तुमचा विवेक—त्यास कसे प्रशिक्षित करावे
“एक शुद्ध विवेक साखरझोप आणतो.” ही पुरोगामी म्हण एका महत्त्वपूर्ण वास्तविकतेवर प्रकाश पाडते, ती म्हणजे: आपण आपल्या विवेकाचे अनुपालन करतो तेव्हा आंतरिक शांती व एकोप्याचा आनंद घेतो.
तथापि, सगळेच लोक तसे करण्याची निवड करत नाहीत. अडॉल्फ हिटलर यांनी विवेक म्हटल्या जाणाऱ्या अतिशय हिणकस अशा काल्पनिक राक्षसापासून किंवा संभ्रमापासून मनुष्याची मुक्ती करण्याचे कार्य हाती घेतल्याची घोषणाबाजी केली. त्यांची, अंगावर काटा उभा करणारी राजवट याची अशी एक निराशाजनक ओझरती झलक देते, की लोक आपल्या विवेकाची उपेक्षा करतात तेव्हा ते किती निर्दयी बनतात. विद्यमान काळातील बहुविध हिंसक गुन्हेगार—बलात्कार व खूनखराबा करून काडीमात्रही खंत न वाटणारे लोक काही कमी निर्दयी नाहीत. असली लांच्छनास्पद कृत्ये करणारे अनेक जण अगदी कोवळ्या वयातली आहेत. म्हणूनच, ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका पुस्तकास, विवेक नसलेली मुले (इंग्रजी) हे उपशीर्षक दिले होते.
तथापि, अनेक लोकांच्या मनाला एखादा हिंसक गुन्हा करण्याचा विचार शिवतही नसला तरी लैंगिक अनैतिकता, लबाडी किंवा ठकबाजी यांत गुरफटण्यासंबंधी काहीएक रुखरुख न वाटणारे इतर अनेक जणही अस्तित्वात आहेत. विश्वभर नैतिक मूल्यांची कमालीची घसरण होत आहे. खऱ्या उपासनेतूनच डोके वर काढणाऱ्या धर्मत्यागाचा उल्लेख करताना, प्रेषित पौलाने लिहिले, की काही ख्रिस्ती जगाच्या प्रभावांपुढे हात टेकतील व परिणामी, ‘त्यांचा विवेक डाग दिल्यासारखा’ होईल. (१ तीमथ्य ४:२) आजच्या या “शेवटल्या काळी” भ्रष्टाचाराचे भय तर अधिकच तीव्र बनले आहे. (२ तीमथ्य ३:१) यास्तव, आपल्या विवेकाची जपणूक करण्यासाठी ख्रिश्चनांनी जिवाच्या आकांताने प्रयत्न करण्यास हवे. विवेकास प्रशिक्षित व विकसित करून आपल्याला असे करणे शक्य आहे.
मन, अंतःकरण आणि तुमचा विवेक
प्रेषित पौलाने म्हटले: “मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही, माझी सद्सद्विवेकबुद्धीहि [विवेक] पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते.” (रोमकर ९:१) म्हणूनच, विवेक हा साक्ष देणारा असू शकतो. एखाद्या वर्तनक्रमाचे परीक्षण करून तो त्यास स्वीकृतीची पावती देऊ शकतो अथवा त्याचा धिक्कारही करू शकतो. योग्य आणि अयोग्य गोष्टींची अधिकतर समज आपल्याला निर्माणकर्त्याकडूनच प्राप्त झाली आहे. तरीसुद्धा, आपल्या विवेकास वळण लावून त्यास प्रशिक्षित करणे शक्य आहे. ते कसे बरे? देवाच्या वचनातून अचूक ज्ञान संपादन केल्याने. प्रेषित पौल म्हणतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, . . . आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) तुम्ही आपल्या मनात देवाची विचारधारा व इच्छा बिंबवता तेव्हा तुमचा विवेक अधिक ईश्वरी मार्गाने कार्य करू लागतो.
यहोवाच्या साक्षीदारांनी जगभरातील लाखो लोकांना ‘यहोवा देवाचे व येशू ख्रिस्ताचे ज्ञान संपादण्यास’ मदत केली आहे. (योहान १७:३) त्यांच्या मोफत गृह बायबल अभ्यास प्रबंधामार्फत ते प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना लैंगिकता, मादक द्रव्ये, विवाह, व्यापारी व्यवहार व इतर बहुसंख्य विषयांवरील यहोवा देवाचे दर्जे शिकवतात.a (नीतिसूत्रे ११:१; मार्क १०:६-१२; १ करिंथकर ६:९, १०; इफिसकर ५:२८-३३) एक ईश्वरी विवेक विकसित करण्यात, ‘अचूक ज्ञान’ संपादन करणे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. (फिलिप्पैकर १:९) तथापि, एखाद्या ख्रिश्चनाला आपला विवेक सदृढ राखायचा असेल तर बायबलची परिपक्व समज प्राप्त झाल्यानंतरही त्याने नियमितपणे देवाच्या वचनावर आपल्या मनाचे अखंड पोषण केले पाहिजे.—स्तोत्र १:१-३.
बायबल, आपल्या संवेदना व मनोभावना यांना सामावणाऱ्या लाक्षणिक अंतःकरणाशीही विवेकाची नाळ जुळविते. (रोमकर २:१५) विवेकाने जर यथार्थपणे कार्य करण्यास हवे तर मग, मन आणि अंतःकरण यांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे. याचा अर्थ, मनात माहितीला शिरकाव करू देणे यापेक्षा आणखीन काही करणे. तुम्ही तुमच्या अंतःकरणालाही—तुमच्या आंतरिक भावना, इच्छा आणि हव्यास यांनाही वळण लावले पाहिजे. म्हणूनच, नीतिसूत्रे हे पुस्तक अशा अभिव्यक्तींचा उपयोग करते जसे, की “तुझे अंतःकरण लाव,” “तुझे अंतःकरण सरळ मार्गांत राख,” “तुझ्या अंतःकरणास मार्ग दाखव.” (नीतिसूत्रे २:२; २३:१९; २७:२३; NW) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे शास्त्रवचनांवर मनन व विचार करणे. स्तोत्र ७७:१२ म्हणते: “मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” मनन केल्याने आपल्याला आपल्या आंतरिक भावना व हेतूंप्रत पोहंचण्यास मदत होते.
उदाहरणार्थ, असे समजा की तुम्हाला तंबाखूच्या व्यसनाची एक अशुद्ध सवय जडली आहे. अनेक लोकांप्रमाणे तुम्हालाही त्याच्या शारीरिक धोक्यांची पुरेपूर जाण आहे याविषयी शंकाच नाही. शिवाय, मित्रांनी व कुटुंबाने आर्जव करूनसुद्धा ती सवय तोडण्यास तुम्हाला महाकठीण वाटले आहे. बायबलच्या संदेशावर मनन केल्याने याबाबतीत तुमचा विवेक प्रबळ कसा होऊ शकतो बरे?
उदाहरणादाखल, २ करिंथकर ७:१ मधील पौलाच्या शब्दांवर मनन करण्याचा प्रयत्न करा जे म्हणते: “तेव्हा प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” या शब्दांची समज प्राप्त करा. स्वतःस विचारा, ‘पौलाने उल्लेखिलेली “ही अभिवचने” आहेत तरी कोणती?’ त्याचा संदर्भ वाचल्याने तुमच्या लक्षात येईल, की आधीची वचने असे म्हणतात: “‘“त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,” असे प्रभु म्हणतो, “आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका”’; ‘“म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.”’ ‘“आणि मी तुम्हाला पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल,” असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.’”—२ करिंथकर ६:१७, १८.
‘सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करण्याच्या’ पौलाच्या आज्ञेस आज आणखीनच पाठबळ मिळते! असे करण्याच्या शक्तिशाली प्रेरणेपोटी, ‘आम्हाला स्वीकारण्याचे’ अर्थात आपल्याला त्याच्या संरक्षक देखरेखीखाली घेण्याचे अभिवचन देव देतो. तुम्ही कदाचित स्वतःस विचाराल, ‘एखाद्या पुत्राचा किंवा कन्येचा पित्यासोबत जो नातेसंबंध असतो तसा घनिष्ठ नातेसंबंध मी देवासोबत अनुभवू शकेल काय?’ ‘स्वीकारले’ जाण्याची किंवा एका बुद्धिमान, प्रेमळ देवाची प्रिय व्यक्ती बनण्याची कल्पना अधिक अपीलकारक वाटत नाही का? ती कल्पना तुम्हाला तितकी समर्पक वाटत नसल्यास प्रेमळ पिता ज्या पद्धतीने आपल्या मुलांना प्रेम व ममता दाखवतात त्याचे निरीक्षण करा. आता, तुमच्यामध्ये व यहोवामध्ये असेच स्नेहबंधन असल्याची कल्पना करा! तुम्ही जितके अधिक यावर मनन करता तितके अधिक अशा नातेसंबंधाची इच्छासक्ती वृद्धिंगत होईल.
मात्र हे लक्षात ठेवा: देवासोबतची घनिष्ठता तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ‘अशुद्ध गोष्टींना शिवत नाही.’ आपणास विचारा: ‘तंबाखूचे व्यसन, देव मज्जाव करतो त्या ‘अशुद्ध गोष्टींपैकीच’ एक नाही का? त्याचा वापर, ‘देहाची अशुद्धता’ असू शकते का व आरोग्याच्या नको त्या धोक्यांना मला सामोरे नेईल का? यहोवा एक निर्मल किंवा “पवित्र” देव आहे त्यामुळे हेतुपुरस्सरपणे स्वतःस अशुद्ध करण्याच्या या माझ्या मार्गास तो सहमती दर्शवील काय?’ (१ पेत्र १:१५, १६) लक्षात घ्या, की पौल ‘एखाद्याच्या आत्म्याचा अशुद्धतेसंबंधी’ म्हणजे मानसिक कल यासंबंधीही इशारा देतो. स्वतःला विचारा: ‘हे व्यसन माझ्या विचारप्रणालीवर वरचष्मा गाजवते का? माझ्या हव्यासाची तृप्ती करण्यासाठी, कदाचित माझ्या आरोग्याची, माझ्या कुटुंबाची किंवा देवासोबतच्या माझ्या नातेसंबंधाचीही किंमत मोजून मी अगदी विकोपास जाईन का? माझे जीवन उद्ध्वस्त करू देण्यास तंबाखूच्या माझ्या व्यसनास मी कितपत अनुमती दिली आहे?’ या दुखऱ्या प्रश्नांना तोंड दिल्याने ते व्यसन सोडण्याचे धैर्य तुम्हाला निश्चितच मिळेल!
तथापि, तंबाखूवर प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्हाला इतरांच्या साहाय्याची व पाठबळाची मदत मिळवावी लागेल. तरीसुद्धा, बायबलवर मनन केल्याने, व्यसनमुक्त होण्यास तुमच्या विवेकास प्रशिक्षित व प्रबळ करण्यासाठी पुष्कळ मदत होऊ शकते.
आपण चुकतो तेव्हा
योग्य ते करण्याचे शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा काही वेळा आपल्या अपूर्णता आपल्यावर ताबा मिळवतात व आपण चुकतो. मग, आपला विवेक आपल्याला डिवचत राहील पण तरीही त्याकडे कानाडोळा करण्यास आपण प्रलोभित होऊ. किंवा मग आपण इतके हताश होऊन जाऊ की देवाची सेवा करण्याचा काहीएक प्रयत्न न करण्याचेच आपण पसंत करू. तथापि, राजा दाविदाच्या उदाहरणाचे स्मरण करा. त्याने बथशेबाशी व्यभिचार केल्यानंतर त्याचा विवेक त्याला डिवचू लागला. त्याने अनुभवलेल्या क्लेशाचे तो असे वर्णन करतो: “रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे.” (स्तोत्र ३२:४) खरेच! किती वेदनादायक, नाही का? असे असले तरी या ईश्वरी दुःखाने दाविदाला पश्चात्ताप करण्यास व देवासोबत समेट करण्यास प्रवृत्त केले. (पडताळा २ करिंथकर ७:१०.) क्षमेकरता दाविदाने दुःखाने केलेल्या याचना त्याच्या प्रामाणिक पश्चात्तापाचा अमाप पुरावा देऊन जातात. दाविदाने आपल्या विवेकास प्रतिसाद दिला त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी व पुन्हा एकदा आपला आनंद मिळविण्यासाठी त्याला मदत मिळाली.—स्तोत्र ५१.
हीच गोष्ट आजही घडू शकते. गत काळात काही जण यहोवाच्या साक्षीदारांकडून अभ्यास घेत होते, परंतु आपले जीवन देवाच्या उदात्त दर्जांच्या सुसंगतेत नाही हे कळून चुकल्यावर मात्र त्यांनी अभ्यास करण्याचे सोडून दिले. कदाचित, विवाहबद्ध न होता ते एखाद्या विरुद्ध लिंगी सदस्यासोबत राहत होते अथवा ते अशुद्ध सवयींचे दास होऊन बसले होते. साहजिकच, त्यांचा विवेक त्यांना टोचणी देऊ लागला!
तुम्ही अशा एखाद्या परिस्थितीत असल्यास, प्रेषित पेत्राने पेन्टेकॉस्टच्या दिवशी काढलेले बोल विचारात घ्या. त्याने यहुदी रहिवाश्यांची पापकर्मे चवाठ्यावर आणली तेव्हा “त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली.” हार मानण्याऐवजी त्यांनी पश्चात्ताप करण्याविषयीच्या पेत्राच्या सल्ल्याचे पालन केले व देवाचे अनुमोदन प्राप्त केले. (प्रेषितांची कृत्ये २:३७-४१; पं.र.भा.) तुम्हालाही असे करण्यास काय हरकत आहे? तुमचा विवेक तुम्हाला बोचत आहे त्यामुळे सत्य त्यागण्याऐवजी ‘पश्चात्ताप करून वळण्याची’ तुम्हाला प्रेरणा देण्यास आपल्या विवेकास अनुमती द्या. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) निश्चय व परिश्रम, देवाचे अनुमोदन प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास तुम्हाला मदत करतील.
‘चांगला विवेक बाळगा’
यहोवाचे मार्ग शिकण्यास तुम्ही नुकतीच सुरवात केली असो किंवा एक प्रौढ ख्रिस्ती म्हणून अनेक वर्षांचा अनुभव तुम्हाला असो, पण पेत्राने दिलेली ताकीद यथोचित आहे: ‘चांगला विवेक बाळगा.’ (१ पेत्र ३:१६) हा दडपण नव्हे तर एक ठेवा आहे. देवाचे वचन, बायबल यात असलेल्या बोधवचनावर आपल्या मनाचे व अंतःकरणाचे पोषण करण्यास त्यास प्रशिक्षित करा. तुमचा विवेक तुम्हाला सावध करतो तेव्हा त्याचे अनुपालन करा. आपल्या विवेकाशी आज्ञाकारी राहिल्याने लाभणाऱ्या आंतरिक शांतीचा आनंद घ्या.
हे कबूल आहे, की आपल्या विवेकास प्रशिक्षित करणे व त्यास वळण लावणे ही काही साधीसोपी गोष्ट नव्हे. तथापि, तुम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही यहोवा देवाकडे प्रार्थना करू शकता. त्याच्या मदतीने, ‘चांगल्या विवेकाने व निष्कपट विश्वासाने’ तुम्ही देवाची सेवा करू शकाल.—१ तीमथ्य १:५.
[तळटीप]
a एक मोफत गृह बायबल अभ्यास करण्यास तुम्ही इच्छुक असल्यास बिनदिक्कतपणे यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीशी संपर्क साधा अथवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा.
[६ पानांवरील चित्र]
देवाच्या वचनाचे वाचन केल्याने व त्यावर मनन केल्याने आपल्या विवेकास प्रशिक्षित करण्याकरता आपल्याला मदत मिळते