अयोग्य इराद्यांचा ठपका लावण्यापासून सांभाळा
दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध धर्मप्रचारकाने त्याच्या सहधर्मप्रचारकाने व्यभिचार केल्यामुळे त्याचे खंडण केले. परंतु, एका वर्षाच्या आतच आरोप करणाऱ्या या धर्मप्रचारकालाच एका वेश्येसोबत असताना रंगे हात पकडण्यात आले.
दुसरी गोष्ट म्हणजे, एका प्रमुख जागतिक सत्तेने युद्ध करणाऱ्या गटांत शांती प्रस्थापित करण्यासाठी शांतिदूतांना पाठविले. परंतु, या काळादरम्यान त्याच राष्ट्राने आरमारी व्यापाऱ्यांना अब्जावधी डॉलर किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा व्यापार करण्यासाठी गुप्तपणे परदेशात पाठविले.
उघड दांभिकता इतकी सामान्य झाली आहे, की त्यामुळे भरवशाची जागा संशयवादाने घेतली आहे हे आश्चर्याचे आहे का? दुसऱ्यांच्या इराद्यांविषयी शंका घेणे, हा आज अनेकांचा स्वभावच बनला आहे.
ख्रिस्ती या नात्याने आपण अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा प्रभाव सहविश्वासूंबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर होऊ नये म्हणून दक्ष असले पाहिजे. येशू ख्रिस्ताने आपल्याला शत्रूंमध्ये “सापांसारखे चतुर” होण्यासाठी आर्जवले असले, तरी आपण त्याच्या खऱ्या अनुयायांविषयी संशयखोर असावे, असे त्याने म्हटले नाही. (मत्तय १०:१६) तर मग, इतरांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावण्याचे धोके कोणते आहेत? अशा प्रकारची प्रवृत्ती टाळण्यासाठी आपण कोणत्या क्षेत्रांत विशेष दक्ष असले पाहिजे? आणि सहख्रिश्चनांसोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?
भूतकाळातून धडा
कोणतीही वास्तविकता जाणून न घेता इतरांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावणे म्हणजे त्यांचा न्यायनिवाडा केल्याप्रमाणे आहे. असे करण्याद्वारे जणू आपण असा निष्कर्ष काढण्याची घाई करत असतो, की कोणतीतरी कपटी आणि द्वेषी गोष्ट लपविण्यासाठी ते असे बोलले किंवा त्यांनी तसे केले. परंतु, गोष्टींविषयी चुकीचा दृष्टिकोन बाळगणे हे समस्येचे खरे मूळ आहे आणि हे आपल्याला यहोशवा अध्याय २२ मध्ये पाहता येऊ शकते.
इस्राएलांनी वाग्दत्त देशावर पूर्णपणे विजय मिळवला होता आणि त्यांना त्यांच्या वंशाप्रमाणे नुकतीच वतने मिळाली होती. रऊबेन, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी यार्देनेच्या तीरावर एक “भव्य मोठी” वेदी बांधली. त्यांचे हे कार्य धर्मत्यागाचे होते, असा इतर वंशांनी चुकीचा तर्क केला. हे तीन वंश उपासनेचे नियुक्त स्थान अर्थात शिलोमधील तंबूत जाण्याऐवजी या भव्य वेदीचा वापर अर्पणासाठी करणार, असे इतर वंशांच्या लोकांना वाटले. आणि आरोप करणाऱ्या वंशांनी त्यांच्यावर लष्करी कार्यवाही करण्याची लगेच तयारी देखील केली.—यहोशवा २२:१०-१२.
हे वाखाणण्याजोगे आहे, की फिनहासच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक प्रतिनिधीमंडळ त्यांनी आपल्या इस्राएली बांधवांसोबत बोलाचाली करण्यासाठी धाडले. यहोवाच्या विरोधात अविश्वासूपणा, बंडाळी आणि धर्मत्याग हे आपल्यावरील आरोप ऐकल्यानंतर अपराधी समजल्या गेलेल्या या वंशांनी ही भव्य वेदी बांधण्याचे कारण त्यांना सांगितले. या वेदीचा उद्देश अर्पणे वाहण्यासाठी नव्हता, तर यहोवाच्या उपासनेतील इस्राएल वंशांच्या एकतेची “साक्ष व्हावी” हा त्या वेदीचा उद्देश होता. (यहोशवा २२:२६, २७) हे प्रतिनिधीमंडळ माघारी या समाधानाने परतले, की त्यांच्या बांधवांनी कोणतेही अयोग्य कार्य केले नव्हते. अशा प्रकारे गृहयुद्ध आणि भयंकर रक्तपात टळला होता.
इतरांवर अयोग्य इराद्यांचा ठपका न लावण्यासाठी आपल्याकरता किती चांगला धडा! दिसते तसे नसते, असे बहुतेक वेळा नंतर सिद्ध होते. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाच्या अनेक पैलूंच्या बाबतीत हे खरे आहे.
वडिलांप्रती आपला दृष्टिकोन
‘देवाच्या मंडळीचे पालन’ करण्याची जबाबदारी पार करतेवेळी मंडळीतील काही जणांना सल्ला देण्याची आवश्यकता असल्याचे वडिलांना आढळून येते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) उदाहरणार्थ, आपल्या मुलांची कुसंगती किंवा त्यांचे विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबर असणारे अयोग्य वर्तन यांविषयी वडील आपल्याशी बोलतात तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? त्यांच्या इराद्यांमागे काहीतरी दडलेले आहे, असे समजून आपण असे म्हणतो का की, ‘नाहीतरी त्यांना आमचं कुटुंब कधीच आवडत नव्हतं’? अशा भावनांनी आपण प्रभावित झालो तर नंतर आपल्यावर पस्तावण्याची पाळी येईल. आपल्या मुलांचे आध्यात्मिक कल्याण धोक्यात असेल आणि त्यामुळे आपण मदतदायक आध्यात्मिक सल्ल्याची कदर केली पाहिजे.—नीतिसूत्रे १२:१५.
मंडळीतील वडील आपल्याला सल्ला देतात तेव्हा त्यांच्या इराद्यामागे काही वाईट आहे, असा आपण विचार करू नये. उलटपक्षी त्यांच्या बायबलवर आधारित सल्ल्यापासून मी काही शिकू शकतो किंवा कसे याचा आपण विचार करू या. प्रेषित पौलाने लिहिले: “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:११) म्हणून आपण कृतज्ञ असू या आणि बाबींचा वास्तविकपणे विचार करू या. हे लक्षात ठेवा, की सल्ला स्वीकारणे आपल्यासाठी जसे कठीण असते तसे आपल्याला सल्ला देणेही वडिलांसाठी असते.
पालकांप्रती भावना
पालक काही बंधने घालतात तेव्हा काही युवकांना आपल्या पालकांच्या इराद्यांविषयी मनात शंका येते. काही युवक कदाचित म्हणतील: ‘माझे आई-बाबा इतके नियम तरी का बनवतात? मी जीवनाचा आस्वाद घेऊ नये असं कदाचित त्यांना वाटत असावं.’ परंतु, अशा प्रकारचे मत बनवण्याऐवजी युवकांनी परिस्थितीचे वास्तविकपणे परीक्षण करण्याची गरज आहे.
पालक कित्येक वर्षांपासून आपल्या मुलांची काळजी घेत आहेत. असे करत असताना त्यांना भौतिकरीत्या आणि इतर प्रकारे पुष्कळ गोष्टींचा त्याग करावा लागला. तर मग, त्यांनी आता आपल्या किशोरवयीन मुलांना दुःखी करण्याचा चंग बांधला आहे, असे म्हणता येईल का? पालकांचे आपल्या मुलांवर प्रेम असल्यामुळे त्यांच्या संरक्षणार्थ आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ते प्रवृत्त होतात, असा विचार करणे अधिक तर्कसंगत होणार नाही का? हेच प्रेम त्यांना आपल्या मुलांवर जे सध्या जीवनातील आव्हानांना तोंड देत आहेत विशिष्ट निर्बंध घालण्यासाठी प्रेरित करीत नाही का? प्रेमळ पालकांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावणे किती निष्ठुरतेचे आणि कृतघ्नतेचे होईल!—इफिसकर ६:१-३.
सहख्रिश्चनांप्रती आपला दृष्टिकोन
इतरांविषयी पूर्वगृह बाळगण्याची आणि इतरांना नावे ठेवण्याची अनेकांना सवय असते. स्वतः आपल्याकडे अशा प्रकारची प्रवृत्ती असल्यास आणि विशिष्ट लोकांविषयी आपण काहीसे शंकेखोर असल्यास काय? या बाबतीत आपण जगाद्वारे प्रभावित होऊ शकतो का?
उदाहरणार्थ, समजा आपल्या एका आध्यात्मिक बांधवाकडे मोठा बंगला आणि महागडी गाडी आहे. तो फार भौतिकवादी आहे; तो आपल्या जीवनात राज्य आस्थांना प्रथम स्थानी ठेवत नाही, असे आपण लगेच म्हणून मोकळे व्हावे का? काही ख्रिश्चनांकडे महागड्या वस्तू घेण्याचे सामर्थ्य असेल, परंतु त्यांचे अयोग्य इरादे आहेत किंवा ‘पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्याचा’ ते प्रयत्न करीत नाही, असा याचा अर्थ होत नाही. आध्यात्मिक कार्यात ते कदाचित फार व्यग्र असतील; राज्य आस्थांना उत्तेजन देण्यासाठी कदाचित ते आपल्या भौतिक मालमत्तेचा उदारपणे वापर करीत असतील आणि कदाचित हे सर्व उघडपणे दिसणार देखील नाही.—मत्तय ६:१-४, ३३.
पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी गरीब आणि श्रीमंत—सर्व प्रकारच्या लोकांनी बनली होती. (प्रेषितांची कृत्ये १७:३४; १ तीमथ्य २:३, ४; ६:१७; याकोब २:५) भौतिक संपन्नतेच्या धर्तीवर देव लोकांचे मूल्यमापन करत नाही आणि आपण देखील करता कामा नये. कसोटीस उतरलेल्या आणि एकनिष्ठ सहविश्वासू जणांवर आपण प्रेम केले पाहिजे आणि “पक्षपाताने काही करू” नये.—१ तीमथ्य ५:२१.
सैतानाला वश झालेल्या या जगात नावे ठेवण्याचे आणि संशयखोरीचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे केवळ त्याच्या पार्श्वभूमीमुळे हिंसाचारी किंवा भौतिकवादी म्हणून पाहिले जाऊ शकते. तथापि, ख्रिस्ती या नात्याने आपण अशा प्रकारच्या प्रवृत्तींना बळी पडता कामा नये. यहोवाच्या संघटनेत स्वमताला आणि संशयखोरीला कोणतेही स्थान नाही. सर्व खऱ्या ख्रिश्चनांना यहोवा देवाला अनुसरण्याची आवश्यकता आहे त्याच्याकडे “काही अधर्म नाही; तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही.”—२ इतिहास १९:७; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
प्रेमाने प्रेरित व्हा
शास्त्रवचने हे स्पष्टपणे सांगतात, की “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) म्हणून आपले बांधव यहोवाला स्वीकारयोग्य सेवा सादर करण्यात आपल्यासोबत संघटित आहेत, या दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या आध्यात्मिक भाऊबहिणींसोबतचा आपला नातेसंबंध संशयखोरीमुळे आणि इतर नकारात्मक भावनांमुळे प्रभावित झाला असल्यास अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी आपण देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू या जेणेकरून आपण सैतानाचे सावज होणार नाही. (मत्तय ६:१३) यहोवाचे इरादे चांगले नव्हते, यहोवाला तिच्या कल्याणाविषयी काही चिंता नाही आणि तिला खरा आनंद प्राप्त करून देणारे स्वातंत्र्य यहोवाने तिला दिले नाही, अशी त्याने हव्वेला खात्री पटवून दिली. (उत्पत्ति ३:१-५) आपल्या बांधवांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावल्यामुळे सैतान डाव साधतो.—२ करिंथकर २:११; १ पेत्र ५:८.
इतरांवर अयोग्य इराद्यांचा ठपका लावण्याकडे आपला कल असल्याचे आपल्याला दिसल्यास येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचा विचार करा. तो देवाचा परिपूर्ण पुत्र होता तरी देखील शिष्यांच्या वाईट इराद्यांकडे त्याने पाहिले नाही. उलटपक्षी त्याने त्यांच्यातील चांगल्या गोष्टी पाहिल्या. आपल्यांमध्ये मोठा कोण अशी त्याच्या शिष्यांमध्ये स्पर्धा लागली होती तेव्हा त्यांचे इरादे भ्रष्ट आहेत असा विचार करून नवीन १२ प्रेषितांची नियुक्ती केली नाही. (मार्क ९:३४, ३५) धर्मत्यागी यहुदी धर्मात अहंकार आणि वर्गवारी या गोष्टींवर फार जोर देण्यात येत असे आणि म्हणूनच येशूचे शिष्य अपरिपूर्ण असल्याने त्यांच्यावर या संस्कृतीचा कोणत्यातरी प्रकारे प्रभाव पडला असावा. येशूला हे माहीत होते, की त्याच्या शिष्यांची मूलभूत प्रेरणा यहोवावरील त्यांचे प्रेम होते. अशा प्रकारचे प्रेम प्रदर्शित केल्यामुळे आणि येशूला जडून राहिल्यामुळे त्यांना फार मोठे प्रतिफळ देण्यात आले.—लूक २२:२८-३०.
आपण आपल्या सहविश्वासू जणांकडे संशयाने पाहिले तर जणू आपण खराब काचेतून गोष्टींकडे पाहत असू. जे प्रत्यक्षात आहे ते कधीच दिसणार नाही. यास्तव आपण प्रेमाच्या काचेतून पाहू या. एकनिष्ठ सहविश्वासू ख्रिस्ती आपल्यावर प्रेम करत असल्याचे आणि आपल्या सहृदयी विचारपूर्वकतेला ते पात्र असल्याचे पुष्कळ पुरावे आहेत. (१ करिंथकर १३:४-८) तर मग, आपण त्यांना अशा प्रकारचे प्रेम दाखवू या आणि त्यांच्यावर अयोग्य इराद्यांचा ठपका लावण्यापासून स्वतःला सांभाळू या.
[२६ पानांवरील चित्र]
देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता?
[२७ पानांवरील चित्र]
भरवसा आणि आदर यांमुळे यहोवाच्या साक्षीदारांचे एक आनंदी कुटुंब तयार होते