वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ६/१ पृ. ३-४
  • कशासाठी एवढी गुप्तता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कशासाठी एवढी गुप्तता?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गुप्तता धोकेदायक केव्हा ठरते
  • आता त्यांचे काय चालले आहे?
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०१८
  • तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तुला एक रहस्य सांगू का?
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • ख्रिश्‍चनांनी गुप्त ठेवण्याचे धाडस करू नये असे एक रहस्य!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ६/१ पृ. ३-४

कशासाठी एवढी गुप्तता?

“गुप्तता राखण्यासारखे दुसरे दडपण नाही.” निदान एका फ्रेंच सुभाषितानुसार तरी हेच खरे आहे. आपल्याला एखादे गौप्य समजते तेव्हा मजा वाटते, पण कोणाजवळ त्याविषयी बोलता येत नाही तेव्हा मात्र काहीवेळा वैताग होतो, याचे हेच कारण तर नसावे? तथापि, गत शतकांत अनेकजण स्वेच्छेने गुप्तता पत्करून, समान ध्येयप्राप्तीकरता गुप्त संघटनांमध्ये सामील झाल्याचे आढळते.

अशाप्रकारच्या संघटनांपैकी सर्वात प्राचीन म्हणजे इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये आढळणारे गुह्‍य संप्रदाय. कालांतराने, यांतील काही समूहांचा धार्मिक प्रभाव निवळला आणि ते राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक स्वरूपाचे बनले. उदाहरणादाखल, मध्ययुगीन युरोपात व्यापारी संघ उदयास आले तेव्हा त्यांच्या सदस्यांनी गुप्तता पाळली ती मुख्यतः आर्थिक आत्म-संरक्षणाच्या हेतूनेच.

सांप्रत काळातही, अनेकदा हे गुप्त समूह उदात्त हेतूंनीच स्थापन करण्यात आले, एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या शब्दांत, “सामाजिक आणि जनहितेच्छु उद्देशांसाठी,” आणि “दानधर्माच्या व शैक्षणिक मोहिमा राबवण्यासाठी.” काही बंधुसमाज, युथ क्लब, सामाजिक क्लब आणि इतर समूह देखील गुप्त, किंवा निदान काही अंशी तरी गुप्त असतात. हे समूह सहसा निरुपद्रवी असतात, त्यांतील सभासदांना गुप्त हालचालींत सहभागी होण्यात रोमांच वाटतो एवढेच. एखाद्याला समूहात अनुप्रविष्ट करण्याचे रहस्यमय विधी भारावून टाकणारे असतात आणि त्यांच्याद्वारे मैत्रिपूर्ण सहजीवनाची आणि एकोप्याची बंधने बळकट होतात. सभासदांच्या मनांत परस्परांविषयी आपुलकीच्या आणि उद्देशपूर्णतेच्या भावना उत्पन्‍न होतात. सहसा अशाप्रकारच्या गुप्त संघटनांकडून, त्यांचे सभासद नसलेल्यांना काहीएक धोका नसतो. शिवाय, त्यांच्या गुप्त गोष्टींविषयी अनभिज्ञ असल्यामुळे या संघटनेबाहेरच्या लोकांचे काही नुकसानही होत नाही.

गुप्तता धोकेदायक केव्हा ठरते

सर्व गुप्त समूह सारख्याच प्रमाणात गुप्त नसतात. पण एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या वर्णनाप्रमाणे ज्यांच्या “गौप्यांमध्ये गौप्ये दडलेली” असतात ते मात्र एका विशेष अर्थाने धोकेदायक ठरू शकतात. यात स्पष्ट करण्यात आले आहे, की या संघटनांमधील उच्च श्रेणीतील सभासद, “टोपणनावे, शपथविधी किंवा त्यांना सांगण्यात आलेल्या विशेष गौप्यांच्या साहाय्याने आपला वेगळेपणा दाखवून खालच्या श्रेणीतील सभासदांना या वरच्या पातळीपर्यंत मजल मारण्याकरता आवश्‍यक प्रयत्न करण्याचे” प्रोत्साहन देत असत. अशा समूहांमुळे कोणता धोका प्रस्तुत होतो हे उघडच आहे. खालच्या श्रेणीतील सभासदांची वरच्या पातळीवर संघटनेची गौप्ये जाणून घेण्यापर्यंत प्रगती झालेली नसल्यामुळे संघटनेच्या खऱ्‍या उद्दिष्टांविषयी ते कदाचित पूर्णपणे अंधारात असू शकतील. ज्या समूहाच्या उद्दिष्टांविषयी आणि ती साध्य करण्याच्या पद्धतींविषयी आपल्याला बेताचीच माहिती आहे आणि खरे पाहता ज्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही अशा समूहात एखादी व्यक्‍ती सहज गुंतू शकते. तथापि, अशा समूहात अनुप्रविष्ट झालेल्या व्यक्‍तीला त्यातून स्वतःला सोडवणे जड जाईल; तो जणू या गुप्ततेच्या कैदेतच सापडतो.

परंतु, एखादा समूह जेव्हा बेकायदेशीर किंवा गुन्हेगार हेतूंच्या प्राप्तीसाठी कार्य करतो आणि या कारणाने तो स्वतःचे अस्तित्व देखील गुप्त राखू पाहतो, अशावेळेस तर गुप्तता आणखीनच धोकेदायक ठरते. किंवा मग त्याच्या अस्तित्वाविषयी आणि सामान्य ध्येयांविषयी माहिती असते पण त्याच्या सभासदांविषयी आणि निकटच्या भविष्यातील योजनांविषयी शक्यतो गुप्तता राखण्यात येते. आपल्या दहशतवादी हल्ल्यांनी वेळोवेळी जगात खळबळ माजवणारे उग्र दहशतवादी समूह असेच करत असतात.

गुप्तता खरोखर धोकेदायक ठरू शकते, वैयक्‍तिकांना आणि सबंध समाजालाही. निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्‍या षोडशवयीनांच्या टोळ्या, गुप्तपणे कार्य करणाऱ्‍या माफियासारख्या गुन्हेगारी संघटना, कू क्लक्स क्लॅन यांच्यासारखे स्वतःचे वर्चस्व सांगणारे गोऱ्‍यांचे समूह,a शिवाय, जागतिक शांती आणि सुरक्षितता आणण्याच्या प्रयत्नांना वारंवार निकामी करणाऱ्‍या शेकडो दहशतवादी समूहांविषयीही जरा विचार करा.

आता त्यांचे काय चालले आहे?

शीतयुद्धाच्या परिणामस्वरूपात, १९५० च्या दशकाच्या दरम्यान जर सोविएत सैन्यांनी कधी पश्‍चिम युरोपाला काबीज करण्याचा प्रयत्न केलाच तर प्रतिकार चळवळी घडवून आणता याव्यात म्हणून पश्‍चिम युरोपातील अनेक देशांत गुप्त संघटना स्थापन करण्यात आल्या. उदाहरणार्थ फोकस या जर्मन बातमीपत्रकानुसार या कालावधीत ऑस्ट्रियामध्ये “७९ गुप्त शस्त्रागृहे” उभारण्यात आली. या संस्थांविषयी काही युरोपियन देशांना तर तिळमात्रही कल्पना नव्हती. १९९० च्या दशकाच्या आरंभास एका बातमीपत्रकाने दिलेल्या वृत्तातील पुढील शब्द, वस्तुस्थितीला धरून आहेत: “या संघटनांपैकी आजमितीस किती जिवंत असतील आणि अलीकडच्या काळापर्यंत त्यांचे नेमके काय चालले असावे हे अद्यापही रहस्यच आहे.”

खरेच आहे. या क्षणी, नेमक्या किती गुप्त समूहांकडून कल्पनाही करता येणार नाही असा भयंकर धोका आपल्याला असावा कोण जाणे?

[तळटीपा]

a पेटत्या क्रॉसचा प्रतीक म्हणून उपयोग करण्याद्वारे अमेरिकेतील या संस्थेने थोड्याफार प्रमाणावर पुरोगामी गुप्त संघटनांतील धार्मिक तत्त्व जतन केले. गतकाळात, या संघटनेचे सभासद झगे आणि पांढऱ्‍या चादरी पांघरून रात्रीच्या वेळी हल्ले करीत आणि काळ्या, कॅथलिक, ज्यू, आणि परदेशी लोकांविरुद्ध तसेच मजूर संघांविरुद्ध आपला क्रोध व्यक्‍त करीत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा