वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. ८-११
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग एक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग एक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलची नक्कल आणि भाषांतराचे सुरवातीचे काम
  • ख्रिस्ती पुस्तकाचे पहिले प्रकाशक
  • लॅटिन आणि स्लॅव्हॉनिक बायबल
  • हिब्रू बायबलचे जतन
  • बायबल भाषांतराला कडवा विरोध
  • भाग ३ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • कालक्रम
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • भाग २ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. ८-११

बायबल आपल्या हातात कसे आले—भाग एक

भाग २ आणि ३ अनुक्रमे सप्टेंबर १५ आणि ऑक्टोबर १५ च्या अंकांत प्रकाशित होतील.

एका लहानशा मुद्रणालयात, एक मुद्रक आणि त्याची काही अप्रेंटिस मुलं त्यांच्या लाकडी मुद्रणयंत्रावर काम करताहेत, मोठ्या काळजीपूर्वक ते कोऱ्‍या कागदांचे ताव टाईप फेसवर ठेवतात. तयार कागदं काढल्यावर ते मुद्रित मजकूर तपासतात. एका भिंतीपासून दुसऱ्‍या भिंतीपर्यंत बांधलेल्या दोरांवर ते त्या कागदांचे ताव घडी करून सुकण्यासाठी लटकवतात. अचानक, जोरजोरात दार ठोठावण्याचा आवाज ऐकू येतो. घाबरलेला तो मुद्रक दार उघडतो, तोच सशस्त्र सैनिकांची एक टोळी जबरदस्तीने आत घुसते. ते सैनिक, सर्वाधिक दोषास पात्र ठरलेले बेकायदेशीर साहित्य शोधताहेत—अर्थात, सर्वसामान्य लोकांच्या भाषेतील बायबल!

पण खूप उशीर झालेला आहे. धोक्याची चाहूल लागताच, भाषांतरकार आणि त्याचा एक मदतनीस यांनी लगेच मुद्रणालयातली जमतील तितकी कागदं हातात घेऊन ऱ्‍हाईन नदीवाटे पळ काढला आहे. त्यांनी केलेले निदान काही काम तरी त्यांना वाचवता आले.

या घटनेतील भाषांतरकार म्हणजे विल्यम टिंडेल; ते जर्मनी येथील कोलोनमध्ये १५२५ साली कायद्याने बंदी घातलेला त्यांचा इंग्रजी “नवा करार” तयार करण्याची खटपट करीत असताना ही घटना घडली. त्यांचा अनुभव एकमात्र मुळीच नव्हता. बायबल लिहून पूर्ण झाल्यानंतरच्या सुमारे १,९०० वर्षांच्या सबंध कालावधीत, देवाच्या वचनाचे भाषांतर आणि वितरण करण्यासाठी कित्येक स्त्रीपुरुषांनी त्यांच्यापाशी होते नव्हते ते सर्वकाही पणास लावले. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे चांगले फळ आपण आजही उपभोगत आहोत. त्यांनी नेमके काय केले? आज आपल्या हातात असलेले बायबल आपल्यापर्यंत कसे आले?

बायबलची नक्कल आणि भाषांतराचे सुरवातीचे काम

देवाच्या खऱ्‍या सेवकांनी त्याच्या वचनाला नेहमीच परम आदर दिला आहे. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात कबूल केल्याप्रमाणे: “सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी त्यांच्या यहुदी वाडवडिलांप्रमाणे पवित्र पुस्तकांच्या वाचनाला अत्यंत महत्त्व दिले. येशूच्या पावलावर पाऊल ठेवून (मत्त ४.४; ५.१८; लूक २४.४४; योहा ५.३९), प्रेषितही जुन्या कराराशी अवगत झाले होते, अर्थात यासाठी त्यांना काळजीपूर्वक वाचन आणि अभ्यास करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागला असेल; शिवाय त्यांनी आपल्या शिष्यांनाही असे करण्याचा आग्रह केला. (रोम १५.४; २ तीम ३.१५-१७).”

यासाठी, बायबलच्या प्रतिकृती बनवणे आवश्‍यक होते. ख्रिस्ती धर्मस्थापनेच्या पूर्वीच्या काळात, यातील पुष्कळसे काम अतिशय वाकबगार ‘पारंगत शास्त्र्यांनी’ पार पाडले; या लोकांच्या नजरेत लहानशी चूक होणेही एक भयंकर बाब होती. (एज्रा ७:६, ११, १२) दोषहीन प्रतीकृती तयार करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी पुढच्या सर्व बायबल नकलनवीसांसाठी एक अत्युच्च आदर्श घालून दिला.

पण सा.यु.पू. चौथ्या शतकादरम्यान एक आव्हान उभे ठाकले. सम्राट ॲलेक्झँडर याची अशी आकांक्षा होती की सबंध जगातल्या लोकांना ग्रीक संस्कृतीचे शिक्षण मिळावे. त्याच्या पराक्रमांमुळे, सर्वसामान्य ग्रीक किंवा कोईनी हिला सबंध मध्य पूर्वेत सार्वत्रिक भाषेची मान्यता मिळाली. परिणामस्वरूप अनेक यहुद्यांना लहानपणी हिब्रू वाचायला शिकवलेच गेले नाही ज्यामुळे ते शास्त्रवचनांचे वाचन करू शकत नव्हते. म्हणून, सा.यु.पू. २८० च्या सुमारास, हिब्रू विद्वानांचा एक गट, हिब्रू बायबलचे सर्वज्ञात कोईनी भाषेत भाषांतर करण्याच्या उद्देशाने ईजिप्तमधील ॲलेक्झँड्रिया येथे एकत्र आला. त्यांनी केलेल्या भाषांतराला सेप्टुअजिंट असे नाव पडले ज्याचा ग्रीक भाषेत “सत्तर” असा अर्थ आहे; या कामात जवळजवळ इतकेच भाषांतरकार सहभागी होते असा समज आहे. हे भाषांतर सा.यु.पू. १५० च्या सुमारास पूर्ण झाले.

येशूच्या काळात, हिब्रू भाषा अद्यापही पॅलेस्टाइनमध्ये प्रचारात होती. तथापि तेथे आणि रोमी विश्‍वाच्या दूरदूरच्या इतर मुलखांत मुख्यतः कोइनीचेच प्रभुत्व होते. यामुळेच ख्रिस्ती बायबल लेखकांनी, जास्तीतजास्त परराष्ट्रियांना बायबल उपलब्ध व्हावे म्हणून हीच सर्वसामान्य ग्रीक भाषा उपयोगात आणली. तसेच, त्यांनी सेप्टुअजिंटमधील अवतरणांचाही मुक्‍तपणे वापर केला आणि त्यातून बरेचसे शब्दप्रयोगही घेतले.

सुरवातीचे ख्रिस्ती आवेशी मिशनरी असल्याकारणाने, बऱ्‍याच काळापासून अपेक्षित असलेला मशीहा येशूच आहे हे सिद्ध करण्यासाठी ते सेप्टुअजिंटचा पाहता पाहता मोठ्या प्राविण्याने वापर करू लागले. यामुळे यहुदी संतप्त झाले आणि परिणामतः त्यांनी काही नवीन ग्रीक भाषांतरे तयार केली; ख्रिस्ती लोक सहसा ज्या शास्त्रवचनांचा पुराव्यादाखल वापर करायचे, त्याच शास्त्रवचनांत फेरबदल करण्याद्वारे त्यांना या वचनांच्या साहाय्याने युक्‍तिवाद करण्यास असमर्थ करण्याच्या दृष्टीने या भाषांतरांची रचना करण्यात आली होती. उदाहरणार्थ, यशया ७:१४ येथे मशीहाच्या आईच्या संदर्भात भविष्यसूचकपणे बोलताना, सेप्टुअजिंट “कुमारिका” या अर्थाचा ग्रीक शब्द वापरते. या नवीन भाषांतरांत एक निराळाच ग्रीक शब्द घालण्यात आला, ज्याचा अर्थ “तरुणी” असा होतो. ख्रिस्तीजनांनी सेप्टुअजिंटचा वापर न थांबवल्यामुळे शेवटी यहुद्यांनी आपली ही युक्‍ती सोडूनच देण्याचे ठरवले आणि ते पुन्हा एकवार हिब्रू भाषेकडे परतण्याचे प्रोत्साहन देऊ लागले. सरतेशेवटी, त्यांनी उचललेले हे पाऊल पुढच्या बायबल भाषांतरांसाठी एक वरदानच ठरले कारण त्यामुळे हिब्रू भाषा जिवंत राहिली.

ख्रिस्ती पुस्तकाचे पहिले प्रकाशक

सुरवातीचे आवेशी ख्रिश्‍चन, बायबलच्या शक्य होतील तितक्या प्रती, आणि त्यासुद्धा हाताने नक्कल करून लिहिलेल्या प्रती तयार करण्याच्या कामाला लागले. शिवाय त्यांनी, पूर्वीसारख्या गुंडाळ्यांऐवजी, आधुनिक पुस्तकात असतात तशी पाने असलेले कोडेक्स देखील प्रचारात आणले. कोडेक्स हे भराभर शास्त्रवचने शोधण्यासाठी तर सोईस्कर होतेच होते, पण एका गुंडाळीत सामावू शकेल त्यापेक्षा जास्त मजकूर—उदाहरणार्थ, सर्व ग्रीक शास्त्रवचने किंवा सबंध बायबल देखील, कोडेक्सच्या एकाच खंडात सामावणे शक्य होते.

शेवटच्या प्रेषिताची अर्थात योहानाची पुस्तके लिहून झाली तेव्हा सा.यु. ९८ सालाच्या सुमारास ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा संग्रह पूर्ण झाला. योहानाच्या शुभवर्तमानाच्या एका प्रतीचा एक अवशेष अस्तित्वात आहे; यास रायलंड्‌झ पपायरस 457 (P52) म्हणतात आणि तो जास्तीतजास्त सा.यु. १२५ च्या कालखंडातील आहे. सा.यु. १५० ते १७० मध्येच, जस्टिन माटर यांचा शिष्य टेशियन याने डायटेसरॉन अर्थात, आपल्या सध्याच्या बायबलमध्ये असणाऱ्‍या चार शुभवर्तमानांतून संकलित केलेला येशूच्या जीवनावरील एक समग्र वृत्तान्त तयार केला.a यावरून असे दिसून येते की त्याने केवळ याच शुभवर्तमानांना विश्‍वासार्ह मानले आणि दुसरे म्हणजे त्यावेळेस या शुभवर्तमानांचे वितरणही सुरू झालेले होते. सा.यु. १७० च्या जवळपास, “नवीन करार” यातील पुस्तकांची उपलब्ध असलेली सर्वात जुनी क्रमवार यादी तयार करण्यात आली जिला म्युरेटोरियन फ्रॅग्मेंट असे म्हणण्यात आले. या यादीत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांपैकी अधिकांश पुस्तकांची नावे आहेत.

ख्रिस्ती विश्‍वासांचा प्रसार होत गेला तसतशी हिब्रू शास्त्रवचनांसोबत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची देखील मागणी करण्यात येऊ लागली. आर्मेनियन, कॉप्टिक, जिऑर्जियन आणि सिरिॲक यांसारख्या भाषांत कालांतराने कितीतरी आवृत्या काढण्यात आल्या. कित्येकदा तर, केवळ याच उद्देशासाठी सबंध वर्णमाला तयार कराव्या लागत. उदाहरणार्थ, रोमन चर्चचा चौथ्या शतकातील बिशप युल्फलास याने बायबलचे भाषांतर करण्यासाठी गॉथिक भाषेची लिपी निर्माण केल्याचे वृत्त आहे. पण, गॉथिक लोकांच्या युद्धपिपासू प्रवृत्तीला खतपाणी मिळेल या भितीने त्याने राजे नावाची पुस्तके मुद्दामहून गाळली. तथापि, त्याची ही कृती “ख्रिस्तीकरण” झालेल्या गॉथिक लोकांना, सा.यु. ४१० साली रोमचा सर्वनाश करण्यापासून रोखू शकली नाही!

लॅटिन आणि स्लॅव्हॉनिक बायबल

मध्यंतरी, लॅटिनचे प्रभुत्व वाढले आणि कित्येक ओल्ड लॅटिन आवृत्त्या निघू लागल्या. पण लेखनशैली आणि अचूकपणा यांबाबतीत त्यांच्यात तफावत होती. म्हणून, सा.यु. ३८२ साली पोप डॅम्सस याने आपला सेक्रेटरी जेरमी याला एक अधिकृत लॅटिन बायबल तयार करण्यासाठी नेमले.

जेरमीने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लॅटिन आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्यापासून सुरवात केली. पण हिब्रू शास्त्रवचने मात्र मूळ हिब्रूमधून भाषांतरीत करण्यात यावीत असा त्याचा अट्टाहास होता. यामुळेच, सा.यु. ३८६ साली तो हिब्रू शिकण्यासाठी आणि एखाद्या रब्बीचे मार्गदर्शन लाभावे यासाठी बेथलेहेम येथे येऊन राहू लागला. त्याने असे केल्यामुळे तो चर्च वर्तुळांमध्ये भयंकर वादाचा विषय बनला. जेरमीचा समकालीन ऑगस्टीन याच्यासहित इतर काहींचे देखील असे म्हणणे होते की सेप्टुअजिंट हे देवाकरवी प्रेरित केलेले आहे आणि म्हणून त्यांनी जेरमीवर “यहुद्यांत जाऊन मिळाल्याचा” आरोप लावला. जेरमीने मात्र आपले काम जोरात सुरू ठेवले आणि सा.यु. ४०० साली ते पूर्ण झाले. मूळ भाषांच्या आणि दस्तऐवजांच्या उगमस्थानी जाऊन तेव्हा प्रचारात असलेल्या भाषेत त्यांचे भाषांतर करण्याद्वारे जेरमीने एक हजार वर्षांपूर्वीच आजच्या आधुनिक भाषांतर पद्धती अवलंबल्या. त्याच्या भाषांतराला व्हल्गेट, किंवा कॉमन व्हर्शन म्हणण्यात आले आणि ते शतकानुशतके लोकांना लाभदायक ठरले.

पौर्वात्य युरोपातल्या ख्रिस्ती धर्मजगतातील अनेकजण अजूनही सेप्टुअजिंट आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने वाचू शकत होते. तथापि आजच्या स्लॅव्हिक भाषा जिच्यातून उत्पन्‍न झाल्या ती ओल्ड स्लॅव्हॉनिक भाषा कालांतराने उत्तरपूर्व युरोपातली सर्वात प्रमुख भाषा बनली. सा.यु. ८६३ साली, सिरिल आणि मेथोडियस नावाचे दोन ग्रीकभाषिक भाऊ, मोरेव्हिया येथे आले जे आता झेक प्रजासत्ताकात येते. येथे त्यांनी बायबलचे ओल्ड स्लॅव्हॉनिक भाषेत भाषांतर सुरू केले. या कामासाठी त्यांनी ग्लॅगलिडिक्‌ वर्णमाला निर्माण केली; कालांतराने सिरिलच्या नावावरून सिरिलिक म्हणण्यात आलेल्या वर्णमालेने या ग्लॅगलिडिक्‌ वर्णमालेची जागा घेतली. सिरिलिक वर्णमालेतूनच सध्याच्या रशियन, युक्रेनियन, सर्बियन आणि बल्गेरियन लिपी उत्पन्‍न झाल्या. स्लॅव्हॉनिक बायबलने त्या प्रदेशांतील लोकांच्या गरजा कितीतरी पिढ्यांपर्यंत भागवल्या. तथापि, कालांतराने भाषांमध्ये बदल घडून आल्यामुळे ही भाषा सर्वसाधारण माणसाच्या समजण्यापलीकडे गेली.

हिब्रू बायबलचे जतन

सा.यु. सहाव्या ते दहाव्या शतकादरम्यानच्या या कालावधीत, यहुद्यांच्या मॅसोरिटीस नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या एका गटाने, हिब्रू शास्त्रवचनांच्या मूळग्रंथांचे जतन करण्यासाठी नक्कल करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धती विकसित केल्या. हे लोक सर्व ओळी, एवढेच काय तर एकूण एक वर्ण मोजण्यापर्यंतची तसदी घेऊन हस्तलिखितांमधील तफावती शोधून काढत असत, आणि हे सारे केवळ विश्‍वासार्ह मजकूर जतन करता यावा, म्हणून. त्यांचे परिश्रम व्यर्थ गेले नाहीत. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, आधुनिक मॅसोरेटिक लिखाणांची सा.यु.पू. २५० आणि सा.यु. ५० च्या दरम्यान लिहिलेल्या मृत समुद्र गुंडाळ्यांशी तुलना करण्यात आली असता १,००० पेक्षा अधिक वर्षांच्या काळादरम्यान कोणताही सैद्धांतिक बदल आढळला नाही.b

युरोपात मध्ययुगे आणि तमोयुगे स्थूलमानाने सारखीच होती. सामान्य लोकांत वाचन आणि विद्यार्जन यांना फार कमी महत्त्व होते. कालांतराने, बऱ्‍याचशा पाळकांना देखील चर्च लॅटिन वाचता येईनासे झाले, शिवाय त्यांना स्वतःच्या भाषेतही वाचता येत नव्हते. युरोपात याच काळात यहुदी लोकांचे जमाव स्वतःच्या काही स्वतंत्र वसाहतींमध्ये वस्ती करीत होते. अशा अलिप्ततेमुळे, बायबलची हिब्रू विद्या जिवंत राहिली. तथापि, दुजाभाव आणि अविश्‍वास यांमुळे यहुद्यांचे हे ज्ञान सहसा त्यांच्या वसाहतींबाहेर कोणाला उपलब्ध होणे शक्य नव्हते. पश्‍चिम युरोपात, ग्रीक भाषेचे ज्ञान देखील ऱ्‍हास पावत होते. शिवाय, पाश्‍चात्त्य चर्चेसनी जेरमीच्या लॅटिन व्हल्गेटला दिलेल्या मानाच्या स्थानामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मॅसोरेटिक काळाच्या शेवटास लॅटिन ही भाषा मृतवत होत चालली तरीसुद्धा, सहसा जेरमीच्या व्हल्गेटला एकमात्र अधिकृत भाषांतर मानले जात असे. अशा तऱ्‍हेने, एकीकडे बायबलचे ज्ञान घेण्याच्या इच्छेला हळूहळू पालवी फुटत होती तर त्याच वेळेस दुसरीकडे एका वादळी संघर्षाचे वारे वाहू लागले होते.

बायबल भाषांतराला कडवा विरोध

सातवे पोप ग्रेगरी यांनी १०७९ साली बायबलच्या प्रादेशिक भाषांतील आवृत्त्यांच्या निर्माणकार्यावर, किंबहुना या आवृत्त्या जवळ बाळगण्यावरही बंदी घालणाऱ्‍या मध्ययुगीन चर्चेसच्या असंख्य नियमांपैकी पहिला नियम स्थापित केला. स्लॅव्हॉनिक भाषेत चर्चविधी घेण्यासाठी त्यांनी परवानगी तर दिली, पण एका अटीवर आणि ती म्हणजे पवित्र शास्त्रवचनांच्या भागांचे भाषांतर करावे लागेल. आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी घेतलेल्या भूमिकेच्या थेट विरोधात, त्याने लिहिले: “पवित्र शास्त्रवचनांचे काही भाग गोपनीयच राहावेत ही देवाची मर्जी आहे.” चर्चने अधिकृतपणे हीच भूमिका पत्करल्यामुळे, बायबल वाचनाचे समर्थन करणारे धोकेदायक आहेत अशी धारणा बळावत जाऊ लागली.

अशा प्रतिकूल वातावरणातही, बायबलची सर्वसामान्यांच्या भाषेत नक्कल आणि भाषांतर करण्याच्या कामात खंड पडला नाही. कित्येक भाषांतील आवृत्त्यांचे युरोपात गुपचूप वितरण करण्यात आले. या सर्व हाताने नक्कल केलेल्या प्रतिकृती होत्या कारण युरोपात १४०० च्या शतकातील मधल्या काळापर्यंत चल खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रण करण्याच्या तंत्राचा शोध लागलेला नव्हता. पण, बायबलच्या प्रती महाग आणि मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे, सामान्य माणसाला बायबलच्या एखाद्या पुस्तकाचा काही भाग किंवा फक्‍त काही पानांवरच समाधान मानावे लागत असे. काहींनी लांबलचक उतारे, आणि काहींनी तर सबंध ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने चक्क तोंडपाठ केली!

तथापि, कालांतराने चर्चमध्ये क्रांती घडवू पाहणाऱ्‍या चळवळी जोर पकडू लागल्या. दररोजच्या जीवनात देवाच्या वचनाला किती महत्त्व आहे या गोष्टीची नव्याने झालेली जाणीव, काही अंशी या चळवळींमागची प्रेरक शक्‍ती होती. या चळवळींचा आणि मुद्रणतंत्रात होत असलेल्या विकासाचा बायबलवर कोणता प्रभाव पडणार होता? शिवाय, सुरवातीला उल्लेखलेल्या विल्यम टिंडेल आणि त्यांच्या भाषांतराचे पुढे काय झाले? त्या चित्तवेधक गोष्टीचा आपल्या काळापर्यंतचा अहवाल आम्ही आमच्या पुढील अंकांत प्रकाशित करू.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित झालेले सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, चार शुभवर्तमानांचा आधुनिक संगतिदर्शक ग्रंथ आहे.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) याचा खंड २, पृष्ठ ३१५ पाहावे.

[८, ९ पानांवरील तक्‍ता]

बायबलच्या संचारणातील प्रमुख तारखा

(For fully formatted text, see publication)

सामान्य युग पूर्व (सा.यु.पू.)

हिब्रू शास्त्रवचनांचे लेखन पूर्ण सा.यु.पू. ४४३ च्या जवळपास

सा.यु.पू ४००

ॲलेक्झँडर द ग्रेट (मृ. सा.यु.पू. ३२३)

सा.यु.पू ३००

सेप्टुअजिंटची सुरवात सु. सा.यु.पू. २८०

सा.यु.पू. २००

मृत समुद्र गुंडाळ्यांपैकी बऱ्‍याच सु. सा.यु.पू. १०० ते सा.यु. ६८

सा.यु.पू. १००

जेरुसलेमचा नाश सा.यु. ७०

ग्रीक शास्त्रवचनांचे लेखन पूर्ण सा.यु. ९८

सामान्य युग (सा.यु.)

सा.यु. १००

योहानाचे रायलंड्‌झ पपायरस (सा.यु. १२५ पूर्वी)

सा.यु. २००

सा.यु. ३००

जेरमीचे लॅटिन व्हल्गेट सु. सा.यु. ४००

सा.यु. ४००

सा.यु. ५००

मॅसोरेटिक लिखाणाची तयारी पूर्ण

सा.यु. ६००

सा.यु. ७००

सा.यु. ८००

मोरेव्हिया येथे सिरिल सा.यु. ८६३

सा.यु. ९००

सा.यु. १०००

प्रादेशिक भाषेत बायबलच्या निर्मितीवर बंदी

घालणारा नियम सा.यु. १०७९

सा.यु. ११००

सा.यु. १२००

सा.यु १३००

[९ पानांवरील चित्र]

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी कोडेक्सचा वापर प्रचारात आणला

[१० पानांवरील चित्र]

जेरमी हिब्रू शिकण्यासाठी बेथलेहेम येथे गेला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा