यहोवा—रहस्ये प्रकटविणारा देव
“रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे.”—दानीएल २:२८.
१, २. (अ) यहोवा त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूपासून कसा भिन्न आहे? (ब) मानव ही भिन्नता कशी प्रतिबिंबित करतात?
यहोवा, विश्वाचा सर्वश्रेष्ठ आणि प्रेमळ देव, एकमेव सृष्टीकर्ता, सुज्ञ व न्यायी परमेश्वर आहे. त्याला आपली ओळख, कार्ये किंवा उद्देश लपवण्याची गरज भासत नाही. आपल्या वेळेनुसार व विवेकबुद्धीनुसार तो स्वतःस प्रकटवितो. अशाप्रकारे, स्वतःची खरी ओळख व हेतू लपवण्याचा प्रयत्न करणारा त्याचा शत्रू दियाबल सैतान याच्यापासून तो भिन्न आहे.
२ यहोवा आणि सैतान जसे एकमेकांच्या विरोधात आहेत तसेच त्यांचे उपासकही एकमेकांच्या विरोधात आहेत. लबाडी आणि फसवेगिरी ही सैतानाचे अनुकरण करणाऱ्यांची लक्षणे आहेत. अंधकाराची कामे करत असताना ते स्वतःला आपण उपकारकर्ते आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. ही वस्तुस्थिती पाहून आश्चर्यचकित न होण्यास करिंथमधील ख्रिश्चनांना सांगण्यात आले होते. “कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१३, १४) दुसऱ्या बाजूला पाहता, ख्रिश्चन लोक ख्रिस्ताला आपला नेता मानतात. पृथ्वीवर असताना त्याने हुबेहूब आपल्या पित्याचे, अर्थात यहोवा देवाचे व्यक्तिमत्त्व उमटवले. (इब्री लोकांस १:१-३) म्हणून, ख्रिस्ताचे अनुकरण करण्याद्वारे ख्रिस्ती लोक सत्याच्या, उघडपणाच्या व प्रकाशाच्या देवाचे अनुकरण करतात. त्यांनाही आपली ओळख, कार्ये किंवा उद्देश लपवावे लागत नाही.—इफिसकर ४:१७-१९; ५:१, २.
३. यहोवाचे साक्षीदार होणाऱ्या लोकांना धाकदपटशाहीने ‘गुप्त संप्रदायात’ सामील केले जाते, हा आरोप आपण खोडून कसा काढू शकतो?
३ यहोवा, त्याला उचित वाटणाऱ्या समयी, मानवांना पूर्वी माहीत नसलेल्या आपल्या उद्देशांबद्दलची व भवितव्याबद्दलची सविस्तर माहिती प्रकट करतो. या अर्थी तो रहस्ये प्रकटविणारा देव आहे. याचकारणास्तव, त्याची सेवा करू इच्छिणाऱ्या लोकांना अशा प्रकारची प्रकट माहिती शिकण्यासाठी आमंत्रित केले जाते, नव्हे, आर्जविले जाते. सन १९९४ मध्ये एका यूरोपियन देशातील १,४५,००० पेक्षा अधिक साक्षीदारांच्या घेतलेल्या सर्वेक्षणात कळून आले, की प्रत्येकाने साक्षीदार होण्याचा निर्णय घेण्याआधी तब्बल तीन वर्षांपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणुकींचे व्यक्तिगत परीक्षण केले होते. त्यांनी ही निवड, धाकदपटशामुळे नव्हे तर आपल्या इच्छा स्वातंत्र्याच्या आधारे केली. आणि तेव्हापासून त्यांना इच्छेचे व कार्याचे स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ, काही अल्प लोकांना ख्रिश्चनांकरता असलेले नैतिकतेचे उच्च दर्जे अमान्य झाल्यामुळे त्यांनी साक्षीदार न राहण्याचे ठरवले. परंतु मनोरंजक गोष्ट अशी, की गेल्या पाच वर्षांत, अशा भूतपूर्व अनेक साक्षीदारांनी साक्षीदारांसोबतचा आपला सहवास राखण्यास व कार्य करण्यास पुन्हा आरंभ करण्याकरता पावले उचलली.
४. विश्वासू ख्रिश्चनांनी कोणत्या गोष्टीमुळे व का अस्वस्थ होण्याची गरज नाही?
४ अर्थात पहिल्यांदा साक्षीदार असलेले सर्वच जण पुन्हा येत नाहीत; त्यांतील काही जण तर एकेकाळी ख्रिस्ती मंडळीत जबाबदार पदी होते. यात नवल करण्यासारखे काही नाही, कारण येशूचा अत्यंत निकटचा एक अनुयायी, यहुदा इस्कर्योत देखील त्याला सोडून गेला. (मत्तय २६:१४-१६, २०-२५) परंतु, यामुळे ख्रिस्ती विश्वासाविषयी अस्वस्थ होण्याची गरज आहे का? यहोवाचे साक्षीदार ज्या सफलतेने आपले शैक्षणिक कार्य पार पाडत आहेत ती सफलता यामुळे निरर्थक ठरते का? मुळीच नाही, यहुदा इस्कर्योताच्या विश्वासघातकी कृत्यामुळे देखील देवाचे उद्देश पूर्ण होण्यापासून थांबले नाहीत.
सर्वसमर्थ आणि तरीही प्रेमळ
५. यहोवा आणि येशू, मानवांवर प्रेम करतात हे आपण कसे जाणतो व त्यांनी ही प्रीती कशी प्रदर्शित केली आहे?
५ यहोवा प्रेमळ देव आहे. तो लोकांची काळजी वाहतो. (१ योहान ४:७-११) तो इतका उदात्त असूनही त्याला मानवांसोबत मैत्री करावयास आवडते. त्याच्या एका प्राचीन सेवकाविषयी आपण असे वाचतो: “‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;’ आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.” (याकोब २:२३; २ इतिहास २०:७; यशया ४१:८) मानवी मित्र जसे खासगी किंवा गुप्त गोष्टी एकमेकांना सांगतात तसेच यहोवाही आपल्या मित्रांना सांगतो. याबाबतीत येशूने आपल्या पित्याचे अनुकरण केले कारण त्याने शिष्यांना आपले मित्र बनवून त्यांना गुप्त गोष्टी सांगितल्या. त्याने त्यांना सांगितले: “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहान १५:१५) यहोवा, त्याचा पुत्र आणि त्यांचे मित्र यांमध्ये असलेली समान खासगी माहिती किंवा “गुप्त” गोष्टी त्यांना प्रीतीच्या आणि भक्तीच्या अतूट बंधनात संयुक्त करते.—कलस्सैकर ३:१४.
६. यहोवाला आपले हेतू लपवावे का लागत नाहीत?
६ “तो व्हावयास कारणीभूत ठरतो,” हा यहोवाच्या नावाचा अर्थ, त्याचे उद्देश साध्य करण्याकरता त्याला वाटेल ते होण्याच्या त्याच्यामधील क्षमतेला सूचित करतो. मानवांपासून भिन्न असलेल्या यहोवाला, इतर जण आपले उद्देश पूर्ण करताना अटकाव करतील या भीतीपोटी ते उद्देश लपवण्याची गरज भासत नाही. तो अपयशी ठरूच शकत नाही, म्हणूनच तर तो जे काही उद्देशितो ते आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये उघडपणे प्रकट करतो. तो वचन देतो: ‘माझे वचन माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.’—यशया ५५:११.
७. (अ) यहोवाने एदेनमध्ये काय भाकीत केले व देव खरा असल्याचे सैतानाने कसे शाबीत केले? (ब) २ करिंथकर १३:८ मधील तत्त्व नेहमीच कसे खरे ठरते?
७ एदेनातील बंडाळीनंतर लगेच यहोवाने, तो आणि त्याचा विरोधक सैतान यांच्यात चालू असलेल्या वादविषयाच्या अंतिम परिणामाचे संक्षिप्त वर्णन प्रकट केले. देवाच्या वचनयुक्त संतानाला यातनामय दुखापत होणार होती, पण ती कायमसाठी नव्हती; आणि सैतानाला सरतेशेवटी प्राणघातक दुखापत भोगावी लागणार आहे. (उत्पत्ति ३:१५) सा.यु. ३३ मध्ये, दियाबलाने, ख्रिस्त येशूच्या अर्थात संतानाच्या मृत्यूस कारणीभूत ठरून त्यास खरोखर दुखापत केली. अशाप्रकारे, सैतानाने शास्त्रवचने पूर्ण केली आणि त्यासोबतच, सैतानाचा मुळीच हेतू नसतानाही त्याने यहोवाला सत्याचा देव शाबीत केले. सत्य आणि धार्मिकतेबद्दलच्या त्याच्या द्वेषामुळे तसेच गर्विष्ठ, अपश्चात्तापी मनोवृत्तीमुळे, देवाने त्याच्या कार्यांबद्दल जे भाकीत केले होते तेच त्याने पूर्ण केले. होय, सैतानासह सत्याच्या सर्व विरोधकांच्या बाबतीत हे तत्त्व खरे होते की: “सत्याविरूद्ध आम्हास काही करिता येत नाही, तर सत्यासाठी करिता येते.”—२ करिंथकर १३:८.
८, ९. (अ) सैतानाला काय माहीत आहे पण यामुळे यहोवाचा उद्देश पूर्ण होण्याकरता काही धोका आहे का? (ब) यहोवाचे विरोधक कोणत्या स्पष्ट इशाऱ्याकडे कानाडोळा करतात व का?
८ सन १९१४ मध्ये देवाचे राज्य अदृश्यपणे स्थापित झाले तेव्हा प्रकटीकरण १२:१२ लागू झाले: “म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” पण, आपला काळ थोडा राहिला आहे हे माहीत असल्यामुळे सैतान आपला मार्ग बदलू इच्छितो का? तसे झाल्यास, यहोवा सत्याचा देव आहे व सर्वोच्च शासक या नात्याने तोच उपासनेच्या पात्र आहे हे सैतानाला कबूल करावे लागेल. परंतु, दियाबलाला ही वस्तुस्थिती माहीत असूनही तो हार मानावयास तयार नाही.
९ सैतानाच्या जगिक व्यवस्थीकरणावर न्यायदंड ठोठावण्यासाठी ख्रिस्त येईल तेव्हा काय घडेल हे यहोवा उघडपणे प्रकट करतो. (मत्तय २४:२९-३१; २५:३१-४६) याबाबतीत जगिक शासकांबद्दल त्याचे वचन असे घोषित करते: “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात् वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात् नाश होतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:३) सैतानाचे अनुवर्तन करणारे या स्पष्ट इशाऱ्याकडे कानाडोळा करतात. त्यांच्या दुष्ट अंतःकरणांमुळे ते अंधळे झाले आहेत; व हे त्यांना आपल्या दुष्ट मार्गाक्रमणाचा पश्चात्ताप करण्यास व यहोवाच्या उद्देशांना हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या क्लृप्त्या व कट बदलण्यास प्रतिबंध करते.
१०. (अ) १ थेस्सलनीकाकर ५:३ ची पूर्णता कदाचित केवढ्या प्रमाणात झाली असावी पण यहोवाच्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवावी? (ब) विश्वासहीन लोक भवितव्यात देवाच्या लोकांचा विरोध करण्यात आणखी धीट का बनू शकतील?
१० संयुक्त राष्ट्रसंघाने, १९८६ हे आंतरराष्ट्रीय शांती वर्ष म्हणून घोषित केल्यापासून विशेषतः जगभरात शांती आणि सुरक्षिततेची चर्चा चालली आहे. जागतिक शांती टिकवून ठेवण्याकरता निर्णायक पावले उचलण्यात आली व काहीप्रमाणात त्याला यशही आले. या भविष्यवाणीची ही संपूर्ण पूर्णता आहे, की काहीशा अशाच चकित करून टाकणाऱ्या भावी घोषणेची आपण अपेक्षा करू शकतो? यहोवा आपल्या नियुक्त समयी ते कळवेल. तोपर्यंत आपण “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत,” आध्यात्मिकतेत जागृत राहू या. (२ पेत्र ३:११) शांती आणि सुरक्षिततेबद्दलची चर्चा करण्यात आणखी वेळ निघून जातो त्या दरम्यान, हा इशारा माहीत असलेले पण त्याकडे दुर्लक्ष करणारे, यहोवा आपले वचन पूर्ण करणार नाही किंवा करू शकत नाही असे जास्तच उर्मटपणे गृहीत धरू लागतील. (पडताळा उपदेशक ८:११-१३; २ पेत्र ३:३, ४.) पण यहोवा आपले उद्देश पूर्ण करील हे खऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे!
यहोवा वापरत असलेल्या माध्यमाविषयी योग्य आदर
११. दानीएल व योसेफ यहोवाबद्दल काय शिकले?
११ नव-बॅबिलोनियन साम्राज्याचा शासक, राजा नबुखद्नेस्सरला एक स्वप्न पडले पण ते त्याला आठवत नव्हते तेव्हा त्याने मदतीची याचना केली. त्याचे पुरोहित, ज्योतिष व मांत्रिक त्याला कोणते स्वप्न पडले होते व त्याचा काय अर्थ होतो याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाही. परंतु देवाचा सेवक, दानीएल त्याला सांगू शकला; पण त्याने हे कबूल केले, की स्वप्न प्रकट करणे व त्याचा अर्थ सांगणे त्याच्या बुद्धीनुसार नव्हते. दानीएल म्हणाला: “रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गांत आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखद्नेस्सर महाराजांना कळविले आहे.” (दानीएल २:१-३०) अनेक शतकांपूर्वी, देवाच्या आणखी एका संदेष्ट्याला अर्थात योसेफाला, यहोवा हा रहस्ये प्रकट करणारा असल्याची प्रचिती झाली होती.—उत्पत्ति ४०:८-२२; आमोस ३:७, ८.
१२, १३. (अ) देवाचा सर्वश्रेष्ठ संदेष्टा कोण होता व तुम्ही असे उत्तर का देता? (ब) आज “देवाच्या रहस्यांचे कारभारी” या नात्याने कोण कार्य करतात व आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
१२ पृथ्वीवर सेवा केलेला यहोवाचा सर्वश्रेष्ठ संदेष्टा येशू होता. (प्रेषितांची कृत्ये ३:१९-२४) पौलाने स्पष्टीकरण दिले: “देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले.”—इब्री लोकांस १:१, २.
१३ यहोवा, आपला पुत्र येशू याच्याद्वारे प्रारंभिक ख्रिश्चनांसोबत बोलला; या पुत्राने यांना ईश्वरी रहस्ये प्रकट केली. येशूने त्यांना सांगितले: “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे.” (लूक ८:१०) पौलाने नंतर अभिषिक्त ख्रिश्चनांना, “ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी” असे म्हटले. (१ करिंथकर ४:१) म्हणूनच आज अभिषिक्त ख्रिश्चनांचा मिळून बनलेला विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्ग त्याच्या नियमन मंडळाद्वारे उचित समयी आध्यात्मिक अन्न पुरवण्याचे कार्य करीत आहे. (मत्तय २४:४५-४७) गत दिवसांतील देवाच्या ईश्वरप्रेरित संदेष्ट्यांचा आणि खासकरून देवाच्या पुत्राचा जर आपण अतिशय आदर करतो तर, या कठीण काळात आपल्या लोकांना अत्यंत आवश्यक असलेली बायबलमधील माहिती प्रकट करण्यासाठी यहोवा ज्या मानवी माध्यमाचा उपयोग करीत आहे त्याचाही आपण आदर करू नये का?—२ तीमथ्य ३:१-५, १३.
उघडपणा की गुप्तता?
१४. ख्रिस्ती जन केव्हा गुप्तपणे कार्य करतात व अशाप्रकारे ते कोणाचे उदाहरण अनुसरत असतात?
१४ यहोवा सर्व गोष्टी अगदी उघडपणे प्रकट करतो तेव्हा, ख्रिश्चनांनी सुद्धा नेहमी आणि सर्व प्रसंगी त्यांना माहीत असलेले सर्वकाही प्रकट करीत राहावे असा त्याचा अर्थ होतो का? येशूने आपल्या प्रेषितांना “सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी” होण्याचा जो सल्ला दिला त्याचे ख्रिस्ती लोक अनुसरण करतात. (मत्तय १०:१६) आपल्या विवेकानुसार देवाची उपासना करण्यास त्यांना मनाई आहे असे ख्रिश्चनांना सांगितल्यास, ते “देवाची आज्ञा” मानतील कारण त्यांना माहीत आहे, की कोणत्याही मानवी माध्यमाला यहोवाच्या उपासनेवर प्रतिबंध लावण्याचा अधिकार नाही. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) स्वतः येशूने याची समर्पकता प्रदर्शित केली. आपण वाचतो: “त्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारावयास पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही. यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता; त्यावरून येशू त्यांना [सत्यात नसलेल्या त्याच्या सख्ख्या भावांना] म्हणाला, . . . तुम्ही वर सणाला जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्या सणास जात नाही. असे त्यांना सांगून तो गालीलात राहिला. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोहि, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.”—योहान ७:१, २, ६, ८-१०.
प्रकट करावे की करू नये?
१५. गुप्तता राखणे काही वेळा प्रेमळपणाचे ठरू शकते हे योसेफाने कसे दाखवून दिले?
१५ काही प्रसंगी, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे केवळ सुज्ञपणाचे नव्हे तर प्रेमळपणाचेही असते. जसे की, येशूचा दत्तक पिता योसेफाने, जिच्यासोबत त्याची मागणी झाली होती ती मरीया, गर्भवती आहे हे कळल्यावर कशी प्रतिक्रिया दाखवली? आपण वाचतो: “तिचा पति योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १:१८, १९) सर्व लोकांसमोर तिची नालस्ती करणे किती निर्दयीपणाचे ठरले असते!
१६. गोपनीय गोष्टींबाबत वडील जन तसेच मंडळीतील इतर सर्व सदस्यांची काय जबाबदारी आहे?
१६ लाजिरवाण्या किंवा दुःखित करणाऱ्या गोपनीय गोष्टी अनाधिकृत लोकांना सांगू नये. वडील जनांना, सहख्रिश्चनांस व्यक्तिगत सल्ला किंवा सांत्वन द्यावे लागते किंवा कदाचित यहोवाविरुद्ध गंभीर पाप केल्याबद्दल शिक्षा द्यावी लागते तेव्हा वरील गोष्ट ते लक्षात ठेवतात. शास्त्रवचनीय मार्गाने या बाबी हाताळणे आवश्यक आहे; संबंधित नसलेल्यांना गोपनीय गोष्टी सांगणे अनावश्यक आणि निर्दयीपणाचे आहे. निश्चितच, ख्रिस्ती मंडळीतील सदस्य वडिलांकडून गोपनीय गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत, उलट गोपनीय गोष्टी गुप्त ठेवण्याच्या वडिलांच्या जबाबदारीचा आदर करतील. नीतिसूत्रे २५:९ अशी नोंद करते: “तुझा व तुझ्या शेजाऱ्याचा वाद असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.”
१७. बहुतेक बाबतीत ख्रिस्ती गुप्तता का राखतात पण ते नेहमीच तसे का करू शकत नाहीत?
१७ हे तत्त्व, कौटुंबिक वर्तुळात किंवा निकटच्या मित्रांमध्ये लागू होते. अपसमज व तणावपूर्ण नातेसंबंध टाळण्याकरता काही गोष्टींबाबत गुप्तता राखणे आवश्यक आहे. “उत्तरेचा वारा पाऊस आणितो, त्याप्रमाणे [गौप्यस्फोट करणारी] जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करिते.” (नीतिसूत्रे २५:२३) अर्थात, यहोवा आणि त्याच्या धार्मिक तत्त्वांसोबत निष्ठा तसेच चूक करणाऱ्यांबद्दल प्रीती यामुळे काही वेळा पालकांना, ख्रिस्ती वडिलांना किंवा इतर संबंधितांना गोपनीय गोष्टी सांगण्याची गरज भासेल.a परंतु बहुतेक बाबतीत, ख्रिस्ती जण स्वतःच्या गुप्त गोष्टींबाबत जशी गुप्तता राखतात त्याचप्रमाणे इतरांच्या व्यक्तिगत गुप्त गोष्टींबाबतही राखतात.
१८. आपण काय सांगावे किंवा सांगू नये हे ठरवण्याकरता कोणते तीन ख्रिस्ती गुण आपली मदत करू शकतात?
१८ सारांशात, एखादा ख्रिस्ती आवश्यकता असते तेव्हा विशिष्ट बाबी गोपनीय ठेवून उचित समयी त्यांना प्रकट करण्यात यहोवाचे अनुकरण करतो. त्याने काय सांगावे किंवा सांगू नये हे ठरवताना, नम्रता, विश्वास आणि प्रीती त्याला मार्गदर्शन देईल. नम्रता त्याला, स्वतःची बढाई मारण्याचे, त्याला माहीत असलेल्या सर्व गोष्टी इतरांना सांगून किंवा त्याला सांगता येणार नाहीत अशा गोपनीय गोष्टींबाबत त्यांना सतावून सोडण्याद्वारे त्यांच्यावर आपली छाप पाडण्याचे टाळण्यास मदत करील. यहोवाच्या वचनावरील आणि ख्रिस्ती मंडळीवरील विश्वास त्याला, ईश्वरप्रेरणेने पुरवलेल्या बायबल माहितीचा प्रचार करण्यासोबत सुरवातीलाच इतरांचे मन दुखविणाऱ्या गोष्टी न बोलण्यासाठी सावध राहण्यास प्रवृत्त करतो. होय, प्रीती त्याला देवाचे गौरव करणाऱ्या तसेच जीवन मिळवण्याकरता लोकांनी जाणून घ्यावयाच्या गोष्टी लोकांना उघडपणे सांगण्यास प्रवृत्त करते. दुसऱ्या बाजूला पाहता, त्याने व्यक्तिगत गोपनीय बाबी इतरांना सांगितल्यास त्याच्यात प्रीतीचा अभाव आहे हे प्रकट होईल याची जाणीव ठेवून तो त्या सांगत नाही.
१९. कोणते मार्गाक्रमण खऱ्या ख्रिश्चनांना ओळखण्यास मदत करते व त्याचा काय परिणाम होतो?
१९ हा संतुलित पवित्रा खऱ्या ख्रिश्चनांना ओळखण्यास मदत करतो. ते देवाची ओळख निनावी मुखवट्यामागे किंवा गूढ, उलगडा करता न येणाऱ्या त्रैक्याच्या सिद्धान्तामागे लपवत नाहीत. अज्ञात दैवते, खऱ्या नव्हे तर खोट्या धर्मांची विशेष लक्षणे आहेत. (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३ पहा.) यहोवाचे अभिषिक्त साक्षीदार, “देवाच्या रहस्यांचे कारभारी” होण्याच्या सुहक्काची खरोखरच गुणग्राहकता बाळगतात. इतरांना ही रहस्ये उघडपणे प्रकट करण्याद्वारे ते प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देवाची मैत्री प्राप्त करण्यासाठी त्याच्याजवळ जाण्यास मदत करतात.—१ करिंथकर ४:१; १४:२२-२५; जखऱ्या ८:२३; मलाखी ३:१८.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९८६ मधील “दुसऱ्यांच्या पापकर्मात सहभागी होऊ नका” लेख पाहा.
तुम्ही उत्तर कसे द्याल?
◻ यहोवाला आपले हेतू लपवावे का लागत नाही?
◻ यहोवा कोणास आपली रहस्ये प्रकट करतो?
◻ गोपनीय गोष्टींबाबत ख्रिश्चनांची काय जबाबदारी आहे?
◻ कोणते तीन गुण ख्रिश्चनांना, कोणती गोष्ट सांगावी व कोणती सांगू नये हे समजण्यास मदत करतील?
[८ पानांवरील चित्र]
यहोवा आपल्या वचनाद्वारे रहस्ये प्रकट करतो