विवेक—एक दडपण की एक ठेवा?
‘माझा विवेक मला डिवचत आहे!’ वेळोवेळी, बहुधा आपण सगळेच विवेकाच्या अवकळा अनुभवत असतो. अशा भावनांचा अवाका, मवाळ अस्वस्थतेपासून ते अगदी जहाल अशा मानसिक वेदनेपर्यंत असू शकतो. एक त्रासलेला विवेक, औदासीन्यता किंवा पराजयाची बोचरी भावना यांसही जन्म देऊ शकतो.
तर मग, या दिशेने विचार केल्यास विवेक एकप्रकारचे दडपणच नव्हे का? काहींना कदाचित तसे वाटेल. इतिहास काळातील संस्कृतींची बहुशः अशी समज होती, की विवेक एक अंगभूत अर्थात एक जन्मजात क्षमता आहे. अनेकांना असे वाटले जणू तो देवापासून प्रत्यक्ष मिळालेला एक नैतिक मार्गदर्शक होता. यास्तव, विवेकास “मनुष्यातील देवाचं अस्तित्व,” “आपला मूळ स्वभावधर्म” तसेच “देवाची वाणी” असेही संबोधण्यात आले आहे.
तथापि, विवेक हा बहुधा प्राप्त केलेली एक क्षमता—पालकीय व सामाजिक प्रभावाची परिणती असल्याचे प्रतिपादन करणे अलीकडील काळात अगदी प्रचलित होऊन बसले आहे. उदाहरणार्थ, काही मानसशास्त्रवेत्ते असा वितंडवाद मांडतात की, एखादे मूल केवळ शिक्षा होण्याच्या भीतीपोटी अनिष्ट वागणुकीपासून चार हात लांब राहण्याचे शिकते; याचे कारण, आपण ज्यास विवेक असे नाव देतो तो म्हणजे, केवळ आपल्या पालकांची व्यक्तिगत मूल्ये व विश्वास आत्मसात करणे एवढेच होय असा त्यांचा विश्वास आहे. मूल्ये व दर्जे यांचा पुरस्कार करण्यात समाज सामान्यतः पार पाडत असलेल्या भूमिकेकडे इतर लोक अंगुलीनिर्देश करतात. काहींच्या दृष्टिकोनात विवेकाच्या अवकळा म्हणजे, आपण जे काही करू इच्छितो व जुलमी समाज हक्काने आपल्याकडून जे काही करून घेण्याची मागणी करतो यांच्यातील संघर्षापलीकडे आणखी काहीच नाही!
विवेकावर इतके तर्कवितर्क करूनसुद्धा वेळोवेळी लोक पालकांविरुद्ध, कुटुंबांविरुद्ध आणि इतकेच काय पण सबंध समाजांविरुद्धही उठले आहेत; आणि याचे कारण म्हणजे त्यांच्या विवेकाने त्यांना तसे करण्याची चालना दिली म्हणून. काही जण तर विवेकाखातर, आपल्या जिवाची आहुती देण्यासही एका पायावर तयार झाले आहेत! आणि जगातील संस्कृतींत अफाट तफावती असल्या तरी खूनखराबा, चोरी, व्यभिचार, लांड्यालबाड्या आणि गोत्रगमन यांसारख्या कृत्यांना विश्व पातळीवर अनिष्ट समजले जाते. यावरून विवेक अंगभूत अर्थात जन्मजात आहे यास पुष्टी मिळत नाही का?
विवेक—बायबलचा दृष्टिकोन
या विषयावरील खरा अधिकारी स्वतः यहोवा देव आहे. काहीही असले तरी शेवटी, ‘आपण स्वतःस उत्पन्न केले नाही तर, त्यानेच [देवानेच] आपल्याला उत्पन्न केले.’ (स्तोत्र १००:३) आपली रचना तो अंतर्बाह्य जाणतो. देवाचे वचन बायबल सांगते, की मनुष्याला देवाच्या “प्रतिरुपाचा” बनविण्यात आले होते. (उत्पत्ति १:२६) योग्य काय आणि अयोग्य काय यांतील फरक जाणण्याच्या समजबुद्धीनिशी मनुष्याची निर्मिती करण्यात आली होती; अगदी सुरवातीपासूनच विवेक हा मनुष्याच्या स्वभावधर्माचा एक अविभाज्य भाग होता.—पडताळा उत्पत्ति २:१६, १७.
रोमकरांस लिहिलेल्या आपल्या पत्रात प्रेषित पौल ही गोष्ट प्रमाणसिद्ध करतो: “ज्यांना [देवाचे] नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिहि [विवेक] त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.” (रोमकर २:१४, १५) याची नोंद घ्या, की यहुद्यांना दिलेल्या ईश्वरी नियमशास्त्राधीन जे लहानाचे मोठे झाले नव्हते असे अनेक जणही सामाजिक दडपणामुळे नव्हे तर “स्वभावतः” देवाच्या नियमशास्त्रातील काही तत्त्वांचे अनुपालन करत होते!
तर मग, एक दडपण असण्याऐवजी विवेक एक ईश्वरी देणगी अर्थात एक ठेवा आहे. हे मान्य आहे, की विवेकामुळे मानसिक दुखापत होऊ शकते. परंतु, विवेकास उचितपणे कान दिल्यास गाढ समाधानाच्या व आंतरिक शांतीच्या भावनांचे प्रतिफळ तो आपल्या पदरी पाडू शकतो. तो आपले मार्गदर्शन करू शकतो, आपले संरक्षण करू शकतो व आपल्याला प्रेरणाही देऊ शकतो. द इन्टरप्रिट्र्स बायबल असे विवेचन करते: “एखादी व्यक्ती जे काही करते व जे काही करण्यास ती बांधील आहे या दोहोंमधील पोकळी भरून काढण्यास ती प्रयत्नांची शिकस्त करते तेव्हाच काय मानसिक व भावनिक स्वास्थ्याची जपणूक करता येते.” एखादी व्यक्ती ही पोकळी कशी भरून काढू शकते बरे? आपल्या विवेकास वळण लावून त्यास प्रशिक्षित करणे शक्य आहे का? हे प्रश्न पुढील लेखात विचारात घेतले जातील.