निराशेतही आशा प्राप्त करणे
खालील प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही असल्याची कल्पना करा: तुमच्याकडील सर्व भौतिक संपत्ती नाश झाली आहे आणि तुम्ही आता पूर्णपणे निराधार झाला आहात. तुमच्या जीवनातील आनंद—तुमची मुले—देखील मरण पावली आहेत. तुमचा विवाहित सोबती देखील तुमचे मनोधैर्य उंचावण्याच्या कामी येत नाही. तुमची प्रकृती अक्षरशः ढासळली आहे. प्रत्येक दिवस तुमची जणू कष्टमय परीक्षा पाहत आहे.
तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीत असला असता तर तुमच्या जीवनात काही रस राहिला असता का? किंवा तुम्ही निराशेचे बळी ठरला नसता का?
वरील दुःखमय दैनावस्था ईयोबाच्या जीवनातील वास्तव होते; हा मनुष्य बायबल काळात अस्तित्वात होता. (ईयोब, अध्याय १, २) एका अगदी निराशेच्या घटकेला ईयोबाने अशा प्रकारे शोक व्यक्त केला: “माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे.” या दुःखातून मुक्तता मिळविण्यासाठी त्याने मरणाला देखील हसतहसत मिठी मारली असती. (ईयोब १०:१; १४:१३) तथापि, त्याला अशा प्रकारची भयंकर यातना असताना देखील त्याने देवाप्रती आपली सचोटी कायम राखली. यास्तव, यहोवाने “ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले.” अशा प्रकारे तो “वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन” शांतीने मरण पावला.—ईयोब ४२:१२, १७.
सहनशीलतेच्या बाबतीत ईयोबाने उदाहरण घालून दिले आहे आणि त्या उदाहरणाचे गोडवे आजही गायले जातात. त्याच्यावर आलेल्या परीक्षांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व सुधारले तसेच इतरांना देखील चांगली कामे करण्यासाठी प्रेरणा मिळाली. (याकोब ५:१०, ११) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ईयोबाच्या अखंड सचोटीमुळे यहोवाचे अंतःकरण आनंदी झाले होते. (नीतिसूत्रे २७:११) अशाप्रकारे, दुःखाचा हा भयानक अनुभव देवत्व, विश्वास आणि सचोटीच्या जबरदस्त विजयात परिणीत झाला ज्यामुळे ईयोबाला तसेच त्याच्या उदाहरणाने प्रेरित झालेल्या सर्वांना अनेक आशीर्वाद प्राप्त झाले.
विविध परीक्षा असतानाही आशा
ईयोबाप्रमाणे तुम्हावर देखील परीक्षा येतील. कदाचित तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे तुम्ही भावनिकरीत्या अगदी सुन्न झालेले असाल. गंभीर आजारामुळे तुम्हाला जगणे सुद्धा कमालीचे दुःखमय वाटत असेल. हृदयविदारक घटस्फोटामुळे तुम्हाला तुमचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त झाल्याचे भासत असेल. आर्थिक तोट्यांमुळे तुम्ही कदाचित कंगाल व्हाल. खऱ्या उपासनेच्या द्वेषी विरोधकांनी केलेल्या छळाचे तुम्ही कदाचित भक्ष्य झालेले असाल. तुमच्या परीक्षांचा सामना करण्याच्या संघर्षामुळे तुमच्या भवितव्यात कोणतीही आशा नसल्याचे तुम्हाला कदाचित वाटत असेल.—१ पेत्र १:६.
निराशेपुढे हात टेकण्याऐवजी तुम्ही स्वतःला असे विचारा, ‘मी दुःख का अनुभत आहे?’ दियाबल सैतानाला अर्थात “दुष्टाला वश” झालेल्या जगात तुम्ही जगत असल्यामुळे तुम्हाला दुःख भोगावे लागत आहे. (१ योहान ५:१९) परिणामी, सर्व जण दुःख भोगत आहेत. आपल्यांतील प्रत्येक जण राज्याच्या संदेशासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे या ‘कठीण दिवसांत’ अगदी सामान्य असणाऱ्या दियाबल-प्रेरित द्वेषामुळे, इतरांच्या झोंबणाऱ्या शब्दांमुळे किंवा अभक्त वर्तनाच्या भयंकर कामांमुळे प्रभावित होतो.—२ तीमथ्य ३:१-५.
तुमच्या जीवनात एखादी शोकांतिका घडली असल्यास “कालवश व दैववश” या गोष्टींचे तुम्ही बळी ठरलेले असाल. (उपदेशक ९:११) दुसऱ्या बाजूला पाहता, आपल्याला प्राप्त झालेल्या पापी वारशामुळे जीवनात काहीवेळा विपरीत घडते. (रोमकर ५:१२) तुम्ही एखादी गंभीर चूक जरी केली असली तरी पश्चात्ताप केल्यास आणि आध्यात्मिक मदत मागितल्यास देवाने तुमचा त्याग केला आहे, असे समजू नका. (स्तोत्र १०३:१०-१४; याकोब ५:१३-१५) तो आपली सर्वांपेक्षा जास्त काळजी घेतो. (१ पेत्र ५:६, ७) तुम्ही या गोष्टीची खात्री करू शकता, की “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) तुम्ही कितीही दुःखमय किंवा गंभीर परीक्षेत असला तरी त्या परीक्षेतून पार होण्यासाठी यहोवा तुम्हाला सुज्ञान देऊ शकतो. (याकोब १:५-८) यहोवा आपले सर्व घाव भरून काढू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्यावर त्याची कृपापसंती असते तेव्हा जीवनाचे बक्षीस प्राप्त करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही.—रोमकर ८:३८, ३९.
परीक्षांचा काही लाभ होऊ शकतो का?
“निराशेतही आशा ही असतेच” अशी जुनी म्हण आहे. थोडक्यात असे म्हणता येईल, की परिस्थिती कितीही विकोपाला गेली तरी त्यातून आपल्याला आशेचा किरण नेहमी दिसू शकतो. देवाच्या वचनात जे काही लिहिले आहे, त्याचा हाच उद्देश आहे की, “आपण आशा धरावी.” (रोमकर १५:४) तुमची दैनावस्था कितीही गंभीर असली तरी बायबलमधील अभिवचनांमुळे आणि त्यातील तत्त्वांमुळे तुमचा आनंद आणि तुमची आशा तुम्हाला पुन्हा मिळू शकते.
शास्त्रवचने हे दाखवून देतात, की देवावर प्रेम करणाऱ्यांसमोर ठेवलेल्या अनंत आशीर्वादांशी तुलना करता आपल्यावर येणारे ‘संकट हे तात्कालिक व हलके’ आहे. (२ करिंथकर ४:१६-१८) बायबल हे देखील दाखवून देते, की परीक्षांमध्ये असताना विकसित केलेले ईश्वरी गुण कीर्ती आणि भौतिक संपत्तीपेक्षा फार मौल्यवान आहेत. (१ योहान २:१५-१७) अशा प्रकारे, दुःखामुळे देखील लाभ होऊ शकतो. (इब्री लोकांस ५:८) खरे तर, तुम्ही परीक्षांदरम्यान जे काही शिकलात ते लागू केल्याने तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद मिळू शकतात.
कठीण परीक्षेमुळे तुम्ही अधिक परिपक्व व्हाल. गतकाळात तुमच्या स्वभावामुळे इतरांना त्रास झाला होता आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला देखील खीळ बसली होती, हे तुम्ही मान्य कराल. कदाचित तुम्ही फाजील आत्मविश्वासी होता परंतु तुमच्यावर एखादे संकट कोसळल्यानंतर तुम्हाला हे समजण्यास फार वेळ लागला नसेल, की तुम्ही किती दुर्बल आहात आणि तुम्हाला इतरांच्या मदतीची किती गरज आहे. तुमच्या परीक्षेने तुम्हाला हा धडा शिकवला असल्यास आणि तुम्ही तुमच्यात आवश्यक ते बदल केले असल्यास त्या परीक्षेचा तुम्हाला फायदाच झाला आहे.
गतकाळात तुमचा रागाचा पारा लगेच चढत असल्यामुळे इतरांचे तुमच्याशी पटत नव्हते त्याबद्दल काय? यामुळे कदाचित तुमची प्रकृती देखील ढासळलेली असेल. (नीतिसूत्रे १४:२९, ३०) परंतु, आता परिस्थितीमध्ये पुष्कळ सुधारणा झालेली असेल कारण इंद्रीयदमन दाखविण्यासाठी तुम्हाला मदत मिळावी म्हणून तुम्ही देवाच्या आत्म्यावर विसंबून राहत आहात.—गलतीकर ५:२२, २३.
एकेकाळी चुका करणाऱ्यांप्रती दयाशील असण्यासाठी इतरांप्रमाणे तुमच्याकडे कदाचित इतकी करुणा नव्हती. परंतु, तुमच्या स्वतःवर जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आली तेव्हा तुम्ही क्षमेची मनःपूर्वक अपेक्षा केली होती त्यामुळे आता तुम्ही देखील इतरांना दया दाखविण्यात विशेष प्रयत्न करता. तुमच्याप्रती दाखविण्यात आलेली मनःपूर्वक सहानुभूती, काळजी आणि दया यामुळे तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते, की पश्चात्तापी पापी व्यक्तींप्रती देखील तुम्ही अशाच प्रकारचे गुण प्रदर्शित केले पाहिजेत. तुमच्यावर आलेल्या दुःखामुळे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वातील या उणिवा दूर करण्यासाठी प्रेरित झाला असल्यास तुमच्या अनुभवाचा तुम्हाला मिळालेला तो एक लाभ आहे. “दया न्यायावर विजय मिळविते,” हे तुम्ही शिकला आहात.—याकोब २:१३; मत्तय ५:७.
ख्रिस्ती मंडळीची शिस्त म्हणून तुमचे विशेषाधिकार काढून घेतल्यास किंवा इतरांच्या नजरेत तुम्ही पडल्यास काय? निराश होऊ नका. शिस्तीच्या कार्यवाहीमुळे मंडळीला शुद्ध ठेवण्यास मदत होते; परंतु पातक्याची आध्यात्मिक पुनर्स्थापना हा त्या शिस्तीचा एक उद्देश आहे. हे मान्य आहे, की “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १२:११) शिस्तीमुळे जरी एखाद्यास जबरदस्त तडाखा बसत असला तरी देखील नम्रपणे पश्चात्ताप करणारा मनुष्य यामुळे आशाहीन राहत नाही. प्राचीन इस्राएलाच्या दावीद राजाला त्याने केलेल्या पातकाची कडक शिक्षा देण्यात आली होती तरी देखील त्याने पश्चात्ताप केला आणि कालांतराने त्याला उल्लेखनीय विश्वास बाळगणारा मनुष्य म्हणून गौरवण्यात आले.—२ शमुवेल १२:७-१२; स्तोत्र ३२:५; इब्री लोकांस ११:३२-३४.
परीक्षेमुळे तुमच्या दृष्टिकोनामध्ये देखील फार मोठा फरक पडू शकतो. भौतिक ध्येयांवर आणि अशा साध्यतांवर तुमचे लक्ष केंद्रित होते ज्यामुळे तुम्ही नावारूपाला आले आहात तसेच या जगात तुम्हाला सामाजित स्थान मिळाले आहे. कदाचित आर्थिक हानीशी किंवा भौतिक तोट्याशी संबंधित असलेल्या परीक्षेने अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रित केले असेल. (पडताळा फिलिप्पैकर १:१०.) आता तुम्हाला या गोष्टीची खात्री पटते, की पवित्र सेवेतील आध्यात्मिक मूल्यांमुळे आणि ध्येयांमुळेच तुम्हाला खरा आनंद आणि चिरस्थायी समाधान मिळते.
यहोवावर भाव ठेवा
यहोवाला पवित्र सेवा सादर करत असल्यामुळे ख्रिस्ती विश्वासास विरोध करणाऱ्यांद्वारे तुमचा कदाचित छळ होईल आणि तुम्हाला भोग भोगावे लागतील. अशा परीक्षेमुळे तुम्हाला पायदळी तुडवल्यासारखे वाटेल; परंतु त्यातून देखील काहीतरी लाभ होऊ शकतो. अशा परीक्षेमुळे तुमचा विश्वास मजबूत होईल. खेरीज, तुमची चिकाटी पाहून इतर जणांना देखील ज्यांचा छळ होत आहे उत्तेजन आणि सामर्थ्य प्राप्त होईल. तुमची चांगली वागणूक पाहून अनेक जण देवाची स्तुती करण्यासाठी प्रेरित होतील. इतकेच काय तर तुमच्या विरोधकांना देखील स्वतःची लज्जा वाटेल आणि तुमच्या चांगल्या वर्तणुकीची ते ग्वाही सुद्धा देतील!—१ पेत्र २:१२; ३:१६.
छळाच्या वेळी तुम्ही निराश होऊ नये म्हणून यहोवावर भाव ठेवण्याची तुम्हाला गरज आहे. त्याचे वचन हे दाखवून देते, की परीक्षेतून सुटका नक्की होईल; परंतु तुमच्या मनात आले आणि तुमची सुटका झाली असे मात्र होणार नाही. तोपर्यंत “बरे करताना खचू नका.” (२ थेस्सलनीकाकर ३:१३) परीक्षांना तोंड देण्याचा आणि त्या सहन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अगदी आशाहीन वाटत असल्यास ‘आपला भार परमेश्वरावर टाका म्हणजे तो तुमचा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.’ (स्तोत्र ५५:२२) स्वतःची कीव करत बसण्याऐवजी, तुम्ही यहोवाला ओळखल्यामुळे, त्याच्या लोकांमध्ये तुम्हाला स्थान प्राप्त झाल्यामुळे आणि अनंत जीवनाची आशा मिळाल्यामुळे तुम्ही किती आशीर्वादित झाला आहात याचा जरा विचार करा.—योहान ३:१६, ३६.
अत्यावश्यक गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रित करा. सहनशीलतेसाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून यहोवाला रोज प्रार्थना करा. (फिलिप्पैकर ४:६, ७, १३) तुमचा छळ करणाऱ्यांसोबत जशास तसे वागण्याचा कोणताही विचार मनातून काढून टाका. सर्व गोष्टी यहोवाच्या हातांत सोपवून द्या. (रोमकर १२:१९) ख्रिस्ती गुण विकसित करण्याद्वारे तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा नेहमी प्रयत्न करा. (२ पेत्र १:५-८) वडील तुमच्या आध्यात्मिक गरजांची प्रेमळपणे काळजी घेतात त्यामुळे त्यांच्यासहित इतर जणांनी तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याची कदर बाळगा. (इब्री लोकांस १३:७, १७) यहोवाला विश्वासू राहा आणि जीवनाच्या बक्षिसावर तुमचे लक्ष ठेवा, असा विश्वास बाळगून, की मृत्यू देखील तुमच्यापासून ते बक्षीस हिरावून घेऊ शकत नाही.—योहान ५:२८, २९; १७:३.
तुम्ही सध्या अतिशय दुःखी असल्यास किंवा गंभीर परीक्षांचा सामना करीत असल्यास ‘आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा’ आणि कालांतराने तुमचा शोक आणि दुःख नाहीसे होऊन तुम्हाला विपुल आनंदाची प्राप्ती होईल. (नीतिसूत्रे ३:५, ६; योहान १६:२०) ईयोबाप्रमाणे यहोवा तुम्हालाही आशीर्वादित करतो तेव्हा यातनामय दुःख जाऊन तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुमच्या प्रतिफळाशी तुलना करता सध्याचे दुःख काहीच नाही. (पडताळा रोमकर ८:१८.) तुमच्या विश्वासू सहनशक्तीमुळे इतरांना उत्तेजन प्राप्त होऊ शकते आणि तुम्हाला ‘नव्या मनुष्यत्वाचे’ सुंदर ख्रिस्ती गुण विकसित करण्यास देखील मदत होऊ शकते. (इफिसकर ४:२३, २४; कलस्सैकर ३:१०, १२-१४) तर मग, हिंमत हारू नका कारण प्रेषित पौलाचा सुज्ञ सल्ला असा आहे: “देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे.”—१ पेत्र ४:१९.
[२३ पानांवरील चित्र]
ईयोबाप्रमाणे व्हा. आशा कधीही सोडू नका
[२४ पानांवरील चित्र]
संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेवा