्यतः याविषयी होते की सध्याचे “आकाश व पृथ्वी” केव्हा नाश होतील. येशूने मोठी युद्धे, अन्‍न टंचाई, भूमिकंप, रोगराई आणि गुन्हेगारी यांविषयी भाकीत केले. (मत्तय २४:३-१४; लूक २१:५-३६) येशूने “युगाच्या समाप्तीचे” जे चिन्ह दिले होते, तसेच ‘शेवटल्या काळाची’ ओळख करून देणाऱ्‍या ज्या गोष्टी पौलाने सांगितल्या होत्या, त्या आपण १९१४ सालापासून पूर्ण होत असताना पाहिल्या आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) खरोखर, आपण या व्यवस्थीकरणाचा शेवट येण्याच्या काळात जगत आहोत हे दाखवणारा पुरावा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे!

१५. येशूने बजावले होते तरीसुद्धा ख्रिश्‍चनांचा काय करण्याकडे कल राहिला आहे?

१५ यहोवाचा दिवस केव्हा येईल हे जाणून घेण्याची यहोवाच्या साक्षीदारांना आधीपासून उत्कंठा होती. या उत्सुकतेमुळे त्यांनी काहीवेळा हा दिवस केव्हा येईल यासंबंधाने अंदाज बांधण्याचे प्रयत्न केले. पण असे केल्यामुळे, येशूच्या सुरवातीच्या शिष्यांप्रमाणेच ते देखील, ‘तो समय केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही,’ या आपल्या धन्याच्या बजावणीकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले आहेत. (मार्क १३:३२, ३३) थट्टेखोरांनी विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या अकालिक अपेक्षांबद्दल त्यांची टर उडवली आहे. (२ पेत्र ३:३, ४) तरीसुद्धा, यहोवाचा दिवस त्याच्या वेळापत्रकानुसार, अवश्‍य येईल यास पेत्र दुजोरा देतो.

यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याची गरज

१६. कोणत्या सल्ल्याचे पालन करणे सुज्ञपणाचे ठरेल?

१६ वेळेसंबंधाने आपण यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्यास हवा, आता पेत्र आपल्याला आठवण करून देतो: “तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.” त्याच्या तुलनेत आपले ७० ते ८० वर्षांचे आयुष्य केवढे अल्प आहे! (२ पेत्र ३:८; स्तोत्र ९०:४, १०) यामुळे देवाची अभिवचने पूर्ण होण्यास उशीर लागत असल्याचे भासल्यास, आपण देवाच्या संदेष्ट्याचे मार्गदर्शन स्वीकारून चालावे: “[नेमलेल्या समयास] विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (तिरपे वळण आमचे.)—हबक्कूक २:३.

१७. शेवटला काळ काहीजणांच्या अपेक्षेपेक्षा जास्त लांबला असला तरीसुद्धा आपण कशाची खात्री बाळगू शकतो?

१७ हा शेवटला काळ अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त का आहे? यामागे एक चांगले कारण आहे, ज्याविषयी पेत्र पुढे खुलासा करतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चाताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) यहोवा, सर्व मानवांकरता काय हितावह आहे हे विचारात घेतो. त्याला लोकांच्या जीवनाची काळजी आहे, म्हणूनच तो म्हणतो: “कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे.” (यहेज्केल ३३:११) म्हणून आपण खात्री बाळगू शकतो की आपल्या बुद्धिसंपन्‍न, प्रेमळ निर्मात्याचा उद्देश पूर्णत्वास नेण्याची योग्य घटका जेव्हा येईल तेव्हाच अंत येईल!

काय नाहीसे होईल?

१८, १९. (अ) यहोवाने या व्यवस्थीकरणाचा नाश करण्याचे का ठरवले आहे? (ब) पेत्र या व्यवस्थीकरणाच्या शेवटाविषयी कसे वर्णन करतो आणि नेमका कशाचा नाश होईल?

१८ यहोवाचे, त्याची सेवा करणाऱ्‍यांवर खरोखर प्रेम असल्यामुळे, त्यांना दुःख देणाऱ्‍या सर्वांना तो नाहीसे करील. (स्तोत्र ३७:९-११, २९) पौलाने याआधी सांगितल्यानुसार, पेत्र देखील लिहितो की नाश एका अनपेक्षित क्षणी येईल: ‘चोर येतो तसा यहोवाचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.’ (२ पेत्र ३:१०; १ थेस्सलनीकाकर ५:२) जलप्रलयाच्या वेळी अक्षरार्थ आकाश व पृथ्वी लयास गेली नाही, यहोवाचा दिवस येईल तेव्हा देखील असे घडणार नाही. तर मग, काय “नाहीसे होईल” किंवा, कशाचा नाश होईल?

१९ मानवजातीवर ‘आकाशासारखे,’ आजवर प्रभुत्व गाजवलेल्या मानवी सरकारांचा नाश होईल आणि भक्‍तिहीन मानवी समाज किंवा “पृथ्वी” देखील नाहीशी होईल. “मोठा नाद” या शब्दावरून, आकाश पाहता पाहता नाहीसे होईल असे कदाचित सूचित होत असावे. आजच्या अवनत मानवी समाजातील घटक अर्थात “सृष्टितत्त्वे” नाश होतील, म्हणजेच “लयास जातील.” आणि “पृथ्वी” तसेच, “तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” नाशास पात्र असलेल्या या सबंध जागतिक व्यवस्थीकरणाचा नाश करून यहोवा मानवांच्या दृष्ट कृत्यांना पूर्णपणे उजेडात आणील.

तुमच्या आशेवर नजर खिळवून ठेवा

२०. भविष्यात होऊ घातलेल्या घटनांविषयी ज्ञान मिळाल्यामुळे आपल्या जीवनावर याचा कसा परिणाम झाला पाहिजे?

२० या अनन्यसाधारण घटना लवकरच घडणार असल्यामुळे, पेत्र म्हणतो की आपण, “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा [यहोवाचा] दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत [“त्याची सतत अपेक्षा करीत,” NW]” मग्न असले पाहिजे. याबद्दल शंका करण्याचे कारणच नाही! “आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.” (२ पेत्र ३:११, १२) या अनन्यसाधारण घटना उद्यादेखील सुरू होऊ शकतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता याचा आपल्या प्रत्येक कृतीवर आणि योजनेवर परिणाम व्हायला हवा.

२१. सध्याच्या आकाश व पृथ्वीची जागा कशाने घेतली जाईल?

२१ जुन्या व्यवस्थीकरणाची जागा कशाने घेतली जाईल याविषयी पेत्र आता आपल्याला सांगतो: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७) केवढी मोठी सुटका! ख्रिस्त आणि त्याचे १,४४,००० सहशासक मिळून एक “नवे” शासकीय “आकाश” घडवतील, आणि या जगाच्या नाशातून बचावणाऱ्‍या लोकांनी मिळून “नवी पृथ्वी” बनेल.—१ योहान २:१७; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३.

तातडीची जाणीव आणि नैतिक निष्कलंकता कायम राखणे

२२. (अ) कोणताही आध्यात्मिक कलंक किंवा दोष लागण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला कशाची मदत मिळेल? (ब) पेत्र कोणत्या धोक्याविषयी इशारा देतो?

२२ पेत्र पुढे म्हणतो, “म्हणून प्रियजनहो, ह्‍या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.” उत्सुकतेने प्रतीक्षा करीत राहिल्याने आणि यहोवाचा दिवस येण्यास उशीर होत आहे असे कधी भासल्यास ही प्रभूची सहनशीलता आहे या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिल्याने कोणताही आध्यात्मिक कलंक किंवा दोष येण्यापासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करण्यास मदत मिळेल. तरीसुद्धा, एक धोका आहे! पेत्र इशारा देतो की, “आपला प्रिय बंधु पौल” याच्या लिखाणांत “समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करितात तसा ह्‍यांचाहि करितात; अशाने ते स्वतःच्या नाशालाच कारणीभूत होतात.”—२ पेत्र ३:१४-१६.

२३. पेत्र कोणता निरोपाचा सल्ला देतो?

२३ खोट्या शिक्षकांनी देवाच्या अपात्री कृपेविषयी पौलाच्या लिखाणांचा विपरीत अर्थ लावला आणि कामातुरपणासाठी त्यांचा दुरुपयोग केला. कदाचित हेच मनात ठेवून पेत्राने हा निरोपाचा सल्ला दिला असावा: “तर प्रियजनहो, ह्‍या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान्‌ लोकांच्या भ्रांतिप्रवाहांत सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्‍यासाठी जपून राहा.” मग आपले पत्र संपवीत, तो प्रोत्साहन देतो: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्‍याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा.”—२ पेत्र ३:१७, १८.

२४. यहोवाच्या सर्व सेवकांनी कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे?

२४ स्पष्टपणे, पेत्राला आपल्या बांधवांना बळ द्यायचे आहे. सुरवातीला उल्लेखलेल्या ८२ वर्षीय साक्षीदाराचीच मनोवृत्ती सर्वांनी बाळगावी अशी त्याची इच्छा आहे, हा साक्षीदार म्हणतो: “मी . . . प्रेषिताने प्रोत्साहन दिल्याप्रमाणेच, अर्थात ‘यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत’ जीवन घालवले आहे. देवाचे वचनयुक्‍त नवे जग ‘न दिसणारे’ असले तरी माझ्या नजरेत ते नेहमी वास्तविक राहिले आहे.” आपण सर्वांनी देखील अशाच प्रकारे आपले जीवन व्यतीत करावे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवाच्या दिवसाची ‘सतत अपेक्षा करीत राहण्याचा’ काय अर्थ होतो?

◻ थट्टेखोर कशाकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करतात आणि का?

◻ थट्टेखोरांनी कोणत्या कारणाने विश्‍वासू ख्रिश्‍चनांची टर उडवली आहे?

◻ आपण कोणता दृष्टिकोन कायम राखला पाहिजे?

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाचा दिवस  . . .

[२४ पानांवरील चित्र]

. . . आणि त्यानंतर येणाऱ्‍या नव्या जगाची सतत अपेक्षा करीत राहा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा