वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ६/१ पृ. १९-२३
  • यहोवा निष्ठेने वागतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा निष्ठेने वागतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आरंभीचे आशाहीन जीवन
  • नवीन निष्ठा अंगीकारणे
  • इंग्लंडमध्ये पूर्ण-वेळेचे सेवाकार्य
  • आफ्रिकेतील विस्तृत सेवाकार्य
  • आफ्रिकेला परत
  • इंग्लंडमधील नवीन परिस्थिती
  • एक मिशनरी नेमणूकच आमचं घर झाली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • जगव्याप्त बंधूवर्गामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • विश्‍वव्यापी ईश्‍वरी शिक्षणाच्या विकासातील माझा सहभाग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ६/१ पृ. १९-२३

यहोवा निष्ठेने वागतो

पिटर पॅलिसर यांच्याद्वारे कथित

सन १९८५ मधील तो डिसेंबरचा महिना. केनियामधील नैरोबी या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही उतरण्याच्या बेतात होतो तेव्हा आमच्या मनातील उत्सुकता अगदी शिगेला पोहंचली होती. शहरातील रस्त्यांवरून गाडीने जाताना ओळखीच्या ठिकाणामुळे आणि आवाजांमुळे माझ्या मनात गतकाळातील आठवणींनी गर्दी केली होती.

यहोवाच्या साक्षीदारांच्या “सचोटी रक्षक” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही केनियामध्ये आलो होतो. बारा वर्षांपूर्वी आमच्या प्रचार कार्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा आम्हा दोघा नवराबायकोला केनियामधून हुसकावून लावण्यात आले होते. यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या शाखा सुविधांना बेथेल हे नाव दिले आहे आणि त्यावेळी आम्ही या बेथेलमध्येच राहायला होतो. आम्ही त्या ठिकाणाला भेट दिली तेव्हा आम्हाला आश्‍चर्याचा किती सुखद धक्का बसला होता!

दुपारचे जेवण तयार करण्यास मदत करत असलेली एक तरुण साक्षीदार आम्हाला दिसली आणि हिला तर आम्ही तिच्या वयाच्या दुसऱ्‍या वर्षांपासून ओळखत होतो. बेथेल कुटुंबाचे किमान सहा असे सदस्य होते ज्यांना आम्ही त्यांच्या बालपणापासून ओळखत होतो. आता त्यांना प्रौढ झाल्याचे तसेच आपल्या कुटुंबांसह सेवाकार्यात कार्यरत असल्याचे पाहणे किती आनंदाचे होते! “निष्ठावंतांशी तू निष्ठेने वागतो,” या बायबलच्या अभिवचनाच्या एकवाक्यतेत आपल्या यहोवा देवाने त्यांची काळजी घेतली होती. (२ शमुवेल २२:२६, कॉमन लँग्वेज भाषांतर.) माझे युवाजीवन आणि या तरुणांचे प्रतिफलदायी जीवन पाहिल्यानंतर मला त्या दोन्ही जीवनांत जमीन अस्मानाचे अंतर असल्याचे दिसून आले होते!

आरंभीचे आशाहीन जीवन

ऑगस्ट १४, १९१८ रोजी इंग्लंडमधील स्कॅरबॉरो येथे माझा जन्म झाला. दोन वर्षांनंतर माझी आई आणि सावत्रबहीण कॅनडामध्ये गेली त्यामुळे मी पुढील तीन वर्षे बाबा, आजी आणि आत्याच्या सहवासात घालवली. मी पाच वर्षांचा असताना आई परत आली आणि तिने मला बाबांपासून हिरावून घेतले व कॅनडातील मॉन्ट्रियलला मला घेऊन गेली. चार वर्षांनंतर शाळेत माझे नाव घालण्यासाठी तिने मला इंग्लंडमध्ये बाबांकडे परत पाठवले.

माझ्या आईचे आणि सावत्रबहिणीचे दर सहा महिन्यांला मला पत्र येत असे. मी एक चांगला नागरिक बनावे आणि राजाशी तसेच देशाशी एकनिष्ठ राहावे, असा उल्लेख ते आपल्या पत्रांच्या शेवटी नेहमी करत. राष्ट्रवाद आणि युद्ध योग्य नाही, हे माझे मत त्यांना पत्राद्वारे कळवल्यावर मात्र त्यांची निराशा होत असे. परंतु माझ्या किशोरावस्थेत मला योग्य ते मार्गदर्शन न लाभल्यामुळे मी उद्देशहीन जीवन जगत होतो.

जुलै १९३९ मध्ये म्हणजे दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या सहा आठवड्यांआधी मला ब्रिटिश लष्करात भरती करण्यात आले. त्यावेळी मी केवळ २० वर्षांचा होतो. लवकरच माझ्या पथकाला उत्तर फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. जर्मन विमाने आमच्यावर हल्ला चढवत तेव्हा आम्ही आमच्या रायफलीच्या साहाय्याने त्यांच्या दिशेने गोळीबार करत असू. आमचे हे जीवन म्हणजे तारेवरची कसरतच होती. जर्मन लष्करांनी आगेकूच करण्याआधी आम्ही माघार घेतली आणि १९४० मधील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डंकर्क सोडून जाणाऱ्‍यांमध्ये मी देखील होतो. संपूर्ण तुकडीतील सैनिकांची शवे समुद्र किनाऱ्‍यावर इतस्ततः पडल्याचे ते हृदयद्रावक दृश्‍य अजूनही मला आठवते. त्या हल्ल्यातून मी कसाबसा बचावलो आणि पूर्व इंग्लंडमधील हार्विचमध्ये छोट्याशा नावेने येऊन पोहंचलो.

त्यानंतरच्याच वर्षी म्हणजे मार्च, १९४१ मध्ये मला भारतात पाठविण्यात आले. त्याठिकाणी मला यांत्रिकी कारागिराचे प्रशिक्षण देण्यात आले. आजारामुळे काही दिवस दवाखान्यात काढल्यानंतर दिल्ली या भारताच्या राजधानीतील लष्करी तुकडीत माझी रवानगी झाली. घरापासून दूर आणि आजारी असल्यामुळे मी भवितव्याविषयी विचार करू लागलो. मरणानंतर आपले काय होते, याचा विशेषतः मी विचार करत असे.

नवीन निष्ठा अंगीकारणे

मी आणि बर्ट गॉल हा इंग्लंडचा सहरहिवासी असे आम्ही दोघे दिल्लीमध्ये एकाच खोलीत राहत असू. “धर्म हा दियाबलाचा आहे,” असे एके दिवशी त्याने म्हटले तेव्हा त्याच्या या विधानाने माझ्यात एक प्रकारची आस्था निर्माण झाली. त्याची पत्नी यहोवाची साक्षीदार झाली होती आणि ती त्याला वेळोवेळी बायबल प्रकाशने पाठवत असे. त्यांपैकी आशा (इंग्रजी) या पुस्तिकेने माझे लक्ष वेधले. त्या पुस्तिकेत पुनरुत्थानाची केलेली चर्चा मी वाचली तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.

सन १९४३ च्या काही काळाआधी बर्ट, आमच्यासोबत सैन्यतळावर काम करणाऱ्‍या टेडी ग्रुबर्ट नामक एका अँग्लो-इंडियन नागरिकाशी बोलला. टेडी हा यहोवाचा साक्षीदार असल्याचे कळल्यानंतर आम्हाला फार आश्‍चर्य वाटले होते. सन १९४१ मध्ये जरी यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांवर बंदी घालण्यात आली होती तरी तो आम्हाला दिल्लीमध्ये होणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना घेऊन गेला. त्या छोट्याशा मंडळीत मला आयुष्यात पहिल्यांदाच खरे, सस्नेह सख्य पाहण्यास मिळाले. ग्रीसमधून आलेल्या बॉसिल सॉटोस या वृद्ध ख्रिस्ती बांधवाने माझ्यामध्ये आस्था घेतली आणि माझ्या प्रश्‍नांची उत्तरे देखील दिली. आपण वृद्ध होतो आणि मरतो ते का, पुनरुत्थान आणि धार्मिकतेच्या नवीन जगाबद्दल देवाच्या अभिवचनांसंबंधी असलेल्या सर्व प्रश्‍नांची त्यांनी बायबलमधून स्पष्ट उत्तरे दिली.—प्रेषितांची कृत्ये २४:१५; रोमकर ५:१२; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४.

सन १९४२ मध्ये प्रकाशित झालेल्या, शांती—ती चिरस्थायी राहील का? (इंग्रजी) या पुस्तिकेने माझे लक्ष विशेषपणे आकर्षित केले. या पुस्तिकेने राष्ट्र संघ म्हणजे ‘किरमिजी रंगाचे श्‍वापद’ असल्याची ओळख करून दिली. (प्रकटीकरण १७:३) प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायातील ११ वचन उद्धृत करत त्या पुस्तिकेने म्हटले: “असे म्हटले जाऊ शकते, की तो संघ ‘होता आणि नाही.’” या पुस्तिकेने पुढे असे म्हटले: “जगिक राष्ट्रांची संघटना पुन्हा अस्तित्वात येईल.” सन १९४५ मध्ये, सुमारे तीन वर्षांनंतर, संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना झाली तेव्हा नेमके हेच घडले!

साक्षीदारांच्या साहित्यावर बंदी होती त्या काळात मला लाभलेल्या नवीन मित्रांची मला मदत करता आली. शांती—ती चिरस्थायी राहील का? या पुस्तिकेने भरलेले खोके जेव्हा येत असे तेव्हा ते सुरक्षित राहावे म्हणून मंडळी ते माझ्याकडे ठेवत असे. बंदी असलेले साहित्य लष्करी छावणीत असेल, असा विचार कोणाच्या मनाला शिवला तरी असता का? बांधवांना या पुस्तिकांचा नियमित पुरवठा व्हावा म्हणून मी सभांना जाताना प्रत्येक वेळी या पुस्तिकेच्या काही प्रती बरोबर घेऊन जात असे. घरांची झडती होण्याची बांधवांना भीती वाटत असल्यास बांधव त्यांच्याकडील बायबल साहित्य देखील माझ्याकडे लपवून ठेवत असत. अखेरीस, डिसेंबर ११, १९४४ मध्ये बंदी उठवण्यात आली.

आमच्या लष्करी तुकडीने १९४३ मध्ये नाताळ साजरा करण्यासाठी कार्यक्रम आखला तेव्हा ख्रिस्ती शिकवणींप्रती असणाऱ्‍या माझ्या निष्ठेची खरोखरच पारख झाली. डिसेंबरच्या थंडीत येशूचा जन्म झाला नाही आणि आरंभीचे ख्रिश्‍चन नाताळ साजरा करत नव्हते, हे मला पुरते माहीत झाल्यामुळे त्यांच्यात सामील होण्यास मी नकार दिला.—पडताळा लूक २:८-१२.

जबलपूर येथे “संघटित घोषक” हे संमेलन डिसेंबर २७ ते ३१, १९४४ मध्ये भरविण्यात आले तेव्हा त्यास सुमारे १५० जण उपस्थित होते आणि अर्थात मी देखील त्यामध्ये उपस्थित होतो. दिल्लीहून अधिवेशनाचे अनेक प्रतिनिधी रेल्वेचा प्रवास करून या अधिवेशनासाठी आले होते; हा प्रवास ६०० पेक्षा अधिक किलोमीटरचा होता. मोकळ्या आल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या या अधिवेशनाचे मला कधीही विस्मरण होणार नाही आणि येथे यहोवाची संघटना कार्यरत असल्याची प्रचिती मला आली.

अधिवेशनाच्या प्रतिनिधींची राहण्याची सोय एका शाळेत केली होती आणि येथे आम्ही राज्यगीते गायली तसेच आनंदी ख्रिस्ती संगतीचा आनंदही लुटला. त्या अधिवेशनाच्या दरम्यान मी जाहीर प्रचार कार्यात भाग घेण्यास सुरवात केली आणि तेव्हापासून हे कार्य माझ्यासाठी फार मोलाचे राहिले आहे.

इंग्लंडमध्ये पूर्ण-वेळेचे सेवाकार्य

सन १९४६ मध्ये मी इंग्लंडमध्ये परत आलो आणि लगेचच वुल्व्हरटन मंडळीत उपस्थित होऊ लागलो. या मंडळीत केवळ दहा प्रकाशक होते त्यामुळे त्या मंडळीत घरच्यासारखे वातावरण होते आणि भारतातील माझ्या बांधवांमध्ये मी ज्या सौख्याचा अनुभव घेतला तेच प्रेम मला येथे पाहायला मिळाले. विरा क्लिफ्टन ही तरुणी त्या मंडळीत प्रांजळ आणि सस्नेह व्यक्‍ती म्हणून उठून दिसत असे. माझ्याप्रमाणे तिचीही पायनियर अर्थात पूर्ण वेळेची सेविका होण्याची इच्छा असल्याचे मला कळले तेव्हा आम्ही दोघे मे २४, १९४७ मध्ये विवाहबद्ध झालो. राहण्याची सर्व व्यवस्था असलेल्या माझ्या गाडीची मी डागडुजी केली आणि त्यानंतरच्याच वर्षी हंटींगडनच्या शहरात आम्हाला आमची पहिली पायनियर नियुक्‍ती मिळाली.

त्या दिवसांत आम्ही सायकलींवरून भल्या पहाटे ग्रामीण भागात जाण्यासाठी निघत असू. दिवसभर प्रचार करत असताना आम्ही केवळ दुपारच्या जेवणाची शिदोरी सोडण्यासाठी थांबत असू आणि तेही अगदी थोडावेळ. घरी येताना विरुद्ध दिशेने कितीही वारा असला किंवा कितीही जोराचा पाऊस असला तरी आम्ही आमच्या सायकली चालवत असू; प्रभूच्या या कामात आम्ही आनंदी आणि समाधानी होतो.

सेवाकार्याचा विस्तार करण्याची आणि दुसऱ्‍या देशांतील लोकांनाही “सुवार्ता” सांगण्याची आमची इच्छा कालांतराने बळावली. (मत्तय २४:१४) यास्तव साऊथ लेन्सिंग, न्यूयॉर्क, अमेरिका येथील गिलियड मिशनरी प्रशालेस उपस्थित राहता यावे म्हणून आम्ही अर्ज केला. अखेरीस, २६ व्या गिलियड वर्गासाठी आम्हाला बोलावण्यात आले आणि फेब्रुवारी १९५६ मध्ये आम्ही पदवीधर झालो.

आफ्रिकेतील विस्तृत सेवाकार्य

आमची मिशनरी नियुक्‍ती आफ्रिकेतील उत्तर ऱ्‍होडेशिया (आता झांबिया) येथे होती. तेथे पोहंचल्यानंतर काही कालावधीतच आम्हाला त्या देशातील बेथेलमध्ये काम करण्यासाठी बोलावण्यात आले. बेथेलमध्ये मला पूर्व आफ्रिकासोबत होणारा पत्रव्यवहार पाहण्याचे काम देण्यात आले होते. सन १९५६ मध्ये केनिया—या पूर्व आफ्रिकी देशात—केवळ चार साक्षीदार होते; परंतु उत्तर ऱ्‍होडेशियात २४,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार होते. जेथे अधिक गरज आहे अशा ठिकाणी काम केल्यास किती बरे होईल, असा विचार विरा आणि मी करू लागलो.

आणि अनपेक्षितपणे, गिलियड प्रशालेचे आणखी एक निमंत्रण मला मिळाले; शाखा दफ्तरांतील पर्यवेक्षकांसाठी असलेल्या या कोर्सचा कालावधी दहा महिन्यांचा होता. विराला उत्तर ऱ्‍होडेशियात मागे ठेवून मी न्यूयॉर्क शहरात गेलो, त्यावेळी या ठिकाणी गिलियड प्रशाला भरत असे. नोव्हेंबर १९६२ मध्ये कोर्स संपल्यानंतर केनियामध्ये शाखा दफ्तराची स्थापना करण्यासाठी मला तेथे पाठविण्यात आले. या काळादरम्यान केनियामध्ये साक्षीदारांची संख्या शंभरापेक्षा अधिक झाली होती.

विराला भेटण्यासाठी उत्तर ऱ्‍होडेशियात परताना केनियातील नैरोबीमध्ये खरे तर मला काही काळ थांबण्यास हवे होते. परंतु मी आलो तेव्हा, गिलियड प्रशालेच्या २५ व्या वर्गातून पदवीधर झालेल्या बिल निसबेटशी माझी गाठ पडली आणि केनियामध्ये प्रवेश करण्याची अधिकृत परवानगी मिळण्याची संधी त्याचवेळी उपलब्ध असल्याचे त्यांनी मला सांगितले. आम्ही परदेशगमन अधिकाऱ्‍याची भेट घेतली आणि काही मिनिटांमध्ये केनियामध्ये पाच वर्षे राहण्याची परवानगी मला मिळाली. यास्तव त्यानंतर मी उत्तर ऱ्‍होडेशियात गेलोच नाही; उलटपक्षी विराच नैरोबीमध्ये माझ्यासोबत राहण्यासाठी आली.

अनपेक्षित स्वाहिली भाषेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आम्ही नैरोबीतील छोट्या मंडळीसोबत सेवाकार्यात सहभागी होऊ लागलो. स्वाहिली भाषेतील आमची प्रस्तुती घरमालकाला वाचून दाखविल्यानंतर घरमालक आम्हाला असे म्हणत असे, “मला इंग्रजी समजत नाही!” तरी देखील आम्ही हात टेकले नाही आणि कालांतराने आम्ही भाषेचा हा अडसर दूर केला.

जेरुसलेम आणि जेरिको यांसारखी बायबल आधारित नावे असलेल्या अनेक निवासी इमारती आमच्या क्षेत्रात होत्या. त्यामुळे आस्था जोपासण्यास फार काळ लागला नाही; परिणामी या क्षेत्रांतील अनेक लोक राज्याचे प्रचारक झाले. बायबलमधील सत्याचा या लोकांवर किती विलक्षण परिणाम झाला होता! देवाच्या राज्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे यहोवाच्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण झाले होते त्यामुळे त्यांच्यातील जातीय भेदभावाची भावना केव्हाच नाहीशी झाली होती. एवढेच नव्हे तर यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आंतरजातीय विवाह देखील होत होते आणि ही बाब साक्षीदार नसलेल्यांसाठी खरोखरच असामान्य होती.

नव्या राज्य प्रचारकांनी सत्याचा मोठ्या उत्साहाने अंगीकार केला होता. उदाहरणार्थ, आपल्या क्षेत्रांतील लोकांना बायबलमधील सत्याची ओळख व्हावी अशी सॅमसनची मनस्वी इच्छा होती त्यामुळे तेथे पायनियरांना पाठविण्याची तो एकसारखी विनंती करत होता. पायनियरांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्याने युकामबनीमधील क्षेत्रातील आपले घर आणखी वाढवले होते. लवकरच तेथे राज्य प्रचारकांच्या नव्या मंडळीची स्थापना करण्यात आली.

इथोपियाच्या पूर्व आफ्रिकी देशातील आपल्या बांधवांना मी अनेकदा भेटी दिल्या. तुरुंगवास, मारहाण आणि कडक देखरेख असतानाही तेथील बांधव प्रत्येक महिन्याला सरासरी २० पेक्षा अधिक तास सेवाकार्यात घालवत होते. केनियातील प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून एकदा तर इथोपियातील बांधवांनी आणि बहिणींनी एक आठवडा धोकेदायक डोंगरदऱ्‍यांतून दोन बसमधून प्रवास केला होता. त्यांच्या देशात राज्य साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी केलेली योजकता खरोखरच वाखाणण्याजोगी होती. केनियात राहून त्यांना नियमित साठा पुरवण्यात आम्ही आनंद मानत होतो.

सन १९७३ मध्ये केनियात आमच्या कार्यावर अधिकृतरीत्या बंदी घालण्यात आली आणि मिशनऱ्‍यांनाही देश सोडण्यासाठी सांगण्यात आले. तोपर्यंत केनियातील साक्षीदारांची संख्या १,२०० पेक्षा अधिक झाली होती आणि यांतील अनेक जण आम्हाला अविस्मरणीय निरोप देण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांची उपस्थिती इतकी प्रचंड होती, की आमच्यासोबत प्रवास करणाऱ्‍यांना आम्ही कोणी प्रसिद्ध व्यक्‍ती असल्याचे वाटले. विरा आणि मी इंग्लंडला परतलो आणि तेथे आम्हाला नियुक्‍ती मिळाली; परंतु आफ्रिकेत जाण्याची आमची फार इच्छा होती.

आफ्रिकेला परत

अशा प्रकारे, काही महिन्यांनंतर आम्हाला घाना या पश्‍चिम आफ्रिकी देशाच्या राजधानीतील अर्थात अक्रातील बेथेलमध्ये नवीन नियुक्‍ती मिळाली. आपले बांधव कोणत्या संकटांना तोंड देत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन मला या नियुक्‍तीमुळे घडले. बेथेल कुटुंबाच्या अन्‍नाची तसेच इतर गोष्टींची खरेदी करण्याचे काम माझ्याकडे होते आणि जेव्हा मी खाद्यपदार्थांचे आकाशाला भिडलेले भाव पाहिले तेव्हा मी अगदी स्तब्ध झालो. एखाद्या व्यक्‍तीला आपल्या आवश्‍यक गोष्टी खरेदी करणे प्रत्येक वेळी शक्य नव्हते. पेट्रोलचा तुटवडा आणि सुट्या भागांची टंचाई यांमुळे तर अधिकच समस्या उद्‌भवत होत्या.

यातूनच मी धीराचे महत्त्व जाणले आणि घानामधील बांधवांनी तर हा धीर आधीपासून विकसित केला होता. लाचलुचपतीने जीवनावश्‍यक गोष्टी प्राप्त करण्याच्या मोहाला धुडकावून लावण्याद्वारे त्यांनी कायम ठेवलेली उत्साही मनोवृत्ती पाहणे खरोखरच फार उत्तेजनदायक होते. परिणामी, घानातील यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्वश्रुत झाले आणि अनेक अधिकाऱ्‍यांकडून त्यांची वाहवा होऊ लागली.

तथापि, भौतिक गोष्टींचा तुटवडा असतानाही आध्यात्मिकरीत्या भरभराट होत होती. संपूर्ण देशात आपली बायबल प्रकाशने जवळजवळ प्रत्येक घरात देण्यात आली होती. आम्ही घानामध्ये १९७३ साली गेलो होतो तेव्हा तेथे १७,१५६ प्रचारक होते आणि १९८१ सालापर्यंत त्यांची संख्या २३,००० पेक्षाही अधिक झाली होती. याच वर्षी मला त्वचेचा कर्करोग झाला आणि यात काही शंका नाही, की भारतातील आणि आफ्रिकेतील कित्येक वर्षांच्या कडक उन्हामुळे तो विकोपास गेला होता; यास्तव नियमित उपाचारासाठी आम्हाला घाना सोडून इंग्लंडला परतणे भाग पडले.

इंग्लंडमधील नवीन परिस्थिती

इंग्लंडला आम्ही दोघांनी परत जायचे म्हणजे मला आता सेवाकार्यात विलक्षण तडजोड करावी लागणार होती. देवाचा आणि बायबलचा आदर करणाऱ्‍यांसोबत अगदी सहजगत्या बोलण्याची मला चांगलीच सवय झाली होती. परंतु लंडनमध्ये मला अशा मनोवृत्तीचे फार कमी लोक आढळतात. ब्रिटनमधील बांधवांची चिकाटी पाहून मला नवल वाटते. आध्यात्मिकरीत्या ‘गांजलेल्या आणि पांगलेल्या’ लोकांबद्दल अधिक सहानुभाव विकसित करण्याची गरज यामुळे मला पाहता आली आहे.—मत्तय ९:३६.

आफ्रिकेतून परत आल्यानंतर मी आणि विराने लंडन बेथेलमध्ये सेवा केली; सप्टेंबर १९९१ रोजी विराची जीवनज्योत मालवली त्यावेळी ती ७३ वर्षांची होती. अनेक वर्षांपर्यंत माझ्या बरोबरीने कार्य केलेल्या अशा प्रकारच्या विश्‍वासू सोबत्याच्या मृत्यूमुळे झालेले दुःख व्यक्‍त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला तिची पदोपदी आठवण होते. तरीही मी आनंदी आहे कारण बेथेल कुटुंबाचे सुमारे २५० सदस्य मला उत्तेजन देतात.

यहोवाच्या संघटनेच्या आगेकूच कार्याचा अनुभव घेणे आणि पूर्ण-वेळेच्या सेवाकार्यासाठी अनेक जण आपले जीवन वेचत असल्याचे पाहणे हा खरोखरच मी एक विशेषाधिकार समजतो. यापेक्षा अधिक चांगले जीवन कोणतेही नाही, या गोष्टीची मी तुम्हाला हमी देऊ शकतो कारण ‘यहोवा आपल्या निष्ठावान भक्‍तांस सोडीत नाही.’—स्तोत्र ३७:२८.

[२३ पानांवरील चित्र]

इंग्लंडमध्ये आम्ही १९४७ ते १९५५ पर्यंत पायनियर कार्य केले

[२३ पानांवरील चित्र]

भारतातील अधिवेशनाच्या दरम्यान सेवाकार्यात पहिल्यांदा

[२३ पानांवरील चित्र]

उत्तर ऱ्‍होडेशियामध्ये आम्ही मिशनरी होतो तेव्हा

[२३ पानांवरील चित्र]

सन १९८५ मध्ये माझ्या मित्रांसोबत ज्यांना मी १२ वर्षांनंतर भेटलो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा