प्रभूच्या नावाने गुप्तता
जपान येथील टोकियो शहरातील भुयारी रेल्वेमार्गावर, मार्च १९९५ मध्ये झालेल्या विषारी-वायूच्या हल्ल्यात १२ लोक दगावले, हजारोंना बाधा झाली, शिवाय, या घटनेमुळे एक गौप्यस्फोटही होऊ शकला. ऑम शिनरीक्यो (परम सत्य) नावाच्या एक धार्मिक पंथाने आपले रहस्यमय हेतू साध्य करतेवेळी उपयोगात आणण्यासाठी गुप्तपणे सॅरिन वायूची साठवणूक केलेली होती.
अवघ्या एका महिन्यानंतर अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटी येथे एका इमारतीत झालेल्या बॉम्बस्फोटात १६७ जण आपल्या प्राणास मुकले. पुराव्यावरून असे भासत होते की वॉको, टेक्सस येथील ब्रँच डेव्हिडियन धार्मिक पंथाशी, बरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या सरकारी चकमकीचा या हल्ल्याशी काहीतरी संबंध असावा. त्यावेळेस या पंथातले अंदाजे ८० सभासद ठार झाले होते. या बॉम्बस्फोटामुळे अनेकांना माहिती नसलेली एक गुप्त गोष्ट देखील उघडकीस आली: संयुक्त राष्ट्रांमध्ये सध्या भरपूर निमलष्करी सैनिक गट कार्यरत असून, ते गुप्तपणे सरकारविरोधी कारवायांचे कट रचतात असा त्यांपैकी निदान काहींविषयी तरी संशय केला जातो.
नंतर, १९९५ सालाच्या शेवटी शेवटी, फ्रान्स येथील ग्रनोबलजवळ असलेल्या एका वनक्षेत्रात १६ जणांचे होरपळलेले मृतदेह गवसले. हे मृतक एकेकाळी ऑर्डर ऑफ द सोलर टेम्पल या पंथाचे सभासद होते; त्यांच्या ५३ सदस्यांपैकी काहींनी आत्महत्या केल्यामुळे आणि काहींचे खून करण्यात आल्यामुळे, ऑक्टोबर १९९४ मध्ये स्वित्झर्लंड आणि कॅनडा येथे या लहानशा पंथाने कित्येक लोकांचे लक्ष वेधले होते. तथापि, या दुःखद घटनेनंतरही, हा पंथ क्रियाशील राहिला. आजतागायत त्यांच्या प्रेरणा आणि उद्दिष्टांभोवती एक गूढ वलय आहे.
धार्मिक गुप्ततेचे धोके
अशा घटना लक्षात घेता, अनेक लोक धार्मिक गटांकडे संशयाने पाहतात यात काही नवल आहे का? व्यक्तीच्या भरवशाचा गैरफायदा घेऊन त्याला न पटणाऱ्या उद्देशांकरता कार्य करायला लावणाऱ्या गुप्त संघटनेला—मग ती धार्मिक असो किंवा गैरधार्मिक—अशा संघटनेला समर्थन देण्याची निश्चितच कोणाचीही इच्छा नसेल. संशयास्पद स्वरूपाच्या गुप्त संघटनांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एखाद्याला काय करता येईल?
साहजिकच, ज्या कोणालाही एखाद्या गुप्त संघटनेचा सभासद व्हायचे असेल त्याने या गटाची खरी उद्दिष्टे काय आहेत याची खात्री करून घेणे शहाणपणाचे ठरेल. आप्तेष्टांच्या दबावात येण्यापासून सांभाळावे आणि भावनांच्या आहारी जाऊन नव्हे तर वस्तुस्थितीच्या आधारावर निर्णय घेण्यात यावा. लक्षात असू द्या, जे काही परिणाम घडतील—ते बहुतकरून त्या व्यक्तीलाच स्वतःला भोगावे लागतील—इतर कोणाला नव्हे.
ज्या गटांचे इरादे नेक नाहीत अशांच्या फंद्यात न पडण्याचा सर्वात खात्रीलायक मार्ग म्हणजे बायबल तत्त्वांचे पालन करणे. (यशया ३०:२१) यात राजनैतिक तटस्थता राखणे, इतरांवर, म्हणजे शत्रूंवर देखील प्रेम व्यक्त करणे, “देहाची कर्मे” करण्यापासून दूर राहणे आणि देवाच्या आत्म्याची फळे विकसित करणे हे अंतर्भूत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येशू जसा जगाचा भाग नव्हता तसेच खऱ्या ख्रिस्ती लोकांनीही जगाचा भाग असू नये, आणि अशाप्रकारचा मार्ग पत्करल्यामुळे जगिक गुप्त संघटनांमध्ये सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.—गलतीकर ५:१९-२३; योहान १७:१४, १६; १८:३६; रोमकर १२:१७-२१; याकोब ४:४.
यहोवाचे साक्षीदार बायबलचे विचारशील विद्यार्थी आहेत, ते आपल्या विश्वासाची गंभीर दखल घेतात आणि उघडपणे त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करतात. सबंध जगात, ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटणारा व तिचा मार्ग धरलेला’ धार्मिक गट म्हणून त्यांना ख्याती मिळाली आहे. (१ पेत्र ३:११) यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात अगदी योग्य विवेचन दिले आहे: “यहोवाचे साक्षीदार म्हणजे कोणत्याही अर्थाने एक गुप्त संघटना नाही. बायबलवर आधारित असलेल्या त्यांच्या विश्वासांबाबत त्यांच्या प्रकाशनांत पूर्ण खुलासा केलेला असतो आणि ही प्रकाशने कोणालाही सहज मिळवता येतात. शिवाय, ते लोकांना त्यांच्या सभांना येऊन तिथे काय चालते हे प्रत्यक्ष पाहण्याचे आणि ऐकण्याचे आमंत्रण देण्यासाठी खास प्रयत्न करतात.”
खरा धर्म कदापि गुप्तपणाचा अवलंब करीत नाही. खऱ्या देवाच्या उपासकांना शिक्षण देण्यात आले आहे, की त्यांनी स्वतःची ओळख लपवू नये किंवा यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपला उद्देशही अंधारात ठेवू नये. येशूच्या आरंभीच्या शिष्यांनी जेरुसलेमास आपल्या शिक्षणाने भरून टाकले. आपल्या विश्वासांबद्दल किंवा कार्याबद्दल त्यांनी कोणतीही लपवाछपवी केली नाही. आज यहोवाच्या साक्षीदारांविषयीही हेच सत्य आहे. अर्थात, जेव्हा हुकुमशाही शासने उपासनेच्या स्वातंत्र्यावर अवाजवी बंधने घालू पाहतात तेव्हा मात्र ख्रिश्चनांनी “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,” आणि त्याअर्थी त्यांनी सावधगिरीने व धैर्याने आपले कार्य चालू ठेवले पाहिजे; निर्भयपणे सार्वजनिक साक्षकार्य केल्यामुळे ख्रिश्चनांवर असा हा प्रसंग ओढवतो.—प्रेषितांची कृत्ये ५:२७-२९; ८:१; १२:१-१४; मत्तय १०:१६, २६, २७.
यहोवाचे साक्षीदार म्हणजे एक गुप्त पंथ किंवा गुप्त धार्मिक समूह असावा असा विचार यापूर्वी कधी तुमच्या मनाला चाटून गेला असल्यास, तुम्हाला त्यांच्याविषयी फारच त्रोटक माहिती असल्यामुळे कदाचित असे झाले असावे. पहिल्या शतकातही अनेकांची काहीशी अशीच स्थिती असेल.
प्रेषितांची कृत्ये यातील २८ व्या अध्यायात आपण रोम येथे “यहूद्यांची जी मुख्य माणसे होती,” त्यांच्यासोबत झालेल्या पौलाच्या एका भेटीविषयी वाचतो. ती माणसे त्याला म्हणाली: “आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २८:१६-२२) उत्तरात, पौलाने ‘त्यांस देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता त्या विषयाची फोड केली,’ आणि “कित्येकांची खातरी झाली [“विश्वास ठेवू लागले,” NW].” (प्रेषितांची कृत्ये २८:२३, २४) खऱ्या ख्रिस्ती विश्वासाविषयी खरे काय ते जाणून घेतल्यामुळे त्यांना निश्चितच कायमस्वरूपी लाभ मिळाला.
देवाच्या उघड आणि जाहीर सेवेला समर्पित असल्याकारणाने, कोणाला वस्तुस्थितींची जाणीव हवी असल्यास यहोवाचे साक्षीदार आपल्या कार्यांविषयी आणि विश्वासांविषयीचे उघड सत्य सांगण्यास आनंदाने तयार होतील. त्यांच्या विश्वासासंबंधी खरी माहिती असावी म्हणून तुम्ही स्वतः चौकशी करून पाहा, काय हरकत आहे?
[६ पानांवरील चित्र]
आपण कोण आहोत आणि काय करतो याविषयी माहिती प्रगट करण्यास यहोवाचे साक्षीदार आनंदाने तयार होतात