राज्य घोषकांचा वृत्तान्त
यहोवाच्या ईश्वरशासित संघटनेकडे धाव घेणे
फार पूर्वी, संदेष्टा यशया हे जाहीर करण्यास प्रवृत्त झाला: ‘समुद्रतीरी राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे गौरव करा.’ (यशया २४:१५) जेथे “सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे” असे येशूने म्हटले त्या ‘जगाच्या’ भागात बेटेही असल्याचे यहोवाचे साक्षीदार मानतात.—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.
ताहितीच्या १,४०० किलोमीटर इशान्येला, मार्केसास बेटे आहेत. ही बेटे दक्षिण प्रशांत महासागरामधील फ्रेंच पॉलिनेशिया म्हटलेल्या दूरवरच्या द्वीपसमूहांचा भाग आहेत. येथे ज्वालामुखीची सुपीक जमीन व उष्ण आणि दमट वातावरण असल्याकारणाने पिकांसाठी येथील वातावरण अगदी अनुकूल आहे. तसेच, मार्केसासमध्ये एका वेगळ्या प्रकारची फळप्राप्ती देखील होत आहे. हिवा ओआ या बेटावर, राज्य संदेश ऐकून घेतलेल्या एका कुटुंबाचे उदाहरण विचारात घ्या.
पश्चिमी युरोपच्या तथाकथित सुसंस्कृत समाजात राहणारा झॉन् आणि त्याची पत्नी नादिन, ह्यांना ते समाज आवडत नव्हते. म्हणूनच ती व्यस्त जीवनशैली मागे सोडून आपल्या मुलासोबत मार्केसास बेटांवर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एका दूरच्या डोंगरदरीमध्ये त्यांचे नवीन बांबूचे घर वसले होते. त्यांना सर्वात जवळच्या शेजाऱ्यांकडे जाण्यासाठी उंचसखल डोंगरावरून सलग दोन तास चालावे लागत असे. डॉक्टर, शाळा व किराणामालाचे दुकान असलेले सर्वात जवळचे गाव, जीपने तीन तासाच्या अंतरावर होते.
झॉन् आणि नादिन यांना धर्माबद्दल आवड नव्हती. पण, जीवनाच्या मूळ उगमाविषयी ते नेहमी चर्चा करीत. कित्येकदा उत्क्रांतीवादाच्या जटिल सिध्दान्तांचा विचार त्यांनी केला होता. परंतु, यांमधील एकाही सिध्दान्ताने त्यांचे समाधान झाले नाही.
एकान्तवासात सहा वर्षे राहिल्यानंतर, यहोवाच्या दोघासाक्षीदारांनी त्यांना भेट दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. जवळच्या गाववासीयांकडून या साक्षीदारांना झॉन् आणि नादिन यांची माहिती मिळाली. स्वाभाविकपणे हे संभाषण, उत्क्रांतीवादाच्या चर्चेकडे वळाले. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक साक्षीदारांनी बरोबर आणल्याचे पाहून त्या जोडप्याला आनंदी आनंद झाला. जीवन येथे कसे आले याची पूर्ण माहिती प्रस्तुत करणारे पुस्तक प्राप्त करण्यात, झॉन् आणि नादिन यांना समाधान वाटले.
काही काळानंतर, एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीत, झॉन् आणि नादिनची प्रगती अतिशय हळू होती. लवकरच सबंध पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल, याची खात्री त्यांना पटली. त्यांना तीन मुले झाल्यानंतर, चार तास प्रवास करून ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यास फारच कठीण होते. तरीदेखील, यामुळे तेथे उपस्थित राहण्याचे त्यांनी सोडले नाही. सरतेशेवटी, झॉन् आणि नादिनने यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. मुख्य गावामध्ये भरविलेल्या अधिवेशनात त्यांचा बाप्तिस्मा झाला; तेथे उपस्थितीचा उच्चांक ३८ लोकांचा होता!
राज्य प्रचारकांच्या या छोट्या समूहाची मदत करण्यासाठी, या कुटुंबाने दूरवरच्या क्षेत्रात असलेले आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला. सुमारे हजार रहिवाश्यांच्या एका गावात त्यांनी स्थलांतर केले, तेथील स्थानिक मंडळीत झॉन् आता सेवा-सेवक या नात्याने काम करतात. आधी ज्या कुटुंबाने त्या तथाकथित सुसंस्कृतीपासून दूर राहण्यासाठी, या बेटांकडे धाव घेतली हाती, तेच कुटुंब आता खरा आश्रयस्थान अर्थात यहोवाची ईश्वरशासित संघटना मिळाल्याचा विशेषाधिकार मानतात.