राज्य घोषकांचा वृत्तान्त
त्याला एक “अति मोलवान मोती” गवसला
‘स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.’ या शब्दांत येशूने देवाच्या राज्याचे उच्चत्तम मोल स्पष्ट केले. (मत्तय १३:४५, ४६) राज्याचे मोल जाणणारे लोक ते प्राप्त करण्यासाठी अनेकदा प्रचंड वैयक्तिक त्याग करतात. ही बाब, पिंडोन काउन्टी, तैवान येथील पुढील अनुभवावरून सुस्पष्ट होते.
सन १९९१ साली लिन नामक एक दांपत्य यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले. एका स्थानीय पाळकाला याचा मागमूस लागला तेव्हा त्यांना चर्चकडे आकृष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. लिन दांपत्याचा, स्थानिक बाजारपेठेत डुकरे व बदके यांचे रक्त विक्री करण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी सदर विषयाबद्दल पाळकाचे मत जाणून घ्यायचे ठरवले. त्याने उत्तर दिले: “देवाने निर्मिलेले सर्व काही मनुष्यासाठी सेवन करण्याजोगे आहे.” परंतु, दुसऱ्या बाजूला साक्षीदारांनी, देवाचे वचन काय म्हणते ते विचारात घेण्याचे त्यांना उत्तेजन दिले. त्यांना हे समजले, की यहोवा देवाच्या नजरेत रक्त पवित्र आहे कारण “प्राणीमात्राचा जीव रक्तात आहे.” (लेवीय १७:१०, ११, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) यास्तव, खरे ख्रिस्ती ‘रक्तापासून अलिप्त’ राहतात. (प्रेषितांची कृत्ये १५:२०) या विषयावरील शास्त्रवचनांचे परीक्षण केल्यामुळे, लिन दांपत्याने रक्ताची विक्री न करण्याचा निश्चय केला; हा व्यवसाय त्यांच्या मिळकतीचा प्रमुख स्रोत असूनही त्यांनी वरील निर्णय घेतला. तथापि, अल्पावधीतच आणखी एका खडतर परीक्षेला ते सामोरे गेले.
सत्य शिकण्याआधी, लिन दांपत्याने आपल्या जमिनीत १,३०० सुपारीची झाडे लावली होती. झाडांपासून फलप्राप्ती होण्यासाठी पाच वर्षे लागणार असली तरी एकदा का त्यांची पूर्ण वाढ झाली म्हणजे दर वर्षी यांपासून ७७,००० डॉलर इतका नफा होण्याची अपेक्षा लिन दांपत्य करू शकत होते. पहिल्या हंगामाची वेळ जवळ येऊ लागली तसे लिन दांपत्याला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आवश्यक होते. बायबलच्या अभ्यासातून ते शिकले होते, की ख्रिश्चनांनी तंबाखूचा वापर करणे, मादक पदार्थांचा दुरुपयोग करणे व सुपारी खाणे यांसारख्या सर्व अशुद्ध सवयी वर्ज्य करून “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून” स्वतःला शुद्ध करावे. (२ करिंथकर ७:१) आता ते काय करणार होते बरे?
एका बोचणाऱ्या विवेकाच्या दबावाला आहारी जाऊन श्री. लिन यांनी अभ्यास बंद करण्याचे ठरवले. दरम्यान श्रीमती लिन यांनी आपल्या काही जुन्या झाडांपासून मिळालेल्या सुपारींची विक्री करून ३,००० हून अधिक डॉलर्सचा नफा मिळविला. त्यांनी आपली झाडे तशीच ठेवली असती तर अल्पावधीतच ते ज्याचा अनुभव घेणार होते त्याचा हा एक पूर्वानुभवच म्हणावा. तथापि, श्री. लिन यांचा विवेक आतल्या आत त्यांना डिवचतच राहिला.
ह्या बाबीशी ते संघर्ष करत राहिले व एके दिवशी त्यांनी एका स्थानिक साक्षीदारास आपल्यासाठी आपली झाडे तोडण्यास सांगितली. साक्षीदारांनी त्यांना समजावले, की हा निर्णय त्यांनी स्वतः घेण्यास हवा; त्यामुळे ‘आपला स्वतःचा भार वाहून’ त्यांनी स्वतःच आपली झाडे तोडण्यास हवी होती. (गलतीकर ६:४, ५) त्यांनी श्री. लिन यांना १ करिंथकर १०:१३ मधील अभिवचन लक्षात ठेवण्याचे प्रोत्साहन दिले जे म्हणते: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” साक्षीदारांनी त्याच्याशी असाही तर्क करून म्हटले: “आम्ही जर तुमच्या सांगण्याप्रमाणे तुमची झाडं तोडली तर तुम्हाला याचा पस्तावा होऊन तुमच्या नुकसानाचं खापर तुम्ही आमच्याच डोक्यावर फोडाल.” थोड्याच काळानंतर, श्रीमती लिन ह्या एके दिवशी सकाळी चेनच्या करवतीच्या आवाजामुळे जाग्या झाल्या. त्यांचे पती व त्यांची मुले चक्क सुपारीची झाडे तोडत होती!
श्री. लिन यांना याची अनुभूती झाली, की यहोवा आपल्या शब्दाला सच्चा आहे. एक शुद्ध विवेक देणारी नोकरी त्यांनी पत्करली आणि यामुळे यहोवाचा स्तुतीकर्ता बनणे त्यांना शक्य झाले. एप्रिल १९९६ साली यहोवाच्या साक्षीदारांच्या एका विभागीय संमेलनात त्यांचा बाप्तिस्मा झाला.
होय, सरतेशेवटी श्री. लिन यांनी “आपले सर्वस्व विकले” आणि “एक अति मोलवान मोती” विकत घेतला. आता त्यांना यहोवा देवाशी एक वैयक्तिक ऋणानुबंध जोपासण्याचा व त्याच्या राज्य आस्थांसाठी सेवा करण्याचा अमाप विशेषाधिकार प्राप्त झाला आहे.