ख्रिश्चनांनी गुप्त ठेवण्याचे धाडस करू नये असे एक रहस्य!
“मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, . . . गुप्तपणे काही बोललो नाही.”—योहान १८:२०.
१, २. शास्त्रवचनांमध्ये वापरण्यात आलेल्या मिस्टेरिओन या ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो?
मिस्टेरिओन हा ग्रीक शब्द, पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) यात २५ वेळा “पवित्र रहस्य” आणि ३ वेळा “गूढ” असा भाषांतरित करण्यात आला आहे. पवित्र म्हटलेले रहस्य नक्कीच महत्त्वपूर्ण असले पाहिजे! या रहस्याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्याचा सुहक्क मिळालेल्या व्यक्तीला सन्मानित वाटले पाहिजे, कारण विश्वाच्या सर्वोच्च देवासोबत रहस्य माहीत होण्याकरता त्याला पात्र ठरवण्यात आले आहे.
२ बहुतेक वेळा “गूढ” याऐवजी “पवित्र रहस्य” हे भाषांतर अधिक उचित वाटते अशी वाईन्स एक्स्पोसिटरी डिक्शनरी ऑफ द ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्र्स पुष्टी देते. ती मिस्टेरिओन विषयी असे म्हणते: “[ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचन] यांमध्ये ते (इंग्रजीत) सुचवले जाते त्याप्रमाणे गूढ शब्द सूचवत नाही तर, आकलन करण्याच्या मानवाच्या नैसर्गिक क्षमतेपलिकडील गूढ सुचवते, ते असे गूढ आहे जे केवळ ईश्वरी प्रकटीकरणाद्वारे समजू शकते व ते केवळ देवाच्या नियुक्त पद्धतीने व समयी आणि फक्त त्याच्या पवित्र आत्म्याचे ज्ञानदान झालेल्यांनाच कळवले जाते. सर्वसामान्य अर्थाने गूढ, प्रकट न केलेल्या ज्ञानाला सूचित करते; पण शास्त्रवचनीय अर्थाने ते प्रकट सत्याला सूचित करते. यास्तव, याविषयाशी निगडीत असलेल्या संज्ञा खासकरून, ‘माहीत करून दिलेले,’ ‘स्पष्ट केलेले,’ ‘प्रकट केलेले,’ ‘प्रचार केलेले,’ ‘समजलेले,’ ‘दिलेले,’ या आहेत.”
३. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी विशिष्ट गुह्य धार्मिक गटांपासून भिन्न कशी होती?
३ हे स्पष्टीकरण, पहिल्या शतकात भरभराटीस आलेले गुह्य धार्मिक गट आणि नव्याने स्थापन झालेली ख्रिस्ती मंडळी यांतील मोठा फरक ठळकपणे दाखवते. याशिवाय, गुप्त पंथांत अनुप्रविष्ट केलेल्यांना बहुतेक वेळा धार्मिक शिकवणुकी गुप्त राखण्याबद्दल मौन व्रत पाळण्याचे बंधन असते, ख्रिश्चनांना अशा प्रकारचे व्रत केव्हाही पाळावे लागले नाही. प्रेषित पौलाने ‘पवित्र रहस्यातील देवाच्या सुज्ञतेला,’ ‘या युगातल्या अधिकाऱ्यांपासून’ गुप्त असलेले ‘गुप्त ज्ञान’ असे संबोधले हे खरे आहे. देवाच्या आत्म्याद्वारे ज्या ख्रिश्चनांना ते प्रकट झाले आहे त्यांच्यापासून ते गुप्त नाही जेणेकरून ते हे ज्ञान जाहीर करू शकतील.—१ करिंथकर २:७-१२; पडताळा नीतिसूत्रे १:२०.
‘पवित्र रहस्याची’ ओळख पटते
४. “पवित्र रहस्य” कोणावर केंद्रित आहे व कसे?
४ यहोवाचे “पवित्र रहस्य” येशू ख्रिस्तावर केंद्रित आहे. पौलाने लिहिले: “ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे [यहोवाने] स्वतःच्या इच्छेनुरुप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” (इफिसकर १:९, १०) ‘ख्रिस्त, जो देवाच्या पवित्र रहस्याचे अचूक ज्ञान,’ आहे ते ज्ञान घेण्याच्या गरजेकडे पौलाने लक्ष आकर्षित केले तेव्हा त्याने विशिष्टपणे ‘पवित्र रहस्याचे’ स्वरूप दाखवले.—कलस्सैकर २:२.
५. ‘पवित्र रहस्यात’ कशाचा समावेश होतो?
५ परंतु, “पवित्र रहस्य” अनेक पैलूंचे रहस्य असल्यामुळे यात आणखी पुष्कळ समाविष्ट आहे. त्यात, येशू हा वाग्दत्त संतान किंवा मशीहा म्हणून त्याची ओळखच नव्हे तर, देवाच्या उद्देशांमध्ये त्याला दिलेली भूमिका याचा देखील समावेश होतो. त्यामध्ये एक स्वर्गीय सरकार, देवाचे मशिही राज्य आहे ज्याचे स्पष्टीकरण येशूने आपल्या शिष्यांना असे म्हणताना दिले: “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय १३:११.
६. (अ) “पवित्र रहस्य” ‘गतयुगात गुप्त ठेवण्यात आले होते,’ असे म्हणणे बरोबर का आहे? (ब) ते प्रगतिशीलपणे कसे प्रकट करण्यात आले?
६ मशिही राज्यासाठी आधार पुरवण्याचा देवाचा उद्देश असा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला तेव्हापासून ‘गूज पूर्ण’ करण्यापर्यंतच्या दरम्यान बराच काळ लोटण्याची गरज होती. (प्रकटीकरण १०:७; उत्पत्ति ३:१५) प्रकटीकरण १०:७ आणि ११:१५ ची तुलना शाबीत करते त्याप्रमाणे, राज्याची स्थापना झाल्यावर ते पूर्ण केले जाणार होते. वास्तविक पाहता, एदेनमध्ये राज्याविषयीचे पहिले अभिवचन दिल्यापासून नेमस्त राजाचे सा.यु. २९ मध्ये प्रकट होणे यामध्ये ४,००० वर्षे सरली. १९१४ मध्ये स्वर्गामध्ये राज्याची स्थापना व्हावयाच्या आधी आणखी १,८८५ वर्षे उलटली. अशाप्रकारे सुमारे ६,००० वर्षांच्या कालावधीदरम्यान “पवित्र रहस्य” प्रगतिशीलपणे प्रकट करण्यात आले. (पृष्ठ १६ पहा.) पौलाने जेव्हा “जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे,” असे म्हटले तेव्हा तो निश्चितच बरोबर होता.—रोमकर १६:२५-२७; इफिसकर ३:४-११.
७. आपल्याला विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गावर पूर्ण भरवसा का ठेवता येऊ शकतो?
७ मर्यादित जीवनकाल असलेल्या मानवांच्या तुलनेत, यहोवाला समयाच्या दबावामुळे आपली रहस्ये अकाली प्रकट करावी लागत नाहीत. या वस्तुस्थितीमुळे आपण, काही बायबल प्रश्नांचे स्पष्टीकरण आपले समाधान होईपर्यंत दिले जाता येत नाही तेव्हा अधीर होण्याचे टाळावे. ख्रिस्ती घराण्याला यथाकाळी अन्न देण्याची कामगिरी मिळालेल्या विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाला त्याच्या विनयशीलतेमुळे, उद्धटपणे पुढे पुढे जाऊन अजूनही अस्पष्ट असलेल्या गोष्टींबद्दल मनास येईल तो तर्क करण्याचे टाळण्यास मदत होते. दास वर्ग हट्टवादी होण्याचे टाळतो. नीतिसूत्रे ४:१८ तील बोल मनात स्पष्ट बाळगून, तो सध्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही हे कबूल करण्याइतपत नम्र आहे. परंतु यहोवा आपल्या ठरल्या वेळी आणि आपल्या पद्धतीनुसार त्याच्या उद्देशांविषयीची रहस्ये प्रकट करीत राहील हे जाणणे किती स्फुर्तीदायक आहे! आपण केव्हाही यहोवाच्या व्यवस्थेमुळे अधीर होऊन, रहस्ये प्रकटविणाऱ्याच्या पुढे जाण्याचा मूर्ख प्रयत्न करू नये. यहोवा आज ज्या माध्यमाचा उपयोग करीत आहे ते असले काही करीत नाही हे जाणणे किती सांत्वन देणारे आहे! ते विश्वासू आणि बुद्धिमान आहेत.—मत्तय २४:४५; १ करिंथकर ४:६.
प्रकटविलेले रहस्य सांगितले पाहिजे!
८. “पवित्र रहस्य” प्रकट केले पाहिजे हे आपल्याला कसे माहीत होते?
८ यहोवाने ख्रिश्चनांना “पवित्र रहस्य” यासाठी प्रकट केले नाही की त्यांनी ते गुप्त ठेवावे. ते प्रकट केले पाहिजे; “तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरांतल्या सर्वांना प्रकाश देतो; त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे,” या येशूने दिलेल्या तत्त्वाच्या सुसंगतेत ते प्रकट केले पाहिजे. हे तत्त्व केवळ काही पाळकांकरताच नव्हे तर येशूच्या सर्व अनुयायांकरता आहे.—मत्तय ५:१४-१६; २८:१९, २०.
९. काही लोकांचा दावा असला तरी, येशू कोणी क्रांतीकारी नव्हता हे कसे सिद्ध होते?
९ गुप्त उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुयायांची एक गुप्त संघटना बनवण्याचा येशूचा कोणताही क्रांतीकारी उद्देश नव्हता. आरंभिक ख्रिस्ती विश्वास व समाज (इंग्रजी) नामक आपल्या पुस्तकात रॉबर्ट एम. ग्रान्ट यांनी, आरंभीच्या ख्रिश्चनांसंबंधी दुसऱ्या शतकातील जस्टीन मार्टरने युक्तीवादाने जे आत्मसमर्थन केले त्याविषयी असे लिहिले: “ख्रिस्ती जन क्रांतीकारी असते तर आपले उद्देश साध्य करण्याकरता ते गुप्त राहिले असते.” पण ख्रिस्ती जन ‘गुप्त राहण्यासोबतच’ ‘डोंगरावर वसलेल्या नगरासमान’ कसे होऊ शकतील बरे? त्यांना आपला दिवा मापाखाली लपवून ठेवण्याचे धाडसच झाले नाही! म्हणूनच, त्यांच्या कार्यांमुळे सरकाराला कोणताही धोका नव्हता. हा लेखक पुढे त्यांचे, “शांती आणि सुव्यवस्था राखण्याबाबत सम्राटाचे खास दोस्त,” असे वर्णन करतो.
१०. ख्रिश्चनांनी आपली ओळख का लपवू नये?
१० तथाकथित धार्मिक पंथाचे सदस्य असल्याचे आपल्या शिष्यांनी लपवून ठेवावे अशी येशूची इच्छा नव्हती. (प्रेषितांची कृत्ये २४:१४; २८:२२) आपला प्रकाश पाडण्याकडे दुर्लक्ष केल्यास ख्रिस्त आणि त्याचा पिता अर्थात रहस्ये प्रकटविणारा, यांना आवडणार नाही, शिवाय आपणही आनंदी राहणार नाही.
११, १२. (अ) ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार व्हावा अशी यहोवाची इच्छा का आहे? (ब) येशूने योग्य उदाहरण कसे मांडले?
११ ‘कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.’ (२ पेत्र ३:९; यहेज्केल १८:२३; ३३:११; प्रेषितांची कृत्ये १७:३०) “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे,” म्हणून केवळ काहींसाठीच नव्हे तर सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास करणाऱ्या पश्चात्तापी मानवांना पापांची क्षमा होऊ शकते. (योहान ३:१६) येणाऱ्या न्यायाच्या वेळी स्वतःचा, शेरडे नव्हे तर मेंढरे असा न्याय व्हावा म्हणून आवश्यक पावले उचलण्यास लोकांना मदत करणे महत्त्वाचे आहे.—मत्तय २५:३१-४६.
१२ खरा ख्रिस्ती विश्वास गुप्त ठेवण्यासाठी नाही; शक्य असलेल्या सर्व उचित प्रसंगी तो प्रकट केला पाहिजे. स्वतः येशूने याबाबतीत कित्ता घालून दिला. प्रमुख याजकांनी त्याच्या शिष्यांबद्दल आणि त्याच्या शिकवणुकींबद्दल विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला: “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही.” (योहान १८:१९, २०) हे पूर्वोदाहरण लक्षात ठेवून, कोणता देवभीरू मनुष्य देवाने जाहीर करावयास लावलेला संदेश गुपित ठेवण्याची कल्पना करील? चिरकालिक जीवनाकडे नेणारी “ज्ञानाची किल्ली” दडवून ठेवण्याची कोणाची हिम्मत होईल? असे केल्यास, तो पहिल्या शतकातील धार्मिक दांभिक लोकांप्रमाणे होईल.—लूक ११:५२; योहान १७:३.
१३. प्रत्येक संधीत आपण प्रचार का करावा?
१३ आपण यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या राज्याचा संदेश गुप्त ठेवला आहे असे कोणीही म्हणता कामा नये! आपला संदेश स्वीकारला अगर नाकारला गेला तरी, त्याचा प्रचार करण्यात आला आहे हे लोकांना माहीत झाले पाहिजे. (पडताळा यहेज्केल २:५; ३३:३३.) यास्तव, आपण लोकांना जेथे जेथे भेटतो तेथे तेथे सर्वांना सत्याचा संदेश सांगण्याच्या हरएक संधीचा फायदा घेऊ या.
सैतानाच्या जबड्यांत गळ टोचणे
१४. खुलेपणाने उपासना करण्यास आपण का कचरू नये?
१४ बहुतेक ठिकाणी, यहोवाच्या साक्षीदारांची अधिकाधिक प्रमाणात प्रसार माध्यमातून चर्चा केली जात आहे. आरंभीच्या ख्रिश्चनांच्या बाबतीत जे झाले त्याप्रमाणे अनेकदा त्यांना चुकीचे समजले जाते व संशयास्पद धार्मिक पंथ व गुप्त संघटनांच्या वर्गात गणले जाते. (प्रेषितांची कृत्ये २८:२२) प्रचार कार्यातील आपल्या खुलेपणामुळे आपल्यावर हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे का? स्वतःहून वाघाच्या तोंडात पडणे मूर्खपणाचे ठरेल व येशूने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे होईल. (नीतिसूत्रे २६:१७; मत्तय १०:१६) परंतु, राज्य प्रचाराचे व लोकांना आपल्या जीवनात सुधारणा करावयाचे फायदेकारक कार्य लपवून ठेवण्यासारखे नाही. त्यामुळे यहोवाचे गौरव होते, त्याला उंचावले जाते, त्याच्याकडे आणि त्याच्या स्थापित राज्याकडे लोकांचे लक्ष आकर्षिविले जाते. पूर्व युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच बायबल सत्याला मिळणारा संतोषजनक प्रतिसाद काही अंशी, आता तेथे जितक्या खुलेपणाने सत्याचा प्रचार केला जाऊ शकतो त्याची परिणती आहे.
१५, १६. (अ) आपल्या खुलेपणामुळे व आध्यात्मिक समृद्धतेमुळे कोणते उद्देश साध्य होतात पण हे चिंतेचे कारण आहे का? (ब) यहोवा सैतानाच्या जबड्यात गळ का टोचतो?
१५ यहोवाच्या साक्षीदारांचा प्रचार करतानाचा खुलेपणा, ते उपभोगत असलेल्या आध्यात्मिक परादीसचा आनंद आणि त्यांची मानवी साधनसंपत्ती आणि भौतिक संपत्ती या दोघांतील समृद्धता—लोकांच्या चटकन नजरेस पडते. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आकर्षित करताना, विरोधकांना वरील कारणांमुळे तिरस्कार वाटेल. (२ करिंथकर २:१४-१७) वस्तुतः, ही समृद्धता पाहून कदाचित सैतानाच्या समूहाला देवाच्या लोकांवर हल्ला करण्याचा मोह होऊ शकतो.
१६ हे चिंतेचे कारण आहे का? यहेज्केलच्या ३८ व्या अध्यायात आढळणाऱ्या यहोवाच्या भविष्यवाणीनुसार तर नाही. मागोग देशातील गोग असे ज्याचे वर्णन केले त्या दियाबल सैतानाला, १९१४ मध्ये राज्याची स्थापना झाल्यावर पृथ्वीवर टाकल्यामुळे तो देवाच्या लोकांवर हल्ला करील असे त्यात भाकीत केले आहे. (प्रकटीकरण १२:७-९) यहोवा गोगला सांगतो: “तू म्हणशील, ज्या प्रदेशांतील गावांना तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन; जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, व ज्यांपैकी कोणालाहि कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत त्यांजवर मी चालून जाईन; लोकांची मालमत्ता हिरावण्यासाठी व लुटालूट करावयासाठी; ज्या ओसाड ठिकाणी पुनः वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा, आणि निरनिराळ्या राष्ट्रांतून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांजवर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन.” (यहेज्केल ३८:११, १२) तथापि वचन ४ दाखवते, की देवाच्या लोकांना या हल्ल्यामुळे घाबरण्याची गरज नाही कारण ते यहोवाचे कार्य आहे. पण, यहोवा आपल्या लोकांवर हल्ला होण्यास अनुमती का देईल—नव्हे हल्ला होण्यास चेतवतो तरी कशाला? वचन २३ मध्ये आपण यहोवाचे उत्तर वाचतो: “या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करीन, आणि बहुत राष्ट्रांस माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर [यहोवा, NW] आहे.”
१७. गोगच्या जवळ येऊन ठेपलेल्या हल्ल्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहावे?
१७ यास्तव, गोगच्या हल्ल्याच्या भीतीने जीवन कंठण्याऐवजी यहोवाचे लोक या बायबल भविष्यवाणीच्या पुढील पूर्णतेची उत्सुकतेने वाट पाहतात. यहोवा आपल्या दृश्य संघटनेला समृद्ध व आशीर्वादित करण्याद्वारे सैतानाच्या जबड्यात गळ टोचून त्याला आणि त्याच्या सैनिकी बळाचा पराजय करतो हे जाणणे किती रोमांचकारी आहे!—यहेज्केल ३८:४.
आता पूर्वीपेक्षा अधिक!
१८. (अ) आज अनेक लोकांना कोणती जाणीव होत आहे व का? (ब) राज्य प्रचाराला मिळणारा प्रतिसाद शक्तिशाली प्रेरणा कसा ठरतो?
१८ बायबल आधारित दृष्टिकोन इतके लोकप्रिय नसले तरी आधुनिक काळात, यहोवाचे साक्षीदार ते अधिक खुलेपणाने सांगत आहेत. ते, अनेक दशकांपासून धुम्रपान आणि अंमली पदार्थांच्या दुरूपयोगाच्या धोक्यांविषयी, सोशीक बालशिक्षणाच्या अदूरदर्शीपणाविषयी, अवैध लैंगिक कृत्य आणि हिंसा यांनी खच्चून भरलेल्या मनोरंजनाच्या दुष्परिणामांविषयी व रक्त संक्रमणाच्या धोक्यांविषयी इशारा देत आले आहेत. त्यांनी उत्क्रांती सिद्धान्ताची विसंगती देखील दाखवली आहे. आज पुष्कळ लोक म्हणत आहेत, “यहोवाच्या साक्षीदारांचे म्हणणे बरोबर आहे.” आपण आपले दृष्टिकोन इतक्या उघडपणे जाहीर केले नसते तर ते अशी प्रतिक्रिया दाखवू शकले नसते. शिवाय वरील विधान करण्याद्वारे ते एका दृष्टीने, “सैताना, तू लबाड आहेस; यहोवाच खरा आहे,” असेच म्हणत असतात या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करीत सत्याचे वचन निर्भीडपणे बोलत राहण्याकरता केवढी ही शक्तिशाली प्रेरणा!—नीतिसूत्रे २७:११.
१९, २०. (अ) यहोवाच्या लोकांनी १९२२ मध्ये कोणता निर्धार व्यक्त केला व हे शब्द आजही लागू होतात का? (ब) आपण यहोवाच्या ‘पवित्र रहस्याकडे’ कोणत्या दृष्टीने पाहावे?
१९ याबाबतीत यहोवाच्या लोकांनी केव्हाच आपली जबाबदारी ओळखली आहे. सन १९२२ मधील एका उल्लेखनीय अधिवेशनात, वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी असे म्हणून आपल्या श्रोतृगणाला रोमांचित केले: “विचारी, जागरूक, कार्यशील, धैर्यशील असा. प्रभूचे विश्वासू आणि खरे साक्षी राहा. बॅबिलोनच्या सर्व मागमूसाचे उच्चाटन होईपर्यंत लढाईत पुढे जा. सर्वदूर संदेशाची घोषणा करा. जगाला माहीत झाले पाहिजे की यहोवा देव आहे आणि येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. हा सर्वात मोठा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधी आहात. म्हणून, राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा.”
२० हे शब्द १९२२ मध्ये महत्त्वपूर्ण होते तर, ७५ वर्षांनंतर म्हणजे न्यायाधीश व सूड घेणारा म्हणून येशूचे प्रकट होणे जवळ आले असताना ते केवढे महत्त्वपूर्ण आहे बरे! यहोवाच्या स्थापित राज्याचा आणि देवाचे लोक उपभोगत असलेल्या आध्यात्मिक परादीसचा संदेश उदात्त “पवित्र रहस्य” असल्यामुळे देवाच्या लोकांना तो स्वतः पुरताच ठेवण्याचे धाडस होत नाही. स्वतः येशूने इतक्या स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे त्याच्या अनुयायांनी यहोवाच्या चिरकालिक उद्देशातील त्याच्या प्रमुख स्थानासंबंधाने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्षीदार असले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १:८; इफिसकर ३:८-१२) वास्तविक पाहता, रहस्ये प्रकट करणारा देव यहोवा याचे सेवक या नात्याने आपण हे रहस्य आपल्याजवळच ठेवण्याचे धाडस करू नये!
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ “पवित्र रहस्य” काय आहे?
◻ ते जाहीर करावयाचे आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
◻ कोणत्या कारणामुळे गोग यहोवाच्या लोकांवर हल्ला करतो व आपण याकडे कोणत्या दृष्टीने पाहावे?
◻ आपण प्रत्येकाने काय करण्याचा निर्धार करावा?
[१६ पानांवरील चौकट]
प्रगतिशीलपणे प्रकटविलेले “पवित्र रहस्य”
◻ सा.यु.पू. ४०२६ नंतर: सैतानाचा नाश करण्याकरता एक संतान उत्पन्न करण्याविषयी देव अभिवचन देतो.—उत्पत्ति ३:१५
◻ सा.यु.पू. १९४३: अब्राहामाचा करार मान्य केला जातो, संतान अब्राहामाद्वारे येईल असे अभिवचन दिले जाते.—उत्पत्ति १२:१-७
◻ सा.यु.पू. १९१८: कराराचा वारस या नात्याने इसहाकाचा जन्म.—उत्पत्ति १७:१९; २१:१-५
◻ सा.यु.पू. १७६१ च्या सुमारास: इसहाकाचा पुत्र याकोब याच्याद्वारे संतान येईल अशी यहोवा पुष्टी देतो.—उत्पत्ति २८:१०-१५
◻ सा.यु.पू. १७११: ते संतान आपला पुत्र यहुदा याच्याद्वारे येईल असे याकोब सूचित करतो.—उत्पत्ति ४९:१०
◻ सा.यु.पू. १०७०-१०३८: राजा दावीदाला कळून येते, की ते संतान आपला वंशज असेल व तो अनंतकाळासाठी राजा या नात्याने राज्य करील.—२ शमुवेल ७:१३-१६; स्तोत्र ८९:३५, ३६
◻ सा.यु. २९-३३: संतान, मशीहा, भावी न्यायाधीश व नेमस्त राजा अशी येशूची ओळख करण्यात आली.—योहान १:१७; ४:२५, २६; प्रेषितांची कृत्ये १०:४२, ४३; २ करिंथकर १:२०; १ तीमथ्य ३:१६
◻ आपले सहशासक व न्यायाधीश असतील, स्वर्गीय राज्याची पृथ्वीवर प्रजा असेल, आपले सर्व अनुयायी राज्य प्रचारक असले पाहिजेत हे येशू प्रकट करतो.—मत्तय ५:३-५; ६:१०; २८:१९, २०; लूक १०:१-९; १२:३२; २२:२९, ३०; योहान १०:१६; १४:२, ३
◻ जगिक घटना पुष्टी देतात त्याप्रमाणे राज्य एका निर्धारित समयी स्थापित केले जाईल हे येशू प्रकट करतो.—मत्तय २४:३-२२; लूक २१:२४
◻ सा.यु. ३६: गैर यहुदी देखील राज्याचे सहवारीस असतील हे पेत्राला कळून चुकते.—प्रेषितांची कृत्ये १०:३०-४८
◻ सा.यु. ५५: राज्याच्या सहवारीसांना ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान अमरत्व व अविनाशीपण प्राप्त करण्यासाठी पुनरुत्थित केले जाईल.—१ करिंथकर १५:५१-५४
◻ सा.यु. ९६: आपल्या अभिषिक्त अनुयायांवर आधीपासूनच राज्य करणाऱ्या येशूने प्रकट केले, की यांची पूर्ण संख्या १,४४,००० असेल.—इफिसकर ५:३२; कलस्सैकर १:१३-२०; प्रकटीकरण १:१; १४:१-३
◻ सा.यु. १८७९: देवाचे “पवित्र रहस्य” पूर्ण होण्यामध्ये १९१४ हे वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचे झायन्स वॉच टावर दाखवते
◻ सा.यु. १९२५: द वॉच टावर स्पष्टीकरण देते, की राज्याचा जन्म १९१४ मध्ये झाला; राज्याबद्दलचे “पवित्र रहस्य” जाहीर केले पाहिजे.—प्रकटीकरण १२:१-५, १०, १७
[१५ पानांवरील चित्र]
यहोवाचे साक्षीदार आपला नेता येशूप्रमाणे यहोवाच्या राज्याची जाहीरपणे घोषणा करतात