राज्य घोषकांचा वृत्तान्त
देवाच्या वचनाची शुद्धीकरण शक्ती
असा अहवाल दिला जातो, की मादक पदार्थांचे अनेक व्यसनी सुधार केंद्रांतून सुटल्यानंतर पुन्हा व्यसनाधीन होतात. परंतु देवाचे वचन असे काही साध्य करू शकते जे प्रत्येक वेळी क्लिनिकला साध्य करता येत नाही. (इब्री लोकांस ४:१२) देवाच्या वचनाद्वारे आणि त्याच्या आत्म्याद्वारे मादक पदार्थांच्या व्यसनसक्तीपासून मुक्त होण्यास आणि पुढील सल्ला लागू करण्यास अनेकांना मदत झाली आहे: “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.”—२ करिंथकर ७:१.
म्यानमारमधील अनुभवावरून याची आपल्याला प्रचिती येते. हा असा इसम होता जो मादक पदार्थांची सवय सोडण्यासाठी कित्येक वर्षे झगडत होता, तो म्हणतो: “कोवळ्या वयातच मला मादक पदार्थांचं व्यसन लागलं. कित्येक वेळा ही सवय सोडण्याचा मी प्रयत्न केला पण मी सोडू शकलो नाही. मादक पदार्थांची लागलेली तलब भागविण्यासाठी मी चोऱ्या करू लागलो. आणि याचा परिणाम म्हणून मला सन १९८८ मध्ये संपूर्ण एक वर्ष बिन भाड्याच्या घरात घालवावं लागलं.
“तुरुंगातून सुटल्यानंतर मी परत एकदा माझ्या जुन्या मित्रांच्या सहवासात आलो. आणि त्यानंतर लगेचच मी पुन्हा एकवार मादक पदार्थांच्या आहारी गेलो. या आत्म-घातक सवयीमुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवण्यास नकार दिला. याशिवाय, माझ्या बंडखोर स्वभावामुळे समाजातील इतर लोकांच्या मनांत देखील माझ्याविषयी दहशत निर्माण झाली आणि ते सुद्धा माझ्यापासून फटकून राहू लागले.
“मग एके दिवशी जे घडायचे होते ते घडलेच—मादक पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे मी अस्वस्थ झालो. मला यावेळी तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगातील जीवन फार हालअपेष्टेचे होते; पण तेथे माझा कसातरी निभाव लागला.
“तुरुंगातून घरी परतल्यानंतर मागील चुकांबद्दल मी माझ्या घरातल्या लोकांची क्षमा मागितली. त्यांनी माझा मोठ्या आनंदाने स्वीकार केला, पण माझ्या मित्रांनी पुन्हा पूर्वीच्या मार्गांवर जाण्यास चेतविले.
“अखेरीस, मला एका विशिष्ट बायबल प्रशालेत उपस्थित राहता यावं म्हणून माझ्या आजीने एका स्थानिक पाळकाला विनंती केली. पाळकही त्यास राजी झाला. तथापि, तेथे जाण्यापूर्वीच यहोवाची साक्षीदार असलेल्या माझ्या आत्याने मला म्हटले, की मला जर खरोखरच बायबलविषयी जाणून घ्यायचं असेल तर मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करावा.
“मी राज्य सभागृहात गेलो तेव्हा माझी ओळख एका व्यक्तीसोबत करून दिल्यानंतर सदर व्यक्तीने माझ्यासोबत बायबल अभ्यास घेण्याचे मान्य केले. तेथे उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांनी मला विनम्र अभिवादन करून माझं स्वागत केलं.
“बायबलचा अभ्यास सुरू केल्यानंतर आणि ख्रिस्ती सभांना हजर राहू लागल्यानंतर मादक पदार्थांप्रती असलेली माझी लालसा नाहीशी होऊन देवाविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा माझ्यात निर्माण झाली. एका वर्षानंतर मी स्वतःचे जीवन यहोवा देवाला समर्पित करण्यापर्यंत प्रगती केली आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून मी अखेरीस पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.
“अलीकडे, घरोघरी जात असताना मादक पदार्थांच्या व्यसनाधीन असलेल्या एका जुन्या मित्राशी माझी भेट झाली. माझ्यामध्ये झालेले विलक्षण बदल त्याला समजले. यामुळे त्याला साक्ष देण्याची एक संधी मिळाली आणि मी त्याच्यासोबत राज्य आशेविषयी बोललो.
“जीवनाचा खरा उद्देश आणि खरा अर्थ अखेरीस मला सापडला आहे. देवाची मदत आणि त्याच्या वचनाद्वारे त्याने दिलेला सल्ला यांबद्दल मी त्याचा ऋणी आहे, आता मी मादक पदार्थांच्या नीतिभ्रष्ट व्यसनापासून इतरांना मुक्त करण्याच्या स्थितीत आहे.”